Thursday, March 17, 2016

राजाराम सीताराम ..............भाग १५ ----------- सूट्टीसाठी आतूर


सूट्टीसाठी आतूर

 

भदराज कँप झाल्या नंतर आमच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा पंधरा दिवसात होणार होत्या. त्या आधी फायरिंगची परीक्षा होणार होती. ह्या परीक्षेनंतर आम्हाला चार दिवसाची सत्र संपल्याची सुट्टी मिळणार होती. आम्ही सगळे त्या सुट्टीची वाट बघत होतो. आम्हा प्रत्येकालाच घरी कधी जातो असे झाले होते. ह्या पंधरा दिवसात दोन घटना घडल्या. एक घटना माझ्याशी निगडित होती व एक आम्हा सगळ्यांशी निगडित होती. सोमवार पासून पुढचे चार दिवस आमची फायरिंग होती. खरे तर फायरिंगची परीक्षाच होती. आता एव्हाना आमची फायरिंगची ड्रिल पक्की झाली होती. त्यामुळे स्टॅन्ड फाईव्ह - जेथे फायरिंग होणार होती तेथे गेल्यावर कश्या तुकड्या पाडायचे कसे उस्तादाच्या हुकमांवर फायरिंग करायचे हे सगळ्यांना माहीत होते. स्टॅन्ड फाईव्ह आमच्या बॅरॅक्स् पासून साधारण पाच किलोमीटर दूर होता. सोमवारी सकाळीच आम्ही कोत मध्ये जाऊन आमच्या प्रत्येकाच्या नावावर असलेल्या सर्व्हिस रायफल्स, कार्बाईनस्, पिस्तोल घेतल्या व आठ आठ सायकलीचा स्क्वॉड करून स्टॅन्ड फाईव्हकडे कूच केली.

 

आम्ही फायरिंग रेंजवर सायकली लावल्या. रेंजवर आल्यावर नेहमी प्रमाणे वॉर्म अप् रगडा कष्ट दे मिश्राने लावला व फायरिंग सुरू झाली. खरे म्हणजे हे शेवटचे पंधरा दिवस आम्हाला सगळ्यांनाच जिवावर आले होते. घरी जाण्यास उतावीळ झालो होतो. असे वाटायचे की कसे तरी करून संपत आलेल्या सत्राचे शेवटचे पंधरा दिवस एका दिवसात फटाफट फास्ट फॉरवर्ड करून संपवावेत. सगळेच अधीर झाले होते व हा अधीरपणा आमच्या प्रत्येक हालचालीत दिसायला लागला होता. एकतर सुट्टी मिळणार ह्याचा आनंद व पंधरा दिवसात पहिले सत्र संपवून शेवटच्या सत्रात पदार्पण करून आम्ही सिनियर होणार ह्याची आम्हावर धुंदी यायला लागली होती. पंधरा दिवसाचा कार्यक्रम सगळ्यांनाच माहीत होता. आमच्यात वेगळीच ऊर्जा झळकायला लागली होती. फायरिंग झाल्यावर आमच्या लेखी परीक्षा. ह्या परीक्षांची तयारी अशी नसतेच कारण सततच आमच्याकडून शारीरिक अभ्यास व युद्धशास्त्राचा अभ्यास करवून घेतला जायचा. लागलीच पुढच्या दोन दिवसात परीक्षेचा निकाल व मग चार दिवसाची सुट्टी. आम्ही चक्क घरी जाऊ शकणार होतो. विषयात नापास होणाऱ्या जिसीजना पास होई पर्यंत सुट्टी मिळणार नव्हती, म्हणजे थोडक्यात त्यांच्या चार दिवसाच्या सुट्टीला पास मिळणार होता. ज्या जिसीजची शिक्षा सुरू असेल त्यांना सुट्टीत घरी जाऊ देणार नव्हते. सुनील खेरच्या अठ्ठावीस रेस्ट्रिकशन्स संपल्या नसल्यामुळे साहजिकच त्याला सुट्टी नव्हती. पण त्याला त्याची फिक्र नव्हती. त्याची आई वाचली ह्यातच त्याला समाधान. आयएमएने ह्याच चार दिवसात काही अॅडव्हेनचर सहली आखलेल्या होत्या. आमच्यातले काही हौशी घरी जाण्या ऐवजी ह्या अॅडव्हेनचर सहलींना जाणार होते. ह्यात पॅराग्लायडींग, पॅरासेलींग, बद्रीनाथ केदारनाथच्या पर्वतांवर गिर्यारोहण, गंगेतून रिव्हर राफ्टींग, हॉट एअर बलूनींग अशा अनेक प्रकारच्या सहली आयोजल्या होत्या.

 

आमच्या सारख्यांचा मात्र घरी जायचा पक्का बेत होता. आमच्या कडून कॅप्टन गिलने कोठच्या गाडीचे आरक्षण करायचे हे लिहून घेतले होते. त्या वेळेला रांगेत उभे राहूनच आरक्षण करावे लागायचे व ते आम्हा जिसीज् ना शक्य नव्हते. तो आम्हा सगळ्यांचे रेल्वेचे आरक्षण करणार होता. त्यामुळे ती काळजी मिटली होती. ह्याच कारणासाठी आम्हाला कॅप्टन गिल आवडायचा. तो असल्या गोष्टी सहजच समजून करायचा. अश्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आम्ही त्याचे चाहते झालो होतो. असा सगळा पुढच्या पंधरा दिवसाचा बेत माहीत असल्या मुळे पंधरा दिवसाचा वेळ कमी कसा करायचा तेवढेच राहिले होते.

 

रोज फायरिंग झाल्यावर रायफलचे बॅरल पुलथृने साफ करावे लागायचे. पुलथृ म्हणजे एका दोरीच्या टोकाला मुलायम कपड्याची चिंधी बांधलेली असते. फायरिंग झाल्यावर एका बाजूने बॅरल मध्ये ही चिंधी घालायची व दोरीने दुसऱ्या बाजूने ती ओढायची. म्हणजे बॅरल मध्ये चिकटलेला काडतुसांतून निघालेल्या धूरा बरोबर निघालेले कण व बारूदाचे अवशेष साफ होतात. हे अवशेष असेच राहिले तर बॅरल आतून गंजते व रायफलचे बॅरल लवकर खराब होते. दोरीने चिंधी ओढून बॅरल साफ करतो म्हणून त्या चिंधी व दोरीला पुलथृ म्हणतात. आपल्या रायफलची अशी काळजी घेणे हा प्रत्येक सैनिकाचा धर्म असतो. अधिकारी असो व शिपाई, आपल्या शस्त्राची काळजी आपण स्वतः घ्यायची ही शिकवण आयएमेतच दिली जाते. त्याने आपल्याला आपल्या शस्त्रावर विश्वास बसतो. आपली रायफल किंवा कार्बाईन आपल्याला जास्त कळते व ह्याचा फायदा युद्धात होतो. कोणीतरी दुसऱ्याने रायफलची काळजी घ्यायची व आपण ती वापरायची हे शक्यच नाही.

 

फायरिंगचा शेवटचा दिवस होता. आमचा अधीरपणा हालचालीत, वागण्यात दिसत होता. घरी जायच्या घाईपेक्षा आमच्यातल्या काहींची सीनियर होण्याची धुंदी, व वाढता  वागणुकीतला बेफिक्रपणा जाणवू लागला होता. गुरवारच्या फायरिंग नंतर आमचे क्लासेस माणेकशॉ सभागृहात भरणार होते. त्या दिवशी कोत मधून रायफली घेण्यात आम्हाला उशीर झाला, त्यांमुळे स्टॅन्ड फाईव्ह वर आम्ही कसे बसे वेळेत पोहोचलो. पोहचल्या बरोबर आम्ही सायकली लावल्या. लावल्या कसल्या आमच्यातल्या काहीने जिथे जागा मिळेल तेथे फेकल्या व फॉलईनसाठी पळालो. वेळेत पोहोचलो नसतो तर कष्ट दे मिश्राने लोळवलेच असते. आज शेवटचा दिवस, कष्ट दे मिश्राच्या कचाट्यातून सुटणार. आम्ही फॉलइनमध्ये उभे असताना, रिपोर्ट घेता घेता कष्ट दे मिश्राने आमच्या सायकलींकडे बघून तिरसट चेहऱ्याने म्हणाला

 

"लगता नही हैं, आप सीनियर्स होने जा रहे हैं। सीनियर्स होनेके नाते नये आनेवाले जिसीज को डिसिप्लीन सिखाना होता हैं। मगर हमको ऐसा दिखाई दे रहा हैं की आपका डिसिप्लीन बहुत ढिला पड गया हैं। आप लोगोने आपकी सायकल कैसी फेकी हूई हैं। बहुत बूरा बहुत ढिला डिसिप्लीन।"

 

कष्टदे मिश्राच्या ह्या वाक्याने आम्हाला वाटले, फायरिंग संपली. आता खूप रगडा लागणार. मनात आले. शेवटचा दिवस आहे घेऊ रगडा काय बिघडणार आहे. पण असे काहीच झाले नाही. बहुतेक आज फायरिंगचा शेवटचा दिवस होता व कष्ट दे मिश्राला फायरिंग संपवायचीच होती.  नेहमीच्या रगड्या नंतर आम्ही फायरिंग संपवली. रायफल मध्ये पुलथृ मारली. हे सगळे करता करता पाऊण वाजता आम्ही मोकळे झालो. पुढचा कार्यक्रम होता माणेकशा बटालियनच्या सभागृहात जाण्याचा. ते स्टॅन्ड फाईव्ह पासून पाच किलोमीटर दूर. जाता जाता आधी रायफली कोत मध्ये जमा करायच्या होत्या, फायरिंगचे कपडे बदलून युनिफॉर्म घालायचा, मेस मध्ये जाऊन जेवायचे व दुपारी अडीच वाजता सभागृहात पोहोचायचे होते. आमच्याकडे साधारण पावणे दोन तास होते. नेहमीच्या आराखड्यात हे सहज जमणारे होते. वीस मिनिटे सायकलने कोत पर्यंत, वीस मिनिटे कोत मध्ये रायफल ठेवणे, युनिफॉर्म बदलणे व दुपारच्या जेवणाला अजून अर्धा तास. सहज शक्य होते.

 

आम्ही सायकली घ्यायला जेव्हा सायकल स्टॅन्डवर गेलो तेव्हा आम्हाला धक्काच बसला. झाले काय होते, ज्यांनी सायकली वाटेल तशा फेकल्या होत्या त्यांच्या सायकलच्या दोन्ही चाकातली हवा कष्ट दे मिश्राने काढून टाकली होती. एकूण तेवीस सायकली. म्हणजे एकूण आम्हा तेवीस जिसीजने सायकली वाटेल तशा फेकल्या होत्या. आता पर्यंत आम्हा पहिल्या सत्राच्या जिसीज मध्ये चांगलीच एकी झाली होती. आम्हाला सगळ्यांना वाईट वाटले. आमचा त्या सायकलीतली हवा काढल्याने वेळेचा आराखडा कोलमोडून पडला होता. आता निदान ते तेवीस जिसीज तरी वेळेत सभागृहात पोहचणार नव्हते. परत सभागृहात रिपोर्ट देताना कष्टदे मिश्राने हवाकाढली हे कारण कोणी समजून घेतलेच नसते. आयएमएत उशीर झाला की उशीर उशीर झाला. कारणे नाहीत. अपील नाही. अर्ज नाही. हे माहीत असल्या मुळे आम्हा हतबल जिसीजना काय करावे ते समजेना. आता आम्हाला ते पाच किलोमीटर पायी जावे लागणार होते, त्यानंतर हवा भरून मग पुढचे काम. शक्यच नव्हते वेळेत होणे. कष्ट दे मिश्राचा भयंकर राग आला होता व दुःखही. आम्ही स्वतःला सीनियर समजायला लागलो होतो व त्याच धुंदीत होतो अन त्याच वेळेस कष्ट दे मिश्राने असा झटका दिला होता. कष्ट दे मिश्रा दुरून हे सगळे पाहतं होता. म्हणाला "आप लोग कभी डिसिप्लीन भूलोगे नही अभी इसके बाद। जाओ अभी नहीतर अगले क्लास के लिये लेट हो जाओगे।"

 

लेट हो जाओगे कसले ------- लेट हो गए थे।

 

भयंकर राग व संतापाच्या भरात आमच्यातल्या कोणीतरी, मला वाटते सूब्बूने किंवा अमितने चिडून जोरात "हिंदोस्तान मुर्दाबाद" म्हटले. क्षणभर आमच्या कंपूमध्ये भीषण शांतता पसरली. आवाज खरे तर मागून आला होता, म्हणजे ज्याने हे म्हटले त्याने त्याची सायकल बरोबर लावली होती व तो त्या तेवीस हवा काढलेल्या सायकल मधल्या कंपूतला नव्हता. हे सगळे नाटक दुरून जसे कष्ट दे मिश्रा बघत होता तसेच कॅप्टन गिल पण बघत होता. आम्हाला वाटते त्याने घोषणा ऐकली असावी. कारण आमच्यात पसरलेली शांतता अजून संपली नव्हती तोच कॅप्टन गिल आमच्या समोर येऊन उभा राहिला होता. क्षण भराने आम्हाला पण कसेसेच वाटायला लागले. कोणी म्हटले हे हिंदोस्तान मुर्दाबाद. खूप राग आला, ज्याने म्हटले त्याने काहीही म्हटले असते तरी तेवढे वाईट वाटले नसते. कष्ट दे मिश्रा मुर्दाबाद, आयएमए मुर्दाबाद, माणेकशा बटालियन मुर्दाबाद काहीही चालले असते आम्हाला. एवढे वाईट वाटले नसते. पण हिंदोस्तान मुर्दाबाद. कसेसेच वाटले. त्या जिसीच्या आपल्या देशाबद्दलच्या घोषणेने आता पर्यंत कष्ट दे मिश्रावर आलेल्या रागाची जागा, आपल्या देशावर असलेली आस्था चिरडली गेल्या मुळे दुःखाने घेतली. 
 
(क्रमशः)

Wednesday, March 9, 2016

प्रसिद्धीसाठी राष्ट्रद्रोह


 
फेब्रुवारीच्या ९ तारखेला अब्दुल्लाने जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम अफझल गुरुला फाशी दिल्याच्या निषेधार्थ आयोजित केला होता व अशा तर्‍हेचे पोस्टर्स जेएनयूमध्ये सगळीकडे चिकटवली गेली होती. गेली तीन वर्षे अफजल गूरच्या फाशी दिनी असे कार्यक्रम होत होते अशा बातम्या आहेत. कार्यक्रमाची तयारी जोरात होती. ह्या समारंभाला कन्हैय्या व त्याच्या माववादी (डिएसयू) संघटनेचा पाठिंबा होता. ह्या कार्यक्रमाच्या रूपाने अर्थातच न्यायालयाची अवमानना केली गेली कारण फाशी न्यायालयाने ठोठावली. ह्या कार्यक्रमाच्या वेळेस कन्हैय्याने राष्ट्राविरुद्ध घोषणा केल्या की नाहीत ह्यावर काहूर माजवले गेले आहे. एका क्षणासाठी असे समजू की कन्हैय्याने घोषणा केल्याही नसतील व जमलेल्या गर्दीतून कोणी तरी घोषणा केल्या असतील पण त्याने कन्हैय्याचा देशद्रोह कमी होत नाही. अफझल गुरुच्या स्मरणार्थ आयोजलेल्या कार्यक्रमाला त्याचा पाठिंबा असणे एवढेच देश द्रोहाचे कलम लावण्यासाठी पुरेसे आहे. त्याचा त्या कार्यक्रमात नुसता सहभाग हे ठरवतो की त्याने राष्ट्रद्रोही कार्यात हिस्सा घेतला होता व त्याचा देशद्रोह्यांना पाठिंबा होता.

हे झाल्यावर कन्हैय्याला देशद्रोहासाठी अटक होते, दुस-या दिवशी काँग्रेसी व वामपंथी जेएनयू मध्ये जमतात व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कन्हैय्याला पाठिंबा जाहीर करतात.

न्यायालया कडून जामीन मिळवून, तुरुंगातून बाहेर आल्यावर जेएनयू मध्ये कन्हैय्या दमदार भाषण ठोकतो.  अशी बातमी आहे की बरखा दत्त त्याच्या भाषणा पूर्वी त्याला भेटली व भाषणात कोणता विषय बोलायचा हे ठरवले गेले. न्यायालयाच्या दणक्याने घाबरून जाऊन स्वतःला वाचवण्यासाठी कन्हैय्या भाषण देतो व जाहीर करतो की तो देशभक्त आहे व फक्त मोदी व  संघविरोधी त्याला मोहीम बांधायची आहे. कन्हैय्याचा अफझल गुरुला पाठिंबा असणे म्हणजे मोदी व संघा विरुद्ध मोर्चा हे गणितच चुकीचे व नपटणारे आहे. तसेच अफझल गुरुला पाठिंबा देणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतीक आहे असे पण कोणी म्हणू शकणार नाही. त्यामुळे आमचे असे मानणे आहे की देशद्रोहाच्या आधीच्या केलेल्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी कन्हैय्याने मोदी व संघाविरुद्ध वक्तव्य दिली.

बातम्या देणा-या काही वाहिन्यांनी कन्हैय्याच्या भाषणाचे कौतुक केले आहे. राजकारण्यांसाठी तो एका रात्रीत एक हीरो म्हणून शाबीत झाला आहे. बातम्या देणा-या वाहिन्या, त्याने काय केले व काय बोलतो ह्याकडे दुर्लक्षून त्याचे भाषण लोकांना ऐकवून, टीआरपी वाढवण्यात गुंग आहेत. वामपंथी व काँग्रेसला  ह्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. केरळ व प बंगाल वामपंथी लोकांचे गढ आहेत व काँग्रेस जिवंत राहण्याच्या प्रयत्नात आहे. साहजिकच वामपंथी व काँग्रेस ने कन्हैय्याचा उपयोग येणा-या निवडणुकांमध्ये करून घ्यायचा प्रयत्न सरू केला आहे.

जाणून घ्यायची गोष्ट ही की ३१ वर्षाच्या कन्हैय्याची विद्यार्थीदशा अजून संपली नाही. तो जेएनयू मध्ये कसल्याशा विषयावर गेली अनेक वर्षे पीएचडी करत आहे. ८००० विद्यार्थ्यांच्या मताने जेऐनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्षांनी, सव्वाकोटी लोकांनी निवडून दिलेल्या मोदींवर शिवीगाळ करून देशद्रोहातून राष्ट्रनेता बनण्याची क्लूप्ती शोधून काढली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली हे सगळे आपल्याच देशात घडू शकते. बातम्या देणा-या वाहिन्यांना टीआरपी कसे वाढेल ह्याचीच काळजी लागली आहे. खरेखोटे व देशाला लाभकारक काय व हानिकारक काय ह्याचे भान ते विसरले आहेत. काँग्रेस व वामपंथ्यांना निवडणूकीच्या काळात लोकांना आकृष्ट करण्यासाठी तयार विषय व माणूस मिळाला आहे त्यामुळे ते पक्ष त्याचा भरपूर उपयोग करून घेत आहेत. ह्या सगळ्या  गडबड गोंधळात कन्हैय्याला जर वाटत असेल की दिलेल्या दमदार भाषणाने व वाहिन्यांनी केलेल्या भरपूर कौतुकाने त्याने केलेले राष्ट्रद्रोह न्यायालय किंवा लोकं विसरतील तर त्याचा तो गैरसमज आहे.

आम्ही त्याने केलेला राष्ट्रद्रोह कधीही विसरणार नाही. राहुल गांधीने अशा लोकांना समर्थन दिले हे आम्ही कधी विसरणार नाही. आम्ही कधी विसरणार नाही की केवळ राष्ट्रद्रोहाचे पाप पुसण्यासाठी मोदी विरुद्ध व संघा विरुद्ध कन्हैय्याने मोहीम उघडली आहे की जेणे करून लोकांना काय खरे व काय खोटे ह्याचा पत्ता लागू नये. आम्ही विसरणार नाही, निवडणुकांसाठी काँग्रेस व वामपंथी कन्हैय्याचा उपयोग करत आहेत. इंग्रजी बातम्या देणा-या वाहिन्या टीआरपी वाढवण्यासाठी त्याचे कौतुक करत आहेत हे ही आमच्याकडून विसरले जाणार नाही.

थोडक्यात - झालेल्या अवमाननेची दखल घेऊन न्यायालयानेच कन्हैय्याला व रशिदला शिक्षा ठोठावायला पाहिजे. देशाविरुद्ध काम करणा-यांना जे पाठिंबा देतात ते सगळे राष्ट्रद्रोही. ह्या मध्ये कसलाही गोंधळ नाही. कन्हैय्याचे भाषण रंगतदार होते का नाही. कन्हैय्या होता का अब्दुल. हे सगळे प्रश्न गौण आहेत. कोर्टाच्या चपराकींनी किंवा लोकांच्या रोषामुळे, बदललेल्या व्यक्तव्यांनी आमच्या मनात उत्पन्न झालेल्या शंका दूर होणार नाहीत. कन्हैय्या, ह्या घोळात पडण्यापेक्षा तू आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कलेस तर बरे होईल. तू एक साधारण बुद्धीचा विद्यार्थी आहेस हे इतकी वर्षे तुझ्या कुवती वरून समजून येते त्यामुळे आम्हाला संबोधन करण्या पेक्षा तुझ्याकडून विद्यार्थ्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पुरे कर. तुझ्या वयाची मुले दहा वर्षा आधीपासून कमावायला लागतात. तू करदात्यांचे पैसे खाऊन, आपल्याच देशाविरुद्ध वागतोस आणि ह्याची तुला थोडी सुद्धा शरम नाही त्याची देशाला चीड आहे.

Sunday, February 28, 2016

राहूल गांधींचा बेजबाबदारपणा


भारत विरोधी सांस्कृतिक कार्यक्रमात घोषणा झाल्या. घोषणा भारत विरोधी झाल्या. व्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली राहूल गांधींनी जेएनयू मध्ये जाऊन त्यांचे समर्थन केले.

व्यक्ति स्वातंत्र्य संविधानाने आपल्याला दिलेला प्रसाद आहे. पण स्वातंत्र्याचा वापर जबाबदारीने केला पाहीजे. जॉर्ज बर्नाड शॉ म्हणतात “your freedom ceases to exists where my nose starts” बेजबाबदार पद्धतीने हात हालवताना जर दूस-याच्या गालफडात लागले तर क्षमा मागावीच लागेल. मला हात पाय हलवायचे स्वातंत्र्य आहे म्हणून वाटेल तसे नाही हलवता येणार. तीच गोष्ट जेएनयू मधल्या घटनेची. सांस्कृतिक कार्यक्रम अफझलला फाशी दिली त्या घटनेच्या विरोधात होती. अब्दूलयाने परवानगी मागीतली. कार्यक्रम आयोजित केला. कन्हैया च्या DSU ने समर्थन केले व त्याला मग अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली राहूलने समर्थन केले. मत मिळवण्यासाठी देशहितपण सोडून दिला. कसाबसाठी पण एखादा कार्यक्रम होऊ शकतो ह्या जेएनयू मध्ये.

भ्रष्टाचाराविरूद्ध, महागयी विरूद्ध, गून्हेगारी विरूद्ध आवाज उठवला व त्याला समर्थन देणे एक पण असल्या गोष्टींना समर्थन म्हणजे राहूल गांधींना साध्या साध्या गोष्टी समजत नाहीत त्याचे हे उदाहरण. असा मनूष्य जर कॉंग्रेस पक्षाचा नेता होणार असेल तर देव करो व लवकरात लवकर असा राष्ट्रविरोधी पक्ष मोडकळीस येवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

Sunday, November 22, 2015

नितीशच्या शपथग्रहण समारंभाला केजरीवाल


 
नितीशह्यांच्या शपथग्रहण समारंभाला केजरीवालसाहेबांनी आपली उपस्थिती लावली. सगळ्यांच्या लक्षात राहिली. ह्या आधी निवडणूकातून त्यांनी ट्वीट करून नितीशला जिंकवा व भाजपाला हरवा अशा आशयाचा मजकूर जनतेपूढे मांडला होता.

आता हजेरी लावून आणि लालू व कॉंग्रेस बरोबर फोटो काढून घेऊन आपल्या पक्षाची भ्रष्टाचाराच्या विरूद्ध उभे राहण्याच्या विचारसरणीचे सरपण राजद कॉंग्रेसच्या अग्नीत घालून भ्रष्टाचार भडकावण्यालाच मदत केली आहे. ह्या आधी त्यानीच म्हटले होते की आम्ही कोणत्या ही पक्षाशी हात मिळवणी करणार नाही कारण सगळे केजरीवालांना सोडून भ्रष्ट आहेत असे त्यांच्या पक्षाचे मत होते. आता हे ढोंग होते हे सिद्ध झाले.

राजनीतीच्या त्याच धोपट मार्गाने केजरीवाल जाऊ पाहात आहेत. उरले फक्त राजकारण. लोकांच्यासाठी चांगले काही तरी करण्याचे फक्त ढोंग होते.

Wednesday, May 20, 2015

मोदी सरकारचे एक वर्ष

मोदी सरकारचे एक वर्ष पूर्ण झाले. त्याचे विच्छेदन करायला लोकांनी सुरवात केली आहेच. त्यांच्या चाहत्यांकडून कौतुक व विरोधकांकडून शिव्यांचा भडिमार होऊ लागला आहे. काँग्रेसचे लोक कुठे गेले तुमचे ‘अच्छे दिन’ असे विचारण्यात मशगुल आहेत. इंग्रजी वृत्तपत्रवाले टीआरपी रेटिंगवाल्या बातम्यांच्या मागे लागलेले असतात त्यामुळे देशा पुढल्या खऱ्या अडचणी, देशाचे भवितव्य व लोकांना अडणाऱ्या गोष्टींवर क्वचितच बोलतात.

 

मोदींचे एक वर्ष माझी समीक्षा

 

राष्ट्रनिर्माण एका दिवसात होत नाही. आपल्या सगळ्यांना स्वच्छ वातावरण, नियोजन व आधुनिकीकरण   आवडते. लोकशाहीमध्ये हे घडायला थोडा वेळ लागतो. एक वर्षा पेक्षा नक्कीच जास्त. म्हणूनच सरकारला ५ वर्ष दिलेली असतात. धीरा पोटी फळे गोमटी. Prudent Gradualism.

 

इमारत बांधताना, सगळ्यात महत्त्वाचा तिचा पाया असतो. पाया भरून इमारतीचा पहिला मजला सुरू होई पर्यंत लोकांचे सहज लक्ष जात नाही. राष्ट्रबांधणीचे पण असेच आहे. पाया भरणीचे काम मोदी सरकारने सुरू केले आहे असे त्यांच्या एक वर्षाच्या कामावरून कळून येते. काहीजण वाट बघायला तयार नसतात, बरेच निराश होतात. बऱ्याचजणांना संशय येऊ लागतो. मोजकेच थोडे वाट बघतात व हेच इष्ट आहे.

 

 

जन धन योजना –

आर्थिक दृष्ट्या गरीब, रोजगारी करणाऱ्या वर्गाला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी. त्या आधारे त्यांना, विमा व पेन्शन देण्याची मोठी योजना सुरू केली गेली.

 

E – लिलाव –

कोळशाच्या खाणी व अशाच प्रकारच्या सगळ्या नैसर्गिक संपदांचा लिलाव केल्याने भ्रष्टाचार कमी होतो व राजस्व वाढते.

 

स्वच्छ भारत अभियान –

आपल्या जनमानसात भिनायला दोन पिढ्या तरी जायला हव्यात. स्वच्छतेचे महत्त्व भारताच्या पंतप्रधानाने अंगिकारले व ह्या अभियानाला जोर दिला तर जास्त महत्त्व. आपण सगळे आजूबाजूच्या गलिच्छ परिसराला कंटाळलो आहोत. आपल्या देशातल्या सार्वजनिक जागा किती गलिच्छ आहेत त्याचा अंदाज सर्वांनाच आहे. सगळ्यांना स्वच्छता हवी आहे. हे साफ करायला पंतप्रधानांची साथ मिळाली ही तर कौतुकच.

 

काळा पैशावर अंकुश –

ह्या कायद्याने देशा बाहेर जाणारा काळ्या पैशावर अंकुश लागेल असे वाटते.

 

संरक्षण सौदे –

बरीच वर्षे रेंगाळत राहिलेले सुरक्षा खरेदीचे सौदे पारिकरांनी काही महिन्यात आटोपले. सुरक्षादलाचे आधुनिकीकरण अडले होते ते बऱ्याच अंशी आता मार्गी लागेल. पाणबुड्या, हेलिकॉप्टर, विमाने सगळ्या विषयांना पारिकरांनी हाताळले व मार्गी लावले.

 

विदेश नीती –

प्रत्येक राष्ट्राला भेट दिली तेव्हा भारतासाठी आर्थिक गुंतवणूक निश्चित करायचा प्रयत्न केला. शेजारी देशांबरोबर देशाच्या सीमा पक्क्या करायचा प्रयत्न केला.   

 

नैसर्गिक आपत्ती –

नेपाळची मदत असो किंवा येमन मधून भारतीयांना सोडवून आणायचे काम असो मोदी सरकारने वेळ न घालवता आलेल्या सगळ्या नैसर्गिक व राजनैतिक आपत्तीला चांगले तोंड दिले.

 

जमीन अधिग्रहण कायदा –

जमीन असल्या शिवाय, उद्योग, कारखाने गावा गावातून उभे राहणार नाहीत. कारखाने लोकांना नोकऱ्या देतात व नियमित वेतन.

 

ता.क. – आपले राष्ट्र बलाढ्य, समृद्ध व कल्याणकारी करायचे असेल व ते तसे टिकवून ठेवायचे असेल तर पिढ्या पिढ्यांचा प्रयत्न सतत झाला पाहिजे. हे राष्ट्रबांधणीचे कार्य हा आपला राष्ट्रधर्म झाला पाहिजे, आपला स्वभाव झाला पाहिजे. राष्ट्रव्रताची अशी आपली संस्कृती निर्माण झाली पाहिजे. हे एका वर्षाचे काम नाही.

Friday, March 13, 2015

मसरत आलम


जम्मू काश्मीर मध्ये भारतीय जनता पक्ष चांगल्या मतांनी बऱ्याच जागा जिंकली. तरी सुद्धा सरकार बनवता येण्या जोगी परिस्थिती नव्हती. जम्मू काश्मीर मध्ये जनतेचा कोणालाच बहुमताचा कौल मिळाला नाही. ह्या परिस्थितीत दोन पक्षांच्या मदतीने युतीचे सरकार बनविणे व ते जमले नाही तर परत राष्ट्रपती शासन लागू करणे एवढे दोनच मार्ग खुले होते. त्यात राष्ट्रपती शासन हे लोकशाहीला हानिकारक असल्या कारणाने भाजपने युतीचा मार्ग अनुसरला.

लोकशाहीत निवडणुका लढवणारा राजकीय पक्ष भारतीय संविधानावर विश्वास ठेवणारा असतो व अशा  पक्षांबरोबरची युती वैध असते. सरकार बनवण्याचा प्रयास म्हणूनच भाजपाने केला. प्रगतीसाठी एका ठरवलेल्या कार्यक्रमानुसार भाजप व पिडीपी एकत्र आले. अर्थात असा भाजपचा कयास होता.

मुख्यमंत्री झाल्या झाल्या मुफ्ती साहेबांनी रंग दाखवायला सुरवात केली. यशस्वी निवडणुकांसाठी त्यांनी पाकिस्तानला धन्यवाद दिला! आतंकवादी व पाकिस्तानच्या सहयोगानेच ह्या निवडणुका यशस्वी होऊ शकल्या असे त्यांचे मत. दुसरा चुकीचा निर्णय (की मुद्दामून घेतलेला निर्णय) की त्यांनी मसरत आलम ह्या आतंकवाद्याला तुरुंगातून भाजपला न कळवता सोडले. तो २०१० पासून भारता विरुद्धाच्या कारवायांसाठी तुरुंगात होता. भाजप – पिडीपी ह्यांनी एकत्र ठरवलेल्या कार्यक्रमापेक्षा हा निर्णय एकदम तिरपागडा होता व भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हानिकारक पण. ह्या त्यांच्या एकतर्फी निर्णयामुळे भाजप मोठ्या संकटात पडला व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाईट झाले.

मुफ्ती साहेबांनी आपले रंग दाखवले. ह्या पुढे मुफ्तींनी एकतर्फी निर्णय घेतला तर भाजपने युतीतून बाहेर आले  पाहिजे. राष्ट्रपती शासन आपोआप लागेल. पिडीपीला त्यांची जागा दाखवली पाहिजे, राजकीय पक्ष्याच्या मुखवट्या मागे देशद्रोही मनोवृत्ती चालणार नाही हे त्यांना शिकवले पाहिजे.

पिडीपीला पूर्ण बहुमत मिळाले नाही ते छानच झाले नाही तर त्यांनी असा काही हाहाकार घातला असता व भाजपला वाटून सुद्धा पिडीपीवर नियंत्रण ठेवता आले नसते. भाजपाला बऱ्याच जागा मिळून कमकुवत पिडीपीला आवर घालण्याइतकी ताकद आली हे त्यातल्या त्यात बरे झाले. भाजपाचे व आपले सौभाग्य म्हणायचे. म्हणूनच ही युती जास्तीत जास्त सहा महीने चालेल असे वाटते. त्यानंतर सहा महीने राष्ट्रपती शासन व मग भाजप नॅशनल कॉन्फ्रसचे सरकार येईल असे वाटते.

Thursday, November 13, 2014

स्वच्छ भारत अभियान

१५ ऑगस्टला प्रधान मंत्री नरेंद्र मोदी ह्यांनी लाल किल्ल्यावरून स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली व त्वरित त्याची अंमलबजावणी सुद्धा झाली. आपण सगळे आजूबाजूच्या गलिच्छ परिसराला कंटाळलो आहोत. आपल्या देशातल्या सार्वजनिक जागा किती गलिच्छ आहेत त्याचा अंदाज सर्वांनाच आहे. सगळ्यांना स्वच्छता हवी आहे. आपोआप झाली तर बरेच पण स्वच्छता आपोआप काही होत नाही.

दूरचित्रवाणी व रेडिओ वरून स्वच्छ भारत अभियानाने म्हणावा तसा जोर पकडलेला नाही हे समजते ह्याचे सगळ्यात मोठे कारण पिढ्यांपिढ्यांची घाणेरड्यात राहायची सवय. त्यातून वैयक्तिक स्वच्छता फक्त काय ती राखायची बाकी सगळीकडे घाण व उकिरडा. घराबाहेर सार्वजनिक जागांवर घर स्वच्छ करून उकिरडा फेकणे हा कार्यक्रम गेली अनेक वर्षे आपण राबवत आलो आहोत त्या मुळे सगळीकडे उकिरडाच उकिरडा दिसतो.

इतक्या पटकन अशी घाणेरडी सवय कशी जाणार? उकिरडा, गलिच्छता व घाणीबद्दलच्या संवेदना बधिर होऊन गेल्या आहेत. अगदी शिकलेले लोकंपण आपले घर झाडून कुंपणा बाहेर रस्त्यावर केर ढकलून देतात. बंगळूरला तर साठलेला कचरा प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून घराबाहेर रस्त्यावर ठेवतात, दरवाजाला अडकवतात किंवा घराबाहेरच्या झाडाला टांगतात! महानगरपालिकेचा कचरावाला घेऊन जाईल अशी अपेक्षा. कचरावाला काही रोज येत नाही व टांगलेल्या व ठेवलेल्या पिशव्या रस्त्यावरची मोकाट कुत्री फाडून कचरा सगळ्याभर करतात. सकाळी आपल्यासकट आजूबाजूचे रहीवाशी महानगरपालिकेला नावे ठेवतात.

स्वच्छता अभियान एक पिढिभर तरी राबवले पाहिजे तरच काय तो फरक दिसायला लागेल. नाहीतर थोड्या दिवसाने परत तशीच सगळीकडे - घाण. स्वच्छता अभियानात काही गोष्टी आपण सर्वाने केल्या तर काही प्रमाणात तरी फरक पडेल. स्वच्छते बरोबर कचरा कमी करणे व उकिरडा न पसरवण्यावर भर दिला तर बऱ्याच प्रमाणात स्वच्छता दिसून येईल. घाण होऊ कशी द्यायची नाही ह्यासाठी काही प्रस्ताव देत आहे –

- आपल्या घराजवळील रस्त्यालगतचा किंवा रस्त्याचा एक भाग किंवा घाणीचा एक कोपरा स्वच्छ करण्यासाठी दत्तक घ्यायचा प्रयत्न करूया. असे दत्तक घेतलेले ठिकाण, दर आठवड्याला साफ झाडून स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करूया. त्या जागेवर कोणी घाण टाकताना दिसली तर त्यांना घाण टाकू नका अशी विनंती करायचा प्रयत्न करावा. नियमाने दर आठवड्याला स्वच्छता करायची असा प्रयत्न असावा.

- आपल्या घरातल्या नोकरांना किंवा मोलकरीणबाईला कचरा कोठे व कसा टाकायचा ह्याची सूचना द्यावी. बऱ्याच वेळा सूचना न दिल्याने घर स्वच्छ ठेवण्यासाठी ठेवलेले नोकर घर स्वच्छ करून साठलेला कचरा घराबाहेर जवळच जेथे त्यांना सोपे जाईल तेथे टाकतात. बाकीचे लोकं असा वाटेल तसा कचरा टाकताना पाहून, नोकरांच्या मालकांना नावे ठेवतात.

- ज्यांच्याकडे पाळीव कुत्री, मांजरी असतील त्यांनी पाळीव जनावरांना फिरवायला घेऊन जाताना बरोबर एक प्लॅस्टिकची पिशवी व जुन्या वर्तमानपत्राचा तुकडा जरूर बाळगावा. पाळीवाची विष्ठा उचलून कचरा कुंडीत टाकावी. रस्त्यावरची विष्ठा उचलायला अतिशय सोपे असते. रस्त्यावरच्या माती व धुळीमुळे रस्त्याला विष्ठा चिकटत नाही. बऱ्याच जणांनी हे करून पाहिलेले नसते व त्यामुळे त्यांना असे वाटते की विष्ठा काढायला खूप वेळ लागेल व कोणीतरी पाहील. आपल्या पाळीव प्राण्याची विष्ठा काढायला लाज वाटायचे कारण नाही. उलट बाकीचे लोकं आपले बघून अनुकरण करायला लागतील. पहिल्यांदा काढताना थोडीशी लाज वाटेल पण मग काही वाटणार नाही. जो मालक स्वतःच्या पाळीव जनावराची विष्ठा काढून कचरा पेटीत टाकत नाही त्याचे हे करणे बाहेर शौचाला जाण्या एवढेच वाईट आहे.

- दर आठवड्याला समाजसेवा करायला थोडा वेळ द्या. आपल्या मुलांना घेऊन आठवड्यात एकदा एक तास तरी आपण ठरवलेला घराबाहेरचा कोपरा साफ करायचा प्रण घ्या. त्या निमित्ताने आपला व्यायाम होतो व मुलांना स्वच्छतेचे चांगले वळण लागते. दर आठवड्याला नियमाने साफ केल्याने, आपण ठरवलेल्या जागेबद्दल आपुलकी निर्माण होते व त्याच आपुलकीतून तो कोपरा साफ ठेवला जातो.

- सार्वजनिक स्वच्छता मोहिमेसाठी आपल्याला स्वतःचा अहंभाव जरा बाजूला ठेवावा लागेल. जी जागा आपली नाही ती साफ करायला बऱ्याच वेळेला आपला ‘इगो’ मध्ये मध्ये येतो. आपण ती जागा साफ का करावी हा प्रश्न आपल्याला पडतो. आपण कारणे देतो – हे काम खरे तर महानगरपालिकेचे आहे, गेल्याच आठवड्यात साफ केले होते मी, लोकांनी परत घाण केली – मी काय त्यांचा नोकर आहे की मी साफ करावे? व त्यांनी घाण टाकावी? एवढ्याचसाठी आपण एक कोपरा स्वच्छतेसाठी आपलासा करावा, एखाद्या व्रता प्रमाणे तो नियमितपणाने साफ ठेवावा. हे काम चिकाटीचे आहे व मन शांत ठेवून साफ करण्याच्या उद्देश्याकडे लक्ष ठेवण्याचे आहे बाकीच्या गोष्टी गौण समजाव्यात.

आपण ठरवलेला व स्वच्छतेसाठी दत्तक घेतलेला कोपरा नियमितपणे साफ ठेवा. घाण होऊन देऊ नका, साफ ठेवण्यासाठी तळमळीने काम करावे लागेल पण तरी सुद्धा करा. एकदा करून पाहाच.

Friday, August 15, 2014

बिटींग द रिट्रीट किंवा परिसमाप्ती समारोह



बिटींग द रिट्रीट किंवा परिसमाप्ती समारोह



पश्चिम सीमेवर बिएसएफची फौज तैनात आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला आपण ‘बिएसएफ’ ह्या नावाने ओळखतो. युद्धशांतीच्या काळात आंतरराष्ट्रीय सीमेवर बिएसएफ गस्त घालते पण युद्धजन्य काळात मात्र बिएसएफची जागा भारतीय सेना घेते. पाकिस्तानकडून त्यांची ‘बिएसएफ’, ज्याला ते ‘रेंजरर्स’ म्हणतात ते रेंजरर्स गस्त घालतात.



भारताचे अमृतसर व पाकिस्तानचे लाहोर. ह्या दोन शहरांमधून जाणारा ग्रॅन्डट्रंक रस्ता इतिहास प्रसिद्ध आहे. हाच रस्ता पुढे काबूल पर्यंत जातो, व पूर्वेला चितागॉन्ग पर्यंत! साधारण अडीचहजार किलोमीटरचा हा मौर्यकालिन रस्ता, ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात सुद्धा अस्तित्वात होता. त्या काळी ह्या रस्त्याचे नाव ‘उत्तरापथ’ होते. १९४७च्या फाळणीत, ह्याच ग्रॅन्डट्रंक रस्त्यावरून, हजारो हिंदू व पंजाबी लोकं, नवीनच कोरून काढलेल्या देशातून जिवमुठीत धरून भारतात आली होती.



स्वातंत्र्यप्राप्तीच्या वर्षी, सत्तांतराची तारीख १५ ऑगस्ट अशी ठरवली गेली. पण १९४७ सालाच्या जून महिन्याच्या अखेर पर्यंत भारत व नव्या कोरुन काढण्यात येणा-या देशा मधली सीमारेषा ठरवली गेली नव्हती. दोहोंमधली सीमारेषा ठरवण्यासाठी घाईघाईत एक बॉर्डर कमिशन गठीत केले गेले. त्यासाठी जस्टीस रॅडक्लिफ ह्या ब्रिटिश महाशयांना पाचारण धाडले गेले व त्यांना ह्या कमिशनचे अध्यक्ष नेमले गेले. ह्या कमिशन मध्ये मुस्लिम लीग व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. निःपक्ष पणे कमीशनचे काम करता यावे म्हणूनच जणूकाही कधीही भारत देश न बघितलेल्या व इतिहास तज्ञ देखिल नसणाऱ्या रॅडक्लिफ ह्यांना अध्यक्षपद दिले गेले असावे.



सत्तांतराची तारीख जवळ येत होती. रॅडक्लिफ साहेबांवर बरेच जोखमीचे काम पडले होते. त्यांना पश्चिमेकडे पंजाब प्रांत व पूर्वेकडच्या बंगाल प्रांतातून एक नवा देश कोरून काढायचा होता. हे करण्यासाठी, मुसलमान लोकसंख्या व हिंदू लोकसंख्येला अनुसरून नकाश्यावरती रेघ मारायची होती आणि हे काम करायला रॅडक्लिफ साहेबांकडे फक्त पाच आठवडेच होते. थोड्याच दिवसात रॅडक्लिफ साहेबांच्या असे लक्षात आले की कसेही केले तरी भारतीय जनतेचे समाधान होणारे नाही. परिस्थितीच अशी होती. शेवटी घाईगडबडीत त्यांनी फाळणीचा पाया रचला. गव्हर्नर जनरल माउंटबॅटनला जेव्हा कळले की मुसलमान व हिंदू दोन्ही गटात फाळणीवरून राग धुमसतो आहे तेव्हा त्यांनी रॅडक्लिफ साहेबांचा देशाचे तुकडे करणारा नकाशा, १५ ऑगस्ट ऐवजी दोन दिवस थांबून १७ ऑगस्टला प्रसिद्ध करायचे ठरवले. ह्याच कारणास्तव, आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तरी दोन दिवस पंजाब मधील जनतेत बरीच घालमेल होती व शेवटी जेव्हा १७ ऑगस्टला नकाशा प्रसिद्ध झाला तेव्हा तर लोकांवर आकाशच कोसळले. फाळणीत लाखो लोकं बेघर झाली व लाखो लोकं प्राणास मुकली. अटारी व वाघा गावांचे पण असेच काहीसे हाल झाले होते. वाघा गावाच्या मधून फाळणीची रेघ ओढली गेली होती. ग्रॅन्डट्रंक रस्त्यावर अटारी पासून चार किलोमीटर अंतरावर घाईघाईत वाघा येथे, बाउंड्री पिलर क्रमांक १०२ जवळ चेकपोस्ट बांधले गेले. कारण फाळणीची रेघ तेथून जात होती. फाळणी नंतर त्या चेकपोस्टचा ताबा, भारतीय सेनेच्या कुमाऊ रेजीमेंट ने घेतला. ११ ऑक्टोबर १९४७ ह्या दिवशी तेथे पहिल्यांदा भारतीय तिरंग्याचा ध्वजारोहण समारंभ पार पडला. सोहळ्याला ब्रिगेडियर मोहिंदर सिंग उपस्थित होते. पुढे पन्नासच्या दशकात ह्या चेकपोस्टवर पंजाब पोलिस गस्त घालत. त्या वेळेला वाघा चेकपोस्ट हा एकच भारत – पाकिस्तान मधला आवक जावकीचा रस्ता होता. १९६५ मध्ये जेव्हा बिएसएफ चे गठन झाले, तेव्हापासून हे चेकपोस्ट बिएसएफकडे आहे. ऑक्टोबर १९४७ सालापासून सुरू झालेला ध्वजारोहण व ध्वज उतरवण्याचा समारोह आजतागायत अव्याहतपणे रोज होतो. ह्याला अपवाद फक्त १९६५ व १९७१चे साल. भारत पाक युद्धकाळात, तेवढा पुरता हा समारोह थांबवला गेला होता.

परदेशात पूर्वीच्या काळी शत्रूपासून गावांचे रक्षण करण्यासाठी गावाच्या वेसेवर तट बांधला जायचा. सकाळी गावातली लोकं तटा बाहेर जाऊन शेती करायची. सूर्यास्ताच्या वेळेला शेती करणाऱ्या गावकरऱ्यांना गावात परतण्यासाठी, नगारे व ब्युगलची धून वाजवून सुचीत केले जायचे व ही बिगुलाची व नगाऱ्याची धून कानावर पडल्यावर आपले काम थांबवून शेतकरी गावात परतायचे व तटाचे दरवाजे रात्रीसाठी बंद व्हायचे. ह्याच सोळाव्या शतकातल्या प्रघाताला अनुसरून युरोप मध्ये ‘बिटींग द रिट्रीट’ ची कल्पना सुरू झाली. त्या काळी सैनिकांना ड्रम्सच्या वेगवेगळ्या बिट्सचा अर्थ माहिती असायचा व त्याच्या तालावर काम चालायचे.



सूर्यास्ता नंतर युद्ध त्या दिवशी पुरते बंद ठेवत असत. ह्याला कारण म्हणजे, रात्रीच्या अंधारात काही दिसत नाही व आपले कोण, व शत्रू कोण हे समजत नाही. अशा मध्ये युद्ध करणाऱ्या दोन्ही गटांमध्ये सूर्यास्ता पासून सूर्योदयापर्यंत युद्धविराम पाळला जायचा. ह्याची सूचना तुताऱ्या, नगारे व ध्वज उतरवून दिली जात असे. असा इशारा होताच सैन्याच्या तुकड्या युद्ध थांबवून छावणीत परतायच्या. ह्यालाच ‘बिटींग द रिट्रीट’ किंवा परिसमाप्ती समारोह म्हणतात. महाभारतात युद्धामध्ये अचानक सूर्यग्रहण लागल्या मुळे गोंधळ उडाला. युद्धविरामाची घोषणा होत असतानाच ग्रहण संपले, युद्धपुन्हा सुरू झाले व त्या गोंधळात जयद्रथाला मारले गेले. अशी कथा आहे. शिवाजीच्या काळात सुद्धा तटाचे दरवाजे संध्याकाळी बंद झाल्या मुळेच हिरकणी गडावर अडकली होती. संध्याकाळी राजवाड्यांची, किल्ल्यांची, गावाच्या वेसेजवळ बांधलेल्या तटाची दारे बंद करण्याचा व भगवा ध्वज उतरवण्याचा प्रघात जरी पूर्वीपासून चालत असला तरी, परिसमाप्ती समारोहा सारखा सोहळा होत नसायचा. तो आपण इंग्रजांकडून स्वीकारला आहे. शिवकालीन किंवा पशवेकालीन सैन्याच्या कवायतींच्या प्रथांमध्ये परिसमाप्तीची प्रथा असल्याच्या नोंदी सापडत नाहीत.



इंग्रजांकडून शिकलेली परिसमाप्ती समारोहाची परंपरा भारतीय सैन्यात आज सुद्धा अस्तित्वात आहे. प्रत्येक सैन्य मुख्यालयात सूर्यास्ताला ‘बिटींग द रिट्रीट’ च्या तालावर भारताचा तिरंगा व त्या त्या मुख्यालयाचा झेंडा उतरवला जातो. दरवर्षी दिल्लीत २६ जॅनेवरीच्या गणतंत्र दिवसाच्या समारोहा नंतर २९ जॅनेवरीला राष्ट्रपतींच्या उपस्तिथीत विजय चौकात परिसमाप्ती समारोह संपन्न होतो. अशा कार्यक्रमाला भारतीय वायुदल, नौदल व सैन्यदलाचे विविध वाद्यवृंद भाग घेतात. दर वर्षी डिसेंबर महिन्यात नौदल हा समारोह मुंबईत साजरा करते.



असाच समारोह, अमृतसर पासून २३ किलोमीटरवर असलेल्या, अमृतसर – लाहोर रस्त्यावरच्या ‘वाघा चेकपोस्ट’ आंतरराष्ट्रीय सीमेवर रोज होतो. भारतीय तिरंगा सूर्यास्ताच्या सुमारास बिएसएफच्या वाद्यवृंदाच्या तालावर त्यादिवसासाठी उतरवण्यात येतो व अमृतसर लाहोर रस्त्यावरचे लोखंडी दार रात्रीसाठी बंद केले जाते. जणूकाही आपल्या देशाचे रक्षण करणारा तट रात्रीसाठी कडेकोट बंद करावा तसेच.



कधीकधी जन्मोजन्मीचे वैरी, अल्पकाळासाठी हसतखेळत एकमेकात चेष्टा करत एकमेकांबद्दलचे वैर दर्शवतात, तसेच काहीसे उभय राष्ट्रांमध्ये आहे. किंबहुना परिसमाप्ती समारोहा मध्ये हेच वैर नाटकीय रूपाने रोज दर्शविले जाते. १९४७ पासून सातत्याने सुरू झालेला ध्वजारोहण व सूर्यास्ताला ध्वज उतरवण्याचा कार्यक्रम सुरवातीला साधाच असायचा. त्याच कार्यक्रमाचे पर्यवसान, सन १९६५ मध्ये एका छोटेखानी पाऊणतासाच्या कार्यक्रमात झाला. आपले बघून लागलीच पाकिस्तान्यांनी पण त्यांचा कार्यक्रम सुरू केला. पुढे जेव्हा बिएसएफचे डायरेक्टर जनरल व पाकिस्तान रेंजर्सचे प्रमुख एकमेकांना भेटले तेव्हा एक नाट्यपूर्ण दिग्दर्शित सोहळा करायचे ठरवले गेले व आताचा वाघा समारोह सुरू झाला. आधी फक्त आवेशच होता. पण बघताबघता हा सोहळा, भारत – पाक संबंधांचा थर्मामीटर ठरला व जसजसा त्यात एकमेकांबद्दलचा द्वेष, त्वेष व क्रोध नाट्यपूर्ण रीतीने रेखाटला जाऊ लागला, तसतसे त्याची प्रसिद्धी व्हायला लागली. आता हा समारोह पर्यटकांचे आकर्षण झाला आहे. आज जगात कोठेही असा समारोह होत नाही. पूर्वी जेव्हा पश्चिम जर्मनी व पुर्व जर्मनी दुभंगलेली राष्ट्र होती, त्या वेळेला सुद्धा बर्लिन वॉलपाशी असा समारोह व्हायचा नाही. उत्तर व दक्षिण कोरिया मध्ये अजूनही होत नाही. बाहेरच्या देशातल्या बऱ्याच पर्यटकांनी वाघा येथे होणाऱ्या कार्यक्रमाची टिका केली आहे. हसे उडवले आहे पण ह्या समारोहा पाठीमागची भावना फाळणी मध्ये होरपळल्या गेलेल्या इथल्या आपल्या हिंदू भावंडांनाच समजू शकते. इतरांना नाही. त्यामुळे बाहेरच्या देशातल्या पर्यटकांच्या टीकेचा फरक आपल्यावर पडत नाही.



वाघा चेकपोस्ट जवळ लोकं संध्याकाळी चार वाजल्यापासून जमू लागतात. हा समारोह बघण्यासाठी बांधलेल्या ग्रॅन्डस्टॅन्ड जवळ जसजसे आपण जायला लागतो तसतसे आपल्याला भारतीय झेंडे व तिरंगी टोप्या विकणारे, रोज होणाऱ्या समारोहाचे फोटो विकणारे विक्रेते भेटायला लागतात. कपाळावर आठ्या आणून नको नको म्हणत पर्यटक त्यांना हुसकावताना दिसतात. आपण जसजसे त्या शाही मंडपाजवळ जायला लागतो तसतसा, हळूहळू गोंगाट वाढायला लागतो. मोठमोठ्यांनी ध्वनिक्षेपकावर लागलेली देशभक्तिपर गीते व गाणी आपल्या कानावर पडत असतात व समारोहाची वातावरण निर्मिती व्हायला लागते. मोठ्याने ऐकू येणारी ‘सारे जहासे अच्छा’, ‘ऐमेरे वतन के लोगो’ अशी गाणी अंगावर रोमांच उठवतात. आधीच ग्रॅन्डस्टॅन्ड वर येऊन बसलेली भारतीय जनता मधूनमधून मोठमोठ्याने ‘हिंदूस्ताsssssन झिंदाबाद’, ‘वंदेsssss मातरम्’ चे नारे लावत असतात. आपल्या नकळत आपण त्या ओरडण्यात सहभागी व्हायला लागतो.



साधारण पाऊणतास, चालणाऱ्या ह्या कवायतीत, रुबाबदार, मोठ्यामोठ्या मिशा ठेवलेले, बिएसएफचे गणवेशधारी जवान असतात. छान कांजी केलेला खाकी रंगाचा शर्ट व खाकी रंगाची विजार. शर्टावर उजवीकडे खिशावर नावाची छोटी पाटी. काळ्या पाटीवर पांढऱ्या रंगाने नाव कोरलेले. शर्टाच्या डाव्या खिशावर रीबनला लावलेली चकाकणारी मेडल्स्. पॅन्ट अशी चढवलेली की पट्ट्यावर जिथे शर्ट दिसायला लागतो त्या भागात शर्टाची फक्त तीनच बटणे दिसतात. कमरेला बिएसएफच्या निळ्या, पिवळ्या व लाल चट्ट्यांचा कमरबंद. त्यावर बिएसएफचे बक्कल असलेला कातड्याचा काळा जाड पट्टा. डोक्यावर मस्त दिमाखदार पागोटे. त्या पागोट्याच्याच कापडाचा डौलदार तुरा व पागोट्याच्या डाव्या बाजूला हळूच कानावर रुळणारी सोनेरी झालर. खांद्यावर बिएसएफच्याच रंगाच्या अॅपलेटस्, खाली काळ्या रंगाचे चकाकणारे ड्रिलशूज. पॅन्ट व जोडे जेथे मिळतात तेथे पांढरी पट्टी ज्याला इंग्रजीत अॅन्कलेट म्हणतात अशी लावलेली असते. अॅन्कलेटमुळे पोषाख उठावदार दिसतो. ड्रिलशूज चामड्याचे असतात व नडगी पर्यंत येतात. टाचेला १३ खिळ्यांनी घोड्याची नाल ठोकलेली असते. त्या ठोकलेल्या नालीमुळे, जोडे घालून चालताना खाड खाड आवाज होतो. जोड्याची लेस लांब असते. लेस बांधताना ती दुमडली गेली नाही पाहिजे म्हणजे छान दिसते. खांद्यावर रायफल व हातात कॉपरपर्यंत येणारे पांढरे हातमोजे. फार रुबाबदार व लक्षवेधी असतो हा पोषाख.



अमृतसर लाहोर रस्त्याच्या डाव्या बाजूला आपला तिरंगा व दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा चांद तारा, दोन्ही ध्वज असे दिमाखात दिवसभर फडकत असतात. ह्या समारोहात बिएसएफचा एक सेक्शन भाग घेतो. सेक्शनमध्ये बिएसएफचे दहा जवान असतात. एक ब्युगल धारक जवान, व बाकीच्यांनी खांद्यावर घेतलेली रायफल अशी ती दहा जणांची तुकडी असते. तुकडीचे नेतृत्व बिएसएफचा एक हवालदार करतो.



"साsssवधान। बिएसएफच्या हवालदाराचा खड्या आवाजात आपल्या तुकडीला दिलेल्या आदेशाने समारोहाची सुरवात होते. ध्वनिक्षेपकांवर लागलेली सगळी गाणी थांबतात. फक्त लोकांचा एकमेकांशी बोलण्याचा गोंगाट ऐकायला यायला लागतो.



गणवेशावर जान्हव्या सारखा सॅटिनचा लाल सॅशे घातलेला हवालदार खर्ड्या आवाजात तुकडीला तिरंगा उतरवण्यासाठी लागणारे ‘वर्ड ऑफ कमांडस्’ म्हणजेच मोठमोठ्यांदी शब्दाज्ञ्या देत कवायत करवून घेतो. जर बरोबर ठिकाणी पॉज दिला तर कवायत देखणी होते. चपळाईने केलेल्या दोन हालचालींमध्ये जर काही घटकांचा पूर्ण विराम दिला गेला तर, त्या हालचाली खूप उठावदार दिसतात. सांघिक कवायतीत प्रत्येकांच्या हालचाली एकसमयावेच्छेनुसार होतात व एक लय, एक ताल जमतो. संचलन उमदे दिसते. ड्रिल करताना एक लयबद्धता येते, सांघिक शक्तीचा अनुभव येतो, मन तल्लीन होते, हालचाल एकसारखी दिसते. कवायतीत, ज्या बाजूला आपला ध्वज असतो त्याच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या उजव्या बाजूला संचलन करत जायचे व बिगुलाच्या लयबद्ध कर्णमधुर धुनेवर हळूहळू दोरी ओढत ध्वज उतरवायचा. हृदयचीरुन जाणारा बिगुलाचा आवाज ऐकून ग्रॅन्डस्टॅन्ड मध्ये एकदम स्तब्धता होते, शांतता पसरते व बघायला आलेले सगळे लोकं उभे राहतात. प्रत्येकाच्या मनात तिरंग्याप्रतीच्या भावना अशा काही जागृत होऊन एका क्षणासाठी सगळे विसरून देशासाठी सर्वस्व अर्पण करायचा विचार मनात येतो. बिएसएफची पूर्ण तुकडी सावधान होऊन सॅल्यूट करते. तेवढ्यात बिगुलाची ‘रिट्रीट’ धून संपते व बघणारे सगळे ह्या जगात परत येतात. ह्याच प्रकारे हा सोहळा दोघांकडील जवान पार पाडतात. दोघे जेव्हा समोरा समोर येतात तेव्हा एकमेकांनी केलेल्या वैराच्या नाट्ट्याला तोड नाही. बिएसएफ व रेंजरर्सचे दोघेही जवान, नेहमीचीच कवायत करतात, पण त्यात जोष भरत ड्रिलशूज खाड खाड आपटत, उंच उंच कदम ताल करत, एकमेकांसमोर येतात. जसजसे एकमेकांच्या जवळ येतात तसतसे त्यांचा जोष वाढत जातो. ढम ढम वाजणाऱ्या ढोलाच्या तालावर ड्रिल करताना पहिल्यांदा डाव्या पायाने सुरवात करून पाय घुडग्यात न वाकवता पुढे नेऊन टाकताना त्यांचे पाय इतके उंच जायला लागतात की डोळ्यांच्या रेषेत समोर चकाकणारे ड्रिलशूज येतात! परत पाय खाली आणताना जोरात हिलडीग करतात. हिलडिग म्हणजे कवायतीत पाय खाली आणताना आपली टाच जोरात जमिनीला मारायची व जमिनीत रुतवायची. त्याचवेळेस तडक उजवा पाय घुडग्यात न वाकवता पुढे न्यायचा. हात कोपऱ्यात न वाकवता नीट शिताफीने पुढे लंबकासारखा फिरवायचा, परत आणताना जेवढा पुढे नेला तेवढाच तो मागे आणायचा. जसे कवायत करत दोन्हीकडचे जवान समोरासमोर येतात तसे मग आवेशात मिशांना पीळ देत, जोरात श्वास सोडत, मुठी आवळत असा काही आव आणतात की आता दोघे एकमेकांना ठोसेच मारणार असे वाटायला लागते. समारोह समाप्तीला आपआपल्या तुकडीचे नेतृत्व करणारे, दोन्ही ‘वैरी’ हस्तांदोलन करतात व आपआपली लोखंडी दारे लोटून घेतात.



हल्ली ह्या समारोहामध्ये थोडा फरक पडत चालला आहे. सध्या सरकारने नरमाईचे धोरण धरल्यामुळे बिएसएफच्या डायरेक्टर जनरलने व रेंजर्सच्या प्रमुखाने ‘ह्या संचलनातला त्वेष ठेवायचा पण द्वेष काढून टाकायचा’ असा निर्णय घेतला आहे. पण तो संदेश अजून बिएसएफच्या जवानांपर्यंत पोहचायचा आहे असे वाटते. कारण एकदा का ‘भारत माता की जय’ व वंदे मातरम् च्या गर्जना सुरू झाल्या की मग बिएसएफच्या जवानांमध्ये एक आगळाच त्वेष चढतो. पुढचे सगळे आपोआप घडते. २०१० साला पासून बिएसएफच्या ह्या संचलनात महिला सैनिक पण भाग घ्यायला लागल्या आहेत. महिलांच्या सहभागामुळे समारोहाला आगळाच रंग येऊ लागला आहे. हा समारोह बघताना आपल्याला क्षणभर आपल्या मायभूमीसाठी जीवन देणाऱ्या महावीरांचे स्मरण होऊन जाते. डोळ्यात कधी पाणी येते ते कळत नाही व छाती देशाभिमानाने फुलून जाते.



हा सोहळा बघण्या साठी पाचसहा हजाराची गर्दी रोज होते. समारोहाच्या आधी, दोन्ही बाजूला सहलीवर आलेली शाळकरी मुले मुली आपआपल्या देशभक्तिपर गाण्यांवर नाच करताना आढळतात व समारोह संपल्यावर जेव्हा दारे बंद होतात तेव्हा भावनाविवश झालेले प्रेक्षकातील काही बघे धावत लोखंडी दारा जवळ शत्रूवर धावा बोलावा तसे येतात.



सूर्यास्ताला सुरू झालेला हा समारोह संपता संपता अंधार पडलेला असतो व तो पर्यंत आपण इतके भावनावश होऊन गेलेलो असतो की आता पर्यंत आपल्या देशासाठी आपण काहीच केले नाही ह्या सतावणाऱ्या विचाराने आपल्या व्यर्थ घालवलेल्या जीवनाचा आढावा घेत हिरमुसले होऊन परत जायला निघतो. मात्र जाताना ‘त्या’ झेंडे, तिरंगी टोप्या व फोटो विकणाऱ्या मुलाला शोधून, त्याच्या कडून भारताचा छोटा ध्वज व समारोहाचे फोटो आवर्जून घ्यायला आपण विसरत नाही.





Wednesday, July 23, 2014

विचा-यांचा अविचार


 
ठाण्याच्या खासदारांनी, महाराष्ट्र सदनात जेवण चांगले नाही मिळाले म्हणून तेथल्या सुपरीटेंडंटच्या तोंडात बळेने पोळी कोंबल्याचे दृष्य सर्वानीच पाहीले असेल. जेवण चांगले नाही म्हणून राग आलेल्या ठाण्याच्या राजन विचा-यांनी जे कृत्य केले ते निंदनीय आहेच पण त्यावर त्यांचा बचावाचा प्रयत्न अजूनच निंदनीय आहे.
त्या केटररची किंवा त्या सुपरीटेंडंटची कितीही चूक असली तरी कोणाच्या तोंडात कोंबणे म्हणजे व्यक्ति स्वातंत्र्यावर कु-हाड मारण्यासारखे आहे. आपण खासदार आहात, प्रशासनिक कारवाई घेण्याचा अधिकार आपण बाळगता, मग तो सोडून हा अविचार म्हणजे तुमचा खासदारकीचा निव्वळ मगरुरपणाच दाखवतो.
आपण काय विचार करतो ह्या पेक्षा आपण काय कृती करतो ह्यावरच समाजातली आपली प्रतिमा बांधली जाते. लोकसंग्रह करण्या-यांनी तरी हे मनात बाळगून आपली कृती केली पाहिजे. जे राजन विचा-यांनी केले नाही. कोणाला समज द्यायचीच असेल तर असे तोंडात कोंबून कोणाचा वैयक्तिक अपमान करायचे स्वातंत्र्य तर कोणालाही नाही.
ह्या परिस्थितीत राजन विचा-यांनी त्या सुपरिटेंडंची सार्वजनिक माफी मागणे हेच उचित आहे. तसेच राजकीय पक्षांकडून ह्या गोष्टीला हिंदू मुसलमान रंग देण्याची चूक झाली नाही पाहिजे.
 

Sunday, July 20, 2014

बुकर पाहीतोषिक मिळवणा-या बाईंनी केला गांधींचा अपमान


काहीच दिवसांपूर्वी महात्मा अय्यनकालीह्यांच्या जीवनावर बोलताना अरुंधती रॉय ह्यांनी महात्मा गांधींना वर्णद्वेशी म्हटले. त्या पुढे म्हणाल्या “It is part of a political conspiracy to perpetuate the caste system that such heroes are never celebrated. All the while, the nation has been fed on centuries of lies about “mahatmas,” who never openly renounced the caste system but instead, advocated that the hereditary occupation of people who belonged to a particular caste ought to be the maintained social order. The story of Gandhi that we have been told, is a lie. It is time to unveil a few truths, about a person whose doctrine of nonviolence was based on the acceptance of a most brutal social hierarchy ever known, the caste system. Gandhi believed that a scavenger should always remain a scavenger. Do we really need to name our universities after him?”

गांधी, सावरकर, फूले, आय्यनकलीह्या सगळ्या महात्म्यांनी छूत अछूत व वर्णद्वेशा विरुद्ध केवढे मोठे काम केले होते ते सर्व परिचितच आहे. पण ह्या सगळ्याला बगल देऊन फक्त प्रसिद्धीसाठी अरूंधती बाईनी जो महात्मा गांधींचा अपमान केला तो निंदनीय आहे.

 

अरूंधती बाईंना देशद्रोही वक्तव्य देण्याची जणूकाही सवयच आहे. एवढे काय कमी होते, आता राष्ट्रपित्याचा अपमान करुन प्रसिद्धी माध्यमात राहण्याचा प्रयत्न चालू आहे. दूस-यांना नावे ठेवून स्वतः वर्तमान पत्रातून बातमी बनून राहायचे हे केजरीवाल, अरूंधती बाई ह्यांना सहजच जमते.

 

आपले मत ठेवण्याचा अधीकार सगळ्यांना आहे, पण ह्या थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या आपला देश स्वतंत्र होण्यासाठी दिलेले योगदान विसरून चालणार नाही. बूकर पारितोषिक मिळाले म्हणून कोणालाही काहीही म्हणायचे स्वातंत्र्य मिळाले असे वाटायला नको.