Wednesday, November 16, 2011

राजाराम सीताराम..............भाग ८

शिक्षा



बजरीऑर्डरच्या शिक्षेमध्ये डांगरी किंवा कॅमोफ्लॉजच्या गणवेशावर रुट मार्चच्या वेळेला पाठीवर लादल्या जाणाऱ्या स्मॉलपॅक्स किंवा बिगपॅक मध्ये सामाना ऐवजी टॉन्स नदीच्या किनाऱ्यावरली वाळू व गोटे भरावे लागायचे. डांगरी किंवा कॅमोफ्लॉजचा गणवेश बॉयलर सुटा सारखा अखंड असतो. ह्या गणवेशाला बरेच खिसे असतात. अंगरख्याच्या वरच्या भागावर म्हणजे छातीवर येतील असे दोन खिसे व अंगरख्याच्याच खालच्या भागावर दोन्हीकडे दोन खिसे. तसेच विजारीला दोन्ही बाजूंना दोन, मागे कुल्ल्यावर दोन व दोन्ही नडग्यांच्या बाजूंना दोन खिसे. ह्या सगळ्या खिशांतून सुद्धा वाळू भरलेली असली पाहिजे. अशी वाळू भरली की गणवेश खूप जड होतो व गणवेश चढवल्यावर फार अडचण वाटायची. साधारण पंधरा ते वीस किलो वजनाची ती वाळू किंवा हिंदी मध्ये बजरी, भरल्या मुळे डांगरी चांगलीच जड व्हायची. एवढेच काय कमरेच्या मागे बेल्टला लटकवलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटली मध्ये सुद्धा पाणी फेकून देऊन वाळू भरावी लागायची. मग असा वाळूने म्हणजेच बाजरीने भरलेला पॅक घेऊन जिसीला उभे राहायला लावायचे का, काही अंतर पळायला सांगायचे ते शिक्षा देणाऱ्या डिएसच्या मर्जीवर अवलंबून असायचे. ह्या शिक्षेत पाठीची अक्षरशः वाट लागते. मणक्याला ते टॉन्स नदी मधले गोटे टोचत राहायचे.



बिगपॅक मध्ये बजरी ऐवजी जर कॅम्पचे सामान घातले तर त्याला चिंडीटऑर्डर म्हणतात. ह्या चिंडीटऑर्डरचा पॅक जरा मोठा असायचा. कांबळे, मच्छरदाणी, खायचा डब्बा, दाढीकरायचे सामान, विजेरी, खायचे सामान इत्यादी सगळ्या मिळून पन्नास गोष्टी भराव्या लागायच्या. शिक्षेमध्ये उस्ताद कधी कधी तो पॅक तपासायचा, आपले नशीब वाईट असेल व तपासा मध्ये एक जरी गोष्ट त्याला कमी आढळली की अजून शिक्षा वाढायची. चिंडीट हा शब्द दुसऱ्या महायुद्धातल्या चिंडीट स्पेशल फोर्सेस वरून पडला आहे. चिंडीट नावाची एक स्पेशल फोर्स, ब्रिटिश सेनांनी ब्रिगेडियर विनगेटने तयार केली होती. चिंथे नावाच्या योध्याला ब्रह्मदेशातली जनता देवस्वरुप मानते. तो ब्रह्मदेशातल्या मंदिराची राखण करतो असे तेथील लोकांचे मानणे आहे. त्यावरून त्या स्पेशल फोर्सला चिंडीट हे नाव ब्रिगेडियर विनगेटने दिले होते. महायुद्धात स्पेशल फोर्सेसना ब्रह्मदेशातली महाकाय इरावडी नावाची नदी, तसेच घनदाट जंगले पार करावी लागायची व त्यास उपयुक्त असे सामान घेऊन जावे लागायचे. चिंडीटऑर्डर मध्ये अशा प्रकारचे सामान बांधलेले असते. नद्यानाले पार करताना चिंडीटऑर्डर उपयोगी पडते. आयएमएत चिंडिटऑर्डरचा अर्थ हे सगळे सामान मोठ्या पॅक मध्ये बांधायचे व निर्देशवल्या ठिकाणी हजर राहायचे. ह्या शिक्षेने तसे सामान बांधण्याची सवय होते.



मंदिर दाये छोड ही गमतीदार शिक्षा असायची. डिएस एखादे लांबवर दिसणारे मंदिर, जिसीला बोटाने दाखवायचा व म्हणायचा ‘त्या’ मंदिराला शिवून ये. मग जिसी दूरवर दिसणाऱ्या ‘त्या’ मंदिराच्या दिशेने पळत जायचा व मंदिराची प्रदक्षिणा घालून यायचा. अगदी ‘स्टिपलचेस’ मध्ये जसे पळावे लागते तसेच. कोठचे मंदिर दाखवायचे ते डिएसच्या मनावर अवलंबून असायचे. कधीकधी ते मंदिर दोन किलोमीटरवर असायचे कधीकधी डिएस खूप चिडला असेल तर पाच किलोमीटर दूर असलेल्या मंदिराकडे बोट दाखवले जायचे. ह्या सगळ्या शिक्षांमध्ये हॅकलऑर्डरची शिक्षा सोपी असायची. हॅकल लावलेली बॅरे घालून जायचे एवढेच काय ते असायचे.



केबिनकबोर्ड ही शिक्षा म्हणजे खोली आवरण्याची शिक्षा. केबिनकबोर्डच्या शिक्षेत आपण राहत असलेल्या खोलीचे डिएस इन्सपेक्शन करायचा. खोली कशी असली पाहिजे व कशी आवरलेली पाहिजे हे सीनियर्सने ठरवून एक पायंडा घातलेला असतो. केबिनकबोर्ड मध्ये सगळ्या वस्तू तशाच ठेवल्या गेल्या पाहिजेत. कपडे, गणवेश, जोडे, दाढीचे सामान, बाकीच्या चीजवस्तू सगळ्यांच्या नेमून दिलेल्या जागी असल्या पाहिजेत व नीट घडी घातलेल्या व स्वच्छ असल्या पाहिजेत. कपाटातल्या प्रत्येक घडी केलेल्या कपड्यातून एकसारखा कापलेला पुठ्ठा घातलेला असायचा म्हणजे घातलेली घडी उठावदार व एकसारखी चौकोनी किंवा आयताकृती दिसते. सामानाची ट्रंक एका ओळीत पलंगाच्या बाजूला असली पाहिजे. रूमच्या कोपऱ्यात किटबॅग असली पाहिजे. मला जेव्हा पहिल्यांदा केबिनकबोर्डची शिक्षा मिळाली तेव्हा बाकीचे आवरून झाल्यावर लाल कोबा केलेल्या जमिनीला बाकीच्यांप्रमाणे मीही हाताने पॉलिश करून मोठ्या आत्मविश्वासाने खोलीच्या दारा बाहेर कॅप्टन गिलच्या प्रतीक्षेत तपासणीसाठी विश्राम ठोकून मागे हात बांधून उभा होतो. कॅप्टन गिल जसा माझ्या खोलीच्या दिशेने माझ्याकडे यायला लागला तसा मी डावा पाय कदमतालासारखा वर करून उजव्याच्या शेजारी हापटून, पाठीमागचे हात सरळ रेषेत बाजूला आणून सावधान झालो. ‘सर, केबिन इज रेडी फॉर युअर इन्सपेक्शन सर’ असे मोठ्या आवाजात त्याला रिपोर्ट केला. कॅप्टन गिल आत गेला. सगळे पाहिल्यावर त्या प्राण्याने स्टडी टेबलाशी जाऊन टेबलाच्या तक्त्याच्या उलट बाजूने बोट फिरवले. ते धुळीने भरलेले बोट माझ्या जितके जवळ आणता येईल तितके आणून माझ्या नाकावर पुसत म्हणाला ‘धिस इज युअर ब्लडी स्टॅंडर्ड ऑफ द केबिनकबोर्ड’. आपल्याला अजून किती शिकायचे आहे, हे मला त्याच क्षणी कळून चुकले.



अजून एक शिक्षा होती जी सगळ्यात कठीण व कठोर अशी मानली जायची. त्यात अशा शिक्षेस पात्र जिसीसाठी वेगळे वेळापत्रक ठरवून दिलेले असते. अशा शिक्षेस रेस्ट्रिकशन्स् असे म्हटले जाते. अशा रेस्ट्रिकशन् मध्ये आताच वर्णन केलेल्या सगळ्या शिक्षा दिवसभरात केव्हा ना केव्हा वेळापत्रकाप्रमाणे कराव्या लागायच्या. परत रेस्ट्रिकशनस् मध्ये रविवार किंवा कोठचीही सुट्टी नसते. लिबर्टी गेटेड होते म्हणजे आयएमएतून रविवारी बाहेर जायला परवानगी नाही मिळत. जिसी हे सगळे करता करता अगदी जेरीला यायचा. ह्या शिक्षे मध्ये जिसीचा दिवस सकाळी चार वाजता सुरू व्हायचा – सकाळी चार वाजता जिसी, ड्रिलस्क्वेअरवर हॅकलऑर्डर मध्ये रिपोर्ट करायचा. तशात आयएमएतली अंतरे एवढी लांबलांब असायची की ड्रिलस्क्वेअर दोनतीन किलोमीटर दूर असायचे. सायकल वरून जायला लागायचे. रेस्ट्रिकशनवर असलेला जिसीला स्क्वॉड शिवाय एकट्याला सायकल वरून जायची सूट होती. हे झाल्यावर मग जेवणा पर्यंत जिसीचा नेहमीचा ठरलेला दिनक्रम बाकीच्या आयएमएच्या वेळापत्रकाप्रमाणे चालायचा. दुपारी जेव्हा बाकीचे जिसी एक तासाची विश्रांती घ्यायचे त्या वेळात ही शिक्षा झालेला जिसी एक्स्ट्रॉ ड्रिल, ड्रिलच्या पोषाखात करायचा. परत दुपारी बाकीच्या जिसीज बरोबर गेम्स परेड चालायचीच. संध्याकाळी स्मॉलपॅक लावून व रायफल घेऊन बॅटलऑर्डर मध्ये ५ किलोमीटरची दौड लागायची. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता परत ड्रिलस्क्वेअर वर हॅकल ऑर्डर मध्ये रिपोर्ट द्यावा लागायचा. संध्याकाळी बाकीच्या जिसीजना अभ्यासासाठी जेव्हा वेळ मिळायचा त्या वेळेला ह्या शिक्षेत जिसी रात्रीच्या चिंडीटऑर्डरची तयारी करायचा. जेवणाच्या आधी आमचा जेयुओ भुल्लर त्या जिसेचे केबिनकबोर्ड इन्सपेक्शन करायचा. पुढे रात्री अकरा वाजता अशा जिसीला चिंडीटऑर्डर मध्ये ड्रिलस्क्वेअरला रिपोर्ट करावे लागायचे. रात्री अकरा वाजता त्याच्या पॅक मधले सामान त्याच्याच पॅक मध्ये असणाऱ्या विजेरीने तपासले जायचे आणि एकही गोष्ट ठेवायची राहिली की मग अशी शिक्षा अजून एका दिवसाने वाढायची. हा ह्या कठोर शिक्षेचा अजून एक नियम. असा हा खास वेळापत्रकाने बांधलेला ह्या शिक्षेचा एक दिवस. किती दिवस अशी शिक्षा झेलायची ते जिसीच्या चुकीवर अवलंबून असे. परेडला लेट आला तर साधारण तीन दिवस अशी शिक्षा मिळायची त्या शिक्षेला थ्री रेस्ट्रिकशनस् किंवा थ्रिडेज असे संबोधले जायचे. पोषाख वाईट असेल तर एक दिवसाची अशी वन रेस्ट्रिकशन मिळायची. गंमत अशी की शिक्षा करताना जर काही चूक झाली तर मागे सांगितल्या प्रमाणे शिक्षेत हळूहळू वाढ व्हायची. एका टर्म मध्ये जिसीला जर अशी कठोर शिक्षा मिळून अठ्ठावीस रेस्ट्रिकशनस् पेक्षा जास्त रेस्ट्रिकशनस् मिळाल्या तर त्या जिसीचे आपोआप रेलीगेशन व्हायचे. प्रत्येक मिळालेल्या रेस्ट्रिकशनला जिसीचे ‘ओएलक्यू’ पॉईंटस् कमी होतात व तो स्पर्धेत मागे पडायला लागतो. ह्या सगळ्या मुळेच सगळ्यात कठोर अशी ती शिक्षा असायची व साधारण जिसीला एका वेळेला ‘टेन रेस्ट्रिकशनस्’ पेक्षा जास्त ही शिक्षा मिळायची नाही. ह्या कठोर शिक्षेचा हिशोब प्रत्येक जिसी ठेवायचा व शिक्षा कमीत कमी होईल असे आपले वर्तन सांभाळायचा.



सामूहिक गोंधळ घातला तर ‘मास पनिशमेंट’ ठरलेली. एकदा आम्हाला ऑडिटोरियम मध्ये एका नामवंत व्यक्तीचे भाषण ऐकायला पाठवले होते. अशी भाषणे बरीच व्हायची. आम्हाला अशी भाषणे खूप आवडायची. सभामंडपातील दिवे मालवले व भाषण सुरू झाले की आम्ही छान पुशबॅक खुर्चीत बसल्याबसल्या जागच्या जागीच झोपून जायचो. भाषण संपल्यावर दिवे लागायचे तेव्हाच जाग यायची. सभागृह एकदम शांत राहायचे. त्या दिवशी भाषणात असेच आम्ही सगळे झोपलो होतो. तेवढ्यात एका जिसीला ठसका लागला व चांगलाच लागला. आम्हाला जाग आली. मस्ती तर अशी अंगात होती की आमच्यातले काही जिसी उगाचच ठसका काढू लागले. काही वेळातच सभाघृहातून ठसक्याचा आवाज घुमायला लागला. जिसीजना मजा येत होती. उगाचच ठसका काढत होते. त्या दिवशी ते एक तासाचे भाषण संपल्यावर चिडलेला एडज्युटंट कर्नल मारुफ रझाने आयएमएच्या एकॅडमी कॅडेट एडज्यूटंटला बोलवून आमच्या वर्तनाबद्दल खूप झाडले. आयएमएचा एकॅडमी कॅडेट एडज्यूटंट थर्ड टर्मर एसीए परमविरसिंग सांगा ने आम्हाला नंतर संबोधले...



यू ब्लोक्स यू थिंक यू आर हेल ऑफ चॅप्स क्रियेटींग डिसऑर्डर. आय निड टू सॉर्ट आऊट यू एंड युअर थ्रोटस.



असे म्हणत त्याने फर्मान सोडले की पुढच्या तीन रात्री मानेकशॉ बटालियन मधील सगळे फर्स्ट आणि सेकंड टर्मर्स रात्रभर दर दोन तासांनी बटालियन पिटी ग्राउंडवर येऊन गार्गलींग करतील. पुढचे तीन रात्री आम्ही सगळे दर दोन तासाने प्लॅस्टिकचा मग घेऊन इनथ्रिज फॉलीन होऊन गार्गलींग करत होतो. सुक्या बरोबर ओले जळते. आयएमएत नेहमीच असे होते.



वेगवेगळ्या शिक्षा व सीनियर्सच्या रॅगिंग मुळे आयएमएत खूप अडचणी होत्या पण तरी सुद्धा कसलीही दुःख नव्हती. सामूहिक शिक्षांमध्येही एक मजा असायची. सगळेच करायचे त्यामुळे हसत खिदळत असल्या अडचणी पार करायचो. अशा एकत्र उपभोगलेल्या शिक्षांनी आमच्या नकळत आमच्या कोर्सच्या मुलांमधली दोस्ती वृद्धींगत होत होती.

(क्रमशः)

No comments:

Post a Comment