Thursday, March 17, 2016

राजाराम सीताराम ..............भाग १५ ----------- सूट्टीसाठी आतूर


सूट्टीसाठी आतूर

 

भदराज कँप झाल्या नंतर आमच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा पंधरा दिवसात होणार होत्या. त्या आधी फायरिंगची परीक्षा होणार होती. ह्या परीक्षेनंतर आम्हाला चार दिवसाची सत्र संपल्याची सुट्टी मिळणार होती. आम्ही सगळे त्या सुट्टीची वाट बघत होतो. आम्हा प्रत्येकालाच घरी कधी जातो असे झाले होते. ह्या पंधरा दिवसात दोन घटना घडल्या. एक घटना माझ्याशी निगडित होती व एक आम्हा सगळ्यांशी निगडित होती. सोमवार पासून पुढचे चार दिवस आमची फायरिंग होती. खरे तर फायरिंगची परीक्षाच होती. आता एव्हाना आमची फायरिंगची ड्रिल पक्की झाली होती. त्यामुळे स्टॅन्ड फाईव्ह - जेथे फायरिंग होणार होती तेथे गेल्यावर कश्या तुकड्या पाडायचे कसे उस्तादाच्या हुकमांवर फायरिंग करायचे हे सगळ्यांना माहीत होते. स्टॅन्ड फाईव्ह आमच्या बॅरॅक्स् पासून साधारण पाच किलोमीटर दूर होता. सोमवारी सकाळीच आम्ही कोत मध्ये जाऊन आमच्या प्रत्येकाच्या नावावर असलेल्या सर्व्हिस रायफल्स, कार्बाईनस्, पिस्तोल घेतल्या व आठ आठ सायकलीचा स्क्वॉड करून स्टॅन्ड फाईव्हकडे कूच केली.

 

आम्ही फायरिंग रेंजवर सायकली लावल्या. रेंजवर आल्यावर नेहमी प्रमाणे वॉर्म अप् रगडा कष्ट दे मिश्राने लावला व फायरिंग सुरू झाली. खरे म्हणजे हे शेवटचे पंधरा दिवस आम्हाला सगळ्यांनाच जिवावर आले होते. घरी जाण्यास उतावीळ झालो होतो. असे वाटायचे की कसे तरी करून संपत आलेल्या सत्राचे शेवटचे पंधरा दिवस एका दिवसात फटाफट फास्ट फॉरवर्ड करून संपवावेत. सगळेच अधीर झाले होते व हा अधीरपणा आमच्या प्रत्येक हालचालीत दिसायला लागला होता. एकतर सुट्टी मिळणार ह्याचा आनंद व पंधरा दिवसात पहिले सत्र संपवून शेवटच्या सत्रात पदार्पण करून आम्ही सिनियर होणार ह्याची आम्हावर धुंदी यायला लागली होती. पंधरा दिवसाचा कार्यक्रम सगळ्यांनाच माहीत होता. आमच्यात वेगळीच ऊर्जा झळकायला लागली होती. फायरिंग झाल्यावर आमच्या लेखी परीक्षा. ह्या परीक्षांची तयारी अशी नसतेच कारण सततच आमच्याकडून शारीरिक अभ्यास व युद्धशास्त्राचा अभ्यास करवून घेतला जायचा. लागलीच पुढच्या दोन दिवसात परीक्षेचा निकाल व मग चार दिवसाची सुट्टी. आम्ही चक्क घरी जाऊ शकणार होतो. विषयात नापास होणाऱ्या जिसीजना पास होई पर्यंत सुट्टी मिळणार नव्हती, म्हणजे थोडक्यात त्यांच्या चार दिवसाच्या सुट्टीला पास मिळणार होता. ज्या जिसीजची शिक्षा सुरू असेल त्यांना सुट्टीत घरी जाऊ देणार नव्हते. सुनील खेरच्या अठ्ठावीस रेस्ट्रिकशन्स संपल्या नसल्यामुळे साहजिकच त्याला सुट्टी नव्हती. पण त्याला त्याची फिक्र नव्हती. त्याची आई वाचली ह्यातच त्याला समाधान. आयएमएने ह्याच चार दिवसात काही अॅडव्हेनचर सहली आखलेल्या होत्या. आमच्यातले काही हौशी घरी जाण्या ऐवजी ह्या अॅडव्हेनचर सहलींना जाणार होते. ह्यात पॅराग्लायडींग, पॅरासेलींग, बद्रीनाथ केदारनाथच्या पर्वतांवर गिर्यारोहण, गंगेतून रिव्हर राफ्टींग, हॉट एअर बलूनींग अशा अनेक प्रकारच्या सहली आयोजल्या होत्या.

 

आमच्या सारख्यांचा मात्र घरी जायचा पक्का बेत होता. आमच्या कडून कॅप्टन गिलने कोठच्या गाडीचे आरक्षण करायचे हे लिहून घेतले होते. त्या वेळेला रांगेत उभे राहूनच आरक्षण करावे लागायचे व ते आम्हा जिसीज् ना शक्य नव्हते. तो आम्हा सगळ्यांचे रेल्वेचे आरक्षण करणार होता. त्यामुळे ती काळजी मिटली होती. ह्याच कारणासाठी आम्हाला कॅप्टन गिल आवडायचा. तो असल्या गोष्टी सहजच समजून करायचा. अश्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आम्ही त्याचे चाहते झालो होतो. असा सगळा पुढच्या पंधरा दिवसाचा बेत माहीत असल्या मुळे पंधरा दिवसाचा वेळ कमी कसा करायचा तेवढेच राहिले होते.

 

रोज फायरिंग झाल्यावर रायफलचे बॅरल पुलथृने साफ करावे लागायचे. पुलथृ म्हणजे एका दोरीच्या टोकाला मुलायम कपड्याची चिंधी बांधलेली असते. फायरिंग झाल्यावर एका बाजूने बॅरल मध्ये ही चिंधी घालायची व दोरीने दुसऱ्या बाजूने ती ओढायची. म्हणजे बॅरल मध्ये चिकटलेला काडतुसांतून निघालेल्या धूरा बरोबर निघालेले कण व बारूदाचे अवशेष साफ होतात. हे अवशेष असेच राहिले तर बॅरल आतून गंजते व रायफलचे बॅरल लवकर खराब होते. दोरीने चिंधी ओढून बॅरल साफ करतो म्हणून त्या चिंधी व दोरीला पुलथृ म्हणतात. आपल्या रायफलची अशी काळजी घेणे हा प्रत्येक सैनिकाचा धर्म असतो. अधिकारी असो व शिपाई, आपल्या शस्त्राची काळजी आपण स्वतः घ्यायची ही शिकवण आयएमेतच दिली जाते. त्याने आपल्याला आपल्या शस्त्रावर विश्वास बसतो. आपली रायफल किंवा कार्बाईन आपल्याला जास्त कळते व ह्याचा फायदा युद्धात होतो. कोणीतरी दुसऱ्याने रायफलची काळजी घ्यायची व आपण ती वापरायची हे शक्यच नाही.

 

फायरिंगचा शेवटचा दिवस होता. आमचा अधीरपणा हालचालीत, वागण्यात दिसत होता. घरी जायच्या घाईपेक्षा आमच्यातल्या काहींची सीनियर होण्याची धुंदी, व वाढता  वागणुकीतला बेफिक्रपणा जाणवू लागला होता. गुरवारच्या फायरिंग नंतर आमचे क्लासेस माणेकशॉ सभागृहात भरणार होते. त्या दिवशी कोत मधून रायफली घेण्यात आम्हाला उशीर झाला, त्यांमुळे स्टॅन्ड फाईव्ह वर आम्ही कसे बसे वेळेत पोहोचलो. पोहचल्या बरोबर आम्ही सायकली लावल्या. लावल्या कसल्या आमच्यातल्या काहीने जिथे जागा मिळेल तेथे फेकल्या व फॉलईनसाठी पळालो. वेळेत पोहोचलो नसतो तर कष्ट दे मिश्राने लोळवलेच असते. आज शेवटचा दिवस, कष्ट दे मिश्राच्या कचाट्यातून सुटणार. आम्ही फॉलइनमध्ये उभे असताना, रिपोर्ट घेता घेता कष्ट दे मिश्राने आमच्या सायकलींकडे बघून तिरसट चेहऱ्याने म्हणाला

 

"लगता नही हैं, आप सीनियर्स होने जा रहे हैं। सीनियर्स होनेके नाते नये आनेवाले जिसीज को डिसिप्लीन सिखाना होता हैं। मगर हमको ऐसा दिखाई दे रहा हैं की आपका डिसिप्लीन बहुत ढिला पड गया हैं। आप लोगोने आपकी सायकल कैसी फेकी हूई हैं। बहुत बूरा बहुत ढिला डिसिप्लीन।"

 

कष्टदे मिश्राच्या ह्या वाक्याने आम्हाला वाटले, फायरिंग संपली. आता खूप रगडा लागणार. मनात आले. शेवटचा दिवस आहे घेऊ रगडा काय बिघडणार आहे. पण असे काहीच झाले नाही. बहुतेक आज फायरिंगचा शेवटचा दिवस होता व कष्ट दे मिश्राला फायरिंग संपवायचीच होती.  नेहमीच्या रगड्या नंतर आम्ही फायरिंग संपवली. रायफल मध्ये पुलथृ मारली. हे सगळे करता करता पाऊण वाजता आम्ही मोकळे झालो. पुढचा कार्यक्रम होता माणेकशा बटालियनच्या सभागृहात जाण्याचा. ते स्टॅन्ड फाईव्ह पासून पाच किलोमीटर दूर. जाता जाता आधी रायफली कोत मध्ये जमा करायच्या होत्या, फायरिंगचे कपडे बदलून युनिफॉर्म घालायचा, मेस मध्ये जाऊन जेवायचे व दुपारी अडीच वाजता सभागृहात पोहोचायचे होते. आमच्याकडे साधारण पावणे दोन तास होते. नेहमीच्या आराखड्यात हे सहज जमणारे होते. वीस मिनिटे सायकलने कोत पर्यंत, वीस मिनिटे कोत मध्ये रायफल ठेवणे, युनिफॉर्म बदलणे व दुपारच्या जेवणाला अजून अर्धा तास. सहज शक्य होते.

 

आम्ही सायकली घ्यायला जेव्हा सायकल स्टॅन्डवर गेलो तेव्हा आम्हाला धक्काच बसला. झाले काय होते, ज्यांनी सायकली वाटेल तशा फेकल्या होत्या त्यांच्या सायकलच्या दोन्ही चाकातली हवा कष्ट दे मिश्राने काढून टाकली होती. एकूण तेवीस सायकली. म्हणजे एकूण आम्हा तेवीस जिसीजने सायकली वाटेल तशा फेकल्या होत्या. आता पर्यंत आम्हा पहिल्या सत्राच्या जिसीज मध्ये चांगलीच एकी झाली होती. आम्हाला सगळ्यांना वाईट वाटले. आमचा त्या सायकलीतली हवा काढल्याने वेळेचा आराखडा कोलमोडून पडला होता. आता निदान ते तेवीस जिसीज तरी वेळेत सभागृहात पोहचणार नव्हते. परत सभागृहात रिपोर्ट देताना कष्टदे मिश्राने हवाकाढली हे कारण कोणी समजून घेतलेच नसते. आयएमएत उशीर झाला की उशीर उशीर झाला. कारणे नाहीत. अपील नाही. अर्ज नाही. हे माहीत असल्या मुळे आम्हा हतबल जिसीजना काय करावे ते समजेना. आता आम्हाला ते पाच किलोमीटर पायी जावे लागणार होते, त्यानंतर हवा भरून मग पुढचे काम. शक्यच नव्हते वेळेत होणे. कष्ट दे मिश्राचा भयंकर राग आला होता व दुःखही. आम्ही स्वतःला सीनियर समजायला लागलो होतो व त्याच धुंदीत होतो अन त्याच वेळेस कष्ट दे मिश्राने असा झटका दिला होता. कष्ट दे मिश्रा दुरून हे सगळे पाहतं होता. म्हणाला "आप लोग कभी डिसिप्लीन भूलोगे नही अभी इसके बाद। जाओ अभी नहीतर अगले क्लास के लिये लेट हो जाओगे।"

 

लेट हो जाओगे कसले ------- लेट हो गए थे।

 

भयंकर राग व संतापाच्या भरात आमच्यातल्या कोणीतरी, मला वाटते सूब्बूने किंवा अमितने चिडून जोरात "हिंदोस्तान मुर्दाबाद" म्हटले. क्षणभर आमच्या कंपूमध्ये भीषण शांतता पसरली. आवाज खरे तर मागून आला होता, म्हणजे ज्याने हे म्हटले त्याने त्याची सायकल बरोबर लावली होती व तो त्या तेवीस हवा काढलेल्या सायकल मधल्या कंपूतला नव्हता. हे सगळे नाटक दुरून जसे कष्ट दे मिश्रा बघत होता तसेच कॅप्टन गिल पण बघत होता. आम्हाला वाटते त्याने घोषणा ऐकली असावी. कारण आमच्यात पसरलेली शांतता अजून संपली नव्हती तोच कॅप्टन गिल आमच्या समोर येऊन उभा राहिला होता. क्षण भराने आम्हाला पण कसेसेच वाटायला लागले. कोणी म्हटले हे हिंदोस्तान मुर्दाबाद. खूप राग आला, ज्याने म्हटले त्याने काहीही म्हटले असते तरी तेवढे वाईट वाटले नसते. कष्ट दे मिश्रा मुर्दाबाद, आयएमए मुर्दाबाद, माणेकशा बटालियन मुर्दाबाद काहीही चालले असते आम्हाला. एवढे वाईट वाटले नसते. पण हिंदोस्तान मुर्दाबाद. कसेसेच वाटले. त्या जिसीच्या आपल्या देशाबद्दलच्या घोषणेने आता पर्यंत कष्ट दे मिश्रावर आलेल्या रागाची जागा, आपल्या देशावर असलेली आस्था चिरडली गेल्या मुळे दुःखाने घेतली. 
 
(क्रमशः)

Wednesday, March 9, 2016

प्रसिद्धीसाठी राष्ट्रद्रोह


 
फेब्रुवारीच्या ९ तारखेला अब्दुल्लाने जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम अफझल गुरुला फाशी दिल्याच्या निषेधार्थ आयोजित केला होता व अशा तर्‍हेचे पोस्टर्स जेएनयूमध्ये सगळीकडे चिकटवली गेली होती. गेली तीन वर्षे अफजल गूरच्या फाशी दिनी असे कार्यक्रम होत होते अशा बातम्या आहेत. कार्यक्रमाची तयारी जोरात होती. ह्या समारंभाला कन्हैय्या व त्याच्या माववादी (डिएसयू) संघटनेचा पाठिंबा होता. ह्या कार्यक्रमाच्या रूपाने अर्थातच न्यायालयाची अवमानना केली गेली कारण फाशी न्यायालयाने ठोठावली. ह्या कार्यक्रमाच्या वेळेस कन्हैय्याने राष्ट्राविरुद्ध घोषणा केल्या की नाहीत ह्यावर काहूर माजवले गेले आहे. एका क्षणासाठी असे समजू की कन्हैय्याने घोषणा केल्याही नसतील व जमलेल्या गर्दीतून कोणी तरी घोषणा केल्या असतील पण त्याने कन्हैय्याचा देशद्रोह कमी होत नाही. अफझल गुरुच्या स्मरणार्थ आयोजलेल्या कार्यक्रमाला त्याचा पाठिंबा असणे एवढेच देश द्रोहाचे कलम लावण्यासाठी पुरेसे आहे. त्याचा त्या कार्यक्रमात नुसता सहभाग हे ठरवतो की त्याने राष्ट्रद्रोही कार्यात हिस्सा घेतला होता व त्याचा देशद्रोह्यांना पाठिंबा होता.

हे झाल्यावर कन्हैय्याला देशद्रोहासाठी अटक होते, दुस-या दिवशी काँग्रेसी व वामपंथी जेएनयू मध्ये जमतात व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कन्हैय्याला पाठिंबा जाहीर करतात.

न्यायालया कडून जामीन मिळवून, तुरुंगातून बाहेर आल्यावर जेएनयू मध्ये कन्हैय्या दमदार भाषण ठोकतो.  अशी बातमी आहे की बरखा दत्त त्याच्या भाषणा पूर्वी त्याला भेटली व भाषणात कोणता विषय बोलायचा हे ठरवले गेले. न्यायालयाच्या दणक्याने घाबरून जाऊन स्वतःला वाचवण्यासाठी कन्हैय्या भाषण देतो व जाहीर करतो की तो देशभक्त आहे व फक्त मोदी व  संघविरोधी त्याला मोहीम बांधायची आहे. कन्हैय्याचा अफझल गुरुला पाठिंबा असणे म्हणजे मोदी व संघा विरुद्ध मोर्चा हे गणितच चुकीचे व नपटणारे आहे. तसेच अफझल गुरुला पाठिंबा देणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतीक आहे असे पण कोणी म्हणू शकणार नाही. त्यामुळे आमचे असे मानणे आहे की देशद्रोहाच्या आधीच्या केलेल्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी कन्हैय्याने मोदी व संघाविरुद्ध वक्तव्य दिली.

बातम्या देणा-या काही वाहिन्यांनी कन्हैय्याच्या भाषणाचे कौतुक केले आहे. राजकारण्यांसाठी तो एका रात्रीत एक हीरो म्हणून शाबीत झाला आहे. बातम्या देणा-या वाहिन्या, त्याने काय केले व काय बोलतो ह्याकडे दुर्लक्षून त्याचे भाषण लोकांना ऐकवून, टीआरपी वाढवण्यात गुंग आहेत. वामपंथी व काँग्रेसला  ह्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. केरळ व प बंगाल वामपंथी लोकांचे गढ आहेत व काँग्रेस जिवंत राहण्याच्या प्रयत्नात आहे. साहजिकच वामपंथी व काँग्रेस ने कन्हैय्याचा उपयोग येणा-या निवडणुकांमध्ये करून घ्यायचा प्रयत्न सरू केला आहे.

जाणून घ्यायची गोष्ट ही की ३१ वर्षाच्या कन्हैय्याची विद्यार्थीदशा अजून संपली नाही. तो जेएनयू मध्ये कसल्याशा विषयावर गेली अनेक वर्षे पीएचडी करत आहे. ८००० विद्यार्थ्यांच्या मताने जेऐनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्षांनी, सव्वाकोटी लोकांनी निवडून दिलेल्या मोदींवर शिवीगाळ करून देशद्रोहातून राष्ट्रनेता बनण्याची क्लूप्ती शोधून काढली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली हे सगळे आपल्याच देशात घडू शकते. बातम्या देणा-या वाहिन्यांना टीआरपी कसे वाढेल ह्याचीच काळजी लागली आहे. खरेखोटे व देशाला लाभकारक काय व हानिकारक काय ह्याचे भान ते विसरले आहेत. काँग्रेस व वामपंथ्यांना निवडणूकीच्या काळात लोकांना आकृष्ट करण्यासाठी तयार विषय व माणूस मिळाला आहे त्यामुळे ते पक्ष त्याचा भरपूर उपयोग करून घेत आहेत. ह्या सगळ्या  गडबड गोंधळात कन्हैय्याला जर वाटत असेल की दिलेल्या दमदार भाषणाने व वाहिन्यांनी केलेल्या भरपूर कौतुकाने त्याने केलेले राष्ट्रद्रोह न्यायालय किंवा लोकं विसरतील तर त्याचा तो गैरसमज आहे.

आम्ही त्याने केलेला राष्ट्रद्रोह कधीही विसरणार नाही. राहुल गांधीने अशा लोकांना समर्थन दिले हे आम्ही कधी विसरणार नाही. आम्ही कधी विसरणार नाही की केवळ राष्ट्रद्रोहाचे पाप पुसण्यासाठी मोदी विरुद्ध व संघा विरुद्ध कन्हैय्याने मोहीम उघडली आहे की जेणे करून लोकांना काय खरे व काय खोटे ह्याचा पत्ता लागू नये. आम्ही विसरणार नाही, निवडणुकांसाठी काँग्रेस व वामपंथी कन्हैय्याचा उपयोग करत आहेत. इंग्रजी बातम्या देणा-या वाहिन्या टीआरपी वाढवण्यासाठी त्याचे कौतुक करत आहेत हे ही आमच्याकडून विसरले जाणार नाही.

थोडक्यात - झालेल्या अवमाननेची दखल घेऊन न्यायालयानेच कन्हैय्याला व रशिदला शिक्षा ठोठावायला पाहिजे. देशाविरुद्ध काम करणा-यांना जे पाठिंबा देतात ते सगळे राष्ट्रद्रोही. ह्या मध्ये कसलाही गोंधळ नाही. कन्हैय्याचे भाषण रंगतदार होते का नाही. कन्हैय्या होता का अब्दुल. हे सगळे प्रश्न गौण आहेत. कोर्टाच्या चपराकींनी किंवा लोकांच्या रोषामुळे, बदललेल्या व्यक्तव्यांनी आमच्या मनात उत्पन्न झालेल्या शंका दूर होणार नाहीत. कन्हैय्या, ह्या घोळात पडण्यापेक्षा तू आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कलेस तर बरे होईल. तू एक साधारण बुद्धीचा विद्यार्थी आहेस हे इतकी वर्षे तुझ्या कुवती वरून समजून येते त्यामुळे आम्हाला संबोधन करण्या पेक्षा तुझ्याकडून विद्यार्थ्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पुरे कर. तुझ्या वयाची मुले दहा वर्षा आधीपासून कमावायला लागतात. तू करदात्यांचे पैसे खाऊन, आपल्याच देशाविरुद्ध वागतोस आणि ह्याची तुला थोडी सुद्धा शरम नाही त्याची देशाला चीड आहे.