Saturday, August 25, 2018

कमुआत्या


कमुआत्याला जाऊन आज एक वर्ष झाले. संध्याकाळी आम्ही घरातली तिची आठवण काढत होतो. माझी आजी, कमुआत्या, आई, वडील व त्यांचा भाऊ. भाऊकाका अविवाहित होते. आम्ही एकत्र राहायचो.
माझे वडील तिला कमळाताई ह्या नावाने हाक मारायचे. आमच्यासाठी ती कमुआत्या होती. कमुआत्या म्हटले म्हणजे सदा प्रसन्न व हसरा चेहरा. सडपातळ देहयष्टी व दुसऱ्याला मदत करायची हाउस हे आठवते. कमुआत्या कोठेही कधी जायची नाही. ती असल्यामुळे आमच्या घराला क्वचितच कुलूप लागायचे. आम्हाला ती माजघरात सतत काही तरी करताना दिसायची. माजघरात पाटावर बसून खाली ठेवलेल्या चुलीवर स्वयंपाक करायची. लहान मुलांना तेथेच ताट ठेवून जेवू घालायची. तिची एक ठरलेली बसण्याची तऱ्हा होती. कोपऱ्यात पाटावर सुखासनात डावी मांडी वर करून बसायची. चुलीवर भांडे ठेवलेले. शेजारी विळी व फोडणीला लागणारे तिखटमिठाचे पंचपात्र. तेल व लागणारी बाकी सामुग्री. मुखात सतत रामनामाचा जप. असे चित्र दिसायचे. भरल्यावांग्याची भाजी व वेगवेगळ्या कोशिंबिरीत तर कमुआत्याचा हातखंडा. दुपारी आम्हाला मंदिरात प्रवचनाला किंवा कीर्तनाला घेऊन जायची. रात्री जेवणे झाल्यावर आजूबाजूच्या सगळ्या मुलांना एकत्र जमवून गोलाकार बसवून गोष्टी सांगायची.
नेहमी घरात असल्या कारणाने घराच्या किल्ल्यांचा जुडगा चंचीच्या शेजारी खोचलेला असायचा. नऊवारी लुगडे जेव्हा खोचायची तेव्हा असे वाटायचे की ओच्यामध्ये काही तरी ठेवले आहे. आम्ही लहान असताना ओच्याला हात लावून विचारायचो कमुआत्या ह्यात काय आहे? इथे मी ना, कात चुना व विडे ठेवते असे म्हणून चिडवायची. घरातले पैसे, व दागिने तीच्याच ताब्यात असत. सणावाराला घरातल्या स्त्रिया तिच्या कडून घ्यायच्या. तिने कधी कोणता दागिना घातलेला माझ्या आठवणीत नाही.
चवथी पास कमळाताई माझ्या वडलांची मोठी बहीण. तिचे लग्न तिच्या वयाच्या चवदाव्या वर्षीच झाले होते व सहा महिन्यात तिचे यजमान वारले. विधवा कमळाताई तेव्हा पासून आमच्याकडेच राहिली. माझे वडील तिला आईसमान मानायचे. सदा हसतमुख व सतत कामात असायची. सतत कामात असायची म्हणून सदा आनंदी राहायची की सदा हसतमुख असायची म्हणून तिला काम करायला आवडायचे याची काही कल्पना नाही. म्हणायची तिला शिकायचे होते. पण लवकर लग्न झाले व मग पती वारल्यावर कोणी शिकून दिले नाही.
वडील सांगायचे विधवा झाल्यावरची पहिली काही वर्ष तिची वाईट गेली. सतत रडायची. खायची नाही. बोलायची नाही. शिकायचे होते पण शिकू दिले नाही. काही येत नाही, पैसे नाहीत, घरात सतत दुसऱ्यांवर अवलंबून, विषण्ण मन. मनासारखे काहीच घडत नव्हते.
कमुआत्याच्या लहानपणाची गोष्ट माझ्या वडिलांनी मला सांगितली. त्यांना कोणी सांगितली माहीत नाही किंवा त्यांना थोडे थोडे आठवत असावे. माझ्या आजीचे एक गुरुजी होते. मंगळूरकर गुरुजी त्यांचे नाव. माझी आजी फार मानायची त्यांना. कमुआत्याची फार श्रद्धा मंगळूरकर गुरुजींवर. गुरुजींनी काही सांगितले की शिरसावंद्य पाळणार. हे का? असच का? कधी विचारले नाही. एक दिवस आमच्याकडे गुरुजी आले. आजीने कमुला त्यांच्या पाया पडायला लावले. त्यांना म्हणाली हिचे काहीतरी करा. सदा दुःखी असते, उदास बसलेली असते. गुरुजी म्हणाले बरोबर आहे. उदास बसणार नाही तर काय करणार. एकतर तुम्ही तिच्या मनासारखे करा, तिला शिकवा. नाहीतर तिने परिस्थिती समजून आपली आवड निवड परिस्थितीला अनुरूप अशी करून घेतली पाहिजे. त्या वेळेला कमुआत्याचे वय पंधरा वर्षांचे होते. गुरुजीने तिला विचारले लेकरा काय झाले. कमुआत्या गप्प उभी. मग गुरुजीच बोलू लागले अगं आपल्या आवडी खूप असतात पण आपण निवड करायची आपल्या परिस्थितीला साजेशी.
पण गुरुजी मला घरकाम करायला आवडत नाही. मला शिकायचे आहे कमळाताई पुटपुटली. आता गुरुजी गंभीर झाले. आजीला म्हणाले पोरीला शिकवा. त्यांनी घरच्यांना बरेच समजावले. रागावले. गुरुजींना कळून चुकले आमच्या घरच्यांमध्ये कमळाताईला शिकवायची इच्छाशक्ती नाही. घरच्यांना समजावण्यात वेळ घालवून चालणार नाही. उदास कमळाताई स्वतःचे काहीबाही करून घेईल. ह्या सगळ्याचा मनात हिशेब धरून गुरुजी घरातल्यांना म्हणाले "तुम्ही शहाणे व्हा नाहीतर मी असे समजेन की तुम्हाला जीवनाचे रहस्य समजलेच नाही अजून. मग पोरीलाच जीवनाचे रहस्य सांगावे लागेल".
नुसतेच आनंदी राहा आनंदी राहा असे सांगण्याने कोणी आनंदी होत नाहीत. आनंदी राहायचे, हा आपण घेतलेला एक निर्णय असतो. हे शक्य व्हायला आधी जीवनाचे रहस्य समजायला पाहिजे. माणसाला निवड करण्याची क्षमता व स्मरणशक्ती देऊन देवाने दुःख दिले आहे.
ते आंब्याचे दिवस होते. गुरुजींनी आढीतून दहा आंबे काढले. त्यातले काहीच पिकलेले होते बाकीचे कच्चे व काही तर काळे डाग पडलेले होते. त्यांनी आंबे एका टोपलीत ठेवले व कमुला म्हणाले ह्या टोपलीतले त्यातल्यात्यात आत्ता खाण्याजोगे किती आहेत ते सांग. कमू म्हणाली ह्यात तर चारच आंबे पिकलेले आहेत. गुरुजी त्यावर म्हणाले की तुला संधी दिली आणि दर वेळेला एकेक त्यातल्यात्यात आत्ता खाण्याजोगा चांगला आंबा काढायला सांगितला तर किती काढशील?”.  कमुआत्या हुशार होती. म्हणाली मग मी त्यातल्यात्यात चांगले असे नऊ आंबे काढीन. गुरूजी म्हणाले अगदी बरोबर. तसेच आहे जीवनाचे. त्यातल्यात्यात काही तरी चांगले करायचे.
त्यातल्यात्यात हे सार आहे जीवनाचे. जी परिस्थिती समोर असते ती बदलण्याच्या आपल्या आवाक्या बाहेर असेल तर त्यातल्यात्यात हा मंत्र लक्षात ठेव. एकदा का हे लक्षात ठेवले की मग आपण त्यातल्यात्यात चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो. जे बदलणे आपल्या आवाक्यात आहे ते बदलावे. जे बदलणे आपल्या आवाक्यात नाही ते स्वीकारावे. परिस्थितीशी तडजोड करणे व परिस्थिती स्वीकारणे ह्यात फरक आहे. तडजोड दुःख देते. स्वीकार मनःशांती देते.
गुरुजींना समजले होते परिस्थिती अशी होती की कितीही आवड असली व कितीही सांगितले तरी आमच्या घरचे त्या विधवेला काही पुढे शिकवणार नव्हते. मग अशा स्थितीत काही असा उपाय करायला पाहिजे की जेणे करून कमू नकळत आनंदी राहून उर्वरित आयुष्य घालवू शकेल. ते म्हणाले कमुला – “मुली, माझ्यावर श्रद्धा असेल तर एक वही शिसपेंसील आण. कमुआत्याला वहीत श्रीराम जय राम जय जय राम हे वाक्य लिहून दिले व म्हणाले. मला हे वाक्य तू वहीत सतत लिहावेस असे वाटते व लिहिताना पुटपुटल्यासारखे म्हणायचे सुद्धा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लिहीत जा. ह्याचा अर्थ हा नव्हे की आपले रोजचे काम सोडून हेच लिहायचे. किंवा रात्री जागून लिहायचे किंवा सकाळी उठून लिहायचे. नाही. आपले सगळे काम जसे आहे ते तसेच चालू दे पण उरलेल्या वेळेत हे लिही. जेव्हा एक कोटी आठ लाख वेळेला हे वाक्य लिहिशील तेव्हा तुझी सर्व दुःखे संपतील. तू हे पुर्णकर व मला भेट. तुझ्या जीवनात नक्कीच फरक पडेल.
कमुआत्याने दुसऱ्याच दिवसा पासून रामनामाचा असा जप करायला सुरवात केली. तिच्या रेखीव अक्षरात पानेच्या पाने भरायला लागली. एका ओळीत दोनदा श्रीराम जय राम जय जय राम व अशा वीस ओळींचे एक पान. दोनशे पानाची वही भरायला एक आठवडा लागायचा, कधी कधी तर एखादा दिवस लवकरच भरायची. ती रामनामाचा हिशेब काटेकोर पणे ठेवू लागली. हळूहळू तिचे रामनाम लिहायचा नियम इतका खोल रुजला की आपले काम पटकन आटोपून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती लिहायला व जप करायला लागली. कामानंतर व काम करताना शिक्षण नाही, लवकर आलेले विधवेपण ह्या गोष्टींनी हिरमुसली व दुःखी होणारी कमुआत्या आता इतकी रामनामाच्या जपात बुडून गेली व त्याची तिला इतकी सवय लागली की त्यातून बाहेर पडणे नकोसे वाटायला लागले.
तिचे सगळे लक्ष रामनामात होते. बाकीचे काम दुय्यम वाटायला लागले. मन रामनामात बुडलेले असायचे. दुःखी राहणारी कमुआत्या हसतमुख राहायला लागली. तिला लोकांनी मारलेले टोमणे, घरातले काम, दिवसेंदिवस व वर्षोवर्षे तेच तेच काम ह्या सगळ्याचे काहीच वाटेनासे झाले. कधी एकदा काम संपवते व आपल्या वहीत रामनामाचा जप करते असे व्हायचे. रामनामाच्या जपात गुंग राहू लागली. अशाच काही वह्या लिहून पूर्ण झाल्या. हळू हळू रामनामाचा जप करणे इतके अंगवळणी पडले की तिने जपाचा हिशेब ठेवणे सोडून दिले. अशीच काही वर्षे लोटली. कमुआत्याने रामनाम वहीत लिहिणे सोडून दिले. गुरुजींनी सांगितले म्हणून नाही. स्वतःच ठरवले. नुसतेच मुखाने रामनामाचा जप करायची. जप करण्यात तिला वेगळाच आनंद मिळायचा. सुरवातीला जपमाळ घेऊन नंतर नंतर जपमाळ घेणे पण बंद करून टाकले. पण रोजची ठरलेली कामे तशीच चालू होती. ती करताना रामनाम सतत मुखावर. अगदी हळू एकाच लयीत संथ गतीने रामनाम म्हणायची. एकदा का मन त्या लहरींशी जुळले की आम्ही काहीही करीत असू तरी एकीकडे आम्हाला तिचा जप ऐकायला यायचा मग आम्ही अभ्यास करीत असो किंवा दुसरे काही तरी. आम्हाला बरे वाटायचे. घरचे सगळे नीट चालले आहे असा दिलासा मिळायचा.
कमुआत्या गेल्यावर तिचे रामनाम आमच्या मनात अजून घुमते. अजून सुद्धा दूरवर कोठे रामनामाचा जप चालला असेल तर आमचे मन व कान लागलीच त्या लहरी टिपतात व मनाला बरे वाटते. 
मंगळूरकर गुरुजींचे नंतर नंतर क्वचितच येणे व्हायचे. मंगळूरगुरूजींनी नामस्मरण करायला सांगितल्या पासून कमुताई त्यांना बऱ्याच वेळेला भेटली. कधी नामस्मरणाचा विषय निघाला नाही. तिचा सतत राहणारा प्रसन्न चेहरा पाहून गुरुजी काय समजायचे ते समजले होते. परिस्थिती स्वीकारणे व तडजोड करणे ह्यातला फरक तिला कळला होता. तिने परिस्थितीशी सलगी साधली होती. जीवनाचे रहस्य तिला कळले होते.