आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमची आई रोज दुपारी आम्हाला रेल्वेलाईन जवळच्या गणपतीच्या देवळात घेऊन जायची. कधी तिथे किर्तन चाललेले असायचे ते ऐकायला बसायचो, कधी प्रवचन चाललेले असायचे त्याला जायचो. किर्तन दोन भागात असायचे पहील्या भागात भागवतातली एक कथा किंवा पुराणातली एखादी घटना भजनां बरोबर किर्तनकार सांगायचे. मजा यायची. दुस-या भागात सांगितलेल्या कथेचा मतीतार्थ सांगायचे. हा भाग जरा गंभीर असायचा व सुरवातीला कंटाळा यायचा वय वाढल्यावर आवडायला लागला. कथेचे सार दुस-याच भागात असते हे कळले. प्रवचनेचे विषय जरा गंभीर असायचे. कधी महाभारतातील सोळा महत्वाची पात्रं, तर कधी गीतेचा अकरावा अध्याय, कधी उपनिषदांवर चर्चा. कधी कधी तर शेवडे गुरुजी प्रवचन करणार असतील तर चक्क १९७१ च्या भारत पाक युद्धातील अभिमन्यु असापण विषय असायचा. पण येवढे मात्र खरे एकदा का जायला सुरवात झाली ह्या किर्तन, प्रवचनांना की आवड वाढते. नवं नव्या गोष्टी कानावरुन जातात. उपनिषदांतून केवढे प्रगाढ तत्वज्ञान आहे ते तेव्हा लहानपणी समजले नाही तरी त्याची कल्पना येते. पुढे त्याचा खुप फायदा होणार असतो. वयाच्या कोणच्या ना कोणच्या टप्प्यावर आपण सर्व जण त्यातले तत्वज्ञान स्विकारतो व त्या तत्वज्ञानाकडे आकृष्ट होतो. हा साक्षातकार केव्हा ना केव्हा प्रत्येक माणसाला होतो. लहानपणी ते तत्वज्ञान नुसते कानावरुन जरी गेले तरी आपल्या आंतरमनात खोल कोठेतरी आपल्या नकळत रुतुन बसते. जिवनाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोण चांगला होतो. मन विशाल होते व आपले मन प्रसन्न व आनंदी रहावयास मदत मिळते.
शाळेला सुट्टी लागायची तशी बाबासाहेब पुरंद-यांच्या शिवाजी महाराजांवरच्या भाषणांना आम्ही जायचो. पुढचे दोन तास प्रत्यक्ष शिवाजी महाराजांबरोबर काढायचो आणि नंतरचे काही दिवस त्याच धुंदीत जायचे.
डोंबिवलीच्या नगरपालीकेचे पुस्तकालय चांगल्या पुस्तकांसाठी खुप प्रसीद्ध होते व ठेवले सुद्धा छान होते. सुट्टीत दुपारी सावरकरांचे काळेपाणी, १८५७ चे स्वातंत्र्य समर, सहा सोनेरी पाने. लोकमान्यांचे गीता रहस्य (त्या वेळेला जरी पुर्णपणे डोक्यावरुन गेले तरी आता कळते त्याचे महत्व) आर्टीक होम ऑफ वेदाज, ऑरायन. पुलंची सगळी पस्तके, वपुंची कथाकथने, रणजित देसाईंची पुस्तके इत्यदी कित्येक अनेक. किशोर मासिक, चांदोबा, गोट्या, चिंगी व चिमणराव, साने गुरुजींची शामची आई, गोनीदां ची पुस्तके व अजुन खुप खुप पुस्तके, आमच्या व बाकीच्या लहान मुलांच्या आवडीनिवडीवर वाचली जायची.
संध्याकाळ झाली की कोणी मोठी उत्सुक ‘ग्राऊंड’ घ्यायचे. म्हणजे जवळच्या मैदानावर खेळ घ्यायचे. मुलं, मुली त्या ‘ग्राऊंड’ वर जायचे. व खेळ घ्यायचे. आम्ही म्हणायचो ‘ग्राऊंडला’ जातो. मोठी समजायची की अमका अमका नेहरु मैदान किंवा बागशाळा मैदानावर गेलाय. मला आठवताय संध्याकाळी लक्ष्मीनारायणाच्या मंदिरा समोर एक घर होते त्यात राहणारे आजोबा त्यांच्या घराच्या गच्चीवर, उत्सुक अशा शालेय मुला मुलींना सभाधीट पणा शिकवायचे. एखादा विषय समोर ठेवायचे व त्यावर बालायला लावायचे. बाकीची ऐकणारी मुले, बोलणारा कसा बोलतो व चुका कसे करतो ते बघायची. त्याची वेळ आली की मग तो बोलायचा व बाकीची ऐकायची. काही मुले संध्याकाळची संघाच्या शाखेत जायची, त्यांच्या शिबिरात जायची. मी पण एक दोनदा शिबिरांना गेलेलो आहे. बहुतेक मुलांना एखादा छंद असायचा. शाळेला लागलेल्या सुट्टीत मग मुलं आपापला छंद जोपासायची. त्यातुन मिळणारा विरंगुळा काही वेगळाच असतो. दिवसभराचा डोक्यावरला ताण काही क्षणातच निघुन जातो.
हे सगळे होत असताना शाळा चालु असायची. शाळेतला अभ्यासक्रम जरी व्यापक असला तरी समर्पक कधीच होऊ शकत नाही. मुलाला एकदा शाळेत पाठवले, मग ती कोठलीही शाळा असो – शेजारची सरकारी शाळा घ्या किंवा अद्ययावत अंतरराष्ट्रीय विद्यालय असो, त्यात वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जरुर मिळते, वेगवेगळे विषय शिकायला मिळतात, जशी शाळा असेल तसे वगवेगळ्या गोष्टी पहायला मिळतात एखाद दुसरा अनुभव पण गाठी लागतो. पण आपल्या विचारसरणीत बसणारे संस्कार होऊ शकत नाहीत. जिवन चांगल्या प्रकारे कसे जगायचे त्याचे पाढे मिळु शकत नाहीत. आपल्या लोकनेत्यांचे जिवन कसे घडले, त्यांचे विचार हे उमजु शकत नाहीत. आपल्या संस्कृतीचा इतिहास व आपली संस्कृती कशी तयार झाली हे समजु शकत नाही. आपले सामाजिक कर्तव्य काय आहे ह्याची कल्पना फार क्वचीतच येऊ शकते. एकुणच शाळा ही ‘अ ब क ड’ शिकवणारी असते पण जिवनाचे ‘कडबोळे’ सोडवण्यासाठी लागणारे धडे देणारी नसते. आपल्या डोक्यावरला आलेला ताण नैसर्गिकरीत्या कसा कमी करायचा ह्याचे शिक्षण नसते. मनाची प्रसन्नता कशी टिकवुन ठेवायची ह्याचे शिक्षण नसते. ह्या जगात तोच मनुष्य यशस्वी गणला जातो ज्याला प्रसन्नतेने व आनंदाने जगता आले आहे.
ह्या सगळ्याचे नकळत शिक्षण देणा-या व चांगले संस्कार करवणा-या शाळेबाहेरील शाळा अजुनही आहेत पण त्यांचा आपण वापर फार कमी करायला लागलो आहे. धकाधकीचे आयुष्य ह्या नावाखाली आपण सगळ्यांनी ह्या शाळेबाहेरील शाळां मधुन आपल्या मुलांचे नाव काढले आहे. आपल्या लहानपणी सुद्धा धकाधकीचे आयुष्य होते. प्रत्येक पिढीला आयुष्य धकाधकीचेच वाटत आलेले आहे. पण आता ग्राऊंड घेणारे काका सहसा सापडत नाहीत. सभेत कसे बोलावे हे शिकवणारे आजोबा स्वतःच वृद्धाश्रमात दाखल आहेत. वेगवेगळे छंद व कला शिकवणारी काकु – का कु करायला लागली आहे. तिला दुरदर्शन वर दिसणा-या ‘सास बहु’ मालिकांमधुन उसंत मिळत नाही. वाचनालये आता गेम्स व ईंटरनेट पार्लर्स मध्ये बदलली आहेत त्यात मुले, नाही नाही ते ज्ञान सर्रास मिळवतात. आपल्या सभोवारचे निरिक्षण करायचे सोडुन स्वतःच्या मोबाइलवर तासनतास बटनं दाबत तल्लीन झालेली मुले आपण हमखास पाहतो. अशाने आपल्या भोवतीची एक प्रकारची जागरुकता असायला हवी ती कमी कमी होऊ लागली आहे. हल्ली आपले काँप्युटर मित्र फार व आसपासच्या ख-या लोकांशी आपल्याला बोलायला वेळ नाही अशी परिस्थिती झाली आहे. मुले फुटबॉल व इतर मैदानी खेळ खेळतात पण पि एस् ३ वर! अशाने जिवाभावाचे मित्रगण व नेत्रुत्व गुण विकसात होण्या पेक्षा मुलांमध्ये माणुसघाणी व विकृत मनोवृत्ती आणि पुढे नैराष्यवादी मनोदशा तयार होते. एवढेच काय पण गणकयंत्रावरच्या काही खेळ सारखे खेळल्याने मुलांमध्ये चुक झाल्यावरच्या पश्चातापाची नैसर्गिक भावना असते ती बोथट होते व चुक होऊन सुद्धा पश्चाताप होईनासा होतो. मुल बिघडण्यामागचे हमखास कारण म्हणजे त्यांच्यातली पश्चातापाची नैसर्गिक भावना नाहिशी होणे.
कोणाला जर वाटत असेल की काय करायचे हल्लीची मुले ऐकतच नाहीत, येतच नाहीत खेळायला कारण मुले म्हणे कॉम्प्युटरलाच चिकटुन बसतात. त्यात मुलांना दोष देण्या पेक्षा त्यांच्या आई वडिलांना द्यावा लागेल. हल्ली साधारण अशा त-हेचे उद्गार आपल्याला सर्रास ऐकायला मिळतात - माझे आयुष्य, मला माझी स्पेस, मी काही फक्त मुलांसाठी जगत नाही मला माझे जगायचे आहे, मी मुलांसाठी का म्हणुन स्वतःच्या स्वतंत्र्यावर आळा घालु?, मी त्यांच्या साठी का म्हणुन बंधन ओढवुन घेऊ?.
आपले आई वडील असेच विचार करते असते तर आज आपण हे वाचत नसतो. पुर्वी डिप्रेशन, बोर होणे हा शब्दच आपण कधी ऐकला नव्हता. हल्ली पालकच म्हणतात व मुले पण बोर व्हायला लागली आहेत. बोर होण्याची पुढची पायरी म्हणजे डिप्रेशन.
हल्ली समाजातील प्रौढ व लहान मुले एकत्र भेटतात व एकमेकांत सुसंवाद सादतात असे बघायला मिळत नाही. ते प्रयत्नपुर्वक पणे केले पाहीजे. शाळेबाहेरील शाळा सक्षम करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे किर्तन, प्रवचनांना प्रोत्साहन देणे. सगळ्यात चांगले प्रोत्साहन म्हणजे आपल्या मुलांना घेऊन अशा कार्यक्रमांना जाणे. किर्तन, प्रवचनांना फक्त म्हातारी लोकं जातात असा जो एक समाजात समज आहे तो आपण स्वतः जायला लागुन बदलला पाहीजे. त्यात कोणाला कमीपणा वाटायला नको, लाज वाटायला नको व मागासलेपणा पण वाटायला नको. आपले क्रिश्चन बांधव पण रविवारच्या मास ला जवळच्या चर्च मध्ये जातातच ना. ते मागासलेले वाटतात का आपल्याला? त्यांना लाज वाटते का? त्यांना त्यात कमीपणा वाटतो का? ते जातियवादी होतात का लागलीच? किर्तनात, प्रवचनात जे सांगितले जाते ते सगळेच्या सगळे देश, काल पात्रानी आपल्याला आणि आपल्या समाजाला लागु होतच असेल असे नाही पण निदान आपल्याला विचाराला चालना तरी मिळेल. ब-याच जणांना आपल्या मुलांना किर्तन प्रवचनांना घेऊन जायचे म्हणजे मुलाला शामळू बनवायचे किंवा लहानवयापासुन वैराग्याचे व अल्पसंतुष्ट होण्याचे धडे द्यायचे असे वाटते. थोडक्यात किर्तन प्रवचनांना लहान मुलांना घेऊन जाणे म्हणजे गृहास्थाश्रमासाठी मुलाला नालायक बनवणे असे काही लोकांना वाटेल. उलट आपली विचारसरणी अशी सर्वसमावशक आहे की वेदांतुन, शास्त्रांतुन, उपनिषदांमधुन, गीतेतुन कधीही टोकाची भुमिका घ्या असे प्रतिपादिले नाही. टोकाचे वैराग्य, टोकाचा संन्यास, टोकाचा उपवास, टोकाची व्रते, टोकाची कर्मे, टोकाचा निस्वार्थीपणा ह्याला विरोधच नाही तर ते तामसी कर्म मानले गेले आहे. माणसाने जगात राहुन, जगाच्या चांगल्या गोष्टींचा अस्वाद घेउन, कर्म न सोडता, प्रसन्न व आनंदी राहुन आपली सदसदविवेक बुद्धी हळु हळु कशी वाढवावी व आत्म्याची उन्नती कशी करावी व त्यासाठी कसे जगायचे हेच प्रत्येक ठिकाणी प्रतिपादिले आहे. हे सगळे करण्यासाठी आपली विचारसरणी ही सर्व समावेशक ह्यासाठी आहे की आपला धर्मच आपल्या शिकवतो की आनंदी कसे रहायचे, प्रसन्न मन कसे ठेवायचे, शरिरास व्यायाम कसा द्यायचा, रोगव्याधीं पासुन दुर राहण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक औषधे व पथ्यपाणी हे आपल्या हिंदुनावाच्या जिवनसरणीतच सामावलेले आहे.
कोठच्याही विचारसरणीचे दोन भाग असतात पहीला भाग – विचार. त्यात समाजापुढे विवेकबुद्धीला अनुसरुन विचार ठेवण्यात येतो. धार्मीक सुत्रे व तत्वज्ञान ह्यात मोडते. दुसरा भाग – क्रिय. त्यात त्या मांडलेल्या विचारांना क्रियेत उतरवणे.
विचार - कोणतिही विचारसरणी लोकांनी अंगीकारण्यासाठी लोकांना ते तत्वज्ञान पटायला पाहीजे. अशा दृष्टीने विचारांची मांडणी केली पाहीजे. आपला धर्म किंवा आपली विचारसरणी हजारो वर्षांपासुन चालत आलेली आहे. कालांतराने त्या परीसावर कधी कधी बुरशी जमते. प्रत्येक पिढीचे मग कर्तव्य बनते की समाजातील मोठ्यानी ती बुरशी वेळोवेळी दुर करावी. आपली विचारसरणी समजायला सोपी ठेवावी. पाखड आहेत म्हणुन आपण तांदुळ टाकुन थोडेच देतो. वेळोवेळी समाजातील मोठ्यांनी पाखड पाखडुन टाकुनद्यावेत. देश, काल व पात्राच्या परिसीमेत ती विचारसरणी कशी सोपी होईल ह्याकडे लक्ष घालायला हवे. लहानपणा पासुन किर्तन प्रवचनांना जाण्याने हे विचार त्यांना विचार करायला लावतात. त्यांच्यातली सारासार विचारकरण्याची ताकद प्रज्वलित होते. चुक झाल्यावर नैसर्गिक पश्चातापाची भावना उफाळुन येते. ही भावनाच लहानांना चांगले गुण आत्मसात करण्यात प्रद्युप्त करते. लहानपणा पासुन विचार कानावर पडले नाहीत तर मग आपली विचारसरणी एकदम अंगिकारली कशी जाऊ शकेल.
क्रिय – मांडलेल्या विचारांना क्रियेत उतरवण्या साठी, समजलेले तत्वज्ञान जिवनात उतरवण्या एवढे सोपे व व्यावहारिक पाहीजे. फार क्लिष्ट चाली रुढींचा लोकांना अनुसरायला कंटाळा येतो व त्या मागचा उद्देश स्पष्ट नसेल तर विचारसरणीवरचा विश्वासच उडतो. तसेच जर देश, काल व पात्र ह्यांना अनुलक्षून आपल्या विचारसरणीला वेळोवेळी धार दिली नाही तर ती लौकरच कालबाह्य होते व अनुसरणीय रहात नाही. आता हे करण्यासाठी काही कोणती धार्मीक बैठक बोलावण्याची गरज नाही किंवा राजकारण्यांसारखी कमिटी बनवण्याची गरज नाही. आपण समाजातील वयस्कर व मोठ्या लोकांनीच वेळोवेळी आपणहोऊन हे हाती घेतले पाहीजे. म्हणजे सुपातले तांदुळ न सांडता पाखड तेवढे जातील असे बघितले पाहीजे. ह्याची सुरवात अगदी आपल्या प्रत्येकाच्या घरात होऊ शकते. आपण लहानांना लागणारी विचारांची योग्य सामुग्री त्यांच्या बालपणीच बालकडु म्हणुन द्यायला हवी. हे साध्य करण्यासाठी काही रुपरेषा दिल्या आहेत –
• आपल्या मुलांना जवळच्या देवळात आठवड्यातुन एकदा किर्तन वा प्रवचनांना घेउन जा. ह्या गोष्टीला आठवड्यात दोन ते तिन तास लागतात जास्तीत जास्त. साधारण वयाच्या चार वर्षांपासुन बारा वर्षांपर्यंत हे करावे लागेल.
• लहान मुलांन मध्ये मिसळा. त्यांच्या बरोबर संध्याकाळी खेळ खेळा. जर का आसपास खेळायचे मैदान नसेल तर त्यांच्याकडुन पळायचा व्यायाम करवुन घ्या. सुर्यनमस्कारांचे मह्त्व पटवुनद्या व त्यांच्या कडुन सुर्यनमस्कार घालुन घ्या.
• लहानांना राष्ट्रव्रती बनवा व राष्ट्रव्रत काय असते ते समजवा.
शाळेबाहेरच्या शाळेची प्रथा तेवत ठेवणे आपल्या हाती आहे. लहान मुलांना दोष द्यायचा सोडुन आपला माणुसघाणेपणा आपण कमी करायला शिकला पाहीजे. आपणच परत पुर्वी आपल्या बरोबर होत असायची तशी लहान मुलां बरोबर सुसंवादास सुरवात केली पाहीजे. ह्या शाळे बाहेरील शाळा कार्यक्षम केल्या पाहिजेत. शाळेबाहेरील शाळांना आपण प्रत्येकाने महत्व दिले पाहीजे.