Wednesday, March 9, 2016

प्रसिद्धीसाठी राष्ट्रद्रोह


 
फेब्रुवारीच्या ९ तारखेला अब्दुल्लाने जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम अफझल गुरुला फाशी दिल्याच्या निषेधार्थ आयोजित केला होता व अशा तर्‍हेचे पोस्टर्स जेएनयूमध्ये सगळीकडे चिकटवली गेली होती. गेली तीन वर्षे अफजल गूरच्या फाशी दिनी असे कार्यक्रम होत होते अशा बातम्या आहेत. कार्यक्रमाची तयारी जोरात होती. ह्या समारंभाला कन्हैय्या व त्याच्या माववादी (डिएसयू) संघटनेचा पाठिंबा होता. ह्या कार्यक्रमाच्या रूपाने अर्थातच न्यायालयाची अवमानना केली गेली कारण फाशी न्यायालयाने ठोठावली. ह्या कार्यक्रमाच्या वेळेस कन्हैय्याने राष्ट्राविरुद्ध घोषणा केल्या की नाहीत ह्यावर काहूर माजवले गेले आहे. एका क्षणासाठी असे समजू की कन्हैय्याने घोषणा केल्याही नसतील व जमलेल्या गर्दीतून कोणी तरी घोषणा केल्या असतील पण त्याने कन्हैय्याचा देशद्रोह कमी होत नाही. अफझल गुरुच्या स्मरणार्थ आयोजलेल्या कार्यक्रमाला त्याचा पाठिंबा असणे एवढेच देश द्रोहाचे कलम लावण्यासाठी पुरेसे आहे. त्याचा त्या कार्यक्रमात नुसता सहभाग हे ठरवतो की त्याने राष्ट्रद्रोही कार्यात हिस्सा घेतला होता व त्याचा देशद्रोह्यांना पाठिंबा होता.

हे झाल्यावर कन्हैय्याला देशद्रोहासाठी अटक होते, दुस-या दिवशी काँग्रेसी व वामपंथी जेएनयू मध्ये जमतात व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कन्हैय्याला पाठिंबा जाहीर करतात.

न्यायालया कडून जामीन मिळवून, तुरुंगातून बाहेर आल्यावर जेएनयू मध्ये कन्हैय्या दमदार भाषण ठोकतो.  अशी बातमी आहे की बरखा दत्त त्याच्या भाषणा पूर्वी त्याला भेटली व भाषणात कोणता विषय बोलायचा हे ठरवले गेले. न्यायालयाच्या दणक्याने घाबरून जाऊन स्वतःला वाचवण्यासाठी कन्हैय्या भाषण देतो व जाहीर करतो की तो देशभक्त आहे व फक्त मोदी व  संघविरोधी त्याला मोहीम बांधायची आहे. कन्हैय्याचा अफझल गुरुला पाठिंबा असणे म्हणजे मोदी व संघा विरुद्ध मोर्चा हे गणितच चुकीचे व नपटणारे आहे. तसेच अफझल गुरुला पाठिंबा देणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतीक आहे असे पण कोणी म्हणू शकणार नाही. त्यामुळे आमचे असे मानणे आहे की देशद्रोहाच्या आधीच्या केलेल्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी कन्हैय्याने मोदी व संघाविरुद्ध वक्तव्य दिली.

बातम्या देणा-या काही वाहिन्यांनी कन्हैय्याच्या भाषणाचे कौतुक केले आहे. राजकारण्यांसाठी तो एका रात्रीत एक हीरो म्हणून शाबीत झाला आहे. बातम्या देणा-या वाहिन्या, त्याने काय केले व काय बोलतो ह्याकडे दुर्लक्षून त्याचे भाषण लोकांना ऐकवून, टीआरपी वाढवण्यात गुंग आहेत. वामपंथी व काँग्रेसला  ह्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. केरळ व प बंगाल वामपंथी लोकांचे गढ आहेत व काँग्रेस जिवंत राहण्याच्या प्रयत्नात आहे. साहजिकच वामपंथी व काँग्रेस ने कन्हैय्याचा उपयोग येणा-या निवडणुकांमध्ये करून घ्यायचा प्रयत्न सरू केला आहे.

जाणून घ्यायची गोष्ट ही की ३१ वर्षाच्या कन्हैय्याची विद्यार्थीदशा अजून संपली नाही. तो जेएनयू मध्ये कसल्याशा विषयावर गेली अनेक वर्षे पीएचडी करत आहे. ८००० विद्यार्थ्यांच्या मताने जेऐनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्षांनी, सव्वाकोटी लोकांनी निवडून दिलेल्या मोदींवर शिवीगाळ करून देशद्रोहातून राष्ट्रनेता बनण्याची क्लूप्ती शोधून काढली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली हे सगळे आपल्याच देशात घडू शकते. बातम्या देणा-या वाहिन्यांना टीआरपी कसे वाढेल ह्याचीच काळजी लागली आहे. खरेखोटे व देशाला लाभकारक काय व हानिकारक काय ह्याचे भान ते विसरले आहेत. काँग्रेस व वामपंथ्यांना निवडणूकीच्या काळात लोकांना आकृष्ट करण्यासाठी तयार विषय व माणूस मिळाला आहे त्यामुळे ते पक्ष त्याचा भरपूर उपयोग करून घेत आहेत. ह्या सगळ्या  गडबड गोंधळात कन्हैय्याला जर वाटत असेल की दिलेल्या दमदार भाषणाने व वाहिन्यांनी केलेल्या भरपूर कौतुकाने त्याने केलेले राष्ट्रद्रोह न्यायालय किंवा लोकं विसरतील तर त्याचा तो गैरसमज आहे.

आम्ही त्याने केलेला राष्ट्रद्रोह कधीही विसरणार नाही. राहुल गांधीने अशा लोकांना समर्थन दिले हे आम्ही कधी विसरणार नाही. आम्ही कधी विसरणार नाही की केवळ राष्ट्रद्रोहाचे पाप पुसण्यासाठी मोदी विरुद्ध व संघा विरुद्ध कन्हैय्याने मोहीम उघडली आहे की जेणे करून लोकांना काय खरे व काय खोटे ह्याचा पत्ता लागू नये. आम्ही विसरणार नाही, निवडणुकांसाठी काँग्रेस व वामपंथी कन्हैय्याचा उपयोग करत आहेत. इंग्रजी बातम्या देणा-या वाहिन्या टीआरपी वाढवण्यासाठी त्याचे कौतुक करत आहेत हे ही आमच्याकडून विसरले जाणार नाही.

थोडक्यात - झालेल्या अवमाननेची दखल घेऊन न्यायालयानेच कन्हैय्याला व रशिदला शिक्षा ठोठावायला पाहिजे. देशाविरुद्ध काम करणा-यांना जे पाठिंबा देतात ते सगळे राष्ट्रद्रोही. ह्या मध्ये कसलाही गोंधळ नाही. कन्हैय्याचे भाषण रंगतदार होते का नाही. कन्हैय्या होता का अब्दुल. हे सगळे प्रश्न गौण आहेत. कोर्टाच्या चपराकींनी किंवा लोकांच्या रोषामुळे, बदललेल्या व्यक्तव्यांनी आमच्या मनात उत्पन्न झालेल्या शंका दूर होणार नाहीत. कन्हैय्या, ह्या घोळात पडण्यापेक्षा तू आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कलेस तर बरे होईल. तू एक साधारण बुद्धीचा विद्यार्थी आहेस हे इतकी वर्षे तुझ्या कुवती वरून समजून येते त्यामुळे आम्हाला संबोधन करण्या पेक्षा तुझ्याकडून विद्यार्थ्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पुरे कर. तुझ्या वयाची मुले दहा वर्षा आधीपासून कमावायला लागतात. तू करदात्यांचे पैसे खाऊन, आपल्याच देशाविरुद्ध वागतोस आणि ह्याची तुला थोडी सुद्धा शरम नाही त्याची देशाला चीड आहे.

No comments:

Post a Comment