ज्या धर्माने ज्या विचारसरणीने आपल्या देशाला जिवंत केले, ज्याला अर्थ दिला आहे, देशाचे राष्ट्र बनवले आहे, त्या देशातल्या जर कोणी हिंदू हे नाव घेतले, त्याचा उच्चार केला तर तो जातीय कसा बनेल. ज्या श्वासांनी आपल्यात जीव फुंकरला आहे, तोच घ्यायला मला आता लाज वाटते असे कोणाला वाटायला लागले तर त्याने मेलेलेच बरे. मला श्वास तर घ्यायचा नाही पण जगायचे मात्र आहे असे कदापि शक्य होणार नाही. हे तर सोडाच पण हल्ली आपल्या देशात आपण हिंदू धर्माचा अभिमान न धरणे म्हणजे आपोआपच ‘सेक्युलर’ मानले जातो, असे वातावरण झाले आहे. ह्या विश्वात इतर अनेक देशात आपला म्हणण्यासारखा भारत एक देश आहे व ह्या भारताचे आम्ही आग्रही आहोत व त्याचा आम्हाला अभिमान आहे असे म्हणणे म्हणजे साऱ्या मानवजातीचा जसा अपमान होत नाही तसेच ह्या आपल्या देशात आपला म्हणण्यासारखा आमचा धर्म आहे व त्याचा आम्हाला अभिमान आहे असे म्हणण्याने बाकीच्या धर्मांचा अपमान होत नाही. आता गरज आहे आपल्या धर्माबद्दलची जाणीव होऊन अभिमान बाळगण्याची.
काही लोकांना उगाचच असंबद्ध प्रश्न करायची सवय असते. ते मग नेहमीच्या बिनबुडाच्या शंका काढतात - "लोकांना हिंदू असण्याचा नुसता गर्व असून काय उपयोग होणार. कोणाला नीट माहिती नाही हिंदू धर्म किंवा हिंदुत्त्वा बद्दल. हिंदू हिंदू करणाऱ्यांनी गीता पण कधी वाचलेली नसते. ह्या लोकांना हिंदुह्या शब्दाचा अर्थही कळलेला नसतो. हिंदुत्व म्हणजे काय हे ही समजावून घ्यायचे नसते वगैरे वगैरे". त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, जो भारतात राहतो, जो भारतासाठी जगतो, जो भारता साठी झटतो, ज्याच्या पूर्वजांनी येथे जन्म घेतलेला आहे – हो तरच त्याला आपल्या देशा बद्दल आपुलकी वाटणार. जो मनुष्य भारतहीच त्याची पुण्यभुमी आहे असे समजतो, जो भारतहीच त्याची कर्मभुमी आहे असे समजतो. ज्याला भारताच्या, पूर्वीपासून चालत आलेली समृद्ध अशी संस्कृती ही त्याचीच आहे असे वाटते. ज्याचा आपल्या विचारसरणीवर विश्वास आहे. तो हिंदू होय व त्या तत्त्वावर जो जीवनक्रम उभारतो, ह्या तत्त्वाचा ज्याला अभिमान आहे ते म्हणजे हिंदुत्व. ह्या पुढे जाऊन जो राष्ट्रवताच्या दहा सूत्रांबरहुकूम वागतो तो राष्ट्रव्रती व त्याचे राष्ट्रव्रत हेच खरे हिंदुत्व. इतकेच आपल्या हिंदू बांधवांसाठी पुरे आहे. प्रत्येकाने काही गीता वाचायलाच पाहिजे असे नाही. सगळेच लोकनेते होऊ शकत नाहीत. ज्यांना लोकसंग्रह करायचा आहे, त्यांनी हे व बाकीचे सगळे अभ्यासावे, मनन करावे व लोकांना शिकवावे. लोकांनी अशा श्रेष्ठांचा पुरस्कार करून, त्यांनी दिशा दाखवल्या प्रमाणे जीवनक्रम अनुसरावा. सामान्य जनांसाठी श्रेष्ठांवर विश्वास व हिंदुत्वाचा अभिमान एवंम राष्ट्रव्रताचा पुरस्कार व त्याचे आचरण एवढेच पुरे आहे. श्रेष्ठलोकनेत्यांनी काय करायचे ते श्रेष्ठांना सांगावे लागत नाही. ते करतात व म्हणूनच त्यांना लोकसंग्रहाचे कार्य करायचे काम ईश्वर सोपवतो. अशा श्रेष्ठलोकांनी गीतेत काय आहे त्याचा जरूर अभ्यास केला पाहिजे.
यद्यदाचरती श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः। स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते।।
गीतेचा हा श्लोक ह्या बद्दलचा संभ्रम दूर करतो. सामान्य लोकं नेहमी श्रेष्ठ लोकांचे अनुसरणं करतात असे दिसून येते, कारण श्रेष्ठ लोकांचे कर्म सामान्य लोकं प्रमाण मानतात. व श्रेष्ठ लोकं उत्तुंग कार्य करतात म्हणूनच ते लोकमान्य होतात. त्यांचा लोकसंग्रह कारणी लागतो.
माणसाच्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणी आहेत. त्या त्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणीत, माणूस त्याच्या पुढे येणाऱ्या सगळ्या गोष्टींचे आकलन करून विचार करतो, निष्कर्ष काढतो. समोर येणाऱ्या प्रश्नांना उत्तरं शोधतो. संकटाला तोंड देतो. प्रत्येक मानसिक प्रगतीच्या श्रेणीत त्याचे स्वतःचे मानसिक स्वास्थ्य वाढवायचे ध्येय असते. प्रत्येक श्रेणीत त्याची विचार करण्याची कक्षा ठरलेली असते. तितकीच तो करू शकतो. ती कक्षा ओलांडता येत नाही त्याला. जेव्हा एक मानसिक प्रगल्भतेची श्रेणी पार करून तो दुसऱ्या अजून उच्च दर्जाच्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणीत पदार्पण करतो, तेव्हाच तो आधीची कक्षा ओलांडू शकतो. प्रत्येक चढत्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणीत त्याचे विचार व्यापक बनतात. सामावून घेण्याची कक्षा वाढते. जगाकडे बघण्याची दृष्टी बदलते. मन विशाल होते. आधीच्या मनाच्या श्रेणीत त्याला बऱ्याच गोष्टी पटण्यापलीकडे होत्या. जेव्हा मनुष्य मनाच्या इतक्या प्रगल्भावस्थेत पोहोचतो तेव्हा त्याच्या दृष्टीने वेगवेगळे देश किंवा राष्ट्र ही कल्पना फार कोती ठरते. तो साऱ्या जीवसृष्टीचा विचार करतो. तो मग कोणत्याही धर्माचा, देशाचा, राष्ट्राचा राहत नाही. तो विश्वाचा होतो. विश्व त्याचे असते. त्याचा धर्म हा ‘जिववाद’ होतो. त्याचे राष्ट्र अखिल मानवजात ठरते. त्याचा देश संपूर्ण विश्व असते. त्याच्या दृष्टीने कोणी शेजारी राष्ट्रे नसतात. कोणी शत्रू राष्ट्रे नसतात. ह्याच संकल्पनेतून "सर्व भूत हित" हे ब्रीद वाक्य आपल्या धर्माने आपल्याला दिले आहे. बृहदअरण्यक उपनिषदात सर्व सृष्टीला उद्देशून केलेली सर्वेपिसुखिनःसंतू । सर्वेसंतू निरामया। सर्वेभद्राणी पश्यंतु। मा कश्चित दुःखमाप्नुयात। (१. ४. १४ बृहदअरण्यक) अशी प्रार्थना आढळेल. ही प्रार्थना सर्व सृष्टीला लागू आहे. तसेच "सर्व भूत हीतार्थ" (भगवद्गीता, १२ अध्याय, ४ श्लोक) ही संकल्पना हल्लीच्या "सर्व धर्म समभाव" ह्या पेक्षा प्रगल्भ आहे. "सर्व भूत हितार्थ" ही संकल्पना सर्व धर्मांना तर सामावून घेतेच पण त्याही पुढे जाऊन सगळ्या प्रकारच्या विचारसरण्यांना सामावून घेते, नास्तिक लोकांना सामावून घेते, जिवंत गोष्टी व त्यापेक्षाही पुढे जाऊन निर्जीव गोष्टींना सुद्धा सामावून घेते. एवढेच काय आपली पृथ्वी ही साऱ्या सृष्टीचा एक घटक समजून साऱ्या सृष्टीचा येथे विचार असतो व त्या सर्वांचे उत्थान करण्याचा प्रयत्न ह्या संकल्पनेत केलेला आढळतो. आपली "वसुधैव कुटुंबकम्" ही संकल्पना आजच्या "ग्लोबल व्हिलेज" पेक्षा फार पूर्वीची व सर्व समावेशक आहे.
बहुतांशी असे आढळून येते की अश्या मानसिक प्रगतीच्या उच्चतम श्रेणीत पोहोचलेली माणसे हाताच्या बोटावर मोजण्या सारखी असतात. त्यांच्या मानसिक प्रगल्भतेच्या कमतरते मुळे, बहुतांशी लोकांची विचारांची क्षमता, ह्या संतांएवढी व्यापक होऊ शकत नाही. त्यांचे विश्व एवढे विशाल नसते व अशांची जर प्रगती व्हायची असेल तर त्यांना झेपणाऱ्या अशा छोट्या वर्गात पहिल्यांदा त्यांना बसवून, शिकवून मगच ते पुढच्या इयत्तेत जायला तयार होतात. अशा कोट्यवधी लोकांच्या प्रगतीसाठी राष्ट्रांची संकल्पना उभारावी लागते. अशातऱ्हेने मग वेगवेगळ्या राष्ट्रांचा पुढचा प्रवास - प्रगतीच्या दिशेने त्या त्या लोकसमूहावर सोपविला जातो. त्या त्या विचारसरणीने मंत्रीत होऊन, ते ते देश मग प्रगत होण्यात गढून जातात. ह्या प्रक्रिये मधूनच हळू हळू अजून अजून प्रगल्भ, अजून अजून उन्नत व उत्तम विचारसरणी जन्म पावते. ही गोष्ट राष्ट्रा राष्ट्रात विश्व वाटले गेल्यामुळेच होऊ शकते.
‘हे विश्वची माझे घर’ मानणारे महात्मे मंडळी सुद्धा प्रबोधन करताना, त्यांच्या दृष्टीने क्षुल्लक पण सामान्य लोकांच्या प्रगती करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी धर्म व राष्ट्रांची संकल्पना उभारतात. जो शिक्षक दोन गटात खेळाचे सामने घेतो, त्याच्या दृष्टीने दोन्ही गट सारखेच असतात. पण दोन्ही गटांचे नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांना त्यांचा त्यांचा गट, अत्यंत महत्त्वच वाटतो. चुरशी शिवाय प्रगती नाही. त्यामुळे खेळात कर्णधाराने, त्याचा त्याचा गट कसा पुढे जाईल हेच बघायचे असते व शिक्षकाला दोन्ही गटात फरक वाटत नसून सुद्धा त्याने चुरस निर्माण करायची असते – खेळ व खेळाडूंच्या फायद्या साठी. ह्या प्रक्रियेत कर्णधारही बरोबर आहे व शिक्षकही बरोबर आहेत. इथे फक्त त्यांची श्रेणी वेगवेगळी असल्या मुळे त्यांना ह्या भूमिका घ्याव्या लागतात. कर्णधार जर शिक्षका सारखा विचार करू लागला तर त्याच्या गटाला परवडणार नाही. प्रगती – म्हणजे खेळात त्या गटाची आगेकूच थांबेल व त्याचा गट हरेल. अजून एक उदाहरण पाहण्या सारखे आहे. ह्या भौतिक जगात, भूमितीची जी प्रमेय लागू आहेत, उदाहरणार्थ त्रिकोणाच्या तीन अशांची बेरीज १८० अंश भरते, चौरसाच्या अंशांची बेरीज ३६० असते व आपल्याला वाटत राहते की हे नेहमी असेच राहणार आहे. ही प्रमेय आपण विविध गणिते सोडवायला वापरतोही आणि ती गणिते बरोबरही येतात. हे किती बरोबर आहे ते बघू. ह्या रोजच्या वापरातल्या भूमितीला ‘युक्लीडीयन’ भूमिती असे म्हणतात. कोणाच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही की हिच भूमितीची प्रमेय जेव्हा संपूर्ण विश्वाला (युनीव्हर्स) आपण लावतो तेव्हा ती चूक ठरतात. गणितं चुकतात, कारण जेव्हा संपूर्ण सापडलेल्या, व अवलोकन करता येण्या सारख्या विश्वाला आपण ही प्रमेय लावतो, तेव्हा आपण पृथ्वीच्या नेहमीच्या लांबी, रुंदीच्या मापदंडां पासून मुक्त होऊन त्याच्या कोट्यवधीच्या पटीने मोठ्या व गोलाकार अशा मापांशी खेळत असतो. पृथ्वीवर काढलेली लांबलचक सरळ रेघ, खूप वरून बघितले कर पृथ्वीचा गोलाकार घेतलेली दिसते. त्या वेळेला तेथे ‘युक्लीडीयन’ भूमिती कामास येत नाही. ‘युक्लीडीयन’ प्रमेयांनी ह्या विश्वाची गणितं चुकू लागतात. कारण येथे भूमितीच्या ‘युक्लीडीयन’ पेक्षाही वेगळ्या प्रमेयांची गरज पडते. ह्या प्रमेयां प्रमाणे त्रिकोणाच्या कोनांची बेरीज नेहमीच १८० अशांपेक्षा जास्त भरते. पण म्हणून आपण ‘युक्लीडीयन’ भूमिती बाद ठरवत नाही. कारण आपल्या श्रेणीला तीच बरोबर आहे व उपयोगी आहे. आपल्यासाठी जशी ‘युक्लीडीयन’ भूमिती आहे, तशीच राष्ट्रांची संकल्पना आपल्या प्रगती साठीच आहे. देश जिवंत करणाऱ्या, देशाचे राष्ट्रात रुपांतर करणाऱ्या धर्माची आपल्याला अत्यंत गरज आहे. तो धर्म ज्या विचारसरणीतून जन्मपावला त्या विचारसरणीचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, कारण तीच विचारसरणी, आपल्या मनुष्य समूहाची मानसिक, भौतिक व आधिभौतिक प्रगती करणारी आहे.
आपल्या धर्माचे आपणच रक्षण कर्ते आहोत. धर्माचे रक्षण करणे म्हणजे तलवारी काढणे नव्हे. जर वेळोवेळी कालबाह्य झालेल्या संकल्पनांचा आढावा घेऊन आपल्या धर्माला लागलेली बुरशी काढून तो सोपा करून व लहान, तरुण व वयस्कर लोकांना आकलनीय करून आकर्षित करणारा असा आपला धर्म केला व आपल्या धर्मातल्या चांगल्या प्रथा ठेवून बाकीच्या काढून टाकल्या तर आपल्या धर्माचे आपोआपच रक्षण होईल, तो वाढीस लागेल, त्याला परत पूर्वीचा कस येईल व तो वृद्धींगत होईल. तरुण पिढीला आलेली आपल्या धर्माबाबतची ग्लानी अशीच दूर होईल.
उठा ह्याची जाणीव करून घ्या. ह्याची जाणीव दुसऱ्यांना करून द्या. आपला धर्म जागवा. हे काम आपले आहे. वेळ गेलेली नाहीये, उशीर झालेला नाहीये. आपली ताकद ओळखा. हनुमानाच्या प्रचंड शक्तीची जाणीव करून द्यायला जांबुवंत होता. आपल्यावर लागलेल्या शापाचा आपला उतारा आपणच शोधला पाहिजे. आपल्यातल्या सुप्त ताकदीची जाणीव करून घ्या. संघटित शक्तीचे राष्ट्रव्रत घ्या. आपणच आपले जांबुवंत बना. राष्ट्रव्रती व्हा. राष्ट्रव्रत घ्या.
आता जे राष्ट्रव्रताच्या संकल्पनेशी आकृष्ट झाले असतील त्यांना राष्ट्रव्रत कसे घेता येईल ते पाहू. ज्यांना राष्ट्रव्रत घेण्याचे महत्त्व पटले आहे त्यांनी सर्वात आधी दहा सूत्री राष्ट्रव्रत घेण्याचे मनात ठामपणे आणले पाहिजे. बरेचजण ह्या सूत्रामधील काही सूत्र किंवा कधी कधी सोयी प्रमाणे सगळी सूत्र अमलात आणत असतील. पण म्हणून तो मनुष्य काही राष्ट्रव्रती ठरत नाही. हे व्रत पूर्णतः स्वीकारले पाहिजे. हे ज्यांना पटले त्यांनी राष्ट्रव्रती बनायचा प्रयत्न करावा, कोणाला दाखवायचे म्हणून तेवढ्या पुरते नको. पैशासाठी नको, जोर जबरदस्तीने नको, सोयीसाठी नको. राष्ट्रव्रत हे स्वतःला मानसिक प्रगतीच्या वरच्या श्रेणीत नेण्यासाठी हाती घ्या. आपल्या राष्ट्राच्या कल्याणासाठी घ्या, हिंदू धर्माच्या पुनर्उत्थानासाठी घ्या. आपल्या मानसिक समाधानासाठी घ्या. राष्ट्रव्रत घेण्याने आपोआप आपल्या जीवनाला अर्थ येईल. ह्या विश्वातले आपले वास्तव्य अर्थपूर्ण करण्यासाठी घ्या. नाहीतर आयुष्याच्या शेवटी आपण का जगलो व काय मिळवले असे वाटायला नको. श्वास आहे तोवर जगलो, खाल्ले, प्याले, काही पैसे जोडले गाठीला व प्रजनन केले असे नको. एवढे उद्योग तर बाकीचे प्राणीपण करतात आणि ते सुद्धा आपल्या सारखे रडत कुढत नाही.
आपण ठरवा, पटले तर राष्ट्रव्रत घ्या व एकदा घेतल्यावर स्वतःला दिलेला शब्द पाळा. आपल्या सदसद्विवेक बुद्धीला चालना द्या.
राष्ट्रव्रत घेतल्याने काय होईल? – आपली चित्तशुद्धी होईल. मानसिक प्रगल्भतेच्या अजून वरच्या श्रेणीत आपण सहजच पदार्पण करू शकाल. आपण जर ही सूत्र तंतोतंत नेहमी पाळत गेलो तर आपोआपच आपले एक वेगळे अस्तित्व तयार होईल. बाकीचे लोक आपल्याला राष्ट्रवती म्हणून ओळखतील व आपला आदर्श पुढे ठेवून आपल्या सारखे जगण्याचा प्रयत्न करायला लागतील. आपल्या सगळ्यांच्या अशा राष्ट्रवती आचरणांनी सांघिक शक्तीचा प्रत्यय येईल जे आपल्या राष्ट्राला पोषक ठरेल.
राष्ट्रव्रत घेतले नाही तर काय होईल?
काही नाही, आपले आयुष्य तसेच पुढे रेटत राहील बिनार्थाचे, रडत कुढत. आपल्या धर्मावर, आपल्या राष्ट्रावर विश्वास असेल तर आपण राष्ट्रव्रती होऊ शकता. प्रसिद्ध ब्रिटिश सेनांनी फील्ड मार्शल फिलिप चेटवुडच्या शब्दात थोडा बदल करून राष्ट्रव्रती कसा असावा हे थोडक्यात सांगतो -
आपल्या राष्ट्राची सुरक्षा, राष्ट्राचा सन्मान आणि राष्ट्राचे कल्याण - नेहमीच सगळ्यात आधी.
तदनंतर आपल्या परिवाराचा सन्मान, परिवाराचे कल्याण आणि परिवाराची सोय.
स्वतःची सोय, स्वतःचे कल्याण व स्वतःची सुरक्षा - शेवटी, नेहमीच शेवटी.
आपले राष्ट्र बलाढ्य, समृद्ध व कल्याणकारी करायचे असेल व ते तसे टिकवून ठेवायचे असेल तर पिढ्या पिढ्यांचा प्रयत्न सतत झाला पाहिजे. हे राष्ट्रबांधणीचे कार्य हा आपला राष्ट्रधर्म झाला पाहिजे, आपला स्वभाव झाला पाहिजे. राष्ट्रव्रताची अशी आपली संस्कृती निर्माण झाली पाहिजे. राष्ट्रव्रत हे प्रत्येकाने त्याच्या कुवतीला धरून घेतलेले पवित्र व्रत आहे. रामाच्या खारुटली प्रमाणे राष्ट्रबांधणी रुपी सेतू मध्ये घातलेले खारुटलीचे छोटे दगड आहेत. हे राष्ट्रव्रत आपल्या परिवाराच्या कल्याणाच्या आड न येणारे असे आहे. स्वतःवर ओझे न पाडणारे आहे, आपली गैरसोय न करणारे आहे आणि तरी सुद्धा राष्ट्रासाठी लागणारे सुकार्य आपल्या हातून घडवून आणणारे आहे.
तर मग केव्हा घेताय आपण राष्ट्रव्रत?
No comments:
Post a Comment