Wednesday, May 27, 2020

नेटवरच्या मालिका


पाताळलोक, मिर्झापूर सेक्रेड गेम्स आपल्या येथील नेटवर चालणाऱ्या मालिका कलेच्या दृष्टिकोनातून खूपच वाईट आहेत. निर्मात्यांना कलाकृतीच्या नावाखाली विकृती दाखवण्यात जास्त रुची दिसते.
त्याचे पडसाद आपण अनुभवत आहोतच. समाजात क्रूरता, आततायीपणा  व विकृतीची झलक सभोवार दिसते.  आपल्या शत्रूचे कौतुक करताना दुःख होते पण काही पाकिस्तानी मालिका (हमसफर, सदके तुम्हारे, जिंदगी गुलजार है इत्यादी) इतक्या चांगल्या तऱ्हेने रेखाटल्या आहेत हे पाहून आपल्या 'सास बहू' व बाकीच्या मालिकांच्या निर्मात्यांनी व दिग्दर्शकांनी त्यांच्या कला कौशल्याचा पूनर्अभ्यास करून स्वतःला बदलणे जरूरी आहे. थोडा 'हमसफर' किंवा 'जिंदगी गुलजार है' अशा मालिकांचा अभ्यास केला तर दर्जेदार मालिका तयार करता येते हे आपल्या इकडील दिग्दर्शकांच्या लक्षात येईल.
भारतात दर्जेदार चित्रपट व मालिका पूर्वी बनत होत्या व तशाच दर्जेदार मालिका तयार करण्याची भरपूर क्षमता आजही आहे. पण भरकटलेल्या निर्मात्यांनी विकृत मालिका तयार करून कलेचा गळा घोटला आहे.  एवढेच नाही तर त्यामुळे बघणाऱ्यांचा दर्जेचा स्तर पण खालावला आहे. हल्लीच्या बहुतांश प्रेक्षकांना विकृत बघणे हे सामान्य वाटायला लागले आहे. विकृत हे सामान्य वाटायला लागणे हे समाजाच्या मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने घातक आहे. वरचेवर विकृती बघून मेंदू सरावतो व माणूस कधी विकृतीच्या अधीन जातो ते त्याचे त्यालाच कळत नाही. नेट वर सेंसॉर (नियंत्रण) लागू होऊ शकणार नसेल तर आपल्या येथे चित्रपटांसाठी सेंसॉरचा (नियंत्रणाचा) काय उपयोग. नियंत्रण लागू होऊ शकत नाही म्हणून चालू द्यावे ह्याला काय अर्थ आहे.  माहिती प्रसारण मंत्री काही करू शकतात का. करतील का.Thursday, May 21, 2020

हल्लीचे वार्ताहर

हल्लीच्या वार्ताहरांना मोदींच्या भाषणाची टिंगल टवाळी करायची सवय लागली आहे. ते काय बोलले. ह्या पेक्षा काही तरी दुसरेच तिकडम काढायची जणू चढाओढ लागलेली दिसते. मग ते स्वतःच्या सोशलमिडीया फेसबुक ट्विटर सारख्या माध्यमांतून काही तरी खरडतात. त्यांना माहीत आहे की मोदींचे खूप चाहते आहेत व त्यामुळे त्यांच्या मुळे त्यांच्या टिंगलटवाळीला पण लाईक्स मिळतील. जेणे करून स्वतःचे नाव कसे मोठे होईल असे काही तरी करायचे. परवाचे त्यांच्या वित्तीय पॅकेज व राष्ट्राला आत्मनिर्भर करण्यासंबंधाच्या भाषणाचे पण तसेच. ह्या वार्ताहरांना गोष्टीचे ना गांभीर्य कळते ना मोदी जे विषय हाताळतात त्यातली काही जाण आहे. काश्मीर चे ३७० कलम घ्या रफाल घ्या किंवा आत्मनिर्भर होण्यासाठी घेतलेले वित्तीय निर्णय. कोणी नीट अभ्यास करून लेख लिहिला आहे हे माझ्या पाहण्यात नाही. फक्त टिंगलटवाळी करून वेळ निभावून घ्यायची. हेच दिसते. ह्या सगळ्याने मोदींचे कार्य कमी होण्या पेक्षा वार्ताहरांचा अभ्यास कसा कमी पडतो हेच दिसून येते. 

Friday, April 24, 2020

वार्ताहर


सध्या मराठी बातम्या देणाऱ्या वाहिन्या व माध्यमांच्या विश्वासाहर्तेनी एकदम तळ गाठला आहे. छापील व डिजीटल माध्यमांचा पैसा कमावणे हा मोठा व्यवसाय झाला आहे. ह्या कारणामुळे वाहिन्यांचे व माध्यमांचे काम चालवण्यासाठी व पैसा मिळवण्यासाठी कोणत्या बातम्या कशा द्यायचा ह्याचे धोरण आखले जाते. ते बातम्या देत नाहीत तर त्यांच्या आवडत्या राजकीय पक्षाला साजेसं जनमत तयार कसे करता येईल त्या दृष्टिकोनातून बातम्यांची निवडकरून लोकांपर्यंत पोहोचवतात. असली माध्यमे व वाहिन्या PR Agency सारखे काम करतात. हे झाले माध्यमांचे. त्यात नोकरी करणाऱ्या वार्ताहरांची कथा तर अजून आगळी आहे. 
हल्लीचे वार्ताहर जर्नालिझमचा कोर्स करतात व कोणत्या न कोणत्या माध्यमातून किंवा बातम्या देणाऱ्या वाहिन्यांतून आपली कारकीर्द सुरू करतात. तरुण, हातात लेखणी व जनमानसांकडून माध्यमांना मिळणारा प्रतिसाद त्यामुळे हुरळून जाऊन बातम्या सोडून कोणत्याही विषयावर स्वतःचे अपरिपक्व मत लादण्यापलीकडे ते काहीच करत नाहीत. अश्यांना कोणत्याच विषयाचे विशेष ज्ञान नसते, अभ्यासू वृत्तीही नसते पण काहीतरी मत नोंदवायचे म्हणून लेखणीच्या जोरावर कोठच्याही विषयावर स्वतःचे मत खरडायला सतत तयार असतात. छापील किंवा डिजीटल प्रसिद्ध माध्यमांच्यामुळे वार्ताहर स्वतःला स्पेशल समजायला लागतात. त्यातले काही फेसबुकवर किंवा ट्विटरवर त्यांच्या पर्सनल प्रोफाइल वर राजकारणावर लेख लिहून आपल्या मित्रांकडून लाईकस् उकळतात. त्यांनी राजकारणावर लिहिलेल्या त्यांच्या मतांना फेसबुकवाले पावसाळी मित्र लाइक किंवा शेअर करायला उपयोगी पडतील म्हणून काही वार्ताहरांचा फेसबुक फ़्रेंड्स वाढवण्याचा उद्देश असतो. तेवढीच त्यांच्या नोकरीत पुढची पायरी गाठायला मदत म्हणायची. त्यातले काही वार्ताहर बेताचे असतात. त्यातून जर का काही कारणाने अशा वार्ताहरांना पंतप्रधान मोदी आवडत नसल्यास (संघ आवडत नाही म्हणून मोदी आवडत नाहीत म्हणून म्हणा किंवा त्यांना काही कारणाने दुसरा पक्ष निकटचा वाटतो किंवा मोदींविरुद्ध लिहिले की आपले TRP वाढते म्हणून म्हणा) त्यामुळे मोदींनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर फेसबुक व तत्सम सोशल मीडियावर उपहासात्मक किंवा वाईट काहीतरी गरळ ओकल्या सारखे खरडायचे. मग करोनाच्या लॉकडाऊन दरम्यान मोदींनी केलेल्या टाळ्या ठोका, थाळ्या बडवा किंवा दिवे लावा अशा विनंतीचा उपहास असो किंवा PM CARES फंड असो काही तरी टिंगल टवाळी करायची व आपल्या फेसबुकच्या मित्रांकडून लाईकस् ओरपायचे. फेसबुकच्या पर्सनल वॉलवर राजकारण लिहायचे, मतं मांडायची शिव्या घालायच्या व कोणी मित्राने विरुद्ध कमेंट केली की रुसायचे व म्हणायचे की आमची पर्सनल वॉल आहे. फेसबुकचे लाईकसाठी जमवलेले मित्र व खरे मित्र ह्यात फरक हाच.   पर्सनल वॉल पब्लिक केल्यावर असे काही तरी होणारच. अशा बेताच्या वार्ताहरांचे अजून एक लक्षण म्हणजे जर त्यांच्या आवडत्या नेत्याकडून किंवा त्यांच्या आवडत्या सरकारकडून ढिसाळ कारभार (कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त किंवा साधूंना पिटून मारण्यासारख्या बातम्या) आढळून आला तर त्यावर काणाडोळा करून आपल्या पर्सनल वॉलवर एकदम पर्सनल आयुष्याचे काहीतरी पोस्ट करून वेळ मारून न्यायची. अशा अपरिपक्व वार्ताहरांचे सध्या खूप पीक आले आहे. त्या पासून सर्व सुज्ञांनी सावधान राहणे जरूरीचे आहे. 

Saturday, April 11, 2020

हव्यासून्मुख


सहा महिने होतील तिनतीगाडीने सरकार बनवून. मी माझ्या वडलांना वचन दिले आहे त्यामुळे मला मुख्यमंत्री व्हायचेच आहे ह्या पासून सुरवात करून जरी १४४ जागांपैकी ५४ जागा मिळाल्या तरी बाकीच्या तिसऱ्या व चवथ्या क्रमांकाच्या पक्षांबरोबर हातमिळवणी करून कशी तरी गाडी हाकायला सुरवात केलीत. ह्या ५४ जागांत बहुतांशी जागा मोदींच्या व भाजपच्या प्रतिमेवर स्वार होऊन कशा घेतल्या हे सर्वज्ञातच आहे. पहिल्यांदा मुख्यमंत्रिपद पाहिजे ह्यापासून सुरू करून भाजप बरोबरची युती तोडून कोणा तिसऱ्या किंवा चवथ्याबरोबर बंधन रचले व जरी दोन्ही पक्षांपुढे साक्षात दंडवत घालावे लागले तेही पत्करून फक्त मुख्यमंत्री बनण्यासाठी खाते वाटप व मंत्र्यांच्या संख्येवर सुद्धा पडतं घेऊन मुख्यमंत्रिपद ओरपले. त्या दिवसापासून वाघाच्या पक्षप्रमुखांच्या हव्यासाचे खरे रूप दिसायला लागले.

कर्नाटकात वेगवेगळे लढल्यावर व भाजपच्या जागा सगळ्यात जास्त आल्यावर जसे संधीसाधूंनी दोन पक्ष एकत्र करून शहं देऊन सरकार स्थापले त्यापेक्षा भयंकर येथे झाले येथे तर निवडणूक पूर्व युतीबरोबर काडीमोड करून दुसऱ्या व तिसऱ्या बरोबर साठगाठ केली.

असे हे न निवडून आलेले मुख्यमंत्री झाले. एक फोटोग्राफर कलाकार खरोखरीच कलाकार निघाले. त्यांची फोटोग्राफीची कला आतापर्यंत कधीच जनमानसात स्थान उत्पन्न करू शकली नाही इतकी बेताचीच पण त्याच बरोबर व्यवस्थापनेचा कोणताच अधिकार नसलेल्या मुख्यमंत्र्याने फक्त खुर्ची सांभाळू सरकार चालवायला घेतले.

सगळ्या आधीच्या प्रकल्पांना स्थगिती देऊन काही प्रकल्प परत सुरू केले. आरे मधल्या मेट्रोशेड चे काम बंद करण्यापासून कमिटी द्वारा परत सुरू करण्या पर्यंत सगळ्यात वेळकाढू पणा. असे होणारच होते. ५४ जागा असल्यावर प्रत्येक दिवस खुर्ची सांभाळण्यातच जाणार त्यात हे पॅरॅशूट नी खाली आलेले स्वयंघोषित नेते फक्त नावावर चालणाऱ्या बाकीच्या पक्षांसारखेच वागायला लागले.

त्यातून जेव्हा आजचे संकट उद्भवले तेव्हा तर कहरच झाला. आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त संकट आहे. लोक मरत आहेत. तबलिगी संबंधित लोकांना अजून सरकार ओळखू शकले नाहीत. त्यामुळे चारी दिशांना असे वातावरण आहे की सरकार जणूकाही हात वर करून बसलेत असे वाटते.

मग काय फेसबुक शो करून, यू ट्यूब शो करून कसे तरी काही तरी करत आहे असे दाखवत राहायचे. काही वार्ताहरांना हाताशी घेऊन चांगले चांगले लेख लिहून घ्यायचे. फेसबुक व ट्विटर वर काहीतरी द्यायचे व टीआरपी वाढवायचा असे खेळ सुरू झाले. ह्या पेक्षा योगी आदित्यनाथ नवीन पटनाईक यदूरप्पा अमरींदर चौहान मैदानात उतरून काम करत आहेत. महाराष्ट्र ह्या संकटात शेवटच्या नंबरावर आणून ठेवण्यात अशा सरकारचा मोठा वाटा आहे.

पुढे कधीतरी मोजमाप होईल तेव्हा सर्वात निष्क्रिय असे सरकार व त्या सरकारचा म्होरक्या म्हणून ह्यांची गणना नक्की होईल. किंबहुना नेतृत्व कसे नसावे ह्याचे उदाहरणच ते ह्या पिढीच्या लोकांपुढे जणू ठेवत आहेत.
जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते सदस्य पण नव्हते सहा महिन्यात सदनाचे सदस्य झाले नाहीत तर राजीनामा द्यावा लागेल. हा तेढ सोडवण्यासाठी स्वतःला सदनाच्या सदस्याची नियुक्ती करवून घेतली हा सगळ्यात हास्यास्पद कार्यक्रम महाराजांनी करून राजकारणातला नीचांकच गाठला आहे. ह्या बाबतीत मात्र असे म्हणता येईल की दिलेले वचन रडून का पण पूर्ण करून दाखवले. किती दिवस मिरवता येईल तेवढे बघायचे. अजून काही महिने कदाचित. तोवर असे म्हणायला हरकत नाही – मुख्यमंत्री व्हायचे जसे तसे पण व्हायचे  - उध्ववजी तुम्ही करून दाखवलंत!!!!!!

Thursday, December 26, 2019

नागरिकत्व सुधारणा कायदा (२०१९)काय आहे नागरिकत्व सुधारणा कायदा (२०१९)?  - पाकिस्तान, अफघाणिस्तान, बांगलादेश हे इस्लाम बहूल देश आहेत. ह्या देशात राहाणाऱ्या हिंदू, बौद्ध, शीख, ईसाई, जैन व पारसी  प्रजेला लागू होणारा हा कायदा आहे. ते तेथे अल्पसंख्याक आहेत. ह्या तीन देशातल्या अल्पसंख्यांवर धर्मामुळे होणाऱ्या छळाला कंटाळून ही लोकं भारतात पळून आली होती. २०१४ डिसेंबर पर्यंत भारतात पळून आलेले व निर्वासित छावण्यांतून इतकी वर्ष राहत असलेल्यांना नागरिकत्व बहाल करणारा हा कायदा आहे. २०१६ मध्येच हे विधेयक लोकसभेत पारित झाले होते. संख्येच्या अभावी राज्यसभेमध्ये पारित होऊ शकले नाही व विधेयक शोध समितीकडे पाठवण्यात आले होते. ईशान्य प्रदेशात आदिवासी लोकांची संस्कृती जपण्यासाठी हा कायदा आसाम, मेघालय, मिझोराम त्रिपुरा व त्याच बरोबर इनर लाइन परमिटाला लागू होणार नाही ह्याची काळजी घेतली गेली आहे.

हा कायदा कोणासाठी व कशासाठी? – धर्माधिष्ठित छळ ह्या तीन देशात अविरत होत आहेत व ह्याचा परिणाम असा की गेल्या ७० सालात हिंदू व बाकी अल्पसंख्याकांची संख्या ३० टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत येऊन ठेपली आहे. काय झाले तेथल्या हिंदू व इतर अल्पसंख्याकांचे बरेच मारले गेले, काही, छळामुळे धर्मांतरित झाले व काही, येथे पळून आले. त्यांना आपल्या देशाशिवाय दुसरा पर्याय नाही, दुसरा आसरा नाही. अशा सगळ्या लोकांना आपल्या देशात सामावून घेणे हे आपल्या संस्कृतीला अनुसरून आहे व आपले कर्तव्य आहे. ह्या कायद्यात ते सुलभ केले आहे.

ह्याला विरोध कोणाचा व का? ईशान्य प्रदेशातल्या लोकांना वाटते की नागरिकत्व कायद्याने त्यांच्या आदिवासी संस्कृतीवर सावट येईल. पण इनर लाईन परमिटाने त्यांना वाटणारी भीती चुकीची आहे व भ्रमित करणारी आहे. बाकीच्या ठिकाणी विरोधकांना वाटते की ह्या मुद्द्याचा उपयोग करून मतांच्या राजनीतीने धृवीकरण करणे सहज शक्य आहे व त्यांच्या पक्षाला निवडणुकांमध्ये अशा धृवीकरणाने मोठा फायदा होईल. त्यामुळे अफवा पसरवल्या जात आहेत व भीतीचे वातावरण तयार करण्याचे काम चालू आहे. काही बेजबाबदार मीडियावरून असे दाखवले जात आहे की देशभरातले विद्यार्थी ह्या कायद्याच्या विरोधात आहेत. वस्तुस्थिती वेगळीच आहे.  भारतात पाचशेहून अधिक विद्यापीठे व ३८ हजारापेक्षा अधिक विद्यालये आहेत व विरोध फक्त बोटावर मोजता येतील इतक्याच संस्थांमधून होत आहे त्यात जामीया मिलिया, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ जाधवपूर विद्यापीठ प्रामुख्याने आहेत.

खरे काय आहे? भारतीय नागरिकांना ह्या कायद्याने काही नुकसान होणार नाही. फक्त पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेशात राहणाऱ्या हिंदू, बौद्ध, शीख, ईसाई, जैन व पारसी  लोकं ज्यांना रात्रंदिवस छळाला सामोरे जावे लागते अशा लोकांना भारताचे नागरिकत्व बहाल करणारा हा कायदा आहे. 

Tuesday, September 17, 2019

१९७१ चे अभिमन्यू (पुस्तक पाचवे)


१९७१ चे अभिमन्यू – प्रा सु ग शेवडे गणपतीच्या मंदिरात प्रवचने घ्यायचे. महाभारतातील महत्त्वाची पात्रे, हिंदू धर्म, सावरकर, असे विषय असायचे. आम्ही जायचो त्या प्रवचनांना. त्यांची प्रवचने मला खूप आवडायची. त्यांनी लिहिलेले एक पुस्तक १९७१ चे अभिमन्यू हे वाचण्यात आले. मी आठवीत असेन. १९७१ च्या भारत पाक युद्धात आपल्या आर्मी नेव्ही व एअर फोर्स मधल्या आधिकाऱ्यांची कर्तबगारी व त्यांच्या हौतात्म्यांच्या गोष्टी होत्या.
हुतात्मा हा शब्द सावरकरांनी मराठीला दिलेला आहे. संस्कृत मधला हुत म्हणजे बलिदान (मराठी मध्ये) sacrifice English मध्ये. हुताग्नी, आहुती इत्यादी शब्द हुत ह्या पासून जन्म घेतात. जो आत्मा देशासाठी स्वतःची आहुती देतो तो हुतात्मा. ह्या आधी आपण शहीद हा शब्द वापरायचो तो फारसी शब्द आहे. अशी हुतात्मा ह्या शब्दाची उत्पत्ती
हे पुस्तक वाचून व माझा मामा मराठा लाइट इन्फंट्री मध्ये होता त्या मुळे मला आर्मी मध्ये जावे असे वाटू लागले. पुस्तक अगदी छोटे १०० पानी पण माझा जीवनक्रम बदलण्यात त्या पुस्तकाचा सिंहाचा वाटा म्हणून येथे देतो. पुस्तकाचे कव्हर सापडत नाही म्हणून देत नाही. पण मला आठवते ते अगदी साधे होते. पिवळ्या पुठ्ठ्याचे कव्हर. त्यावर पुस्तकाच्या वरच्या बाजूला लाल अक्षरात छापले होते १९७१ चे अभिमन्यू. ते पुस्तक पुण्याला आहे घरी. पण आता ते पुस्तकाचा फोटो काढायला घरी जावे लागेल जे इतक्यांत जमणार नाही.

Monday, August 12, 2019

राजे शिवछत्रपती (पुस्तक चवथे)

राजे शिवछत्रपती
बमोंची डोंबिवलीतल्या नहरू प्रांगणात राजे शिवछत्रपतींवरची व्याख्याने ऐकली. सात दिवस रोज चालणारी ती व्याख्याने म्हणजे मेजवानी असायची. नंतर हे पुस्तक वाचले. पूर्वार्ध व उत्तरार्ध अशा दोन भागात असणारे पुस्तक शिवरायाच्या जन्मा आधी महाराष्ट्रात व हिंदुस्तानात काय हिंदूंची दशा होती त्या पासून सुरू होऊन शिवरायांच्या अंतकाला पर्यंतचा इतिहास उत्तम तऱ्हेने दिलेला आहे. आपल्या डोळ्या समोर गड आला पण सिंह गेला, अफझलखानाची हत्या, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची बोटे, बाजी प्रभूंचा पराक्रम सगळे उभे राहते. ह्या पुस्तका मुळेच मी शिवरायांचा भक्त झालो व मनोमन पटले की जर शिवराय नसते तर महाराष्ट्रात आज हिंदू कोण असे म्हणावे लागले असते. आपण सारे बाटगे मुसलमान झालो असतो.
अशा ह्या महान पुस्तकाला मानाचा कुर्निसात.
माझ्याकडे ह्या पुस्तकाची जी प्रत आहे पूर्वार्ध २१ (मोठ्या आकाराची ५१२ पाने) व उत्तरार्ध (मोठ्या आकाराची ४९० पाने) अशी पुठ्ठ्याची बांधणी असून प्रत्येकी किंमत २१ रु अशी लिहिली आहे.Sunday, June 23, 2019

सहा सोनेरी पाने (पुस्तक तिसरे)


स्वातंत्र्यवीरांच्या मौक्तिकांमधले सगळ्यात महत्त्वाचे एक. आठवी नववी व दहावी ह्या इयत्तेत असताना हे वाचले. त्या वेळी डोंबिवली नगरपालिकेचे वाचनालय खूप छान व चांगली पुस्तके असणारे चांगले ठेवलेले वाचनालय होते. आता कसे आहे माहीत नाही.
पहिल्यांदा हे पुस्तक तेथून वाचले व मग एका पुस्तक प्रदर्शनात विकत घेतले. माझी जन्म ठेप, काळेपणी कादंबरीतला डोलकाठी अजून आठवतो. पण आपल्या राष्ट्राचा अलौकिक इतिहास कधी मॅकॉलेच्या शिक्षणात समजलाच नाव्हता तो समजला.
माझ्या जीवनावर त्याचा खूप प्रभाव आहे. सहा सोनेरी पाने जो पर्यंत आपण वाचत नाही तो पर्यंत आपल्याला आपला इतिहास फक्त पराभवाचा आहे असेच वाटत राहते. आपल्या धर्मातील सात दोष (बंदी) व त्या मुळे झालेली हानी लक्षात येते.
मी हे who are we असे हल्लीच्या घाल माती काढ गणपती छाप पिढीसाठी सोनेरी पानांवरून लिहिले आहे. जरूर वाचावे


Monday, May 27, 2019

व्यक्ती आणि वल्ली (दुसरे पुस्तक)सहावी सातवीत गेल्यावर पुलंचे व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक वाचले. चितळे मास्तर, नारायण, म्हैस, पेस्तनजी अशा अनेक काल्पनिक व्यक्तींची व्यक्ती चित्रे त्यांनी रंगवली होती. मजा यायची वाचताना. प्रत्येक व्यक्ती चित्रात आपल्या घरातला, नात्यातला किंवा मित्र परिवारातल्या व्यक्तीचे प्रतिबिंब दिसल्याचा भास व्हायचा. त्यांची शैली सर्वश्रुतच आहे. 
वाटायचे आपणही असे लिहावे. असे कथाकथन करता यावे. मी काही व्यक्तीं विषयी वर्णने लिहिली सुद्धा होती पण ती फाइल कोठे तरी पोस्टिंग मध्ये हरवून गेली. मी आर्मीत असल्या कारणाने दर दोन तीन वर्षांनी बदली असायची. त्यात गेली. बरेच लेख गेले त्यात. पण त्या नंतर बोलघेवडा हा ब्लॉग सुरू केला. आता हरवत नाही. 
हल्लीच एक काल्पनिक व्यक्तिचित्र ‘कमुताई’ लिहिले आहे. रामनामाचा उपयोग काउन्सेलिंग पेक्षा सरस पद्धतीने कसा करता येतो ते ह्यात दाखवले आहे. 


Thursday, May 23, 2019

पुस्तक दिंडी

आईची देणगी - पुस्तक १
– गोनीदांचा गोष्टींचा संग्रह मी लहान होतो तेव्हा आई वाचून दाखवायची किंवा त्यातल्या गोष्टी सांगायची. त्यात राम, कृष्ण, शिवाजी, तुकाराम, एकनाथ, रामदास, लोकमान्य टिळक, नेताजी ह्या व अनेक महानुभावांच्या थोडक्यात गोष्टी होत्या. रामायण व महाभारतातल्या गोष्टी होत्या. आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या गोष्टी होत्या. प्रत्येक गोष्टीत संस्काराचे धडे असायचे. मला गोष्टींची आवड तेव्हा पासून लागली. रोज संध्याकाळी एखादी गोष्ट वाचली जायची. त्यानंतर ते पुस्तक दर दिवाळीत वाचले गेले होते. त्यात शिकवलेले संस्कार मनात ठसत होते ते त्या वेळेला समजले सुद्धा नव्हते.
आमच्या लहानपणी पुस्तकाचे मुखपृष्ठ वेगळ्याच प्रकारचे होते. लहान लहान चौकोनात काढलेल्या चित्रांचे ते पृष्ठ होते. ती चित्र आम्ही तासनतास बघत बसायचो. आता त्याचे मुखपृष्ठ वेगळे झाले आहे बहुदा. पुस्तक दिंडीतले माझी पहिली निवड.