Friday, August 15, 2014

बिटींग द रिट्रीट किंवा परिसमाप्ती समारोहबिटींग द रिट्रीट किंवा परिसमाप्ती समारोहपश्चिम सीमेवर बिएसएफची फौज तैनात आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला आपण ‘बिएसएफ’ ह्या नावाने ओळखतो. युद्धशांतीच्या काळात आंतरराष्ट्रीय सीमेवर बिएसएफ गस्त घालते पण युद्धजन्य काळात मात्र बिएसएफची जागा भारतीय सेना घेते. पाकिस्तानकडून त्यांची ‘बिएसएफ’, ज्याला ते ‘रेंजरर्स’ म्हणतात ते रेंजरर्स गस्त घालतात.भारताचे अमृतसर व पाकिस्तानचे लाहोर. ह्या दोन शहरांमधून जाणारा ग्रॅन्डट्रंक रस्ता इतिहास प्रसिद्ध आहे. हाच रस्ता पुढे काबूल पर्यंत जातो, व पूर्वेला चितागॉन्ग पर्यंत! साधारण अडीचहजार किलोमीटरचा हा मौर्यकालिन रस्ता, ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात सुद्धा अस्तित्वात होता. त्या काळी ह्या रस्त्याचे नाव ‘उत्तरापथ’ होते. १९४७च्या फाळणीत, ह्याच ग्रॅन्डट्रंक रस्त्यावरून, हजारो हिंदू व पंजाबी लोकं, नवीनच कोरून काढलेल्या देशातून जिवमुठीत धरून भारतात आली होती.स्वातंत्र्यप्राप्तीच्या वर्षी, सत्तांतराची तारीख १५ ऑगस्ट अशी ठरवली गेली. पण १९४७ सालाच्या जून महिन्याच्या अखेर पर्यंत भारत व नव्या कोरुन काढण्यात येणा-या देशा मधली सीमारेषा ठरवली गेली नव्हती. दोहोंमधली सीमारेषा ठरवण्यासाठी घाईघाईत एक बॉर्डर कमिशन गठीत केले गेले. त्यासाठी जस्टीस रॅडक्लिफ ह्या ब्रिटिश महाशयांना पाचारण धाडले गेले व त्यांना ह्या कमिशनचे अध्यक्ष नेमले गेले. ह्या कमिशन मध्ये मुस्लिम लीग व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. निःपक्ष पणे कमीशनचे काम करता यावे म्हणूनच जणूकाही कधीही भारत देश न बघितलेल्या व इतिहास तज्ञ देखिल नसणाऱ्या रॅडक्लिफ ह्यांना अध्यक्षपद दिले गेले असावे.सत्तांतराची तारीख जवळ येत होती. रॅडक्लिफ साहेबांवर बरेच जोखमीचे काम पडले होते. त्यांना पश्चिमेकडे पंजाब प्रांत व पूर्वेकडच्या बंगाल प्रांतातून एक नवा देश कोरून काढायचा होता. हे करण्यासाठी, मुसलमान लोकसंख्या व हिंदू लोकसंख्येला अनुसरून नकाश्यावरती रेघ मारायची होती आणि हे काम करायला रॅडक्लिफ साहेबांकडे फक्त पाच आठवडेच होते. थोड्याच दिवसात रॅडक्लिफ साहेबांच्या असे लक्षात आले की कसेही केले तरी भारतीय जनतेचे समाधान होणारे नाही. परिस्थितीच अशी होती. शेवटी घाईगडबडीत त्यांनी फाळणीचा पाया रचला. गव्हर्नर जनरल माउंटबॅटनला जेव्हा कळले की मुसलमान व हिंदू दोन्ही गटात फाळणीवरून राग धुमसतो आहे तेव्हा त्यांनी रॅडक्लिफ साहेबांचा देशाचे तुकडे करणारा नकाशा, १५ ऑगस्ट ऐवजी दोन दिवस थांबून १७ ऑगस्टला प्रसिद्ध करायचे ठरवले. ह्याच कारणास्तव, आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तरी दोन दिवस पंजाब मधील जनतेत बरीच घालमेल होती व शेवटी जेव्हा १७ ऑगस्टला नकाशा प्रसिद्ध झाला तेव्हा तर लोकांवर आकाशच कोसळले. फाळणीत लाखो लोकं बेघर झाली व लाखो लोकं प्राणास मुकली. अटारी व वाघा गावांचे पण असेच काहीसे हाल झाले होते. वाघा गावाच्या मधून फाळणीची रेघ ओढली गेली होती. ग्रॅन्डट्रंक रस्त्यावर अटारी पासून चार किलोमीटर अंतरावर घाईघाईत वाघा येथे, बाउंड्री पिलर क्रमांक १०२ जवळ चेकपोस्ट बांधले गेले. कारण फाळणीची रेघ तेथून जात होती. फाळणी नंतर त्या चेकपोस्टचा ताबा, भारतीय सेनेच्या कुमाऊ रेजीमेंट ने घेतला. ११ ऑक्टोबर १९४७ ह्या दिवशी तेथे पहिल्यांदा भारतीय तिरंग्याचा ध्वजारोहण समारंभ पार पडला. सोहळ्याला ब्रिगेडियर मोहिंदर सिंग उपस्थित होते. पुढे पन्नासच्या दशकात ह्या चेकपोस्टवर पंजाब पोलिस गस्त घालत. त्या वेळेला वाघा चेकपोस्ट हा एकच भारत – पाकिस्तान मधला आवक जावकीचा रस्ता होता. १९६५ मध्ये जेव्हा बिएसएफ चे गठन झाले, तेव्हापासून हे चेकपोस्ट बिएसएफकडे आहे. ऑक्टोबर १९४७ सालापासून सुरू झालेला ध्वजारोहण व ध्वज उतरवण्याचा समारोह आजतागायत अव्याहतपणे रोज होतो. ह्याला अपवाद फक्त १९६५ व १९७१चे साल. भारत पाक युद्धकाळात, तेवढा पुरता हा समारोह थांबवला गेला होता.

परदेशात पूर्वीच्या काळी शत्रूपासून गावांचे रक्षण करण्यासाठी गावाच्या वेसेवर तट बांधला जायचा. सकाळी गावातली लोकं तटा बाहेर जाऊन शेती करायची. सूर्यास्ताच्या वेळेला शेती करणाऱ्या गावकरऱ्यांना गावात परतण्यासाठी, नगारे व ब्युगलची धून वाजवून सुचीत केले जायचे व ही बिगुलाची व नगाऱ्याची धून कानावर पडल्यावर आपले काम थांबवून शेतकरी गावात परतायचे व तटाचे दरवाजे रात्रीसाठी बंद व्हायचे. ह्याच सोळाव्या शतकातल्या प्रघाताला अनुसरून युरोप मध्ये ‘बिटींग द रिट्रीट’ ची कल्पना सुरू झाली. त्या काळी सैनिकांना ड्रम्सच्या वेगवेगळ्या बिट्सचा अर्थ माहिती असायचा व त्याच्या तालावर काम चालायचे.सूर्यास्ता नंतर युद्ध त्या दिवशी पुरते बंद ठेवत असत. ह्याला कारण म्हणजे, रात्रीच्या अंधारात काही दिसत नाही व आपले कोण, व शत्रू कोण हे समजत नाही. अशा मध्ये युद्ध करणाऱ्या दोन्ही गटांमध्ये सूर्यास्ता पासून सूर्योदयापर्यंत युद्धविराम पाळला जायचा. ह्याची सूचना तुताऱ्या, नगारे व ध्वज उतरवून दिली जात असे. असा इशारा होताच सैन्याच्या तुकड्या युद्ध थांबवून छावणीत परतायच्या. ह्यालाच ‘बिटींग द रिट्रीट’ किंवा परिसमाप्ती समारोह म्हणतात. महाभारतात युद्धामध्ये अचानक सूर्यग्रहण लागल्या मुळे गोंधळ उडाला. युद्धविरामाची घोषणा होत असतानाच ग्रहण संपले, युद्धपुन्हा सुरू झाले व त्या गोंधळात जयद्रथाला मारले गेले. अशी कथा आहे. शिवाजीच्या काळात सुद्धा तटाचे दरवाजे संध्याकाळी बंद झाल्या मुळेच हिरकणी गडावर अडकली होती. संध्याकाळी राजवाड्यांची, किल्ल्यांची, गावाच्या वेसेजवळ बांधलेल्या तटाची दारे बंद करण्याचा व भगवा ध्वज उतरवण्याचा प्रघात जरी पूर्वीपासून चालत असला तरी, परिसमाप्ती समारोहा सारखा सोहळा होत नसायचा. तो आपण इंग्रजांकडून स्वीकारला आहे. शिवकालीन किंवा पशवेकालीन सैन्याच्या कवायतींच्या प्रथांमध्ये परिसमाप्तीची प्रथा असल्याच्या नोंदी सापडत नाहीत.इंग्रजांकडून शिकलेली परिसमाप्ती समारोहाची परंपरा भारतीय सैन्यात आज सुद्धा अस्तित्वात आहे. प्रत्येक सैन्य मुख्यालयात सूर्यास्ताला ‘बिटींग द रिट्रीट’ च्या तालावर भारताचा तिरंगा व त्या त्या मुख्यालयाचा झेंडा उतरवला जातो. दरवर्षी दिल्लीत २६ जॅनेवरीच्या गणतंत्र दिवसाच्या समारोहा नंतर २९ जॅनेवरीला राष्ट्रपतींच्या उपस्तिथीत विजय चौकात परिसमाप्ती समारोह संपन्न होतो. अशा कार्यक्रमाला भारतीय वायुदल, नौदल व सैन्यदलाचे विविध वाद्यवृंद भाग घेतात. दर वर्षी डिसेंबर महिन्यात नौदल हा समारोह मुंबईत साजरा करते.असाच समारोह, अमृतसर पासून २३ किलोमीटरवर असलेल्या, अमृतसर – लाहोर रस्त्यावरच्या ‘वाघा चेकपोस्ट’ आंतरराष्ट्रीय सीमेवर रोज होतो. भारतीय तिरंगा सूर्यास्ताच्या सुमारास बिएसएफच्या वाद्यवृंदाच्या तालावर त्यादिवसासाठी उतरवण्यात येतो व अमृतसर लाहोर रस्त्यावरचे लोखंडी दार रात्रीसाठी बंद केले जाते. जणूकाही आपल्या देशाचे रक्षण करणारा तट रात्रीसाठी कडेकोट बंद करावा तसेच.कधीकधी जन्मोजन्मीचे वैरी, अल्पकाळासाठी हसतखेळत एकमेकात चेष्टा करत एकमेकांबद्दलचे वैर दर्शवतात, तसेच काहीसे उभय राष्ट्रांमध्ये आहे. किंबहुना परिसमाप्ती समारोहा मध्ये हेच वैर नाटकीय रूपाने रोज दर्शविले जाते. १९४७ पासून सातत्याने सुरू झालेला ध्वजारोहण व सूर्यास्ताला ध्वज उतरवण्याचा कार्यक्रम सुरवातीला साधाच असायचा. त्याच कार्यक्रमाचे पर्यवसान, सन १९६५ मध्ये एका छोटेखानी पाऊणतासाच्या कार्यक्रमात झाला. आपले बघून लागलीच पाकिस्तान्यांनी पण त्यांचा कार्यक्रम सुरू केला. पुढे जेव्हा बिएसएफचे डायरेक्टर जनरल व पाकिस्तान रेंजर्सचे प्रमुख एकमेकांना भेटले तेव्हा एक नाट्यपूर्ण दिग्दर्शित सोहळा करायचे ठरवले गेले व आताचा वाघा समारोह सुरू झाला. आधी फक्त आवेशच होता. पण बघताबघता हा सोहळा, भारत – पाक संबंधांचा थर्मामीटर ठरला व जसजसा त्यात एकमेकांबद्दलचा द्वेष, त्वेष व क्रोध नाट्यपूर्ण रीतीने रेखाटला जाऊ लागला, तसतसे त्याची प्रसिद्धी व्हायला लागली. आता हा समारोह पर्यटकांचे आकर्षण झाला आहे. आज जगात कोठेही असा समारोह होत नाही. पूर्वी जेव्हा पश्चिम जर्मनी व पुर्व जर्मनी दुभंगलेली राष्ट्र होती, त्या वेळेला सुद्धा बर्लिन वॉलपाशी असा समारोह व्हायचा नाही. उत्तर व दक्षिण कोरिया मध्ये अजूनही होत नाही. बाहेरच्या देशातल्या बऱ्याच पर्यटकांनी वाघा येथे होणाऱ्या कार्यक्रमाची टिका केली आहे. हसे उडवले आहे पण ह्या समारोहा पाठीमागची भावना फाळणी मध्ये होरपळल्या गेलेल्या इथल्या आपल्या हिंदू भावंडांनाच समजू शकते. इतरांना नाही. त्यामुळे बाहेरच्या देशातल्या पर्यटकांच्या टीकेचा फरक आपल्यावर पडत नाही.वाघा चेकपोस्ट जवळ लोकं संध्याकाळी चार वाजल्यापासून जमू लागतात. हा समारोह बघण्यासाठी बांधलेल्या ग्रॅन्डस्टॅन्ड जवळ जसजसे आपण जायला लागतो तसतसे आपल्याला भारतीय झेंडे व तिरंगी टोप्या विकणारे, रोज होणाऱ्या समारोहाचे फोटो विकणारे विक्रेते भेटायला लागतात. कपाळावर आठ्या आणून नको नको म्हणत पर्यटक त्यांना हुसकावताना दिसतात. आपण जसजसे त्या शाही मंडपाजवळ जायला लागतो तसतसा, हळूहळू गोंगाट वाढायला लागतो. मोठमोठ्यांनी ध्वनिक्षेपकावर लागलेली देशभक्तिपर गीते व गाणी आपल्या कानावर पडत असतात व समारोहाची वातावरण निर्मिती व्हायला लागते. मोठ्याने ऐकू येणारी ‘सारे जहासे अच्छा’, ‘ऐमेरे वतन के लोगो’ अशी गाणी अंगावर रोमांच उठवतात. आधीच ग्रॅन्डस्टॅन्ड वर येऊन बसलेली भारतीय जनता मधूनमधून मोठमोठ्याने ‘हिंदूस्ताsssssन झिंदाबाद’, ‘वंदेsssss मातरम्’ चे नारे लावत असतात. आपल्या नकळत आपण त्या ओरडण्यात सहभागी व्हायला लागतो.साधारण पाऊणतास, चालणाऱ्या ह्या कवायतीत, रुबाबदार, मोठ्यामोठ्या मिशा ठेवलेले, बिएसएफचे गणवेशधारी जवान असतात. छान कांजी केलेला खाकी रंगाचा शर्ट व खाकी रंगाची विजार. शर्टावर उजवीकडे खिशावर नावाची छोटी पाटी. काळ्या पाटीवर पांढऱ्या रंगाने नाव कोरलेले. शर्टाच्या डाव्या खिशावर रीबनला लावलेली चकाकणारी मेडल्स्. पॅन्ट अशी चढवलेली की पट्ट्यावर जिथे शर्ट दिसायला लागतो त्या भागात शर्टाची फक्त तीनच बटणे दिसतात. कमरेला बिएसएफच्या निळ्या, पिवळ्या व लाल चट्ट्यांचा कमरबंद. त्यावर बिएसएफचे बक्कल असलेला कातड्याचा काळा जाड पट्टा. डोक्यावर मस्त दिमाखदार पागोटे. त्या पागोट्याच्याच कापडाचा डौलदार तुरा व पागोट्याच्या डाव्या बाजूला हळूच कानावर रुळणारी सोनेरी झालर. खांद्यावर बिएसएफच्याच रंगाच्या अॅपलेटस्, खाली काळ्या रंगाचे चकाकणारे ड्रिलशूज. पॅन्ट व जोडे जेथे मिळतात तेथे पांढरी पट्टी ज्याला इंग्रजीत अॅन्कलेट म्हणतात अशी लावलेली असते. अॅन्कलेटमुळे पोषाख उठावदार दिसतो. ड्रिलशूज चामड्याचे असतात व नडगी पर्यंत येतात. टाचेला १३ खिळ्यांनी घोड्याची नाल ठोकलेली असते. त्या ठोकलेल्या नालीमुळे, जोडे घालून चालताना खाड खाड आवाज होतो. जोड्याची लेस लांब असते. लेस बांधताना ती दुमडली गेली नाही पाहिजे म्हणजे छान दिसते. खांद्यावर रायफल व हातात कॉपरपर्यंत येणारे पांढरे हातमोजे. फार रुबाबदार व लक्षवेधी असतो हा पोषाख.अमृतसर लाहोर रस्त्याच्या डाव्या बाजूला आपला तिरंगा व दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा चांद तारा, दोन्ही ध्वज असे दिमाखात दिवसभर फडकत असतात. ह्या समारोहात बिएसएफचा एक सेक्शन भाग घेतो. सेक्शनमध्ये बिएसएफचे दहा जवान असतात. एक ब्युगल धारक जवान, व बाकीच्यांनी खांद्यावर घेतलेली रायफल अशी ती दहा जणांची तुकडी असते. तुकडीचे नेतृत्व बिएसएफचा एक हवालदार करतो."साsssवधान। बिएसएफच्या हवालदाराचा खड्या आवाजात आपल्या तुकडीला दिलेल्या आदेशाने समारोहाची सुरवात होते. ध्वनिक्षेपकांवर लागलेली सगळी गाणी थांबतात. फक्त लोकांचा एकमेकांशी बोलण्याचा गोंगाट ऐकायला यायला लागतो.गणवेशावर जान्हव्या सारखा सॅटिनचा लाल सॅशे घातलेला हवालदार खर्ड्या आवाजात तुकडीला तिरंगा उतरवण्यासाठी लागणारे ‘वर्ड ऑफ कमांडस्’ म्हणजेच मोठमोठ्यांदी शब्दाज्ञ्या देत कवायत करवून घेतो. जर बरोबर ठिकाणी पॉज दिला तर कवायत देखणी होते. चपळाईने केलेल्या दोन हालचालींमध्ये जर काही घटकांचा पूर्ण विराम दिला गेला तर, त्या हालचाली खूप उठावदार दिसतात. सांघिक कवायतीत प्रत्येकांच्या हालचाली एकसमयावेच्छेनुसार होतात व एक लय, एक ताल जमतो. संचलन उमदे दिसते. ड्रिल करताना एक लयबद्धता येते, सांघिक शक्तीचा अनुभव येतो, मन तल्लीन होते, हालचाल एकसारखी दिसते. कवायतीत, ज्या बाजूला आपला ध्वज असतो त्याच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या उजव्या बाजूला संचलन करत जायचे व बिगुलाच्या लयबद्ध कर्णमधुर धुनेवर हळूहळू दोरी ओढत ध्वज उतरवायचा. हृदयचीरुन जाणारा बिगुलाचा आवाज ऐकून ग्रॅन्डस्टॅन्ड मध्ये एकदम स्तब्धता होते, शांतता पसरते व बघायला आलेले सगळे लोकं उभे राहतात. प्रत्येकाच्या मनात तिरंग्याप्रतीच्या भावना अशा काही जागृत होऊन एका क्षणासाठी सगळे विसरून देशासाठी सर्वस्व अर्पण करायचा विचार मनात येतो. बिएसएफची पूर्ण तुकडी सावधान होऊन सॅल्यूट करते. तेवढ्यात बिगुलाची ‘रिट्रीट’ धून संपते व बघणारे सगळे ह्या जगात परत येतात. ह्याच प्रकारे हा सोहळा दोघांकडील जवान पार पाडतात. दोघे जेव्हा समोरा समोर येतात तेव्हा एकमेकांनी केलेल्या वैराच्या नाट्ट्याला तोड नाही. बिएसएफ व रेंजरर्सचे दोघेही जवान, नेहमीचीच कवायत करतात, पण त्यात जोष भरत ड्रिलशूज खाड खाड आपटत, उंच उंच कदम ताल करत, एकमेकांसमोर येतात. जसजसे एकमेकांच्या जवळ येतात तसतसे त्यांचा जोष वाढत जातो. ढम ढम वाजणाऱ्या ढोलाच्या तालावर ड्रिल करताना पहिल्यांदा डाव्या पायाने सुरवात करून पाय घुडग्यात न वाकवता पुढे नेऊन टाकताना त्यांचे पाय इतके उंच जायला लागतात की डोळ्यांच्या रेषेत समोर चकाकणारे ड्रिलशूज येतात! परत पाय खाली आणताना जोरात हिलडीग करतात. हिलडिग म्हणजे कवायतीत पाय खाली आणताना आपली टाच जोरात जमिनीला मारायची व जमिनीत रुतवायची. त्याचवेळेस तडक उजवा पाय घुडग्यात न वाकवता पुढे न्यायचा. हात कोपऱ्यात न वाकवता नीट शिताफीने पुढे लंबकासारखा फिरवायचा, परत आणताना जेवढा पुढे नेला तेवढाच तो मागे आणायचा. जसे कवायत करत दोन्हीकडचे जवान समोरासमोर येतात तसे मग आवेशात मिशांना पीळ देत, जोरात श्वास सोडत, मुठी आवळत असा काही आव आणतात की आता दोघे एकमेकांना ठोसेच मारणार असे वाटायला लागते. समारोह समाप्तीला आपआपल्या तुकडीचे नेतृत्व करणारे, दोन्ही ‘वैरी’ हस्तांदोलन करतात व आपआपली लोखंडी दारे लोटून घेतात.हल्ली ह्या समारोहामध्ये थोडा फरक पडत चालला आहे. सध्या सरकारने नरमाईचे धोरण धरल्यामुळे बिएसएफच्या डायरेक्टर जनरलने व रेंजर्सच्या प्रमुखाने ‘ह्या संचलनातला त्वेष ठेवायचा पण द्वेष काढून टाकायचा’ असा निर्णय घेतला आहे. पण तो संदेश अजून बिएसएफच्या जवानांपर्यंत पोहचायचा आहे असे वाटते. कारण एकदा का ‘भारत माता की जय’ व वंदे मातरम् च्या गर्जना सुरू झाल्या की मग बिएसएफच्या जवानांमध्ये एक आगळाच त्वेष चढतो. पुढचे सगळे आपोआप घडते. २०१० साला पासून बिएसएफच्या ह्या संचलनात महिला सैनिक पण भाग घ्यायला लागल्या आहेत. महिलांच्या सहभागामुळे समारोहाला आगळाच रंग येऊ लागला आहे. हा समारोह बघताना आपल्याला क्षणभर आपल्या मायभूमीसाठी जीवन देणाऱ्या महावीरांचे स्मरण होऊन जाते. डोळ्यात कधी पाणी येते ते कळत नाही व छाती देशाभिमानाने फुलून जाते.हा सोहळा बघण्या साठी पाचसहा हजाराची गर्दी रोज होते. समारोहाच्या आधी, दोन्ही बाजूला सहलीवर आलेली शाळकरी मुले मुली आपआपल्या देशभक्तिपर गाण्यांवर नाच करताना आढळतात व समारोह संपल्यावर जेव्हा दारे बंद होतात तेव्हा भावनाविवश झालेले प्रेक्षकातील काही बघे धावत लोखंडी दारा जवळ शत्रूवर धावा बोलावा तसे येतात.सूर्यास्ताला सुरू झालेला हा समारोह संपता संपता अंधार पडलेला असतो व तो पर्यंत आपण इतके भावनावश होऊन गेलेलो असतो की आता पर्यंत आपल्या देशासाठी आपण काहीच केले नाही ह्या सतावणाऱ्या विचाराने आपल्या व्यर्थ घालवलेल्या जीवनाचा आढावा घेत हिरमुसले होऊन परत जायला निघतो. मात्र जाताना ‘त्या’ झेंडे, तिरंगी टोप्या व फोटो विकणाऱ्या मुलाला शोधून, त्याच्या कडून भारताचा छोटा ध्वज व समारोहाचे फोटो आवर्जून घ्यायला आपण विसरत नाही.