१९७१ चे अभिमन्यू – प्रा सु ग शेवडे गणपतीच्या मंदिरात प्रवचने घ्यायचे. महाभारतातील महत्त्वाची पात्रे, हिंदू धर्म, सावरकर, असे विषय असायचे. आम्ही जायचो त्या प्रवचनांना. त्यांची प्रवचने मला खूप आवडायची. त्यांनी लिहिलेले एक पुस्तक १९७१ चे अभिमन्यू हे वाचण्यात आले. मी आठवीत असेन. १९७१ च्या भारत पाक युद्धात आपल्या आर्मी नेव्ही व एअर फोर्स मधल्या आधिकाऱ्यांची कर्तबगारी व त्यांच्या हौतात्म्यांच्या गोष्टी होत्या.
हुतात्मा हा शब्द सावरकरांनी मराठीला दिलेला आहे. संस्कृत मधला हुत म्हणजे बलिदान (मराठी मध्ये) sacrifice English मध्ये. हुताग्नी, आहुती इत्यादी शब्द हुत ह्या पासून जन्म घेतात. जो आत्मा देशासाठी स्वतःची आहुती देतो तो हुतात्मा. ह्या आधी आपण शहीद हा शब्द वापरायचो तो फारसी शब्द आहे. अशी हुतात्मा ह्या शब्दाची उत्पत्ती
हे पुस्तक वाचून व माझा मामा मराठा लाइट इन्फंट्री मध्ये होता त्या मुळे मला आर्मी मध्ये जावे असे वाटू लागले. पुस्तक अगदी छोटे १०० पानी पण माझा जीवनक्रम बदलण्यात त्या पुस्तकाचा सिंहाचा वाटा म्हणून येथे देतो. पुस्तकाचे कव्हर सापडत नाही म्हणून देत नाही. पण मला आठवते ते अगदी साधे होते. पिवळ्या पुठ्ठ्याचे कव्हर. त्यावर पुस्तकाच्या वरच्या बाजूला लाल अक्षरात छापले होते १९७१ चे अभिमन्यू. ते पुस्तक पुण्याला आहे घरी. पण आता ते पुस्तकाचा फोटो काढायला घरी जावे लागेल जे इतक्यांत जमणार नाही.