इंग्रजांच्या विरुद्ध लढलेल्या १८५७च्या स्वातंत्र्यसमराला बरीच वर्षे लोटली. इंग्रजांशी झुंजून त्यांना मागे रेटण्यात आपले स्वातंत्र्यवीर सफल झाले व आजच्याच दिवशी १६५ वर्षापूर्वी दिल्ली इंग्रजांपासून मुक्त झाली.
मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे ह्यांच्या सारख्या असंख्य हुतात्म्यांमुळे बहादूर शहा जफर भारताचा राजा झाला. भले सहाच दिवसांकरता पण झाला. इंग्रजांनी त्याचा पराभव करून दिल्लीवर परत ताबा मिळवला आणि भारताचे पहिले स्वातंत्र्य समर अयशस्वी ठरले.
इंग्रजांनी ह्या स्वातंत्र्य लढ्याला “काडतुसाला लागलेल्या गायीच्या व डुकराच्या चरबीमुळे झालेला उठाव” असे घोषित केले. इंग्रजांनी त्यांना सोयीस्कर असा इतिहास आपल्या गळी उतरवला. खरे काय घडले व किती प्रमाणात घडले ह्याचे आपल्या लोकांना अज्ञान होते व त्यामुळे ह्या लढ्याचे आपल्या लोकांना विस्मरण होऊ लागले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गेल्या शतकाच्या पहिल्या दशकात इंग्रज अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या पत्रांचा व तपशिलांचा अभ्यास करून खरा इतिहास भारता समोर ठेवला. चरबीमुळे झालेला छोट्या स्वरूपाचा उठाव नव्हे तर १८५७चे स्वातंत्र्य समर हा इतिहास लोकांना दाखवून त्यांचे अज्ञान दूर केले. प्रयत्न केले तर स्वराज्य मिळू शकते हे लोकांना पटले. भारतीय जनतेला राणी लक्ष्मी, टोपे व मंगल पांडे ह्यांच्या हौतात्म्याचे स्मरण करून दिल्यामुळे पुढे प्रोत्साहित होऊन त्यांच्या नावाचा जयजयकार करीत व ओठावर बंकीम चंद्रांच्या वंदे मातरमचा उद्घोष करीत कित्येक भारतीयांनी आपले जीवन समर्पित केले.
स्वराज्य भिकेत मिळत नाही तर हिसकावूनच घ्यावे लागते हे समजावण्याचे काम १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याने केले. ह्याचे स्मरण म्हणून ११ मे हा दिवस भारतीय स्वातंत्र्य समर दिन म्हणून दर वर्षी साजरा झाला पाहिजे.
No comments:
Post a Comment