Friday, November 30, 2012

सचिनचे क्रिकेट


सचिनचे क्रिकेट

हल्लीच इंग्लंड बरोबरच्या झालेल्या क्रिकेट कसोटीत भारताला हार मानावी लागली व सचिन सामन्यात धावा काढू शकला नाही म्हणून विविध बातम्या देणाऱ्या वाहिन्यांनी दिवसभर व मध्य रात्री पर्यंत ह्या घटनेला अक्षरशः कुटून काढले. सचिनने संदीप पाटिलला केलेला फोन, त्यावर तो काय बोलला असेल ह्याच्या अटकळी ह्या वाहिन्या लावीत बसल्या होत्या. दुसऱ्या दिवशी वर्तमान पत्रात सुद्धा मोठाल्या बातम्या आल्या होत्या. बातमीत दिले होते, सचिन म्हणतो, "क्रिकेट सिलेक्टर्स् ना जर का वाटत असेल की मी धावा काढू शकणार नसेल तर त्याने भारतीय संघात माझा समावेश करू नये". सिलेक्टरस् हेही म्हणत होते की अजून दोन कसोट्या राहिल्या आहेत, कोलकत्याची इडन गार्डनवर होणारी व नागपूरची, ह्या दोन कसोट्यांमधून सचिनला धावा काढण्याची संधी मिळेल व तो येणाऱ्या कसोट्यां मध्ये धावा काढून खरा उतरेल.

 

ह्या पार्श्वभूमीवर कारगिलमधल्या ऑपरेशन विजय मध्ये लॉन्गरेंज पॅट्रोलवर गेलेल्या व पाकिस्तानच्या हातून पकडल्या गेल्यावर हालाहाल करून मारण्यात आलेल्या कॅप्टन सौरभ कालिया व त्याच्या बरोबरच्या जवानांची हृदयाचा ठाव घेणारी बातमी माझ्या कानावर पडत होती. वाटले सचिनला जशी कोठच्या कसोटीत धावा जमल्या नाहीत तर पुढच्या येणाऱ्या कितीतरी कसोट्यांना धावा काढायची एक, अजून एक, अशा कितीतरी संध्या मिळत राहतात. पण कॅप्टन सौरभ कालिया व त्याच्या बरोबरच्या जवानांना जीवनाच्या कसोटीत जिवंत राहायच्या धावा काढण्यासाठी अजून एकच संधी त्यांच्या सिलेक्टरने दिली असती तर किती बरे झाले असते. थोडी चूक झाली असेल, थोडा अंदाज चुकला असेल तेवढ्यात पाकिस्तानी रेंजरसने त्या पॅट्रोलला पकडले व त्यांना जीवनातूनच आऊट केले .....हालाहाल करून. सचिनला परत परत मिळणाऱ्या संधीला बघून आज दिवंगत कॅप्टन सौरभ कालियाच्या आई वडिलांना काय वाटत असेल.

 

आपण राष्ट्रव्रत घेतले का

 

त्या संबंधी येथे अजून वाचा

 

http://rashtravrat.blogspot.com/

आणि येथे

http://bolghevda.blogspot.com/

 (मराठी ब्लॉग)

Sunday, November 25, 2012

सुनिल खेर - भाग १३ (राजाराम सीताराम एक.......)



जिसी सुनील खेर काश्मिरी होता. अधिकारी होण्याच्या प्रतीक्षेत दिवस मोजत राहायचा. त्याचे वडील काश्मीर खोऱ्यात एका दैनिकाचे संपादक होते. एक दिवस ते त्यांच्या कचेरीतून परत आलेच नाहीत. आज पर्यंत त्यांचा पत्ता लागला नव्हता. तो आणि त्याची आई, बारामुल्ला जवळच्या सोयीबुक ह्या गावात राहायचे. त्यांची छोटी हवेली होती तिथे. त्याच्या कुटुंबाने वडील परत भेटण्याची आशा सोडून दिली होती.

तो आम्हाला काश्मीर बद्दलच्या गोष्टी सांगायचा. तो पर्यंत मला लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स अशा प्रकारच्या नियतकालिकामधून व वेगवेगळ्या मासिकांतून वाचलेला तपशील एवढीच काय ती काश्मीर बद्दलची माहिती होती. आयएमएच्या मुलाखतीसाठी केलेली तयारी, ती पण अशीतशीच होती. थोडक्यात, काश्मीर प्रश्ना विषयी एकदम थोडी कल्पना होती. मला इंडियन एक्सप्रेस नियतकालीकेत, १९८६- ८७ मध्ये छापून आलेला काश्मीर बद्दलचा लेख वाचल्याचे आठवत होते. त्यात निवृत्त ब्रिगेडियर एन बि ग्रॅन्ट ह्यांनी लिहिले होते की "सन १९४८, १९६५ आणि १९७१  मध्ये भारत पाक युद्धांमधून झालेल्या पाकिस्तानच्या जबरदस्त पराजयाचा धक्का पाकिस्तानला सतत सतावत असतो. पाकिस्तानला कळून चुकले आहे की, भारताबरोबर सरळ युद्ध केल्याने त्या देशाची वित्त व मनुष्यहानी फार होते. ह्या सर्व बाबींचा विचार करून पाकिस्तानच्या इंटर सर्विसेस इंटलीजन्स जे आयएसआय ह्या नावाने प्रसिद्ध आहे त्या संघटनेने एक अभिनव योजना आखली आहे. त्या योजनेनुसार सरळ युद्धापेक्षा अतिरेकी संघटना उभारून भारत आतून पोखरून टाकायचा. मग अशा पोखरून अशक्त भारताला हरवायला वेळ लागणार नाही. योजना चार पदरी कार्यक्रमावर आधारित अशी राबवायची. पाहिला पदर काही काश्मिरी युवकांना भडकवून पाकव्याप्त काश्मीर मध्ये नेऊन प्रशिक्षण देऊन  अतिरेकी बनवणे. मग काश्मीर मधल्या भारत पाक युद्ध विराम सीमा ओलांडून (लाइन ऑफ कंट्रोल) अशा अतिरेक्यांना खोऱ्यात धाडायचे षडयंत्र राबवायचे. एकदा अतिरेकी आत घुसले की मग त्यांचे थैमान चालू द्यायचे. अशा अतिरेक्यांना एके४७, हॅन्ड ग्रेनेड्स व तत्सम साधन सामुग्री पुरवायची. दुसरा पदर जम्मू काश्मीर राज्य प्रशासन अतिरेकी कारवायांनी व अतिरेकी फतव्यांनी खिळखिळे करायचे. तिसरा पदर काश्मिरी हिंदूंना पहिल्यांदा खोऱ्यातून व नंतर उधमपूर जम्मू मधून हुसकवून लावून काश्मिरी हिंदूंची संख्या नगण्य करायची. हे झाले की मग त्याच युक्तीचे पुनरावर्तन कारगिल व त्याच्या वरती लडाख भागात करायचे. शेवटचा चौथा पदर काश्मिरी मुस्लिम जनतेला भारता विरुद्धं जेहादसाठी उत्तेजित करायचे".

ह्या पार्श्वभूमीवर मला जेव्हा जिसी सुनील खेरच्या रूपाने एक काश्मिरी हिंदू भेटला तेव्हा काश्मीर संबंधी बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या. मी वेळ मिळेल तेव्हा सुनील खेर व अजून एक काश्मीरचाच राहणारा जिसी हिरालाल गाडरू ह्या दोघांकडून काश्मीरच्या स्थिती बद्दल चौकशी करायचो. कमिशन मिळाल्यावर आम्हाला त्या भागात जावेच लागणार होते, त्यामुळे सगळ्यांचं जिसीना, हिंदूंची होणारी गळचेपी व ससेहोलपट ही खरेच होतेका?, हे जाणून घ्यायची इच्छा प्रबळ असायची. काश्मिरी हिंदूंची घरे रोज कशी जाळली जात आहेत व धमक्या कशा मिळत आहेत ते त्या दोघांकडून आम्हाला कळले. आम्ही सुनीलला नेहमी पटवून द्यायचा प्रयत्न करायचो की त्याने त्याच्या आईला घेऊन दुसरीकडे राहायला गेले पाहिजे म्हणून. त्यालाही तसे राहायचे होते, पण दुसरीकडे राहायला लागणारे पैसे त्याच्या जवळ नव्हते व त्याची आई काश्मीर सोडायला तयार नव्हती. काश्मीरसोडून दुसरीकडे राहायचे म्हणजे काश्मीर मधले घर विकावे लागणार होते. ही कल्पना त्याच्या आईला करवत नव्हती. परत दुसरीकडे, म्हणजे कोठे स्थायिक व्हायचे? हा प्रश्न होताच त्याला सतावणारा. आता पर्यंत खोरे सोडून कोठेही खेर कुटुंब राहिले नव्हते, त्यातून वडील सापडत नाहीत ह्याची सतत मनाला खंत लागून राहिलेली. सैन्यात जाऊन अधिकारी होण्याचे लहानपणापासूनचे सुनीलचे स्वप्न होते. सैन्यात, राहायला सरकारी घर मिळते हे कळल्यावर तर सुनीलला त्याच्या अडचणीचे उत्तरच सापडल्या सारखे झाले होते. म्हणूनच जरी आई एकटी राहणार असली होती, तरी तो तिच्याशी भांडून आयएमए मध्ये दाखल झाला होता. आयएमएचे शिक्षण पूर्ण करूनच आता घर बदलायचे असे त्याने ठरवले होते.

काश्मीर मध्ये हिंदूंची घरे विकली जात नाहीत तर ती बळजबरीने घेतली जातात हे त्या वेळेला मला पहिल्यांदा समजले. जिसी हिरालाल गाडरू (हा जिसी, वर्षभर आम्हाला त्याच्या आडनावाचा उच्चार बरोबर कसा करायचा हेच शिकवीत राहिला व आम्हीही मुद्दामून त्याला "गदरू" असे बोलवत राहायचो. हा खेळच झाला जणू काही. शेवटी त्याचे नाव जिसी हिरालाल गाडरू ऐवजी - जिसी हिरालाल "गदरू नहीं गाडरू" असे लांबलचक पडले. वीस वर्षांनी जेव्हा त्याची पुन्हा भेट झाली तेव्हा मी त्याला ह्याच नावाने संबोधले होते. ) ह्या गाडरूच्या वडलांची लाकडाची वखार अतिरेक्यांनी जाळली होती.

अशा परिस्थितीत भर म्हणजे लहानपणापासून काश्मिरी जनतेने, टेलिव्हिजनवर फक्त पाकिस्तानी कार्यक्रमच बघितले होते कारण त्यांना तेवढेच कायते दिसायचे. आपले दूरदर्शनचे प्रक्षेपण तेथपर्यंत पोहचायचे नाही. लहानपणापासून त्यांना रेडियोवर फक्त उर्दू ऐकायला मिळालेले. त्यात सुद्धा पाकिस्तानी कार्यक्रम. शाळेत उर्दू मध्ये शिक्षण चालायचे. काश्मीरचे खोरे व जम्मू ह्या भागांना जोडणारा जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग - एन एच वन असा एकच रस्ता होता. थंडीत बर्फवृष्टीमुळे जवाहर बोगदा कित्येक वेळेला बंद पडायचा त्यामुळे पूर्ण एन एच वन बंद ठेवायला लागायचा. त्यातून होणारी आवकजावक बंद पडायची. अजून सुद्धा जम्मूहून श्रीनगर पर्यंत रेल्वेचा प्रवास होऊ शकत नाही. ह्याच्या उलट पाकव्याप्त काश्मीरकडून मात्र दळणवळण नेहमी चालू असायचे. ह्याला एक महत्त्वाचे कारण म्हणजे काश्मीर खोऱ्यातल्या लोकांची नातीगोती व त्यातून उत्पन्न झालेले लग्नसंबंध फार पूर्वी पासून पाकव्याप्त काश्मिरात आहेत.

ह्या घडामोडींचा परिणाम काश्मिरी हिंदू मानसिकतेवर होत होता व अजूनही होत आहे. भोवतालची लोकवस्ती आपल्या बरोबर जर नसेल तर सगळ्या बाबतीत केवढी पंचाईत होते ही जाणून घ्यायची गोष्ट आहे. आपल्याला सगळ्यांनी वाळीत टाकल्या सारखे वाटायला लागते. काश्मिरात त्या वेळेला साधे घराबाहेर सुद्धा पडता यायचे नाही अशी परिस्थिती असायची. दिसता क्षणी गोळी घालण्याचे आदेश सतत असायचे. दोनदोन महिने कर्फ्यू चालायचा. शाळातर नेहमीच बंद असायच्या. बऱ्याच शाळा हळूहळू सशस्त्रबलांनी ताब्यात घ्यायला सुरवात केली होती कारण त्यांना तिथे छावण्या लावायच्या होत्या. हिंदूंची घरे जाळणे, त्यांना पळवून नेणे, त्यांना धाक दाखवून घरे खाली करायला लावणे, त्यांना नोकऱ्या न मिळणे, मुली व महिलांवर अत्याचार होणे हे सगळे प्रकार सन १९८९ मध्ये हळूहळू वाढायला लागले होते. त्यामुळे तेथील काश्मिरी हिंदू, बाकीच्या हिंदूंपेक्षा दुरावलेले होते. त्या वेळेला जणूकाही मानव हक्क समिती (ह्युमन राईटस कमिशन) मूग गिळून बसली होती.

आम्ही आठ दिवसांच्या भदराज कॅम्पला गेलो होतो. हा कॅम्प डोंगराळ प्रदेशात युद्ध कसे करायचे ह्या शिक्षणाचा भाग असतो त्याला माउंटन वॉरफेअर ट्रेनिंग असे म्हणतात. संपूर्ण कोर्स चार बटालियन्स मध्ये विभागलेला असायचा. ह्या चारही बटालियन्सचे नेतृत्व आलटून पालटून कोण्या जिसी वर सोपवले जायचे. भदराज कँपसाठी त्या त्या तुकडीचा तेवढ्या वेळेपुरतं नेमून दिलेला जिसी मग सेनापती असायचा. माउंटन वॉरफेअर संबंधी आयएमए मध्ये, जे काही शिकवले ते उपयोगात आणून भदराजवर धावा बोलायचा असा तो एक्सरसाईजचा भाग होता.

डेहराडूनहून  मसुरीचे डोंगर दिसतात. त्या डोंगरांच्या रांगेतले भदराज नावाचे सगळ्यात डावीकडचे शिखर. शिखरावरती एक शंकराचे मंदिर आहे. भदराज साधारण ५५०० फूट उंचीचा. त्या पर्वतराशीला "लोअर हिमालयन रेंजेस" म्हणतात. ते शिखर सर करून परत आयएमए मध्ये यायचे. चारही बटालियन्स मध्ये चुरस असते. ह्यालाच रनबॅक असे म्हणतात. जी बटालियन भदराज सर करून पहिल्यांदा आयएमएत पोहोचेल ती जिंकते. त्या बटालियनला भदराज चषक मिळतो. भदराजचा डोंगर चढायला, रात्री सुरवात करायची. पूर्णं युद्ध पोषाखात जंगलात घालतात ते कॅमोफ्लॉज कपडे, तोंड ब्ल्यांकोने काळे केलेले, पाठीवर मोठा पॅक त्यात अत्यावश्यक लागणारे सामान. भूक शमवण्यासाठी शक्करपाऱ्याच्या वड्या, टेंट बांधण्यासाठी आवश्यक असे ताडपत्रीचे बिवोक, एक दुर्बीण व चुंबकीय कंपास दिशा समजण्यासाठी. ह्या सगळ्याचे वजन साधारण १५ किलो भरायचे. कमरेच्या पट्ट्याला लागलेली अर्ध्या लीटरची पाण्याची बाटली. तेवढेच काय ते पाणी. माहीत नसलेल्या  ठिकाणाहून पाणी पिण्यास सक्त मनाई असते युद्धात. ह्याला  कारण असेकी शत्रूच्या इलाक्यात आपण असताना, शत्रूने इलाका सोडून पळताना विहिरींमध्ये, तलावांमध्ये विष घालून ठेवले असेल तर जिंकलेला इलाका पाण्याच्या लोभापायी गमवावा लागेल. आपली माणसे मरतील ते वेगळेच. शिवाय हातात गवत कापण्यासाठी दाह किंवा खुरपे व खांद्यावर साडेपाच किलो वजनाची आतापर्यंत अंगाचाच भाग झालेली अशी रायफल असायची. पहाटे पर्यंत भदराज सर करून आपला तिरंगा फडकवून आयएमएकडे परतीचा रस्ता दिलेल्या नकाशा वरून थोधत, निघायचे. असा तो भदराजचा कॅंप. रात्रभर चढून अर्धमेले झालेलो आम्ही, डोंगर माथ्याला जेव्हा सकाळी पोहोचतो तेव्हा पुढचा रनबॅक डोळ्यासमोर उभा राहतो, व आपल्या बटालियनच्या सगळ्यांना जमवण्याच्या नादात, त्या मंदिरातल्या शंकराचे दर्शन चुकते. दर वर्षी प्रत्येक कोर्स बरोबर हे असेच होते म्हणे. साधारण पन्नास किलोमीटरचा रनबॅक हा चिकाटी, ताकद, शिस्त, धाडस, नेतृत्व व तुकडीतले सामंजस्य ह्यावर अवलंबून असायचा. परतताना आमच्या माणेकशॉ तुकडीचे नेतृत्व जिसी अमित वर्मावर सोपवले गेले होते. आम्ही नकाशे पाहत आमच्या गटातल्या साथीदारांसह आयएमएत परतलो. पन्नास किलोमीटर चालून आल्याने सगळे जिसी दमले होते. पण साथीदाराबरोबर चालताना एवढे दमलो असे  वाटत नाही. कदाचित एकट्याला एवढे अंतर जड गेले असते. पंढरपूरच्या वारीचे पण तसेच असेल. ग्यानबा तुकारामाचा गजर, ह्या लयी मुळे पायात गती येते व आजूबाजूच्या वारकऱ्यांचा मेळ्यामुळे अंतर समजून येत नाही, सहनिय होते व उलट आनंदही मिळतो.

पोहोचल्या बरोबर शस्त्रागारात आपआपल्या रायफली, दुर्बिणी व चुंबकीय कंपास जमा झाल्यावर आमचे स्वागत गरमागरम चहा व बिस्किटांनी झाले. चहापान प्रत्येक कॅम्पचा आमचा सगळ्यात लाडका भाग असे. आम्ही आतुरतेने ह्या मेजवानीची वाट बघायचो. कॅप्टन गिल ह्यांनी त्यादिवशीचे आयएमएचे बाकीचे कार्यक्रम आमच्यासाठी रद्द झाल्याची घोषणा करताच सगळ्या जिसींकडून उत्फुर्तपणे "माणेकशॉ बटालियन की जय" निघाले. आमचे अर्धे दमणे तेथेच विरून गेले. प्रत्येकजण त्यांना आलेली पत्र वाचण्यात गुंग होता. मोबाईल फोन प्रकरण काय असते ते कोणालाच माहीत नव्हते व दूरध्वनी सेवा नुकतीच सुरू झाली असल्या कारणाने ती फक्त आयएमएच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्येच असायची. एसटीडी बूथवर जाणे सोपे काम नव्हते. त्यामुळे आम्ही व आमचे आप्तेष्ट ह्यामध्ये, पत्र हा एकच दुवा होता.

 मी माझ्या आईचे पत्र संपवतच होतो तेव्हा माझ्याकडे जिसी सुनील खेर व जिसी हिरालाल गाडरू आले. सुनीलचा रडवेला चेहरा पाहून मी "काय झाले" म्हणून विचारले. सुनील मला म्हणाला, "आकाशी, आईला अतिरेक्याचा धमक्या आल्या आहेत व त्यांनी महिना अखेर पर्यंत घर सोडायला सांगितले आहे". त्याच्या तोंडाचे पाणीच पळाले. चेहरा सुकून गेला होता. घर सोडून ती अशी एकटी जाणार कोठे हा नवाच प्रश्न त्याला पडला. खोऱ्याबाहेर नवे घर घ्यायला पैसे नाहीत व असलेले घर विकता येत नाही अशी काश्मीर खोऱ्यातली परिस्थिती, आणि हे सगळे करायला सुनीलला सुट्टी कोण देणार व कशी मागणार सुट्टी. परत कॅप्टन गिल असा कर्दन काळ होताकी त्याच्याकडे जाणे म्हणजे शिक्षा घेऊनच येणे असे होते. त्यामुळे आम्ही शक्यतोवर त्याच्याकडे जायचे टाळायचो. पण आजचा दिवस वेगळा होता. आमच्यावर कॅप्टन गिल खूश होता कारण माणेकशॉ बटालियन पहिली आली होती. बाकीच्या बटालियन्स आल्याआल्या कपडे बदलून पुढच्या कार्यक्रमाला लागल्या होत्या.

धीर करून आम्ही कॅप्टन गिलकडे गेलो. घाबरत घाबरत सुनीलने सगळे सांगितले. कॅप्टन गिलला सुनीलची घरची सगळी परिस्थिती माहीत होती. त्यामुळे त्याने सगळे नीट ऐकून घेतले. आज आमच्या पोषाखाची खिल्ली उडवली गेली नाही व शिक्षेचे नावही निघाले नाही. सगळे ऐकून घेतल्यावर तो म्हणाला – "मी समजू शकतो तुला सुट्टी हवी आहे. तू सुट्टीचा अर्ज लिही, मी शिफारीश करतो. बाकी पुढचे कंपनी कमांडर व बटालियन कमांडर वर अवलंबून आहे. मी पण तुझ्या सुट्टी बद्दल त्यांच्याशी बोलेन". सुनीलने वेळ जायला नको म्हणून डिएसकडे जाण्या अगोदरच लिहून ठेवलेला अर्ज पुढे केला. कॅप्टन गिलने लागलीच त्याची शिफारिश लिहून तो कंपनी कमांडरकडे स्वतः गेला. सुनीलला रात्री कंपनी कमांडर कडून निरोप आला, की त्याला बटालियन कमांडरने मुलाखती करता सकाळी बोलावले आहे. आमचा कॅप्टन गिल ह्याच्याशी रोजच्यारोज संबंध यायचा. पण कंपनी कमांडर मेजर शेखावतकडे जाण्याचा किंवा त्याला भेटण्याचा प्रसंग गेल्या आठ महिन्यात क्वचितच आला होता. बटालियन कमांडरचा धाक तर मग विचारूच नका. त्याचे ऑफिस जेथे असायचे तो रस्ता आम्हा जिसीजना रहदारीसाठी बंद होता. त्या रस्त्या वरून आम्हाला जाताही यायचे नाही. आम्ही बटालियन कमांडरला फक्त खेळाच्या मैदानावर किंवा कॅंपसच्या वेळेला पाहिले होते. कर्नल कटोच नाव होते त्यांचे. ज्या जिसीच्या हातून त्यांच्या गेल्या जन्मात घोर पापे घडली असावीत तेच जिसी बटालियन कमांडरच्या ऑफिस मध्ये जायचे असे काहीसे चित्र होते. ज्यांचे रेलिगेशन होणार असायचे त्यांनाच फक्त तो, एकदा भेटायचा. "तू रेलिगेट झालास", हे सांगायला फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे कोणताही जिसी त्याच्या ऑफिस मध्ये दोन मिनटा पेक्षा जास्त वेळ कधीही उभा राहिला नव्हता. त्यामुळे जिसी सुनील खूप घाबरला होता. जेव्हा दुपारच्या जेवणाच्या वेळेला भेटला तेव्हा त्याचा चेहरा अजूनच रडवेला झाला होता. तो म्हणाला बटालियन कमांडर ने सुट्टी चा अर्ज रद्द केला. म्हणाला हे काही कारण होत नाही सुट्टी मागायला. आम्हाला राग आला व खूप वाईट वाटले. जिसी सुनील खेर तर वेडापिसा झाला होता. खूप शिव्या घातल्या बटालियन कमांडरला. त्याला त्याच्या आई व्यतिरिक्त कोणीच दिसत नव्हते.

त्या संध्याकाळी कॅप्टन गिल आमच्या बरॅक मध्ये सुनीलला येऊन भेटला. सुनीला म्हणाला की त्याला पण खूप वाईट वाटत होते अर्ज रद्द झाल्या बद्दल. ह्याला कारण असे की कॅप्टन गिलने सुनीलच्या सुट्टीसाठी कंपनी कमांडरला स्वतः भेटून सुनीलवर बेतलेल्या संकटा बद्दलची कल्पना दिली होती.

कॅप्टन गिलला संध्याकाळी भेटल्या पासून सुनील मध्ये आम्हाला अचानक एक बदल जाणवला. तो जरी दुःखी होता तरी त्याचा रडवेला चेहरा जाऊन निग्रही वाटत होता जसा काही त्याला त्याच्या वर बेतलेल्या संकटावर तोडगा सापडला आहे असा.

जिसी  सुनील खेर चार दिवसाच्या सुट्टीवर गेल्या पासून परत आला नव्हता.    तो गेल्या पासून आजचा पाचवा दिवस होता. आम्ही काळजीत होतो. तो कोठे असेल आता, येईल का परत? सुट्टी वरून उशीराने परत जरी आला तरी आयएमएच्या नियमानुसार त्याचे काय होईल? त्याचा तो निग्रही चेहरा आठवून आम्हाला वारंवार वाईट वाटत होते. आठ महीने एकत्र रगडा खाल्लेले आम्ही जिसी, एकमेकांचे जीवाभावाचे मित्र झालो होतो. त्यातून तो आमच्याच बटालियनचा, आमच्याच कंपनीचा व आमच्याच प्लटूनचा. मला दोन गोष्टींची काळजी लागून राहिली होती. तो परत येईल का, व तो त्याच्या आईला कोठे सोडणार त्याची आई घर सोडून कोठे जाईल, कोठे राहील व तिचे कसे होईल?

कोणाला जर का फर्मावले की, तुमचे राहते घर तडकाफडकी खाली करा व चालते व्हा तर काय वाटेल त्या कुटुंबाला? कोठे राहतील, कसे होईल त्यांचे? त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल? कोणाच्या आयुष्यात भोगाव्या लागणाऱ्या अशा अचानक घडामोडी पाहिल्या की पूर्व संचित म्हणून काही असतेका असा विचार डोकावून जातो. वाटते, आपण असतो तर त्यांच्या जागी? त्यांनाच का ही पिडा? जी लोकं संचित मानत नाहीत, ते अशा घडामोडींकडे कसे पाहतात? लॉटरी लागण्या एवढी निसर्गातली ही प्रोसेस रॅन्डम असते असे जे संचित मानित नाहीत ते सूचीत करतात. संचिताला अंधश्रद्धा म्हणून त्याविरुद्ध बोलत राहतात. अंधश्रद्धा मानू नये हे खरे आहे. पण कोणती गोष्ट अंधश्रद्धा मानावी व कोणती नाही हे कोण ठरवणार? डोळस श्रद्धा असते का? का श्रद्धा हाच एक भंपकपणा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संचित म्हणजे अंधश्रद्धा मानणाऱ्या लोकांना जर उद्या अशा परिस्थितीला स्वतः तोंड द्यावे लागले तरी ते तो निसर्गातील एक रॅन्डम प्रोसेसचा भाग आहे असे समजतील? का त्या वेळेला सोयीने त्यांच्या दृष्टिकोनात फरक झालेला असेल? ह्याचे उत्तर मी अजून शोधत आहे. संचित जर नसेलच तर अशा घटनांना निसर्ग नियम म्हणून आपण विषय संपवू शकतो का? अशा घटना काहींनाच का भोगाव्या लागतात ह्या प्रक्रियेला काही नाव व कारण देऊ शकतो का? आपण रोजच्या अडचणींना दुःखाचे नाव देऊन आपल्या नशिबाला लागलीच कोसायला सुरवात करतो. सुनीलचे दुःख पाहून आपल्या आयुष्यातल्या अडचणी साध्या सोप्या वाटायला लागतात.

सुनील खेर गेल्या पासून आमच्या डोक्यात एकच विषय त्याचे काय झाले व आयएमएत परतला तर काय होणार.

आमच्या रोजच्या कार्यक्रमात सुनील गेल्याने काही बदल झाला नाही. नाही म्हणायला आमचा कॅप्टन गिल आम्हाला सांगून गेला होता की सुनीलच्याबद्दल काहीही माहिती समजल्यास त्वरित कळवा. सुनील सुट्टीवर गेल्याच्या सहाव्या दिवशी जिसी सुनीलच्या खोलीत आम्हाला दिवा लागलेला दिसला. आमच्या जिवात जीव आला. आम्ही पिटी परेडला जायच्या आधी त्याला भेटलो. कॅप्टन गिलनी निरोप पाठवला की जिसी सुनीलला आठ वाजता कंपनीकमांडरने त्याच्या ऑफिस मध्ये बोलावले आहे. आम्हाला त्याच्याशी बोलून गेल्या सहा दिवसांचा हिशोब घ्यायला वेळच नव्हता. तो आम्ही संध्याकाळसाठी सोडला, व आम्ही पिटी परेडला गेलो. त्याचे रेलिगेशन होणार का त्याला काढून टाकणार अशा अटकळी लावे पर्यंत संध्याकाळ झाली. जिसी सुनील दिवसभर दिसला नाही. संध्याकाळी जेवायच्या वेळेला भेटला. खूप थकल्या सारखा वाटत होता. पण चिंता कमी झाली होती. आम्ही आतूर होतो त्याच्या दोन्ही गोष्टी ऐकायला. एक तर तो सुट्टीच्या तब्बल २४ तास उशीरा आला होता व त्यांमुळे बटालियन कमांडरने त्याचे काय केले हे ऐकायचे होते व दुसरे त्याच्या आईचे काय झाले?, सुखरूप आहे का? कशी आहे? ह्या दोन्ही गोष्टी ऐकूया त्याच्याच शब्दात...............

भदराजवरून आल्यावर मला आईची तार मिळाली व त्या नंतर सुट्टी मिळत नाही असे कळले तसा मी खूप उदास झालो. कर्नल कटोच ह्यांचा भयंकर राग आला होता. आईची आठवण येत होती. काळजी लागली होती. कशातच लक्ष लागत नव्हते. डोक्यात गोंधळ उडाला होता. संध्याकाळ झाली तसा एकएक क्षण एक तासा सारखा जाणवत होता. शांत राहा, १ ते १० मोजा, उलटी गिनती करा, देवाचे नाव घ्या, डोळे मिटून स्वस्थ बसा हे सगळे डोके शांत ठेवण्यासाठी करायचे उपाय माहीत असून, राहून गेले. हे उपाय करायचे सुद्धा स्वारस्य राहिले नव्हते. मलाच माहीत होते काय परिस्थिती होती खोऱ्यात ती. सगळ्यात वाईट वाटत होते ते कर्नल कटोच ह्यांचा माझ्या सुट्टी मागण्याच्या कारणावर विश्वास बसला नव्हता ह्या गोष्टीचा. खोऱ्यातले वातावरण हळूहळू बदलायला लागले होते. रोज जवळच्या मशीदींतून प्रक्षोभक भाषणे सुरू झाली होती. रोज कोणते न कोणते काश्मिरी हिंदू कुटुंब खोरे सोडून जाण्याचा विचार करत होते व जात होते. काश्मिरी हिंदूंचे खोरे सोडून जाण्याच्या ह्या प्रक्रियेचा शेवट सगळ्यात मोठ्या विस्थापनात होणार आहे ते तेव्हा आम्हाला माहिती नव्हते. ह्याच्या आधी सहादा असे मोठ्या प्रमाणात काश्मिरी हिंदूंचे स्थलांतर झाले होते.    पाहिले स्थलांतर तेराव्या शतकात झाले सुलतान शमसुद्दीनने मोठ्या प्रमाणात हिंदू मंदिरांची तोडफोड करून हिंदूंना धाक दाखवून पळवून लावले असा इतिहास आहे. १४ व्या शतकात दुसरे व तिसरे स्थलांतर, सुलतान अली शहाच्या जाचक सुलतानशाहीने उद्भवले. त्याने पहिल्यांदा काश्मीर मध्ये हिंदूंवर जिझिया कर सुरू केला. १४ व्या शतकातच पुढे मिरं शमसुद्दीन इराकी ह्या नवाबाने जोर जबरदस्तीने हजारो हिंदूंना पळवून लावले. चवथे व सगळ्यात मोठे स्थलांतर १६ व्या शतकातले. औरंगजेबाच्या बादशाहीत झाले. ह्या बादशहाशी लढता लढता शिखांच्या नवव्या गुरुंना गुरू तेग बहादुरांना प्राणांना मुकावे लागले होते. हा औरंगजेबाच्या काळातील इतिहास पाहता असे वाटते की जसे महाराष्ट्राला शिवाजी राजे मिळाले तसे काश्मीरला लाभले असते तर कदाचित इतिहास काही वेगळा झाला असता पण काश्मिरी हिंदूंपेक्षा महाराष्ट्रातल्या हिंदूंचे नशीब जास्त बलवोत्तर होते असेच म्हणावे लागेल. पाचवे  स्थलांतर, १७ व्या शतकात मुल्ला अब्दुल्ला ह्याच्या नवाबीत झाले. सहावे स्थलांतर, अफघाण सुलतानांच्या क्रूर कारवायांमुळे झाले. १९८९-९० सालातले सातवे स्थलांतर पाकिस्तानच्या "ऑपरेशन टोपूक" मुळे होत होते. ते त्या वेळेला आम्हाला अवगत नव्हते. १९८८ मध्ये त्यावेळचे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल झिया उल हक ह्यांनी ऑपरेशन टोपूक कार्यान्वित केला. अतिरेक्यांना प्रशिक्षण देऊन, घुसखोरी करून काश्मिरात अराजक माजवायचे व भारताला अस्थिर करायच्या चार पदरी कार्यक्रमाचा तो भाग होता. हे कोणालाच माहीत नव्हते. व्होटबँकांच्या राजकारणात काश्मिरी हिंदूंचे पारडे मुसलमानांपेक्षा हलके होते, व नेमके ह्याच कारणासाठी, सरकारला कठोर पावले उचलायची नव्हती. काही न करणे हे सरकारच्या सोयीचे होते. कोठल्याही देशा पुढील समस्येवर देशातल्या जनतेचा मानसिक दृष्टिकोन बदलायला वेळ लागतो. खूपदा लोकांना समजे पर्यंत वेळ निघून गेलेली असते. ह्या सगळ्या सहा स्थलांतराने जे एकेकाळी काश्मीर मध्ये फक्त हिंदूच होते ते कमी होत होत, १९४८ मध्ये फक्त १० टक्के राहिले. हिंदूंची संख्या सातव्या स्थलांतरानंतर १ टक्का राहिली. ज्या समाजाला इतिहासाचा विसर पडला तो समाज संपला हे आम्हाला सातव्यांदा कळणार होते. शेवटी जिसकी लाठी उसकी भैस हेच फक्त खरे आहे. ह्या कलियुगांत सभ्यता वगैरे सोयीच्या गोष्टी आहेत. आपल्या जवळ "ती" लाठी का नसते कधी? सभ्यतेपोटी आपण "लाठी" सोडली हे खरे पण त्याचबरोबर दुसरे सोडतात की नाही हे पाहिले नाही. दुसऱ्याने जर लाठी घेतली असेल व आपल्यावर उगारत असेल तर तेवढ्या पुरती तरी आपण लाठी घेतली पाहिजे नाहीतर शतकानुशतके आपण असेच भरडले जाणार. पूर्वी क्रूर सुलतानशाही होती आता एक क्रूर शेजारी राष्ट्र आहे.
 
(क्रमशः)

Sunday, October 28, 2012

कॅम्पलाईफ ...........भाग १२


कॅम्पलाइफ
 
कमांडंट, लेफ्टनंट जनरल खेत्रपाल, फार रुबाबदार माणूस होता. आम्हाला त्याचे दर्शन कॅम्पच्या निमित्ताने झाले. आमच्या कोर्सच्या पहिल्या बाहेरच्या एक्सरसाईजच्या वेळेला कमांडंटने आम्हाला संबोधले.
 
"Gentlemen remember, the more you sweat and toil in peace, the easier to force your enemy, bleed and boil in war" जनरल खेत्रपालची ती वाक्य अजूनही आठवणीत आहेत.
 
आमच्या पहिल्या एक्सरसाईजचे नाव होते पहला कदम’. आम्ही सारे जिसीज आपआपल्या आरामाच्या घरटूल्यांतून आयएमएमध्ये आल्यावरचा हा पहिला आऊटडोअर एक्सरसाईज. पहिल्या काही दिवसातच म्हणजे आमचे युद्धशास्त्राचे वर्ग झाल्यावर आम्हाला चार दिवसा करता "पहला कदम" ह्या एक्सरसाईज साठी रवाना केले गेले. डेहराडूनहून पंचवीस किलोमीटर अंतरावरच्या जंगलात आम्हाला घेऊन गेले. तेथल्या जंगलात टेंट बांधून चार दिवस राहायचे असा कार्यक्रम होता. पोहोचल्यावर, पाच मिनिटात टेंट कसा रचायचा त्याचे आम्हाला प्रात्यक्षिक दिले गेले. टेंट पिचींगची एक्सरसाईजच्या शेवटच्या दिवशी स्पर्धा घेतली जाणार होती. एक टेंट दोन जिसीनी बांधायचा त्यात दोघांनी राहायचे. आमच्या बटालियनचे दोनशे टेंट लागले. मला लहान असताना ऐकलेले बाबासाहेब पुरंदऱ्यांचे शिवाजीराजांवरचे भाषण आठवले आपणही युद्धशास्त्राचे खरोखरचे धडे घेत असल्याचा अभिमान उरी जाणवला. दर, मे महिन्याचा सुट्टीत डोंबिवलीत, नेहरू मैदानावर बमोंचा सात दिवसांचा कार्यक्रम व्हायचा.
 
.... अफझलखानाच्या वधावर चाललेले त्यांचे ते भाषण....  "खानाचा तळ, कोयनेच्या खोऱ्यांत पडला. त्या भयंकर निर्बिड अरण्याचे पर्वतमय प्रदेशाचें किती वर्णन करावे? त्या अरण्यांत खानाच्या हजारो सैनिकांनाही भय वाटूं लागलें. पण खानाला मात्र अजिबात भय वाटलें नाही. तो मनांत म्हणाला, "बस अब जावली का मुल्क मेरा ही हैं।" जंगलांत तंबू ठोकण्यासाठी जरुर तेवढी जागा साफ करून उंच भव्य तंबू उभारण्यांत आले. साखळदंडांनी हत्ती ठाणबंद करण्यांत आले. जमिनींत मेखा ठोकून घोड्याच्या रांगा बांधण्यांत आल्या. उंटांचे तांडेही बांधण्यांत आले. सैनिकांच्या हालचालींनी इकडे तिकडे भटकण्याने तें अरण्य गजबजून गेलें. अफाट जंगलाच्या मानाने तें सैन्य चिमूटभर वाटत होते. झाडींत तें पार झाकून गेलें होतें. जावळीत पोहचल्याबरोबर मोंगल फौजांनी डेरे बांधले फौजा डेरे दाखल झाल्या..... "  मो पुरंदऱ्यांचे भाषण ऐकताना काय मजा यायची, संपूर्ण दृश्य अगदी डोळ्यासमोर उभे राहायचे. असे वाटायचे की आपण त्या काळात वावरत आहोत.
 
एका जिसी करता बांधलेल्या टेंटला "बिवोक" म्हणतात. टेंट कसला अगदी छोटा झोपण्या पुरता आडोसाच जणू. पण येथे "बिवोक" नाही चक्क टेंटच बांधायचे होते. टेंट बांधून झाल्यावर, साप, विंचू किंवा तत्सम सरपटणारे प्राणी येऊ नयेत म्हणून टेंटच्या चारही बाजूने "स्नेक पीट" खोदावा लागतो. आम्हाला "स्नेक बाईट किट" कसा तयार करायचा ते शिकवले. साप चावला तर विष चढू नये म्हणून अंगाचा भाग छोट्या धाग्याने बांधून कसा ठेवायचा, अंगाच्या भागाला एक छोटी भेग करून भिनलेले रक्त कसे काढून टाकायचे हे सर्व शिकायला मिळाले. डासांपासूनच्या संरक्षणासाठी "सन डाउन, स्लिवस डाउन" हे वाक्य किती उपयुक्त आहे हे शर्टाच्या दुमडलेल्या बाह्या, उलगडून खाली केल्यावरच कळते. जंगलात राहताना अंगाला "ओडोमॉस" किंवा "डिएमपी" तेल लावावे लागते. "डाय मेथायील फॅलेट" म्हणजेच डिएमपी तेलाने अंग चिकट होते पण डास चावत नाहीत हे कळले. टेंट मध्ये राहताना "डीटीएल्स" खोदायचा एक मोठा कार्यक्रम असतो. "डीप ट्रेंच लॅट्रीन" वेळेवर खोदले नाहीत तर सकाळी करावे लागणारे विधी किती अवघड जातात ते समजून आले. सकाळी मिळालेल्या अर्ध्या लीटरच्या पाण्यामध्ये सकाळचे विधी, तोंड धुऊन दाढी करणे दिवस भर पाण्याची तहान भागवणे हे सगळे जमणे अवघड असते पण सवय होते. त्याने कमीत कमी पाणी कसे वापरायचे ते कळून येते.
 
ह्याच कॅम्प मध्ये सकाळच्या वेळेला आमचा रेडिओ टेलिफोनीचा अभ्यास होता. युद्धात रेडियोचा खूप उपयोग होतो. जवळ जवळ सगळे दळणवळण ऑर्डर्स रेडिओवरून द्यायचे असतात. त्यामुळे रेडिओवर कसे बोलायचे त्याचा एक प्रघात आहे. त्याचे शिक्षण आम्हाला आधीच दिलेले होते येथे त्या शिक्षणाचा उपयोग करायचा होता. प्रत्येक टेंट मध्ये एक रेडिओ सेट होता आम्हाला रेडिओवर ऑर्डर्स ब्रॉडकास्ट करायच्या होत्या. आमचा रेडिओ टेलिफोनीचा अभ्यास सुरू झाला............
 
Tiger: Sparrow, Sparrow, This is Tiger, Message Over.
Sparrow: Tiger, This is Sparrow, Go Ahead.
Tiger: Acknowledge, Over.
Sparrow: Wilco, Over!
Tiger: This is Sparrow, Out. …………..
 
सुरवातीला रेडिओ टेलिफोनीचा रीतसर अभ्यास चाललेला असताना मधूनच कंटाळा येऊन नकळत आम्ही आमची बकवास टेलिफोनी सुरू केली होती त्यात गाण्यांची अंताक्षरी तत्सम बकवास सुरू झाली.
 
एका रेडिओवर आम्ही काय कसे बोलतो त्यावर आमचा डिएस, कॅप्टन गिल कान ठेवून होता. थोड्याचं वेळात रेडिओवर चालणाऱ्या आमच्या पाल्हाळ गप्पा गाणी ऐकून कॅप्टन गिलने आम्हा सगळ्यांना एकत्र बोलवून रेडिओ टेलिफोनी बद्दल समजावले, अर्थातच आयएमएतले समजावणे म्हणजे रोलिंग परेड झाल्यावर मगच.
 
"....Gentlemen, always remember four golden rules of radio telephony - Brevity, Simplicity Clarity and Security. Radio telephony should be like a lady's skirt: long enough to cover the essentials but short enough to keep it interesting. Yours is a night gown.............. .“ कॅप्टन गिलचे आम्हाला समजावणे चालूच होते.   तेवढ्यात कॅप्टन गिलला मी नीट दाढी केली नाही अशी बहुदा शंका आली असावी. जवळ येऊन, माझ्या गालावरून हात फिरवत म्हणतो, "यू हॅव नॉट शेव्हड्ं प्रॉपर्ली. जिसी आकाश, यू नो, बाय नाऊ, शेवींग इज पार्ट ऑफ रीग. गो नाऊ, बिफोर रोलिंग शेव्ह प्रॉपर्ली एंड कम". मला वाटले आता टेंट मध्ये जाऊन शेव्हिंग करावे लागणार पण कॅप्टन गिलचा इरादा वेगळाच होता. त्याने इकडे तिकडे पाहिले एका दगडाकडे बोट दाखवत मला म्हणतो "पिक दॅट अप एंड बिफोर वी फिनिश आवर रेडिओ टेलिफोनी एक्सरसाईज, आय वॉन्ट टू सी युअर फेस क्लिनली शेव्हड् अॅन्ड डोन्ट फरगेट टू पूट सम आफ्टर शेव्ह, व्हेन यू शेव्ह यु्अर फेस". त्या दिवशी, त्या दगडाने गालावर असे खरचोटे उठले होते त्या ओल्ड स्पाईसने असे झोंबले होते, की आजतागायत माझी दाढी गुळगुळीत छान होते. आयएमएत आम्ही हेच आफ्टरशेव्ह लोशन लावायचो. त्यावेळेस हेच आफ्टरशेव्ह प्रसिद्ध होते सहज मिळायचे. अजूनही दूरवरून ओल्ड स्पाईसचा वास आला की खरचोटे उठलेले झोंबणारे गाल मला आठवतात आयएमएतले दिवस डोळ्यांसमोर येतात.
 
एक्सरसाईजमध्ये ट्रेंचेस खोदायचे फार जिकरीचे काम होते. दिवसभर दमल्यावर रात्रभर ट्रेंच खोदायचा खूप कंटाळा यायचा. खूप दमायचो. कुदळ फावडे वापरून तळहात सोलवटून गेले होते. एकदा ट्रेंच खोदले की ट्रेंचच्या सुरक्षेसाठी कोणाला तरी गस्त घालायला लागायचे. आम्हाला "थ्रिमॅनट्रेंच" रात्रभर खोदून सकाळी सूर्योदयाच्या वेळेला आपली आपली रायफल घेऊन "स्टॅन्ड टू" व्हावे लागायचे. कॅप्टन गिल नेहमी म्हणायचा "शत्रू, साधारण संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला किंवा सकाळी सूर्योदयाच्या वेळेला घात करतो. ह्याला कारण असे की चढाई करताना शत्रू साधारणपणे रात्रीच्या अंधारात वाट काढत येतो सकाळच्या पहिल्या प्रहरी हमला करतो. हे जर जमणारे नसेल अंतर खूप असेल किंवा चढाई खूप असेल एका रात्रीत चढाई साधणार नसेल तर मग रात्रीच्या अंधारात शत्रू त्याच्या लक्षाच्या दिशेने मार्गक्रमण करतो पहिला टप्पा गाठतो. लक्ष टप्प्यात आले की फॉर्मींगअप प्लेसवर शत्रचे सैन्य दिवसभर टिकून राहते संध्याकाळी सूर्यास्ताला हमला करते. परत दिवसभरच्या दमण्याने संध्याकाळच्या वेळेला, किंवा रात्रभराच्या अपूऱ्या झोपेमुळे सूर्योदयाच्या वेळेला, डिफेन्सीव्ह पोझिशन घेतलेले सैनिक, शिथिल सापडू शकतात. ह्या शिथिलपणावर मात करण्यासाठी, डिफेंडींग फोर्सेस, ह्या दोन्ही वेळेला मुद्दामून जास्त तयारीत राहतात. ह्या प्रक्रियेला "स्टॅन्ड टू" म्हणतात".
 
आपले हत्यार नेहमी आपल्या जवळ असले पाहिजे. अगदी झोपताना सकाळचे प्रातर्विधी करताना सुद्धा. कॅम्पमध्ये हे शिकायला मिळते. हत्यार जर कोणा कडून हरवले तर त्याच्या वर रेलीगेशनचीच वेळ येते. हत्याराचा सांभाळ, संरक्षण आदर ह्याला खूप प्राधान्य दिले जाते कारण युद्धात आपले हत्यार हाच आपला दोस्त आपला साथी ठरणार असतो. मरे पर्यन्त फक्त आपले हत्यारच आपल्या बरोबर असते. सुरवातीला, सुरवातीला सवय नसल्या कारणाने कोणा जिसीचे हत्यार काहीतरी काम करताना राहून जायचे, सुटायचे. जिसी सुब्बूला हा धडा डिएस गिलने त्याचा "नमुना" बनवून शिकवला आणि त्याच्याच काय पण आमच्या पण लक्षात राहिले जन्मभर.
 
ट्रेंच खोदून झाल्यावर, सकाळच्या वेळेला आम्ही स्टॅन्ड टू मध्ये सज्ज राहिलो होतो. आमचे कसेतरी खोदलेले ट्रेंचस् बघून कॅप्टन गिलचा पारा चढला. म्हणाला "बगरर्स धिस इज हौ यू हॅव डग युअर ट्रेंचेस्". ह्याला कारण की आम्ही जेमतेम दोनदोन फुटाचे ट्रेंचेस खणून ठेवले होते. कितीही भरभर केले तरी प्रत्येकाच्या कुवती प्रमाणे हातात असलेल्या वेळेत तेवढेच जमले होते. खरे तर आम्ही चार, चार फूट ट्रेंच खोदायला पाहिजे होते. नाहीतर दोन फूट ट्रेंच खोदण्याचा काहीच उपयोग नव्हता. ट्रेंच मध्ये उभे राहिल्यावर छाती पर्यन्त जर जमीन नाही आली तर संरक्षण ते काय मिळणार. दिवसभराच्या श्रमाने रात्रीच्या खोदण्याने आम्हाला केव्हा एकदा झोपतो असे झाले होते. त्या रात्री प्रत्येकाला फक्त दोनतास रात्री झोपायला मिळाले होते. बाकीच्या वेळेत गस्त घालणे खोदायचे काम चालू होते. झोपेतच कसेतरी खोदून टाकले आम्ही ट्रेंचस्. परितोष शहा कॅम्पसाठी आमचा कंपनी कमांडर होता. त्याला पकडून कॅप्टन गिल म्हणतो "यू हॅव डग धिस ट्रेंच. नाऊ आय वॉन्ट यू टू गो इनसाईड धिस" असे म्हणत कॅप्टन गिलने परितोष शहाला त्या दोन फुटाच्या ट्रेंच मध्ये अक्षरशः कोंबलेन. "इन वॉर यू विल नॉट गेट धिस मच टाइम बगर्स, दॅट टाइम एव्हरी बडी वूड गो फॉर सिक्स फिट ट्रेंचेस. एंड यू विल डिग विथ युअर मेस टिन्स, विथ युअर फिंगरस्, विथ युअर नेल्स् बिकॉज एव्हरी बडी विल रीक्वायर डिगींग टूल्स् अॅन्ड दे वील ऑलवेज बी इन शॉर्ट सप्लाय... ". खरे तर युद्धा मध्ये संसाधनांचा वेळेचा अभाव नेहमीच जाणवतो. त्यामुळे जी बाजू जास्त तयारीत असते त्या बाजूची सरशी होते. युद्धात शत्रू पेक्षा वेळेशी झुंजण्यातच अर्धी शक्ती निघून जाते. The more you sweat and toil in peace….. ह्या वाक्याची सार्थकता तेव्हा कळते.
 
आमचा पुढचा एक्सरसाईज होता "आगे बढ". एक्सरसाईज सात दिवसांचा होता. ह्यामध्ये मॅपरिडींग करत जंगलातून, नाल्यातून वाट काढत दुश्मनाच्या दडून बसलेल्या बंदूकधाऱ्याला किंवा आतंकवाद्याला पकडायचा इरादा असतो ह्या एक्सरसाईज मध्ये. मजा यायची, जेव्हा बेसावध राहिल्यावर डिएस एकदम कानापाशी येऊन ओरडायचा तेव्हा..... "कंपनी कमांडर अमित वर्मा यू आर डेड!". मग त्याला थोड्या वेळेसाठी त्या एक्सरसाईज मधून कंपनी कमांडरला बाहेर काढले जायचे आमच्यावर आमची युद्धातली पुढची खेळी अमित वर्मा म्हणजेच आमच्या कंपनी कमांडरला सोडून राबवण्याची पाळी यायची. ह्या मुळे चढाईची योजना बनवतानाच ह्या सगळ्या बाबींचा विचार करावा लागायचा. कोण कोठली कामे करणार आपल्यातला सहकारी घायाळ झाला किंवा ऐनवेळेला मेला तर कोणाचे काम कोणी करायचे हे आधीच ठरवलेले असायचे…..   
 
कॅम्पच्या शेवटी कॅम्पफायर झाला. कॅम्पमधल्या सगळ्या थकावटीची होळी ह्या कॅम्पफायर मध्ये झाली. डिएसचे कडक वागणे, त्या शिक्षा, आतापर्यंत अंगवळणी पडलेले रोलिंग, क्रॉलिंग सगळे सगळे संपले होते. त्यादिवशी आम्हाला डिएस बाकी अधिकाऱ्यांचे एक वेगळेच रूप बघायला मिळाले. संध्याकाळी छान मोठी शेकोटी पेटवली गेली सगळ्यांना स्नॅक्स बिअरची मेजवानी मिळाली. अशा श्रम परिहाराला "रम पंच" म्हणतात हे नंतर कळले मला. डिएस बाकी अधिकारी सगळ्यांशी गंमत गोष्टी करत कॅम्प मधल्या आमच्या चुका आठवून आठवून हसत होते. आम्ही जिसींनी मिळून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. प्रत्येक जिसीनी जमेल तशी आपआपली अभिव्यक्ती सादर केली. अमित वर्माने " SSSS साथीरे, तेरे बीना"... हे "मुक्कदर का सिकंदरचे" गाणे म्हटले. आम्हाला खूप आवडले. अमितने अगदी त्याची राखी त्याच्या डोळ्या समोर उभी आहे अशा भावनेत गाणे म्हटले. आम्ही त्याच्या कडून त्याच्या मैत्रिणीचे खूप कौतुक ऐकले होते. अमितचे वडील लष्करात अधिकारी होते. त्यांच्या सहकाऱ्यांमधल्या एका अधिकाऱ्याची ती मुलगी. अमित ती लहानपणा पासून एकमेकांना ओळखत होते. दोघांचेही वडील पायदळाच्या गार्डस् रेजीमेंट मध्ये काम करायचे. अमित आम्हाला सैन्या बद्दलची थोडी थोडी माहिती द्यायचा. वासरात लंगडी गाय होती अमित म्हणजे. मला सैन्याबद्दलची काही खास माहिती नव्हती. सैन्य त्यातले आयुष्य म्हणजे आमच्यासाठी मोठे रहस्य होते. युद्ध तर रोज रोज होत नाहीत. मग जेव्हा युद्ध नसते तेव्हा सैन्य करते काय असा मला नेहमी प्रश्न पडायचा. तो सैन्या मधल्या गोष्टी सांगायचा आम्ही कान देऊन त्या ऐकायचो. रेजीमेंटला "युनिट" असेही म्हटले जाते हे त्याच्या कडूनच ऐकले होते. दोघांचेही वडील एकाच युनिट मध्ये असल्या कारणाने, ते दोघे गार्डस् रेजीमेंटच्या बाकीच्या अधिकाऱ्यांना ओळखत होते. युनिटमधले जवान शिपाई त्यांना आपले वाटायला लागले होते. अमितने इनफनट्रीत जायचे गार्डस् रेजीमेंट मध्येच जायचे असे ठरवले होते. गार्डस् ची तीच युनिट मिळेल ह्याची त्याला खात्री होती. आम्हाला आता पर्यन्त सैन्या बद्दल बरीच माहिती झाली होती. अमित मुळे रोज त्या माहितीत भर पडायची. भारतीय सैन्याचे पायदळ, रणगाडा, तोफखाना, सॅपर्स एंड माईनर्स, पॅरा कमांडो, आर्मीचे वायूदळ, सिग्नल्स् असे विविध लढाऊ दल आहेत किंवा आर्मस् आहेत. प्रत्येक लढाऊ दलाच्या आपल्या अशा रेजीमेंट्स, बटालियन्स् किंवा स्कॉड्रन्स् आहेत. उमेदवारीची पहिली काही वर्षे सैन्याधीकाऱ्याला, कमीशन्ड ऑफिसर झाल्यावर मिळालेल्या युनिट मध्ये घालवावी लागतात. एकदा त्याला एका युनिट मध्ये कमीशन मिळाले की पहिली दहा बारा वर्षे तो त्याच युनिट मध्ये राहतो शिकतो. त्याची युनिट जिथे जाईल तिथे जातो. युनिटची जागा दर तीन वर्षाने बदलते. युनिट, त्यातले जवान, त्यातले अधिकारी हे सगळे त्याचे कुटुंब बनते. युनिट मधले ज्येष्ठ अधिकारी त्याचे मार्गदर्शक शिक्षक बनून राहतात. हे सगळे ऐकून आम्हाला कधी एकदा आमची युनिट मिळते असे व्हायचे. लग्नाचे वय झालेल्या एखाद्या मुलीला जसे सासर कसे असेल, कोठे असेल असे प्रश्न सतावतात तसे आम्हाला आमच्या युनिट बद्दल वाटायचे. ह्या उलट अमित. त्याला हवी असलेली युनिट मिळणारच हे त्याला माहीत असल्या कारणाने निश्चिंत होता. आयएमए मध्ये कोर्स संपण्या पूर्वी, प्रत्येक जिसी कडून त्यांना कोठले लढाऊ दल पाहिजे ते जाणून घेतले जाते.   प्रत्येक जिसीची आवड, कोर्स मधली त्याची कामगिरी युनिट मधल्या रिक्त जागा ह्यावर एखाद्या जिसीला मिळणारी युनिट अवलंबून असते. त्यात पेरेंटल क्लेमला खूपं महत्त्व दिले जाते. पेरेंटल क्लेम, म्हणजे जर कोणाचे वडील एखाद्या युनिट मध्ये असतील त्या अधिकाऱ्याच्या किंवा जवानाच्या आयएमएत शिकणाऱ्या मुलाला त्याच्या वडिलांची युनिट पाहिजे असल्यास, त्याच्या त्या निवडीला प्राधान्य दिले जाते. पेरेंटल क्लेम हे आपल्या सैन्य दलाचे वैशिष्ट्य आहे. एकाच युनिट मध्ये वाढल्या मुळे त्याच युनिट मध्ये आता अधिकारी म्हणून आल्या मुळे, युनिट प्रती आपुलकीचा तीव्र भाव जागृत होतो, आपलेपणा येतो. लढाईत अशा "आपल्या" युनिट विषयी वाटणाऱ्या आपुलकीचा खूप उपयोग होतो. त्या आपुलकीपोटी, लढाईत, अधिकाऱ्यांनी शौर्याच्या मोठ्या गाथा कोरून ठेवल्या आहेत. भारतीय सैन्याचा इतिहास अशा घटनांनी समृद्ध आहे. बऱ्याच वेळेला असे दिसून आले आहे की जवान किंवा अधिकारी युद्धात देशासाठी नव्हेतर त्यांच्या युनिटच्या मानासाठी स्वतःचे प्राण देतात. हे सगळे जाणूनच भारतीय सैन्यात पेरेंटल क्लेमची मुद्दामून तरतूद केली गेली आहे. असा हा वारसाहक्क दावा फक्त लढाऊ दलांसाठीच आहे. ह्याच पेरेंटल क्लेम मुळे जिसी अमित वर्माला गार्डस् रेजीमेंट मिळणार हे जवळ जवळ निश्चित होते. त्याच्या मैत्रिणीला सुद्धा तेच हवे होते असे तो आम्हाला कित्येकदा म्हणाला होता. आम्हाला आयएमएच्या रुक्ष दिनचर्येत अमित त्याच्या मैत्रिणीचा विषय चघळायला खूप आवडायचा. त्याची आम्ही खूप खिल्ली उडवायचो. पण खरे तर आम्हाला त्याचा हेवा वाटायचा.
 
विविध ठिकाणाहून आलेले ते जिसीज आणि त्यांच्या फुललेल्या प्रतिभा अनुभवायची एक संधी म्हणजे पहिल्या सत्राच्या मध्ये होणारी सोशल्स्. अॅकॅडमीतले दिल्लीवाले, चंडीगढवाले - दिल्ली चंडीगढ सोशल करायचे. मराठी जिसी एकत्र जमून - तांत सोशल करायचे. तसेच मल्लू सोशल, बॉन्ग सोशल ह्याच बरोबर प्लटून सोशल, कंपनी सोशल, बटालियन सोशल, एनडीए स्कॉड्रन सोशल, आरआयएमसी सोशल अशी अनेक सोशल्स् होत राहायची. अशा सोशल्स् मधून कोणी गाणी म्हणायचे, कोणी स्वतःच्या कवितांचे वाचन करायचे, छोट्या नाटिका बसवल्या जायच्या तर कोणी एखादे तंतुवाद्य वाजवून आपले कर्तब दाखवून सुंदर मैफिल जमवायचे. बंगाली मुले सुंदर गाणी म्हणण्यात पटाईत. प्रत्येकाच्या घशात किशोरकुमार बसलाय असे वाटायचे प्रत्येकाला रविंद्रसंगीत यायचे. रवींद्रनाथांनी दहा हजारावर कविती लिहून ठेवल्या आहेत. रवींद्रनाथांच्या प्रतिभेची झलक अशाच जिसींजने गाईलेल्या रविंद्रसंगीताने मला करून दिली. ह्या सोशल्स् मधून जिसीजच्या वेगवेगळ्या प्रतिभा साकार व्हायच्या.
 
शेवटचा सगळ्या कॅम्पचा बाप म्हणजे चिंडिटस्. ह्या कॅम्पनंतर आऊटडोअर एक्सरसाईजचे सत्र संपते. आयएमएत झालेल्या सगळ्या एक्सरसाईजचे शिकवलेल्या साऱ्या युद्धशास्त्राचा परिपाक चिंडिटस् एक्सरसाईजने होतो. ह्या कॅम्प मध्ये "भदराज" नावाचे भले मोठे पर्वत शिखर सर करायचे असते. पर्वत शिखर कसले, पर्वत समूह म्हणावे लागेल त्याला. त्यामुळे चिंडिटसला कधीकधी "भदराज" असे पण म्हटले जाते. कॅम्प जिथे संपतो तेथून, डोंगर दऱ्याखोऱ्यातून जवळजवळ पन्नास किलोमीटरचा "रनबॅक" करावा लागतो. तो सुद्धा चिंडीट ड्रेसमध्ये, आपली वैयक्तिक रायफल घेऊन. हा रनबॅक म्हणजे, आयएमएच्या सगळ्या बटालियन्स मध्ये कोणती बटालियन पहिल्यांदा पोहोचते त्याची चुरस असते. शंभर ते एकशेवीस जिसींच्या समूहाच्या रनबॅक साठी मोठा ताळमेळ साधावा लागतो.
 
हनुमानाला लागलेल्या शापा मुळे त्याला स्वतःच्या शक्तीची जाणीव नव्हती, किंबहुना त्याला माहीतच नव्हते की तो एका प्रचंड शक्तीचा धनी आहे म्हणून. जाणीव नसल्यामुळे तो त्याच्या शक्तीचा योग्य उपयोग करू शकत नव्हता. जांबुवंताने ही जाणीव करून देण्याचे काम केले. भदराजच्या कॅम्प आम्हाला आमच्यातील आंतरिक शक्तीची जाणीव करून देतो. देवाने दिलेल्या आपल्या अंगात दडलेल्या मानसिक शारीरिक शक्तीचा अनुभव ह्या कॅम्प द्वारा मिळतो त्याची परिणती प्रत्येकाचा आत्मविश्वास वाढण्यात होते.