Monday, September 13, 2010

हनुमानाला मिळालेला शाप व त्यावर उतारा – भाग २





माणसाचा स्वभाव हा जात्याच ‘पोझेसीव’ असतो. म्हणजे, ‘हे माझे’, ‘हे मी मिळवले आहे, ‘माझी गोष्ट अशी असावी’, ‘मी मग असे करीन’ – अशी वाक्ये आपण नेहमी ऐकतो. माणूस नेहमी मी, माझे अशा तऱ्हेचे मालकी हक्क दाखवणारे शब्द वापरतो व आपल्या वाटणाऱ्या गोष्टींना तो शेवट पर्यंत बिलगून राहतो. पण सध्या त्याला जणू हिंदू विचारसरणीचा काही कारणाने विसर पडत चालला आहे. ही जी महान संस्कृती म्हणजेच विचारसरणी त्याला लाभली आहे ती त्याची स्वतःची आहे ह्याची जाणीव भारतात राहणाऱ्या हिंदू मनाला करून दिली पाहिजे. ही संस्कृती त्याच्या पूर्वजांनी स्वतः संपादन केली आहे, ही संस्कृती भारतीयांचे आयुष्य सुकर करणारी व प्रेरणादायी विचारसरणी आहे. ह्याच विचारसरणीने आज ह्या देशाला इतर देशांपेक्षा वेगळे केले आहे. ह्याच विचारसरणीने, सगळ्या भारतीयांना विचार बंधांनी बांधलेले आहे. ह्या विचारसरणीत एवढी शक्ती आहे की तिचा जर अवलंब केला तर, लोकांचे कल्याण होईल ह्याचा प्रत्यय आज हजारो वर्षे आपल्याला येत आलेला आहे.



आज भारतात अनेक वेगवेगळे रीतिरिवाज आहेत – उत्तरे कडून दक्षिणे पर्यंत व पुर्वे कडून पश्चिमे पर्यंत, पण तरीसुद्धा प्रत्येक हिंदूमनाला माहीत असते की आपण वेगळे नाहीत. कारण मनाच्या कोपऱ्यात वा अंतर्मनात दडलेले असते की आपली विचारसरणी म्हणजेच धर्म एक आहे, व हा एवढा एक व एकच दुवा पुरा आहे लोकांची मने बांधून ठेवायला. पाहा ही कल्पना नुसती मनाच्या कोपऱ्यात असल्यानेच केवढे कार्य केले आहे, त्याचीच जर प्रत्येकाला जाणीव झाली तर त्यातूनच केवढी मोठी सांघिक शक्ती निर्माण होईल. हीच शक्ती प्रेरणा देते की आम्ही एक आहोत. हा देश आमचा आहे. ही विचारसरणी टिकवण्यास व प्रगल्भ करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आम्हाला आमच्या विचारसरणीचा म्हणजेच हिंदुत्वाचा अभिमान आहे. हे आमचे आहे. आमच्या देशाला काही अपयश आले तर नामुष्की आमची स्वतःची होणार आहे. देश यशस्वी झाला तर यश आमचे आहे. आमचा भारत बलाढ्य झाला पाहिजे, कारण आमची विचारसरणी, आमची संस्कृती, आमची इच्छा प्रबळ आहे. ही विचारसरणी हजारो वर्षांच्या परंपरेतून तावून सुलाखून निघालेली आहे. विचारसरणी पक्की आहे, खोटी आमच्या कडूनंच आहे. पण हे सगळे आपल्या विचार धारणेवर विश्वास नसला तर मुळीच होणार नाही. म्हणूनच प्रत्येक हिंदू मनाला आपण हिंदू आहोत ह्याचा अभिमान पाहिजे हे महत्त्वाचे व तो योग्य तऱ्हेने प्रगट करता आला पाहिजे हे अजून महत्त्वाचे. हिंदू धर्माचा अभिमान बाळगणे व तो योग्य तऱ्हेने प्रगट जर करायचा तर आपल्याला खालील सूत्र अमलात आणावी लागतील. ती सूत्र अशी आहेत.



- आपल्या व आपल्या भोवतालच्या लहान मुलांना योग्य वळण लावणे व जागृत करणे, राष्ट्रव्रती बनवणे.

- अहंभाव कमी करणे.

- राष्ट्र सुधार कार्यात नेहमी अग्रेसर राहणे.

- लाचलुचपत व वित्तीय घोटाळ्यांपासून स्वतः दूर राहणे व दुसऱ्याला परावृत्त करणे.

- आपल्यातले कला, नैपुण्य सतत वाढवणे व छंद जोपासणे. शरीराला व्यायामाची सवय ठेवणे.

- कामाच्या चांगल्या सवयी लावून घेणे. तसेच कोणच्या ही कामाची व काम करणाऱ्यांची उपेक्षा टाळणे.

- नीतिमत्ता व चांगल्या आचरणांचा वापर सतत करणे.

- टोकाच्या आवडी-निवडी टाळणे. छांदिष्टपण टाळणे व स्वतः बद्दलची कीव कमी करणे.

- दूरदर्शी बनायचा प्रयत्न करणे व स्वतःचे विचार उत्तम, उदात्त व उत्तुंग बनवणे.

- आपल्या धर्मातल्या चांगल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे.



ही सूत्र जो अमलात आणतो तो हिंदू हा राष्ट्रव्रती असतो. ही सूत्रे आपल्या हिंदुधर्मात वेळोवेळी व वेगवेगळ्या संतांनी, स्मृती, श्रुतींमधून निर्देशांच्या रूपाने आधीच अस्तित्वात आहेत. येथे फक्त देश काल पात्राच्या मर्यादेत राहून एकत्र केली आहेत. हेच हिंदुत्व, हेच राष्ट्रव्रत. राष्ट्रव्रताच्या दहा सूत्रांचे आकलन होण्या करता ती सूत्र काय आहेत ती पाहूया.



- आपल्या व आपल्या भोवतालच्या लहान मुलांना योग्य वळण लावणे व जागृत करणे, राष्ट्रव्रती बनवणे. हे प्रत्येक हिंदुत्ववाद्याचे म्हणजेच राष्ट्रव्रत्याचे कर्तव्य असले पाहिजे. आपल्या राष्ट्राला अग्रेसर बनवणारी अशी लहान मुलेच मशाली ठरणार आहेत. त्यांना हिंदू असण्याची कल्पना व देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी लागणारी विचारांची योग्य सामुग्री त्यांच्या बालपणीच बालकडू म्हणून द्यायला हवी. हे साध्य करण्यासाठी काही रूपरेषा दिल्या आहेत –



• लहान मुलांना कामाचे महत्त्व शिकवावे. कोणचेही काम खालच्या दर्जाचे नसते हे शिकवावे. काम करणाऱ्यांची उपेक्षा करणे घातक असते हे त्यांना सांगितले पाहिजे. ज्यांना काम मिळते ते खरोखरीच नशीबवान आहेत हे त्यांच्या मनात सतत ठसवले गेले पाहिजे.

• लहान मुलांमध्ये स्वच्छतेची जाणीव जागवा. स्वतःची स्वच्छात व सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व रुजवा. सार्वजनिक स्थळे घाण करणे म्हणजे अतिशय नीचतेचे वागणे आहे हे पटवा.

• गणपतीच्या दिवसात बाकीच्या न विरघळणाऱ्या मूर्तींपेक्षा मातीच्या मूर्ती स्थापनेचा फायदा शिकवा. मिरवणूक शिस्तबद्ध का असावी ह्याचे बाळकडू द्या.

• वाहनांचे योग्य नियम शिकवा व ते पाळायला शिकवा.

• मुलांना रांगेत उभे राहण्याचे महत्त्व सांगा. आपल्या देशाचे नियम पाळायची सवय लावा. नियम पाळणे वा न पाळणे हे कोणी बघताय वा बघत नाही ह्यावर अवलंबून असायला नको. नियमांविरुद्ध अर्ज करणे व नियम का पाळला नाही त्याला कारणे देणे आपल्यात भिनले आहे ते थांबवायची गरज आहे. लहानांना हे पटवले पाहिजे की नियम न पाळणे ह्यात काही शहाणपण नाही. माणसाचे थोरपण तेव्हाच कळते जेव्हा तो नियम पाळून यशस्वी होतो.

• लहानांना व्यायामाचे महत्त्व शिकवा. सूर्यनमस्कार शिकवा. नीटनेटकेपण अंगी बाणायला शिकवा. कोणचीही गोष्ट चांगल्या तऱ्हेने सादर करायची कला आत्मसात करायची सवय लावा.

• आपल्या देशाच्या मालमत्तेचे रक्षण करायची सवय लावा. विरोध जरी प्रदर्शित करायचा झाला तरी वाहने जाळून व कोणच्याही प्रकारची नासधूस करून प्रदर्शित करता कामा नये ह्याची शिकवण लहानपणापासून द्या.

• थुंकायची सवय चांगली नाही हे मनात बिंबवा.

• छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घ्यायला शिकवा. टोकाच्या आवडी निवडी सोडायला शिकवा. त्याने त्यांचे पुढचे आयुष्य आनंदी व प्रसन्न होण्यास मदत होईल.

• सकाळी लवकर उठण्याचे महत्त्व शिकवा. जो सकाळी लवकर उठतो त्याला दुसऱ्यांपेक्षा जास्त वेळ मिळतो हे ठसवा.

• लहान मुलांमध्ये मिसळा. त्यांच्या बरोबर संध्याकाळी खेळ खेळा. जर लहान वयात मुलांना नुसते मोकळे सोडले तर मुलं वाईट सवयी पटकन धरतात. नाहीतर गणकयंत्रावर लहानपणीच विविध हानिकारक खेळ खेळायचा वाईट नाद मुलांना लागतो. त्यामुळे त्यांची मनोवृत्ती विकृत बनू शकते वा शारीरिक प्रगती खुंटते. जर का आसपास खेळायचे मैदान नसेल तर त्यांच्याकडून पळायचा व्यायाम करवून घ्या. सूर्यनमस्काराचे महत्त्व पटवुन द्या व त्यांच्या कडून सूर्यनमस्कार घालून घ्या.

• लहान मुलांमध्ये कसे मिसळायचे व त्यांना जागृत कसे करायचे ह्याचे थोडक्यात वर्णन करत आहे.

o साधारणपणे दररोज १ तास लहानांमध्ये घालवायचा प्रयत्न करावा. लहान मुलांबरोबर खेळून आपणही आनंदी व्हाल. आपल्या आवडी नुसार व वेळेच्या उपलब्धते नुसार वेळापत्रक करावे. पण जे ठरवाल त्यात नियमितता असली पाहिजे.

o पहिला अर्धा तास व्हॉली बॉल, फुटा बॉल सारखे मैदानी खेळ असावेत. ह्या खेळांनी एकमेकांमधले सामंजस्य वाढते, मुलांची शारीरिक प्रगती होते आणि मुलांना दमायला होते. लहान मुलांनी खेळ खेळून दमायलाच पाहिजे. पुढची १५ मिनिटे, त्यांना एखादी गोष्ट सांगा. ही गोष्ट अशी निवडा की ज्या पासून जीवनाबद्दल चांगले धडे शिकायला मिळतील. ती गोष्ट, पूर्वीच्या आपल्या भारतवर्षाच्या उज्ज्वल काळातली असू शकते, आपल्या इतिहासातल्या झालेल्या चुका असू शकतात, आपल्या स्वातंत्र्य लढ्या बद्दलच्या गोष्टी असू शकतात, किंवा एखादी आपल्या स्वातंत्र्योत्तर काळातील भारत पाक लढ्यातली गोष्ट असू शकते. एखादी थोर लेखकाने लिहिलेली गोष्टही असू शकते.

o पुढची १५ मिनिटे मुलांना हल्लीच्या ज्वलंत प्रश्नांबद्दलची माहिती करून द्यावी. त्यांना त्याचा विचार करून त्या प्रश्नांवर उत्तरे शोधायची सवय लावावी. लोकांपुढे बोलायची सवय लावावी. सभे पुढे बोलायचे त्यांचे धैर्य वाढवावे.

o हा एक तास आपण जेवढा नीट आखाल तेवढा त्याचा फायदा मुलांच्यात योग्य जागृती होण्यात होईल. मुलांमध्ये आपला मेळ बरोबर बसला पाहिजे तरच मुले तुम्हाला मित्र समजून, किंवा तुमचा आदर करून चांगल्या सवयी उचलतील. हे करताना आपल्याला स्वतःचा अहंभाव जरा बाजूला ठेवावा लागेल. मुलांना शिकवायची मनापासून इच्छा व्हायला पाहिजे. कोठे मुले चुकताना दिसली तर, ‘मला काय करायचे त्यांचे पालक बघून घेतील’ ही भावना सोडून देऊन मुलांची चूक दुरुस्त करायचा प्रयत्न करावा लागेल. मुलांना चूक समजावून द्यावी लागेल व पालकांनीही उगाचच मुलांची बाजू घेण्याचे टाळले पाहिजे. हातून झालेल्या चुकांचा मुलांना पश्चात्ताप होणे हे चांगले लक्षण आहे ते जोपासले पाहिजे. ज्याला पश्चात्ताप होतो तो चुका सुधारू शकतो.



- अहंभाव कमी करणे. बऱ्याच वेळेला आपला अहंभाव कृती करण्याच्या आड येतो. आपल्यातल्या अहंभावामुळे कृती करावीशी वाटून सुद्धा गोंधळ उडण्या सारखे भरपूर प्रश्न आपल्या समोर उभे ठाकतात. कधी वाटते – "माझा दर्जा, माझी ‘पोझिशन’ पाहून मी का म्हणून असले काम करू"? कधी मनात येते, "मी कशाला त्या मुलाला शिकवू किंवा त्याच्या चुका काढू? कारण, तो मुलगा ज्या घरातला आहे त्याच्याशी आपले फार काही जिव्हाळ्याचे संबंध नाहीत". कधी कोणी आपल्या राष्ट्रासाठी छान कल्पना पुढे ठेवली तर "मी मदत तर सोडाच पण साधा पाठिंबा पण देणार नाही. बाजूला होऊन गंमत बघेन". फारच झाले तर, "मला जर श्रेय मिळणार असेल तर मग विचार करीन". आपण जेव्हा आपल्याकडे कामकरणाऱ्यांच्या मुलांना शिकवत असू, किंवा एखाद्या दारिद्र्यरेषेखालच्या घरातल्या मुलांना शिकवत असू तेव्हातर प्रामुख्याने आपल्या अहंभावावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे.



- राष्ट्र सुधार कार्यात नेहमी अग्रेसर राहणे. राष्ट्र जोपर्यंत समृद्ध होत नाही तो पर्यंत स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाच्या सातत्याने विकास होणार नाही. हे ज्याला पटले तो आपोआपच राष्ट्र सुधार कार्यात अग्रेसर राहील. जेव्हा आपले राष्ट्र निकोप, सुरक्षित व संघटित होईल तेव्हाच आपण स्वतःचा विकास खऱ्या अर्थाने करू शकू. आपल्या धर्मा मध्ये गरजूंची मदत नेहमीच प्रतिपादीली आहे एवढेच नाही तर शास्त्रांमध्ये तीकशी करावी ह्यावर मार्मिक विवेचन आढळते. शास्त्रे सांगतात, आपल्या मिळकतीतील दहा टक्के आपण गरजूंना द्यावेत, दहा टक्के आपल्या वृद्ध पालकांवर व थोरांवर खर्ची घालावी, दहा टक्के भविष्यासाठी साठवून ठेवावी आणि बाकी उरलेली स्वतःवर व परिवाराच्या कल्याणार्थ खर्ची घालावी. ही काही काळ्या दगडावरची रेघ समजायची गरज नाही. हा एक घालून दिलेला पायंडा आहे. कोणाला गरजेनुसार, इच्छेनुसार, आपल्या शक्तीनुसार, आपल्या आत्म्याच्या प्रगल्भतेच्या स्तरानुसार, आपल्या आवडीनुसार त्या टक्केवारीत कमी जास्त बदल करायचा असेल तर त्यात काही बिघडत नाही, तसा तो प्रत्येकाने करावा. पण समाजासाठी असलेली आपली जबाबदारी ओळखावी एवढे समजले व त्याप्रमाणे वागले म्हणजे शास्त्रपालन झाले असे समजावे. स्वतःला असे करण्यात किती समाधान मिळेल ते बघा. स्वतःचा स्वाभिमान वाढीस लागतो. आत्मविश्वास वाढतो.



राष्ट्र सुधार कार्यात अग्रेसर व्हायचे तर काही सोप्या सहजच करता येण्या सारख्या गोष्टी आहेत त्या देतो.



- आपण एखाद्या गरजू विद्यार्थ्याला मदत करू शकता.

- जवळच्या बिनसरकारी संघटनेत काम करू शकता.

- आपण जर वृद्ध असाल तर आजूबाजूचा लहान मुलामुलींना गोष्टी सांगून किंवा गोष्टी सांगायला लावून सभाधीट बनवू शकता. आपला पण वेळ चांगला जाईल व लहानांना पण जाता जाता वळण लागेल.

- आपण जर गृहिणी असाल तर फावल्या वेळेत आपल्याला येणारी कोठलीतरी कला लहानांना शिकवता येईल. कला, गोष्टी, संगीत व गप्पागोष्टींतून सुद्धा समाजोपयोगी चांगले गुण शिकले, शिकवले जाऊ शकतात.

- तुम्ही जर वैद्य किंवा डॉक्टर असाल तर जवळच्या गरजू लोकांना सामाजिक स्वास्थ्या बद्दल प्रबोधन करू शकाल व औषधेही देऊ शकाल.

- किती लिहू? तुम्ही आपण आपल्या कुवती प्रमाणे स्वतःच ठरवून रामाच्या खारुटली प्रमाणे आपला वाटा उचलू शकता. थोडक्यात, आयुष्यात एकातरी गरजू मुलासाठी देवमाणूस व्हायचा प्रयत्न करा व बघा किती आंतरिक समाधान प्राप्त होते ते.



ज्यांना एवढेही जमणार नसेल त्याने बाकीच्यांनी हाती घेतलेल्या कामात अडथळे न आणता त्यांना मनापासून निदान चांगले आशीर्वाद तरी द्यावेत. काही गोष्टी ज्या सहज आपल्या हातून होऊ शकतात त्या अशा.



- आपल्याला आवडले असेल किंवा नसेल पण आपले राष्ट्र वेगवेगळ्या भाषिक प्रांतात (राज्यात) विभागले गेले आहे. आपल्या राष्ट्राने ह्या गोष्टीचा स्वीकार केला आहे. आपले राष्ट्र आपल्या राज्यांपेक्षा श्रेष्ठ असल्या कारणाने आंतरराज्य सीमेवरून भांडणे उकरून काढता कामा नयेत व असलेल्या मतभेदांना प्रोत्साहन देता कामा नयेत. कोठच्याही अशा मोहिमेला बळी पडू नका ज्याने राज्या राज्यां मध्ये कलह निर्माण होईल. आपले बळ, आपली ऊर्मी, आपली ताकद, आपला उत्साह, आपली शक्ती, आपला जोर, आपला जोष व आपली बुद्धी नेहमी आपल्या राष्ट्राच्या सीमा सुरक्षित कशा राहतील ह्यात लागल्या पाहिजेत. आपल्या सीमेला धरून असणाऱ्या प्रश्नांशी आपण नेहमी जागरूक असले पाहिजे. कोणत्या सीमा अजून निश्चित नाहीत, कोणच्या सीमेबाबत कोणच्या राष्ट्रांबरोबर वाद आहेत, घुसखोर कोठून होत आहे, बांगलादेशी विस्थापितांचा लोंढा अजून का येत आहे व आपला देश तो थांबवण्यासाठी काय करत आहे इत्यादी बाबींवर आपले लक्ष वेधलेले असले पाहिजे.

- आपल्या राष्ट्राची संपत्ती व नैसर्गिक साठे ह्याच्या सुरक्षिततेच्या बाबतीत आपण नेहमी सतर्क असले पाहिजे. मुलांना व वाटचुकलेल्या तरुणांना राष्ट्रीय संपत्तीच्यानाषापासून नेहमी परावृत्त केले पाहिजे. राष्ट्रीय संपत्तीला हानी पोहचेल अशा कोठच्याही मोहिमेला आपला पाठिंबा असता कामा नये. विरोध दर्शवायच्या सुद्धा सुसंस्कृत पद्धती आहेत त्याचा वापर करावा. कोणत्याही कायद्या विरुद्ध किंवा सरकारी धोरणाचा विरोध करायचा असेल तर राष्ट्रीय संपत्तीला हानी न पोहचवता करा.

- मंदिर, मस्जिद इत्यादी धर्मस्थळे दळणवळण केंद्रांवर व रस्त्यांमध्ये बांधायचा कोणताही विचार असेल तर किंवा बांधली जात असली तर, अशा कोणत्याही मोहिमेला प्रोत्साहन वा पाठिंबा देऊ नये.

- लोकसंख्या वाढीमुळे उद्भवणारे प्रश्न अशिक्षित लोकांना समजावून सांगा. संख्ये पेक्षा कस का चांगला ह्याचे महत्त्व समजवावे.

- आपल्या राष्ट्राबद्दल चांगले विचार मनात नेहमी आणावे, तसेच आपल्या परिवाराबद्दल मनात चांगले विचार आणावे, आपल्या समाजाबद्दल मनात चांगले विचार आणावे. प्रार्थनेचा खूप फायदा होतो. त्याने मन निर्मळ, आनंदी राहते व आजूबाजूला चांगले वातावरण निर्माण होण्यास मदत होते हे सर्वश्रुतच आहे. देशासाठी चांगल्या मनाने केलेली प्रार्थना उपायकारक ठरते.

- मतदान हे आपले सगळ्यात मोठे कर्तव्य आहे व लोकशाही टिकवण्याचे मुख्य साधन आहे. ते प्रत्येकाने आपला धर्म आहे अस समजून पाळले पाहिजे.



(क्रमशः)

No comments:

Post a Comment