Tuesday, May 17, 2016

राजाराम सीताराम एक ..................भाग १७.............. मुंबईचा मित्र


 

ह्या आधीचे............आस्थेचे बंध

 

........आम्ही खोटेखोटे चेहऱ्यावर हसू आणायचा प्रयत्न केला. पण घरी जाऊ देणे त्या ऐवजी बिअर पाजणे हे माझ्या कोठल्याच कोष्टकात बसत नव्हते. सुनील खेर बाकीच्या शिक्षा भोगणाऱ्या जिसीजना बरे वाटले आता त्यांच्या बरोबर पहिल्या सत्राचे कोणीच सुट्टीत घरी जाणार नव्हते.

 

 

मुंबईचा मित्र

 

आम्ही पहिल्या सत्राचे उरलेले दिवस रेटायला लागलो. खूप कठीण जात होते. मी मनाने कधीच घरी पोहोचलो होतो. त्यामुळे जीव रमत नव्हता, इतके दिवस घरी जायची वाट बघितली घरीच जायला मिळाले नाही त्याचे दुःख जास्ती. पहिल्यांदाच माहीत असते तर मनाची तयारी  केली असती. मनाला समजावणे आता खूप कठिण झाले होते. पण नाईलाज होता. कधी कधी पर्याय असणे हा शाप ठरतो नाईलाज हा फार मोठा वर ठरतो. पर्याय असण्याने चुकीची निवड होऊ शकते आपण निवड केली त्या पेक्षा दुसरी निवड सरस ठरली तर? असे मनात नेहमी येत राहते. त्या पेक्षा जर नाईलाज असेल तर निवड करायची जरूर नसते जे आहे तेच भोगू त्यातच आनंद मानू असे मनोबल तयार होते. तेवढ्यात मला आशिष कार्लेकरचे पत्र आले. आशिष कार्लेकर माझा रुईया कॉलेज मधला मित्र. आर्मीच्या सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड जे एसएसबी म्हणून प्रसिद्ध आहे त्यासाठी आम्ही दोघे एकत्र भोपाळला गेलो होतो. आमच्या बॅच मध्ये चाळीस पोरं आली होती. हे सिलेक्शन आर्मी, नेव्ही, एअरफोर्सला जाऊ इच्छुकांना देणे जरूरीचे असते. निवड प्रक्रिया चार दिवसाची असते. पाहिल्या दिवशी सायकॉलॉजीकल परीक्षा असतात. छान असतात. त्यात वेगवेगळी चित्र पटापट पडद्यावर प्रदर्शित करतात. प्रत्येक चित्र जेव्हा प्रदर्शित होते तेव्हा दहा सेकंदात त्या चित्राला पाहून मनात काय आले ते कागदावर लिहायचे असते. एका मागून एक खूप चित्र दाखवतात. विचार करायला वेळ राहत नाही आपल्या मनाची स्थिती जशी असेल त्या प्रमाणे आपण चित्रा संबंधी लिहायला लागतो. आपल्या मनात काय चालले आहे ते तज्ञ बरोबर ओळखतात. त्या नंतर काही सिचुएशन्स रेखाटलेले असतात अर्धी गोष्ट आपल्याला पुरी करायची असते. ह्या अशा विविध परीक्षांमधून आलेल्या पोरांची मानसिकतेचा अभ्यास करतात. त्यांना विशिष्ट प्रकारची मानसिकता हवी असते. काहींची आत्महत्येची सुप्त प्रवृत्ती असते. काही निराशावादी असतात. काहींच्याकडे आपलेपणा नसतो. आलेल्या मुलांमध्ये साहस, एकदूसऱ्याला घेऊन पुढे जायची मानसिकता, नेतृत्व गूण, ध्येयसिद्धीचा अट्टहास अशा सारखे गूण शोधण्याचा प्रयत्न होतो. दुसऱ्या दिवशी ग्रुप डिस्कशन ग्रुप टास्क्स असतात. ग्रुप टास्क्स मध्ये अगदी सोपे सोपे टास्क देतात. वेळ दहा मिनिटे दिलेली असतात. ग्रुप टास्क ऑफिसर मग लांब राहून फक्त त्या ग्रुपला न्याहाळतो. तो ग्रुप तो टास्क दहा मिनिटात कसा सोडवतो, त्या ग्रुप मध्ये नैसर्गिकरीत्या कोण नेता म्हणून उभरतो. ग्रुपमधल्या मुलांचे टीम स्पिरिट कसे आहे, एकमेकांशी कसे नाते बनते हजार गोष्टी. तिसऱ्या दिवशी पॅनल इंटरव्युव असतो. चवथ्या दिवशी निकाल जाहीर करतात. आमच्या त्या चाळीसच्या बॅचचा निकाल देण्याआधी सिलेक्शन बोर्डाच्या प्रेसिडेंट ने छोटेसे भाषण दिले होते. म्हणतो आर्मीसाठी अधिकाऱ्यांचे सिलेक्शन एका विशिष्ट प्रकारे केले जाते. आम्हाला एक विशिष्ट प्रकारची मानसिकता असलेले होतकरू पाहिजे असतात त्यावर आधारीत आमची निवड प्रक्रिया असते. त्यामुळे ह्या प्रक्रियेत ज्यांचे सिलेक्शन होत नाही त्यांनी त्यांच्यात काही कमी आहे असे वाटून घेऊ नाही. ह्या एसएसबी सिलेक्शनला अमिताभ बच्चन पण आला होता तो सिलेक्ट होऊ शकला नव्हता. आज बघा तो कोठे आहे. आम्हाला येथे जसे बुद्धू मुले नको तसे खूप बुद्धिमान मुले पण नको असतात. आम्ही लिडरशीप क्वालिटी, टीम मध्ये बसणारा, शरीर मनाने कठोर असलेली ऍव्हरेज इंटलीजन्सची मुले शोधत असतो. त्यामुळे ज्यांची निवड होत नाही त्यांनी वाईट वाटून घेऊ नये ज्यांची निवड होते त्यांनी असे वाटून घेऊ नये की ते कोणी आईन्स्टाईन आहेत. असे म्हणत त्याने निकाल जाहीर केला. आमच्या चाळीस जणांच्या ग्रुप मधून आठ जणांची निवड झाली होती. काही काही चाळीस चाळीस मुलांचे ग्रुप्स निवड होताच परत पाठवले जातात. पास झालेल्या आठात मी होतो, आशिष कार्लेकर बाकीच्या बत्तीस मधला एक होता. पुढे मी आयएमएत जेव्हा रगडा खात होतो तेव्हा आशिष बंगळूरच्या आय आय एम मध्ये मॅनेजमेंट शिकत होता.

 

पहिल्या सत्राच्या शेवटच्या आठवड्यात तो मला भेटायला येणार असे पत्र आले. त्याला माझ्या बरोबर दोन दिवस राहायचे होते. पण आयएमएत असे काही करता येण्या सारखे नव्हते म्हणून तो डेहराडूनला हॉटेलात उतरला. रविवार होता, मला भेटायला सकाळीच आला. मला जेवढे जमले तेवढे त्याला आयएमएचे दर्शन करून आणले. माझी प्लटून दाखवली. प्लटून मागे खूप मोठी लिचीच्या झाडांची बाग होती. लिची हे फळ आयएमएत येण्या आधी कधी खाल्ले नव्हते. पण लांबच लांब पसरलेल्या लिचीच्या बागांतून लिची तोडून खायला केव्हा आम्ही लागलो ते समजलेच नाही. ती लिचीची बाग आमच्या प्लटूनच्या जिसीज साठी विशेष होती. त्या लिचीच्या बागेच्या एका कोपऱ्यात एक चोर वाट होती जी जंगलातून डेहराडून गावाजवळ असणाऱ्या घंटाघराजवळ उघडायची. चोरावाटेने मध्येच राजापूर रस्त्या पर्यंत सरळ पोहचता यायचे. त्यामुळे त्या चोरवाटीचे आम्हाला आकर्षण होते. मी कधी गेलो नव्हतो पण कधीकधी कोणी गेले होते असे ऐकिवात होते. रविवारच्या लिबर्टीची वेळ संध्याकाळी आठला संपायची. एखाद दुसऱ्या जिसीला उशीर झाला तर तो ह्या चोरावाटेने लपतछपत आल्याच्या गोष्टी आम्ही प्लटूनकर ऐकायचो. पण ह्या वाटेने अडचण अशी होती की ह्या वाटेने सायकलने नाही येता यायचे. कारण त्यात छोटी टेकडी चढून यावे लागायचे घनदाट झाडी असायची. ह्या झाडीला आम्ही १४ प्लटून जंगल म्हणायचो. त्यामुळे एखाद दुसरा उशीर झालेला प्लटून चवदाचा जिसी अशा गुप्त वाटेने आल्यामुळे शिक्षेतून सुटायचा. आयएमचे रेजिमेंटल पोलीस क्वचितच त्या रस्त्याला असायचे. आमच्या प्लटूनचा हा गुप्तमार्ग वारसाहक्क होता. लिचीची बाग आम्हा चवदा प्लटूनकरांना ह्याच कारणास्तव  फार जवळची होती. बाग दाखवून झाल्यावर, त्याला मी चेटवोडची बिल्डिंग परेड ग्राउंड दाखवले. बिल्डिंग बघून तो भारावून गेला. आम्ही भेटलो तेव्हा जाणवले, त्याला आयएमएत येता आले नाही त्याची खंत उराशी अजून बाळगून होता.  खरे तर तो आय आय एम मध्ये शिकत होता. लवकरच कोर्स संपल्यावर कोठल्या तरी कंपनीत लठ्ठ पगारावर लागणार होता हे निर्विवाद होते. पण कोणाचा जिव कशात असतो त्यातच तो घुटमळतो. हल्ली तो गेली बरीच वर्षे अमेरिकेत कोठेतरी कंसलटंट म्हणून आहे. बक्कळ मिळवले आहे, पण मधून मधून आर्मी मध्ये नसण्याची आठवण येते त्याचे जड झालेले मन दिसून येते.

 

हमदोनो, संगम, सात हिंदोस्तानी, हिमालय की गोद मे, संगम, विजेता, रंग दे बसंती, बॉर्डर असल्या चित्रपटाने जे ग्लॅमर लष्कर अधिकऱ्याला चिकटवलेले आहे त्याने बरीच लोक मोहित होतात. चित्रपटातून सेनाधीकाऱ्याचे जे जीवन रेखाटलेले असते ते पाहून बऱ्याच जणांना ही जीवन पद्धती फार लुभावणारी वाटते. बऱ्याच जणांना आर्मीचा गणवेश भयंकर आवडतो. त्या ओजी गणवेषावर जाड पट्टा इतका उठावदार दिसतो. लोकांना फार आवडतो. ह्या दिसणाऱ्या ग्लॅमरला दिसणाऱ्या पण समजून घ्यायच्या त्याग बलिदानाच्या झालरीने सैनिकांची नोकरी आकर्षक वाटते. ती फील्ड मधली पोस्टिंग, नावा पुढे लागणारी पदाची बिरुदावली, युद्ध होते तेव्हा थोड्या वेळे पुरते जवानाला मिळणारा संपूर्ण देशाचा पाठिंबा प्रसिद्धी, ह्या सगळ्या गोष्टी ग्लॅमर वाढवतात काहींना सेनेकडे आकृष्ट करतात. आशिष कार्लेकर सारख्याना सैन्यात जायचे राहून गेले ह्याचे जन्मभर वाईट वाटत राहते. 

 

रविवारचा पूर्णं दिवस त्याच्या बरोबर काढायचा असे ठरवून, उशीर झाला गरज पडलीतर लिचीच्या बागेतल्या गुप्त मार्गाने यायला सोपे जावे म्हणून बरोबर एक सिव्हिल ड्रेस घेतला. खरे तर मी कधी असले प्रकार केले नव्हते पण त्या दिवशी कसे सुचले फार विचार करता कसा काय नियम तोडण्याचा निर्णय घेतला कळलेच नाही. कधी कधी काही निर्णय क्षणात घेतले जातात. नेहमी नियमांचे पालन करणारे क्वचित जर वाटे वरून घसरले तर लागलीच तोंडघशी पडतात. घंटाघर, क्लेमेन्ट टाऊन, राजापूर रस्ता असे गावात त्याच्या बरोबर पायी हिंडल्यावर, कुमार स्विट्स मधून पाणीपुरी खाल्ली. संध्याकाळचे सहा वाजत आले होते. माधुरी दीक्षितांचा तेजाब पिक्चर रिलीज झाला होता. आम्ही तो बघितला. पिक्चर संपायला रात्रीचे नऊ वाजले होते. आता त्या गुप्त वाटे खेरीज गत्यंतर नव्हते. मी त्याच्या हॉटेलच्या रूमवर जाऊन मुफ्ती ड्रेसच्या ऐवजी सिव्हिल ड्रेस चढवला, त्याचा निरोप घेतला भरल्या मनाने परतीच्या मार्गाला लागलो. राजपूररस्त्याच्या गुप्त मार्गाच्या वळणावर क्षणभर सगळीकडे नजर टाकली, रेजीमेटल पोलीस नाही असे बघून पटकन चवदा प्लटूनच्या जंगलात पसार झालो. भयंकर घाबरलो होतो, जंगलाला नाही, तर आपल्याला असे पकडू नये कोणी म्हणून. मार्ग काही छोटा नव्हता, साधारण तीन किलोमीटरचा जंगलातून जाणारा मार्ग. दूरवर जसे मॅकटीला कंपनीचे दिवे दिसायला लागले तसा जिवात जीव आला. आता लिचीची बाग जवळच. हळूच तारेचे कुंपण ओलांडून मांजराच्या पावलाने मी लिचीच्या बागेत पाऊल टाकले, मागून कोणीतरी ओरडले. "ये जिसी सावधान". मला समजले. रेजीमेंटल पोलीस अर्थात आर-पी ने पकडले. आपण कधी कधीच असले करायला जातो, नेमके पकडले जातो, बाकीचे आरामात सगळे नियम धाब्यावर बसवून सर्रास जगतात त्यांना काहीच कसे होत नाही ह्याचे कोडे मला आज पर्यंत सुटले नाही. कधीतरीच सिग्नल तोडला जातो पोलीस पकडतो. मध्यम वर्गाचे हे लक्षणच आहे असे दिसते. खूप श्रीमंत नियम धाब्यावर बसवतात, खूप गरीब लोकांना नियमांचा उपयोग नसतो. रेजीमेंटल पोलीस ने पकडल्यावर व्हायचे तेच झाले, दुसऱ्या दिवशी पासून मी पाच दिवसाच्या रेस्ट्रिकश्नस् वर रुजू झालो. हा सगळा गोंधळ माधुरी दीक्षित मुळे झाला असे अजून सुद्धा मी समजतो. म्हणजे माधुरी दीक्षित नेमका मी आयएमएत असतानाच तिचा पहिला हिट पिक्चर देते, तो नेमका त्याच आठवड्यात डेहराडूनच्या थेटरात लागतो नेमका मी उशीराचा शो बघून, माधुरीच्या माधुर्याने चढलेल्या नशेला रेजिमेंटल पोलिस ने पकडून नशा उतरवावी. चांगल्या गेलेल्या दिवसावर पाणी फेरले गेले. फजितीच झाली. तसे पाहिले तर माधुरीने मी एकदमच आमचे करिअर सुरू केले होते. तिने ज्या वर्षी तेजाब पिक्चर दिला, त्याच वर्षी मी आयएमएत दाखल झालो. आता ती अमेरिकेत असते मी कर्नल आहे पण कधी भेट झालीच तर मला मिळालेल्या रेस्ट्रिकश्नस बद्दल तिच्याकडे तक्रार करणार आहे. माझ्या शिक्षेचे पाप तिच्या माथ्यावर फोडणार आहे.

 

आज त्या गोष्टीला २५ वर्षे झाली. जेव्हा आयएमएत होतो तेव्हा एव्हढा एकच पिक्चर आय एम बाहेर जाऊन चोरून बघितला. त्या वेळचे ते एक दो तीन .. .. ..हे गाणे आवडले होते. माधुरीला बघताना हृदयाचा ठोका चुकला होता. त्या वेळचे आयएमए, तिचे गाणे, तो मित्र हे सगळे इतके मनात खोलवर रुतले आहे की अजूनही कोठे ते गाणे लागले तरी डोळ्यात चमक येते हृदयाचा ठोका चुकतो.

 

माझी बायको नेहमी म्हणते माधुरीचे नाव कानावर पडले की ह्याचे डोळे चमकतात. आपल्या आयुष्यात कोणी असे येऊन जाते की त्यांचे नाव उच्चारले गेले की डोळ्यात चमक येते. कधी ती माणसे कोठच्या तरी प्रसंगाने लक्षात राहतात, कधी त्यांच्यामुळे आपल्या आयुष्याला चांगली कलाटणी मिळालेली असते, कधी काही प्रसंगामुळे आपण त्यांच्या जवळ जातो किंवा त्या व्यक्तीच्या विचारांच्या जवळ जातो.  कधी कधी भेटलेल्या व्यक्तीचे आपले मनाचे धागे जोडले जातात असे जोडले जातात की आपण बरेच वर्षात जरी भेटलो नाहीतरी, त्या व्यक्तीची आठवण मधून मधून डोकावते. ह्यालाच म्हणतात नाते. नाहीतर ह्या धरतीवर सर्व एकटेच येतात आणि एकटेच जातात. पण काही माणसे आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडून जातात. काही जण आपल्या आयुष्यात एका घटने पुरती येतात असे काम करून जातात की आपण जन्मभर त्यांना विसरू शकत नाही. आपले आयुष्य जगताना आपल्यालाही असे कोणाच्या आयुष्यात येण्याचा योग असतो. आपल्याला भेटलेल्या चांगल्या व्यक्तींना आपण कधी देव माणूस म्हणतो, मित्र म्हणतो, सखा म्हणतो, हितचिंतक म्हणतो किंवा अजून काही. नात्याला काहीही नाव द्या. डोळ्यात चमक आणणाऱ्या अशा व्यक्ती सारखे आपणही एखाद्याच्या आयुष्यात त्यांना आवडणारा त्यांचा लुकलूकणारा तारा बनू शकू का? नकळत बनतही असू. 

 

असे तसे करत दोन जिसींना वगळून आमचा संपूर्ण कोर्स पहिल्या सत्रात पास झाला आम्ही दुसऱ्या सत्रात दाखल झालो. सुट्टी मात्र मिळाली नाही. घरी जाता आले नाही. आमच्या बरोबरचा एक जिसी रघुनाथ, मंकी रोप करताना पडून हात तुटल्यामुळे परीक्षा देऊ शकला नाही रेलिगेट झाला. हरबींदर वेळेत पोहणे शिकला नाही पोहण्याच्या परीक्षेत नापास झाला. तोही रेलिगेट झाला. त्यांना हेच सत्र पुनः करावे लागणार होते.  नवे सत्र जोमात सुरू झाले. आम्ही सीनिअर झालो. आमच्या डोक्यावर कोणी सीनियर जिसी नव्हते, त्यामुळे बराच रगडा कमी झाला. नवीन बकरे यायला एक आठवडा होता, आम्हाला कॅप्टन गिलने सीनियर्स च्या अपॉइंटमेंट्स दिल्या. परितोष शहा जेयुओ झाला, मी कॉर्पोरल, अमित बटालियन अंडर ऑफिसर, करिअप्पा बटालियन चा शोभित राय ऍकॅडमी अंडर ऑफिसर झाला होता. सुब्बूला कोणतीही अपॉइंटमेंट मिळाली नव्हती. अपॉइंटमेंट म्हणजे जास्त काम. अशा प्रत्येक प्लटून मधून ओएलक्यू परीक्षेतल्या मेरिट वर आधारीत एक दोन अपॉइंटमेंट धारकांना त्याच प्लटून मध्ये ठेवले जाते. ज्युनीयरर्स आले की आम्हाला जसे सिनियर्सने, मारून मुटकून आयएमएत राहण्या जोगे बनवले तेच काम आता ह्या अपॉइंटमेंट धारकांना करावे लागणार होते. काम खूप पण रॅगिंग घेण्याची मजा. ज्यांना अपॉइंटमेंट मिळाली नाही असे बाकीचे जिसी, वेगवेगळ्या बटालियन्स प्लटून्स मध्ये वाटले गेले. आम्ही जेव्हा दुसऱ्या सत्रात दाखल होत होतो, त्याच सुमारास आमचे सीनियर्स पासिंग आऊट परेड होऊन सैन्यातील आधीकारी म्हणून वेगवेगळ्या आर्मी युनिट्स मध्ये रवाना झाले. त्यांनी मोकळ्या केलेल्या खोल्या आता आम्ही घेतल्या.

 

(क्रमशः)

 

 

Friday, April 1, 2016

राजाराम सीताराम एक..............आस्थेचे बंध...भाग १६


आस्थेचे बंध

 

लहान असताना झालेल्या परिस्थितीच्या व समाजाच्या संगामुळे मिळालेल्या संस्कारातून व मोठेपणी केलेल्या अभ्यासाने व अनुभवाने आपल्या आस्था दृढ होत जातात.  आपल्या आईवडीलांबद्दल, देशासाठी लढलेल्या व प्राणत्यागलेल्या व्यक्तींबद्दल, राष्ट्र, धर्म, आपल्या परिवाराशी निगडित वस्तूंबद्दल, चिह्नांबद्दल आस्था निर्माण होतात. म्हणूनच मग काहींच्या आपल्या पूर्वीच्या ग्रंथांवर, हिंदूंच्या ॐ ह्या अक्षरावर, क्रिश्चनांच्या क्रॉसवर, सिखांच्या गुरुग्रंथसाहिब ग्रंथावर, मुसलमानांच्या चांदसिताऱ्यावर आस्था वसतात. कोणाला त्यांच्या परिवाराच्या चिजांवर आस्था असते, ही आस्था अगदी आजीच्या भिंग तुटलेल्या चश्म्या सारखी दुसऱ्याला क्षुल्लक वाटणारी सुद्धा असू शकते, कोणाला त्यांच्या शिक्षकांवर, कोणाला फिजिक्सच्या पुस्तकांवर कोणाला बायबलवर कोणाला गीतेवर तर कोणाला इतर धर्मग्रंथांवर. अशा वेगवेगळ्या आस्था जडलेल्या असतात. प्रत्येकांच्या वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या आस्था काही ठिकाणी मात्र जुळून येतात व परमोच्च असतात. अशा परमोच्च आस्थांखातर वैयक्तिक आस्थांना तिलांजली द्यायची वेळ आली तरी ती दिली जाते. त्या म्हणजे राष्ट्र, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय संपदा व राष्ट्रगौरव चिन्हे. व्यक्तीच्या आवडीनिवडी निर्माण होण्यात आस्थेचा सहभाग मोठा असतो.

 

 

कालांतराने काही आस्था समाजमान्य होतात. वडिलधाऱ्या माणसांचा आदर करणे, देव, धर्म व देश ह्याच्याशी निगडित चिन्हांचा आदर करणे ह्या त्यातल्या काही आस्थांचा उल्लेख करता येईल. आस्थेचे बंध आपल्या आयुष्यात संयम राखण्यात मदत करतात. संसाराच्या भट्टीत व रोजच्या कामा मुळे, आपण आस्थांमध्ये गुंतून राहत नाही, पण हृदयाच्या एका कोपऱ्यात आस्थांना योग्य ती जागा दिली गेलेली असते व अशा जतन केलेल्या आस्थांना दुखापत होताना आपल्याला पाहवत नाही, वाईट वाटते. आस्था जपण्यासाठी व्यक्ती फार काही करत नाही पण त्याच्या मनाचा एक कोपरा त्या आस्थांमध्ये अडकलेला असतो. जर आपल्या आस्थांना धक्का लागला तर झालेली दुखापत न भरून निघणारी असते, एका प्रकारे त्या आस्थांशी निगडित तेवढे मन मारून जाते. वाईट वाटते.

 

आस्थेच्या बंधातून निर्माण झालेला संयम, आलेल्या रागावर मनाचा काबू राखायला मदत करतो. कधी कधी घरी, नोकरीमध्ये वा बाहेर आपल्यावर असे प्रसंग येतात की, आपण अगदी जेरीला येतो. असे वाटते की सगळ्यांविरुद्ध  बंड करून उठावे. आपल्या भावना आपल्या हातात राहत नाहीत. अशा वेळेला आपण वाटेलते रागाच्या भरात करायला निघतो. पण नेमके अशाच वेळी आपल्या नकळत आपले आस्थेचे बंध आड येतात व आपण त्या धुमसत्या परिस्थितीत सुद्धा आपण आपल्या आस्थांशी प्रतारणा करत नाही. आपल्या भावनांचा कितीही उद्वेग झाला तरी ह्या आस्था ढाली सारख्या आपल्या समोर उभ्या ठाकतात व त्यांना सांभाळता सांभाळता आपण आपल्या भावनांवर सहजच नकळत संयम मिळवतो. एवढेच नव्हे कधीकधी अशा आस्था आपले चित्त अपवित्र होऊ न देण्याचे काम करतात, त्यांना आपण चक्क कॉनसायनस् किपर असे म्हणू शकू. ह्यालाच आस्थेचे बंध म्हणतात. ह्या आस्थेच्या बंधांपायी आततायीपणा कमी होतो. सारासार विचार करायला वेळ मिळतो. आपल्या मनाचा संयम कायम राहतो.   

 

ज्या कोणी हिंदोस्तान मुर्दाबाद अशी घोषणा केली त्याचा संयम त्या घटकेला तुटला होता. आस्थेचे बंध तुटले होते.

 

समोर कॅप्टन गिल उभा होता. म्हणाला,

 

"आय थिंक युअर फंडामेंटल्स आर ऑल स्क्युड. आय एम सॉरी, एट धिस फॅग एन्ड ऑफ युअर फर्स्ट टर्म, आय निड टू टीच यु फंडामेंटल्स्. स्टील टाइम इज देअर फॉर युअर टर्मएन्ड. जंटलमन युअर आफटरनून टाईमटेबल इज ससपेंडेड. यु विल फॉल इन फ्रंट ऑफ चेटवोड बिल्डिंग एट थ्री पिएम शार्प. यु विल बी  इन युनिफॉर्म. ऍकॅडमी ऍडज्यूटंट वूड ऍड्रेस यु ऑल"

 

एव्हाना आम्ही कष्ट दे मिश्रावरच्या रागा पेक्षा आमच्यातल्या जिसीने ओरडून हिंदोस्तान मुर्दाबाद म्हटले होते त्या बद्दल शर्मिंदा झालो होतो.

 

दुपारी तीन वाजायला काही मिनिटे असताना, आम्ही सगळे फर्स्ट टर्मर्स, जवळ जवळ चारशे जिसीज, आमच्या युनिफॉर्म मध्ये चेटवोडच्या ड्रिलस्क्वेअर वर फॉल इन झालो. आज पटकन रिपोर्टची तयारी झाली. आमचा ऍकॅडमी अंडर ऑफिसर एयुओ                    अभिमन्यू सिंग ने रिपोर्ट घेतला व ऍडज्यूटंटच्या प्रतीक्षेत आम्ही व एयुओ सावधान होऊन उभे राहिलो. बरोबर तीन वाजता, सजलेल्या घोड्यावर बसून ऍकॅडमी ऍडज्यूटंट लेफ्टनंट कर्नल मारूफ रझा आमच्या समोर आला. तसे एयुओ ने आधीच सावधान मध्ये उभे असलेल्या आम्हाला जोरात ----

 

ऍकॅडमी SSSS स्टेडी असा कडक इशारा दिला व आम्ही सावधान मध्ये असताना अजून मुठी आवळून, मणका ओढून ताठ उभे राहिलो.

 

गुड आफटरनून सर. फोर हंड्रेड ऍड थर्टीथ्री जिसीज प्रेझेंट फॉर स्पेशल परेड सर.

 

एयुओचा सॅल्यूट घेऊन मानेनेच बाजूला उभे राहा म्हणून सांगितले. व आम्हाला त्याच्या शांत पण कडक आवाजात म्हणाला.

 

आय नॉट ईंटरेस्टेड इन हू मेड डॅट स्टूपीड स्लोगन. फॉर मी इट केम फ्रॉम फर्स्टटमर्स् डॅट इज इनफ. यु फर्स्ट टर्मर्स, टुडे यु हॅव फेल्ड इन एन इम्पॉर्टंट टेस्ट इन लाईफ. व्हॉटेव्हर द एडव्हरसीटीज एन्ड प्रोव्होकेशन्स, आवर कंट्री कम्स फर्स्ट. आय डोन्ट हॅव टू रिपीट आवर बायबल अगेन एन्ड अगेन. बट इट सिम्स यु हॅव फोरगॉटन द व्हेरी बेसीक्स. आय विल रिमाइंड यु.

 

यु विल इको बँक आफ्टर माय इच सेन्टेन्स्.

 

असे म्हणत त्याने आमच्या कडून फील्ड मार्शल चेटवोडचे वाक्य मोठ्यांदा म्हणवून घेतले.

 

"The safety, honour and welfare of our Nation comes first, always and every time.

 

The honour, welfare and comfort of the family you belong to come next.

 

Your own ease, comfort and safety comes last, always and every time."

 

 यु शुड हॅव डाईड बिफोर इव्हन थिंकिंग टू अब्युज आवर कंट्री.

 

मग त्यांनी फर्मावलेन.

नेक्स्ट फोर डेज, ऑल एक्टीवीटीज फॉर फर्स्ट टर्मर्स वूड बी ससपेंडेड. फॉर नेक्स्ट फोर डेज एन्ड नाइट एव्हरी फोर आवर्स होल ऍकॅडमी फर्स्ट टर्मर्स विल फॉलइन इन बजरी ऑर्डर हिअर इन चेटवोड परेड ग्राउंड एन्ड गिव रिपोर्ट टू मी. टूडेज रिपोर्ट एट थ्री विल बी कनसीडरर्ड एज फर्स्ट. नेक्स्ट विल बी एट सेव्हन इन द ईव्हिनिंग, देअर आफ्टर एट, देन इलेव्हन इन द नाइट, देन थ्रि इन द नाइट एन्ड सो ऑन. नाऊ यु कॅन डिसबर्स.

 

संध्याकाळी आम्ही सर्व चारशे तेहतीस जिसीज बजरी ऑर्डर मध्ये परत माणेकशाँवर जमा झालो. ऍडज्यूटंटने पुन्हा एकदा आमच्या कडून फील्ड मार्शल चेडवोडची ती तीन वाक्य आमच्या कडून म्हणवून घेतलीन व आम्हाला परत पाठवलेन.

 

असे पुढचे चार दिवस दर चार तासाने होत गेले. प्रत्येक वेळेला मारूफ रझा हजर असायचा व प्रत्येक वेळेला आमच्या कडून ती तीन वाक्य मोठ्याने म्हणवून घ्यायचा. प्रत्येक परेडसाठी तयारी करायची व चारशे जिसिज जमून बजरी ऑर्डर मध्ये रिपोर्ट द्यायचा म्हणजे ह्या सगळ्या प्रकारात दोन तास जायचे. चवथ्या दिवशी पर्यंत कमी झोपेमुळे व रोज च्या बजरी ऑर्डरने बेजार झालो होतो. तरी सुद्धा आम्हा प्रत्येकाला वाटत होते आमच्या हातून जे घडले त्याला ह्या पेक्षा मोठी शिक्षा झाली पाहिजे होती. आम्हाला आमचीच लाज वाटत होती. चूक समजली होती. त्या मुळे चार दिवसाची सगळी फॉलईनस् कोठचाही आखून दिल्या प्रमाणे आम्ही करायचो. सगळ्यांमध्ये एक प्रकारचा शिक्षा भोगण्यात उत्साह होता. चवथ्या दिवशी दुपारी तीन वाजता शेवटच्या फॉलीनला त्याने जाहीर केले

 

जिसीज. डॅट्स द स्पिरिट. आय लाईक्ड इट. कंसीडर धिस एज युअर लास्ट फॉलइन  फॉर द मिस्टेक यू कमीटेड. यु कॅन रीझ्यूम युअर नॉर्मल एक्टीवीटीज फ्रॉम नाऊ ऑन.

 

मग म्हणतो.

 

वि विल रिझ्युम आवर आयएमए टाइम टेबल फ्रॉम व्हेअर वि ससपेंडेड इट. वि लॉस्ट फोर डेज, सो इट इज लॉजीकल डॅट इन ऑर्डर टू फिनिश थिस टर्म एन्ड स्टार्ट युअर फायनल टर्म विदाऊट कॉम्प्रमायझींग ऑन ट्रेनिंग, यु मस्ट गिव अप युअर टर्म एन्ड लिव्ह ऑफ फोर डेज.

 

हे ऐकून आमच्या सगळ्यांच्या पोटात गोळा आला. पण करतो काय. आमच्या सगळ्यांची घरी जायच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले व आम्ही जड मनाने आमच्या बराकीकडे परतलो. रूमवर येऊन आईला भले मोठे पत्र लिहिले. फोन करण्याचा प्रश्नच नव्हता. कारण घरी फोनच नव्हता. आलीया भोगासी असावे सादर असे म्हणत दुसऱ्या दिवशीची तयारी सुरू केली. त्या दिवशी संध्याकाळी कॅप्टन गिल आला आमच्या प्लटून मध्ये. म्हणाला गाईज, आय नो यु मस्ट बी कर्सींग मी, बट समथिंग्स् जस्ट डोन्ट गेट एक्सेपटेड इन आयएमए एन्ड युअर बिहेविअर ऑन डॅट फेटफूल डे वॉज ऑबनॉक्शीअस. एनी वे --- मुव्ह ऑन. धिस संडे बिअर इज ऑन मी. गाईज चिअर अप.

 

आम्ही खोटेखोटे चेहऱ्यावर हसू आणायचा प्रयत्न केला. पण घरी न जाऊ देणे व त्या ऐवजी बिअर पाजणे हे माझ्या कोठल्याच कोष्टकात बसत नव्हते. सुनील खेर व बाकीच्या शिक्षा भोगणाऱ्या जिसीजना बरे वाटले आता त्यांच्या बरोबर पहिल्या सत्राचे कोणीच सुट्टीत घरी जाणार नव्हते.

 

 

 

(जेएनयूच्या पार्श्वभूमीवर हा भाग महत्वाचा आहे)

(क्रमशः)

Thursday, March 17, 2016

राजाराम सीताराम ..............भाग १५ ----------- सूट्टीसाठी आतूर


सूट्टीसाठी आतूर

 

भदराज कँप झाल्या नंतर आमच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा पंधरा दिवसात होणार होत्या. त्या आधी फायरिंगची परीक्षा होणार होती. ह्या परीक्षेनंतर आम्हाला चार दिवसाची सत्र संपल्याची सुट्टी मिळणार होती. आम्ही सगळे त्या सुट्टीची वाट बघत होतो. आम्हा प्रत्येकालाच घरी कधी जातो असे झाले होते. ह्या पंधरा दिवसात दोन घटना घडल्या. एक घटना माझ्याशी निगडित होती व एक आम्हा सगळ्यांशी निगडित होती. सोमवार पासून पुढचे चार दिवस आमची फायरिंग होती. खरे तर फायरिंगची परीक्षाच होती. आता एव्हाना आमची फायरिंगची ड्रिल पक्की झाली होती. त्यामुळे स्टॅन्ड फाईव्ह - जेथे फायरिंग होणार होती तेथे गेल्यावर कश्या तुकड्या पाडायचे कसे उस्तादाच्या हुकमांवर फायरिंग करायचे हे सगळ्यांना माहीत होते. स्टॅन्ड फाईव्ह आमच्या बॅरॅक्स् पासून साधारण पाच किलोमीटर दूर होता. सोमवारी सकाळीच आम्ही कोत मध्ये जाऊन आमच्या प्रत्येकाच्या नावावर असलेल्या सर्व्हिस रायफल्स, कार्बाईनस्, पिस्तोल घेतल्या व आठ आठ सायकलीचा स्क्वॉड करून स्टॅन्ड फाईव्हकडे कूच केली.

 

आम्ही फायरिंग रेंजवर सायकली लावल्या. रेंजवर आल्यावर नेहमी प्रमाणे वॉर्म अप् रगडा कष्ट दे मिश्राने लावला व फायरिंग सुरू झाली. खरे म्हणजे हे शेवटचे पंधरा दिवस आम्हाला सगळ्यांनाच जिवावर आले होते. घरी जाण्यास उतावीळ झालो होतो. असे वाटायचे की कसे तरी करून संपत आलेल्या सत्राचे शेवटचे पंधरा दिवस एका दिवसात फटाफट फास्ट फॉरवर्ड करून संपवावेत. सगळेच अधीर झाले होते व हा अधीरपणा आमच्या प्रत्येक हालचालीत दिसायला लागला होता. एकतर सुट्टी मिळणार ह्याचा आनंद व पंधरा दिवसात पहिले सत्र संपवून शेवटच्या सत्रात पदार्पण करून आम्ही सिनियर होणार ह्याची आम्हावर धुंदी यायला लागली होती. पंधरा दिवसाचा कार्यक्रम सगळ्यांनाच माहीत होता. आमच्यात वेगळीच ऊर्जा झळकायला लागली होती. फायरिंग झाल्यावर आमच्या लेखी परीक्षा. ह्या परीक्षांची तयारी अशी नसतेच कारण सततच आमच्याकडून शारीरिक अभ्यास व युद्धशास्त्राचा अभ्यास करवून घेतला जायचा. लागलीच पुढच्या दोन दिवसात परीक्षेचा निकाल व मग चार दिवसाची सुट्टी. आम्ही चक्क घरी जाऊ शकणार होतो. विषयात नापास होणाऱ्या जिसीजना पास होई पर्यंत सुट्टी मिळणार नव्हती, म्हणजे थोडक्यात त्यांच्या चार दिवसाच्या सुट्टीला पास मिळणार होता. ज्या जिसीजची शिक्षा सुरू असेल त्यांना सुट्टीत घरी जाऊ देणार नव्हते. सुनील खेरच्या अठ्ठावीस रेस्ट्रिकशन्स संपल्या नसल्यामुळे साहजिकच त्याला सुट्टी नव्हती. पण त्याला त्याची फिक्र नव्हती. त्याची आई वाचली ह्यातच त्याला समाधान. आयएमएने ह्याच चार दिवसात काही अॅडव्हेनचर सहली आखलेल्या होत्या. आमच्यातले काही हौशी घरी जाण्या ऐवजी ह्या अॅडव्हेनचर सहलींना जाणार होते. ह्यात पॅराग्लायडींग, पॅरासेलींग, बद्रीनाथ केदारनाथच्या पर्वतांवर गिर्यारोहण, गंगेतून रिव्हर राफ्टींग, हॉट एअर बलूनींग अशा अनेक प्रकारच्या सहली आयोजल्या होत्या.

 

आमच्या सारख्यांचा मात्र घरी जायचा पक्का बेत होता. आमच्या कडून कॅप्टन गिलने कोठच्या गाडीचे आरक्षण करायचे हे लिहून घेतले होते. त्या वेळेला रांगेत उभे राहूनच आरक्षण करावे लागायचे व ते आम्हा जिसीज् ना शक्य नव्हते. तो आम्हा सगळ्यांचे रेल्वेचे आरक्षण करणार होता. त्यामुळे ती काळजी मिटली होती. ह्याच कारणासाठी आम्हाला कॅप्टन गिल आवडायचा. तो असल्या गोष्टी सहजच समजून करायचा. अश्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आम्ही त्याचे चाहते झालो होतो. असा सगळा पुढच्या पंधरा दिवसाचा बेत माहीत असल्या मुळे पंधरा दिवसाचा वेळ कमी कसा करायचा तेवढेच राहिले होते.

 

रोज फायरिंग झाल्यावर रायफलचे बॅरल पुलथृने साफ करावे लागायचे. पुलथृ म्हणजे एका दोरीच्या टोकाला मुलायम कपड्याची चिंधी बांधलेली असते. फायरिंग झाल्यावर एका बाजूने बॅरल मध्ये ही चिंधी घालायची व दोरीने दुसऱ्या बाजूने ती ओढायची. म्हणजे बॅरल मध्ये चिकटलेला काडतुसांतून निघालेल्या धूरा बरोबर निघालेले कण व बारूदाचे अवशेष साफ होतात. हे अवशेष असेच राहिले तर बॅरल आतून गंजते व रायफलचे बॅरल लवकर खराब होते. दोरीने चिंधी ओढून बॅरल साफ करतो म्हणून त्या चिंधी व दोरीला पुलथृ म्हणतात. आपल्या रायफलची अशी काळजी घेणे हा प्रत्येक सैनिकाचा धर्म असतो. अधिकारी असो व शिपाई, आपल्या शस्त्राची काळजी आपण स्वतः घ्यायची ही शिकवण आयएमेतच दिली जाते. त्याने आपल्याला आपल्या शस्त्रावर विश्वास बसतो. आपली रायफल किंवा कार्बाईन आपल्याला जास्त कळते व ह्याचा फायदा युद्धात होतो. कोणीतरी दुसऱ्याने रायफलची काळजी घ्यायची व आपण ती वापरायची हे शक्यच नाही.

 

फायरिंगचा शेवटचा दिवस होता. आमचा अधीरपणा हालचालीत, वागण्यात दिसत होता. घरी जायच्या घाईपेक्षा आमच्यातल्या काहींची सीनियर होण्याची धुंदी, व वाढता  वागणुकीतला बेफिक्रपणा जाणवू लागला होता. गुरवारच्या फायरिंग नंतर आमचे क्लासेस माणेकशॉ सभागृहात भरणार होते. त्या दिवशी कोत मधून रायफली घेण्यात आम्हाला उशीर झाला, त्यांमुळे स्टॅन्ड फाईव्ह वर आम्ही कसे बसे वेळेत पोहोचलो. पोहचल्या बरोबर आम्ही सायकली लावल्या. लावल्या कसल्या आमच्यातल्या काहीने जिथे जागा मिळेल तेथे फेकल्या व फॉलईनसाठी पळालो. वेळेत पोहोचलो नसतो तर कष्ट दे मिश्राने लोळवलेच असते. आज शेवटचा दिवस, कष्ट दे मिश्राच्या कचाट्यातून सुटणार. आम्ही फॉलइनमध्ये उभे असताना, रिपोर्ट घेता घेता कष्ट दे मिश्राने आमच्या सायकलींकडे बघून तिरसट चेहऱ्याने म्हणाला

 

"लगता नही हैं, आप सीनियर्स होने जा रहे हैं। सीनियर्स होनेके नाते नये आनेवाले जिसीज को डिसिप्लीन सिखाना होता हैं। मगर हमको ऐसा दिखाई दे रहा हैं की आपका डिसिप्लीन बहुत ढिला पड गया हैं। आप लोगोने आपकी सायकल कैसी फेकी हूई हैं। बहुत बूरा बहुत ढिला डिसिप्लीन।"

 

कष्टदे मिश्राच्या ह्या वाक्याने आम्हाला वाटले, फायरिंग संपली. आता खूप रगडा लागणार. मनात आले. शेवटचा दिवस आहे घेऊ रगडा काय बिघडणार आहे. पण असे काहीच झाले नाही. बहुतेक आज फायरिंगचा शेवटचा दिवस होता व कष्ट दे मिश्राला फायरिंग संपवायचीच होती.  नेहमीच्या रगड्या नंतर आम्ही फायरिंग संपवली. रायफल मध्ये पुलथृ मारली. हे सगळे करता करता पाऊण वाजता आम्ही मोकळे झालो. पुढचा कार्यक्रम होता माणेकशा बटालियनच्या सभागृहात जाण्याचा. ते स्टॅन्ड फाईव्ह पासून पाच किलोमीटर दूर. जाता जाता आधी रायफली कोत मध्ये जमा करायच्या होत्या, फायरिंगचे कपडे बदलून युनिफॉर्म घालायचा, मेस मध्ये जाऊन जेवायचे व दुपारी अडीच वाजता सभागृहात पोहोचायचे होते. आमच्याकडे साधारण पावणे दोन तास होते. नेहमीच्या आराखड्यात हे सहज जमणारे होते. वीस मिनिटे सायकलने कोत पर्यंत, वीस मिनिटे कोत मध्ये रायफल ठेवणे, युनिफॉर्म बदलणे व दुपारच्या जेवणाला अजून अर्धा तास. सहज शक्य होते.

 

आम्ही सायकली घ्यायला जेव्हा सायकल स्टॅन्डवर गेलो तेव्हा आम्हाला धक्काच बसला. झाले काय होते, ज्यांनी सायकली वाटेल तशा फेकल्या होत्या त्यांच्या सायकलच्या दोन्ही चाकातली हवा कष्ट दे मिश्राने काढून टाकली होती. एकूण तेवीस सायकली. म्हणजे एकूण आम्हा तेवीस जिसीजने सायकली वाटेल तशा फेकल्या होत्या. आता पर्यंत आम्हा पहिल्या सत्राच्या जिसीज मध्ये चांगलीच एकी झाली होती. आम्हाला सगळ्यांना वाईट वाटले. आमचा त्या सायकलीतली हवा काढल्याने वेळेचा आराखडा कोलमोडून पडला होता. आता निदान ते तेवीस जिसीज तरी वेळेत सभागृहात पोहचणार नव्हते. परत सभागृहात रिपोर्ट देताना कष्टदे मिश्राने हवाकाढली हे कारण कोणी समजून घेतलेच नसते. आयएमएत उशीर झाला की उशीर उशीर झाला. कारणे नाहीत. अपील नाही. अर्ज नाही. हे माहीत असल्या मुळे आम्हा हतबल जिसीजना काय करावे ते समजेना. आता आम्हाला ते पाच किलोमीटर पायी जावे लागणार होते, त्यानंतर हवा भरून मग पुढचे काम. शक्यच नव्हते वेळेत होणे. कष्ट दे मिश्राचा भयंकर राग आला होता व दुःखही. आम्ही स्वतःला सीनियर समजायला लागलो होतो व त्याच धुंदीत होतो अन त्याच वेळेस कष्ट दे मिश्राने असा झटका दिला होता. कष्ट दे मिश्रा दुरून हे सगळे पाहतं होता. म्हणाला "आप लोग कभी डिसिप्लीन भूलोगे नही अभी इसके बाद। जाओ अभी नहीतर अगले क्लास के लिये लेट हो जाओगे।"

 

लेट हो जाओगे कसले ------- लेट हो गए थे।

 

भयंकर राग व संतापाच्या भरात आमच्यातल्या कोणीतरी, मला वाटते सूब्बूने किंवा अमितने चिडून जोरात "हिंदोस्तान मुर्दाबाद" म्हटले. क्षणभर आमच्या कंपूमध्ये भीषण शांतता पसरली. आवाज खरे तर मागून आला होता, म्हणजे ज्याने हे म्हटले त्याने त्याची सायकल बरोबर लावली होती व तो त्या तेवीस हवा काढलेल्या सायकल मधल्या कंपूतला नव्हता. हे सगळे नाटक दुरून जसे कष्ट दे मिश्रा बघत होता तसेच कॅप्टन गिल पण बघत होता. आम्हाला वाटते त्याने घोषणा ऐकली असावी. कारण आमच्यात पसरलेली शांतता अजून संपली नव्हती तोच कॅप्टन गिल आमच्या समोर येऊन उभा राहिला होता. क्षण भराने आम्हाला पण कसेसेच वाटायला लागले. कोणी म्हटले हे हिंदोस्तान मुर्दाबाद. खूप राग आला, ज्याने म्हटले त्याने काहीही म्हटले असते तरी तेवढे वाईट वाटले नसते. कष्ट दे मिश्रा मुर्दाबाद, आयएमए मुर्दाबाद, माणेकशा बटालियन मुर्दाबाद काहीही चालले असते आम्हाला. एवढे वाईट वाटले नसते. पण हिंदोस्तान मुर्दाबाद. कसेसेच वाटले. त्या जिसीच्या आपल्या देशाबद्दलच्या घोषणेने आता पर्यंत कष्ट दे मिश्रावर आलेल्या रागाची जागा, आपल्या देशावर असलेली आस्था चिरडली गेल्या मुळे दुःखाने घेतली. 
 
(क्रमशः)

Wednesday, March 9, 2016

प्रसिद्धीसाठी राष्ट्रद्रोह


 
फेब्रुवारीच्या ९ तारखेला अब्दुल्लाने जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम अफझल गुरुला फाशी दिल्याच्या निषेधार्थ आयोजित केला होता व अशा तर्‍हेचे पोस्टर्स जेएनयूमध्ये सगळीकडे चिकटवली गेली होती. गेली तीन वर्षे अफजल गूरच्या फाशी दिनी असे कार्यक्रम होत होते अशा बातम्या आहेत. कार्यक्रमाची तयारी जोरात होती. ह्या समारंभाला कन्हैय्या व त्याच्या माववादी (डिएसयू) संघटनेचा पाठिंबा होता. ह्या कार्यक्रमाच्या रूपाने अर्थातच न्यायालयाची अवमानना केली गेली कारण फाशी न्यायालयाने ठोठावली. ह्या कार्यक्रमाच्या वेळेस कन्हैय्याने राष्ट्राविरुद्ध घोषणा केल्या की नाहीत ह्यावर काहूर माजवले गेले आहे. एका क्षणासाठी असे समजू की कन्हैय्याने घोषणा केल्याही नसतील व जमलेल्या गर्दीतून कोणी तरी घोषणा केल्या असतील पण त्याने कन्हैय्याचा देशद्रोह कमी होत नाही. अफझल गुरुच्या स्मरणार्थ आयोजलेल्या कार्यक्रमाला त्याचा पाठिंबा असणे एवढेच देश द्रोहाचे कलम लावण्यासाठी पुरेसे आहे. त्याचा त्या कार्यक्रमात नुसता सहभाग हे ठरवतो की त्याने राष्ट्रद्रोही कार्यात हिस्सा घेतला होता व त्याचा देशद्रोह्यांना पाठिंबा होता.

हे झाल्यावर कन्हैय्याला देशद्रोहासाठी अटक होते, दुस-या दिवशी काँग्रेसी व वामपंथी जेएनयू मध्ये जमतात व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कन्हैय्याला पाठिंबा जाहीर करतात.

न्यायालया कडून जामीन मिळवून, तुरुंगातून बाहेर आल्यावर जेएनयू मध्ये कन्हैय्या दमदार भाषण ठोकतो.  अशी बातमी आहे की बरखा दत्त त्याच्या भाषणा पूर्वी त्याला भेटली व भाषणात कोणता विषय बोलायचा हे ठरवले गेले. न्यायालयाच्या दणक्याने घाबरून जाऊन स्वतःला वाचवण्यासाठी कन्हैय्या भाषण देतो व जाहीर करतो की तो देशभक्त आहे व फक्त मोदी व  संघविरोधी त्याला मोहीम बांधायची आहे. कन्हैय्याचा अफझल गुरुला पाठिंबा असणे म्हणजे मोदी व संघा विरुद्ध मोर्चा हे गणितच चुकीचे व नपटणारे आहे. तसेच अफझल गुरुला पाठिंबा देणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतीक आहे असे पण कोणी म्हणू शकणार नाही. त्यामुळे आमचे असे मानणे आहे की देशद्रोहाच्या आधीच्या केलेल्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी कन्हैय्याने मोदी व संघाविरुद्ध वक्तव्य दिली.

बातम्या देणा-या काही वाहिन्यांनी कन्हैय्याच्या भाषणाचे कौतुक केले आहे. राजकारण्यांसाठी तो एका रात्रीत एक हीरो म्हणून शाबीत झाला आहे. बातम्या देणा-या वाहिन्या, त्याने काय केले व काय बोलतो ह्याकडे दुर्लक्षून त्याचे भाषण लोकांना ऐकवून, टीआरपी वाढवण्यात गुंग आहेत. वामपंथी व काँग्रेसला  ह्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. केरळ व प बंगाल वामपंथी लोकांचे गढ आहेत व काँग्रेस जिवंत राहण्याच्या प्रयत्नात आहे. साहजिकच वामपंथी व काँग्रेस ने कन्हैय्याचा उपयोग येणा-या निवडणुकांमध्ये करून घ्यायचा प्रयत्न सरू केला आहे.

जाणून घ्यायची गोष्ट ही की ३१ वर्षाच्या कन्हैय्याची विद्यार्थीदशा अजून संपली नाही. तो जेएनयू मध्ये कसल्याशा विषयावर गेली अनेक वर्षे पीएचडी करत आहे. ८००० विद्यार्थ्यांच्या मताने जेऐनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्षांनी, सव्वाकोटी लोकांनी निवडून दिलेल्या मोदींवर शिवीगाळ करून देशद्रोहातून राष्ट्रनेता बनण्याची क्लूप्ती शोधून काढली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली हे सगळे आपल्याच देशात घडू शकते. बातम्या देणा-या वाहिन्यांना टीआरपी कसे वाढेल ह्याचीच काळजी लागली आहे. खरेखोटे व देशाला लाभकारक काय व हानिकारक काय ह्याचे भान ते विसरले आहेत. काँग्रेस व वामपंथ्यांना निवडणूकीच्या काळात लोकांना आकृष्ट करण्यासाठी तयार विषय व माणूस मिळाला आहे त्यामुळे ते पक्ष त्याचा भरपूर उपयोग करून घेत आहेत. ह्या सगळ्या  गडबड गोंधळात कन्हैय्याला जर वाटत असेल की दिलेल्या दमदार भाषणाने व वाहिन्यांनी केलेल्या भरपूर कौतुकाने त्याने केलेले राष्ट्रद्रोह न्यायालय किंवा लोकं विसरतील तर त्याचा तो गैरसमज आहे.

आम्ही त्याने केलेला राष्ट्रद्रोह कधीही विसरणार नाही. राहुल गांधीने अशा लोकांना समर्थन दिले हे आम्ही कधी विसरणार नाही. आम्ही कधी विसरणार नाही की केवळ राष्ट्रद्रोहाचे पाप पुसण्यासाठी मोदी विरुद्ध व संघा विरुद्ध कन्हैय्याने मोहीम उघडली आहे की जेणे करून लोकांना काय खरे व काय खोटे ह्याचा पत्ता लागू नये. आम्ही विसरणार नाही, निवडणुकांसाठी काँग्रेस व वामपंथी कन्हैय्याचा उपयोग करत आहेत. इंग्रजी बातम्या देणा-या वाहिन्या टीआरपी वाढवण्यासाठी त्याचे कौतुक करत आहेत हे ही आमच्याकडून विसरले जाणार नाही.

थोडक्यात - झालेल्या अवमाननेची दखल घेऊन न्यायालयानेच कन्हैय्याला व रशिदला शिक्षा ठोठावायला पाहिजे. देशाविरुद्ध काम करणा-यांना जे पाठिंबा देतात ते सगळे राष्ट्रद्रोही. ह्या मध्ये कसलाही गोंधळ नाही. कन्हैय्याचे भाषण रंगतदार होते का नाही. कन्हैय्या होता का अब्दुल. हे सगळे प्रश्न गौण आहेत. कोर्टाच्या चपराकींनी किंवा लोकांच्या रोषामुळे, बदललेल्या व्यक्तव्यांनी आमच्या मनात उत्पन्न झालेल्या शंका दूर होणार नाहीत. कन्हैय्या, ह्या घोळात पडण्यापेक्षा तू आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कलेस तर बरे होईल. तू एक साधारण बुद्धीचा विद्यार्थी आहेस हे इतकी वर्षे तुझ्या कुवती वरून समजून येते त्यामुळे आम्हाला संबोधन करण्या पेक्षा तुझ्याकडून विद्यार्थ्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पुरे कर. तुझ्या वयाची मुले दहा वर्षा आधीपासून कमावायला लागतात. तू करदात्यांचे पैसे खाऊन, आपल्याच देशाविरुद्ध वागतोस आणि ह्याची तुला थोडी सुद्धा शरम नाही त्याची देशाला चीड आहे.

Sunday, February 28, 2016

राहूल गांधींचा बेजबाबदारपणा


भारत विरोधी सांस्कृतिक कार्यक्रमात घोषणा झाल्या. घोषणा भारत विरोधी झाल्या. व्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली राहूल गांधींनी जेएनयू मध्ये जाऊन त्यांचे समर्थन केले.

व्यक्ति स्वातंत्र्य संविधानाने आपल्याला दिलेला प्रसाद आहे. पण स्वातंत्र्याचा वापर जबाबदारीने केला पाहीजे. जॉर्ज बर्नाड शॉ म्हणतात “your freedom ceases to exists where my nose starts” बेजबाबदार पद्धतीने हात हालवताना जर दूस-याच्या गालफडात लागले तर क्षमा मागावीच लागेल. मला हात पाय हलवायचे स्वातंत्र्य आहे म्हणून वाटेल तसे नाही हलवता येणार. तीच गोष्ट जेएनयू मधल्या घटनेची. सांस्कृतिक कार्यक्रम अफझलला फाशी दिली त्या घटनेच्या विरोधात होती. अब्दूलयाने परवानगी मागीतली. कार्यक्रम आयोजित केला. कन्हैया च्या DSU ने समर्थन केले व त्याला मग अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली राहूलने समर्थन केले. मत मिळवण्यासाठी देशहितपण सोडून दिला. कसाबसाठी पण एखादा कार्यक्रम होऊ शकतो ह्या जेएनयू मध्ये.

भ्रष्टाचाराविरूद्ध, महागयी विरूद्ध, गून्हेगारी विरूद्ध आवाज उठवला व त्याला समर्थन देणे एक पण असल्या गोष्टींना समर्थन म्हणजे राहूल गांधींना साध्या साध्या गोष्टी समजत नाहीत त्याचे हे उदाहरण. असा मनूष्य जर कॉंग्रेस पक्षाचा नेता होणार असेल तर देव करो व लवकरात लवकर असा राष्ट्रविरोधी पक्ष मोडकळीस येवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

Sunday, November 22, 2015

नितीशच्या शपथग्रहण समारंभाला केजरीवाल


 
नितीशह्यांच्या शपथग्रहण समारंभाला केजरीवालसाहेबांनी आपली उपस्थिती लावली. सगळ्यांच्या लक्षात राहिली. ह्या आधी निवडणूकातून त्यांनी ट्वीट करून नितीशला जिंकवा व भाजपाला हरवा अशा आशयाचा मजकूर जनतेपूढे मांडला होता.

आता हजेरी लावून आणि लालू व कॉंग्रेस बरोबर फोटो काढून घेऊन आपल्या पक्षाची भ्रष्टाचाराच्या विरूद्ध उभे राहण्याच्या विचारसरणीचे सरपण राजद कॉंग्रेसच्या अग्नीत घालून भ्रष्टाचार भडकावण्यालाच मदत केली आहे. ह्या आधी त्यानीच म्हटले होते की आम्ही कोणत्या ही पक्षाशी हात मिळवणी करणार नाही कारण सगळे केजरीवालांना सोडून भ्रष्ट आहेत असे त्यांच्या पक्षाचे मत होते. आता हे ढोंग होते हे सिद्ध झाले.

राजनीतीच्या त्याच धोपट मार्गाने केजरीवाल जाऊ पाहात आहेत. उरले फक्त राजकारण. लोकांच्यासाठी चांगले काही तरी करण्याचे फक्त ढोंग होते.