Tuesday, December 27, 2011

राजाराम सीताराम ........ भाग ९.....एक गोली एक दुश्मन। भाग एक





एक गोली एक दुश्मन।

SHOOT TO KILL.



असे फायरिंग रेंजच्या प्रवेशद्वाराच्या सुरवातीलाच चुन्याने मोठ्या अक्षरात जमिनीवर कोरलेले असायचे. फायरिंग रेंजवर जाण्या आधीच आम्हाला क्लास मध्ये पिस्तूल, रायफल, मशीनगन, रॉकेट लॉन्चर, मोर्टार, ग्रेनेड ह्यांच्या बद्दल कॅप्टन गिलने माहिती दिलेली होती. मस्केटरीचे क्लासेस बाहेर भरायचे. आयएमएत मुबलक मोकळी जागा असायची. गोलाकार सिमेंटच्या बैठ्या बैठकी असायच्या त्यावर आम्ही बसायचो. आमच्या समोर त्यादिवशी शिकायचे हत्यार ठेवलेले असायचे. उस्ताद आम्हाला हत्याराबद्दल माहिती सांगायचा. ह्याच मस्केटरीच्या क्लास मध्ये उस्तादाने आम्हाला ही सगळी हत्यारे हाताळायला दिलेली होती. मस्केटरीच्या क्लासला खरी हत्यारे नसायची. ही सगळी ‘ड्रिलप्रॅक्टीस’ हत्यारे म्हणजे खऱ्या सारखी खोटी हत्यारे. पूर्वी कधीतरी ती हत्यारे खरी होती व फायरिंगसाठी वापरली जायची. जुनी, बिघडलेली व दुरुस्त करण्याच्या पलीकडे गेलेली ही हत्यारे फेकून द्यायच्या ऐवजी ह्याच हत्यारांचा शिकण्यासाठी व ड्रिलसाठी वापर व्हायचा. उस्तादाने अशाच एका ड्रिलप्रॅक्टीस रायफलीचे जोडलेले भाग सुटे करायला व परत शिताफीने जोडायला शिकवले. त्याने रायफलच्या गोळ्या झाडताना रायफल मध्ये जर तांत्रिक बिघाड आला तर ‘फौरी इलाज’ कसा करायचा त्याचे शिक्षण दिले, रायफल कॉकिंग करायला शिकवले, ‘लेटके’ पोझिशन घ्यायला शिकवली. ह्या पोझिशन मुळे नेम चांगला लागतो. ‘लेटके’ पोझिशन म्हणजे जमिनीवर रायफल घेऊन पालथे पडायचे, दोन्ही पायात अंतर ठेवून पायांच्या तळव्यांची कड टाचे सकट पूर्णं टेकवली गेली पाहिजे. रायफलचा लाकडाचा मागचा भाग म्हणजेच रायफल ‘बट’, आपल्या उजव्या खांद्याला घट्ट टेकले गेले पाहिजे. डाव्या हाताने रायफलचा पुढचा भाग खालून पकडायचा व उजव्या हाताने रायफल कॉक करून त्याच हाताने रायफलचा घोडा तर्जनीने दाबतायेईल अशी रायफलची मूठ पकडायची व रायफलचे सेफ्टी लॅच फायर पोझिशनवर करायचे. मान सरळ ठेवून डोळा, नेम धरायची मागची खोच, नेमधरायचे पुढचे टोक व टार्गेट सरळ रेषेत आणून, आपला श्वास रोखून चाप दाबायचा. चाप दाबल्या दाबल्या गोळी सुटते व उलट बसणाऱ्या जोराने, रायफलच्या बटचा थोडा धक्का आपल्या खांद्याला लागतो. त्याची जाणीव असली पाहिजे व असा जोर घ्यायला आपण तयारीत राहिले पाहिजे. पूर्वी थ्री नॉट थ्री च्या बंदुका असायच्या. असा जोर बसायचा खांद्याला, की जर तयारीत नाही राहिलो तर कधी कधी खांदा निखळायचा. पण हल्लीच्या रायफलींमध्ये नवीन तंत्रज्ञानाने खांद्यावर येणारा जोर खूप कमी झाला आहे. गोळी किंवा बुलेटला राउंड किंवा कार्ट्रीज म्हणतात. कार्ट्रीजचे दोन भाग असतात. मागचा भाग ब्रासचा असतो. त्यात बारूद भरलेले असते. पुढचा भाग शिसे वापरून बनवलेला असतो त्याला थोडे टोक दिलेले असते. जेव्हा रायफलचा चाप दाबला जातो तेव्हा कार्ट्रीजच्या मागच्या भागावर जोरात घाव बसतो, ब्रासच्या आतल्या बारुदाचा स्फोट होतो व तापलेला वायू प्रसरण पावतो. त्या प्रसरण पावणाऱ्या वायूच्या धक्क्याने शिसे असलेला पुढचा भाग म्हणजे गोळी, ब्रासच्या भागाहून उसळी मारून मोकळी होऊन, स्वतःच्या भोवती गरगरा फिरत जोरात वेगाने लक्ष्याचा वेध घेते. रायफल सेल्फ लोडींग असल्या मुळे उरलेल्या गरम वायूच्या धक्क्याने ब्रिचब्लॉक मागे जाऊन रायफल पुन्हा आपोआप कॉक होऊन पुढच्या गोळी साठी सज्ज होते. त्याच वेळेला आता ब्रासचा मागचा मोकळा भाग रायफल मधून बाहेर पडतो. ह्या सगळ्या घडामोडी एकदम घडत असतात. रायफल मधून बाहेर पडलेल्या मोकळ्या भागाला ‘एम्टी राउंड’ किंवा ‘खालीखोका’ म्हणतात. हे सगळे खालीखोके ब्रासचे असल्या मुळे परत वापरता येतात व म्हणून गोळा केले जातात. थ्री नॉट थ्री च्या बंदुकांमध्ये प्रत्येक गोळी साठी प्रत्येक वेळेला हाताने कॉक करावे लागायचे. पण सेल्फ लोडींग रायफलने मॅगझिन मध्ये गोळ्या असेपर्यंत आपोआप रायफलचा ब्रिचब्लॉक मागे येतो. त्यामुळे बुलेटस् दर चापाला सहजच सुटू शकतात. फायरिंग झाल्यावर रायफलचे बॅरल पुलथृला लावलेल्या चिंधीने साफ करावे लागते. रायफलची जपणूक करणे हा फार महत्त्वाचा भाग आहे. नाहीतर पुढच्या फायरिंगला रायफल नीट चालत नाही. रायफल हा जवानाचा युद्धातला सगळ्यात जवळचा साथी असतो व त्याची काळजी घेणे त्याचे परम कर्तव्य असते.



आयुष्यात पहिल्यांदा खऱ्या रायफलने खऱ्या बुलेटस् मला डागायला मिळणार होत्या. हे सगळे ब्रह्मांड मी त्या ड्रिलप्रॅक्टीसच्या रायफलवर शिकून खऱ्या फायरिंगच्या प्रतीक्षेत होतो. शिकण्यात महिना दोन महिने गेले होते. पुढच्या आठवड्यात लॉन्गरेंज वर फायरिंग करायला जायचे. लॉंगरेंज आमच्या रोजच्या ड्रिलस्क्वेअर, क्लासेस व पिटी ग्राउंड पासून साधारण सात ते आठ किलोमीटरवर होते. सायकलनेच जायचे. आठवड्यातले चार दिवस सलग फायरिंग होती. जेवणाची व्यवस्था सुद्धा रेंजवरच होणार होती. ठरलेल्या दिवशी मी डांगरी चढवली. थंडी होती म्हणून आतून स्वेटर घातला. बाहेरून स्वेटर घालताच आला नसता कारण डांगरीच्या गणवेशात, डांगरी, स्मॉल पॅक, जॅपकॅप, बेल्ट, डिएमएस बूट व त्यावर पट्टी एवढेच असते, मग स्वेटर कसा घालणार. गणवेशात आपल्या मर्जीने कोणताही बदल चालत नाही. त्यामुळे मी डांगरीवर स्मॉलपॅक बांधला, पाण्याची बाटली कमरेला पाठीमागे बसेल असा बेल्ट चढवला, पायांत डिएमएस शूज चढवले, जिथे डांगरीचे पाय शूज जवळ येतात तेथे पायाला पट्टी बांधली व सकाळीच शस्त्रागारात जाऊन सर्विस रायफल घेतली. आज पहिल्यांदा खरी रायफल हाताळायला मिळाली. प्रत्येकाच्या नावाची एक सर्विस रायफल होती. रायफलच्या बट वर त्या रायफलीचा नंबर लिहिला असायचा. रायफल घेतली पण आम्हाला बूलेटस रेंजवर गेल्यावरच मिळणार होत्या. रायफल व बुलेटस् सुरवातीला एकत्र कसे देणार. माकडाच्या हातात कोलीत देण्यासारखेच की. आम्ही आठ आठचा स्क्वॉड करून स्टॅन्ड नंबर फाइव्ह, जी आमची फायरिंग रेंज होती तिकडे कुच केले.



स्टॅन्ड फाइव्ह वर पोहोचलो. सायकली लावल्या व इन थ्रिज फॉलीन झालो. आता एव्हाना आम्हाला कोणाला सांगायला लागायचे नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच व्हायच्या. इन थ्रिज फॉलीन न होता असे जमावासारखे उभे राहिले तर प्रत्येकाला कसेसे वाटायला लागायचे.



जिसीज साSSSSवधान. आठवड्याचा कोर्स सीनियर मी होतो. मार्च करत मी कॅप्टन गिल कडे गेलो. थम. एक दो. करून उजवा हात शिताफीने उचलून डाव्या हाताच्या खांद्यावर मारला. जेव्हा रायफल स्लिंगला लावून ती डाव्या खांद्यावर लटकवलेली असते तेव्हा नेहमी सारखा उजवा तळ हात डोक्याच्या कडेला लावून सॅल्यूट नसतो करायचा हे आता ड्रिल करून करून व शिक्षा झेलून झेलून पक्के झाले होते.



गुड मॉर्निंग सर. 120 जिसीज प्रेझेंट फॉर फायरिंग सर.



कॅप्टन गिलने सॅल्यूट करून माझ्या सॅल्यूटला उत्तर दिले व आम्हाला म्हणाला -



गाईज नेक्स्ट फोर डेज इज फायरिंग ड्युरींग द डे. वन्स् यू फिनिश धिस देअर विल बी नाइट फायरिंग. लर्न इट प्रॉपर्ली. धिस इज युअर मोस्ट इम्पॉर्टन्ट फेज ऑफ ट्रेनिंग. रिमेमबर द मोर यू स्वेट इन पीस द मोर यू सेव्ह ब्लड ड्यूरींग वॉर.

जितना पसीना आभी बहाओगे । उतना खून लडाईमे बचाओगे ।



येस सर. आमचा सांघिक आवाज त्या स्टॅन्ड नंबर फाइव्ह मध्ये दुमदुमला. आम्ही उतावीळ झालो होतो.



गाईज. यू विल बी हॅन्डलींग रिअल बुलेट राऊंडस अॅन्ड इट इज डेंजरस इफ इनफ प्रिकॉशन इज नॉट टेकन. डिसिप्लीन इज पॅरामाऊंट व्हाइल फायरिंग. आदर वाईज यू विल अॅन्ड अप किलींग युअर ओन फोर्सेस, युअर ओन मेन, रादर दॅन एनीमी फोर्सेस. डोन्ट फरगेट द बेसिक डिसिप्लीन बॉइज..... अॅन्ड वी वील एनशूअर, डॅट यू डोन्ट फरगेट इट. बेस्ट ऑफ लक. विSSSSश्राम.



मॅकटीला कंपनी सावधान. आमचा उस्ताद, हवालदार इष्ट देव मिश्राने आता आमचा ताबा घेतला. आम्ही त्याला नंतर नंतर कष्ट दे मीश्रा म्हणायला लागलो. कष्ट दे मिश्राने आल्या आल्या आमचे ‘ट्रेनिंग’ सुरू केले. सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला दहा दहाच्या बारा डिटेल्स् मध्ये वाटले गेले. फायरिंग करतानाची कवायत कष्ट दे मिश्राने समजावून सांगितली.



एका वेळेला तीन डिटेल्स्. दहा फायरिंग पॉईन्टस् मागे इन थ्रिज आपली आपली रायफल डाव्या खांद्याला टेकवून जमिनीवर मांडी घालून बसा. जेव्हा पहिले डिटेल फायरिंग पॉईन्ट वरून फायरिंग करत असेल तेव्हा दुसरे डिटेल पहिल्या डिटेलच्या प्रत्येक जिसी मागे फायरिंग करताना खालीखोकी उडतात ती आपल्या जॅपकॅप मध्ये साठवून घेण्यासाठी सज्ज असले पाहिजे. फायरिंग करून झाल्यावर फायरिंग टार्गेट्स पर्यंत पळत जाऊन प्रत्येक जिसीचा फायरिंग स्कोर टिपण्यासाठी तिसरे डिटेल. अशी कवायत अविरत फायरिंग संपे पर्यंत चालत राहिल. फायरिंगची ही कवायत अत्यंत चोखपणे चालावी लागते नाहीतर अपघात होतात. कारण भरलेली रायफल हातात असणार, बुलेटस् खऱ्या असणार, थोडीशी सुद्धा हलगर्जी झाली तर शेजारचा जीवानिशीच जाईल. म्हणून रायफलचे बॅरल नेहमी टार्गेटकडेच रोखून ठेवलेले असावे. बेसावधपणे ते जर इकडे तिकडे फिरवले व चुकून रायफलच्या चापावर बोट पडले तर आजूबाजूचे हकनाक मरतील. आम्हाला घाम फुटला, त्या आजूबाजूला आम्हीच तर होतो.



कष्ट दे मीश्रा आम्हाला फायरिंगच्या कवायतीचे बारीकसारीक पैलू सांगत होता. त्याच्या खड्या आवाजात आम्हाला ऑर्डर देत होता.



डिटेsssल खडे होs।

त्या बरोबर मांडी घालून बसलेले व डोक्यावर हेल्मेट लावलेले, पहिले तिन्ही डिटेल उभे राहिले.



नंsssबरएक डिटेल आगेssss बढ। तेज चल।

जसे फायरिंग पॉईन्ट जवळ पाहिला डिटेल आला तसे....



थम्। लेsssटके पोझिशन्।

जिसीनी लेटके पोझिशन घेतली.

खराssssब.... एकदम खराssssब। पहिल्या डिटेलची लेटके पोझिशन कष्ट दे मिश्राला आवडली नसल्या मुळे तो जोरात किंचाळला.



खडे होsss। फिर एकबार लेsssटके पोझिशन................ असे बऱ्याच वेळेला प्रत्येक डिटेल कडून करवून घेतल्या शिवाय कष्ट दे मिश्राला चैन पडायचे नाही. तेवढ्यात एका लेटके पोझिशन मध्ये माझ्या डांगरीच्या अस्तनीतून बाहेर डोकावणारा आतून घातलेला स्वेटर कष्ट दे मिश्राच्या नजरेस पडला.



ये जिसी फॉल आऊट। बहोत ठंड लगती हैं जिसीको। आभी गरमी लाता हूं।

मला डिटेलच्या बाहेर काढले.

सुरू न झालेली बाकीच्या डिटेलची फायरिंग तेथेच थांबली. पाहिलाच डिटेल.



जिसी आकाश, आपकी रायफल नीचे रखो।

डांगरी उतारों।



मला सगळ्यांसमोर डांगरी उतरायला लावली. डांगरी उतरल्यावर मी आत घातलेला मरून रंगाचा स्वेटर दिसायला लागला. पाठीमागे अमित, सुब्बू, परितोष, सुनील खेर ह्या सगळ्या माझ्या प्लटूनच्या जिसींबरोबर बाकी अनेक जिसींचे फिदीफिदी हसणे मला ऐकायला येत होते. खूप राग आला होता व सगळ्यांसमोर बीना डांगरीचे उघडे उभे राहायला लाज पण वाटत होती. थंडी वाजत होती ती वेगळीच.



वर्दी ठीक क्यो नही पेहनते आप लोग। ये प्रायवेट स्वेटर जो डांगरीके अंदर था वो निकालो। ऐसा गलत ड्रेस पहनननेका पर्मिशन किसने दिया आपको।



ये माचीस लेलो। कष्ट दे मिश्राने त्याची सिगारेट शिलगावण्याची माचीस काढून माझ्या हातावर दिली. मी कष्ट दे मिश्राकडून काडेपेटी घेऊन परत उभा राहिलो. मला अंधुकशी कल्पना आली आता काय होणार त्याची.



जिसी आकाश, अब बीना देर किये आपका ये प्रायव्हेट स्वेटर उतारो और जलाओ। मी तो स्वेटर पेटवला, डोळ्यात पाणी आले, तो स्वेटर तिकडे थंडी असेल म्हणून माझ्या आईने तिच्या स्वेटर विणायच्या मशीनावर विणून दिला होता. रोज रात्री झोपताना घालायचो. आई जवळ असल्याचा भास व्हायचा. दिवसभर दमल्यावर आईच्या कुशीत झोपल्या सारखे वाटायचे. ज्या गोष्टींवर आपली खूप आस्था असते अशा गोष्टी दुसरा माणूस कधीकधी सहजच तुडवून जातो. ह्यात आपण कोणाच्या आस्थेला धक्का पोहचवला आहे हे त्याच्या खिजगणतीत सुद्धा नसते. त्याच्या दृष्टीने तो एक साधा स्वेटर होता पण तोच स्वेटर माझा कमफर्ट झोन होता. कधी कधी आयुष्यात अशा गोष्टी घडतात आणि त्या सुद्धा अचानक. अचानक घडल्या मुळेच आपण कदाचित तोंड देऊ शकतो. कोठून स्वेटर घालायचे मनात आले असे झाले मला. पाठीमागून परत एकदा मुलांचे हसणे ऐकायला आले. फिदीफिदी हसणे ऐकून कॅप्टन गिल आला. त्याने बाकीच्या जिसीजना फर्मावले.



जोकर्स, लाफिंग अपॉन युअर फेलो जिसी. वेट आय विल रब दॅट स्माईल फ्रॉम युअर फेस.



मग दूरवर एका झाडाकडे बोट दाखवत त्यांना म्हणाला. मॅकटीला कंपनी सावधान, सामने देख। आठसो मीटर सामने, एक किकर का पेड। नाम किकर।



एव्हाना सगळ्या जिसींना ते आठशे मीटर दूर बाभळीचे झाड दिसू लागले. कॅप्टन गिलचे चालूच होते.



उस किकर को दाये छोडके आना। पहले तीन लुंगा। बाकीची मुले छू झाली व मला मनातल्या मनात गुदगुल्या व्हायला लागल्या. बऱ्याच वेळाला त्या झाडाला शिवून झाल्यावर कॅप्टन गिलने, ज्यांनी ज्यांनी आतून स्वेटर घातले होते त्यांना काढायला लावून त्याची होळी पेटवली. किती जणांच्या आस्था त्या होळीत पेटल्या गेल्या असतील आम्हालाच ठाऊक. त्या दिवसा पासून पुढे कधी कोणी गणवेशात स्वतःहून फेरबदल करण्याच्या भानगडीत पडले नाही.

Wednesday, November 16, 2011

राजाराम सीताराम..............भाग ८

शिक्षा



बजरीऑर्डरच्या शिक्षेमध्ये डांगरी किंवा कॅमोफ्लॉजच्या गणवेशावर रुट मार्चच्या वेळेला पाठीवर लादल्या जाणाऱ्या स्मॉलपॅक्स किंवा बिगपॅक मध्ये सामाना ऐवजी टॉन्स नदीच्या किनाऱ्यावरली वाळू व गोटे भरावे लागायचे. डांगरी किंवा कॅमोफ्लॉजचा गणवेश बॉयलर सुटा सारखा अखंड असतो. ह्या गणवेशाला बरेच खिसे असतात. अंगरख्याच्या वरच्या भागावर म्हणजे छातीवर येतील असे दोन खिसे व अंगरख्याच्याच खालच्या भागावर दोन्हीकडे दोन खिसे. तसेच विजारीला दोन्ही बाजूंना दोन, मागे कुल्ल्यावर दोन व दोन्ही नडग्यांच्या बाजूंना दोन खिसे. ह्या सगळ्या खिशांतून सुद्धा वाळू भरलेली असली पाहिजे. अशी वाळू भरली की गणवेश खूप जड होतो व गणवेश चढवल्यावर फार अडचण वाटायची. साधारण पंधरा ते वीस किलो वजनाची ती वाळू किंवा हिंदी मध्ये बजरी, भरल्या मुळे डांगरी चांगलीच जड व्हायची. एवढेच काय कमरेच्या मागे बेल्टला लटकवलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटली मध्ये सुद्धा पाणी फेकून देऊन वाळू भरावी लागायची. मग असा वाळूने म्हणजेच बाजरीने भरलेला पॅक घेऊन जिसीला उभे राहायला लावायचे का, काही अंतर पळायला सांगायचे ते शिक्षा देणाऱ्या डिएसच्या मर्जीवर अवलंबून असायचे. ह्या शिक्षेत पाठीची अक्षरशः वाट लागते. मणक्याला ते टॉन्स नदी मधले गोटे टोचत राहायचे.



बिगपॅक मध्ये बजरी ऐवजी जर कॅम्पचे सामान घातले तर त्याला चिंडीटऑर्डर म्हणतात. ह्या चिंडीटऑर्डरचा पॅक जरा मोठा असायचा. कांबळे, मच्छरदाणी, खायचा डब्बा, दाढीकरायचे सामान, विजेरी, खायचे सामान इत्यादी सगळ्या मिळून पन्नास गोष्टी भराव्या लागायच्या. शिक्षेमध्ये उस्ताद कधी कधी तो पॅक तपासायचा, आपले नशीब वाईट असेल व तपासा मध्ये एक जरी गोष्ट त्याला कमी आढळली की अजून शिक्षा वाढायची. चिंडीट हा शब्द दुसऱ्या महायुद्धातल्या चिंडीट स्पेशल फोर्सेस वरून पडला आहे. चिंडीट नावाची एक स्पेशल फोर्स, ब्रिटिश सेनांनी ब्रिगेडियर विनगेटने तयार केली होती. चिंथे नावाच्या योध्याला ब्रह्मदेशातली जनता देवस्वरुप मानते. तो ब्रह्मदेशातल्या मंदिराची राखण करतो असे तेथील लोकांचे मानणे आहे. त्यावरून त्या स्पेशल फोर्सला चिंडीट हे नाव ब्रिगेडियर विनगेटने दिले होते. महायुद्धात स्पेशल फोर्सेसना ब्रह्मदेशातली महाकाय इरावडी नावाची नदी, तसेच घनदाट जंगले पार करावी लागायची व त्यास उपयुक्त असे सामान घेऊन जावे लागायचे. चिंडीटऑर्डर मध्ये अशा प्रकारचे सामान बांधलेले असते. नद्यानाले पार करताना चिंडीटऑर्डर उपयोगी पडते. आयएमएत चिंडिटऑर्डरचा अर्थ हे सगळे सामान मोठ्या पॅक मध्ये बांधायचे व निर्देशवल्या ठिकाणी हजर राहायचे. ह्या शिक्षेने तसे सामान बांधण्याची सवय होते.



मंदिर दाये छोड ही गमतीदार शिक्षा असायची. डिएस एखादे लांबवर दिसणारे मंदिर, जिसीला बोटाने दाखवायचा व म्हणायचा ‘त्या’ मंदिराला शिवून ये. मग जिसी दूरवर दिसणाऱ्या ‘त्या’ मंदिराच्या दिशेने पळत जायचा व मंदिराची प्रदक्षिणा घालून यायचा. अगदी ‘स्टिपलचेस’ मध्ये जसे पळावे लागते तसेच. कोठचे मंदिर दाखवायचे ते डिएसच्या मनावर अवलंबून असायचे. कधीकधी ते मंदिर दोन किलोमीटरवर असायचे कधीकधी डिएस खूप चिडला असेल तर पाच किलोमीटर दूर असलेल्या मंदिराकडे बोट दाखवले जायचे. ह्या सगळ्या शिक्षांमध्ये हॅकलऑर्डरची शिक्षा सोपी असायची. हॅकल लावलेली बॅरे घालून जायचे एवढेच काय ते असायचे.



केबिनकबोर्ड ही शिक्षा म्हणजे खोली आवरण्याची शिक्षा. केबिनकबोर्डच्या शिक्षेत आपण राहत असलेल्या खोलीचे डिएस इन्सपेक्शन करायचा. खोली कशी असली पाहिजे व कशी आवरलेली पाहिजे हे सीनियर्सने ठरवून एक पायंडा घातलेला असतो. केबिनकबोर्ड मध्ये सगळ्या वस्तू तशाच ठेवल्या गेल्या पाहिजेत. कपडे, गणवेश, जोडे, दाढीचे सामान, बाकीच्या चीजवस्तू सगळ्यांच्या नेमून दिलेल्या जागी असल्या पाहिजेत व नीट घडी घातलेल्या व स्वच्छ असल्या पाहिजेत. कपाटातल्या प्रत्येक घडी केलेल्या कपड्यातून एकसारखा कापलेला पुठ्ठा घातलेला असायचा म्हणजे घातलेली घडी उठावदार व एकसारखी चौकोनी किंवा आयताकृती दिसते. सामानाची ट्रंक एका ओळीत पलंगाच्या बाजूला असली पाहिजे. रूमच्या कोपऱ्यात किटबॅग असली पाहिजे. मला जेव्हा पहिल्यांदा केबिनकबोर्डची शिक्षा मिळाली तेव्हा बाकीचे आवरून झाल्यावर लाल कोबा केलेल्या जमिनीला बाकीच्यांप्रमाणे मीही हाताने पॉलिश करून मोठ्या आत्मविश्वासाने खोलीच्या दारा बाहेर कॅप्टन गिलच्या प्रतीक्षेत तपासणीसाठी विश्राम ठोकून मागे हात बांधून उभा होतो. कॅप्टन गिल जसा माझ्या खोलीच्या दिशेने माझ्याकडे यायला लागला तसा मी डावा पाय कदमतालासारखा वर करून उजव्याच्या शेजारी हापटून, पाठीमागचे हात सरळ रेषेत बाजूला आणून सावधान झालो. ‘सर, केबिन इज रेडी फॉर युअर इन्सपेक्शन सर’ असे मोठ्या आवाजात त्याला रिपोर्ट केला. कॅप्टन गिल आत गेला. सगळे पाहिल्यावर त्या प्राण्याने स्टडी टेबलाशी जाऊन टेबलाच्या तक्त्याच्या उलट बाजूने बोट फिरवले. ते धुळीने भरलेले बोट माझ्या जितके जवळ आणता येईल तितके आणून माझ्या नाकावर पुसत म्हणाला ‘धिस इज युअर ब्लडी स्टॅंडर्ड ऑफ द केबिनकबोर्ड’. आपल्याला अजून किती शिकायचे आहे, हे मला त्याच क्षणी कळून चुकले.



अजून एक शिक्षा होती जी सगळ्यात कठीण व कठोर अशी मानली जायची. त्यात अशा शिक्षेस पात्र जिसीसाठी वेगळे वेळापत्रक ठरवून दिलेले असते. अशा शिक्षेस रेस्ट्रिकशन्स् असे म्हटले जाते. अशा रेस्ट्रिकशन् मध्ये आताच वर्णन केलेल्या सगळ्या शिक्षा दिवसभरात केव्हा ना केव्हा वेळापत्रकाप्रमाणे कराव्या लागायच्या. परत रेस्ट्रिकशनस् मध्ये रविवार किंवा कोठचीही सुट्टी नसते. लिबर्टी गेटेड होते म्हणजे आयएमएतून रविवारी बाहेर जायला परवानगी नाही मिळत. जिसी हे सगळे करता करता अगदी जेरीला यायचा. ह्या शिक्षे मध्ये जिसीचा दिवस सकाळी चार वाजता सुरू व्हायचा – सकाळी चार वाजता जिसी, ड्रिलस्क्वेअरवर हॅकलऑर्डर मध्ये रिपोर्ट करायचा. तशात आयएमएतली अंतरे एवढी लांबलांब असायची की ड्रिलस्क्वेअर दोनतीन किलोमीटर दूर असायचे. सायकल वरून जायला लागायचे. रेस्ट्रिकशनवर असलेला जिसीला स्क्वॉड शिवाय एकट्याला सायकल वरून जायची सूट होती. हे झाल्यावर मग जेवणा पर्यंत जिसीचा नेहमीचा ठरलेला दिनक्रम बाकीच्या आयएमएच्या वेळापत्रकाप्रमाणे चालायचा. दुपारी जेव्हा बाकीचे जिसी एक तासाची विश्रांती घ्यायचे त्या वेळात ही शिक्षा झालेला जिसी एक्स्ट्रॉ ड्रिल, ड्रिलच्या पोषाखात करायचा. परत दुपारी बाकीच्या जिसीज बरोबर गेम्स परेड चालायचीच. संध्याकाळी स्मॉलपॅक लावून व रायफल घेऊन बॅटलऑर्डर मध्ये ५ किलोमीटरची दौड लागायची. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता परत ड्रिलस्क्वेअर वर हॅकल ऑर्डर मध्ये रिपोर्ट द्यावा लागायचा. संध्याकाळी बाकीच्या जिसीजना अभ्यासासाठी जेव्हा वेळ मिळायचा त्या वेळेला ह्या शिक्षेत जिसी रात्रीच्या चिंडीटऑर्डरची तयारी करायचा. जेवणाच्या आधी आमचा जेयुओ भुल्लर त्या जिसेचे केबिनकबोर्ड इन्सपेक्शन करायचा. पुढे रात्री अकरा वाजता अशा जिसीला चिंडीटऑर्डर मध्ये ड्रिलस्क्वेअरला रिपोर्ट करावे लागायचे. रात्री अकरा वाजता त्याच्या पॅक मधले सामान त्याच्याच पॅक मध्ये असणाऱ्या विजेरीने तपासले जायचे आणि एकही गोष्ट ठेवायची राहिली की मग अशी शिक्षा अजून एका दिवसाने वाढायची. हा ह्या कठोर शिक्षेचा अजून एक नियम. असा हा खास वेळापत्रकाने बांधलेला ह्या शिक्षेचा एक दिवस. किती दिवस अशी शिक्षा झेलायची ते जिसीच्या चुकीवर अवलंबून असे. परेडला लेट आला तर साधारण तीन दिवस अशी शिक्षा मिळायची त्या शिक्षेला थ्री रेस्ट्रिकशनस् किंवा थ्रिडेज असे संबोधले जायचे. पोषाख वाईट असेल तर एक दिवसाची अशी वन रेस्ट्रिकशन मिळायची. गंमत अशी की शिक्षा करताना जर काही चूक झाली तर मागे सांगितल्या प्रमाणे शिक्षेत हळूहळू वाढ व्हायची. एका टर्म मध्ये जिसीला जर अशी कठोर शिक्षा मिळून अठ्ठावीस रेस्ट्रिकशनस् पेक्षा जास्त रेस्ट्रिकशनस् मिळाल्या तर त्या जिसीचे आपोआप रेलीगेशन व्हायचे. प्रत्येक मिळालेल्या रेस्ट्रिकशनला जिसीचे ‘ओएलक्यू’ पॉईंटस् कमी होतात व तो स्पर्धेत मागे पडायला लागतो. ह्या सगळ्या मुळेच सगळ्यात कठोर अशी ती शिक्षा असायची व साधारण जिसीला एका वेळेला ‘टेन रेस्ट्रिकशनस्’ पेक्षा जास्त ही शिक्षा मिळायची नाही. ह्या कठोर शिक्षेचा हिशोब प्रत्येक जिसी ठेवायचा व शिक्षा कमीत कमी होईल असे आपले वर्तन सांभाळायचा.



सामूहिक गोंधळ घातला तर ‘मास पनिशमेंट’ ठरलेली. एकदा आम्हाला ऑडिटोरियम मध्ये एका नामवंत व्यक्तीचे भाषण ऐकायला पाठवले होते. अशी भाषणे बरीच व्हायची. आम्हाला अशी भाषणे खूप आवडायची. सभामंडपातील दिवे मालवले व भाषण सुरू झाले की आम्ही छान पुशबॅक खुर्चीत बसल्याबसल्या जागच्या जागीच झोपून जायचो. भाषण संपल्यावर दिवे लागायचे तेव्हाच जाग यायची. सभागृह एकदम शांत राहायचे. त्या दिवशी भाषणात असेच आम्ही सगळे झोपलो होतो. तेवढ्यात एका जिसीला ठसका लागला व चांगलाच लागला. आम्हाला जाग आली. मस्ती तर अशी अंगात होती की आमच्यातले काही जिसी उगाचच ठसका काढू लागले. काही वेळातच सभाघृहातून ठसक्याचा आवाज घुमायला लागला. जिसीजना मजा येत होती. उगाचच ठसका काढत होते. त्या दिवशी ते एक तासाचे भाषण संपल्यावर चिडलेला एडज्युटंट कर्नल मारुफ रझाने आयएमएच्या एकॅडमी कॅडेट एडज्यूटंटला बोलवून आमच्या वर्तनाबद्दल खूप झाडले. आयएमएचा एकॅडमी कॅडेट एडज्यूटंट थर्ड टर्मर एसीए परमविरसिंग सांगा ने आम्हाला नंतर संबोधले...



यू ब्लोक्स यू थिंक यू आर हेल ऑफ चॅप्स क्रियेटींग डिसऑर्डर. आय निड टू सॉर्ट आऊट यू एंड युअर थ्रोटस.



असे म्हणत त्याने फर्मान सोडले की पुढच्या तीन रात्री मानेकशॉ बटालियन मधील सगळे फर्स्ट आणि सेकंड टर्मर्स रात्रभर दर दोन तासांनी बटालियन पिटी ग्राउंडवर येऊन गार्गलींग करतील. पुढचे तीन रात्री आम्ही सगळे दर दोन तासाने प्लॅस्टिकचा मग घेऊन इनथ्रिज फॉलीन होऊन गार्गलींग करत होतो. सुक्या बरोबर ओले जळते. आयएमएत नेहमीच असे होते.



वेगवेगळ्या शिक्षा व सीनियर्सच्या रॅगिंग मुळे आयएमएत खूप अडचणी होत्या पण तरी सुद्धा कसलीही दुःख नव्हती. सामूहिक शिक्षांमध्येही एक मजा असायची. सगळेच करायचे त्यामुळे हसत खिदळत असल्या अडचणी पार करायचो. अशा एकत्र उपभोगलेल्या शिक्षांनी आमच्या नकळत आमच्या कोर्सच्या मुलांमधली दोस्ती वृद्धींगत होत होती.

(क्रमशः)

Tuesday, November 1, 2011

राजाराम सीताराम .............. भाग ७



ड्रिलस्क्वेअर

आमचे पोहण्याचे तास सुरू झाले होते. त्या थंडीत पोहणे येत असताना सुद्धा विसरल्या सारखे वाटायचे मग न येणाऱ्यांची कथा काही आगळीच. पोहण्याचा तास जर सकाळचा असला तर अजूनच थंडी कुडकुडायची. आमच्यातले जेवढे केरळातले त्यांना आम्ही ‘मल्लू’ म्हणायचो. मल्लू व बंगालचे ‘बॉन्ग्स’ त्यांना पोहणे हमखास यायचे. महाराष्ट्रातले ‘तांत’ किंवा ‘कढी’ जिसी, व उत्तर भारतीय, यांतील काहींना पोहणे जमायचे व काहींना नाही. जर का एनडीएतले ‘नंगे’ सोडले तर आंध्रप्रदेशातल्या ‘गुलटी’ जिसीजना, पोहणे मुळीच जमायचे नाही. पंजाबातले ‘सर्डी’ किंवा ‘पापे’ ह्यांना बहुतेक करून पोहणे यायचे. मल्लू, बॉन्ग, कढी, तांत, गुलटी, सर्डी, पापे, तंबी, अण्णा, बबूवा हे प्रांतवार खिताब आयएमएत मोठ्या दिमाखात राबतात. कोणाला फारसे त्यात काही गैर आहे असे वाटत नाही व कोणाला त्यात वावगे वाटत नाही. आयएमएतल्या रॅगिंगने व एकत्र राहून होणाऱ्या सलगीने म्हणा, असल्या गोष्टींचे मनाला लावून घेणे कधीच संपलेले होते.



पोहण्यामध्ये आमच्या दोन टोळ्या बनवल्या गेल्या – एक टोळी पोहणे येणाऱ्यांची व दुसरी न येणाऱ्यांची. ज्यांना पोहोणे येत होते त्यांना लागलीच पोहायच्या तासाला पोहायला मिळायचे व ज्यांना येत नव्हते त्यांना पोहणे शिकवले जायचे. पोहायला न येणाऱ्यात काही पाण्याला घाबरणारे जिसी असायचे. त्यांचे हाल काय व्हायचे ते कल्पनेतूनच कोणाला कळेल. स्विमींगट्रंक घालून कोणाला जरका जमिनीवर पोहायला सांगितले व हातपाय मारत पोहत पोहत जमिनीवरच पुढे जायला सांगितले व असे पोहण्याचा तासभर करायला लावले तर पाण्याचे भय विसरून तो जिसी पुढच्या तासाला आपणहून पाण्यात उतरून हातपाय मारायला शिकायला लागेल, आणि व्हायचेही तसेच. पाण्याला घाबरण्याचा नखरा पोहोण्याच्या पहिल्या तसाच्या पहिली पाच मिनटेच चालायचा. पोहणे न येणारे व पाण्याला घाबरणारे काहीच दिवसात मजेत पोहताना दिसायचे. पहिल्या सत्रात १०० मीटर पोहणे व दहा मीटरवरून पाण्यात उडी मारणे हा अभ्यास होता. ज्याला हे जमायचे नाही त्याचे रेलिगेशन ठरलेले. जमिनीवर पोहायला शिकल्यावर क्वचितच कोणी जिसी पोहण्यासाठी रेलीगेट झालेला आढळायचा.



पोहणे किंवा पिटी परेड संपली की आमचा ड्रिलचा तास असायचा. ड्रिलस्क्वेअर मध्ये जाऊन ड्रिल करणे आता अंगचाच भाग झाल्या सारखे झाले होते. चेटवोड हॉलच्या पुढ्यातले ते ऐसपैस ड्रिलस्क्वेअर, जवळ जवळ पाचशे मीटर लांबी रुंदीचे चौकोनी डांबरीकरण केलेले कवायतीचे मैदान आम्हाला जणू ड्रिलसाठी साद घालायला लागले होते. लांबूनच ड्रिलचे कमांडस् ऐकायला यायचे..... स्क्वॉड आगे चलेगा.......... आगेसेssssss तेज चल. एक दो एक....... एक दो एक....... उंच आवाजातल्या कवायतीच्या ह्या आदेशांबरोबरच मोठ्या ढोलावर वाजवलेले ढम ढम दूरदूर पर्यंत एकसारखे ऐकायला यायचे. एकाच लयीत एक ड्रिलउस्ताद ढोल वाजवत राहिलेला आढळायचा. ड्रिलबुटांखाली लावलेल्या तेरा खिळ्यांनी सज्ज असे बूट घालून जेव्हा ड्रिलस्क्वेअर मध्ये जिसी यायचा तेव्हा त्या खाडखाड वाजणाऱ्या बुटांच्या आवाजानेच ड्रिलचे वातावरण निर्माण व्हायचे. सकाळच्या तिरप्या उन्हात ड्रिलकरताना वेगळाच उत्साह यायचा. थंडीच्या दिवसात, ड्रिलस्क्वेअरच्या चहुबाजूला बहरलेल्या चाफ्याच्या झाडांच्या फुलांचा मंद सुगंध वातावरणात दरवळलेला असायचा. ड्रिलकरताना त्या सतत येणाऱ्या सुगंधाने इतके बरे वाटायचे. प्रत्येक जिसी पासिंग आऊट परेडची स्वप्ने रंगवत अजूनच जोरात पाय आपटायचा.



ढम ढम वाजणाऱ्या ढोलाच्या तालावर आमची कवायतीची तालीम चालायची…………… एक दो एक.... एक दो एक.... एक दो एक थम एक दो...... ड्रिल करताना पहिल्यांदा डाव्या पायाने सुरवात करून पाय घुडग्यात न वाकवता पुढे नेऊन परत खाली आणताना ‘एक’ वर जोरात हिल डीग करायची व त्याचवेळेस तडक उजवा पाय घुडग्यात न वाकवता पुढे नेऊन परत खाली आणून ‘दो’ वर हिल डिग करायची. हात कोपऱ्यात न वाकवता नीट शिताफीने पुढे लंबकासारखा फिरवायचा, परत आणताना जेवढा पुढे नेला तेवढाच तो मागे पण गेला पाहिजे हे लक्षात ठेवायचे मात्र. त्याने ड्रिलमध्ये डौल येतो....



‘ये जिसी सुब्रमण्यम हिल डिग हिल डिग’. असा आमचा ड्रिल उस्ताद हवालदार किसनलाल नेहमी म्हणायचा. हिल डिग म्हणजे कवायत करताना आपला पाय खाली आणताना आपली टाच जोरात जमिनीला मारायची व रुतवायची जमिनीवर. उस्ताद किसनलाल आम्हाला म्हणायचा, टाचेला लागलेल्या घोड्याच्या नालेचे चित्र उमटले पाहिजे जमिनीवर. बऱ्याच जिसीजना सुरवातीला हे जमत नाही. मग सुब्रमण्यम असणारच असल्या न येणाऱ्यांच्या यादीत.



ड्रिल शिकवणाऱ्या उस्तादांबरोबर उमद्या घोड्यावर बसलेला आमच्या अॅकॅडमीचा अॅडज्यूटंटचे दर्शन घडायचे. तो घोड्यावर बसून लांबूनच ड्रिलच्या तासाला आमच्या तुकडीच्या ड्रिल प्रॅक्टिसचे निरीक्षण करायचा. अॅकॅडमीचा अॅडज्यूटंट म्हणजे दंडपाल. अॅकॅडमीत शिस्त राखण्याचे त्याचे खास काम. त्यामुळे आम्ही त्याला घाबरून असायचो. लेफ्टनंट कर्नल मारुफ रझा आमचा अॅडज्युटंट होता. भयंकर कडक शिस्तीचा. पुढे काही वर्षाने हाच लेफ्टनंट कर्नल मारुफ रझा निवृत्त झाल्यावर पॉलिटीकल अॅनालिस्ट म्हणून वेगवेगळ्या टीव्ही वाहिनीवर दिसणार होता आम्हाला. कोणी जिसी नीट कदमताल किंवा सांगितलेली कवायत करत नसेल तर लांबूनच तो घोड्याच्या चाबकाने इशारा करायचा. त्या बरोबर उस्ताद जोरात ओरडायचा



‘ये जिसी फॉल आऊट. रायफल उपर और दौडकेssssचल। दौडके अॅडज्यूटंट के पास जाओ।‘



बहुतेक वेळेला कवायती मध्ये आमच्या सुब्बूचीच वेळ यायची असे अॅडज्यूटंट पर्यंत जाण्याची. मग सुब्बू हात वर करून स्वतःची रायफल डोक्यावर आडवी धरून पळत जायचा अॅडज्यूटंटच्या पुढ्यात. त्याच्या त्या ढिल्या ऑन डबल्स कडे कुत्सित नजरेने बघत करड्या आवाजात एडज्युटंट ओरडायचा –



‘डोंट वॉक लाइक ए प्रेगनंट डक. यू मोरॉन, रन फास्ट. ’



एक दो एक..... एक दो एक स्क्वॉड थम एक दो। जिसी सामने सॅल्यूट करेगाssssssssss सॅल्यूट - राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो. ड्रिल मध्ये जर बरोबर ठिकाणी पॉज दिला नाही तर कवायतीत उमदेपणा येत नाही. सॅल्यूट म्हटले की राजाराम सीताराम मनात म्हणेपर्यंत सावधान मध्ये एका जागी थिजल्या सारखे उभे राहायचे. एक म्हणताक्षणिक उजवा हात आवळलेली मूठ सोडवत, वर घेऊन भरकन कोपऱ्यात वाकवून हाताची बोटं नीट जुळवून तळवा सपाट करून तर्जनी उजव्या भुवईवर दोन बोटांच्या अंतराने जिथे बॅरेची पट्टी कपाळावर बसते तेथे लावला पाहिजे. खांदा जमिनीला समांतर व कोपर आपल्या शरीराच्या रेषेत. त्या सॅल्यूट मारलेल्या स्थितीत मनातल्या मनात परत ‘राजाराम सीताराम’ म्हणेपर्यंत विराम घ्यायचा व ‘दो’ म्हणताच भरकन सॅल्यूट मारलेला हात खाली घेऊन परत सावधान व्हायचे. चपळाईने केलेल्या दोन हालचालींमध्ये जर काही घटकांचा पूर्ण विराम दिला गेला तर, त्या हालचाली खूप उठावदार दिसतात. ‘राजाराम सीताराम’ ह्या शब्दांच्या साहाय्याने मिळालेल्या विरामा मुळे कवायत उठावदार बनते. परत, ‘राजाराम सीताराम’ हे शब्द प्रत्येक जिसी मनात म्हणत असल्या मुळे सांघिक कवायतीत प्रत्येकांच्या हालचाली एकसमयावेच्छेनुसार होतात व एक लय, एक ताल जमतो. सगळ्यांचे डावे हात एका रेषेत खाली वर एकदम होतात. त्याच वेळेला उजवे पाय पुढे येऊन मग एकदम सगळे हिल डिग करतात. असे संचलन उठावदार व उमदे दिसते. उस्तादाचे सुरूच होते...... आभी दाए सॅल्यूट, बाए सॅल्यूट....................... आम्ही मशीनासारखे त्याच्या हुकुमांचे पालन करत होतो. ड्रिल करताना एक लयबद्धता येते, सांघिक शक्तीचा अनुभव येतो, मन तल्लीन होते, आपली हालचाल एकसारखी होते व आपल्या शरीराला चांगला ढब येतो.



ड्रिल करून करून, टाचा आपटून आपटून हळू हळू प्रत्येक जिसीची चालण्याची ढब बदलायला लागली होती. एकतर शाळा कॉलेज मध्ये असतो तसा अभ्यास नाही आणि तशातच अशा कवायतीने व टाचा आपटून आपटून मेंदू कधी कधी बधिर व्हायचा. आमचा उस्ताद मजेने आम्हाला म्हणायचा देखील, ‘जबतक हिलडीग व कदमताल करके जिसीका भेजा घूटनेमे नही आता तब तक आपको ड्रिल नही आएगी।’ जेव्हा मेंदू घुडग्यात जातो, तेव्हा डोकं वापरायची गरज वाटणारच नाही व कोणतीही गोष्ट एखाद्या मशिना सारखी घड्याळाबर हुकूम व ड्रिल सारखी शिस्तीत होऊ लागेल.



ड्रिल करून करून पायांना इतकी सवय पडली होती की, दोन जिसी कोठेही जाताना ‘कदम मे कदम मिलाकर’ चालू लागले होते. एकाचा डावा पाय पुढे तर दुसऱ्याचा सुद्धा डावाच पाय त्याच वेळेला पुढे असल्याची खात्री करून घेतली जायची. तसे नसेल तर मनात विचित्र वाटायला लागून जिसी सहजच आपली चाल बदलून घ्यायला लागले. ह्या छोट्या छोट्या गोष्टी मुळेच जिसी सिव्हिलियन आयुष्या पासून हळूहळू वेगळे व्हायला लागतात व काही दिवसाने सैनिकी रीतिरिवाज, सैनिकी शिस्त व सैनिकी जीवनमान तयार होते. पुढे ते जीवनमान कायमचे मनात व शरीरात असे भिनते की चालण्यावरून, कपडे घालण्यावरून, बोलण्यावरून व सवयींवरून दूरूनच सैनिकाला ओळखता येते.



ये जिसी फॉल आऊट। रायफल उपर और कदमताल शुरू कर। कितने बार आपको कहा हैं की जिसी सॅल्यूट सिर्फ दाये हाथसे ही करते हैं।



सुब्बूच असणार. आम्हाला गालातल्या गालात हसू आवरत नव्हते. त्याचे ड्रिल महाभयंकर होते. संचलन करायचा तर जो पाय पुढे टाकायचा त्याच बाजूचा हात त्याच्या नकळत पुढे यायचा. हे खरे म्हणजे किती अवघड आहे. चालताना जर डावा पाय पुढे टाकला तर उजवा हात पुढे येतो हा माणसाचा नैसर्गिक कल, पण सुब्बूचे उलटेच. साहजिकच ड्रिल परेडला सगळ्यात जास्त शिक्षा त्याला व्हायची. संचलन करताना दाए सॅल्यूट मध्ये मान उजवीकडे वळवून उजव्या हाताने सॅल्यूट करायचे असते अगदी जसे गणतंत्र दिवसाच्या समारंभात राष्ट्रपतींसमोर संचलन करत येणारी सेनेची तुकडी मान वळवून दाए सॅल्यूट करते तसेच. तशाच प्रकारे बाए सॅल्यूट मध्ये मान डावीकडे वळवून उजव्याच हाताने सॅल्यूट करायचा असतो तर आमचा पठ्ठ्या बाये सॅल्यूट मध्ये खुशाल डाव्या हाताने सलाम ठोकून मोकळा झाला होता. रोज दुपारी सुब्बू साठी विशेष ड्रिलचा तास लागायचा.



आमची ड्रिलची परीक्षा साक्षात अॅडज्यूटंट घ्यायचा. घोड्यावर आरूढ होऊन एकेक जिसीला त्याच्या समोर तेज चल, दाये सॅल्यूट, बाए सॅल्यूट, सलामी शस्त्र, धिरेचल, कदमताल असे सगळे कवायतीचे प्रकार करून दाखवावे लागायचे. तो ठरवायचा पास का फेल ते. कवायत करून झाल्यावर, परीक्षेसाठी आलेल्या जिसीने अभिवादन म्हणून केलेल्या सॅल्यूटला अॅडज्यूटंटने परत सॅल्यूट करून जर त्या जिसीचे अभिवादन स्वीकारले तर समजायचे आपण ड्रिल टेस्ट पास. त्या दिवशी पासून डिएस ना सॅल्यूट करायची परवानगी मिळायची व लिबर्टीपण मिळायला लागायची. आमच्यातले काही जिसी ड्रिल टेस्ट अजून पास झाले नव्हते त्या मुळे त्यांना लिबर्टी मिळाली नव्हती. जिसी सुब्बू त्यातला एक होता. आम्हाला मात्र आता लिबर्टी मिळायला लागली होती. लिबर्टी म्हणजे रविवारी आयएमएच्या बाहेर जायची परवानगी. लिबर्टीचा कागदी पास असतो. आठवड्यात जर काही चुका झाल्या नाहीत तर कॅप्टन गिल शनवारी लिबर्टीच्या पास वर सही करायचा व त्या योगाने रविवारी बाहेर जायला आम्हाला परवानगी मिळायची. सकाळी ८ वाजता आम्ही मुफ्ती ड्रेस घालून सायकल वरून डेहराडून गावात जायचो. आयएमएतून बाहेर पडून राजपूर रस्त्याने घंटाघरला जमायचो. त्या वेळचे डेहराडून म्हणजे छोटेखानी गाव होते. साधी माणसे. साधी दुकाने. खूप धूर सोडत जाणाऱ्या विक्रम रिक्शा. रिक्शा कसल्या टेम्पोला किर्लोस्कर कमिन्सचे इंजन लावले तर काय होईल तसे असायचे. विक्रम सहा माणसांसाठी असायची पण त्यात साधारण १२-१३ माणसे भरली जायची. हे गाव शिवालीक ह्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी आहे. मसुरीसाठी इथूनच जाता येते. शिवालीक पर्वत समूहांना लोअर हिमालीयन रेंजेस पण म्हटले जाते. डेहराडूनला काही जुन्या इमारती आहेत, ‘सर्व्हे ऑफ इंडिया’, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम’, ‘फॉरेस्ट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ अशा सारख्या संस्था येथे आहेत. फॉरेस्ट इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची पूर्विची इमारत देखणी व विलोभनीय आहे. लिबर्टी मिळाल्या लागल्या पासून आम्ही दर रविवारी डेहराडूनला जायचो. डेहराडूनला एकच हमरस्ता होता राजपूर रोड. घंटाघरच्या चौकात ‘कुमार स्विटस’ म्हणून प्रसिद्ध मिठाईचे दुकान होते. चांगलेसे एकही पिक्चरचे थिएटर नव्हते तरीसुद्धा आम्ही कधी कधी त्यात पिक्चर बघायचो. आठवड्याभराचा रगडा मित्रांबरोबर पिक्चर बघताना कधीच निघून जायचा. आयएमएतल्या जिसीज साठी थेटर मालकाने जागा राखीव ठेवलेल्या असायच्या त्यामुळे तिकीट मिळाले नाही असे कधी झालेच नाही. आम्हाला ह्या स्पेशल ट्रीटमेंटचे फार अप्रूप वाटायचे. सकाळी सायकल वरून राजपूर रस्त्याने दहा किलोमीटरचा रस्ता सायकल ने तुडवून डेहराडून गावात यायचो. आमचा कार्यक्रम येथेही तसा ठरलेला असायचा. सकाळच्या वेळेस रस्त्यावरून मुली बघत फिरणे. दुपारी एखादा पिक्चर टाकणे, संध्याकाळी सहाच्या सुमारास कुमार मिठाईवाल्या कडे समोसा, कचोरी, पलंगतोड, कालाजाम नाहीतर मसाला दूध प्यायचे ठरलेले. घंटाघरचे टोले सतत आम्हाला आमची जायची वेळ सांगत राहायचे. साधारण साडेसहाच्या सुमारास जड मनाने त्या बाहेरच्या जगाला टाटा करून सायकलने परतीचा रस्ता आम्ही धरायचो. गावात सामान्य वेषात आयएमएचे रेजिमेंटल पोलीस त्यांना ‘आरपी’ असे म्हटले जायचे ते अशा लिबर्टीच्या दिवशी फिरायचे. त्यांचे काम होते लिर्बटीवर आलेल्या जिसीज वर डोळा ठेवण्याचे. काही काही जिसीजना बाहेर जाऊन सिव्हिल ड्रेस घालायची हुक्की यायची, किंवा आऊट ऑफ बाऊंड एरीयाज मध्ये जाण्याचे धारिष्ट्य करावेसे वाटायचे त्यावेळेला मुफ्ती ड्रेस मध्ये आयएमए बाहेर पडून नंतर सिव्हिल कपडे बदलायचे प्रयत्न व्हायचे. ह्यात अमित वर्माचा पहिला नंबर. पण ड्रिल करून करून बदललेल्या चालण्याच्या ढबीवरून, केस कापण्याच्या ठेवणीवरून जिसी लपायचा नाही व आरपिंची तयार झालेली नजर अशांना लागलीच हुडकून काढायची. लागलीच आरपी अशांना एक टोकन द्यायचा. त्या टोकनावर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी डिएस कॅप्टन गिलकडे मार्चअपची वेळ लिहिलेली असायची. दुसऱ्या दिवशी अशा टोकन मिळालेल्या जिसीची ‘पेशी’ व्हायची. डिएसकडे शिक्षेसाठी जाताना हॅकल ऑर्डर मध्ये जावे लागत असे. हॅकल ऑर्डर म्हणजे, आयएमएचा पोषाख घालायचा व बॅरे वर लागलेल्या आयएमएच्या बिल्ल्यावर लाल पिसांचा तुरा खोवायचा. ह्या पोषाखात जिसी एकदम रुबाबदार दिसतो. बॅरेवर लावायचा पिसांचा तुरा आयएमएच्या शॉपिंगसेंटरवर मिळतो. प्रत्येक जिसीकडे तो असायचा. शिक्षेसाठी जावे लागायचे त्यावेळेला हा तुरा खुपसावा लागायचा. असा तुरा खुपसलेला जिसी दिसला की समजावे की काहीतरी चूक जिसीच्या हातून झालेली आहे व तो कोणत्यानाकोणत्या शिक्षेसाठी तरी जात आहे नाहीतर शिक्षा सुनावणीसाठी तरी जात आहे. आयएमएतल्या आधिकारिक शिक्षा सुद्धा अजब असायच्या. त्यात प्रामुख्याने बजरी ऑर्डर, २८ डेज, केबिन कबोर्ड, हॅकल ऑर्डर, मंदिर दाये छोड, चिंडिट ऑर्डर अशा विचित्र नावांच्या त्या शिक्षा.

(क्रमशः)

आपण राष्ट्रव्रत घेतले का. त्या बद्दल अजून वाचा.
येथे
http://rashtravrat.blogspot.com

http://bolghevda.blogspot.com

Friday, September 9, 2011

राजाराम सीताराम .....................मसुरी नाईट




"आकाशी, मी नाही राहणार येथे. मला नाही आवडले. अभ्यास काहीच नाही. नुसतेच रोलिंग व क्रॉलिंग करून वैताग आलाय".



खरे तर पाहिल्या पहिल्यांदा माझे सुद्धा मन लागायचे नाही. आयएमएतले नियम आवडले नाहीत किंवा इथला दिनक्रम झेपत नाही म्हणून जर आयएमए सोडून निघून गेले तर चालते. ही सूट फक्त पाहिल्या आठवड्या पुरतीच ठेवलेली असते. असे पाहिल्या आठवड्यात निघून गेले तर काही पैसे भरावे लागत नाहीत. आयएमएत मिळालेले कपडे, स्मॉल पॅक, बिग पॅक, सायकल वगैरे परत करून मुले परत जायची. पण एका आठवड्यानंतर जर कोणा मुलाला परत जायचे असेल तर शिक्षणाचा, राहण्याचा व खाण्यापिण्याच्या खर्चाची भरपाई करून जावे लागत असे. आयएमए सोडून जाऊ इच्छित जिसीच्या वडलांना बोलावण्यात येई व ‘हे ही दिवस’ जातील असे पटवून देण्याचा प्रयत्न होई. काही जिसी जायचे. शिक्षे पासून लांब राहण्यासाठी सुरवातीला आम्ही सगळे बिचकून वागत असू. कधी आमच्या हातून चूक होईल व रोलिंग क्रॉलिंगला सुरवात होईल समजत नसे. सुरवातीला, रोलिंग करायला लागले तरी आम्हाला वाईट वाटायचे. वाटायचे आमच्या हातुनच का चुका घडतात की आम्हाला रोलिंग करावी लागते. खरे म्हणजे जसे जन्म मरणाच्या फेऱ्यातून कोणाचीही सुटका नाही अगदी तसेच आयएमएचे आहे. शिक्षेवाचून कोणाचीही येथे सुटका नाही. हे गूढ फक्त आमच्यातल्या अमित वर्माला कळले होते. त्यामुळे त्याचे तसे नव्हते, बेधडक सगळे काम चालायचे त्याचे आणि चूक झाली तर रोलिंग करण्याचे वाईटही वाटायचे नाही त्याला.



सुब्बू म्हणायचा, "तो नंगा बघ, त्याला काही शिक्षेचे सोयरसुतक नाही असे वाटते. तो स्वतःच्या घरासारखेच वावरतो येथे". आयएमएत जे एनडिएतून म्हणजे पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून येतात त्यांना ‘नंगे’ म्हणतात, डायरेक्ट एंट्री जिसीजना ‘धक्का’ असे संबोधतात व अभियांत्रिकी करून आलेले ‘टेको डोप’. एनडीएत एक परंपरा आहे, एनडीए मध्ये पाहिल्या सत्राला सगळे कॅडेटस् अंघोळ एकत्र करतात व तेही कोणतेही कपडे न घालता. हो तुमच्या मनातली शंका मी ओळखली, म्हणूनच स्पष्ट केले. त्यामुळे नंगे ही उपाधी त्यांना तेव्हा पासून चिकटलेली असते. बीएस्सी, बीए, बीकॉम करून कंबाईंड डिफेन्स सर्विसेस म्हणजे सिडिएसची परीक्षा देऊन दीड वर्षाचा आयएमएचा कोर्स करणाऱ्यांना ‘धक्का’ ह्यासाठी म्हणतात कारण ही मुले म्हणे बाहेर धक्के खाऊन मग ह्या वळणाला आलेली असतात. अभियांत्रिकी करून आलेले इथल्या अपेक्षेने सगळ्यात बावळट ठरत असल्यामुळे त्यांना ‘टेको डोप्स’ म्हणतात. मजा ह्यात आहे की वर्षाच्या शेवटी तेथल्या शिक्षणाने व शिस्तीने, हे सगळे जिसी एकसारखे होतात. साच्यातून काढल्या सारखे. घाल माती काढ गणपती. तर असा नंग्या अमित वर्माचा फार राग टेको डोप सुब्बूला कारण जिसी सुब्रमण्यमला जेवढ्या शिक्षा भोगाव्या लागायच्या त्यापेक्षा जास्त शिक्षा अमित वर्माला मिळत असून सुद्धा तो नेहमी उत्साही, हसतमुख व खोड्या काढण्यात पटाईत असायचा.



जिसी सुब्रमण्यमची अवस्था मी समजू शकत होतो. मलाही सुरवातीला खूपवेळा वाटले होते की हा कोर्स आपल्याच्याने नाही होणार, आपल्याला नाही झेपणार व आपण परत जावे येथून. येथे आलो, त्यात काही चूक तर केली नाही आपण, असे वाटायचे. खूप वेळेला पळून जावे असे वाटायचे. पण मनातून, आई काय म्हणेल, बाकीची लोकं काय म्हणतील ह्याची भीती सतत भेडसावायची. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लहानपणापासून सैन्यात जायची इच्छी होती. त्या इच्छेचे काय होईल असे वाटायचे. जर लहानपणापासून इच्छा असून व त्यानुसार निवड झाल्यावरही मी आयएमए सोडून गेलो तर बाहेरजाऊनतरी दुसरे काय करणार होतो, आणि आयएमए सोडून दुसरे काम किंवा दुसरा नोकरीधंदा करायचा म्हणजे इथल्या सारख्या नाही तरी वेगळ्या काहीतरी अडचणी असतीलच की. मग मी त्या अडचणींपासून लांब कसा पळू शकणार होतो, काही समजत नव्हते. असे आयएमएच्या बाहेर जाऊन पुन्हा तेथेही आवडले नाहीतर? त्या वयात अशी काही घालमेल व्हायची. काय करावे काही समजायचे नाही. मी मनाला समजावायचा प्रयत्न केला, आता आलोच आहोत येथे तर कोर्स पूर्ण करूया. पण तरी सुद्धा सकाळ पासून चाललेल्या रॅगिंग मुळे मनाला पटत नव्हते. मी मला काही दिवस द्यायचे ठरवले. काही दिवस राहून बघायचे व मग ठरवावे येथे राहायचे का कोर्स सोडून माघारी फिरायचे ते.



माझ्या शेजारचा जिसी ब्रिजेशप्रताप सिंह ६ फूट ३ इंच उंचीचा व भारदस्त होता. माझे वजन चौपन्न किलो होते तर त्याचे सत्तर किलो भरायचे. मी कसेतरी पाच पुलअपस् काढू शकायचो व तो सहज पंधरा काढायचा. पुलअपस् म्हणजे लोखंडी सळईला लोंबकळून हाताच्या ताकदीने शरीर वर ओढून आपली छाती त्या सळईला लावायची, व परत खाली यायचे म्हणजे डोके पूर्ण सळईच्या खाली गेले पाहिजे व हात कापऱ्यात वाकलेले नकोत म्हणजे एक पुलअप झाला. ब्रिजेशप्रताप जेवढा अवाढव्य होता तितकाच एकदम साधा व प्रामाणिक. आम्ही त्याला बिपी म्हणायचो. सगळ्यांना मदत करण्यात त्याचा पाहिला नंबर. कोणाला लागले, कोणाला अडचण आली तर लागलीच मदतीला धावून जायचा. मी नेहमी सुब्रमण्यमला म्हणायचो, "ब्रिजेशकडे बघ त्याला पण तेवढीच शिक्षा होत असते तरी तो कधी तोंडातून हूं का चू काढत नाही. नाहीतर तू. दररोज एकदातरी पळून जायची गोष्ट करतोस (अगदी माझ्या मनातलं बोलतोस)".



दर आठवड्याला कोर्सलीडर बदलायचा. आमच्यातलाच कोणाला तरी करायचे. तो आठवडाभर वेळापत्रकाप्रमाणे वेगवेगळ्या परेड्सना व वेगवेगळ्या तासांना आमची संख्या डिएसला देण्याचे काम करायचा. डिएस व सीनियर्सने दिलेले हुकूम व धाडलेले निरोप सगळ्यांना सांगण्याचे काम पण त्याचेच असायचे. त्यामुळे त्या आठवड्यात त्याचा संबंध आमचा डिएस, कॅप्टन गिलशी सारखा यायचा व त्यामुळेच बहुतेक वेळेला कोर्सलीडर आठवड्याच्या शेवटी कोठचीनाकोठची शिक्षा ओढवून घ्यायचा. पाहिल्या सत्रा मधल्या शिक्षा जास्त करून सीनियर्सने दिलेल्या रॅगिंगच्या निमित्ताने मिळालेल्या असायच्या. बहुतेक वेळा डिएस प्रत्यक्षपणे कधी शिक्षा द्यायचा नाही पण, आपला अदृश्य हात सीनियर्सकडून आमच्यावर साफ करून घ्यायचा. डिएसचे शिक्षा सत्र टर्म एंडला व शेवटच्या टर्म मध्ये सुरू होणार होते म्हणे. आमचा क्लास जिथे भरायचा त्या खोलीत पाहिल्या दिवसा पासून फळ्यावर दोन गोष्टी बघायला मिळायच्या. संख्या व DLTGH. क्लास मध्ये कोर्सलीडरची दोन कामे असायची. फळ्याच्या उजव्या वरच्या बाजूला क्लास मधली आमची संख्या लिहायची. सिक रिपोर्ट सोडले तर क्लास बंक वगैरे करण्याचे कोणाच्याच मनात कधी यायचे नाही. कारण नसताना क्लास बंक केला तर रेलीगेशनच. सगळ्यांचे एकसारखे वेळापत्रक असल्या कारणाने बंक मारायला कारण काहीच नव्हते. क्लासची संख्या लिहिल्यावर लगेचच डाव्या कोपऱ्यात DLTGH असे लिहून त्यापुढे घरी जायला किती दिवस उरले त्याची उलटी उतरण लिहायचा - Days Left To Go Home. तो रोज कमी होणारा आकडा बघून मनातल्यामनात गुदगुल्या व्हायच्या.



बहुतेक जिसी क्लासेस मध्ये डोळे उघडे ठेवून झोपायचे. एवढ्या व्यायामाची सवय कोणालाच नव्हती. माझ्या सारखी काही पत्र लिहायची. आयएमए मध्ये कोणताही अभ्यासक्रम शिकवण्याची फार सुंदर प्रथा असायची. समजा युद्धशास्त्रातला ‘शत्रूवर चढाई’ हा विषय शिकवायचा असला, तर त्या विषयावर पहिल्यांदा थिअरी क्लास घेतला जायचा. मैदानी चढाई, आंतरराष्ट्रीय सीमेवरची चढाई, लाइन ऑफ कंट्रोलवरची चढाई, पहाडामधली चढाई, जंगलातली चढाई असे चढाईच्या प्रकारांचे प्रात्यक्षिक करून दाखवले जायचे. चढाई करताना रणगाड्यांचे काम काय असते, तोफा केव्हा डागल्या जातात, विमानातून बॉम्बं कसे व कधी टाकले जातात हे सांगितले जाते. पालटून लेव्हल चढाई, कंपनी लेव्हल चढाई, बटालियन लेव्हल चढाई, ब्रिगेड लेव्हल चढाई अशा चढाईच्या चढत्या कक्षा शिकवल्या जायच्या. चढाई आधीची तयारी, चढाई करण्यासाठी किती फौज घ्यायची, काय काय बरोबर घेऊन जायचे, कोठे जमायचे, कसे चालून जायचे, शत्रूच फौजा एकमेकांना भिडल्या, की कशी आगेकूच करायची, शत्रूची फळी कशी फोडायची, एकमेकांशी संपर्कात कसे राहायचे, रेडिओ सायलेन्स म्हणजे काय व केव्हा सुरू करायचा, रसद कशी पुरवली जावी, किती दारुगोळा घ्यायचा व त्याचा अनुमान कसा बांधायचा ह्याचे धडे शिकवले जायचे. ऐकून व लिहून लक्षात राहते मग मनात ठसवण्यासाठी ‘शत्रूवर चढाई’ ह्या विषयावरचा चित्रपट दाखवला जायचा. हे झाल्यावर पुढे काही दिवसांनी उघड्या मैदानात नेऊन आम्हाला चढाईचे प्रात्यक्षिक करून दाखवले जायचे. प्रात्यक्षिकासाठी दोन इंफन्टरी बटालियन्स तैनात असायच्या. एक बटालियन संरक्षक पावित्र्यात व दुसरी शत्रू होऊन आक्रमक पावित्र्यात. खऱ्यासारखे लुटुपुटूच्या युद्धाचे प्रात्यक्षिक करून दाखवले जायचे. शेवटची निकराची लढाई म्हणजे शत्रू व आपण समोरा समोर उभे ठाकल्यावर शेवटची रणदुंधूभी पुकारून बंदुकीला लावलेली संगीन शत्रूवर रोखून शेवटचे दहा मीटर पळत जिवाच्या आकांताने ‘हरहर महादेव किंवा जो बोले सो निहाल, सत् श्रीअकाल’ अशा वेगवेगळ्या गर्जना करत, जेव्हा शत्रूची छाती संगिनीच्या कक्षेत येते तेव्हाच तोंडाने जोरात ‘घोsssssssssssप’ असा उच्चार करत सगळे बळ एकवटून संगीन शत्रूच्या छातीत घुसवायची व लागलीच परत तोंडाने ‘निकाल’ असे म्हणत ती रक्त लांछित भोसकलेली संगीन तेवढ्याच ईर्ष्येने काढून दुसऱ्या शत्रूच्या छाताडात भोसकण्यासाठी तयार व्हायचे. हे करत असतानाच हळू हळू शत्रूला मागे रेटत शत्रूचे ठाणे काबीज कसे करायचे, शत्रू अशा वेळेला शेवटचा उपाय म्हणून आकस्मिक पणे उलट चढाई करतो त्याला तयार कसे राहिले पाहिजे व हे सगळे होत असतानाच शक्य होईल तितके आपल्या घायाळ झालेल्या सैनिकांना मागे नेऊन प्राथमिक उपचार केंद्रावर न्यायची जबाबदारी पण आपल्या तुकडीवर असते ह्याचे भान सोडले नाही पाहिजे, अशा बऱ्याच चढाईच्या वेगवेगळेया दशांचे प्रात्यक्षिक मैदानात आम्हाला करून दाखवले जायचे. मैदानात चालले प्रात्यक्षिक, आम्ही उंचावर बसून बघायचो. उंचावर बसून बघता येण्याजोगी सुबक गॅलरी असायची. आयएमएत जागेची कमी नाही. मैदाने मोठी मोठी. त्यामुळे अशा तऱ्हेचे प्रात्यक्षिक सहजच जमते. पुढे मिलिटरी इतिहासातले एका यशस्वी चढाईचे एक उदाहरण नकाश्यावर दाखवून, नकाश्यावरच आपल्या व शत्रूच्या सेना कशा एकमेकांशी झुंजल्या ते दाखवून, चढाई करणाऱ्या सेनेची आगेकूच नकाश्यावर दाखवायचे. नकाश्यावर बघत असताना आपल्या मनात परिसराची, अंतरांची व वेळेची चांगली कल्पना येऊ लागते. हे झाल्यावर एका पहाडा पायथ्याशी आम्हाला घेऊन जायचे व जागेचे अवलोकन झाल्यावर तेथेच ग्रुप डिस्कशन घेतले जायचे व आता पर्यंत शिकवलेल्या रणनीतीवर आपण चढाईचा डाव कसा मांडू व आपल्या व्युव्ह रचनेची परीक्षा घेतली जायची. एकमेकांशी बोलून संदेह दूर होतात त्याचा प्रत्यय यायचा आम्हाला. शेवटी एक सैनिकी कवायत म्हणजे एक्सरसाईज ठेवण्यात येई ज्यात शिकवलेली रणनिती वापरून एका जिसी गटाने दुसऱ्या जिसी गटावर चढाई करायची. स्वतः केले की समजते व मनात बिंबते. हाच शिकवण्याचा प्रकार युद्धशास्त्रातल्या व बाकीच्या विषयांचे शिक्षण देण्यासाठी वापरला जायचा. एक विषय घेऊन त्याचे सहा पदरी पद्धतीने शिक्षण दिल्यामुळे आपल्या मनावर पक्के भिनते कारण प्रत्येक गोष्टीचा सहादा उच्चार होतो. युद्धशास्त्रातील प्रत्येक संकल्पना वेगवेगळ्या प्रकाराने शिकवली की शिकणाऱ्यावर कायमचा ठसा उमटवून जाते. जिथे मरणाचा संबंध असतो तिथे गांभीर्य आपोआप येते.



एव्हाना कडाक्याची थंडी पडायला लागली होती. सुब्रमण्यमचे रडगाणे सुरूच होते. आमच्या चारशेपन्नास जिसीजच्या कोर्स मधली नऊ मुले पाहिल्याच आठवड्यात पळून गेली होती. तीन जणांनी पैसे देऊन बाहेर जाण्यासाठी अर्ज केले होते. प्रत्येक कोर्स मधून म्हणे पंधरा सोळा मुले कंटाळून, निराश होऊन किंवा घाबरून निघून जायची. कॅप्टन गिल नेहमी म्हणायचा ‘डोंट वरी गाइज, दे डोंट हॅव इट इन देम. गाइज यू आर इन द आर्मी नाउ, एंड आर्मी वॉन्टस् रिअल मेन’. तेवढ्या वेळापुरती आमची छाती फुगायची व वाटायचे आम्हीच काय ते भारताचे खड्गहस्त आहोत.



मॅक्टिला कंपनीजवळच्या उतारावरून सायकलवर स्वार होऊन सायकल चालवायची नाही हे सांगितले असताना आम्ही नेहमी सायकली वरून न उतरताच यायचो. का कोण जाणे पण मजा यायची. त्या दिवशी नेमके हेच करताना जिसी सुब्रमण्यम सायकल वरून घसरून पडला व त्या बरोबर त्या स्क्वॉड मधले अजून काही जिसीस पडले. उतार एवढा होता की आम्ही एकमेकांना एकदम खालीच भेटलो. बिपी व उरलेल्या बाकीच्यांनी पडलेल्या जिसीजना उठवले व जवळच्या मेडिकल रूम मध्ये नेले. औषधे व चिकटपट्या झाल्या व आम्ही वेळापत्रका प्रमाणे त्या दिवसाच्या चक्रात गुंतलो.



खरे म्हणजे संध्याकाळचा जेवणा पर्यंतचा वेळ हा अभ्यासाचा तास असायचा. पण सीनियर्सना हाच वेळ मिळायचा आमचे फॉलइन घेऊन रॅगिंग करायचा. रॅगिंग जेवणा पर्यंत चालायचे व त्यानंतरही परत रात्री अकरा, साडे अकरा पर्यंत, जो पर्यंत सीनियर्सना झोप यायची नाही तो पर्यंत. काहीनाकाही कारण रोज मिळायचे.



आज विशेष राग असणार सीनियर्सचा आमच्यावर ह्याची आम्हाला कल्पना होतीच. पण त्या दिवशी जेवणा पर्यंत आम्हाला चक्क अभ्यासाच्या तासा मध्ये अभ्यास करायला मोकळे सोडले होते. जेवण झाल्यावर मात्र आमच्या नशिबाने कोलांटी मारली व आम्हाला मधल्या अंगणा मध्ये फॉलइन व्हावे लागले. रोज काही तरी नवे कारण असायचे. आज सायकली उतारावरून चालवत आलो ते कारण होते.



प्रत्येक कोर्स मध्ये एकदातरी ही मसुरी नाइट होते. मसुरी नाइट यशस्वी होण्यास कडाक्याची थंडी असली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचे. अशीच कडाक्याची थंडी पडली होती, जेवण आटोपले होते, नेहमी प्रमाणे सकाळा चार वाजता उठायचे हे डोक्यात होते, असे वाटत होते कधी एकदा गादीवर अंग टाकतो. तेवढ्यात फॉलइनची घोषणा झाली व आम्ही मधल्या अंगणा मध्ये जमा झालो. आजचा विषय होता अर्थातच उतारावरून सायकल चालवणे. आम्हाला गेम्स ड्रेस मध्ये एक बादली भर गार पाणी घेऊन बोलावले होते फॉलइन. मला समजून चुकले आज आज आमची मसुरी नाइट असणार आहे म्हणून. आम्ही फॉलइन झालो व जेयुओ भुल्लरने आम्हाला ‘एमएल’ पाजणे सुरू केले. एमएल म्हणजे ‘मॉरल लेक्चर’. फॉलइन मध्ये प्रत्येका शेजारी पाण्याने भरलेल्या बादल्या होत्या. दहा वाजता सुरू झालेले ‘एमएल’, मध्यरात्रीला संपले. एमएल मध्ये फार काही अकलेचे कांदे फोडले जात नव्हते, ते फक्त वेळ काढत आम्हाला तिष्ठत उभे ठेवण्याचे एक साधन होते. आम्ही सुद्धा प्रवचन ऐकण्याचा नुसताच आव आणला होता. प्रत्येक अर्ध्या तासाने थंड पाण्याचा एक मग स्वतःच्या डोक्यावर ओतायचा असा हुकूम. मसुरीच्या डोंगरांवरून गार वारे अंगावर शहारे आणत होते. तशातच असा गार पाण्याचा मग त्या थंडीच्या रात्री डोक्यावर उपडा केल्यावर पूर्ण अंग रोमांचित व्हायचे.... पण चुकीच्या कारणाने. एकदा पाण्याचा मग घातला की पुढे अर्धातास थंडी वाऱ्यात व भिजलेल्या अंगाने कुडकुडत त्या मस्तावलेल्या भुल्लरचे एमएल ऐकल्या सारखे आम्ही करत होतो. अंगाच्या गरमीने जेव्हा अंग वाळायची वेळ यायची व आम्हाला बरे वाटायला लागायचे तेव्हाच परत एक गार पाण्याचा मग डोक्यावरून घ्यायचा हुकूम भुल्लर सोडायचा. अंघोळ करताना लहानपणी ‘हर गंगेsssss भागीssssरथी’ असे म्हणत डोक्यावर ऊन पाण्याचा तांब्या उपडा करताना जितके बरे वाटे त्या उलट ही शिवालीकच्या खोऱ्यातली गार गंगोत्री. विजेचा झटका लागल्यागत मणक्यातून थंडीच्या वेदना उठायच्या व नंतर बराच वेळ गार बोचणारा वारा अगदी सहनशीलतेचा अंत बघायचा. मागून कोठूनतरी कोणत्यातरी सीनियरच्या, बहुतेक बटालियन अंडर ऑफिसर ज्याला बियुओ म्हटले जायचे अशा बियुओ रिनच्या खोलीतल्या रेडियोवरून हिंदी चित्रपट ‘कयामत से कयामत’ मधले ‘तुम भी अकेले हम भी अकेले मजा आ रहा है कसमसे।’ हे गाणे कानावर पडत होते. रॅगिंगमे मजा आ रहा है कसमसे। असे आम्हाला सीनियर्स चिडवत होते जणू. कित्येक लोकांना ह्या गाण्याने त्यांच्या पाहिल्या प्रेमाची आठवण होत असेल, पण मला मात्र ती मसुरी नाइट आठवून रोमांच उभे राहते अंगावर. ज्याने स्वतः रॅगिंग सहन केले आहे तोच नीट रॅगिंग करू शकतो. रॅगिंग ज्याने सोसले आहे त्यालाच बरोबर कळते की आपल्या कनिष्ठांचे रॅगिंग किती घ्यायचे, कसे घ्यायचे व कोठे थांबायचे ते. आमच्या बरोबर असेच व्हायचे. आमचे सीनियर्स बरोबर समजायचे कोठे थांबायचे ते.



आयएमएत रॅगिंग घेऊन असे वातावरण निर्माण कले जाते की पाहिल्या काही दिवसातच आपला आत्मविश्वास साफ मोडून काढला जातो. पण हळूहळू शिस्तबद्ध वातावरणात जिसी स्वतःचा हरवलेला आत्मविश्वास परत बांधतो तेव्हा तो द्विगुणित होऊन प्रत्येकात निवासतो. शिस्त व एकवाक्यता ह्याने मनाला सुरक्षितता येते व आपली प्रतिभा उजळून येते. त्या दिवशीची मसुरी नाइट रात्री बारा पर्यंत चालली होती. जेव्हा जेव्हा लहानपणीच्या वर्षासहलीची आठवण येते किंवा चित्रपटात नायक नायिका पावसात ओले चिंब बेधूंध नाचताना पाहतो तेव्हा तेव्हा रोमांचित होण्या ऐवजी मसुरी नाइटच्या कल्पनेने माझ्या अंगावर शहारे येतात. प्रत्येक तांब्यागणिक जिसी सुब्रमण्यम शिव्या घालत होता मजजवळ. उद्याच वडलांना बोलावतो म्हणत होता. दमून भागून कुडकुडत जेव्हा मी माझ्या खोलीवर गेलो तेव्हा मी पण शिव्या घालत होतो. देवाजवळ माझी एकच प्रार्थना होती ती म्हणजे ‘मला ताप येऊन मी जबरदस्त आजारी पडू देत, कसे तरी करून आयएमएच्या हॉस्पिटलात भरती होऊ देत, काही दिवस ह्या रॅगिंग पासून सुटका मिळवू शकेन’. पण तसे काही होणार नव्हते. काही महिन्या नंतर कळून चुकले की देवाने आपले शरीर किती भरभक्कम केले आहे ते.



ज्या रात्री मसुरी नाइट झाली त्या रात्री व नंतर काही दिवस जिसी ब्रजेशप्रतापसिंह खूप गंभीर झाला होता. त्याला नेहमी वाटायचे की आपण असे वागले पाहिजे की आपल्याला मुळीच कधी शिक्षा होता कामा नये. मी त्याला सांगायचा विफळ प्रयास करायचो. मी म्हणायचो त्याला ‘असे वागण्याचा प्रयत्न जरूर कर पण कधीकधी आपली काही चूक नसताना सुद्धा आपण ग्रुप मध्ये आहोत त्याचे कर्म आपल्या माथी मारलेच जाते. रॅगिंग घेण्यासाठी सतत कारणेच शोधणारे सीनियर्स असल्या मुळे, रॅगिंग पासून आपली मुक्ती एवढ्यात नाही. जिसीजचे मन कणखर करण्याचे रॅगिंग एक साधन आहे, असे धरून चालले तर रॅगिंग बद्दल काही वाटणार नाही व आपण त्याबद्दल रोजरोज शिव्या घालत बसणार नाही’. ब्रिजेशला काही ते पटले नाही व पुढच्या दोन दिवसातच तो अचानक कोर्स सोडून निघून गेला. त्याचे वडील आले होते, आमच्या डिएस ने त्यांना भरपूर समजावले पण त्याने त्याचा निर्णय घेतला होता. चार महिन्याचे पैसे भरून तो निघून गेला. आमचा बिपी आम्हाला मध्येच सोडून घरी निघून गेला. कायमचा.





(क्रमशः)

Friday, August 26, 2011

भ्रष्टाचाराविरुद्ध लढा



जन लोकपाल हे विधेयक संसदेत आणण्यासाठी अण्णा हजारे ह्यांच्या आमरण उपोषणा बद्दल लोकांकडून व सरकार कडून बरेच प्रश्न विचारले जात आहेत. प्रामुख्याने त्यातले काही प्रश्न असे आहेत.



अ) जन लोकपाल किंवा लोकपाल विधेयक आणल्याने भारतातला भ्रष्टाचार संपणार नाही.

ब) अण्णा हजारे ह्यांचे आमरण उपोषण हे असंविधानिक आहे व पुढे हेच उदाहरण घेऊन बाकीची लोकं सरकारला वेठीस धरू लागतील.

क) जन लोकपाल विधेयक लागू करण्यालायक नाही. त्यातल्या तरतुदी लोकशाहीच्या तत्त्वांविरुद्ध आहेत.

ड) विधेयक संसदेत आणायला व ते पारित होण्यास वेळ लागतो. अण्णा हजारेंची मागणी अवास्तव आहे.



ह्या रोज विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा उहापोह करूया -



अ) जन लोकपाल किंवा लोकपाल विधेयक आणल्याने भारतातला भ्रष्टाचार संपणार नाही. जनलोकपाल किंवा लोकपाल विधेयक आणल्याने आपल्या देशात जो भ्रष्टाचाराचा राक्षस फोफावला आहे तो मारला जाणार नाही हे मान्य. जनलोकपाल विधेयक किंवा लोकपाल विधेयक भ्रष्टाचाराच्या रोगावरचे हमखास औषध नव्हे. पण ते आणल्याने थोडा तरी फरक पडेलच. निदान संघटनात्मक भ्रष्टाचार स्वैर चालणार नाही व त्यावर अंकुश बसेल. पूर्णपणे नाही पण काही अंशाने फरक पडेल. हे ही नसे थोडके. लोकपाल विधेयकाने भ्रष्टाचार कमी होण्यात थोडेपण यश आले तर चांगलेच आहे. जन लोकपाल विधेयक आणण्यासाठी अण्णा हजारेंनी छेडलेले आंदोलन हे जनजागृतीचे फार महत्त्वाचे काम करत आहे. भ्रष्टाचारा विरुद्ध लोकजागृती करण्याचे. हल्ली लाचलुचपत व भ्रष्टाचार इतका फोफावतो आहे की एखाद्याला पैसे कसे चारायचे व एखाद्या कामासाठी पैसे कसे घ्यायचे हे एक प्रशासन तंत्र म्हणून उद्या व्यवस्थापन शिकवणाऱ्या महाविद्यालयातल्या पाठ्यक्रमात सुद्धा येऊ शकते. लाच देणे व घेणे इतके स्वैर होऊ लागले आहे की लोकांची मानसिकता बधिर होऊ लागली होती. जास्त पैसे कमावण्याच्या नादात व इतरांच्या पुढे जाण्याच्या धुंदीत आपण मूलभूत नीतिमत्ता विसरायला लागलो होतो. लाच घेणे व देणे हे अनैतिक कृत्य आहे हेच आपण विसरायला लागलो होतो. उलट जो लाच घेतो व लाच देतो तो ‘स्मार्ट’ व जो लाच देत नाही व घेत नाही तो मागासलेला व हल्लीच्या समाजरचनेत राहायला नालायक असा आपला समज होऊ चालला होता. ज्याच्या कडे कौशल्य, कर्तब, शक्ती किंवा बुद्धी असते, आणि परिश्रम करण्याची तयारी असते, तो मनुष्य आपल्या कर्तबगारीवर पैसे मिळवतो. स्वतःचे इमान व स्वतःचा धर्म विकून नव्हे. थोड्याशा पैशासाठी, आत्मा विकून आपल्या स्वतःला व आपल्या घरच्या लोकांना सामोरं जाता येणार नाही. लाच घेणाऱ्या प्रत्येक माणसापाठीमागे नेहमी त्याचे हावरट कुटुंब असते. लाचखोरी करून आपल्याला "दुसऱ्याने मला लाच घ्यायला लावली" असे म्हणून टाळता पण येत नाही, कारण लाच घ्यायची का नाही हे ठरवणारे शेवटी आपण स्वतःच असतो व हा निर्णय आपल्या स्वतःचाच असतो. जो इसम लाच खातो व देतो तो आपल्या राष्ट्राचा शत्रू ठरतो, लाच खातो तो इसम जास्त मोठा शत्रू. मग इतरवेळेला किती का राष्ट्रप्रेमाचा आव आणूदे. जो लाच घेतो तो पापी व राष्ट्रद्रोही असतो. अण्णा हजारेह्यांच्या उपोषणांनी समाजाला ह्या विसरत चाललेल्या नीतिमत्तेची जाग आली. लाच देणे व घेणे चांगले नाही व कधीच नव्हते ह्याची जाण आणवून दिली. लाच घेणाऱ्या कोडग्यांना सुद्धा जाग आली की ते करत आहेत तो ‘स्मार्टनेस’ नव्हे पण नैतिकतेने व कायद्याने चुकीचे आहे. अण्णांच्या उपोषणाने निदान ही पिढी तरी लाचखोरी किती चुकीची आहे ते समजली. पुढच्या पिढीसाठी कोणी दुसरा अण्णा हजारे होईल त्याची चिंता आता नको.



ब) अण्णा हजारे ह्यांचे आमरण उपोषण हे असंविधानिक आहे व पुढे हे उदाहरण घेऊन बाकीची लोकं रोज सरकारला वेठीस धरू लागतील. लोकशाही मध्ये लोकांचे राज्य असते. लोकांच्या इच्छेचा मान सर्वात महत्त्वाचा. ह्यात फक्त फारकत देशाच्या सार्वभौमीत्वावर गदा आणणाऱ्यांवर व तेव्हाच होऊ शकते. २१ ऑगस्ट २०१० रोजी नवी दिल्ली येथे अरुंधती रॉय व त्यांच्या मानवी हक्क जपणाऱ्या मित्रपरिवारांनी (श्री वरावर राव व बाकीचे माओईस्ट मित्र) एक सभा बोलावली होती, व त्या सभेत हुरियत पुढारी व काश्मीर तोडायला बसलेले श्री सय्यद अली शहा गीलानी हेही बोलले होते. ह्या सभेचा विषय होता– काश्मीरला आझादी – एकच पर्याय. ही सभा, कमिटी फॉर द रिलीज ऑफ पॉलिटिकल प्रिझनर्स ने बोलावली होती. (हे वृत्त द हिंदू ह्या २२ ऑक्टोबरच्या वृत्तपत्रात छापून आले आहे. ) महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सभेतून अरुंधती रॉय व तीच्या मित्रांनी ह्या काश्मीर तोडू लोकांना त्यांच्या काश्मीर आझादीच्या भारताच्या विरुद्धच्या लढाईत पाठिंबा जाहीर केला आहे. आश्चर्य ह्याचे वाटते की असा आगाऊ सूचना देऊन आयोजित केलेला कार्यक्रम सरकारला गैर वाटला नाही. असंविधानीक पण वाटला नाही. विचार स्वातंत्र्य म्हणून सरकार मूग गिळून बसले व आता आपल्या देशाला खाऊन टाकणाऱ्या लाच व भ्रष्टाचारा सारख्या शापा पासून मुक्त करण्यासाठी पूर्व सैनिक अण्णा हजारे लोकजाग्रण करू इच्छीत आहेत तर त्यांची कृती असंविधानिक म्हणून मानली जात आहे ह्याची कमाल वाटते. अशा करण्याने लोकांच्या दृष्टीने आजचे सरकार हे अत्यंत हतबल, उद्धट व निर्लज्ज असे दिसून येत आहे. सरकारला वाटते की अण्णा हजरेंच्या अशा उपोषणाचे उदाहरण करून बाकीची लोकं रोज सरकारला वेठीस धरू लागतील. सरकारला हे कळत नाही काय, की कोणीही सोम्या गोम्या असे करायला लागला तर त्याला लोकांचा पाठिंबा मिळणार नाही. काही ठोस कार्यक्रम नसेल तर उगाच कोणी स्वतःचा वेळ घालवून पाठिंबा द्यायला जात नाही. लोकांच्या मनातला राग २जी च्या हजारो करोडो रुपयांचा

घोटाळा, राष्ट्रकुल स्पर्धेत झालेला प्रचंड घोटाळा, हसन अली चा मुद्दा व भारता बाहेर स्विस पतपेढ्यांमध्ये साठवलेली प्रचंड धनराशी ह्या अतिरेकामुळे अण्णांच्या उपोषणा निमित्ताने उफाळून आला आहे. लोकांना अती फोफावलेल्या भ्रष्टाचारा बद्दल एवढी घृणा उत्पन्न झाली की त्याचा विस्फोट होऊन आजची परिस्थिती निर्माण झाली.



क) जन लोकपाल विधेयक लागू करण्यालायक नाही. त्यातल्या तरतुदी लोकशाहीच्या तत्त्वांविरुद्ध आहेत. जर कठोर तरतुदी आहेत तर असू दयांत. संसदेत त्यावर विचार होऊ देत. विचारच करायचा नाही असा पवित्रा चुकीच आहे. अतिरेक्यांविरुद्ध ‘टाडा’ सारखा कठोर कायदा करावा लागला तसा काळा पैसा व भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कायदा करण्यातच जनतेचा दीर्घकालीन फायदा आहे.



ड) विधेयक संसदेत आणायला व ते पारित होण्यास वेळ लागतो, अण्णा हजारेंची मागणी अवास्तव आहे. विधेयक यायला वेळ लागतो हे सगळे जाणतात. पण चाळीस वर्ष लोकपाल बिल लोंबकळतं ठेवायचे हे मान्य नाही. राजकीय पक्षांना हा कायदा नकोच आहे अशी शंका उत्पन्न होते आणि तसे नसेल तर मग राजकीय नेत्यांना प्रशासनाची क्षमता नाही असे वाटायला लागते. खरे म्हणजे राजकीय इच्छा असेल तर राष्ट्रपतींची अधिसूचना आणवून लोकपाल विधेयक अमलात आणता येईल व पुढच्या सहा महिन्यात मग लोकसभेत व राज्या सभेत ते पारित करता येईल जसे लोकांना पाहिजे तसे.







आपण राष्ट्रव्रत घेतले का?



त्या संबंधी अजून वाचा येथे







आणि येथे











Tuesday, August 2, 2011

राजाराम सीताराम – आयएमएतले दिवस भाग १

ह्या आधीचे

राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो। ...... प्रवेश


राजाराम सीताराम........ पुढचे चार दिवस

राजाराम सीताराम ..... सुरवातीचे दिवस – भाग १

राजाराम सीताराम ..... सुरवातीचे दिवस – भाग २


………….. मी, जिसी आकाश काशिनाथ शिरगावकर, डोंबिवलीचा राहणारा.



मी डोंबिवलीचा असे सांगितले तर कोणाला कळायचे नाही व मुंबई म्हटले तर मुंबईचा मुलगा मी नाही हे मला माहीत होते. त्यामुळे मी मुंबई जवळ ठाणे जिल्ह्यात राहणारा असे सांगायचो. ठाणे हा एक जिल्हा आहे हे सुद्धा बऱ्याच मुलांना ठाऊक नव्हते.



माझ्या बद्दल काय सांगावे ह्याची घालमेल मनात होत होती. मला काय येते, असे कोणी विचारले तर काय सांगावे ह्याचा मलाच प्रश्न पडावा अशी परिस्थिती होती. अभ्यासात बऱ्यापैकी चमकणारा आहे असे म्हणावे तर आयएमएतल्या अभ्यासक्रमात त्या ‘चमकणाऱ्या’ अकलेचा काडीचा उपयोग नव्हता. कारण शाळा व कॉलेजातले नेहमीचे आपण जे शिकतो त्या अभ्यासक्रमाचा लवलेशही नव्हता. इथले विषय म्हणजे अजब प्रकारचे होते. नेहमीचे आपले गणित, सायन्स, भाषा, इतिहास, भूगोल येथे नव्हते. येथे होते युद्ध शास्त्र त्यात शत्रुसेनेवर चढाई कशी करायची, बचाव कसा करायचा, जमिनीत सुरंगांच्या माळा कशा रचायच्या त्याचे शिक्षण होते. खंदक कसा असला पाहिजे व तो कसा खणायचा ह्याचे ज्ञान होते. शस्त्रास्त्र शास्त्रा मध्ये रायफल, मशिनगन, कारबाईन, पिसातलं, रॉकेट लॉन्चर, ग्रेनेड कसे हाताळायचे त्याचे प्रशिक्षण होते. टेंट कसा उभारायचा, घातपात कसे घडवून आणायचे, युद्धात रेडिओवर कसे एकदुसऱ्याशी बोलायचे त्याचे शिक्षण होते. इतिहास होता पण सैन्यातल्या पूर्वीच्या झालेल्या युद्धांमधले धडे होते. दुसऱ्या महायुद्धातली ब्रह्मदेशावरची स्वारी किंवा चिंडीटस स्वारी बद्दलचा युद्ध इतिहास होता. शिवाय फील्ड मार्शल स्लीम, डेझर्ट फॉक्स रोमेल अशा महारथींची चरित्रे होती. गनिमी काव्याचे प्रशिक्षण देताना शिवाजीचा पुसटसा संदर्भ होता पण चरित्र नव्हते. मुळात मराठी मनात शिवाजी बद्दल जेवढे प्रचंड प्रेम असते, आदर असतो व अभिमान असतो त्या मानाने बाकीच्या राज्यातून आलेल्या मुलांची शिवाजी बद्दल न वाटणारी जाज्वल्यता आपल्याला निराश करते. मिलिटरी हिस्ट्री हा विषय नवीन होता. शालेय इतिहास व भूगोलाचा येथे मागमूस नव्हता..



मी कथा कथन करतो असे म्हटले तर ते मी मराठीतून करायचो. येथे बोंबलायला मराठी कोणाला येत होती. मराठी बोलणारे शोधून सापडत नव्हते. साडे चारशे मुलांच्या कोर्स मध्ये इन मीन सगळी मिळून आठ दहा मराठी ‘पोरं’ होती. आमच्या प्लटून मध्ये मला सोडले तर दुसरे कोणी मराठी नव्हते. मग कोण ऐकणार त्या मराठी कथा. येथे फक्त हिंदी व इंग्रजीतून संभाषण करावे लागायचे. त्यात आमची हिंदी ही बंबया हिंदी. पण दक्षिणेकडील मुलांपेक्षा बरी. त्यामुळे त्यात बोलणे पण दुरापास्त. इंग्रजीचे लहानपणापासूनच रेशन कार्ड हरवलेले त्यामुळे फाड फाड इंग्रजी महाराष्ट्रात फक्त कोकाट्यांनाच माहिती. ह्या सगळ्या उण्यांमुळे माझी हालत एकदम खस्ता झाली होती.



चित्र खूप छान काढतो असे सांगितले तर आयएमएत चित्रांचे काय लोणचे घालायचे असे विचारले गेले. आयएमएत पाहिजे हॉकी, फुटबॉल खेळणारे गडी. क्रॉसकंट्री, टेनिस किंवा स्क्वॉश खेळता येणारे खेळाडू. मी ह्या सगळ्याचा जेव्हा विचार केला तेव्हा मला समजून चुकले की ह्यातले मला काहीच येत नाही. आयएमएतल्या अपेक्षा वेगळ्याच होत्या. एकदम मला ‘कुठून आलो आयएमएत’असे वाटायला लागले. मजा, ही होती की जवळपास सगळ्यांना असेच वाटत होते. फक्त काहीच जिसी मैदानी खेळात पारंगत होते. ते सोडले तर कोणत्याही जिसीकडे असली पात्रता नव्हती.



परितोष शहा – इलेक्ट्रिक गिटार सुंदर वाजवायचा, स्विमिंग तर असे यायचे की मासोळीच वाटायचा. तेव्हा समजले की पाण्यात तरंगता येणे म्हणजे पोहणे नव्हे……



संध्याकाळी जेवणासाठी सोडल्या सोडल्या आम्ही मुफ्ती ड्रेस चढवला व कॅडेटस मेस मध्ये गेलो. आम्हाला ऑफिसर मेस मध्ये जायची अद्याप परवानगी नव्हती. आता हळूहळू काट्या चमच्याने जेवण जेवायचा सराव होऊ लागला होता. आईने वाढलेल्या आणि जमिनीवर बसून हाताने खाल्लेल्या घरच्या जेवणाची मजा काय असते ते काटे चमचे हातात धरल्यावर आणि आयएमएत गेल्यावर कळते. जेवण झाले व आम्ही मुफ्ती ड्रेस मध्येच फॉलइन झालो त्याच अंगणात. आम्हाला आठवड्यातल्या जबाबदाऱ्या समजावून सांगण्यात आल्या. जिसी अमित वर्मा फॉलइन घेऊन रिपोर्ट देणार, मी व जिसी ब्रजेशप्रतापसिंह फॉलइनची घोषणा करणार होतो, काही जिसीजवर सीनियर्सने त्यांचा सकाळचा चहा व बिस्किटे आणून द्यायची जबाबदारी सोपोवली. जिसी अशोक पांडे व जिसी परितोष शहावर कोणतीही जबाबदारी सोपोवली नव्हती, त्यांना त्यांच्या खेळाचा सराव करायला सांगितला होता.



ज्यांना पूर्ण २५ पुशअपस्, सिटअपस् नीट घालता येत नव्हते त्यांना त्या कशा घालायच्या त्या शिकवायचा प्रयत्न झाला व त्यांच्याकडून त्या करवून घेतल्या. मी पूर्वी शाखेत जायचो. संध्याकाळच्या त्या शाखेत जोर, बैठका व सूर्यनमस्कार खूप घातले होते. शंभर सूर्यनमस्कारांची तर शाखेत कावड लागायची, त्यामुळे असेल कदाचित पण मला सहजच पुशअपस् व सिटअपस् घालता येत होत्या व म्हणून मी सुटलो. त्याच फॉलइनमध्ये पोहता न येणाऱ्यांची नावे लिहिली गेली कारण ज्यांना पोहता येत नाही अशा जिसींना सरावासाठी जास्तीचा पोहण्याचा तास मिळणार होता. पाहिल्या सत्रामध्ये शंभर मीटर पोहणे व दहा मीटर उंचीवरून पाण्यात उडी मारणे असा अभ्यास होता. आयएमेत पोहण्याच्या परीक्षेत नापास म्हणजे हमखास रेलीगेशन. मला माझ्या वडलांची आठवण आली त्यांना मनातल्या मनात हजार दंडवत ठोकले. डोंबिवलीला तरणतलाव नव्हता, मी संध्याकाळी लोकलने ठाण्याला जायचो. रंगायतनच्या बाजूला लागूनच तरणतलाव होता. माझे वडील त्यांची नोकरी करून डोंबिवलीला ओसंडून वाहणाऱ्या लोकलने परत येताना मध्येच ठाण्याला उतरायचे, मला पोहणे शिकवायचे व मग आम्ही दोघे एकत्र डोंबिवलीला यायचो. परत यायला आम्हाला रात्रीचे नऊ वाजायचे. त्याचा मला आता फायदा होत होता. बंगाली, केरळीय व बिहारी चांगले पोहणारे.



एका प्लटून मध्येच चाळीस जिसी. मॅकटीला कंपनी मध्ये साधारण दीडशे जिसी होते. रोज कोणीनाकोणी काहीतरी चूक करायचेच. आमची मॅकटीला कंपनी टॉन्स नदीच्या किनाऱ्या जवळ होती. तेथून रोज सायकली घेऊन माणेकशॉ बटालियनच्या क्लासेसना जायचे म्हणजे वाटेत साधारण शंभर मीटरचा उभा चढ लागत असे, सायकलवरून तो चढ चढून जाताना चांगलीच दमछाक व्हायची, ह्याउलट येताना उतार असायचा व त्यामुळे त्या शंभर मीटरच्या उतारावर सायकली सुसाट वेगाने आम्ही हाकायचो. मजा यायची. शिवाय दुपारच्या त्यावेळेला क्लासेस सुटलेले असायचे व पोटात खूप भूक लागलेली असायची, उतारावरून भरधाव सायकल हाकायला हे अजून एक कारण होते आमच्याकडे. येताना सायकलवरून उतरून, सायकलचे हॅन्डल हातात धरून, स्क्वॉड करून, पळत यायचे अशी सक्त ताकीद सीनियर्सने आम्हाला दिली होती. ह्याला कारण असे होते की पूर्वी खूपदा ह्याच उतारावरून सायकलवरून जिसी पडले होते, हात पाय मोडल्या मुळे त्यांचे रेलीगेशन झाले होते.



दुसऱ्या दिवशीची तयारी करे पर्यंत रोज रात्रीचे बारा वाजायचे झोपायला. परत भल्या पहाटेचे ते प्री-मस्टर संपले नव्हते अजून. कसलाही विचार करायची उसंत मिळत नव्हती. रात्री झोपताना झोप लागे पर्यंत कधी कधी मनात विचार चालायचे. पण फार क्वचित. इतका मी दमलेला असायचो की आडवे झाल्या झाल्या झोप लागून जायची. हळूहळू थंडीला सुरवात झाली होती. मुंबईची थंडी व इथल्या थंडीत बराच फरक होता. गादीवर अंग टाकून झोप येई पर्यंत माझ्या डोळ्या समोर गेल्या महिना दीड महिन्याची रूपरेषा सरकली. असे काही गुंतून गेलो होतो मी की, माझे विश्वच बदलून गेले होते. मला आमचा आयएमएतला पहिला दिवस आठवला. डेहराडून स्टेशनवर सिव्हिल कपड्यातून आलेलो आम्ही मुले. अशोक पांडेची वाढलेली दाढी, सुब्रमण्यमचे कपाळावर आडवे लावलेले भस्म व गबाळ्या सारखी घातलेली पॅन्ट शर्ट, कोणी जोडे घातलेले, कोणी चपलेत तर कोणी सॅन्डल्स मध्ये होते. कोणाचा न खोचलेला शर्ट, तर ब्रिजेशप्रताप सिंहाचे मानेवर रुळणारे न कापलेले केस.



दीड दोन महिन्यांच्या रोजच्या संध्याकाळच्या फॉलइननी व त्याबरोबर मिळणाऱ्या शिक्षेतून आम्ही सगळी मुले आता खरोखरीच ‘जिसी’ वाटायला लागलो होतो. आमचे एक सारखे केस कापले जायचे. सगळे दाढी करायला लागले होते. नियमाने करावीच लागायची. गणवेशावर न केलेली दाढी म्हणजे गणवेश पूर्णच झाला नाही. हा नियम फक्त शीख जिसींना लागू नसायचा. कपाळावर गंध नाही, गळ्यात कोठचेही गंडे दोरे नाहीत. एकसारखा गणवेश व एकसारखे सगळ्यांचे जोडे. प्रत्येक पाच जिसी मागे एक सेवादार होता दिलेला. त्याला आम्ही महिन्याला दीडशे रुपये द्यायचो. तो रोज आमचे जोडे पॉलिश करायचा, बेल्ट पॉलिश करून बेल्टच्या ब्रासचे बक्कल, कॉलरवर टर्म दाखवणारे ब्रासचे कॉलर डॉक्स्, खांद्यावर लावायचे ऍप्लेट, बॅरेवरचा आयएमएचा इन्सिग्नीया हे सगळे ब्रासोने चमकवायचा. धोबी दर रोज गणवेश धुऊन इस्त्रीकरून आणायचा. ह्या सगळ्या मुळे आता सगळे जिसी एकदम फाकडे दिसायला लागले होते.



रोजच्या ड्रिल – कवायतीमुळे चालण्यात सुद्धा एक चांगला ढब येऊ लागला होता. दोन जिसी चालताना – चुकलो पळताना दोघांचा आपोआप डावा तर डावाच पाय एकदम पुढे यायला लागला होता आणि आमच्या नकळत ‘कदम - कदम मिलाए जा’ चा अर्थ आम्हाला समजायला लागला होता. आधीच फाकडे दिसणारे जिसीज आता ऐटबाज दिसायला लागले होते.



खोली बाहेर पडताना कोणी अर्ध्या चड्डीत, कोणी बर्म्युडा मध्ये, कोणी अनवाणी हे न दिसता आता तो, ‘पिक्चर मध्ये नायिकेचा बाप घालतो तसा’ गाऊन घालून व बाथरुम स्लीपर्स शिवाय कोणी दिसायचे नाही. गाऊन घालून खोली बाहेर येणे पण फक्त अती पहाटे अंघोळीसाठी, कोपऱ्यातल्या सार्वजनिक स्नानगृहात जातानाच फक्त एरव्ही असे घरातले कपडे घालून बाहेर पडायचे काही कारणच नसायचे. रोज शिक्षा खाऊन खाऊन ही शिकवण इतकी मना मध्ये रुजली की इतक्या वर्षाने सुद्धा रोज गुळगुळीत दाढी केल्या शिवाय व नसल्यात जमा झालेले डोक्यावरचे पीक, नियमित कापल्या शिवाय कसेतरीच वाटते. एवढेच काय पण कंमरे खाली कुल्ले दिसे पर्यंत व जमिनीवर लोळणारी लो-राइझ जीन्स घातलेली आणि एका कानात बाळी घातलेली हल्लीची तरुण मुले बघताना डोक्यात एक तिडीक निघून जाते. अशा स्वतःला ‘कुssल’ समजणाऱ्या मुलांना ओरडून सांगावेसे वाटते की अशी कुल्ले दिसे पर्यंत लो-राइझ जीन्स घालणे हे कुssलपणाचे लक्षण नाही तर अमेरिकेतील तुरुंगातले कैदी घालतात असे कपडे. तेथील जनतेने ती ‘फॅशन’ म्हणून बाजारात आणली. तुम्ही ती काही विचार न करता उचलली. तुमच्या ‘कुssल’ व आमच्या ‘स्मार्ट’मध्ये फरक आहे.



सामूहिक जीवनाचे काही नियम मनात आपोआप रुजू होऊ लागले. आपल्या सीनियर बरोबर चालताना आपण त्याच्या डाव्या बाजूने चालायचे. दुसऱ्याला भेटल्यावर त्याचे पहिल्यांदा अभिवादन करायची लाज वाटत नव्हती आता. उलट तसे केल्याने एकमेकांत नाते जोडले जाते व दुसरा आपल्याला काय म्हणायचे आहे त्याकडे जास्त चांगल्या भावनेने लक्ष देतो हे कळले.



काही दिवसांपूर्वी, रात्रीचे फॉलइन संपल्यावर जेव्हा आम्हाला आमच्या खोलीवर जायला परवानगी मिळाली तेव्हा सुब्बूने जेयुओ भुल्लरला गुडनाईट म्हटले होते.



यू क्लाऊन, टू विश द टाइम ऑफ द डे, डझंन मीन डॅट यू ज्युनियर्स विल विष ए सीनियर, गुड नाइट. ओनल्ही अ सीनियर कॅन विश हिज ज्युनियर गुड नाइट. दॅट इज हिज प्रेरॉगेटिव्ह. यू विल ऑलवेज से गुड डे. दॅट इज युअर प्रिव्हिलेज. इज इट क्लिअर टू यू ऑल?



क्लिअर सर........ आमचा कोरस. पुढे अर्धा तास आम्हाला त्यावर एवढे मोठे लेक्चर मिळाले होते ते सांगायला नकोच.



गुड नाइट गाईज सियू टूमारो.

गुड डे सर. परत एकदा आमचा कोरस. (एकदाचे सुटलो म्हणून).



मी सुब्रमण्यमच्या रूमवर गेलो त्याला भेटायला. त्याला शर्ट घालता येत नव्हता. तो नुकताच मेडिकल इन्सपेक्शन रूम मध्ये जाऊन डॉक्टरांना भेटून आला होता. डॉक्टरने एक दिवसासाठी त्याच्या सगळ्या परेड्स माफ केल्या होत्या. ‘सिक इन क्वार्टस’ म्हणतात त्याला. त्या दिवशीचे क्रॉलिंग त्याने भलतेच मनावर घेऊन केले होते त्यामुळे दोन्ही खांद्यांवरचे सालडे सुटले होते व जखम झोंबत होती. मला सुब्रमण्यम म्हणतो.....



(क्रमशः)


Thursday, July 28, 2011

सुरवातीचे दिवस – भाग २





………….. मला कधी एकदा रूम मध्ये जाऊन झोपतो असे झाले होते. वेळापत्रका प्रमाणे आता एकदम दुपारी ४ वाजता गेम्स पिरियड होता.



मला कधी एकदा रूम मध्ये जाऊन झोपतो असे झाले होते. वेळापत्रका प्रमाणे आता एकदम दुपारी ४ वाजता गेम्स पिरियड होता. मी जेवण पटकन संपवून माझ्या खोलीमध्ये पोहोचतो व कपडे बदलून आता पलंगावर आडवे होणार तेवढ्यात मधल्या अंगणात जिसी परितोष शहाने अनाऊन्स्मेंट केलेली मी ऎकली.



अटेन्शन अटेन्शन अटेन्शन 14 प्लटून. ऑल फर्स्ट टर्मर्स टु फॉलइन, इन द स्क्वेअर, इमीडिएटली इन गेम्स रिग. अटेन्शन ….. ……………स्क्वेअर म्हणजे मधले अंगण.



झाले... मला समजले, की आम्हाला सीनियर्सने बोलावले आहे. पटापट आम्ही सगळेजण गेम्स ड्रेस घालून मधल्या अंगणात फॉलइन झालो. संख्या मोजली गेली. सीनियरला संख्येचा रिपोर्ट द्यायचा होता पण आमच्या ४० जणांमध्ये दोन जिसी कमी आढळल्या मुळे जिसी अमित वर्मा बुचकळ्यांत पडला. आमच्या टर्मचा ह्या आठवड्याचा संख्या देणारा जिसी अमित वर्मा होता. रिपोर्ट न देता, अमित गैरहजर जिसींची वाट बघत थांबला पण आमचा सीनियर, कॉर्पोरल बैन्सलाला मुळीच दम धरवत नव्हता.



यु ब्लडी क्लॉट गिव द रिपोर्ट एज इट इज. बैन्सला अमित वर्मावर खेकसला. तसा जिसी अमित वर्माने पटकन रिपोर्ट दिला.



परेड सावधान. तसे आम्ही लागलीच ताठ उभे राहून सावधान झालो. अमित वर्मा स्वतः पळत जाऊन कॉर्पोरल बैन्सला समोर उभा झाला. सावधान केले व मोठ्याने रिपोर्ट दिला.





गुड अफटर्नून सर, 38 जिसीज प्रेझेंट 2 जिसीज अब्सेंट फॉर द परेड. सर. तेवढ्यात जिसी सुब्रमण्यम आणि जिसी अशोक पांडे लडखडत आले. जिसी सुब्रमण्यमला आम्ही सुब्बू म्हणायचो. सुब्बूची चाल विचित्र होती. तो नेहमी डुलत डुलत चालायचा. हा डुलतं चालणारा सुब्बू जेव्हा पळायचा म्हणजे आयएमएच्या भाषेत ‘ऑन डबल्स’ मध्ये यायचा तेव्हा अगदी सोंग दिसायचा. अशा प्रत्येक फॉलइनला कोणी एक नेहमी उशिरा यायचा. फॉलइनला लवकर येणारे नेहमीच लवकर येतात व जे उशिरा येतात ते नेहमीच उशिरा येतात. काही लोकांची खुबी असते ऎनवेळेवर पोहोचायची व काही लोकं किमान पंधरा मिनिटे तरी आधी येऊन उभी राहायची.



यु क्लाऊन्स व्हाय आर यु लेट. स्टार्ट रोलिंग फ्रॉम देअर इटसेल्फ अॅन्ड जॉईन द फॉलइन. सुब्बू व पांडेला उद्देशून कोर्पोरल बैन्सला खेकसला. माझ्या सारख्यांना बरे वाटले मनातून. आम्ही मरत लवकर यायचे मग उशिरा येणाऱ्यांना काही प्रसाद नको का.



नाव लिसन. यु शुड बी एबल टू पुट युअर रिग इन 2 मिनीटस्. डॅटस् द रिझन वि हॅव कॉल्ड यु.....



झाले काय होते, आमची पिटी परेड झाल्यावर कॅप्टन गिलनी आमच्या सीनियर्सना प्री मस्टर निट केले नव्हते म्हणून झापले होते. सुब्बू आणि पांडे यांना कपडे बदलायला उशीर लागला, व फॉलइनला उशीर झाला हे कारण ऎतेच मिळाले होते आमच्या सीनियर्सना. मग काय विचारता लागलीच कॉर्पोरल बैन्सलाने पट्टी परेडचा हुकूम सोडला. आम्हाला गणवेश व पोशाख निट, वेळेत व बरोबर कसा घालायचा हे शिकवण्यासाठी ही पट्टी परेड. आमची पट्टी परेड पुढे दोन तास चालली. पट्टी परेड म्हणजे पटापट वेगवेगळे पोषाख बदलायचे. प्रत्येक पोषाख बदलण्यासाठी दोन मिनिटे मिळायची. मग सगळे पोषाख व गणवेश त्या दोन तासात दोन दोन मिनटात बदलले गेले.



त्या दिवशीचे दृश्य पाहण्यासारखे होते. कोणी रोलिंग, क्रॉलिंग करत आहे, तर कोणी मुर्गा बनले आहे, कोणी जिसी स्वतःची सायकल गळ्यात अडकवून उभा आहे, तर अजून कोणी फायरमॅन्स लिफ्ट सारखे दुसऱ्याला पाठीवर घेऊन पळते आहे. मजा अशी की प्रत्येकाला दुसऱ्याला झालेली शिक्षा सोपी वाटत होती व आपल्याला ती मिळायला पाहिजे होती अशी हुरहूर प्रत्येक जिसीच्या मनाला लागून राहिलेली होती. कॉर्पोरल बैन्सलाने बरोबर साडेतिनाला पट्टी परेड संपवली. चहा पिऊन गेम्स परेडला जाण्यासाठी लागतो तेवढाच वेळ दिला होता त्या महाभागाने आम्हाला.



आम्ही गेम्स ड्रेस घालून परेड ग्राउंड वर गेलो. गेम्स परेड मध्ये, कॅप्टन गिलने प्रत्येक जिसी, कोणकोणत्या खेळांमध्ये प्रवीण आहे ते जाणून घेतले. सैन्यात खेळाला खूप महत्त्व देण्यात आले आहे. दररोज, खेळाच्या रूपाने व्यायाम झाला तर आपले शरीर निकोप राहते व मनाचे संतुलन बिघडत नाही हे आयएमए मध्ये सुरवाती पासूनच बिंबवले जाते. सैनिकांबरोबर एक प्रकारचे सकारात्मक नाते जमवायला, खेळ हे अत्यंत प्रभावी प्रशासनाचे साधन आहे ही शिकवण पायी पायी आयएमएत दिली जाते. खेळताना सैनिक किंवा सैन्यातले जवान सेनाअधिकाऱ्याच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने खेळतात. तसेच युद्धामध्ये सैन्यातले जवान सेनाअधिकाऱ्याच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने लढतात. युद्धा मध्ये एकदुसऱ्याबरोबरचा तालमेळ खूप महत्त्वाचा ठरतो. एकमेकात तालमेळ जागृत होण्यास सामूहिक खेळाचा उपयोग होतो. म्हणूनच खेळ येणे व त्यात प्रवीण असणे ही आयएमए मध्ये एक ‘ऑफिसर लाइक क्वालिटी’ समजली जाते. ह्या ‘ऑफिसर लाइक क्वालिटीला’ थोडक्यात ओएलक्यू असे म्हणतात. ओएलक्यू हा शब्द आयएमएत आल्यापासूनच सारखा कानावर पडू लागला होता. त्या बद्दलचे ज्ञान जेयुओ भुल्लरने पहिल्याच दिवशी आम्हाला दिले होते. ज्यांचे आपण नेतृत्व करीत आहोत ते आपला आदर्श पुढे ठेवून आपल्या सारखे वागायचा प्रयत्न करायला लागतील असे प्रत्येकाचे आचरण असले पाहिजे व अशा आचरणाला ओएलक्यू म्हणतात. आपण सैन्यातल्या जवानांच्या गळ्यातला ताईत बनू शकू असे आपले वर्तन असले पाहिजे त्यासाठीच आयएमएच्या अभ्यासक्रमात ओएलक्यू वर एवढा जोर दिला जातो. पुढच्या काळात येणारी कोठचीही जबाबदारी समर्थपणे पेलण्यास सक्षम ठरेल असे आचरण आपण अंगी बाणले पाहिजे हे सारखे बिंबवले जाते. टर्मच्या सुरवाती पासून शेवट पर्यंत जिसीला त्यांच्या ओएलक्युवर आधारीत गुण प्रदान केले जातात व पुढे गुणवत्ताक्रम ठरवताना ओएलक्युचे गुण विचारात घेतले जातात एवढे त्याचे महत्त्व.



मैदानी खेळात आपण निपुण नाही त्याचे मला नेहमी दुःख वाटे. मैदानी खेळ येणे हा एक ओएलक्युचा भाग झाला. मैदानी खेळ म्हणजे हॉकी, बास्केटबॉल, फुटबॉल, हॅन्डबॉल आणि एथलेटीक्स सारखे सामूहिक खेळ. टेबल टेनिस व बॅडमिंटन ह्या खेळांना तितकेसे महत्त्व नाही. बॉक्सिंग हा खेळ तर प्रत्येक जिसीने एकदा तरी खेळलाच पाहिजे असा नियम. कोणते जिसी कोणते खेळ खेळतात व कशात तरबेज आहेत ह्याची कदर आयएमेत केली जाते. खेळात ज्याने विशेष प्रावीण्य दाखवले आहे त्याला आयएमए मध्ये त्या खेळासाठी निळ्या रंगाचा मानाचा कोट म्हणजे ब्लेझर मिळतो व अशा जिसीला आयएमए ब्लु म्हणतात. आयएमए ब्लु होणे म्हणजे जिसीसाठी फार अभिमानाची गोष्ट असते. प्रबोधिकेत खेळले जाणारे प्रत्येक खेळ भयंकर चुरशीचे होतात. मी पळण्यातच त्यातल्यात्यात बरा होतो. आमच्या वेळेला डोंबिवललीकरांचे लाडके खेळ म्हणजे कोठेही खेळता येणारा अगदी बाल्कनीत सुद्धा असा क्रिकेट व कबड्डी. त्यावेळेला भागशाळा मैदानावर वार्षिक कबड्डी सामने व्हायचे आता होतात की नाही माहीत नाही. त्यामुळे हेच खेळ जास्त माहिती. ह्या खेळांना फारशी काही साधनं लागत नाहीत. मला अजूनही आठवते, पूर्वी आपल्याकडे हॉकी, बास्केटबॉल, फुटबॉल, हॅन्डबॉल अशा मैदानी खेळाची परंपराच नव्हती व अशा खेळांचे वातावरण नव्हते. त्या मानाने उत्तर हिंदुस्थानात व भारताच्या ईशान्य राज्यातून खेळांना जास्त प्रोत्साहन मिळते हा फरक प्रकर्षाने जाणवला. एकूणच मध्यम वर्गीय लोकांची खेळांच्या बाबतीतल्या उदासिनतेमुळे मुलांना खेळांसाठी प्रोत्साहन कमी मिळायचे. चाकोरीच्या बाहेर जाऊन, खेळाला महत्त्व देऊन, सरावासाठी लागणारा वेळ काढावा लागतो. तो माझ्या लहानपणी काढता येण्यासारखा नव्हता. परिस्थितीचा दोष म्हणता येईल कदाचित पण चाकोरी बाहेर जाण्याचे स्वातंत्र्य फार क्वचित आपल्याकडे अनुभवायला मिळायचे. जसेकाही अनंत फंदी ह्यांचा ‘बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको’ हा फटका आपण तंतोतंत पाळतो असे वाटावे, इतके आपल्याकडे चाकोरीबद्ध जीवन कसे जगायचे त्याचे उत्तम धडे दिले जायचे.



गेम्स पिरेड मध्ये फार काही घडले नाही व आम्ही आमच्या खोल्यांवर आलो. मी संध्याकाळच्या फॉलइनची वाट बघत होतो आणि फॉलइनची घोषणा झालीच. आम्ही मधल्या अंगणात जमलो. ह्या वेळेला पटकन जमलो. आम्हाला दिवसातल्या चुका सांगण्यात आल्या व अजून काही नियम समजावून सांगण्यात आले. पहिला नियम असा होता की शॉपिंग सेंटर मधले कँटिन आमच्या साठी ‘आऊट ऑफ बाऊंड’ करण्यात आले होते. म्हणजे तेथे जायचे नाही व त्यातले काही खायचे नाही. खरेतर तेवढा वेळच मिळणार नव्हता आम्हाला. दुसरा नियम असा की घरातल्या कपड्यात जर खोली बाहेर पडायचे असेल तर प्रत्येकाला दिलेला, तो, ‘पिक्चर मध्ये नायिकेचा बाप घालतो तसा’ गाऊन घातल्या शिवाय बाहेर पडायचे नाही. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे जो पर्यंत ड्रिल टेस्ट पास होत नाही तो पर्यंत ‘लिबर्टी गेटेड’. म्हणजे आयएमएच्या बाहेर जाता येणार नाही. नाहीतर नियमानुसार जिसीजना दर रविवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ८ पर्यंत डेहराडून शहरात मुफ्ती ड्रेस घालून, सायकलने जाता येत असे. पण आमच्या सीनियर्सनी त्याला काट लावली होती. आता आम्हाला ड्रिल टेस्ट पास झाल्या शिवाय बाहेर जायचे स्वातंत्र्य नसणार होते.



माझ्या शेजारच्या खोलीत ब्रजेशप्रतापसिंह राहायचा. तो बिहारचा होता. त्या पलीकडच्या खोलीत जिसी परितोष शहा राहायचा तो सिक्कीमचा राहणारा. माझ्या समोरच्या फ्लॅन्क मध्ये जिसी अमित वर्मा होता. तो दिल्लीचा होता, एनडिए मधून आलेला व त्याचे वडील सुद्धा सैन्यातलेच होते. त्या मुळे आमच्या सारख्या वासरांमध्ये जिसी अमित वर्मा लंगडी गाय होती. अजून एक लंगडी गाय म्हणजे जिसी हरबिंदर सिंह. तो रेलीगेटेड जिसी होता. रेलीगेशन म्हणजे कोर्स मधून नापास होणे. रेलीगेशन झाले की पुन्हा सहा महीने टर्म रिपीट करावी लागायची. रेलीगेशन झाले की आणखीन सहा महिने आयएमएचे सारे नियम व शिक्षा झेलाव्या लागायच्या व पुढे नोकरी मध्ये पदोन्नती करता लागणारी ज्येष्ठता कमी व्हायची, ती वेगळीच. त्यातून जर दोनदा रेलीगेशन झाले तर प्रबोधिकेतून काढून टाकले जायचे व तेथेच एखाद्या जीसीची अधिकारी व्हावयाची स्वप्न भंग पावायची. शीख पंथी वेगवेगळ्या प्रकाराने पगड्या बांधतात. पगड्या बांधण्याची पद्धत व ठेवण त्यांच्या पंथातल्या जातींवर आधारीत असते. आयएमएच्या गणवेशात एका विशिष्ट प्रकारानेच पगडी बांधायची असते. जिसी हरबिंदर रोज रात्री जितके शीख पंथी सरदार जिसी होते त्यांची ‘पगडी परेड’ घ्यायचा. एका विशिष्ट पद्धतीने पगडी बांधायला शिकवायचा, जेणे करून गणवेश घातल्यावर सगळ्या शीख सरदारांची पगडी एकसारखी दिसू शकेल अशी.



संध्याकाळच्या फॉलइन मध्ये जेयुओ भुल्लर व कॉर्पोरल बैन्सलाने आम्हा प्रत्येकाला स्वतः बद्दल माहिती द्यायला सांगितले. दोन शब्द बोलायला सांगितले.



अमित वर्मा – दिल्लीचा पंजाबी मुलगा. त्या आधी सहावी ते बारावी डेहराडूनच्याच राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजात शिकलेला. पुढे बारावी नंतरची तीन वर्ष पुण्याच्या राष्ट्रीय सैन्य प्रबोधिकेत खस्ता खाऊन आता येथे आयएमएत दाखल झालेला. उंची ६ फुट. देखणा बांधा व गोरा गोमटा.



आशुतोष महापात्रा – ओडिशा मधल्या संभलपुरचा, बिएस्सी करून सिडीएसची परीक्षा देऊन आलेला डायरेक्ट एंट्री होता. अत्यंत सालस. पळण्यात नेहमी पहिला नंबर असायचा. क्रॉसकंट्री रनर.



मद्रासचा सुब्रमण्यम – सावळा, घारे डोळे असलेला. कपाळावर आडवे भस्म लावणारा, पण आयएमएतल्या पाहिल्याच दिवशी सीनियर्सने त्याला त्याच्या कपाळावरचे भस्म उतरवायला लावले होते. कोणत्याही पोषाखात हे भस्म बसत नाही. भस्म्याकडे बोट दाखवत ‘आय विल नेssssव्हर टेक धिस ऑफ’ असे म्हणणारा सुब्बू, त्या दिवशी पासून विदाऊट भस्म असा आम्हाला दिसायला लागला. हा जिसी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम मधून निवडून आयएमएत आला होता.



सुनील खेर – काश्मिरी ब्राह्मण, खूप बोलणारा. आमच्या सारखाच अधिकारी होण्याच्या प्रतीक्षेत दिवस मोजत. त्याला वडील नव्हते. तो आणि त्याची आई, बारामुल्ला जवळच्या सोयीबुक ह्या गावात राहायचे. तिथे त्यांची एक छोटी हवेली होती. त्याचे वडील काश्मीर खोऱ्यात एका दैनिकाचे संपादक होते. दीड वर्षापूर्वी एक दिवस त्याचे वडील कचेरीत गेले व परत आलेच नाहीत. त्यांना म्हणे अतिरेक्यांनी पळवून नेले व आजपर्यंत त्यांचा थांगपत्ता लागला नव्हता. त्यामुळे खूप बोलणारा हा जिसी मधूनच कधी कधी दुःखी दिसायचा.



मी, जिसी आकाश काशिनाथ शिरगावकर, डोंबिवलीचा राहणारा..........

Saturday, July 2, 2011

सुरवातीचे दिवस – भाग १




मी सकाळी चार वाजता उठून तयार झालो. अंगणात आलेला चहा व बिस्किटे खाऊन प्रि मस्टर साठी फॉल इन झालो. आमचे सीनियर्सचे ते काम होते की आमचा पोषाख – टर्न आऊट बरोबर आहे का तो बघणे व नसेल तर परेड आधी करवून घेणे. आम्ही सगळे आयएमएला शोभेल असा सोल्जर कट घेतला होता. म्हणजे कानावरती एक इंच भर सगळे केस छाटणे व डोक्यावरील बाकीचे एकदम बारीक करणे. पुण्याच्या राष्ट्रीय रक्षा प्रबोधिकेच्या कॅडेटस चे केस पण असेच छोटे छोटे कापलेले असतात. छोटे झाल्या मुळे केस उभे राहतात व कॅडेटस चे डोके फणसाच्या साली सारखे दिसते म्हणून पुण्यातली कॉलेजातली मुले असल्या केस कापलेल्या कॅडेटला फणस असे म्हणतात. पुढे दर आठवड्याला शनवारी दुपारी हेअर कट घ्यायची सवयच झाली कारण नाहीतर शिक्षा ठरलेली. प्रत्येकाने गुळगुळीत दाढी केलेली. दाढी रोज करायची असा नियम आहे व तो पोषाखाचा एक भाग आहे. तो पर्यंत मी चार दिवसातून एकदा दाढी करायचो. आम्हाला पोषाखातल्या आमच्या चुका समजावून दाखवल्या व ताकीद दिली की समजावलेल्या चुका परत दिसल्या तर शिक्षेस पात्र व्हाल म्हणून. हे सगळे करे पर्यंत सकाळचे साडे पाच वाजले होते.



आम्ही पिटी परेड साठी निघालो, आठ जिसीजचा सायकलचा स्क्वॉड केला, पाठीवर शर्टाच्या कॉलरला दुसऱ्या तासाला लागणारे कपडे टांगलेला हॅन्गर अडकवला, त्याचबरोबर, उजवा आणि डावा ड्रिल बूट एकमेकांच्या नाड्याने बांधून सायकलच्या हॅन्डलवर अडकवला व पिटी ग्राउंड वर येऊन धडकलो. सकाळची कवायत म्हणजे पिटी, आमचा पिटी उस्ताद हवालदार केसरराम घ्यायचा. पिटी परेडला संख्या घेतली तेव्हा पहिल्यांदाच आम्ही आमचा डायरेक्टींग स्टाफ बघितला. प्रत्येक प्लटून साठी एक डायरेक्टींग स्टाफ होता, त्याचे काम हॉस्टेल वॉर्डन् सारखेच असायचे व अजून पुष्कळ जबाबदाऱ्या होत्या त्या डायरेक्टींग स्टाफवर. डायरेक्टींग स्टाफ एक सैन्य आधीकारी असतो. आयएमएतला अभ्यासक्रम घेणारे सगळेच सैन्य अधिकारी आमच्या साठी डायरेक्टींग स्टाफ म्हणजे डिएस असायचे. आमचा डिएस कॅप्टन गिल होता. कॅप्टन गिल स्वतः २४, २५ वर्षांचा असल्या कारणाने, प्रचंड उत्साह ओतप्रोत भरलेला, स्फुर्तीदायक आधीकारी होता. आमचा मानदंड होता. त्याने फॉल इन घेतले. पाहिलाच दिवस असल्या मुळे आम्हाला त्याने पिटीचा सिलॅबस सांगितला.



कमीत कमी २५ पुशअपस्, २५ सिटअपस्, व्हर्टिकल रोप, होरीझॉन्टल रोप, १३ मिनटात २ माइल पळणे, मंकी रोप, जंप एंड रिच, फायरमॅन लिफ्ट, ८ फिट डीच पार करणे, १५ पुलअपस असा पाहिल्या सहामाहीसाठी अभ्यास होता. त्याचा सराव रोज सुरू करायचा होता. जे एनडीए मधून आले होते त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आधीच माहीत होत्या पण आमच्या सारखे सिव्हिल वातावरणातून आले होते त्यांच्यासाठी हे सगळे नवीन होते. त्यातल्या त्यात मला निदान पुशअपस् सिटअपस् माहीत होते कारण पूर्वी शाखेत जायचो तेव्हा सूर्यनमस्कार, जोर, बैठका काढायचो. पण बऱ्याच जणांना ह्यातले काही माहीत नव्हते.



नाऊ फर्स्ट थिंग्स फर्स्ट. युअर टर्न आऊट. बिफोर वी स्टार्ट प्रॅक्टीसिंग, यु ऑल मस्ट लर्न टु ड्रेस अप प्रॉपर्ली फॉर द परेड (म्हणजे प्रि मस्टरचा बट्ट्याबोळ). असे म्हणत कॅप्टन गिलने काही जणांना बनियन चांगला खोचला नाही म्हणून बाहेर काढले, काहींच्या सॉक्स मध्ये दोष काढला, काहींच्या शु लेसेस बांधण्यात दोष काढला व माझ्या गालावरून हात फिरवीत दाढी निट झाली नाही म्हणून मला बाहेर काढले. एकही जिसी उरला नाही ज्याच्या टर्न आऊट मध्ये काही दोष नाही असा. मग आम्हाला सगळ्यांना एका ओळीत उभे केले व म्हणाला



टुडे वी विल जस्ट कॉनसंट्रेट ऑन डिसिप्लीन रादर दॅन पिटी.

आय डोंट वॉन्ट धिस शॅबिनेस टुबी रिपीटेड अगेन. नाव गेट रोलिंग.



जे एनडीएतून आले होते त्यांना माहीत होते रोलिंग ह्या शब्दाचा अर्थ. आता हे रोलिंग काय प्रकरण आहे ते समजावून सांगतो. आपण कशा लहानपणी गाद्या टाकल्यावर कोलांट्याउड्या मारायचो. अगदी तशाच कोलांट्याउड्या मारणे म्हणजे रोलिंग. फक्त हे रोलिंग गाद्यांवर नाही करायचे तर कोठेही होऊ शकते व कोणत्याही पोषाखात होऊ शकते. त्यामुळे आम्ही रोलिंग करायचा प्रयत्न करायला लागलो. हळू हळू जमू लागले. रोलिंग जर निट जमले नाही तर पाठीच्या कण्याला व डोक्याला खूपं छोटे छोटे दगड टोचतात. अगदी असह्य होते. पण जसे आपण रोलिंग मध्ये तरबेज व्हायला लागतो तसे त्यातल्या खुब्या कळतात. रोलिंग मध्ये आपली मान आपण जेवढी दुमडू व मणका जेथून सुरू होतो त्याच्या वरच्या बाजूवर मानेच्या मागच्या भागावर पहिल्यांदा भार दिला म्हणजे डोके वाचते. पुढे एवढा जोर देऊन शरीर पालथे घालायचे की मणका लागतच नाहीत जमिनीला. आदळतात फक्त आपले कूले. ईश्वराने त्या पार्श्व भागाची जनुकही तेवढ्यासाठीच घडण अशी काही केली आहे की बरोबर रोलिंग केल्याने अलगद सगळा भार कमर व कुल्ल्यावर येतो व न लागता कोठेही रोलिंग केले जाऊ शकते. पण ही कला दोन चारदा डोक्याला व मणक्याला दगड टोचे पर्यंत आत्मसात होत नाही. मग आम्ही पिटी परेड भर फक्त रोलिंगचीच सवय करत होतो. आता मला समजून चुकले की प्रत्येकाला पिटी ड्रेसचे ५ जोड का दिले होते ते, कारण पूर्णं पिटी ग्राउंड छापले गेले होते आमच्या कपड्यांवर एव्हाना, सकाळच्या दवाने तर अजूनच कपडे मळले. सकाळची सगळी झोप निघून गेली. आता पुढचा तास होता ड्रिलचा.



पिटीचा तास जसा संपला तसा आम्ही स्क्वॉड बनवला व ड्रिलस्क्वेअर कडे निघालो. अंतर साधारण २ किलोमीटर. प्रत्येक वेळेला स्क्वॉड ने जाताना कोणी आधीकारी दिसला की सगळ्यात पुढचा सायकल स्वार एखाद्या मशीन सारखे स्क्वॉड साsssवधान म्हणायचा, लागलीच आम्ही सारे सायकल स्वार पाठीचा कणा अजूनच ताठ करून मान वर करून त्याला दुजोरा द्यायचो. जसा आधीकारी शेवटच्या सायकाल स्वाराला पार करायचा तसा शेवटचा सायकल स्वार स्क्वॉड विssssश्राम असे ओरडायचा, अधिकाऱ्या ऐवजी जर सुभेदार आला तर पाहिला सायकल स्वार जयहिंद साब असे त्याला अभिवादन करायचा व तो सुद्धा कडक सॅल्यूट मारायचा. जर मधूनच हे करायचे राहून गेले तर एखादा स्क्वॉड पुढची पाच मिनिटे गळ्यात सायकली अडकवून उठाबशा काढताना आढळायचा. गळ्यात कधी सायकली अडकवल्यात का कोणी. आम्ही अडकवल्यात. सोपे असते तसे पण ह्यात वेळ जातो व पुढच्या तासाला उशीर होतो. परत उशीर का झाला ह्याचे कारण न विचारताच उशीर झाल्याची शिक्षा सुरू होते. हिरो किंवा एटलासच्या सिट व हॅन्डल मध्ये आडवा दांडा असलेल्या जेंट्स सायकलचा दांडा मानेच्या मागे ठेवला की आपोआप आपले डोके त्या सायकलच्या दांड्यांच्या त्रिकोणात जाऊन सायकल गळ्यात अडकते, हात सुटे राहतात व उठाबशा पण काढता येतात. हे आत्ता पर्यंत मला कोणच्याही कॉलेजांत शिकायला मिळाले नव्हते.



स्क्वॉड करुन आम्ही ड्रिल स्क्वेअरपाशी आलो. सायकल स्टॅन्ड मध्येच पटापट कपडे बदलले व फॉल इन झालो. ड्रिल रिग बदलण्यास बऱ्याच जिसीज ना वेळ लागला व रिपोर्ट देण्यास साहजिकच उशीर झाला. आता तेथल्या ड्रिल उस्तादाची वेळ होती आमचा ड्रिल रिग तपासण्याची. पिटी परेड पेक्षा ड्रिल रिग मध्ये बरीच अवधाने सांभाळायची असतात, बेल्ट, बॅरे, शर्ट खोचणे (शर्टाची फक्त तीनच बटण दिसली पाहिजेत आठवते ना) वगैरे, व त्यात बऱ्याच चुका ड्रिल उस्ताद ने काढल्या. बॅरे चापुनचोपून लावणे म्हणजे एक कठीण कला आहे. बॅरे जरका चुकीची घातली तर फुगलेल्या भटोऱ्या सारखी दिसते. आडवी सपाट घातली गेली तर कडक पोळी किंवा चपाती सारखी दिसते पण जर बॅरेचा आयएमएचा बिल्ला डाव्या डोळ्याच्या रेषेत वर आणला व बाकीचे कापड डोक्यावर चापून बसवून तिरपे उजव्या कानाच्यावर आणले व बॅरेची कपाळावर बसणारी पट्टी आणि भुवया ह्यात तीन बोटांचे अंतर सुनिश्चित केले की मग मुंडा एकदम छान रुबाबदार दिसतो. आम्हाला ड्रिल उस्तादाने सांगितले की जो पर्यंत ड्रिल टेस्ट पास होत नाही तो पर्यंत आम्हाला सॅल्यूट करण्यास मनाई आहे व पी कॅप घालण्यास सुद्धा मनाई आहे, हे सांगितल्यावर ड्रिल परेड मध्ये गणवेश निट नाही म्हणून ड्रिल उस्ताद ने परेड ग्राउंडच्या चार फेऱ्या हात उंच करून रायफल हातात आडवी घेऊन पळत लावायला सांगितल्या. आता साडे पाच किलो वजनाची रायफल हातात उंच धरून आडवी घेऊन पळायचे म्हणजे नाकात दम येतो हे पळाल्यावर कळते. आयएमेत वेपन ट्रेनिंग, ड्रिल, घोड स्वारीचे काही वर्ग 'साब' म्हणजे सैन्यातले सुभेदार घेतात व त्यांना मदतीला व आम्हाला शस्त्रांचे हिस्से पुर्जे उघडणे, जोडणे, ड्रिल व पिटी शिकवून आणि करवून घ्यायला उस्ताद म्हणजे सैन्यातले हवालदार किंवा नायक असतात. आमची परिस्थिती अशी होती की शिकवताना सैन्यातला नायक सुद्धा आम्हा जिसीजना सहजच शिक्षा करायचा. अशा त्या ड्रिल उस्ताद ने दिलेल्या शिक्षेतच ड्रिल पिरेड संपला आणि आम्ही रायफली शस्त्रागारात ठेवल्या. शस्त्रागाराला सैन्यात कोत असे म्हणतात. आयएमएत दोन प्रकारच्या रायफली प्रत्येक जिसीला मिळतात. एक रायफलीच्याच आकाराची, वजनाची व दिसण्यात अशी असलेली ड्रिल प्रॅक्टिस रायफल व दुसरी खरी रायफल. ड्रिल आम्हाला ड्रिल प्रॅक्टिस रायफलने करायला लागायची.



आम्ही ब्रेकफास्ट साठी मेस मध्ये पोहोचलो. पंधरा मिनटात ब्रेकफास्ट संपवला. सकाळच्या सगळ्या व्यायामाने भलतीच भूक लागली होती. त्यामुळे दलीया, ब्रेड, एग ऑम्लेट व दूध पटकन पोटात गेले. पुढे आमचे साडे बारा वाजे पर्यंत क्लासेस होते. त्यात टॅक्टिक्स्, विपन ट्रेनिंग, रेडियो टेलिफोनी कम्युनिकेशन ह्या सगळ्याचे धडे होते. आम्हाला त्यात काही स्वारस्य राहिले नव्हते. इतके दमलो होतो की झोप अनावर होत होती. पण झोपलेला जिसी दिसला की त्या पायऱ्या पायऱ्यांच्या वर्गात बाकांच्या मध्ये रोलिंग करायला लागायचे. त्यामुळे माझा सगळा वेळ झोप आवरण्यात गेला. काय शिकवले ते कळले काहीच नाही. वहीत लिहून सुद्धा घेतले नाही. दुपारी मेस मध्ये जेवण झाले. पोळीचे तुकडे बोटाने न तोडता, त्याची सुरनळी करून डाव्या हातात धरून एकेक घास तोंडाने तोडून चमच्याने डाळ (आपली आमटी), भाजी, भात खाण्याचे तंत्र पहिल्यांदाच येथे बघत होतो. शाकाहाऱ्यांसाठी डाळ भात भाजी, मांसाहारी असतील त्यांच्या साठी ह्या व्यतिरिक्त एक मांसाहारी डिश असे. मला कधी एकदा रूम मध्ये जाऊन झोपतो असे झाले होते. वेळापत्रका प्रमाणे आता एकदम दुपारी ४ वाजता गेम्स पिरियड होता.

(क्रमशः)