सहावी सातवीत गेल्यावर पुलंचे व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक वाचले. चितळे मास्तर, नारायण, म्हैस, पेस्तनजी अशा अनेक काल्पनिक व्यक्तींची व्यक्ती चित्रे त्यांनी रंगवली होती. मजा यायची वाचताना. प्रत्येक व्यक्ती चित्रात आपल्या घरातला, नात्यातला किंवा मित्र परिवारातल्या व्यक्तीचे प्रतिबिंब दिसल्याचा भास व्हायचा. त्यांची शैली सर्वश्रुतच आहे.
वाटायचे आपणही असे लिहावे. असे कथाकथन करता यावे. मी काही व्यक्तीं विषयी वर्णने लिहिली सुद्धा होती पण ती फाइल कोठे तरी पोस्टिंग मध्ये हरवून गेली. मी आर्मीत असल्या कारणाने दर दोन तीन वर्षांनी बदली असायची. त्यात गेली. बरेच लेख गेले त्यात. पण त्या नंतर बोलघेवडा हा ब्लॉग सुरू केला. आता हरवत नाही.
हल्लीच एक काल्पनिक व्यक्तिचित्र ‘कमुताई’ लिहिले आहे. रामनामाचा उपयोग काउन्सेलिंग पेक्षा सरस पद्धतीने कसा करता येतो ते ह्यात दाखवले आहे.