Friday, April 24, 2020

वार्ताहर


सध्या मराठी बातम्या देणाऱ्या वाहिन्या व माध्यमांच्या विश्वासाहर्तेनी एकदम तळ गाठला आहे. छापील व डिजीटल माध्यमांचा पैसा कमावणे हा मोठा व्यवसाय झाला आहे. ह्या कारणामुळे वाहिन्यांचे व माध्यमांचे काम चालवण्यासाठी व पैसा मिळवण्यासाठी कोणत्या बातम्या कशा द्यायचा ह्याचे धोरण आखले जाते. ते बातम्या देत नाहीत तर त्यांच्या आवडत्या राजकीय पक्षाला साजेसं जनमत तयार कसे करता येईल त्या दृष्टिकोनातून बातम्यांची निवडकरून लोकांपर्यंत पोहोचवतात. असली माध्यमे व वाहिन्या PR Agency सारखे काम करतात. हे झाले माध्यमांचे. त्यात नोकरी करणाऱ्या वार्ताहरांची कथा तर अजून आगळी आहे. 
हल्लीचे वार्ताहर जर्नालिझमचा कोर्स करतात व कोणत्या न कोणत्या माध्यमातून किंवा बातम्या देणाऱ्या वाहिन्यांतून आपली कारकीर्द सुरू करतात. तरुण, हातात लेखणी व जनमानसांकडून माध्यमांना मिळणारा प्रतिसाद त्यामुळे हुरळून जाऊन बातम्या सोडून कोणत्याही विषयावर स्वतःचे अपरिपक्व मत लादण्यापलीकडे ते काहीच करत नाहीत. अश्यांना कोणत्याच विषयाचे विशेष ज्ञान नसते, अभ्यासू वृत्तीही नसते पण काहीतरी मत नोंदवायचे म्हणून लेखणीच्या जोरावर कोठच्याही विषयावर स्वतःचे मत खरडायला सतत तयार असतात. छापील किंवा डिजीटल प्रसिद्ध माध्यमांच्यामुळे वार्ताहर स्वतःला स्पेशल समजायला लागतात. त्यातले काही फेसबुकवर किंवा ट्विटरवर त्यांच्या पर्सनल प्रोफाइल वर राजकारणावर लेख लिहून आपल्या मित्रांकडून लाईकस् उकळतात. त्यांनी राजकारणावर लिहिलेल्या त्यांच्या मतांना फेसबुकवाले पावसाळी मित्र लाइक किंवा शेअर करायला उपयोगी पडतील म्हणून काही वार्ताहरांचा फेसबुक फ़्रेंड्स वाढवण्याचा उद्देश असतो. तेवढीच त्यांच्या नोकरीत पुढची पायरी गाठायला मदत म्हणायची. त्यातले काही वार्ताहर बेताचे असतात. त्यातून जर का काही कारणाने अशा वार्ताहरांना पंतप्रधान मोदी आवडत नसल्यास (संघ आवडत नाही म्हणून मोदी आवडत नाहीत म्हणून म्हणा किंवा त्यांना काही कारणाने दुसरा पक्ष निकटचा वाटतो किंवा मोदींविरुद्ध लिहिले की आपले TRP वाढते म्हणून म्हणा) त्यामुळे मोदींनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर फेसबुक व तत्सम सोशल मीडियावर उपहासात्मक किंवा वाईट काहीतरी गरळ ओकल्या सारखे खरडायचे. मग करोनाच्या लॉकडाऊन दरम्यान मोदींनी केलेल्या टाळ्या ठोका, थाळ्या बडवा किंवा दिवे लावा अशा विनंतीचा उपहास असो किंवा PM CARES फंड असो काही तरी टिंगल टवाळी करायची व आपल्या फेसबुकच्या मित्रांकडून लाईकस् ओरपायचे. फेसबुकच्या पर्सनल वॉलवर राजकारण लिहायचे, मतं मांडायची शिव्या घालायच्या व कोणी मित्राने विरुद्ध कमेंट केली की रुसायचे व म्हणायचे की आमची पर्सनल वॉल आहे. फेसबुकचे लाईकसाठी जमवलेले मित्र व खरे मित्र ह्यात फरक हाच.   पर्सनल वॉल पब्लिक केल्यावर असे काही तरी होणारच. अशा बेताच्या वार्ताहरांचे अजून एक लक्षण म्हणजे जर त्यांच्या आवडत्या नेत्याकडून किंवा त्यांच्या आवडत्या सरकारकडून ढिसाळ कारभार (कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त किंवा साधूंना पिटून मारण्यासारख्या बातम्या) आढळून आला तर त्यावर काणाडोळा करून आपल्या पर्सनल वॉलवर एकदम पर्सनल आयुष्याचे काहीतरी पोस्ट करून वेळ मारून न्यायची. अशा अपरिपक्व वार्ताहरांचे सध्या खूप पीक आले आहे. त्या पासून सर्व सुज्ञांनी सावधान राहणे जरूरीचे आहे. 

Saturday, April 11, 2020

हव्यासून्मुख


सहा महिने होतील तिनतीगाडीने सरकार बनवून. मी माझ्या वडलांना वचन दिले आहे त्यामुळे मला मुख्यमंत्री व्हायचेच आहे ह्या पासून सुरवात करून जरी १४४ जागांपैकी ५४ जागा मिळाल्या तरी बाकीच्या तिसऱ्या व चवथ्या क्रमांकाच्या पक्षांबरोबर हातमिळवणी करून कशी तरी गाडी हाकायला सुरवात केलीत. ह्या ५४ जागांत बहुतांशी जागा मोदींच्या व भाजपच्या प्रतिमेवर स्वार होऊन कशा घेतल्या हे सर्वज्ञातच आहे. पहिल्यांदा मुख्यमंत्रिपद पाहिजे ह्यापासून सुरू करून भाजप बरोबरची युती तोडून कोणा तिसऱ्या किंवा चवथ्याबरोबर बंधन रचले व जरी दोन्ही पक्षांपुढे साक्षात दंडवत घालावे लागले तेही पत्करून फक्त मुख्यमंत्री बनण्यासाठी खाते वाटप व मंत्र्यांच्या संख्येवर सुद्धा पडतं घेऊन मुख्यमंत्रिपद ओरपले. त्या दिवसापासून वाघाच्या पक्षप्रमुखांच्या हव्यासाचे खरे रूप दिसायला लागले.

कर्नाटकात वेगवेगळे लढल्यावर व भाजपच्या जागा सगळ्यात जास्त आल्यावर जसे संधीसाधूंनी दोन पक्ष एकत्र करून शहं देऊन सरकार स्थापले त्यापेक्षा भयंकर येथे झाले येथे तर निवडणूक पूर्व युतीबरोबर काडीमोड करून दुसऱ्या व तिसऱ्या बरोबर साठगाठ केली.

असे हे न निवडून आलेले मुख्यमंत्री झाले. एक फोटोग्राफर कलाकार खरोखरीच कलाकार निघाले. त्यांची फोटोग्राफीची कला आतापर्यंत कधीच जनमानसात स्थान उत्पन्न करू शकली नाही इतकी बेताचीच पण त्याच बरोबर व्यवस्थापनेचा कोणताच अधिकार नसलेल्या मुख्यमंत्र्याने फक्त खुर्ची सांभाळू सरकार चालवायला घेतले.

सगळ्या आधीच्या प्रकल्पांना स्थगिती देऊन काही प्रकल्प परत सुरू केले. आरे मधल्या मेट्रोशेड चे काम बंद करण्यापासून कमिटी द्वारा परत सुरू करण्या पर्यंत सगळ्यात वेळकाढू पणा. असे होणारच होते. ५४ जागा असल्यावर प्रत्येक दिवस खुर्ची सांभाळण्यातच जाणार त्यात हे पॅरॅशूट नी खाली आलेले स्वयंघोषित नेते फक्त नावावर चालणाऱ्या बाकीच्या पक्षांसारखेच वागायला लागले.

त्यातून जेव्हा आजचे संकट उद्भवले तेव्हा तर कहरच झाला. आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त संकट आहे. लोक मरत आहेत. तबलिगी संबंधित लोकांना अजून सरकार ओळखू शकले नाहीत. त्यामुळे चारी दिशांना असे वातावरण आहे की सरकार जणूकाही हात वर करून बसलेत असे वाटते.

मग काय फेसबुक शो करून, यू ट्यूब शो करून कसे तरी काही तरी करत आहे असे दाखवत राहायचे. काही वार्ताहरांना हाताशी घेऊन चांगले चांगले लेख लिहून घ्यायचे. फेसबुक व ट्विटर वर काहीतरी द्यायचे व टीआरपी वाढवायचा असे खेळ सुरू झाले. ह्या पेक्षा योगी आदित्यनाथ नवीन पटनाईक यदूरप्पा अमरींदर चौहान मैदानात उतरून काम करत आहेत. महाराष्ट्र ह्या संकटात शेवटच्या नंबरावर आणून ठेवण्यात अशा सरकारचा मोठा वाटा आहे.

पुढे कधीतरी मोजमाप होईल तेव्हा सर्वात निष्क्रिय असे सरकार व त्या सरकारचा म्होरक्या म्हणून ह्यांची गणना नक्की होईल. किंबहुना नेतृत्व कसे नसावे ह्याचे उदाहरणच ते ह्या पिढीच्या लोकांपुढे जणू ठेवत आहेत.
जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते सदस्य पण नव्हते सहा महिन्यात सदनाचे सदस्य झाले नाहीत तर राजीनामा द्यावा लागेल. हा तेढ सोडवण्यासाठी स्वतःला सदनाच्या सदस्याची नियुक्ती करवून घेतली हा सगळ्यात हास्यास्पद कार्यक्रम महाराजांनी करून राजकारणातला नीचांकच गाठला आहे. ह्या बाबतीत मात्र असे म्हणता येईल की दिलेले वचन रडून का पण पूर्ण करून दाखवले. किती दिवस मिरवता येईल तेवढे बघायचे. अजून काही महिने कदाचित. तोवर असे म्हणायला हरकत नाही – मुख्यमंत्री व्हायचे जसे तसे पण व्हायचे  - उध्ववजी तुम्ही करून दाखवलंत!!!!!!