आकाशवाणी मुंबईवर सकाळी सहा वाजताच्या दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या
बातम्यांनंतर सकाळचा ‘मंगलप्रभात’ कार्यक्रम सुरू व्हायचा. तयार होताना घड्याळ
बघायची गरज नव्हती लागत. कार्यक्रमांवरून किती वाजले ह्याचे भान राहायचे. सोबत छान
गाणीही ऐकायला मिळायची.
आज ब-याच वर्षांनी रेडिओवर ‘रात्र काळी, घागर काळी…’ गवळण ऐकायला मिळाली. लहानपणचे दिवस आठवले. पंधराव्या शतकात संत विष्णूदास ह्यांनी अनेक ग्रंथ, अभंग व कविता लिहिल्या. त्यांनी लिहिलेली ही गवळण लक्षवेधी आहे. रचना पंधराव्या शतकातील आहे. शब्द साधे असले तरी वापरात नसल्याने समजायला अवघड वाटतात. दत्ताराम गाडेकरांची सोपी पण आकर्षक चाल मनोवेधी आहे. आकाशवाणीचे कलाकार गोविंद पोवळे, प्रभाकर नागवेकर व इतरांनी गायीलेले गाणे परत परत ऐकावेसे वाटते. गायिका कोण आहे समजत नाही.
रात्र काळी, घागर काळी ।
यमुना जळे ही काळी वो माय
बुंथ काळी, बिलवर काळी ।
गळा मोती एकावळी काळी वो माय ॥धृ॥
मी काळी, काचोळी काळी ।
कांस कासोली ते काळी गो माय ॥१॥
बुंथ काळी, बिलवर काळी ।
गळा मोती एकावळी काळी वो माय ॥धृ॥
एकली पाण्याला नव जाय साजणी ।
सवें पाठवा मूर्ती सावळी गो माय ॥२॥
बुंथ काळी, बिलवर काळी ।
गळा मोती एकावळी काळी वो माय ॥धृ॥
विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी ।
कृष्णमूर्ती बहूकाळी वो माय ॥३॥
रात्र काळी, घागर काळी ।
यमुना जळे ही काळी वो माय
बुंथ काळी, बिलवर काळी ।
गळा मोती एकावळी काळी वो माय ॥धृ॥
गाणे येथे ऐकायला मिळेल