- लाचलुचपत व वित्तीय घोटाळ्यांपासून स्वतः दूर राहणे व दुसऱ्याला परावृत्त करणे. ज्याच्या कडे कौशल्य, कर्तब, शक्ती किंवा बुद्धी असते, आणि परिश्रम करण्याची तयारी असते, तो मनुष्य आपल्या कर्तबगारीवर पैसे मिळवतो. स्वतःचे इमान व स्वतःचा धर्म विकून नव्हे. थोड्याशा पैशासाठी, आत्मा विकून आपल्या स्वतःला व आपल्या घरच्या लोकांना सामोरं जाता येणार नाही. लाच घेणाऱ्या प्रत्येक माणसापाठीमागे नेहमी त्याचे हावरट कुटुंब असते. लाचखोरी करून "दुसऱ्यानी मला लाच घ्यायला लावली" आपल्याला असे म्हणून टाळता पण येत नाही, कारण लाच घ्यायची का नाही हे ठरवणारे शेवटी आपण स्वतःच असतो व हा निर्णय आपल्या स्वतःचाच असतो. जो इसम लाच खातो व देतो तो आपल्या राष्ट्राचा शत्रू ठरतो, लाच खातो तो इसम जास्त मोठा शत्रू. मग इतरवेळेला किती का राष्ट्रप्रेमाचा आव आणूदे. जो लाच घेतो तो पापी व राष्ट्रद्रोही असतो.
- आपल्यातले कला, नैपुण्य सतत वाढवणे व छंद जोपासणे. शरीराला व्यायामाची सवय ठेवणे. आपली मातृभाषा सुधारण्याचा ध्यास घ्या. भाषाकौषल्य वाढवा. बऱ्याचदा आपले भाषाकौषल्य जर अपुरे असेल तर गैरसमज उद्भवण्याचा संभव असतो. आपला जो अभ्यासक्रम असतो, त्याच बरोबर आपण वेगवेगळे आवडणारे असे विषय शिकावेत व ज्यात आपल्याला गती व रस आहे अश्या कला जोपासाव्या व कौशल्य वाढवावे. आपला शालेय अभ्यासक्रम हा बुद्धीला चालना देणारा नसून पुस्तकी जास्त आहे व कौशल्य वाढवणारा नाही. आपणही कौशल्य वाढवायच्या मागे नसतो. कसेतरी करून पदवीधारक बनून नोकरी लागली की झाले, अशी आपली स्वतःची भावना असते. कमरेवर हात ठेवून दुसऱ्यांकडून काम करवून घेण्यात आपण फार तरबेज असतो. उंटावरून शेळ्या हाकायला फार आवडतात आपल्याला. पण आपल्याकडे कौशल्याची कमी असेल तर फार काळ आपला टिकाव लागत नाही. कोणी तरी जास्त कौशल्याचा आपल्या पुढे निघून जातो. कौशल्या बरोबर एखादा छंद जोपासावा. छंद हे व्यसन नाही. कॉम्प्युटरवर सारखे खेळ खेळणे हे व्यसन म्हणता येईल. सारखे नेट चॅटींग करणे हे व्यसन म्हणता येईल. हल्ली आपले कॉम्प्युटर मित्र फार व आसपासच्या लोकांशी आपल्याला बोलायला वेळ नाही अशी परिस्थिती झाली आहे. ह्याचे पर्यवसान लोकांना ‘डिप्रेशन’, मन उदास होणे व तत्सम व्याधी मधून पाहायला मिळते. ह्याच कारणास्तव आपल्याला आपल्या येणाऱ्या पिढीला छंद जोपासायला शिकवले पाहिजे. प्रत्येक लहान मुलाला एखादा चांगला छंद अंगिकारायला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. मोठे झाल्यावर हल्लीच्या ‘न्युक्लीयर’ कुटंबांतून छंद हाच प्रत्येकाचा खरा सोबती ठरणार आहे. चांगला छंद आपल्याला कठीण प्रसंगी कामास येईल. आपले मनोस्वास्थ्य जोपासण्यास त्याची अतोनात मदत होते. छंद जोपासण्याने बऱ्याच अंशाने आपल्या डोक्यावरचा ताण कमी होण्यास नैसर्गिकरीत्या मदत होते. चांगले छंद आपला एकटेपणा दूर करतात. छंद जोपासल्याने आपली प्रसन्नता टिकवून ठेवली जाते. छंद हा एक विरंगुळा आहे. शेवटी प्रत्येकाने आपला ‘जु’ आपणच उचलून पुढे चालले पाहिजे. ह्या जगात ज्याला प्रसन्नतेने व आनंदाने जगता आले आहे तोच मनुष्य यशस्वी गणला जातो. स्वतःची वाटचाल अशीच आनंदाने चालू ठेवा असेच गुरू रविंद्रनाथ टागोरांचे ‘एकला चालो रे’ ह्या गीतात उद्धृत आहे. आयुष्यात जरी कितीही अडचणी आल्या तरी, छंद हा प्रवास सुकर करण्यास निश्चित मदत करतो. आपल्या शरीराला व्यायामाची सवय ठेवा. दररोज किमान अर्धातास तरी शरीराला व्यायाम द्यावा. आपला हा व्यायाम आपण मुलांमध्ये मिसळून त्यांना शिकवत असताना करू शकता. स्वतःच्या शरीराला व्यायाम देताना तो कशा पद्धतीने करायचा ह्याचा आराखडा आपण स्वतःच तयार करू शकता. आपल्या ह्या अर्ध्या तासाची सुरवात प्राणायामाने करू शकता, त्यानंतर थोडे पळणे, घरातली कामे करणे – साफसफाई, केर काढणे तत्सम गोष्टी व्यायामाच्या आऱ्याखड्यात प्रविष्ट करू शकता, महिलांना भारतीय नृत्य येत असेल तर त्या त्याची तालीम करू शकतात. जे ठरवू त्यात नियमितता आणली पाहिजे. चांगली सवय लावून घेण्यासाठी सोपा उपाय म्हणजे तो उपक्रम सतत एकवीस दिवस करावा, आपोआप त्याची सवय लागेल व मग आपले मनच चुकचुकेल व व्यायाम नियमित व्हायला लागेल. आपल्या शरीराला व्यायाम हा हवाच. कोणतीही सरकारी वा बिनसरकारी स्वास्थ्य योजना असली आणि नीट राबवली जात असली तरी आपले शरीरच जर कमकुवत असेल तर आपल्याला प्रसन्नता, तरतरीतपणा व शरीर सौष्ठवता कदापि लाभणार नाही.
- कामाच्या चांगल्या सवयी लावून घेणे. तसेच कोणच्या ही कामाची व काम करणाऱ्यांची उपेक्षा टाळणे. चांगले काम हे कौशल्य, प्रतिभा व मनाची प्रसन्नता ह्यावर अवलंबून असते. तोंडपुजेपणा, अपात्रतेला प्रोत्साहन व नाकर्तेपणा ह्यावर नाही. चोख काम होणे हे वेळेत व बरोबर कले जाणे ह्यावर अवलंबून असते, हलगर्जीपणावर नाही. तसेच ते चांगल्या प्रशासनावर अवलंबून असते, धाकदपटशाहीवर नव्हे. एक दुसऱ्याच्या आदर भावनेवर अवलंबून असते. कोणच्या ही राष्ट्राची समृद्धता पिढ्या पिढ्यांच्या परिश्रमातून निर्माण होते व पिढ्या पिढ्यांच्या त्यागा मुळे टिकून राहते. ती काही कोणा एका महात्म्या मुळे बनत नाही व टिकत नाही. अशा महात्म्यांची माळ लागते व त्याही पेक्षा तुमच्या आमच्या सारखे सामान्यच लोकं ती टिकवून ठेवू शकतात. कोणतेही काम हे कनिष्ठ नसते. हलकट असतात ती लोकांची मने. कोणतेही कर्तब व कौशल्य कमीपणा आणणारे नसते. प्रत्येकाला परस्परांबद्दल आदरभावना असली पाहिजे मग तो कामगार असो, अधिकारी असो वा मालक असो. अहम भाव व उर्मटपणा, परस्परांमधला आदरभाव संपुष्टात आणतात. अहम भावावर जो मात करत नाही त्याला अहम भाव मारतो. साधेपणा नेहमीच फायद्याचा ठरतो. आपल्या कामावर श्रद्धा ठेवावी. कामाची अस्मिता जोपासावी व दुसऱ्यांचे काम कमीदर्ज्याचे लेखू नये.
- नीतिमत्ता व चांगल्या आचरणांचा वापर सतत करणे. आपल्या धर्माने दिलेली व आपल्या सदसदविचार बुद्धीला साजेसी अशी नीतिमत्ता व समाजात राहायचे म्हणून अंगिकारलेले काही सामाजिक नियम आपण स्वतः ठरवायला हवेत व एकदा ठरवले की त्यांच्याशी बांधील रहायला हवे. स्वतःला पटलेले व स्वतःनी ठरवलेली नीतिमत्ता व नियम म्हणजे स्वतःनी स्वतःला दिलेला शब्द. शब्द पाळण्यासाठी लोकं स्वतःचा जीव देतात अशी कित्येक उदाहरणे पाहिला मिळतील. ही नीतिमत्ता आपण हाती घेतलेल्या कामात, आपण करत असलेल्या अभ्यासात, आपल्या शेजारच्यांबरोबर राहताना आणि दुसऱ्यां बरोबरच्या व्यवहारात अमलात आणायचा प्रयत्न करायला पाहिजे. एकदा ठरवल्यावर नीतिमत्तेचे ढोंग करून उपयोग नाही. ते म्हणजे स्वतःलाच फसवल्यासारखे झाले. ह्यात काही पुरुषार्थ नाही. आपण ठरवलेल्या नीतीमते प्रमाणे आपण वागलो तर स्वतःत आत्मविश्वास जागृत होईल. आपणाला कणखर बनवेल. प्रलोभनांपासून दूर राहायची शक्ती देईल. नीतिमत्तेला धरून चालणाऱ्याला आपोआपच कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी उत्तरे सापडतात. कठीण प्रसंगात मन शांत राहायला मदत मिळते. मानसिक धैर्य वाढते. समाजात राहायचे म्हणजे प्राथमिक सुचार शिकले पाहिजेत व वापरले पाहिजेत. त्यांनी स्वतःचाच फायदा होतो. दुसऱ्यांना भेटल्यावर त्याचे पहिल्यांदा अभिवादन करायला विसरू नका. त्यांनी एकमेकांत नाते जोडले जाते व दुसरा आपल्याला काय म्हणायचे आहे त्याकडे जास्त चांगल्या भावनेने लक्ष देतो. हसतमुख राहा आणि व्यवहार आटोपल्यावर दुसऱ्याला धन्यवाद द्यायला विसरू नका. नेहमी चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवण्याने स्वतःला बरे वाटते व एखाद्या घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक होतो, जोडलेले नाते वाढीस लागते. ह्या सोप्या तीन गोष्टी आचरणात आणल्या आपण तर एकदुसऱ्यात मेळ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, एक नाते तयार होईल, सद्भावना वाढीस लागेल व त्या योगे दोघांचा फायदा होईल. वेळेचे महत्त्व काय सांगावे. कोणाला वेळ दिली तर तिचे पालन करणे हे कोणाला शब्द दिल्या इतकेच महत्त्वाचे आहे.
- टोकाच्या आवडी-निवडी टाळणे. छांदिष्टपण टाळणे व स्वतः बद्दलची कीव कमी करणे. स्वतः बद्दलची कीव करणे ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. ती कोणत्याही प्रगतीच्या आड येते. कोठचाही नवीन उपक्रम हाती न घेण्यासाठी आपण कारणे शोधत राहतो. घालून दिलेला सरकारी नियम हा स्वतःस कसा नुकसानदायी आहे हे पटवण्याचा प्रयत्न करतो पहिल्यांदा स्वतःला मग दुसऱ्यांना. हा नियम आपल्याला कसा लागू होत नाही ह्यासाठी कारणे शोधतो. त्या नियमाविरुद्ध अर्ज करतो. आपल्या सोयीप्रमाणे आपण नियम वाकवायचा प्रयत्न करतो. एकदाका आपले काम झाले की मग आपण तोच नियम कसा चांगला आहे व लोकांनी नियमाबरहुकूम का वागले पाहिजे ह्याचे ‘पाढे’ म्हणायला सुरुवात करतो. तीच गोष्ट सामाजिक कार्याच्या बाबतीत सुद्धा, किंवा रोजच्या व्यायामाबाबतीत. जेव्हा अशी गोष्ट हाती घ्यायची वेळ येते तेव्हा हजार कारणे आपल्याला सुचतात व दाखवता येतात. मग आपण स्वतःलाच समजवायचा प्रयत्नात असतो की ‘हा खोकला गेला की रोज सकाळी उठून फिरायला जाईन’, किंवा ‘माझे अंग दुखायचे जेव्हा कमी होईल तेव्हा मी पळायला जात जाईन’. अशी कीव जो करतो तो अंग दुखायचे थांबले तरी कधी पळायला जाऊ शकणार नाही कारण तो पर्यंत त्याला न करण्याचे दुसरे काहीतरी कारण सापडलेले असते. त्यापेक्षा सगळे बाजूला ठेवायचे मनात निश्चय करायचा व पळायला जायचे मग बघा चमत्कार, आपले शरीर जादूची कांडी फिरवल्यासारखे वागायला लागते ते. आपल्या जवळ जर रोज लागणाऱ्या गोष्टींच्या बद्दल टोकाच्या आवडी निवडी असतील – खायच्या बाबतीत, साफसफाईबाबत, कपड्यांबाबत, चवीबाबत तर आपल्याला खूप त्रास होईल व होत राहील. छोट्या छोट्या कारणांनी तुमचे मन दुःखी होईल. छोट्या छोट्या गोष्टीत मन गुंतले जाईल व आपण उदास होऊ. जर आपल्या आवडीनिवडी अशा प्रकारच्या टोकाच्या असतील तर येणारे रोजचे ‘कठीण’ प्रसंग आयुष्याची ‘दुःख’ समजून हिरमुसले होऊ. इतके दुःखी होऊ की, आपण मग चालू घटकेचा आनंद उपभोगू शकणार नाही. प्रत्येक गोष्टीत व प्रत्येक माणसात उगाचच खोट काढत बसायची सवय लागेल, कोणालाही समजून घेता येणार नाही, कोणाशीही नाते जोडता येणार नाही व माणसे जोडली जाणार नाहीत. जितक्या जास्ती आवडीनिवडी व जितका जास्त छांदिष्टपणा तितके आपले मित्र मंडळी कमी होत जातील व आपण एकटे पडू. एकटेपणा माणसाला दुःखी करतो. त्या उदास होण्याने पुढे आपले मनोस्वास्थ्य भिघडते. आयुष्य आनंदाने जगायचे असेल तर एक कान मंत्र लक्षात ठेवायचा – टोकाच्या आवडीनिवडी सोडून द्याव्या. लहानपणा पासून मुलांना टोकाची आवडनावड कशी घातक आहे ते त्यांना समजवले पाहिजे.
- दूरदर्शी बनायचा प्रयत्न करा व स्वतःचे विचार उत्तम, उदात्त व उत्तुंग बनवणे. दुसऱ्यांच्या चांगल्या संस्कारांची पुनरावृत्ती करण्यात काही गैर नाही. शत्रूच्याही चांगल्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत. आपल्या धर्मात सांगितलेच आहे की रोज सहा गुरू करावेत म्हणजे रोज दुसऱ्यांच्या कडून सहा चांगल्या गोष्टी शिकाव्यात त्यांनी आपली प्रतिभा उत्तुंग होते. इंग्रजांनी एकशेवीस वर्षापूर्वी व्हिक्टोराया टर्मीनस म्हणजे आताचा छत्रपती शिवाजी टर्मीनस बांधला. त्या वेळेला वीस गाड्या व हजार बाराशे प्रवासी त्याचा वापर करीत होती. पण तो टर्मीनस त्यांनी इतका भव्य बांधला होता त्यावेळेला, की आज तीन हजार गाड्या व तीस लाखापेक्षा जास्त प्रवासी तो वापरू शकतात. ह्याला म्हणतात दूरदृष्टी ठेवून केलेली आखणी. अशी दूरदृष्टी व अशी आखणी आपण आत्मसात केली पाहिजे व लहान मुलांना पण अश्या दूरदृष्टीची सवय लावली पाहिजे. आपण कोणचाही कामाचा आराखडा तयार करताना अशी दूरदृष्टी बाळगली पाहिजे. आपली पिढी जरी चाळीस, पन्नास वर्षे त्याचा उपयोग करणार असली तरी पण पुढे येणाऱ्या दहा पिढ्यांचा आपण विचार केला पाहिजे व तशी आखणी केली गेली पाहिजे. त्याच दृष्टिकोनातून आपली बांधकामे, रस्ते, पुल, खेळाची मैदानं इत्यादी आखले गेले पाहिजेत. जरी दुर्दैवाने आपल्या हातात अशी आखणी किंवा तिचा कार्यान्वय नसला तरी मनात नेहमी आपल्या राष्ट्राबद्दल चांगले उत्तुंग असे विचार आणावेत. अश्या राष्ट्राविषयीच्या उत्तुंग विचारांची सवय लावण्याने आपल्या स्वतःच्या दृष्टीमध्ये पुष्कळ फरक पडेल. मग आपण छोट्याछोट्या गोष्टीतला हेकेखोरपणा सोडून देऊ, आपोआप आपली दृष्टी विशाल बनेल, व रोजच्या जीवनातल्या अडचणींना सामोरे जाताना दुःख होणार नाही.
- आपल्या धर्मातल्या चांगल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे. आपले धर्मनिर्देश, आपली धर्म शास्त्रे, घालून दिलेली धर्म सूत्रे ही आपल्या पूर्वजाने त्यांच्या अनुभवातून आनंदाने आयुष्य जगण्याच्या दृष्टीने दिलेली समाजाला एक दिशा आहे. ह्या नियमांचे पालन केल्याने आपल्याला आपल्या आत्म्याची प्रगती होण्यास मदत होते. आपली चित्तशुद्धी होते, सचेतन बुद्धी वाढीस लागते. धर्म निर्देश, शास्त्रे, सूत्रे, व्रत, वैकल्ये ही सगळी स्वतःचे मन व आजूबाजूचे वातावरण प्रसन्न बनवण्याच्या हेतूने तयार केली होती व तशी बंधने घातली गेली होती. सामाजिक सौहार्द्रता व समरसता टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तयार केली गेली होती. त्याला देश, काल पात्राच्या मर्यादा होत्या व अजूनही आहेत. त्या मुळेच प्रत्येकाने हल्लीच्या काळी ही सूत्रे विचार करून अमलात आणली पाहिजेत. आजच्या देशाच्या गरजा, कालाच्या मर्यादा व पात्रता ह्याचा विचार करून प्रसंगी त्या सूत्रात यथार्थ बदल करून त्या त्या सूत्रांचा, व्रतांचा व धर्मनिर्देशाचे पालन केले पाहिजे. सतीची प्रथा एकेकाळी चालू होती आता ती कालबाह्य झाली व आपण ती टाकून दिली. तीच गोष्ट बाकीच्या चालीरुढींबाबत लागू आहे. ह्याचा विचार करून आपल्या धर्माच्या चौकटीत वागले तर आपल्याला मानसिक सुरक्षितता लाभेल. त्याच बरोबर बाकीच्या धर्मातल्या चांगल्या गोष्टी अंगिकारल्या पाहिजेत. आपल्या धर्मात सांगितल्या प्रमाणे जो वागतो त्याला कठीण परिस्थितीत मार्ग काढायला शक्ती व बुद्धी मिळते, कारण आपला धर्म, सामान्य माणसाच्या जीवनात येणाऱ्या सगळ्या संभ्रमांवर तोडगा देत असतो. आपल्या धर्मात, आपल्या समोर ठाकणाऱ्या सगळ्या द्विधा मनस्थितींवर उहापोह करून ठेवलेला आहे. आपल्या आयुष्याच्या मार्गावरून आपण जेव्हा घसरायला लागतो तेव्हा धर्म आपली मदत करतो, आपले रक्षण करतो. म्हणूनच आपल्या धर्मावर विश्वास ठेवा. आपली श्रद्धा असू द्यावी त्यावर पण अंधश्रद्धा टाळावी.
ही दहा सूत्रे व्रता सारखी जो आचरण करेल तो राष्ट्रव्रती. देश, काल, पात्राच्या परिसीमेत आजच्या हिंदू माणसाला जर हिंदुत्वाचा पुरस्कार करायचा असेल तर तो वर्णन केलेल्या दहा सूत्रांप्रमाणे वागून करता येईल. ह्यालाच राष्ट्रव्रत असे नाव आपण देऊ. ह्यालाच खऱ्या हिंदुत्वाचे पालन करणे असे होते. आता कोणी म्हणेल की मी ही दहाच्या दहा सूत्रे काही नेहमी पाळत नाही पण कधी कधी, थोडी थोडी पाळली जातात. कारण असे पाळणे म्हणजे आपल्याला सुलभ जे ते स्वीकारणे व बाकीचे सोडून देणे होते. व्रत हे एकदा घेतले की थोडे करू, मग करू, आपल्या सोयी प्रमाणे करू असे नसते. घ्यायचे तर पूर्णपणे पाळायचे. आपणच आपल्याला दिलेल्या शब्दासारखे व्रत असते. आपण आपल्याला दिलेला शब्द जर पाळणार नसू तर द्यायचाच का? ह्यात कसला पुरुषार्थ? म्हणून अर्धा राष्ट्रव्रती किंवा सोयीने राष्ट्रव्रती नको. अशा राष्ट्रव्रतींचा राष्ट्राला काही उपयोग नाही. राष्ट्रव्रती म्हणजे ही सर्व दहा सूत्रे नेहमी पाळणारा.
शिवाजीने ही जाणीव त्याच्या स्वतःच्या उदाहरणाने करून दिली व एक साम्राज्य निर्माण झाले. ही जाणीव संपली व आपण इग्रजांकडून पराभूत झालो. आपला आत्मविश्वास आपल्या हिंदू मनाच्या अभिमानाबरोबरच संपला. देशासाठी, आपोआप स्फूर्ती एक दुवा होता देणारा तोच संपला. संकटाला तोंड देण्याला, कठीण काम करण्यास जी स्फूर्ती लागते ती स्फूर्ती देणारी गुटीकाच नसेल तर माणसाचे हातपाय लटपटायला लागतात. इंग्रजांनी हे ओळखले व पहिल्यांदा हिंदू धर्माबद्दलचा अभिमानच संपुष्टात आणला. इतका की आजची पिढी हिंदू हे नाव घ्यायलाही लाजू लागली आहे. जो मग हिंदू धर्माचा नुसता उच्चार करता झाला त्याला जातीय म्हणून आपली पिढी स्वतःची सुटका करून घ्यायला लागली आहे. आपल्याला आपल्या शक्तीची परत जाणीव करून घ्यायची वेळ
आली आहे.
(क्रमशः)