Sunday, October 28, 2012

कॅम्पलाईफ ...........भाग १२


कॅम्पलाइफ
 
कमांडंट, लेफ्टनंट जनरल खेत्रपाल, फार रुबाबदार माणूस होता. आम्हाला त्याचे दर्शन कॅम्पच्या निमित्ताने झाले. आमच्या कोर्सच्या पहिल्या बाहेरच्या एक्सरसाईजच्या वेळेला कमांडंटने आम्हाला संबोधले.
 
"Gentlemen remember, the more you sweat and toil in peace, the easier to force your enemy, bleed and boil in war" जनरल खेत्रपालची ती वाक्य अजूनही आठवणीत आहेत.
 
आमच्या पहिल्या एक्सरसाईजचे नाव होते पहला कदम’. आम्ही सारे जिसीज आपआपल्या आरामाच्या घरटूल्यांतून आयएमएमध्ये आल्यावरचा हा पहिला आऊटडोअर एक्सरसाईज. पहिल्या काही दिवसातच म्हणजे आमचे युद्धशास्त्राचे वर्ग झाल्यावर आम्हाला चार दिवसा करता "पहला कदम" ह्या एक्सरसाईज साठी रवाना केले गेले. डेहराडूनहून पंचवीस किलोमीटर अंतरावरच्या जंगलात आम्हाला घेऊन गेले. तेथल्या जंगलात टेंट बांधून चार दिवस राहायचे असा कार्यक्रम होता. पोहोचल्यावर, पाच मिनिटात टेंट कसा रचायचा त्याचे आम्हाला प्रात्यक्षिक दिले गेले. टेंट पिचींगची एक्सरसाईजच्या शेवटच्या दिवशी स्पर्धा घेतली जाणार होती. एक टेंट दोन जिसीनी बांधायचा त्यात दोघांनी राहायचे. आमच्या बटालियनचे दोनशे टेंट लागले. मला लहान असताना ऐकलेले बाबासाहेब पुरंदऱ्यांचे शिवाजीराजांवरचे भाषण आठवले आपणही युद्धशास्त्राचे खरोखरचे धडे घेत असल्याचा अभिमान उरी जाणवला. दर, मे महिन्याचा सुट्टीत डोंबिवलीत, नेहरू मैदानावर बमोंचा सात दिवसांचा कार्यक्रम व्हायचा.
 
.... अफझलखानाच्या वधावर चाललेले त्यांचे ते भाषण....  "खानाचा तळ, कोयनेच्या खोऱ्यांत पडला. त्या भयंकर निर्बिड अरण्याचे पर्वतमय प्रदेशाचें किती वर्णन करावे? त्या अरण्यांत खानाच्या हजारो सैनिकांनाही भय वाटूं लागलें. पण खानाला मात्र अजिबात भय वाटलें नाही. तो मनांत म्हणाला, "बस अब जावली का मुल्क मेरा ही हैं।" जंगलांत तंबू ठोकण्यासाठी जरुर तेवढी जागा साफ करून उंच भव्य तंबू उभारण्यांत आले. साखळदंडांनी हत्ती ठाणबंद करण्यांत आले. जमिनींत मेखा ठोकून घोड्याच्या रांगा बांधण्यांत आल्या. उंटांचे तांडेही बांधण्यांत आले. सैनिकांच्या हालचालींनी इकडे तिकडे भटकण्याने तें अरण्य गजबजून गेलें. अफाट जंगलाच्या मानाने तें सैन्य चिमूटभर वाटत होते. झाडींत तें पार झाकून गेलें होतें. जावळीत पोहचल्याबरोबर मोंगल फौजांनी डेरे बांधले फौजा डेरे दाखल झाल्या..... "  मो पुरंदऱ्यांचे भाषण ऐकताना काय मजा यायची, संपूर्ण दृश्य अगदी डोळ्यासमोर उभे राहायचे. असे वाटायचे की आपण त्या काळात वावरत आहोत.
 
एका जिसी करता बांधलेल्या टेंटला "बिवोक" म्हणतात. टेंट कसला अगदी छोटा झोपण्या पुरता आडोसाच जणू. पण येथे "बिवोक" नाही चक्क टेंटच बांधायचे होते. टेंट बांधून झाल्यावर, साप, विंचू किंवा तत्सम सरपटणारे प्राणी येऊ नयेत म्हणून टेंटच्या चारही बाजूने "स्नेक पीट" खोदावा लागतो. आम्हाला "स्नेक बाईट किट" कसा तयार करायचा ते शिकवले. साप चावला तर विष चढू नये म्हणून अंगाचा भाग छोट्या धाग्याने बांधून कसा ठेवायचा, अंगाच्या भागाला एक छोटी भेग करून भिनलेले रक्त कसे काढून टाकायचे हे सर्व शिकायला मिळाले. डासांपासूनच्या संरक्षणासाठी "सन डाउन, स्लिवस डाउन" हे वाक्य किती उपयुक्त आहे हे शर्टाच्या दुमडलेल्या बाह्या, उलगडून खाली केल्यावरच कळते. जंगलात राहताना अंगाला "ओडोमॉस" किंवा "डिएमपी" तेल लावावे लागते. "डाय मेथायील फॅलेट" म्हणजेच डिएमपी तेलाने अंग चिकट होते पण डास चावत नाहीत हे कळले. टेंट मध्ये राहताना "डीटीएल्स" खोदायचा एक मोठा कार्यक्रम असतो. "डीप ट्रेंच लॅट्रीन" वेळेवर खोदले नाहीत तर सकाळी करावे लागणारे विधी किती अवघड जातात ते समजून आले. सकाळी मिळालेल्या अर्ध्या लीटरच्या पाण्यामध्ये सकाळचे विधी, तोंड धुऊन दाढी करणे दिवस भर पाण्याची तहान भागवणे हे सगळे जमणे अवघड असते पण सवय होते. त्याने कमीत कमी पाणी कसे वापरायचे ते कळून येते.
 
ह्याच कॅम्प मध्ये सकाळच्या वेळेला आमचा रेडिओ टेलिफोनीचा अभ्यास होता. युद्धात रेडियोचा खूप उपयोग होतो. जवळ जवळ सगळे दळणवळण ऑर्डर्स रेडिओवरून द्यायचे असतात. त्यामुळे रेडिओवर कसे बोलायचे त्याचा एक प्रघात आहे. त्याचे शिक्षण आम्हाला आधीच दिलेले होते येथे त्या शिक्षणाचा उपयोग करायचा होता. प्रत्येक टेंट मध्ये एक रेडिओ सेट होता आम्हाला रेडिओवर ऑर्डर्स ब्रॉडकास्ट करायच्या होत्या. आमचा रेडिओ टेलिफोनीचा अभ्यास सुरू झाला............
 
Tiger: Sparrow, Sparrow, This is Tiger, Message Over.
Sparrow: Tiger, This is Sparrow, Go Ahead.
Tiger: Acknowledge, Over.
Sparrow: Wilco, Over!
Tiger: This is Sparrow, Out. …………..
 
सुरवातीला रेडिओ टेलिफोनीचा रीतसर अभ्यास चाललेला असताना मधूनच कंटाळा येऊन नकळत आम्ही आमची बकवास टेलिफोनी सुरू केली होती त्यात गाण्यांची अंताक्षरी तत्सम बकवास सुरू झाली.
 
एका रेडिओवर आम्ही काय कसे बोलतो त्यावर आमचा डिएस, कॅप्टन गिल कान ठेवून होता. थोड्याचं वेळात रेडिओवर चालणाऱ्या आमच्या पाल्हाळ गप्पा गाणी ऐकून कॅप्टन गिलने आम्हा सगळ्यांना एकत्र बोलवून रेडिओ टेलिफोनी बद्दल समजावले, अर्थातच आयएमएतले समजावणे म्हणजे रोलिंग परेड झाल्यावर मगच.
 
"....Gentlemen, always remember four golden rules of radio telephony - Brevity, Simplicity Clarity and Security. Radio telephony should be like a lady's skirt: long enough to cover the essentials but short enough to keep it interesting. Yours is a night gown.............. .“ कॅप्टन गिलचे आम्हाला समजावणे चालूच होते.   तेवढ्यात कॅप्टन गिलला मी नीट दाढी केली नाही अशी बहुदा शंका आली असावी. जवळ येऊन, माझ्या गालावरून हात फिरवत म्हणतो, "यू हॅव नॉट शेव्हड्ं प्रॉपर्ली. जिसी आकाश, यू नो, बाय नाऊ, शेवींग इज पार्ट ऑफ रीग. गो नाऊ, बिफोर रोलिंग शेव्ह प्रॉपर्ली एंड कम". मला वाटले आता टेंट मध्ये जाऊन शेव्हिंग करावे लागणार पण कॅप्टन गिलचा इरादा वेगळाच होता. त्याने इकडे तिकडे पाहिले एका दगडाकडे बोट दाखवत मला म्हणतो "पिक दॅट अप एंड बिफोर वी फिनिश आवर रेडिओ टेलिफोनी एक्सरसाईज, आय वॉन्ट टू सी युअर फेस क्लिनली शेव्हड् अॅन्ड डोन्ट फरगेट टू पूट सम आफ्टर शेव्ह, व्हेन यू शेव्ह यु्अर फेस". त्या दिवशी, त्या दगडाने गालावर असे खरचोटे उठले होते त्या ओल्ड स्पाईसने असे झोंबले होते, की आजतागायत माझी दाढी गुळगुळीत छान होते. आयएमएत आम्ही हेच आफ्टरशेव्ह लोशन लावायचो. त्यावेळेस हेच आफ्टरशेव्ह प्रसिद्ध होते सहज मिळायचे. अजूनही दूरवरून ओल्ड स्पाईसचा वास आला की खरचोटे उठलेले झोंबणारे गाल मला आठवतात आयएमएतले दिवस डोळ्यांसमोर येतात.
 
एक्सरसाईजमध्ये ट्रेंचेस खोदायचे फार जिकरीचे काम होते. दिवसभर दमल्यावर रात्रभर ट्रेंच खोदायचा खूप कंटाळा यायचा. खूप दमायचो. कुदळ फावडे वापरून तळहात सोलवटून गेले होते. एकदा ट्रेंच खोदले की ट्रेंचच्या सुरक्षेसाठी कोणाला तरी गस्त घालायला लागायचे. आम्हाला "थ्रिमॅनट्रेंच" रात्रभर खोदून सकाळी सूर्योदयाच्या वेळेला आपली आपली रायफल घेऊन "स्टॅन्ड टू" व्हावे लागायचे. कॅप्टन गिल नेहमी म्हणायचा "शत्रू, साधारण संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला किंवा सकाळी सूर्योदयाच्या वेळेला घात करतो. ह्याला कारण असे की चढाई करताना शत्रू साधारणपणे रात्रीच्या अंधारात वाट काढत येतो सकाळच्या पहिल्या प्रहरी हमला करतो. हे जर जमणारे नसेल अंतर खूप असेल किंवा चढाई खूप असेल एका रात्रीत चढाई साधणार नसेल तर मग रात्रीच्या अंधारात शत्रू त्याच्या लक्षाच्या दिशेने मार्गक्रमण करतो पहिला टप्पा गाठतो. लक्ष टप्प्यात आले की फॉर्मींगअप प्लेसवर शत्रचे सैन्य दिवसभर टिकून राहते संध्याकाळी सूर्यास्ताला हमला करते. परत दिवसभरच्या दमण्याने संध्याकाळच्या वेळेला, किंवा रात्रभराच्या अपूऱ्या झोपेमुळे सूर्योदयाच्या वेळेला, डिफेन्सीव्ह पोझिशन घेतलेले सैनिक, शिथिल सापडू शकतात. ह्या शिथिलपणावर मात करण्यासाठी, डिफेंडींग फोर्सेस, ह्या दोन्ही वेळेला मुद्दामून जास्त तयारीत राहतात. ह्या प्रक्रियेला "स्टॅन्ड टू" म्हणतात".
 
आपले हत्यार नेहमी आपल्या जवळ असले पाहिजे. अगदी झोपताना सकाळचे प्रातर्विधी करताना सुद्धा. कॅम्पमध्ये हे शिकायला मिळते. हत्यार जर कोणा कडून हरवले तर त्याच्या वर रेलीगेशनचीच वेळ येते. हत्याराचा सांभाळ, संरक्षण आदर ह्याला खूप प्राधान्य दिले जाते कारण युद्धात आपले हत्यार हाच आपला दोस्त आपला साथी ठरणार असतो. मरे पर्यन्त फक्त आपले हत्यारच आपल्या बरोबर असते. सुरवातीला, सुरवातीला सवय नसल्या कारणाने कोणा जिसीचे हत्यार काहीतरी काम करताना राहून जायचे, सुटायचे. जिसी सुब्बूला हा धडा डिएस गिलने त्याचा "नमुना" बनवून शिकवला आणि त्याच्याच काय पण आमच्या पण लक्षात राहिले जन्मभर.
 
ट्रेंच खोदून झाल्यावर, सकाळच्या वेळेला आम्ही स्टॅन्ड टू मध्ये सज्ज राहिलो होतो. आमचे कसेतरी खोदलेले ट्रेंचस् बघून कॅप्टन गिलचा पारा चढला. म्हणाला "बगरर्स धिस इज हौ यू हॅव डग युअर ट्रेंचेस्". ह्याला कारण की आम्ही जेमतेम दोनदोन फुटाचे ट्रेंचेस खणून ठेवले होते. कितीही भरभर केले तरी प्रत्येकाच्या कुवती प्रमाणे हातात असलेल्या वेळेत तेवढेच जमले होते. खरे तर आम्ही चार, चार फूट ट्रेंच खोदायला पाहिजे होते. नाहीतर दोन फूट ट्रेंच खोदण्याचा काहीच उपयोग नव्हता. ट्रेंच मध्ये उभे राहिल्यावर छाती पर्यन्त जर जमीन नाही आली तर संरक्षण ते काय मिळणार. दिवसभराच्या श्रमाने रात्रीच्या खोदण्याने आम्हाला केव्हा एकदा झोपतो असे झाले होते. त्या रात्री प्रत्येकाला फक्त दोनतास रात्री झोपायला मिळाले होते. बाकीच्या वेळेत गस्त घालणे खोदायचे काम चालू होते. झोपेतच कसेतरी खोदून टाकले आम्ही ट्रेंचस्. परितोष शहा कॅम्पसाठी आमचा कंपनी कमांडर होता. त्याला पकडून कॅप्टन गिल म्हणतो "यू हॅव डग धिस ट्रेंच. नाऊ आय वॉन्ट यू टू गो इनसाईड धिस" असे म्हणत कॅप्टन गिलने परितोष शहाला त्या दोन फुटाच्या ट्रेंच मध्ये अक्षरशः कोंबलेन. "इन वॉर यू विल नॉट गेट धिस मच टाइम बगर्स, दॅट टाइम एव्हरी बडी वूड गो फॉर सिक्स फिट ट्रेंचेस. एंड यू विल डिग विथ युअर मेस टिन्स, विथ युअर फिंगरस्, विथ युअर नेल्स् बिकॉज एव्हरी बडी विल रीक्वायर डिगींग टूल्स् अॅन्ड दे वील ऑलवेज बी इन शॉर्ट सप्लाय... ". खरे तर युद्धा मध्ये संसाधनांचा वेळेचा अभाव नेहमीच जाणवतो. त्यामुळे जी बाजू जास्त तयारीत असते त्या बाजूची सरशी होते. युद्धात शत्रू पेक्षा वेळेशी झुंजण्यातच अर्धी शक्ती निघून जाते. The more you sweat and toil in peace….. ह्या वाक्याची सार्थकता तेव्हा कळते.
 
आमचा पुढचा एक्सरसाईज होता "आगे बढ". एक्सरसाईज सात दिवसांचा होता. ह्यामध्ये मॅपरिडींग करत जंगलातून, नाल्यातून वाट काढत दुश्मनाच्या दडून बसलेल्या बंदूकधाऱ्याला किंवा आतंकवाद्याला पकडायचा इरादा असतो ह्या एक्सरसाईज मध्ये. मजा यायची, जेव्हा बेसावध राहिल्यावर डिएस एकदम कानापाशी येऊन ओरडायचा तेव्हा..... "कंपनी कमांडर अमित वर्मा यू आर डेड!". मग त्याला थोड्या वेळेसाठी त्या एक्सरसाईज मधून कंपनी कमांडरला बाहेर काढले जायचे आमच्यावर आमची युद्धातली पुढची खेळी अमित वर्मा म्हणजेच आमच्या कंपनी कमांडरला सोडून राबवण्याची पाळी यायची. ह्या मुळे चढाईची योजना बनवतानाच ह्या सगळ्या बाबींचा विचार करावा लागायचा. कोण कोठली कामे करणार आपल्यातला सहकारी घायाळ झाला किंवा ऐनवेळेला मेला तर कोणाचे काम कोणी करायचे हे आधीच ठरवलेले असायचे…..   
 
कॅम्पच्या शेवटी कॅम्पफायर झाला. कॅम्पमधल्या सगळ्या थकावटीची होळी ह्या कॅम्पफायर मध्ये झाली. डिएसचे कडक वागणे, त्या शिक्षा, आतापर्यंत अंगवळणी पडलेले रोलिंग, क्रॉलिंग सगळे सगळे संपले होते. त्यादिवशी आम्हाला डिएस बाकी अधिकाऱ्यांचे एक वेगळेच रूप बघायला मिळाले. संध्याकाळी छान मोठी शेकोटी पेटवली गेली सगळ्यांना स्नॅक्स बिअरची मेजवानी मिळाली. अशा श्रम परिहाराला "रम पंच" म्हणतात हे नंतर कळले मला. डिएस बाकी अधिकारी सगळ्यांशी गंमत गोष्टी करत कॅम्प मधल्या आमच्या चुका आठवून आठवून हसत होते. आम्ही जिसींनी मिळून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. प्रत्येक जिसीनी जमेल तशी आपआपली अभिव्यक्ती सादर केली. अमित वर्माने " SSSS साथीरे, तेरे बीना"... हे "मुक्कदर का सिकंदरचे" गाणे म्हटले. आम्हाला खूप आवडले. अमितने अगदी त्याची राखी त्याच्या डोळ्या समोर उभी आहे अशा भावनेत गाणे म्हटले. आम्ही त्याच्या कडून त्याच्या मैत्रिणीचे खूप कौतुक ऐकले होते. अमितचे वडील लष्करात अधिकारी होते. त्यांच्या सहकाऱ्यांमधल्या एका अधिकाऱ्याची ती मुलगी. अमित ती लहानपणा पासून एकमेकांना ओळखत होते. दोघांचेही वडील पायदळाच्या गार्डस् रेजीमेंट मध्ये काम करायचे. अमित आम्हाला सैन्या बद्दलची थोडी थोडी माहिती द्यायचा. वासरात लंगडी गाय होती अमित म्हणजे. मला सैन्याबद्दलची काही खास माहिती नव्हती. सैन्य त्यातले आयुष्य म्हणजे आमच्यासाठी मोठे रहस्य होते. युद्ध तर रोज रोज होत नाहीत. मग जेव्हा युद्ध नसते तेव्हा सैन्य करते काय असा मला नेहमी प्रश्न पडायचा. तो सैन्या मधल्या गोष्टी सांगायचा आम्ही कान देऊन त्या ऐकायचो. रेजीमेंटला "युनिट" असेही म्हटले जाते हे त्याच्या कडूनच ऐकले होते. दोघांचेही वडील एकाच युनिट मध्ये असल्या कारणाने, ते दोघे गार्डस् रेजीमेंटच्या बाकीच्या अधिकाऱ्यांना ओळखत होते. युनिटमधले जवान शिपाई त्यांना आपले वाटायला लागले होते. अमितने इनफनट्रीत जायचे गार्डस् रेजीमेंट मध्येच जायचे असे ठरवले होते. गार्डस् ची तीच युनिट मिळेल ह्याची त्याला खात्री होती. आम्हाला आता पर्यन्त सैन्या बद्दल बरीच माहिती झाली होती. अमित मुळे रोज त्या माहितीत भर पडायची. भारतीय सैन्याचे पायदळ, रणगाडा, तोफखाना, सॅपर्स एंड माईनर्स, पॅरा कमांडो, आर्मीचे वायूदळ, सिग्नल्स् असे विविध लढाऊ दल आहेत किंवा आर्मस् आहेत. प्रत्येक लढाऊ दलाच्या आपल्या अशा रेजीमेंट्स, बटालियन्स् किंवा स्कॉड्रन्स् आहेत. उमेदवारीची पहिली काही वर्षे सैन्याधीकाऱ्याला, कमीशन्ड ऑफिसर झाल्यावर मिळालेल्या युनिट मध्ये घालवावी लागतात. एकदा त्याला एका युनिट मध्ये कमीशन मिळाले की पहिली दहा बारा वर्षे तो त्याच युनिट मध्ये राहतो शिकतो. त्याची युनिट जिथे जाईल तिथे जातो. युनिटची जागा दर तीन वर्षाने बदलते. युनिट, त्यातले जवान, त्यातले अधिकारी हे सगळे त्याचे कुटुंब बनते. युनिट मधले ज्येष्ठ अधिकारी त्याचे मार्गदर्शक शिक्षक बनून राहतात. हे सगळे ऐकून आम्हाला कधी एकदा आमची युनिट मिळते असे व्हायचे. लग्नाचे वय झालेल्या एखाद्या मुलीला जसे सासर कसे असेल, कोठे असेल असे प्रश्न सतावतात तसे आम्हाला आमच्या युनिट बद्दल वाटायचे. ह्या उलट अमित. त्याला हवी असलेली युनिट मिळणारच हे त्याला माहीत असल्या कारणाने निश्चिंत होता. आयएमए मध्ये कोर्स संपण्या पूर्वी, प्रत्येक जिसी कडून त्यांना कोठले लढाऊ दल पाहिजे ते जाणून घेतले जाते.   प्रत्येक जिसीची आवड, कोर्स मधली त्याची कामगिरी युनिट मधल्या रिक्त जागा ह्यावर एखाद्या जिसीला मिळणारी युनिट अवलंबून असते. त्यात पेरेंटल क्लेमला खूपं महत्त्व दिले जाते. पेरेंटल क्लेम, म्हणजे जर कोणाचे वडील एखाद्या युनिट मध्ये असतील त्या अधिकाऱ्याच्या किंवा जवानाच्या आयएमएत शिकणाऱ्या मुलाला त्याच्या वडिलांची युनिट पाहिजे असल्यास, त्याच्या त्या निवडीला प्राधान्य दिले जाते. पेरेंटल क्लेम हे आपल्या सैन्य दलाचे वैशिष्ट्य आहे. एकाच युनिट मध्ये वाढल्या मुळे त्याच युनिट मध्ये आता अधिकारी म्हणून आल्या मुळे, युनिट प्रती आपुलकीचा तीव्र भाव जागृत होतो, आपलेपणा येतो. लढाईत अशा "आपल्या" युनिट विषयी वाटणाऱ्या आपुलकीचा खूप उपयोग होतो. त्या आपुलकीपोटी, लढाईत, अधिकाऱ्यांनी शौर्याच्या मोठ्या गाथा कोरून ठेवल्या आहेत. भारतीय सैन्याचा इतिहास अशा घटनांनी समृद्ध आहे. बऱ्याच वेळेला असे दिसून आले आहे की जवान किंवा अधिकारी युद्धात देशासाठी नव्हेतर त्यांच्या युनिटच्या मानासाठी स्वतःचे प्राण देतात. हे सगळे जाणूनच भारतीय सैन्यात पेरेंटल क्लेमची मुद्दामून तरतूद केली गेली आहे. असा हा वारसाहक्क दावा फक्त लढाऊ दलांसाठीच आहे. ह्याच पेरेंटल क्लेम मुळे जिसी अमित वर्माला गार्डस् रेजीमेंट मिळणार हे जवळ जवळ निश्चित होते. त्याच्या मैत्रिणीला सुद्धा तेच हवे होते असे तो आम्हाला कित्येकदा म्हणाला होता. आम्हाला आयएमएच्या रुक्ष दिनचर्येत अमित त्याच्या मैत्रिणीचा विषय चघळायला खूप आवडायचा. त्याची आम्ही खूप खिल्ली उडवायचो. पण खरे तर आम्हाला त्याचा हेवा वाटायचा.
 
विविध ठिकाणाहून आलेले ते जिसीज आणि त्यांच्या फुललेल्या प्रतिभा अनुभवायची एक संधी म्हणजे पहिल्या सत्राच्या मध्ये होणारी सोशल्स्. अॅकॅडमीतले दिल्लीवाले, चंडीगढवाले - दिल्ली चंडीगढ सोशल करायचे. मराठी जिसी एकत्र जमून - तांत सोशल करायचे. तसेच मल्लू सोशल, बॉन्ग सोशल ह्याच बरोबर प्लटून सोशल, कंपनी सोशल, बटालियन सोशल, एनडीए स्कॉड्रन सोशल, आरआयएमसी सोशल अशी अनेक सोशल्स् होत राहायची. अशा सोशल्स् मधून कोणी गाणी म्हणायचे, कोणी स्वतःच्या कवितांचे वाचन करायचे, छोट्या नाटिका बसवल्या जायच्या तर कोणी एखादे तंतुवाद्य वाजवून आपले कर्तब दाखवून सुंदर मैफिल जमवायचे. बंगाली मुले सुंदर गाणी म्हणण्यात पटाईत. प्रत्येकाच्या घशात किशोरकुमार बसलाय असे वाटायचे प्रत्येकाला रविंद्रसंगीत यायचे. रवींद्रनाथांनी दहा हजारावर कविती लिहून ठेवल्या आहेत. रवींद्रनाथांच्या प्रतिभेची झलक अशाच जिसींजने गाईलेल्या रविंद्रसंगीताने मला करून दिली. ह्या सोशल्स् मधून जिसीजच्या वेगवेगळ्या प्रतिभा साकार व्हायच्या.
 
शेवटचा सगळ्या कॅम्पचा बाप म्हणजे चिंडिटस्. ह्या कॅम्पनंतर आऊटडोअर एक्सरसाईजचे सत्र संपते. आयएमएत झालेल्या सगळ्या एक्सरसाईजचे शिकवलेल्या साऱ्या युद्धशास्त्राचा परिपाक चिंडिटस् एक्सरसाईजने होतो. ह्या कॅम्प मध्ये "भदराज" नावाचे भले मोठे पर्वत शिखर सर करायचे असते. पर्वत शिखर कसले, पर्वत समूह म्हणावे लागेल त्याला. त्यामुळे चिंडिटसला कधीकधी "भदराज" असे पण म्हटले जाते. कॅम्प जिथे संपतो तेथून, डोंगर दऱ्याखोऱ्यातून जवळजवळ पन्नास किलोमीटरचा "रनबॅक" करावा लागतो. तो सुद्धा चिंडीट ड्रेसमध्ये, आपली वैयक्तिक रायफल घेऊन. हा रनबॅक म्हणजे, आयएमएच्या सगळ्या बटालियन्स मध्ये कोणती बटालियन पहिल्यांदा पोहोचते त्याची चुरस असते. शंभर ते एकशेवीस जिसींच्या समूहाच्या रनबॅक साठी मोठा ताळमेळ साधावा लागतो.
 
हनुमानाला लागलेल्या शापा मुळे त्याला स्वतःच्या शक्तीची जाणीव नव्हती, किंबहुना त्याला माहीतच नव्हते की तो एका प्रचंड शक्तीचा धनी आहे म्हणून. जाणीव नसल्यामुळे तो त्याच्या शक्तीचा योग्य उपयोग करू शकत नव्हता. जांबुवंताने ही जाणीव करून देण्याचे काम केले. भदराजच्या कॅम्प आम्हाला आमच्यातील आंतरिक शक्तीची जाणीव करून देतो. देवाने दिलेल्या आपल्या अंगात दडलेल्या मानसिक शारीरिक शक्तीचा अनुभव ह्या कॅम्प द्वारा मिळतो त्याची परिणती प्रत्येकाचा आत्मविश्वास वाढण्यात होते.

Friday, September 28, 2012

त्याला लागते जातीचे, येरे गबाळ्याचे काम नव्हे

गेल्या वर्षी झालेल्या जम्मू काश्मीर मधल्या पंचायती निवडणुका इस्लाम विरोधी ठरवून लष्करे तोयबा, हिजबूल मुजाहदीन आणि जैशे मोहमद सारख्या दहशतवादी संघटनांनी एका पत्रका द्वारे फतवा काढून खोऱ्यातील गावांतल्या सरपंचांनी राजीनामे देण्यात यावेत असे आवाहन केले. या आवाहनाला जेव्हा कोणी बळी पडत नाही असे जाणवले तसे धाक घालण्यासाठी दहशदवाद्यांनी सरपंचांना गोळ्या घालून मारण्यास सुरवात केली आहे. पंच मुहंमद शफी तेली ह्यांची गेल्या आठवड्यात हत्या करण्यात आली. आता पर्यंत चार सरपंचांना गोळ्या घालून मारण्यात आले आहे. हे सर्व उत्तर काश्मीर बारामूल्ला भागात घडले. मुहंमद शफी तेली क्रिरी भागातला होता. ह्या हत्ये मुळे सरपंचांमध्ये भिती पसरली आहे व आता पर्यंत दोनशे सरपंचांनी त्यांचे राजीनामे तेथील वृत्तपत्रात जाहिराती देऊन दिले आहेत.   ह्या दोनशे सरपंचांनी दिलेल्या व्यक्तिगत जाहिरातीत असे म्हटले आहे की ह्या राजिनाम्या बरोबरच त्यांचा राजकारणाशी पुढे काहीही संबंध असणार नाही. थोडक्यात त्यांनी राजकारण संन्यास घेतला आहे. हे सगळे राजीनामे उत्तर काश्मिरातून दिले गेले आहेत. सरपंचांच्या निडणूका जम्मू काश्मिरात गेल्या वर्षी ३० वर्षाने होऊ शकल्या होत्या.
काश्मीर खोऱ्यात गेल्या वर्षा पासूनच लष्करे तोयबा, हिजबूल मुजाहदीन, जैशे मोहमदआदींनी अशा तऱ्हेची भित्तिपत्रके चिकटवली होती. ही भित्तीपत्रक चिकटवण्या मागे, सरपंचांच्या मनात भिती उत्पन्न करण्याचा प्रयत्न होता. हे चालू असताना राज्य सरकार, पोलीस व गुप्तचर यंत्रणा झोपा काढत होते का कोठच्या मुहूर्ताची वाट पाहत होते कळत नाही. ह्या भित्तीपत्रकात राजीनामे दिले नाहीत तर परिणाम वाईट होतील असा धाक घातला होता.
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणतात की सरपंचांनी राजीनामे देऊ नयेत. लवकरच राज्य सरकार त्यांना संरक्षण देईल. चार सरपंचांना जीवानिशी मुकावे लागल्यावर येणाऱ्या ह्या वक्तव्यावर कोणाचा विश्वास बसेल. नुसते संरक्षण देण्याने काम भागणारे आहेका? नुसते संरक्षण देण्याने प्रश्न सुटणार आहेका? तेथील जनते मध्ये भितीचे वातावरण जाऊन शांतीचे वातावरण येणार आहेका? नुसते संरक्षण देण्याने लोकतंत्र जिवंत राहणार आहेका? आपले सार्वभौमीत्व टिकवले जात आहे असा विश्वास लोकांना वाटतो का? का खऱ्या प्रश्नाकडे मुद्दामून डोळे झाक करण्यात येत आहे?
केंद्र सरकारला हा प्रश्न फक्त जम्मू काश्मीर राज्याचा प्रश्न आहे असे वाटत असावे. कारण आपल्या निष्क्रिय केंद्र सरकारने डोळे बंद करून काहीच होत नाही असे वाटून घेतले आहे. हा प्रश्न फक्त राज्याचा नाही तर आपल्या देशाच्या सार्वभौमीत्वावर डाग पाडणारा आहे असेच म्हणावे लागेल. ह्या वेळेला केंद्र व राज्य सरकारने वेळीच इलाज केला नाही तर भारतातले व काश्मीर मधले लोकतंत्र तकलादू आहे हे बाहेरच्या जगाला वाटायला लागेल. आपले लोकतंत्र किती खोल रुजलेले आहे त्याचे उदाहरण ह्या दहशतवादी लोकांविरुद्ध वेळीच ठोस उपाय करून दाखवून दिले पाहिजे. नाहीतर बाकीच्या राष्ट्रांचा व आपल्या जनतेचा आपल्या सार्वभौमीत्वावरच्या विश्वासाला तडा जाईल. एवढेच नाही तर आज जसे सरपंचांना राजीनामे द्यायला भाग पाडले जात आहे तसे हे दहशतवादी अजून धीट बनून अशीच पत्रके काढून आमदार, खासदारांना राजीनामे देण्यास भाग पाडतील. त्या दिवशी सार्वभौम ह्या शब्दाचा अर्थ बदलेल,.....  निदान आपल्या साठी तरी. म्हणूनच म्हणावेसे वाटते ह्या सरकारला की त्याला लागते जातीचे येरे गबाळ्याचे काम नव्हे.

राष्ट्रव्रत ह्या विषया बद्दल येथे वाचा

 

Sunday, August 12, 2012

पेटलेले आसाम


गेले एक महिना आसाम पेटलेले आहे. भडकलेल्या दंग्यात शेकडो मरण पावले आहेत. हजारोंना दुखापत झाली आहे तर लाखो बेघर झाले आहेत. ह्या दंग्यांमागे कोण आहे ते सर्वांना माहीत आहे. घुसखोर बांगलादेशी मुसलमान लाखोंच्या संख्येने आज आसाम मध्ये वसलेले आहेत. मत पेट्यांच्या ह्या राजनीतीत त्या घुसखोर बांगलादेशी मुसलमानांना रेशनकार्ड व व्होटर आयडी कार्ड पण मिळाली आहेत. ह्या घुसखोरांनी आसामाचे बोडो व आसामी लोकांचे जिणे मुश्कील करून टाकले आहे. त्यांना धाक दाखवून दहशत माजवून सळोकापळो करून सोडले आहे. जर हे थैमान असेच चालू राहू दिले तर थोड्याच दिवसात काश्मिरात जसा काश्मिरी पंडितांचा प्रश्न सुरू झाला तसा येथे पण व्हायला वेळ लागणार नाही. काश्मिरी पंडितांसारखे इथल्या लोकांना त्यांचे राज्य सोडून पळून जावे लागणार. 



मुंबईत ज्या रितीने राझा ऍकॅडमी तर्फे घुसखोरांना पाठिंबा दाखवण्यात येत आहे त्या वरून आपल्या लोकांनी ता वरून ताकभात ओळखावे.



वृत्तसंस्थांनी सुद्धा ह्या घुसखोरांबद्दल व आसामात होणाऱ्या दंग्यांबद्दल वस्तुनिष्ठ राहून बातम्या दिल्या पाहिजे. ह्या पार्श्वभूमीवर तिस्ता सेतलवाड, अरुंधती रॉय व मानव हक्क संघटनांना मला असे विचारावेसे वाटते की आता मूग गिळून का बसला आहात? गुजरात मध्ये तर आपण फार आग पाखडत आहात, मग येथे काय झाले. का बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध न बोलण्याचा कोणाच्या बरोबर करार झाला आहे?




Friday, August 10, 2012

पालथ्या घड्यावर पाणी

अण्णा हजारे ह्यांनी त्यांची टीम मोडकळीस काढली. आता नव्या पक्षाच्या स्थापनेचे काम सुरू केले आहे. सगळ्या राजकीय पक्षांचे ध्येय व उद्दिष्ट चांगलेच असते. प्रत्येक पक्ष राष्ट्र बांधणी करताच जन्म घेतो. राष्ट्रबांधणी, करता येण्यासाठी पक्षाला सत्तेवर यावे लागते. सत्तेवर येण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. इथे लोकनेत्यांपेक्षा निवडून येण्याची क्लुप्ती लढवणारे व्यवस्थापक पाहिजेत. हे सगळे करण्यात राजकीय पक्षाचा मूळ हेतू हरवला जातो, व राजकीय पक्षाकडे मग येन केन मार्गाने आलेली सत्ता टिकवून ठेवायची एवढेच काय ते उद्दिष्ट राहते. सत्ता भल्याभल्यांना भ्रष्ट करते.



हे होऊ न देण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने लोकसंग्रह करणारा, जनतेला आवडणारा असा लोकनेता पाहिजे. असा लोकनेता, पुरोगामी विचारांचा, भारताचा सर्वांगीण विकासाची स्वप्न बघणारा व जनमानसावर प्रभाव पाडणारा असला पाहिजे. आपल्या प्रभावाने भारतीय जनतेच्या विचारांची चौकट आमूलाग्र बदलून, आपले राष्ट्र बलाढ्य, समृद्ध व कल्याणकारी करण्याच्या आचार विचारांवर ती चौकट बसवली पाहिजे. हे राष्ट्रबांधणीचे कार्य हा भारतीय जनतेचा राष्ट्रधर्म झाला पाहिजे असा इथल्या जनतेचा स्वभाव बनला पाहिजे. आपल्या उदाहरणाने असे राष्ट्रव्रत घ्यायला लावणाऱ्या लोकनेत्याची आपल्याला आज गरज आहे. असा करिश्मा असणारा नेता आपल्याला पाहिजे आहे. अण्णा हजारे खचितच असे नेते नाहीत. उलट एक नवा पक्ष काढून अण्णा, मते फोडायचे काम मात्र करत आहेत. मतं फुटल्याने, अस्थिर सरकार बनायचा योग जास्त व अस्थिर सरकार, दुर्बल असल्या कारणामुळे भ्रष्टाचार आणखीनच भडकायला मदत करते. जर त्यांचा लढा भ्रष्टाचारा विरुद्ध असेल तर त्यांनी त्यातल्या त्यात कमी भ्रष्टाचारी पक्षाला आपला पाठिंबा जाहीर करायला पाहिजे. किंवा ते नाही तर निदान समविचारी पक्षांमध्ये समन्वय साधायला पाहिजे. नवा पक्ष काढल्यावर निवडून येण्यासाठी ज्या खस्ता खाव्या लागतात त्या लागतीलच, एवढे करुन येणाऱ्या २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांत ते सत्तेवर येऊ शकणार नाहीतच. त्यांच्या जवळ अगदी नगण्य खासदार असतील व इतक्या कमी संख्येने ते लोकपाल विधेयक पारित करण्यासाठी कोणावर जोर आणू शकणार नाहीत. मग अशा परिस्थितीत जर तकलादू लोकपाल विधेयक पारित झाले तर ह्याला अण्णा हजारेच जबाबदार ठरतील.



अण्णा हजारेंनी राजकीय पक्ष काढायचा ठरवून आता पर्यंत केलेल्या कामावर पाणी फेरले आहे.

Sunday, April 29, 2012

राजाराम सीताराम एक... भाग ११.. पिटी परेड





‘वन मोर. जिसी शाब्बाश. यू क्हॅन ढू इट. आय वॉन्ट वन मोर पूलअप’.



आठ पूलअप्स काढून झाल्यावर व अगदी दमून पूलअपची लोखंडी सळई सोडून देणार तोच उस्ताद भिमसिंग, जिसी परितोष शहाला म्हणत होता.



‘एक पूलअप आपके माताजी के नाम पर’।



हे ऐकल्याबरोबर परितोष शहाने अंगात दोन बैलांचे बळ शिरल्यागत दोन पूलअप्स अजून काढल्या. आता लोखंडी बार सोडून देणारच तेवढ्यात उस्ताद भिमसिंग परत गरजला.



‘वन फॉर युअर गर्लफ्रेंड’.



अंगात बिलकूल त्राण नसताना, बाकी जिसीज समोर परितोषला अजून एक पूलअप काढावीच लागली. पिटीपरेड मध्ये व्यायामाबरोबर नेहमीच उस्ताद भिमसिंग करमणूक करायचा. भिमसिंगचा गर्लफ्रेंडवाला ‘फंडा’ चपखल बसायचा. कारण गर्लफ्रेंड नसली तरी दुसऱ्यांसमोर उगाच आपले भांडे कशाला उघडे करा म्हणून मग जिंसींजचा गप्प राहून पूढला पूलअप काढायचा प्रयत्न व्हायचा. त्याच्या ह्या अशा प्रोत्साहितं करण्याच्या प्रयत्नात कितीतरी जणांनी कल्पनेतल्या गर्लफ्रेंड साठी एक दोन पूलअप्स किंवा सिटअप्स जास्तीच्या काढल्या आहेत व त्याबरोबर हळूहळू आम्ही आमच्या पिटीच्या अभ्यासक्रमात पुढे सरकलो आहोत. पहिले सत्र पास होण्यासाठी किमान पंचवीस पूशअप्स, आठ पूलअप्स, पंचवीस सिटअप्स, जंप अॅन्ड रीच, फायरमॅन्स लिफ्ट हे सगळे करावे लागायचे. फायरमॅन्स लिफ्ट खूप कठीण असायचे. त्यात एकाने दुसऱ्याला खांद्यावर उचलून पन्नास मीटर पळत जावे लागायचे. अशात जिसी बिपीसींग सारखा आडदांड सत्तर किलो वजनाचा गेंडा कोणाच्या नशिबात आला तर त्या फायरमॅन्स लिफ्ट करण्याऱ्या जिसीचे तेल निघायचे अगदी. पिटीचा अभ्यासक्रम येथेच संपायचा नाही तर पुढे सेव्हन फिट डीच, बाटला फटिग्स मध्ये मंकी रोप व व्हर्टिकल रोप ह्या सारख्या कसरती सुद्धा कराव्या लागायच्या. माकडाला आडवी दोरी किंवा जाड वायर पकडून एकीकडून दुसरीकडे जाताना पाहिले असेलच. तसेच मंकी रोप मध्ये, रायफल घेऊन कॅमोफ्लॉजच्या बॅटलड्रेस मध्ये आडव्या बांधलेल्या दोराला दोन्ही हाताने पकडून, दोन्ही पायांचा विळखा आडव्या दोराला घालून एका बाजूकडून दुसरीकडे जावे लागायचे. आमच्या कोरसमध्ये शेजारच्या भगत बटालियनमधला जिसी रघुनाथ, मंकी रोप करता करता हात सुटून खाली पडला व त्याच्या डाव्या हाताचे हात मोडले. हातावर पडल्या मुळे बरे झाले नाहीतर दहा फुटावरून जर पाठीला किंवा मणक्याला मार लागला असता तर भयंकरच झाले असते काहीतरी. पण हात मोडल्या मुळे सत्रा मध्ये पिटीच्या परीक्षा रघुनाथ देऊ शकला नाही व त्या कारणासाठी तो सहा महिन्यांसाठी रेलीगेट झाला. त्या तेवढ्या मंकी रोप साठी बिचाऱ्याला पहिल्या सत्राचे दिव्य परत पार पाडावे लागणार होते. आम्हाला फार दुःख वाटले पण आयएमएतल्या कडक नियमा पुढे कोणाचेच फारसे चालायचे नाही. व्हर्टिकल रोप मध्ये उभ्या रस्स्याला हाताच्या साहाय्याने व पायाच्या विळख्याने घट्ट पकडून दहा मीटर रोप चढत जावे लागायचे व परत तसेच खाली यावे लागायचे. पायाचा विळखा जर बरोबर बसला नाही व हातात जोर नसेल तर खाली येताना वेग कमी करण्यासाठी आपल्या मुठी आवळल्या जातात, पण एकीकडे स्वतःच्या वजनाने आपण खाली येतच असतो त्यामुळे आपले तळहात कर्षणाने जबरदस्त सोलवटून जातात. पुढचे पाच दिवस आयएमएच्या हॉस्पिटलात अशा जिसीचे निश्चित. पिटीचा अभ्यासक्रम येथेच संपत नाही. पुढे बॅटलड्रेस मध्ये रायफल घेऊन पंचवीस मिनटात पाच किलोमीटर पळणे, गेम्स ड्रेस मध्ये बारा मिनटात दोन माईल पळणे हे एक दिव्य असायचेच. ही दौड खूप अवघड आहे. पळताना खूप दमायला होते. अंतर कधी एकदा संपते असे व्हायचे. फाईव्ह किलोमीटरच्या शर्यतीत एक वेळ अशी येते की सगळे त्राण संपले असे वाटायचे व आपण मरतो की काय असे वाटायला लागायचे. त्यामुळेच पाच किलोमीटर पळताना दमल्यावर थोडे थांबावे कोठेतरी असे मनात यायचे. त्याच क्षणी कॅप्टन गिलचा हात पाठीवर पडायचा. पळता पळता पाठीवर थोपटून म्हणायचा, ‘शाब्बाश, थोडा रह गया। रुकना नही, रुकना नही’. कॅप्टन गिल असे म्हणत आमच्या पुढे गेलेला असायचा. त्याचा हात पाठीवर पडल्यामुळे व त्याला आपल्या पेक्षा वेगाने धावताना बघून थोडा हुरूप यायचा. पळून पळून एक कळले होते, जेव्हा सगळे त्राण गेले असे वाटते त्याक्षणी जर थोडा मनाशी निग्रह करून धीर धरला तर पुढे मग पाच किलोमीटर पूर्णं होतात. पाच किलोमीटर पळण्याने आपण मरत वगैरे नाही हेही पक्के समजले होते एव्हाना. कॅप्टन गिल म्हणायचा...



"And many a fellow turns about

When he might have won had he stuck it out.



Don't give up though the pace seems slow -

You may succeed with another blow"



"इट डझ नोट मॅटर हौ मच यू आर टायर्ड अॅट द एंड ऑफ द रन, बट हौ फास्ट यू रीकव्हर युअर ब्रेथ आफ्टर द रन, विल शो युअर रिसेलियन्स. एव्हरी थिंग इज इन युअर माइंड, इफ यू फिल यू विल नोट एबल टू हॅक इट यू विल नेव्हर बी एबल टू डू इट. वन मोर थिंग, डोंट इंडल्ज इन सेल्फ पीटी. इट वीकन्स यू. इट विकन्स युअर माइंड, इट अफेक्टस युअर बॉडी....... कॅप्टन गिल सुद्धा आमच्या बरोबर रोज पळायचा. पळता पळता कोणी थांबला की लागलीच त्याला ढकलायचा. थांबू द्यायचा नाही. पळून झाल्या नंतर कधी कधी आमच्याबरोबर चहा प्यायचा. चहा बरोबर त्याचा आवडता विषय चघळायचा, म्हणायचा, स्वतः बद्दलची कीव करणे ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. ती कोणत्याही प्रगतीच्या आड येते. अशी स्वतः केलेली स्वतःचीच कीव, कोठल्याही कामाच्या आड येते. कोठचाही नवीन उपक्रम हाती न घेण्यासाठी आपण कारणे शोधत राहतो. रोजच्या व्यायामाबाबतीत सुद्धा तेच आहे. व्यायाम न करण्यासाठी हजार कारणे आपल्याला सुचतात. मग आपण स्वतःलाच समजवायचा प्रयत्नात राहतो की ‘हा खोकला गेला की व्यायाम करीन’, किंवा ‘माझे अंग दुखायचे जेव्हा कमी होईल तेव्हा मी पळायला जाईन’. अशी कीव जो करतो तो अंग दुखायचे थांबले तरी कधी पळायला जाऊ शकत नाही कारण तो पर्यंत त्याला न करण्याचे असे दुसरे काहीतरी कारण सापडलेले असते. त्यापेक्षा मनात निश्चय करा व पळायला किंवा व्यायामाला लागा, मग बघा चमत्कार, आपले शरीर जादूची कांडी फिरवल्यासारखे वागायला लागते ते....... "



जेव्हा आम्ही आयएमएत दाखिल झालो तेव्हा आमच्या सीनियर्स कडून पिटीचा अभ्यासक्रम ऐकून, आपल्याच्याने हे सगळे कसे होईल ह्याचे भय वाटायला लागले होते. पण सहा महिन्याच्या रोजच्या पिटीच्या सरावाने आमच्यातले दुबळे जिसी सुद्धा आरामात परीक्षेत पास होताना बघून आमचा आत्मविश्वास वाढू लागला.



क्वचितच कोणी पिटी मुळे रेलीगेट व्हायचा. मुख्य म्हणजे रोज पिटी करता करता नित्य व नेमाने व्यायाम करायची सवय कधी अंगात भिनली गेली कळलेच नाही. आज सुद्धा नियमित व्यायाम हा आयुष्याचा घटक बनून राहिला आहे तो त्याच कारणाने. व्यायाम केल्याविना कसेतरीच वाटायला लागते. जबरदस्त व्यायाम करून जेव्हा आपण पूर्ण दमतो तेव्हा एक वेगळाच हलकेपणा येतो शरीराला. व्यायाम करताना आपले मन अगदी शांत व एकाग्र होते. काळज्या विसरल्या जातात. रात्री झोप सुरेख लागते. मुख्य म्हणजे संध्याकाळी स्कॉचचा पेग झोकताना मन चुकचुकत नाही. एक वेगळाच आनंद मिळतो.



सत्राच्या शेवटी पिटीचा अभ्यास क्रॉसकंट्री रेसने संपायचा. पंधरा किलोमीटरचा तो रस्ता पार करताना खरी मजा यायची. क्रॉसकंट्री रुट डेहराडून जवळच्या खेडेगावातून जायचा. क्रॉसकंट्री रेस होण्याआधी महिनाभर, मानेकशॉ बटालियनचे आम्ही जिसी, दर दिवसाआड सरावासाठी क्रॉसकंट्री रुटवर पळायचो. आमचीच नाही आयएमए मधल्या सगळ्या बटालियन्स सराव करायच्या, कारण क्रॉसकंट्री शर्यतीत, पहिल्या दहात येणारे जास्तीतजास्त जिसी ज्या बटालियनचे असतील ती बटालियन जिंकायची. पहिले, दुसरे तिसरे पारितोषिक असायचे ते वेगळेच. सराव करता करता लवकरच क्रॉसकंट्री पळायचे तंत्र कळून चुकले. पळताना इकडे तिकडे बघत, मनात कोठलातरी चांगला विचार आणत पळण्याचा एक रिदम पकडायचा. खूपं वेगात नाही व हळू पण नाही. पळत राहायचे. ते सरावानेच जमते. मग आपला श्वास जणू त्या पळण्याच्या ‘पेस’ ला अॅडजस्ट होतो. हळूहळू आपले मन, करत असलेल्या चांगल्या विचारावर एवढे एकाग्र होते की आपले पाय एका लयीत पळत आहेत ह्याचे भान संपते, आता पळण्याच्या क्रियेमुळे आपल्या श्वासाचा रेट जरी वाढला असला तरी त्या ‘पेस’ साठी एकप्रकारचा इक्विलिब्रियम साधला जातो. एकदाका हे संतुलन साधले की एवढा आत्मविश्वास निर्माण होतो की पंधरा किलोमीटर काय अजून सुद्धा पुढे पळू शकू असा जोर अंगात येतो. मनातून आपल्याला पंधरा किलोमीटर पळायचे आहे हे निघून जाते. राहतो फक्त चांगला विचार. आपण फक्त दृष्टिपथातला लांबचा टप्पा मनात ठेवायचा व आपले पाय पळत तेथपर्यंत आले की मग तसाच परत पुढचा टप्पा गाठायचा. असे करत करत कधी पंधरा किलोमीटर संपतात कळत सुद्धा नाही. शेवटच्या शंभर मीटर मध्ये वेग वाढवायचा व अंतर पार करायचे. पंधरा किलोमीटर संपल्यावर मिळणारे लिंबूपाणी व चाय पकोड्या सारखे अमृत भगवंताने आजतागायत तयार केले नाही ह्याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. करीय्याप्पा बटालियनचा क्षितिज पोखरीयाल व थिम्मय्याचा विनीत सिंग, दोघेही अॅथलेटीक्स मध्ये आयएमए ‘ब्लु’ होते व अशा शर्यतीत त्यांच्या जवळपास कोणी पोहचू शकायचे नाही. चुरस दोघांच्यातच असायची, पहिल्या दुसऱ्या क्रमांकासाठी.



विनीत सिंग सिगारेट खूपं प्यायचा. आम्ही म्हणायचो की सिगारेट स्मोकिंग ने स्टॅमिना कमी होतो म्हणून. पण त्याने कधी ऐकले नाही. प्रत्येक पळण्याच्या शर्यतीत तो पहिला असायचा किंवा पोखरीयाल पहिला असायचा व विनीत दुसरा. हे ठरलेले. विनीत डोळे मिचकावत नेहमी म्हणायचा,



"मला तर पळताना सिगारेट पिण्याने स्टॅमिन्यावर काही फरक पडतो असे वाटत नाही, उलट सिगारेटचा एक सुट्टा मारण्याने एक आगळा उत्साह येतो". विनीत सिंग सिगारेटचा परम भक्त होता. चिक्कार सिगारेट प्यायचा पण पेटवायला लागणारी काडेपेटी कधी ठेवणार नाही लेकाचा. सिगारेट ओठात पकडल्यावर खिसे चाचपायला सुरवात करायचा. मग हातानेच काडी पेटवण्याची नक्कल करत शेजारच्याला विचारायचा. "लाइट हैं"? काडेपेटी साठी. ह्या सिगारेट पिणाऱ्यांचे मित्र पटकन होतात व त्यांच्या सवयी सुद्धा एकसारख्या असतात. सिगारेट न पिणाऱ्या आम्हा काही जिसींना भली भारी स्टाईल वाटायची जेव्हा तो तोंडातून धुराचा गोल काढायचा तेव्हा. सिगारेट हे व्यसन आहे व ते चांगले नाही हे लहानपणापासून ऐकल्या मुळे माझे ठाम मत झाले होते की सिगारेट चांगली नाही व ती आपण पिणे चांगले नाही. तरी सुद्धा शेजारचा ओढताना त्याचा धूर नाकात जायचा त्यावेळेला कधी कधी तो वास चांगला पण वाटला होता. एकदा माझ्या त्या अधाशी नजरेकडे बघत, विनीत गाल्यातल्या गालात हसत दोन बोटात धरलेली सिगारेट माझ्याकडे करत म्हणतो,



"आकाशी, ले एक दम मार"। मी हाताने नको म्हणत म्हणालो, "नही विनीत मैं पिता नही। कभी पी नही"। विनीत – "अरे तो आज पी ले।... " पण अशी गोष्ट करणे किंवा करून बघणे म्हणजे आपला मनावर ताबा नाही असे वाटायचे. मनावर ताबा ठेवता न येणे हे एक दुबळेपणाचे लक्षण आहे ह्याची जाणीव मला इतकी तीव्र व्हायची की, स्वतःच्याच नजरेत दुबळे दिसूनये व दुर्बल ठरुनये ही भीती त्या सिगारेट पिण्याच्या क्रियेच्या आड आली व नाही प्यायलो. नाहीतर नको पिऊ हे सांगण्यासाठी आयएमएत कोणीही नव्हते. जरी प्यायली असती तरी ती लपवण्याची सुद्धा काही जरूर नव्हती. तेव्हा अंगातल्या पिळाने प्यायली नाही.



"ये तांत लोग होते ही ऐसे। मन तो उनका भी करता हैं। मगर कभी खुलके जियेंगे नही"। परत एकदा विनीत सिंगाने प्रयत्न करून बघितला.



"आकाशी, ले यार पिले मेरे लिये एक बार दम मारले"। विल्सचे उघडलेले पाकीट माझ्या कडे करत विनीत मला म्हणाला. मनात वाटले अरे हा असा माझा लागतो कोण की ह्याच्यासाठी मी आपले शिकवलेले संस्कार सोडू. मी जरा तिरसट पणानेच उत्तर दिले,



"विनीत छोड यार। मुझे नही पिनी हैं। सिगारेट पिना खराब हैं"। माझ्या त्या तिरसट उत्तराने विनीत एकदम चूप झाला. थोड्या वेळाने म्हणतो,



"ठीक यार, नही पिना है तो मत पी। सिगारेट पीना खराब हैं ये मै भी जानता हूं। मगर अभी आदत लगी हैं। अच्छा लगता है पिनेसे। दम आता हैं। वैसे सिगरेट पिने की आदत बुरी जरूर हैं। मगर हम दिलसे बुरे नही"।



खरेच त्याच्या सारखा दिलदार मनुष्य मी आज पर्यंत पाहिला नाही. विनीत म्हणायचा "जो दारू और सिगारेट पिते हैं वो दिलदार होते हैं। दारू, सिगारेट पिनेवाले लिचड और कॉन्स्टीपेटेड बहोतही कम मिलेंगे।...... " डोळे मिचकावत पुढे म्हणायचा "कंजूष कॉन्स्टीपेटेड सारखे गुण दारू, सिगारेट न पिणाऱ्यात खूपं आढळतील. असली माणसे आयुष्यभर दुसऱ्यांना नुसते नैतिकतेचे धडे देत फिरतात. आमच्या सारखे मस्त जगतात. मरे पर्यंत मजा करतात. जो पर्यंत जगतात तो पर्यंत इंटरेस्टिंग इसम म्हणून जगतात. तुमच्या सारखे दारू सिगारेट न पिणारे दुसऱ्यांसाठी इंटरेस्टिंग तर दूर पण घरातल्यांसाठी सुद्धा मोठे ‘बोअर’ असतात. खडूस खुसट बुढ्ढे साले"।



खूपं वर्षाने मला विनीत भेटला परत. आता तो कर्नल विनीत झालाय. सिगारेट ऐवजी पाइप ओढतो. प्रत्येक दोन वाक्या मध्ये खोकतो. मी त्याच्या बायकोला गमतीने म्हणालो,



"मॅम, आय डोंट नो व्हॉट यू सॉ इन धिस चेन स्मोकर". आपल्या सहावीतल्या मुलाला गोंजारत म्हणाली, "अॅकच्युअली माय फादर युज्ड टू स्मोक, आय युस्डटू लाइक द स्मेल ऑफ सिगारेट स्मोक सीन्स चाईल्डहूड. बट नाऊ आय वॉन्ट हिम टू क्वीट स्मोकिंग. आय लॉस्ट माय फादर अॅट अॅन अर्ली एज बिकॉज ऑफ हिज स्मोकिंग. टेल हिम समथिंग प्लीज". आता मी काय कपाळ सांगू त्याला. तो बनलाच होता तसा. केअरफ्री. मी विनीतला त्या दिवशी संध्याकाळी ‘ओव्हर अ ड्रिंक’ समजावायचा एक अयशस्वी प्रयत्न करून बघितला………



"देख विनीत"। मी म्हणालो, "जिस दिन तुझे मन सें लगेगा सिगारेट खराब हैं तभी छोडेगा तू मुझे मालूम हैं। और ये बुद्धी जल्दी हूई तो ठीक नहीतो अगले जनम मे पक्का सिगारेट न पिनेवाला खडूस कोन्स्टीपेटेड खुसट बुढ्ढा निकलेगा साला देख"। का कोण जाणे त्याने आज डोळे मिचकावत सिगारेटची तरफदारी केली नाही. शांत राहून बराच वेळ विचार करत राहिला होता माझ्या म्हणण्यावर.



सुट्टीच्या दिवशी बिअर प्यायला मोकळीक असायची. पण फर्स्ट टर्मर्सना सीनियर्सने ती गेटेड करून ठेवली होती. त्या मुळे रविवारी सीनियर्स प्यायचे व हे सत्र संपण्याची व नवीन येणाऱ्या कोर्सचे सीनियर होण्याची आम्ही वाट बघत बिअरची तहान थम्सअपच्या बाटलीवर भागवायचो. बिअर ‘सिएसडी’ कॅन्टिन मध्ये मिळायची. ‘सिएसडी’ कॅन्टिन मध्ये आम्हाला रविवारी जाता यायचे. आर्मड फोर्सेस मध्ये असणाऱ्यांना ‘सिएसडी’ कॅन्टिनची सुविधा असते. त्यात नित्योउपयोगी गोष्टींवर भारत सरकारचा कोणताही कर लागू नसायचा. त्यामुळे काही प्रमाणात गोष्टी स्वस्त असायच्या. हल्ली वॅट पद्धत आल्यावर ही स्वस्ताई कमी झाली आहे. दारू खूपच स्वस्त मिळते. अजून सुद्धा. कारण दारूवर सरकारचा जबरदस्त कर असतो व तो काढून घेतल्यावर दारू स्वस्त होते. जिसीजना बिअर वगळता दुसरी कोठलीही दारू मिळायची नाही, व आम्हा फर्स्टटर्मर्सना तर बिअर पण मिळायची नाही. ‘सीएसडी’ कॅन्टिन जायला पहिले तीन महिने आम्हाला बंदी होती. हल्ली दर रविवारी आम्हाला जाता येऊ लागले होते. ज्या रविवारी लिबर्टीवर डेहराडून गावात जाता यायचे नाही त्या रविवारी आवर्जून आम्ही कॅन्टिन मध्ये जायचो. कॅन्टिन मधून फारसे काही घेण्या सारखे नसायचे. पण कधी कधी कॅन्टिन मध्ये आयएमएत पोस्टेड अधीकाऱ्यांच्या सुंदर पोरी बघायला मिळायच्या तेवढेच नेत्रसुख आपले.



आयएमएतले अजून एक आकर्षण म्हणजे दुपारी मेस मधून जेवण संपवून बाहेर पडताना दिसणाऱ्या पोस्टमनाचे. खाकी पोशाखात सायकल बरोबर उभ्या असलेल्या त्या डाकवाल्याच्या खांद्यावर लटकवलेल्या पत्रांच्या थैली मधून जेव्हा तो आम्हाला आमची पत्र द्यायचा तेव्हा त्याला रोज दिवाळीचे बक्षीस द्यावेसे वाटायचे. घरच्यांकडून व मित्रांकडून आलेली पत्र परत परत वाचली जायची. त्या पत्रांना जीव होता. त्या लिहिलेल्या कागदातून भावना ओसंडून व्हायच्या. आईचे हस्ताक्षर नुसते बघूनच ती जवळ असल्या सारखे वाटायचे. त्या पत्रातल्या लिहिलेल्या ओळींवरून हात फिरवताना, आईला हात लावून मिळणारी तीच उब व तोच उमंग अंगात यायचा. मन प्रसन्न व्हायचे. आता कळते, ती सगळी पत्र लिहिताना व त्यात "सगळे चांगले चालले आहे, काळजी करू नकोस" असे लिहिताना आईने किती गोष्टी लपवल्या होत्या आमच्या पासून. घरात काय कमी अडचणी येत राहतात. सगळ्या काय सांगायच्या थोडीच असतात. आयएमएत जेव्हा एकटे वाटायचे तेव्हा आलेली पत्र काढून वाचल्यावर हिरमूसलेपणा एकदम निघून जायचा. ती पत्र आज वीस वर्षांनंतर सुद्धा वाचून कधी हसू येते तर कधी डोळे पाणावतात. हे सुखं व हा अनुभव हल्लीच्या ईमेल व मोबाईलमय दुनियेला कळणार नाही. फेसबुकची टाईमलाईन सुद्धा इतकी गजबजलेली असते की आपल्या आवडत्या व्यक्ती बरोबर विचारांचा वार्तालाप करताना त्या कृत्रिमपणे ‘लाइक इट’, ‘लाइक इट’ करणाऱ्या फेसबुकच्या पानावर असलेल्या लोकांचा गोंगोट वाटायला लागतो. तसेच त्याच पानावर आजूबाजूला गजबजलेले क्लब, चिक्कार जाहिराती व नकोअसलेले स्पॉन्सर्ड लिंक्स ह्या सारख्या बाकीच्या गोष्टींचा उपद्रव वाटतो. सगळेच कृत्रिम वाटायला लागते व वार्तालाप तिथेच संपतो. उरते फक्त स्वतःच्या भावनांची जाहिरात. केविलवाणी….


(क्रमशः)

Wednesday, February 22, 2012

राजाराम सीताराम एक.....भाग १०....एक गोली एक दुश्मन।.... भाग २




हा तमाशा आटोपल्यावर पुन्हा आमची फायरिंगची कवायत सुरू झाली व दिवसभर चालली. फायरिंग केलीच नाही. कवायतीतल्या चुका काढून आमच्या कडून कष्टदे मिश्राने खूप रोलिंग क्रॉलिंग करवून घेतले. दुसऱ्या दिवशीही तेच. दोन दिवस खूप दमवले. मनसोक्त रॅगिंग घेतले. एकही राउंड फायर न करता आम्ही दोन दिवस नुसता रगडा खात होतो. आता फायरिंगची कवायत अगदी अंगवळणी पडली. दुसऱ्या दिवसाच्या शेवटी कॅप्टन गिल म्हणाला -



गुड यू हॅव फॉलोड द ड्रिल. नाऊ नेक्स्ट टू डेज वी वील फायर. पण दुसऱ्या दिवशीही फायरिंग आम्हाला खूप दमवल्यावरच सुरू झाली. अंगातली रग निघून गेली होती व उरली होती फक्त आदेश पाळता येतील तेवढीच ताकद. फालतू गोष्टी सुचतच नव्हत्या.



कष्टदे मिश्राचे कमांडस् देणे चालूच होते व आम्ही एका यंत्रासारखे त्याच्या कमांडस् वर फायरिंग करत होतो.



डिटेल खडे हो।

त्या बरोबर मांडी घालून बसलेले पाहिले तिनंही डिटेल उभे राहिले.



नंबर एक डिटेल, आगेSSSS बढ। तेज चल।

जसे फायरिंग पॉईंट जवळ पाहिला डिटेल आला तसे,



थम। लेटके पोझिशन।

जिसीनी लेटके पोझिशन घेतली. त्या बरोबर नंबर दोन डिटेलने कदमताल करत नंबर एक डिटेलच्या प्रत्येक जिसी जवळ पाच राऊडस् नी भरलेली मॅगझिन ठेवली.



नंबर एक डिटेल... भर।

मॅगझिन रायफल मध्ये भरली गेली.



नंबर एक डिटेल ३०० मीटर सामने टार्गेट।

त्या बरोबर ‘खालीखोके’ गोळा करण्यासाठी नंबर एक डिटेलच्या प्रत्येक जिसीच्या डाव्या बाजूला रायफल जवळ जॅपकॅपची ओंजळ करून नंबर दो डिटेल चा एकेक जिसी तयार उभा राहिला. नंबर एक डिटेलने रायफल कॉक केली. सेफ्टी लॅच फायर पोझिशन वर आणले व अर्जुनाचा आव आणत टार्गेटवर नेम साधला.



पाच राऊंडस् सिंगल शॉट फायर।

नंबर एक डिटेलच्या प्रत्येक जिसी ने नेम साधत पाच राऊंडस फायर केले. ज्याचे फायर करून झाले त्याने लागलीच सेफ्टी लॅच सेफ वर आणले व आपला डावा हात वरती केला. नंबर दो डिटेलच्या जिसीने आपआपल्या जॅपकॅप मध्ये जमवलेल्या राऊंडस् मोजल्या.



नंबर एक डिटेल खाली कर।

त्या बरोबर प्रत्येकाने मॅगझिन काढून, परत एकदा कॉक करून, टार्गेटच्या दिशेला बॅरल करून चाप दाबून रायफलचे चेंबर रिकामे झाल्याची खात्रीकरत नंबर एक डिटेलचा प्रत्येक जिसी - नंबर एक ठीक, दो ठीक, तीन ठीक..... असे म्हणत फायर पूर्णं झाल्याची कष्ट दे मिश्राला ग्वाही देत होता. त्या पाठोपाठ नंबर दो डिटेलचा प्रत्येक जिसी – नंबर एक ठीक, दो ठीक, तीन ठीक..... असे म्हणत ‘खालीखोके’ ठीक गोळा झाल्याची ग्वाही देत होता.



नंबर एक डिटेल खडे हो। दाए मूढ तेज चल।

त्या बरोबर नंबर दो डिटेल सुद्धा जमवलेले ‘खालीखोके’ घेऊन डावीकडे वळून ‘खालीखोके’ जमा करायला गेला व नंबर तीन डिटेलने यंत्रासारखे टार्गेटपाशी पळत जाऊन किती गोळ्या कोठे लागल्या हे तपासायला सुरवात केली.



ही कवायत बाकीच्या डिटेल्स चे फायरिंग होई पर्यंत आता सुरळीत पार पडत होती. सकाळच्या रगाड्याने जिसीज दमले होते व त्यामुळे बाकी खोड्या काढायचे भान राहिले नव्हते. प्रत्येकाला नेमबाजी करायला पंधरा पंधरा राऊंडस मिळाले होते. केवढा हर्ष होत होता. आयुष्यात पहिल्यांदा खऱ्या रायफली, खऱ्या गोळ्या मारायला मिळाल्या होत्या. दुसऱ्या दिवशीचीही आमची फायरिंग सुरळीत पार पडली. मार्क्स मॅन कोणीच झाले नाही ह्याचे दुःख होत होते. कॅप्टन गिल तरी सुद्धा आमच्यावर संतुष्ट होता.



जंटलमन डोंट वरी अबाउट युअर एमींग स्कील्स. हिअर इन एकॅडमी द एम इज टू पॉलिश युअर फायरिंग ड्रिल. युअर एमींग स्किल्स विल बी ईंपृव्ढ वन्स यू गो टू युअर युनीटस.



जर फायरिंग रेंज वर एवढी शिस्त नाही ठेवली तर अगदी सहजच अपघात घडतात. एक वर्षापूर्वी घडलेल्या एका अपघाता बद्दल, कष्ट दे मिश्रा सांगत होता. कार्बाईनचे फायरिंग चालले होते. फायर करता करता दुसऱ्या डिटेल मधल्या आठव्या नंबरच्या जिसीची गोळ्या भरलेली कार्बाईन चालेना. त्याने सहजच शेजारी उभ्या असलेल्या उस्तादाला त्याबद्दल विचारणा केली. ‘उस्ताद, ये देखो यह कार्बाईन रुक गई’। जेव्हा शेजारी उभ्या असलेल्या उस्तादाकडे जिसीने बघितले तेव्हा त्याच्या नकळत कार्बाईनचे बॅरेलपण उस्तादाच्या दिशेला झाले व सेफ्टी लॅच सेफवर न ठेवल्याने चुकून चाप दाबला जाऊन नकळत गोळ्या सुटल्या. पंचवीस गोळ्या क्षणार्धात बॅरल मधून सुटल्या व थेट त्या उस्तादाच्या व त्याच्या जवळ उभ्या असलेल्या त्या डिटेल मधल्या नवव्या व दहाव्या जिसीच्या आरपार गेल्या. तेथल्या तेथे ते तिघेही मरण पावले. ज्याच्या हातून झाले तो जिसी तर वेडापिसा झाला. त्या जिसीला काढून टाकले गेले पण गेलेले परत का येतात............. वाईट वाटून सुद्धा काही उपयोग होत नाही. क्षणार्धात सगळे संपते.



जसे फायरिंग करताना सावधगिरी बाळगायला शिकवली जाते तसेच युद्धाचे अजून एक तंत्र जिसीच्या मनात बिंबवले जाते.



ते म्हणजे ‘शुट टू किल’. ‘एक गोली एक दुश्मन’। कॅप्टन गिल आम्हाला प्रत्येक फायरिंगच्या वेळेला सांगायचा...



आवर प्रोफेशन इज टू किल. किल द एनीमी. टू सिक्युअर आवर बॉर्डर्स, आवर फायर मस्ट बी इफेक्टीव्ह. वि मस्ट नॉट वेस्ट बुलेटस. एव्हरी बुलेट शूड हॅव द पॉवर टू किल. किल द एनीमी. आर्मी इज नॉट पोलीस.....



.... हवेत गोळ्या झाडणे हे पोलिसांचे काम असते. आर्मी गोळ्या झाडते ते शत्रूला मारण्या साठीच. आर्मीचे सगळे शिक्षण व सराव ह्याच दृष्टिकोनातून केला जातो. सैनिकाच्या बंदुकीतून सुटलेली गोळी मारण्यासाठीच सुटली पाहिजे असेच बिंबवले जाते. ह्याच्याचसाठी सैन्य दलाचा उपयोग फक्त आपल्या देशाच्या शत्रूंविरुद्धच केला गेला पाहिजे. सैन्यदलाची दहशत आहे ती टिकवली पाहिजे. भारतीयसैन्य म्हणजे शत्रूला मारण्यासाठीच आहे हे समजले पाहिजे. भारताच्या अंतर्गत सुरक्षतेसाठी पोलीस व अर्धसैनीकदल आहेत व अशांचा योग्य तऱ्हेने उपयोग करून घेता आला पाहिजे सरकारला. पण भारताच्या अंतरर्गत सुरक्षतेसाठी व ‘एड टु सिव्हिल ऑथॉरीटिज’ साठी भारतीय सैन्य बोलावले जाते तेव्हा आपल्या सैन्यदलाला प्रचंड द्विधा मनस्थितीला तोंड द्यावे लागते. ज्या सेनेला ‘शुट टु किल’ हे शिकवले असते त्या सेनेवर हवेत गोळ्या झाडण्याची पाळी येऊ नाही कधी. असे जर झाले तर भारतीय सेनेला त्याची सवय लागेल व वेळ आल्यावर धनुष्य टाकावा तसे ते हत्यार टाकतील. व असे जर झाले तर कोणी आर्मीला घाबरणार नाही व भारतीय सेना एक बोथट फोर्स होऊन राहील. पोलीस व सेनेत काही फरक राहणार नाही.



भारतीय सेनेने अंतर्गत सुरक्षा साधण्यासाठी ‘शुट टु किल’ या नीतीने समोर दिसणाऱ्या दगड फेकणाऱ्याला किंवा अतिरेक्याला मारले तर, मरणारे शेवटी कोणी तरी उकसावलेले भारतीय नागरिकच असतात. शत्रू नसतात. त्या वेळेला एका सैनिकाच्या भावना किती खेळवल्या व दुखावल्या जात असतील ह्याची कल्पनाच केलेली बरी. ‘एड टू सिव्हिल ऑथॉरीटिज’ मध्ये जर आर्मी बोलवायची वेळ आली असे सरकारला वाटत असेल तर तो भाग आधी ‘अशांत’ म्हणून जाहीर करावा लागतो. मग राज्य सरकारच्या शिफारशीवरून केंद्र सरकार ‘आर्मड फोर्सेस स्पेशल पॉवर्स एक्ट आणते’. ते जर आणले नाही तर आर्मी पोलीस दलासारखी बोथट होईल व कार्यक्षम राहणार नाही. हा अधिनियम नसेल तर भारतीय सैन्य अशा ‘अशांत’ भागात आपले काम करू शकणार नाही व परिस्थिती चिघळू शकते. एवढे लक्षात घेतले पाहिजे की आर्मीला पाचारण नेहमी सरकार करते. स्वतःहून आर्मी कधीच अंतर्गत सुरक्षेमध्ये पडत नाही. आर्मीचे ध्येय देशाच्या शत्रूविरुद्ध लढण्याचे असते व ती त्याच्याचसाठी वापरली गेली पाहिजे..........



आमच्या रायफल फायरिंगच्या शेवटच्या दिवशी कॅप्टन गिलने केलेल्या संबोधनाचा अर्थ काही लक्षात आला नव्हता पण हल्ली तो प्रकर्षाने जाणवतो.



‘आर्मड फोर्सेस स्पेशल पॉवर्स एक्ट’ सप्टेंबर १९५८ मध्ये भारतीय संसदेत पारीत झाला. ह्या संविधाना मुळे सशस्त्रसेनेला ‘अशांत’ भागात काही अधिकार दिले गेले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मन्युष्यावर किंवा जमावावर गोळीबार करण्याचा अधिकार, परवान्या शिवाय पकडून तुरुंगात घालण्याचा अधिकार, परवान्या शिवाय संशयित व्यक्तीच्या घराचा तपास करण्याचा अधिकार, ह्या अधिकारांबरोबरच अजून एक महत्त्वाचा अधिकार ‘अशांत’ भागातल्या जनतेकडून काढून घेतला जातो तो म्हणजे, अशा केलेल्या कृत्यावर कोणीही सेने विरुद्ध कोर्टात केस करू शकणार नाही किंवा एकदा ‘अशांत’ भाग म्हणून घोषित केल्यावर असा घोषित केलेला भाग ‘अशांत’ होता का नाही ह्याचे न्यायीक पुनरवलोकन सुद्धा होऊ शकत नाही. असा नियम केल्यामुळे सशस्त्र सैन्याला कार्यक्षम पणे आपले काम करता येते. युद्धात देशाच्या शत्रूंविरुद्ध हे अधिकार सैन्याला आपोआपच असतात. हे अधिकार जर काढून घेऊन काम करायला लावले तर ते सैन्य अकार्यक्षम होईल. पुढे पुढे भारतीय सेनेला अशा अकार्यक्षमतेची सवय लागेल. शत्रूविरुद्ध गोळी झाडताना आधी परवानगी घ्यायची सवय लागेल. अशा बिघडलेल्या मानसीकते मुळे आपली सेना कोठचेही युद्ध जिंकू शकणार नाही व म्हणूनच ‘आर्मड फोर्सेस स्पेशल पॉवर्स एक्ट’ काढून टाकावा असे जर राज्य सरकार किंवा केंद्रसरकारला वाटत असेल तर सरकारने सैन्याला न बोलावता पोलिसांकडूनच काम करवून घ्यायला सुरवात केली पाहिजे.

(क्रमशः)

Tuesday, December 27, 2011

राजाराम सीताराम ........ भाग ९.....एक गोली एक दुश्मन। भाग एक





एक गोली एक दुश्मन।

SHOOT TO KILL.



असे फायरिंग रेंजच्या प्रवेशद्वाराच्या सुरवातीलाच चुन्याने मोठ्या अक्षरात जमिनीवर कोरलेले असायचे. फायरिंग रेंजवर जाण्या आधीच आम्हाला क्लास मध्ये पिस्तूल, रायफल, मशीनगन, रॉकेट लॉन्चर, मोर्टार, ग्रेनेड ह्यांच्या बद्दल कॅप्टन गिलने माहिती दिलेली होती. मस्केटरीचे क्लासेस बाहेर भरायचे. आयएमएत मुबलक मोकळी जागा असायची. गोलाकार सिमेंटच्या बैठ्या बैठकी असायच्या त्यावर आम्ही बसायचो. आमच्या समोर त्यादिवशी शिकायचे हत्यार ठेवलेले असायचे. उस्ताद आम्हाला हत्याराबद्दल माहिती सांगायचा. ह्याच मस्केटरीच्या क्लास मध्ये उस्तादाने आम्हाला ही सगळी हत्यारे हाताळायला दिलेली होती. मस्केटरीच्या क्लासला खरी हत्यारे नसायची. ही सगळी ‘ड्रिलप्रॅक्टीस’ हत्यारे म्हणजे खऱ्या सारखी खोटी हत्यारे. पूर्वी कधीतरी ती हत्यारे खरी होती व फायरिंगसाठी वापरली जायची. जुनी, बिघडलेली व दुरुस्त करण्याच्या पलीकडे गेलेली ही हत्यारे फेकून द्यायच्या ऐवजी ह्याच हत्यारांचा शिकण्यासाठी व ड्रिलसाठी वापर व्हायचा. उस्तादाने अशाच एका ड्रिलप्रॅक्टीस रायफलीचे जोडलेले भाग सुटे करायला व परत शिताफीने जोडायला शिकवले. त्याने रायफलच्या गोळ्या झाडताना रायफल मध्ये जर तांत्रिक बिघाड आला तर ‘फौरी इलाज’ कसा करायचा त्याचे शिक्षण दिले, रायफल कॉकिंग करायला शिकवले, ‘लेटके’ पोझिशन घ्यायला शिकवली. ह्या पोझिशन मुळे नेम चांगला लागतो. ‘लेटके’ पोझिशन म्हणजे जमिनीवर रायफल घेऊन पालथे पडायचे, दोन्ही पायात अंतर ठेवून पायांच्या तळव्यांची कड टाचे सकट पूर्णं टेकवली गेली पाहिजे. रायफलचा लाकडाचा मागचा भाग म्हणजेच रायफल ‘बट’, आपल्या उजव्या खांद्याला घट्ट टेकले गेले पाहिजे. डाव्या हाताने रायफलचा पुढचा भाग खालून पकडायचा व उजव्या हाताने रायफल कॉक करून त्याच हाताने रायफलचा घोडा तर्जनीने दाबतायेईल अशी रायफलची मूठ पकडायची व रायफलचे सेफ्टी लॅच फायर पोझिशनवर करायचे. मान सरळ ठेवून डोळा, नेम धरायची मागची खोच, नेमधरायचे पुढचे टोक व टार्गेट सरळ रेषेत आणून, आपला श्वास रोखून चाप दाबायचा. चाप दाबल्या दाबल्या गोळी सुटते व उलट बसणाऱ्या जोराने, रायफलच्या बटचा थोडा धक्का आपल्या खांद्याला लागतो. त्याची जाणीव असली पाहिजे व असा जोर घ्यायला आपण तयारीत राहिले पाहिजे. पूर्वी थ्री नॉट थ्री च्या बंदुका असायच्या. असा जोर बसायचा खांद्याला, की जर तयारीत नाही राहिलो तर कधी कधी खांदा निखळायचा. पण हल्लीच्या रायफलींमध्ये नवीन तंत्रज्ञानाने खांद्यावर येणारा जोर खूप कमी झाला आहे. गोळी किंवा बुलेटला राउंड किंवा कार्ट्रीज म्हणतात. कार्ट्रीजचे दोन भाग असतात. मागचा भाग ब्रासचा असतो. त्यात बारूद भरलेले असते. पुढचा भाग शिसे वापरून बनवलेला असतो त्याला थोडे टोक दिलेले असते. जेव्हा रायफलचा चाप दाबला जातो तेव्हा कार्ट्रीजच्या मागच्या भागावर जोरात घाव बसतो, ब्रासच्या आतल्या बारुदाचा स्फोट होतो व तापलेला वायू प्रसरण पावतो. त्या प्रसरण पावणाऱ्या वायूच्या धक्क्याने शिसे असलेला पुढचा भाग म्हणजे गोळी, ब्रासच्या भागाहून उसळी मारून मोकळी होऊन, स्वतःच्या भोवती गरगरा फिरत जोरात वेगाने लक्ष्याचा वेध घेते. रायफल सेल्फ लोडींग असल्या मुळे उरलेल्या गरम वायूच्या धक्क्याने ब्रिचब्लॉक मागे जाऊन रायफल पुन्हा आपोआप कॉक होऊन पुढच्या गोळी साठी सज्ज होते. त्याच वेळेला आता ब्रासचा मागचा मोकळा भाग रायफल मधून बाहेर पडतो. ह्या सगळ्या घडामोडी एकदम घडत असतात. रायफल मधून बाहेर पडलेल्या मोकळ्या भागाला ‘एम्टी राउंड’ किंवा ‘खालीखोका’ म्हणतात. हे सगळे खालीखोके ब्रासचे असल्या मुळे परत वापरता येतात व म्हणून गोळा केले जातात. थ्री नॉट थ्री च्या बंदुकांमध्ये प्रत्येक गोळी साठी प्रत्येक वेळेला हाताने कॉक करावे लागायचे. पण सेल्फ लोडींग रायफलने मॅगझिन मध्ये गोळ्या असेपर्यंत आपोआप रायफलचा ब्रिचब्लॉक मागे येतो. त्यामुळे बुलेटस् दर चापाला सहजच सुटू शकतात. फायरिंग झाल्यावर रायफलचे बॅरल पुलथृला लावलेल्या चिंधीने साफ करावे लागते. रायफलची जपणूक करणे हा फार महत्त्वाचा भाग आहे. नाहीतर पुढच्या फायरिंगला रायफल नीट चालत नाही. रायफल हा जवानाचा युद्धातला सगळ्यात जवळचा साथी असतो व त्याची काळजी घेणे त्याचे परम कर्तव्य असते.



आयुष्यात पहिल्यांदा खऱ्या रायफलने खऱ्या बुलेटस् मला डागायला मिळणार होत्या. हे सगळे ब्रह्मांड मी त्या ड्रिलप्रॅक्टीसच्या रायफलवर शिकून खऱ्या फायरिंगच्या प्रतीक्षेत होतो. शिकण्यात महिना दोन महिने गेले होते. पुढच्या आठवड्यात लॉन्गरेंज वर फायरिंग करायला जायचे. लॉंगरेंज आमच्या रोजच्या ड्रिलस्क्वेअर, क्लासेस व पिटी ग्राउंड पासून साधारण सात ते आठ किलोमीटरवर होते. सायकलनेच जायचे. आठवड्यातले चार दिवस सलग फायरिंग होती. जेवणाची व्यवस्था सुद्धा रेंजवरच होणार होती. ठरलेल्या दिवशी मी डांगरी चढवली. थंडी होती म्हणून आतून स्वेटर घातला. बाहेरून स्वेटर घालताच आला नसता कारण डांगरीच्या गणवेशात, डांगरी, स्मॉल पॅक, जॅपकॅप, बेल्ट, डिएमएस बूट व त्यावर पट्टी एवढेच असते, मग स्वेटर कसा घालणार. गणवेशात आपल्या मर्जीने कोणताही बदल चालत नाही. त्यामुळे मी डांगरीवर स्मॉलपॅक बांधला, पाण्याची बाटली कमरेला पाठीमागे बसेल असा बेल्ट चढवला, पायांत डिएमएस शूज चढवले, जिथे डांगरीचे पाय शूज जवळ येतात तेथे पायाला पट्टी बांधली व सकाळीच शस्त्रागारात जाऊन सर्विस रायफल घेतली. आज पहिल्यांदा खरी रायफल हाताळायला मिळाली. प्रत्येकाच्या नावाची एक सर्विस रायफल होती. रायफलच्या बट वर त्या रायफलीचा नंबर लिहिला असायचा. रायफल घेतली पण आम्हाला बूलेटस रेंजवर गेल्यावरच मिळणार होत्या. रायफल व बुलेटस् सुरवातीला एकत्र कसे देणार. माकडाच्या हातात कोलीत देण्यासारखेच की. आम्ही आठ आठचा स्क्वॉड करून स्टॅन्ड नंबर फाइव्ह, जी आमची फायरिंग रेंज होती तिकडे कुच केले.



स्टॅन्ड फाइव्ह वर पोहोचलो. सायकली लावल्या व इन थ्रिज फॉलीन झालो. आता एव्हाना आम्हाला कोणाला सांगायला लागायचे नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच व्हायच्या. इन थ्रिज फॉलीन न होता असे जमावासारखे उभे राहिले तर प्रत्येकाला कसेसे वाटायला लागायचे.



जिसीज साSSSSवधान. आठवड्याचा कोर्स सीनियर मी होतो. मार्च करत मी कॅप्टन गिल कडे गेलो. थम. एक दो. करून उजवा हात शिताफीने उचलून डाव्या हाताच्या खांद्यावर मारला. जेव्हा रायफल स्लिंगला लावून ती डाव्या खांद्यावर लटकवलेली असते तेव्हा नेहमी सारखा उजवा तळ हात डोक्याच्या कडेला लावून सॅल्यूट नसतो करायचा हे आता ड्रिल करून करून व शिक्षा झेलून झेलून पक्के झाले होते.



गुड मॉर्निंग सर. 120 जिसीज प्रेझेंट फॉर फायरिंग सर.



कॅप्टन गिलने सॅल्यूट करून माझ्या सॅल्यूटला उत्तर दिले व आम्हाला म्हणाला -



गाईज नेक्स्ट फोर डेज इज फायरिंग ड्युरींग द डे. वन्स् यू फिनिश धिस देअर विल बी नाइट फायरिंग. लर्न इट प्रॉपर्ली. धिस इज युअर मोस्ट इम्पॉर्टन्ट फेज ऑफ ट्रेनिंग. रिमेमबर द मोर यू स्वेट इन पीस द मोर यू सेव्ह ब्लड ड्यूरींग वॉर.

जितना पसीना आभी बहाओगे । उतना खून लडाईमे बचाओगे ।



येस सर. आमचा सांघिक आवाज त्या स्टॅन्ड नंबर फाइव्ह मध्ये दुमदुमला. आम्ही उतावीळ झालो होतो.



गाईज. यू विल बी हॅन्डलींग रिअल बुलेट राऊंडस अॅन्ड इट इज डेंजरस इफ इनफ प्रिकॉशन इज नॉट टेकन. डिसिप्लीन इज पॅरामाऊंट व्हाइल फायरिंग. आदर वाईज यू विल अॅन्ड अप किलींग युअर ओन फोर्सेस, युअर ओन मेन, रादर दॅन एनीमी फोर्सेस. डोन्ट फरगेट द बेसिक डिसिप्लीन बॉइज..... अॅन्ड वी वील एनशूअर, डॅट यू डोन्ट फरगेट इट. बेस्ट ऑफ लक. विSSSSश्राम.



मॅकटीला कंपनी सावधान. आमचा उस्ताद, हवालदार इष्ट देव मिश्राने आता आमचा ताबा घेतला. आम्ही त्याला नंतर नंतर कष्ट दे मीश्रा म्हणायला लागलो. कष्ट दे मिश्राने आल्या आल्या आमचे ‘ट्रेनिंग’ सुरू केले. सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला दहा दहाच्या बारा डिटेल्स् मध्ये वाटले गेले. फायरिंग करतानाची कवायत कष्ट दे मिश्राने समजावून सांगितली.



एका वेळेला तीन डिटेल्स्. दहा फायरिंग पॉईन्टस् मागे इन थ्रिज आपली आपली रायफल डाव्या खांद्याला टेकवून जमिनीवर मांडी घालून बसा. जेव्हा पहिले डिटेल फायरिंग पॉईन्ट वरून फायरिंग करत असेल तेव्हा दुसरे डिटेल पहिल्या डिटेलच्या प्रत्येक जिसी मागे फायरिंग करताना खालीखोकी उडतात ती आपल्या जॅपकॅप मध्ये साठवून घेण्यासाठी सज्ज असले पाहिजे. फायरिंग करून झाल्यावर फायरिंग टार्गेट्स पर्यंत पळत जाऊन प्रत्येक जिसीचा फायरिंग स्कोर टिपण्यासाठी तिसरे डिटेल. अशी कवायत अविरत फायरिंग संपे पर्यंत चालत राहिल. फायरिंगची ही कवायत अत्यंत चोखपणे चालावी लागते नाहीतर अपघात होतात. कारण भरलेली रायफल हातात असणार, बुलेटस् खऱ्या असणार, थोडीशी सुद्धा हलगर्जी झाली तर शेजारचा जीवानिशीच जाईल. म्हणून रायफलचे बॅरल नेहमी टार्गेटकडेच रोखून ठेवलेले असावे. बेसावधपणे ते जर इकडे तिकडे फिरवले व चुकून रायफलच्या चापावर बोट पडले तर आजूबाजूचे हकनाक मरतील. आम्हाला घाम फुटला, त्या आजूबाजूला आम्हीच तर होतो.



कष्ट दे मीश्रा आम्हाला फायरिंगच्या कवायतीचे बारीकसारीक पैलू सांगत होता. त्याच्या खड्या आवाजात आम्हाला ऑर्डर देत होता.



डिटेsssल खडे होs।

त्या बरोबर मांडी घालून बसलेले व डोक्यावर हेल्मेट लावलेले, पहिले तिन्ही डिटेल उभे राहिले.



नंsssबरएक डिटेल आगेssss बढ। तेज चल।

जसे फायरिंग पॉईन्ट जवळ पाहिला डिटेल आला तसे....



थम्। लेsssटके पोझिशन्।

जिसीनी लेटके पोझिशन घेतली.

खराssssब.... एकदम खराssssब। पहिल्या डिटेलची लेटके पोझिशन कष्ट दे मिश्राला आवडली नसल्या मुळे तो जोरात किंचाळला.



खडे होsss। फिर एकबार लेsssटके पोझिशन................ असे बऱ्याच वेळेला प्रत्येक डिटेल कडून करवून घेतल्या शिवाय कष्ट दे मिश्राला चैन पडायचे नाही. तेवढ्यात एका लेटके पोझिशन मध्ये माझ्या डांगरीच्या अस्तनीतून बाहेर डोकावणारा आतून घातलेला स्वेटर कष्ट दे मिश्राच्या नजरेस पडला.



ये जिसी फॉल आऊट। बहोत ठंड लगती हैं जिसीको। आभी गरमी लाता हूं।

मला डिटेलच्या बाहेर काढले.

सुरू न झालेली बाकीच्या डिटेलची फायरिंग तेथेच थांबली. पाहिलाच डिटेल.



जिसी आकाश, आपकी रायफल नीचे रखो।

डांगरी उतारों।



मला सगळ्यांसमोर डांगरी उतरायला लावली. डांगरी उतरल्यावर मी आत घातलेला मरून रंगाचा स्वेटर दिसायला लागला. पाठीमागे अमित, सुब्बू, परितोष, सुनील खेर ह्या सगळ्या माझ्या प्लटूनच्या जिसींबरोबर बाकी अनेक जिसींचे फिदीफिदी हसणे मला ऐकायला येत होते. खूप राग आला होता व सगळ्यांसमोर बीना डांगरीचे उघडे उभे राहायला लाज पण वाटत होती. थंडी वाजत होती ती वेगळीच.



वर्दी ठीक क्यो नही पेहनते आप लोग। ये प्रायवेट स्वेटर जो डांगरीके अंदर था वो निकालो। ऐसा गलत ड्रेस पहनननेका पर्मिशन किसने दिया आपको।



ये माचीस लेलो। कष्ट दे मिश्राने त्याची सिगारेट शिलगावण्याची माचीस काढून माझ्या हातावर दिली. मी कष्ट दे मिश्राकडून काडेपेटी घेऊन परत उभा राहिलो. मला अंधुकशी कल्पना आली आता काय होणार त्याची.



जिसी आकाश, अब बीना देर किये आपका ये प्रायव्हेट स्वेटर उतारो और जलाओ। मी तो स्वेटर पेटवला, डोळ्यात पाणी आले, तो स्वेटर तिकडे थंडी असेल म्हणून माझ्या आईने तिच्या स्वेटर विणायच्या मशीनावर विणून दिला होता. रोज रात्री झोपताना घालायचो. आई जवळ असल्याचा भास व्हायचा. दिवसभर दमल्यावर आईच्या कुशीत झोपल्या सारखे वाटायचे. ज्या गोष्टींवर आपली खूप आस्था असते अशा गोष्टी दुसरा माणूस कधीकधी सहजच तुडवून जातो. ह्यात आपण कोणाच्या आस्थेला धक्का पोहचवला आहे हे त्याच्या खिजगणतीत सुद्धा नसते. त्याच्या दृष्टीने तो एक साधा स्वेटर होता पण तोच स्वेटर माझा कमफर्ट झोन होता. कधी कधी आयुष्यात अशा गोष्टी घडतात आणि त्या सुद्धा अचानक. अचानक घडल्या मुळेच आपण कदाचित तोंड देऊ शकतो. कोठून स्वेटर घालायचे मनात आले असे झाले मला. पाठीमागून परत एकदा मुलांचे हसणे ऐकायला आले. फिदीफिदी हसणे ऐकून कॅप्टन गिल आला. त्याने बाकीच्या जिसीजना फर्मावले.



जोकर्स, लाफिंग अपॉन युअर फेलो जिसी. वेट आय विल रब दॅट स्माईल फ्रॉम युअर फेस.



मग दूरवर एका झाडाकडे बोट दाखवत त्यांना म्हणाला. मॅकटीला कंपनी सावधान, सामने देख। आठसो मीटर सामने, एक किकर का पेड। नाम किकर।



एव्हाना सगळ्या जिसींना ते आठशे मीटर दूर बाभळीचे झाड दिसू लागले. कॅप्टन गिलचे चालूच होते.



उस किकर को दाये छोडके आना। पहले तीन लुंगा। बाकीची मुले छू झाली व मला मनातल्या मनात गुदगुल्या व्हायला लागल्या. बऱ्याच वेळाला त्या झाडाला शिवून झाल्यावर कॅप्टन गिलने, ज्यांनी ज्यांनी आतून स्वेटर घातले होते त्यांना काढायला लावून त्याची होळी पेटवली. किती जणांच्या आस्था त्या होळीत पेटल्या गेल्या असतील आम्हालाच ठाऊक. त्या दिवसा पासून पुढे कधी कोणी गणवेशात स्वतःहून फेरबदल करण्याच्या भानगडीत पडले नाही.

Wednesday, November 16, 2011

राजाराम सीताराम..............भाग ८

शिक्षा



बजरीऑर्डरच्या शिक्षेमध्ये डांगरी किंवा कॅमोफ्लॉजच्या गणवेशावर रुट मार्चच्या वेळेला पाठीवर लादल्या जाणाऱ्या स्मॉलपॅक्स किंवा बिगपॅक मध्ये सामाना ऐवजी टॉन्स नदीच्या किनाऱ्यावरली वाळू व गोटे भरावे लागायचे. डांगरी किंवा कॅमोफ्लॉजचा गणवेश बॉयलर सुटा सारखा अखंड असतो. ह्या गणवेशाला बरेच खिसे असतात. अंगरख्याच्या वरच्या भागावर म्हणजे छातीवर येतील असे दोन खिसे व अंगरख्याच्याच खालच्या भागावर दोन्हीकडे दोन खिसे. तसेच विजारीला दोन्ही बाजूंना दोन, मागे कुल्ल्यावर दोन व दोन्ही नडग्यांच्या बाजूंना दोन खिसे. ह्या सगळ्या खिशांतून सुद्धा वाळू भरलेली असली पाहिजे. अशी वाळू भरली की गणवेश खूप जड होतो व गणवेश चढवल्यावर फार अडचण वाटायची. साधारण पंधरा ते वीस किलो वजनाची ती वाळू किंवा हिंदी मध्ये बजरी, भरल्या मुळे डांगरी चांगलीच जड व्हायची. एवढेच काय कमरेच्या मागे बेल्टला लटकवलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटली मध्ये सुद्धा पाणी फेकून देऊन वाळू भरावी लागायची. मग असा वाळूने म्हणजेच बाजरीने भरलेला पॅक घेऊन जिसीला उभे राहायला लावायचे का, काही अंतर पळायला सांगायचे ते शिक्षा देणाऱ्या डिएसच्या मर्जीवर अवलंबून असायचे. ह्या शिक्षेत पाठीची अक्षरशः वाट लागते. मणक्याला ते टॉन्स नदी मधले गोटे टोचत राहायचे.



बिगपॅक मध्ये बजरी ऐवजी जर कॅम्पचे सामान घातले तर त्याला चिंडीटऑर्डर म्हणतात. ह्या चिंडीटऑर्डरचा पॅक जरा मोठा असायचा. कांबळे, मच्छरदाणी, खायचा डब्बा, दाढीकरायचे सामान, विजेरी, खायचे सामान इत्यादी सगळ्या मिळून पन्नास गोष्टी भराव्या लागायच्या. शिक्षेमध्ये उस्ताद कधी कधी तो पॅक तपासायचा, आपले नशीब वाईट असेल व तपासा मध्ये एक जरी गोष्ट त्याला कमी आढळली की अजून शिक्षा वाढायची. चिंडीट हा शब्द दुसऱ्या महायुद्धातल्या चिंडीट स्पेशल फोर्सेस वरून पडला आहे. चिंडीट नावाची एक स्पेशल फोर्स, ब्रिटिश सेनांनी ब्रिगेडियर विनगेटने तयार केली होती. चिंथे नावाच्या योध्याला ब्रह्मदेशातली जनता देवस्वरुप मानते. तो ब्रह्मदेशातल्या मंदिराची राखण करतो असे तेथील लोकांचे मानणे आहे. त्यावरून त्या स्पेशल फोर्सला चिंडीट हे नाव ब्रिगेडियर विनगेटने दिले होते. महायुद्धात स्पेशल फोर्सेसना ब्रह्मदेशातली महाकाय इरावडी नावाची नदी, तसेच घनदाट जंगले पार करावी लागायची व त्यास उपयुक्त असे सामान घेऊन जावे लागायचे. चिंडीटऑर्डर मध्ये अशा प्रकारचे सामान बांधलेले असते. नद्यानाले पार करताना चिंडीटऑर्डर उपयोगी पडते. आयएमएत चिंडिटऑर्डरचा अर्थ हे सगळे सामान मोठ्या पॅक मध्ये बांधायचे व निर्देशवल्या ठिकाणी हजर राहायचे. ह्या शिक्षेने तसे सामान बांधण्याची सवय होते.



मंदिर दाये छोड ही गमतीदार शिक्षा असायची. डिएस एखादे लांबवर दिसणारे मंदिर, जिसीला बोटाने दाखवायचा व म्हणायचा ‘त्या’ मंदिराला शिवून ये. मग जिसी दूरवर दिसणाऱ्या ‘त्या’ मंदिराच्या दिशेने पळत जायचा व मंदिराची प्रदक्षिणा घालून यायचा. अगदी ‘स्टिपलचेस’ मध्ये जसे पळावे लागते तसेच. कोठचे मंदिर दाखवायचे ते डिएसच्या मनावर अवलंबून असायचे. कधीकधी ते मंदिर दोन किलोमीटरवर असायचे कधीकधी डिएस खूप चिडला असेल तर पाच किलोमीटर दूर असलेल्या मंदिराकडे बोट दाखवले जायचे. ह्या सगळ्या शिक्षांमध्ये हॅकलऑर्डरची शिक्षा सोपी असायची. हॅकल लावलेली बॅरे घालून जायचे एवढेच काय ते असायचे.



केबिनकबोर्ड ही शिक्षा म्हणजे खोली आवरण्याची शिक्षा. केबिनकबोर्डच्या शिक्षेत आपण राहत असलेल्या खोलीचे डिएस इन्सपेक्शन करायचा. खोली कशी असली पाहिजे व कशी आवरलेली पाहिजे हे सीनियर्सने ठरवून एक पायंडा घातलेला असतो. केबिनकबोर्ड मध्ये सगळ्या वस्तू तशाच ठेवल्या गेल्या पाहिजेत. कपडे, गणवेश, जोडे, दाढीचे सामान, बाकीच्या चीजवस्तू सगळ्यांच्या नेमून दिलेल्या जागी असल्या पाहिजेत व नीट घडी घातलेल्या व स्वच्छ असल्या पाहिजेत. कपाटातल्या प्रत्येक घडी केलेल्या कपड्यातून एकसारखा कापलेला पुठ्ठा घातलेला असायचा म्हणजे घातलेली घडी उठावदार व एकसारखी चौकोनी किंवा आयताकृती दिसते. सामानाची ट्रंक एका ओळीत पलंगाच्या बाजूला असली पाहिजे. रूमच्या कोपऱ्यात किटबॅग असली पाहिजे. मला जेव्हा पहिल्यांदा केबिनकबोर्डची शिक्षा मिळाली तेव्हा बाकीचे आवरून झाल्यावर लाल कोबा केलेल्या जमिनीला बाकीच्यांप्रमाणे मीही हाताने पॉलिश करून मोठ्या आत्मविश्वासाने खोलीच्या दारा बाहेर कॅप्टन गिलच्या प्रतीक्षेत तपासणीसाठी विश्राम ठोकून मागे हात बांधून उभा होतो. कॅप्टन गिल जसा माझ्या खोलीच्या दिशेने माझ्याकडे यायला लागला तसा मी डावा पाय कदमतालासारखा वर करून उजव्याच्या शेजारी हापटून, पाठीमागचे हात सरळ रेषेत बाजूला आणून सावधान झालो. ‘सर, केबिन इज रेडी फॉर युअर इन्सपेक्शन सर’ असे मोठ्या आवाजात त्याला रिपोर्ट केला. कॅप्टन गिल आत गेला. सगळे पाहिल्यावर त्या प्राण्याने स्टडी टेबलाशी जाऊन टेबलाच्या तक्त्याच्या उलट बाजूने बोट फिरवले. ते धुळीने भरलेले बोट माझ्या जितके जवळ आणता येईल तितके आणून माझ्या नाकावर पुसत म्हणाला ‘धिस इज युअर ब्लडी स्टॅंडर्ड ऑफ द केबिनकबोर्ड’. आपल्याला अजून किती शिकायचे आहे, हे मला त्याच क्षणी कळून चुकले.



अजून एक शिक्षा होती जी सगळ्यात कठीण व कठोर अशी मानली जायची. त्यात अशा शिक्षेस पात्र जिसीसाठी वेगळे वेळापत्रक ठरवून दिलेले असते. अशा शिक्षेस रेस्ट्रिकशन्स् असे म्हटले जाते. अशा रेस्ट्रिकशन् मध्ये आताच वर्णन केलेल्या सगळ्या शिक्षा दिवसभरात केव्हा ना केव्हा वेळापत्रकाप्रमाणे कराव्या लागायच्या. परत रेस्ट्रिकशनस् मध्ये रविवार किंवा कोठचीही सुट्टी नसते. लिबर्टी गेटेड होते म्हणजे आयएमएतून रविवारी बाहेर जायला परवानगी नाही मिळत. जिसी हे सगळे करता करता अगदी जेरीला यायचा. ह्या शिक्षे मध्ये जिसीचा दिवस सकाळी चार वाजता सुरू व्हायचा – सकाळी चार वाजता जिसी, ड्रिलस्क्वेअरवर हॅकलऑर्डर मध्ये रिपोर्ट करायचा. तशात आयएमएतली अंतरे एवढी लांबलांब असायची की ड्रिलस्क्वेअर दोनतीन किलोमीटर दूर असायचे. सायकल वरून जायला लागायचे. रेस्ट्रिकशनवर असलेला जिसीला स्क्वॉड शिवाय एकट्याला सायकल वरून जायची सूट होती. हे झाल्यावर मग जेवणा पर्यंत जिसीचा नेहमीचा ठरलेला दिनक्रम बाकीच्या आयएमएच्या वेळापत्रकाप्रमाणे चालायचा. दुपारी जेव्हा बाकीचे जिसी एक तासाची विश्रांती घ्यायचे त्या वेळात ही शिक्षा झालेला जिसी एक्स्ट्रॉ ड्रिल, ड्रिलच्या पोषाखात करायचा. परत दुपारी बाकीच्या जिसीज बरोबर गेम्स परेड चालायचीच. संध्याकाळी स्मॉलपॅक लावून व रायफल घेऊन बॅटलऑर्डर मध्ये ५ किलोमीटरची दौड लागायची. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता परत ड्रिलस्क्वेअर वर हॅकल ऑर्डर मध्ये रिपोर्ट द्यावा लागायचा. संध्याकाळी बाकीच्या जिसीजना अभ्यासासाठी जेव्हा वेळ मिळायचा त्या वेळेला ह्या शिक्षेत जिसी रात्रीच्या चिंडीटऑर्डरची तयारी करायचा. जेवणाच्या आधी आमचा जेयुओ भुल्लर त्या जिसेचे केबिनकबोर्ड इन्सपेक्शन करायचा. पुढे रात्री अकरा वाजता अशा जिसीला चिंडीटऑर्डर मध्ये ड्रिलस्क्वेअरला रिपोर्ट करावे लागायचे. रात्री अकरा वाजता त्याच्या पॅक मधले सामान त्याच्याच पॅक मध्ये असणाऱ्या विजेरीने तपासले जायचे आणि एकही गोष्ट ठेवायची राहिली की मग अशी शिक्षा अजून एका दिवसाने वाढायची. हा ह्या कठोर शिक्षेचा अजून एक नियम. असा हा खास वेळापत्रकाने बांधलेला ह्या शिक्षेचा एक दिवस. किती दिवस अशी शिक्षा झेलायची ते जिसीच्या चुकीवर अवलंबून असे. परेडला लेट आला तर साधारण तीन दिवस अशी शिक्षा मिळायची त्या शिक्षेला थ्री रेस्ट्रिकशनस् किंवा थ्रिडेज असे संबोधले जायचे. पोषाख वाईट असेल तर एक दिवसाची अशी वन रेस्ट्रिकशन मिळायची. गंमत अशी की शिक्षा करताना जर काही चूक झाली तर मागे सांगितल्या प्रमाणे शिक्षेत हळूहळू वाढ व्हायची. एका टर्म मध्ये जिसीला जर अशी कठोर शिक्षा मिळून अठ्ठावीस रेस्ट्रिकशनस् पेक्षा जास्त रेस्ट्रिकशनस् मिळाल्या तर त्या जिसीचे आपोआप रेलीगेशन व्हायचे. प्रत्येक मिळालेल्या रेस्ट्रिकशनला जिसीचे ‘ओएलक्यू’ पॉईंटस् कमी होतात व तो स्पर्धेत मागे पडायला लागतो. ह्या सगळ्या मुळेच सगळ्यात कठोर अशी ती शिक्षा असायची व साधारण जिसीला एका वेळेला ‘टेन रेस्ट्रिकशनस्’ पेक्षा जास्त ही शिक्षा मिळायची नाही. ह्या कठोर शिक्षेचा हिशोब प्रत्येक जिसी ठेवायचा व शिक्षा कमीत कमी होईल असे आपले वर्तन सांभाळायचा.



सामूहिक गोंधळ घातला तर ‘मास पनिशमेंट’ ठरलेली. एकदा आम्हाला ऑडिटोरियम मध्ये एका नामवंत व्यक्तीचे भाषण ऐकायला पाठवले होते. अशी भाषणे बरीच व्हायची. आम्हाला अशी भाषणे खूप आवडायची. सभामंडपातील दिवे मालवले व भाषण सुरू झाले की आम्ही छान पुशबॅक खुर्चीत बसल्याबसल्या जागच्या जागीच झोपून जायचो. भाषण संपल्यावर दिवे लागायचे तेव्हाच जाग यायची. सभागृह एकदम शांत राहायचे. त्या दिवशी भाषणात असेच आम्ही सगळे झोपलो होतो. तेवढ्यात एका जिसीला ठसका लागला व चांगलाच लागला. आम्हाला जाग आली. मस्ती तर अशी अंगात होती की आमच्यातले काही जिसी उगाचच ठसका काढू लागले. काही वेळातच सभाघृहातून ठसक्याचा आवाज घुमायला लागला. जिसीजना मजा येत होती. उगाचच ठसका काढत होते. त्या दिवशी ते एक तासाचे भाषण संपल्यावर चिडलेला एडज्युटंट कर्नल मारुफ रझाने आयएमएच्या एकॅडमी कॅडेट एडज्यूटंटला बोलवून आमच्या वर्तनाबद्दल खूप झाडले. आयएमएचा एकॅडमी कॅडेट एडज्यूटंट थर्ड टर्मर एसीए परमविरसिंग सांगा ने आम्हाला नंतर संबोधले...



यू ब्लोक्स यू थिंक यू आर हेल ऑफ चॅप्स क्रियेटींग डिसऑर्डर. आय निड टू सॉर्ट आऊट यू एंड युअर थ्रोटस.



असे म्हणत त्याने फर्मान सोडले की पुढच्या तीन रात्री मानेकशॉ बटालियन मधील सगळे फर्स्ट आणि सेकंड टर्मर्स रात्रभर दर दोन तासांनी बटालियन पिटी ग्राउंडवर येऊन गार्गलींग करतील. पुढचे तीन रात्री आम्ही सगळे दर दोन तासाने प्लॅस्टिकचा मग घेऊन इनथ्रिज फॉलीन होऊन गार्गलींग करत होतो. सुक्या बरोबर ओले जळते. आयएमएत नेहमीच असे होते.



वेगवेगळ्या शिक्षा व सीनियर्सच्या रॅगिंग मुळे आयएमएत खूप अडचणी होत्या पण तरी सुद्धा कसलीही दुःख नव्हती. सामूहिक शिक्षांमध्येही एक मजा असायची. सगळेच करायचे त्यामुळे हसत खिदळत असल्या अडचणी पार करायचो. अशा एकत्र उपभोगलेल्या शिक्षांनी आमच्या नकळत आमच्या कोर्सच्या मुलांमधली दोस्ती वृद्धींगत होत होती.

(क्रमशः)

Tuesday, November 1, 2011

राजाराम सीताराम .............. भाग ७



ड्रिलस्क्वेअर

आमचे पोहण्याचे तास सुरू झाले होते. त्या थंडीत पोहणे येत असताना सुद्धा विसरल्या सारखे वाटायचे मग न येणाऱ्यांची कथा काही आगळीच. पोहण्याचा तास जर सकाळचा असला तर अजूनच थंडी कुडकुडायची. आमच्यातले जेवढे केरळातले त्यांना आम्ही ‘मल्लू’ म्हणायचो. मल्लू व बंगालचे ‘बॉन्ग्स’ त्यांना पोहणे हमखास यायचे. महाराष्ट्रातले ‘तांत’ किंवा ‘कढी’ जिसी, व उत्तर भारतीय, यांतील काहींना पोहणे जमायचे व काहींना नाही. जर का एनडीएतले ‘नंगे’ सोडले तर आंध्रप्रदेशातल्या ‘गुलटी’ जिसीजना, पोहणे मुळीच जमायचे नाही. पंजाबातले ‘सर्डी’ किंवा ‘पापे’ ह्यांना बहुतेक करून पोहणे यायचे. मल्लू, बॉन्ग, कढी, तांत, गुलटी, सर्डी, पापे, तंबी, अण्णा, बबूवा हे प्रांतवार खिताब आयएमएत मोठ्या दिमाखात राबतात. कोणाला फारसे त्यात काही गैर आहे असे वाटत नाही व कोणाला त्यात वावगे वाटत नाही. आयएमएतल्या रॅगिंगने व एकत्र राहून होणाऱ्या सलगीने म्हणा, असल्या गोष्टींचे मनाला लावून घेणे कधीच संपलेले होते.



पोहण्यामध्ये आमच्या दोन टोळ्या बनवल्या गेल्या – एक टोळी पोहणे येणाऱ्यांची व दुसरी न येणाऱ्यांची. ज्यांना पोहोणे येत होते त्यांना लागलीच पोहायच्या तासाला पोहायला मिळायचे व ज्यांना येत नव्हते त्यांना पोहणे शिकवले जायचे. पोहायला न येणाऱ्यात काही पाण्याला घाबरणारे जिसी असायचे. त्यांचे हाल काय व्हायचे ते कल्पनेतूनच कोणाला कळेल. स्विमींगट्रंक घालून कोणाला जरका जमिनीवर पोहायला सांगितले व हातपाय मारत पोहत पोहत जमिनीवरच पुढे जायला सांगितले व असे पोहण्याचा तासभर करायला लावले तर पाण्याचे भय विसरून तो जिसी पुढच्या तासाला आपणहून पाण्यात उतरून हातपाय मारायला शिकायला लागेल, आणि व्हायचेही तसेच. पाण्याला घाबरण्याचा नखरा पोहोण्याच्या पहिल्या तसाच्या पहिली पाच मिनटेच चालायचा. पोहणे न येणारे व पाण्याला घाबरणारे काहीच दिवसात मजेत पोहताना दिसायचे. पहिल्या सत्रात १०० मीटर पोहणे व दहा मीटरवरून पाण्यात उडी मारणे हा अभ्यास होता. ज्याला हे जमायचे नाही त्याचे रेलिगेशन ठरलेले. जमिनीवर पोहायला शिकल्यावर क्वचितच कोणी जिसी पोहण्यासाठी रेलीगेट झालेला आढळायचा.



पोहणे किंवा पिटी परेड संपली की आमचा ड्रिलचा तास असायचा. ड्रिलस्क्वेअर मध्ये जाऊन ड्रिल करणे आता अंगचाच भाग झाल्या सारखे झाले होते. चेटवोड हॉलच्या पुढ्यातले ते ऐसपैस ड्रिलस्क्वेअर, जवळ जवळ पाचशे मीटर लांबी रुंदीचे चौकोनी डांबरीकरण केलेले कवायतीचे मैदान आम्हाला जणू ड्रिलसाठी साद घालायला लागले होते. लांबूनच ड्रिलचे कमांडस् ऐकायला यायचे..... स्क्वॉड आगे चलेगा.......... आगेसेssssss तेज चल. एक दो एक....... एक दो एक....... उंच आवाजातल्या कवायतीच्या ह्या आदेशांबरोबरच मोठ्या ढोलावर वाजवलेले ढम ढम दूरदूर पर्यंत एकसारखे ऐकायला यायचे. एकाच लयीत एक ड्रिलउस्ताद ढोल वाजवत राहिलेला आढळायचा. ड्रिलबुटांखाली लावलेल्या तेरा खिळ्यांनी सज्ज असे बूट घालून जेव्हा ड्रिलस्क्वेअर मध्ये जिसी यायचा तेव्हा त्या खाडखाड वाजणाऱ्या बुटांच्या आवाजानेच ड्रिलचे वातावरण निर्माण व्हायचे. सकाळच्या तिरप्या उन्हात ड्रिलकरताना वेगळाच उत्साह यायचा. थंडीच्या दिवसात, ड्रिलस्क्वेअरच्या चहुबाजूला बहरलेल्या चाफ्याच्या झाडांच्या फुलांचा मंद सुगंध वातावरणात दरवळलेला असायचा. ड्रिलकरताना त्या सतत येणाऱ्या सुगंधाने इतके बरे वाटायचे. प्रत्येक जिसी पासिंग आऊट परेडची स्वप्ने रंगवत अजूनच जोरात पाय आपटायचा.



ढम ढम वाजणाऱ्या ढोलाच्या तालावर आमची कवायतीची तालीम चालायची…………… एक दो एक.... एक दो एक.... एक दो एक थम एक दो...... ड्रिल करताना पहिल्यांदा डाव्या पायाने सुरवात करून पाय घुडग्यात न वाकवता पुढे नेऊन परत खाली आणताना ‘एक’ वर जोरात हिल डीग करायची व त्याचवेळेस तडक उजवा पाय घुडग्यात न वाकवता पुढे नेऊन परत खाली आणून ‘दो’ वर हिल डिग करायची. हात कोपऱ्यात न वाकवता नीट शिताफीने पुढे लंबकासारखा फिरवायचा, परत आणताना जेवढा पुढे नेला तेवढाच तो मागे पण गेला पाहिजे हे लक्षात ठेवायचे मात्र. त्याने ड्रिलमध्ये डौल येतो....



‘ये जिसी सुब्रमण्यम हिल डिग हिल डिग’. असा आमचा ड्रिल उस्ताद हवालदार किसनलाल नेहमी म्हणायचा. हिल डिग म्हणजे कवायत करताना आपला पाय खाली आणताना आपली टाच जोरात जमिनीला मारायची व रुतवायची जमिनीवर. उस्ताद किसनलाल आम्हाला म्हणायचा, टाचेला लागलेल्या घोड्याच्या नालेचे चित्र उमटले पाहिजे जमिनीवर. बऱ्याच जिसीजना सुरवातीला हे जमत नाही. मग सुब्रमण्यम असणारच असल्या न येणाऱ्यांच्या यादीत.



ड्रिल शिकवणाऱ्या उस्तादांबरोबर उमद्या घोड्यावर बसलेला आमच्या अॅकॅडमीचा अॅडज्यूटंटचे दर्शन घडायचे. तो घोड्यावर बसून लांबूनच ड्रिलच्या तासाला आमच्या तुकडीच्या ड्रिल प्रॅक्टिसचे निरीक्षण करायचा. अॅकॅडमीचा अॅडज्यूटंट म्हणजे दंडपाल. अॅकॅडमीत शिस्त राखण्याचे त्याचे खास काम. त्यामुळे आम्ही त्याला घाबरून असायचो. लेफ्टनंट कर्नल मारुफ रझा आमचा अॅडज्युटंट होता. भयंकर कडक शिस्तीचा. पुढे काही वर्षाने हाच लेफ्टनंट कर्नल मारुफ रझा निवृत्त झाल्यावर पॉलिटीकल अॅनालिस्ट म्हणून वेगवेगळ्या टीव्ही वाहिनीवर दिसणार होता आम्हाला. कोणी जिसी नीट कदमताल किंवा सांगितलेली कवायत करत नसेल तर लांबूनच तो घोड्याच्या चाबकाने इशारा करायचा. त्या बरोबर उस्ताद जोरात ओरडायचा



‘ये जिसी फॉल आऊट. रायफल उपर और दौडकेssssचल। दौडके अॅडज्यूटंट के पास जाओ।‘



बहुतेक वेळेला कवायती मध्ये आमच्या सुब्बूचीच वेळ यायची असे अॅडज्यूटंट पर्यंत जाण्याची. मग सुब्बू हात वर करून स्वतःची रायफल डोक्यावर आडवी धरून पळत जायचा अॅडज्यूटंटच्या पुढ्यात. त्याच्या त्या ढिल्या ऑन डबल्स कडे कुत्सित नजरेने बघत करड्या आवाजात एडज्युटंट ओरडायचा –



‘डोंट वॉक लाइक ए प्रेगनंट डक. यू मोरॉन, रन फास्ट. ’



एक दो एक..... एक दो एक स्क्वॉड थम एक दो। जिसी सामने सॅल्यूट करेगाssssssssss सॅल्यूट - राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो. ड्रिल मध्ये जर बरोबर ठिकाणी पॉज दिला नाही तर कवायतीत उमदेपणा येत नाही. सॅल्यूट म्हटले की राजाराम सीताराम मनात म्हणेपर्यंत सावधान मध्ये एका जागी थिजल्या सारखे उभे राहायचे. एक म्हणताक्षणिक उजवा हात आवळलेली मूठ सोडवत, वर घेऊन भरकन कोपऱ्यात वाकवून हाताची बोटं नीट जुळवून तळवा सपाट करून तर्जनी उजव्या भुवईवर दोन बोटांच्या अंतराने जिथे बॅरेची पट्टी कपाळावर बसते तेथे लावला पाहिजे. खांदा जमिनीला समांतर व कोपर आपल्या शरीराच्या रेषेत. त्या सॅल्यूट मारलेल्या स्थितीत मनातल्या मनात परत ‘राजाराम सीताराम’ म्हणेपर्यंत विराम घ्यायचा व ‘दो’ म्हणताच भरकन सॅल्यूट मारलेला हात खाली घेऊन परत सावधान व्हायचे. चपळाईने केलेल्या दोन हालचालींमध्ये जर काही घटकांचा पूर्ण विराम दिला गेला तर, त्या हालचाली खूप उठावदार दिसतात. ‘राजाराम सीताराम’ ह्या शब्दांच्या साहाय्याने मिळालेल्या विरामा मुळे कवायत उठावदार बनते. परत, ‘राजाराम सीताराम’ हे शब्द प्रत्येक जिसी मनात म्हणत असल्या मुळे सांघिक कवायतीत प्रत्येकांच्या हालचाली एकसमयावेच्छेनुसार होतात व एक लय, एक ताल जमतो. सगळ्यांचे डावे हात एका रेषेत खाली वर एकदम होतात. त्याच वेळेला उजवे पाय पुढे येऊन मग एकदम सगळे हिल डिग करतात. असे संचलन उठावदार व उमदे दिसते. उस्तादाचे सुरूच होते...... आभी दाए सॅल्यूट, बाए सॅल्यूट....................... आम्ही मशीनासारखे त्याच्या हुकुमांचे पालन करत होतो. ड्रिल करताना एक लयबद्धता येते, सांघिक शक्तीचा अनुभव येतो, मन तल्लीन होते, आपली हालचाल एकसारखी होते व आपल्या शरीराला चांगला ढब येतो.



ड्रिल करून करून, टाचा आपटून आपटून हळू हळू प्रत्येक जिसीची चालण्याची ढब बदलायला लागली होती. एकतर शाळा कॉलेज मध्ये असतो तसा अभ्यास नाही आणि तशातच अशा कवायतीने व टाचा आपटून आपटून मेंदू कधी कधी बधिर व्हायचा. आमचा उस्ताद मजेने आम्हाला म्हणायचा देखील, ‘जबतक हिलडीग व कदमताल करके जिसीका भेजा घूटनेमे नही आता तब तक आपको ड्रिल नही आएगी।’ जेव्हा मेंदू घुडग्यात जातो, तेव्हा डोकं वापरायची गरज वाटणारच नाही व कोणतीही गोष्ट एखाद्या मशिना सारखी घड्याळाबर हुकूम व ड्रिल सारखी शिस्तीत होऊ लागेल.



ड्रिल करून करून पायांना इतकी सवय पडली होती की, दोन जिसी कोठेही जाताना ‘कदम मे कदम मिलाकर’ चालू लागले होते. एकाचा डावा पाय पुढे तर दुसऱ्याचा सुद्धा डावाच पाय त्याच वेळेला पुढे असल्याची खात्री करून घेतली जायची. तसे नसेल तर मनात विचित्र वाटायला लागून जिसी सहजच आपली चाल बदलून घ्यायला लागले. ह्या छोट्या छोट्या गोष्टी मुळेच जिसी सिव्हिलियन आयुष्या पासून हळूहळू वेगळे व्हायला लागतात व काही दिवसाने सैनिकी रीतिरिवाज, सैनिकी शिस्त व सैनिकी जीवनमान तयार होते. पुढे ते जीवनमान कायमचे मनात व शरीरात असे भिनते की चालण्यावरून, कपडे घालण्यावरून, बोलण्यावरून व सवयींवरून दूरूनच सैनिकाला ओळखता येते.



ये जिसी फॉल आऊट। रायफल उपर और कदमताल शुरू कर। कितने बार आपको कहा हैं की जिसी सॅल्यूट सिर्फ दाये हाथसे ही करते हैं।



सुब्बूच असणार. आम्हाला गालातल्या गालात हसू आवरत नव्हते. त्याचे ड्रिल महाभयंकर होते. संचलन करायचा तर जो पाय पुढे टाकायचा त्याच बाजूचा हात त्याच्या नकळत पुढे यायचा. हे खरे म्हणजे किती अवघड आहे. चालताना जर डावा पाय पुढे टाकला तर उजवा हात पुढे येतो हा माणसाचा नैसर्गिक कल, पण सुब्बूचे उलटेच. साहजिकच ड्रिल परेडला सगळ्यात जास्त शिक्षा त्याला व्हायची. संचलन करताना दाए सॅल्यूट मध्ये मान उजवीकडे वळवून उजव्या हाताने सॅल्यूट करायचे असते अगदी जसे गणतंत्र दिवसाच्या समारंभात राष्ट्रपतींसमोर संचलन करत येणारी सेनेची तुकडी मान वळवून दाए सॅल्यूट करते तसेच. तशाच प्रकारे बाए सॅल्यूट मध्ये मान डावीकडे वळवून उजव्याच हाताने सॅल्यूट करायचा असतो तर आमचा पठ्ठ्या बाये सॅल्यूट मध्ये खुशाल डाव्या हाताने सलाम ठोकून मोकळा झाला होता. रोज दुपारी सुब्बू साठी विशेष ड्रिलचा तास लागायचा.



आमची ड्रिलची परीक्षा साक्षात अॅडज्यूटंट घ्यायचा. घोड्यावर आरूढ होऊन एकेक जिसीला त्याच्या समोर तेज चल, दाये सॅल्यूट, बाए सॅल्यूट, सलामी शस्त्र, धिरेचल, कदमताल असे सगळे कवायतीचे प्रकार करून दाखवावे लागायचे. तो ठरवायचा पास का फेल ते. कवायत करून झाल्यावर, परीक्षेसाठी आलेल्या जिसीने अभिवादन म्हणून केलेल्या सॅल्यूटला अॅडज्यूटंटने परत सॅल्यूट करून जर त्या जिसीचे अभिवादन स्वीकारले तर समजायचे आपण ड्रिल टेस्ट पास. त्या दिवशी पासून डिएस ना सॅल्यूट करायची परवानगी मिळायची व लिबर्टीपण मिळायला लागायची. आमच्यातले काही जिसी ड्रिल टेस्ट अजून पास झाले नव्हते त्या मुळे त्यांना लिबर्टी मिळाली नव्हती. जिसी सुब्बू त्यातला एक होता. आम्हाला मात्र आता लिबर्टी मिळायला लागली होती. लिबर्टी म्हणजे रविवारी आयएमएच्या बाहेर जायची परवानगी. लिबर्टीचा कागदी पास असतो. आठवड्यात जर काही चुका झाल्या नाहीत तर कॅप्टन गिल शनवारी लिबर्टीच्या पास वर सही करायचा व त्या योगाने रविवारी बाहेर जायला आम्हाला परवानगी मिळायची. सकाळी ८ वाजता आम्ही मुफ्ती ड्रेस घालून सायकल वरून डेहराडून गावात जायचो. आयएमएतून बाहेर पडून राजपूर रस्त्याने घंटाघरला जमायचो. त्या वेळचे डेहराडून म्हणजे छोटेखानी गाव होते. साधी माणसे. साधी दुकाने. खूप धूर सोडत जाणाऱ्या विक्रम रिक्शा. रिक्शा कसल्या टेम्पोला किर्लोस्कर कमिन्सचे इंजन लावले तर काय होईल तसे असायचे. विक्रम सहा माणसांसाठी असायची पण त्यात साधारण १२-१३ माणसे भरली जायची. हे गाव शिवालीक ह्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी आहे. मसुरीसाठी इथूनच जाता येते. शिवालीक पर्वत समूहांना लोअर हिमालीयन रेंजेस पण म्हटले जाते. डेहराडूनला काही जुन्या इमारती आहेत, ‘सर्व्हे ऑफ इंडिया’, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम’, ‘फॉरेस्ट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ अशा सारख्या संस्था येथे आहेत. फॉरेस्ट इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची पूर्विची इमारत देखणी व विलोभनीय आहे. लिबर्टी मिळाल्या लागल्या पासून आम्ही दर रविवारी डेहराडूनला जायचो. डेहराडूनला एकच हमरस्ता होता राजपूर रोड. घंटाघरच्या चौकात ‘कुमार स्विटस’ म्हणून प्रसिद्ध मिठाईचे दुकान होते. चांगलेसे एकही पिक्चरचे थिएटर नव्हते तरीसुद्धा आम्ही कधी कधी त्यात पिक्चर बघायचो. आठवड्याभराचा रगडा मित्रांबरोबर पिक्चर बघताना कधीच निघून जायचा. आयएमएतल्या जिसीज साठी थेटर मालकाने जागा राखीव ठेवलेल्या असायच्या त्यामुळे तिकीट मिळाले नाही असे कधी झालेच नाही. आम्हाला ह्या स्पेशल ट्रीटमेंटचे फार अप्रूप वाटायचे. सकाळी सायकल वरून राजपूर रस्त्याने दहा किलोमीटरचा रस्ता सायकल ने तुडवून डेहराडून गावात यायचो. आमचा कार्यक्रम येथेही तसा ठरलेला असायचा. सकाळच्या वेळेस रस्त्यावरून मुली बघत फिरणे. दुपारी एखादा पिक्चर टाकणे, संध्याकाळी सहाच्या सुमारास कुमार मिठाईवाल्या कडे समोसा, कचोरी, पलंगतोड, कालाजाम नाहीतर मसाला दूध प्यायचे ठरलेले. घंटाघरचे टोले सतत आम्हाला आमची जायची वेळ सांगत राहायचे. साधारण साडेसहाच्या सुमारास जड मनाने त्या बाहेरच्या जगाला टाटा करून सायकलने परतीचा रस्ता आम्ही धरायचो. गावात सामान्य वेषात आयएमएचे रेजिमेंटल पोलीस त्यांना ‘आरपी’ असे म्हटले जायचे ते अशा लिबर्टीच्या दिवशी फिरायचे. त्यांचे काम होते लिर्बटीवर आलेल्या जिसीज वर डोळा ठेवण्याचे. काही काही जिसीजना बाहेर जाऊन सिव्हिल ड्रेस घालायची हुक्की यायची, किंवा आऊट ऑफ बाऊंड एरीयाज मध्ये जाण्याचे धारिष्ट्य करावेसे वाटायचे त्यावेळेला मुफ्ती ड्रेस मध्ये आयएमए बाहेर पडून नंतर सिव्हिल कपडे बदलायचे प्रयत्न व्हायचे. ह्यात अमित वर्माचा पहिला नंबर. पण ड्रिल करून करून बदललेल्या चालण्याच्या ढबीवरून, केस कापण्याच्या ठेवणीवरून जिसी लपायचा नाही व आरपिंची तयार झालेली नजर अशांना लागलीच हुडकून काढायची. लागलीच आरपी अशांना एक टोकन द्यायचा. त्या टोकनावर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी डिएस कॅप्टन गिलकडे मार्चअपची वेळ लिहिलेली असायची. दुसऱ्या दिवशी अशा टोकन मिळालेल्या जिसीची ‘पेशी’ व्हायची. डिएसकडे शिक्षेसाठी जाताना हॅकल ऑर्डर मध्ये जावे लागत असे. हॅकल ऑर्डर म्हणजे, आयएमएचा पोषाख घालायचा व बॅरे वर लागलेल्या आयएमएच्या बिल्ल्यावर लाल पिसांचा तुरा खोवायचा. ह्या पोषाखात जिसी एकदम रुबाबदार दिसतो. बॅरेवर लावायचा पिसांचा तुरा आयएमएच्या शॉपिंगसेंटरवर मिळतो. प्रत्येक जिसीकडे तो असायचा. शिक्षेसाठी जावे लागायचे त्यावेळेला हा तुरा खुपसावा लागायचा. असा तुरा खुपसलेला जिसी दिसला की समजावे की काहीतरी चूक जिसीच्या हातून झालेली आहे व तो कोणत्यानाकोणत्या शिक्षेसाठी तरी जात आहे नाहीतर शिक्षा सुनावणीसाठी तरी जात आहे. आयएमएतल्या आधिकारिक शिक्षा सुद्धा अजब असायच्या. त्यात प्रामुख्याने बजरी ऑर्डर, २८ डेज, केबिन कबोर्ड, हॅकल ऑर्डर, मंदिर दाये छोड, चिंडिट ऑर्डर अशा विचित्र नावांच्या त्या शिक्षा.

(क्रमशः)

आपण राष्ट्रव्रत घेतले का. त्या बद्दल अजून वाचा.
येथे
http://rashtravrat.blogspot.com

http://bolghevda.blogspot.com