Monday, July 16, 2018

घरगुती औषधे


आपल्याकडे पिढ्यांपिढ्या पासून वापरातली आयुर्वेदिक औषधे आहेत. त्यातली बरीचशी आपल्या स्वयंपाकघरात सापडणारी असतात व त्यामुळे वेळी अवेळी आपल्या हाताशी राहतात. काही लागले व जखम झाली की आपण चटकन हळद लावतो. हळद लावणे आता वैद्यकीय दृष्ट्‍या इष्ट मानले गेले आहे. आपल्या आजी, आजोबा किंवा आई वडिलांकडून आपल्याला जी औषधे कळली त्या त्या औषधांचा आपण वापर करतो, पण एका पिढीहून दूसऱ्या पिढी पर्यंत पोहोचेतो त्यातली काही औषधे विसरली जातात. हळूहळू आपण साधी पण प्रभावी औषधे विसरू लागतो. पण आता विसरू लागलेली व माहीत नसणारी औषधे विविध लोकांकडून संकलित करून एका जागी आणणे इंटरनेट मुळे सहज शक्य झालेले आहे.

बोलघेवडा संकेत स्थळाच्या माध्यमातून मी एक नवे पान सुरू करत आहे त्यात आपल्या कोणाला नेहमीच्या आजारांवर सोपी औषधे माहीत असतील तर ती मला ranjit.chitale@gmail.com वर पाठवा. मी बोलघेवड्याच्या पानात समाविष्ट करेन. जर का एखादे प्रभावी औषध तुमच्या स्वतःच्या अनुभवावरून असेल तर येथे द्यावे. ऐकीव किंवा इंटरनेट वरून डाऊनलोड करून देऊ नये.  सुरवात म्हणून मी मला माहीत असलेले एक औषध देत आहे. त्याच साच्यात बसेल असे लिहून पाठवावे. सोबत आपला दूरध्वनी क्रमांक दिलात तर मी पानावर चढवण्या आधी आपल्याशी बोलून मला खात्री करता येईल. औषधाच्या श्रेयनामावलीत आपले नाव दिले जाईल.

फक्त घरगुती औषधेच द्यावीत. आयुर्वेदात काही धातू (चे भस्म) किंवा रस हे वापरले जातात. ते जरी प्रभावी असले तरी त्याला वैद्यांचा सल्ला लागतो. ह्या संकेतस्थळावर अशी औषधे नाही दिली जाणार. धातू किंवा रसाचे सेवन वैद्याना विचारूनच करावा. व त्यामुळे अशी औषधे येथे दिली जाणार नाहीत तरी अशा औषधे येथे कृपया देऊ नयेत.

No comments:

Post a Comment