Thursday, December 26, 2019

नागरिकत्व सुधारणा कायदा (२०१९)



काय आहे नागरिकत्व सुधारणा कायदा (२०१९)?  - पाकिस्तान, अफघाणिस्तान, बांगलादेश हे इस्लाम बहूल देश आहेत. ह्या देशात राहाणाऱ्या हिंदू, बौद्ध, शीख, ईसाई, जैन व पारसी  प्रजेला लागू होणारा हा कायदा आहे. ते तेथे अल्पसंख्याक आहेत. ह्या तीन देशातल्या अल्पसंख्यांवर धर्मामुळे होणाऱ्या छळाला कंटाळून ही लोकं भारतात पळून आली होती. २०१४ डिसेंबर पर्यंत भारतात पळून आलेले व निर्वासित छावण्यांतून इतकी वर्ष राहत असलेल्यांना नागरिकत्व बहाल करणारा हा कायदा आहे. २०१६ मध्येच हे विधेयक लोकसभेत पारित झाले होते. संख्येच्या अभावी राज्यसभेमध्ये पारित होऊ शकले नाही व विधेयक शोध समितीकडे पाठवण्यात आले होते. ईशान्य प्रदेशात आदिवासी लोकांची संस्कृती जपण्यासाठी हा कायदा आसाम, मेघालय, मिझोराम त्रिपुरा व त्याच बरोबर इनर लाइन परमिटाला लागू होणार नाही ह्याची काळजी घेतली गेली आहे.

हा कायदा कोणासाठी व कशासाठी? – धर्माधिष्ठित छळ ह्या तीन देशात अविरत होत आहेत व ह्याचा परिणाम असा की गेल्या ७० सालात हिंदू व बाकी अल्पसंख्याकांची संख्या ३० टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत येऊन ठेपली आहे. काय झाले तेथल्या हिंदू व इतर अल्पसंख्याकांचे बरेच मारले गेले, काही, छळामुळे धर्मांतरित झाले व काही, येथे पळून आले. त्यांना आपल्या देशाशिवाय दुसरा पर्याय नाही, दुसरा आसरा नाही. अशा सगळ्या लोकांना आपल्या देशात सामावून घेणे हे आपल्या संस्कृतीला अनुसरून आहे व आपले कर्तव्य आहे. ह्या कायद्यात ते सुलभ केले आहे.

ह्याला विरोध कोणाचा व का? ईशान्य प्रदेशातल्या लोकांना वाटते की नागरिकत्व कायद्याने त्यांच्या आदिवासी संस्कृतीवर सावट येईल. पण इनर लाईन परमिटाने त्यांना वाटणारी भीती चुकीची आहे व भ्रमित करणारी आहे. बाकीच्या ठिकाणी विरोधकांना वाटते की ह्या मुद्द्याचा उपयोग करून मतांच्या राजनीतीने धृवीकरण करणे सहज शक्य आहे व त्यांच्या पक्षाला निवडणुकांमध्ये अशा धृवीकरणाने मोठा फायदा होईल. त्यामुळे अफवा पसरवल्या जात आहेत व भीतीचे वातावरण तयार करण्याचे काम चालू आहे. काही बेजबाबदार मीडियावरून असे दाखवले जात आहे की देशभरातले विद्यार्थी ह्या कायद्याच्या विरोधात आहेत. वस्तुस्थिती वेगळीच आहे.  भारतात पाचशेहून अधिक विद्यापीठे व ३८ हजारापेक्षा अधिक विद्यालये आहेत व विरोध फक्त बोटावर मोजता येतील इतक्याच संस्थांमधून होत आहे त्यात जामीया मिलिया, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ जाधवपूर विद्यापीठ प्रामुख्याने आहेत.

खरे काय आहे? भारतीय नागरिकांना ह्या कायद्याने काही नुकसान होणार नाही. फक्त पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेशात राहणाऱ्या हिंदू, बौद्ध, शीख, ईसाई, जैन व पारसी  लोकं ज्यांना रात्रंदिवस छळाला सामोरे जावे लागते अशा लोकांना भारताचे नागरिकत्व बहाल करणारा हा कायदा आहे. 

Tuesday, September 17, 2019

१९७१ चे अभिमन्यू (पुस्तक पाचवे)


१९७१ चे अभिमन्यू – प्रा सु ग शेवडे गणपतीच्या मंदिरात प्रवचने घ्यायचे. महाभारतातील महत्त्वाची पात्रे, हिंदू धर्म, सावरकर, असे विषय असायचे. आम्ही जायचो त्या प्रवचनांना. त्यांची प्रवचने मला खूप आवडायची. त्यांनी लिहिलेले एक पुस्तक १९७१ चे अभिमन्यू हे वाचण्यात आले. मी आठवीत असेन. १९७१ च्या भारत पाक युद्धात आपल्या आर्मी नेव्ही व एअर फोर्स मधल्या आधिकाऱ्यांची कर्तबगारी व त्यांच्या हौतात्म्यांच्या गोष्टी होत्या.
हुतात्मा हा शब्द सावरकरांनी मराठीला दिलेला आहे. संस्कृत मधला हुत म्हणजे बलिदान (मराठी मध्ये) sacrifice English मध्ये. हुताग्नी, आहुती इत्यादी शब्द हुत ह्या पासून जन्म घेतात. जो आत्मा देशासाठी स्वतःची आहुती देतो तो हुतात्मा. ह्या आधी आपण शहीद हा शब्द वापरायचो तो फारसी शब्द आहे. अशी हुतात्मा ह्या शब्दाची उत्पत्ती
हे पुस्तक वाचून व माझा मामा मराठा लाइट इन्फंट्री मध्ये होता त्या मुळे मला आर्मी मध्ये जावे असे वाटू लागले. पुस्तक अगदी छोटे १०० पानी पण माझा जीवनक्रम बदलण्यात त्या पुस्तकाचा सिंहाचा वाटा म्हणून येथे देतो. पुस्तकाचे कव्हर सापडत नाही म्हणून देत नाही. पण मला आठवते ते अगदी साधे होते. पिवळ्या पुठ्ठ्याचे कव्हर. त्यावर पुस्तकाच्या वरच्या बाजूला लाल अक्षरात छापले होते १९७१ चे अभिमन्यू. ते पुस्तक पुण्याला आहे घरी. पण आता ते पुस्तकाचा फोटो काढायला घरी जावे लागेल जे इतक्यांत जमणार नाही.

Monday, August 12, 2019

राजे शिवछत्रपती (पुस्तक चवथे)

राजे शिवछत्रपती
बमोंची डोंबिवलीतल्या नहरू प्रांगणात राजे शिवछत्रपतींवरची व्याख्याने ऐकली. सात दिवस रोज चालणारी ती व्याख्याने म्हणजे मेजवानी असायची. नंतर हे पुस्तक वाचले. पूर्वार्ध व उत्तरार्ध अशा दोन भागात असणारे पुस्तक शिवरायाच्या जन्मा आधी महाराष्ट्रात व हिंदुस्तानात काय हिंदूंची दशा होती त्या पासून सुरू होऊन शिवरायांच्या अंतकाला पर्यंतचा इतिहास उत्तम तऱ्हेने दिलेला आहे. आपल्या डोळ्या समोर गड आला पण सिंह गेला, अफझलखानाची हत्या, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची बोटे, बाजी प्रभूंचा पराक्रम सगळे उभे राहते. ह्या पुस्तका मुळेच मी शिवरायांचा भक्त झालो व मनोमन पटले की जर शिवराय नसते तर महाराष्ट्रात आज हिंदू कोण असे म्हणावे लागले असते. आपण सारे बाटगे मुसलमान झालो असतो.
अशा ह्या महान पुस्तकाला मानाचा कुर्निसात.
माझ्याकडे ह्या पुस्तकाची जी प्रत आहे पूर्वार्ध २१ (मोठ्या आकाराची ५१२ पाने) व उत्तरार्ध (मोठ्या आकाराची ४९० पाने) अशी पुठ्ठ्याची बांधणी असून प्रत्येकी किंमत २१ रु अशी लिहिली आहे.



Sunday, June 23, 2019

सहा सोनेरी पाने (पुस्तक तिसरे)


स्वातंत्र्यवीरांच्या मौक्तिकांमधले सगळ्यात महत्त्वाचे एक. आठवी नववी व दहावी ह्या इयत्तेत असताना हे वाचले. त्या वेळी डोंबिवली नगरपालिकेचे वाचनालय खूप छान व चांगली पुस्तके असणारे चांगले ठेवलेले वाचनालय होते. आता कसे आहे माहीत नाही.
पहिल्यांदा हे पुस्तक तेथून वाचले व मग एका पुस्तक प्रदर्शनात विकत घेतले. माझी जन्म ठेप, काळेपणी कादंबरीतला डोलकाठी अजून आठवतो. पण आपल्या राष्ट्राचा अलौकिक इतिहास कधी मॅकॉलेच्या शिक्षणात समजलाच नाव्हता तो समजला.
माझ्या जीवनावर त्याचा खूप प्रभाव आहे. सहा सोनेरी पाने जो पर्यंत आपण वाचत नाही तो पर्यंत आपल्याला आपला इतिहास फक्त पराभवाचा आहे असेच वाटत राहते. आपल्या धर्मातील सात दोष (बंदी) व त्या मुळे झालेली हानी लक्षात येते.
मी हे who are we असे हल्लीच्या घाल माती काढ गणपती छाप पिढीसाठी सोनेरी पानांवरून लिहिले आहे. जरूर वाचावे


Monday, May 27, 2019

व्यक्ती आणि वल्ली (दुसरे पुस्तक)



सहावी सातवीत गेल्यावर पुलंचे व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक वाचले. चितळे मास्तर, नारायण, म्हैस, पेस्तनजी अशा अनेक काल्पनिक व्यक्तींची व्यक्ती चित्रे त्यांनी रंगवली होती. मजा यायची वाचताना. प्रत्येक व्यक्ती चित्रात आपल्या घरातला, नात्यातला किंवा मित्र परिवारातल्या व्यक्तीचे प्रतिबिंब दिसल्याचा भास व्हायचा. त्यांची शैली सर्वश्रुतच आहे. 
वाटायचे आपणही असे लिहावे. असे कथाकथन करता यावे. मी काही व्यक्तीं विषयी वर्णने लिहिली सुद्धा होती पण ती फाइल कोठे तरी पोस्टिंग मध्ये हरवून गेली. मी आर्मीत असल्या कारणाने दर दोन तीन वर्षांनी बदली असायची. त्यात गेली. बरेच लेख गेले त्यात. पण त्या नंतर बोलघेवडा हा ब्लॉग सुरू केला. आता हरवत नाही. 
हल्लीच एक काल्पनिक व्यक्तिचित्र ‘कमुताई’ लिहिले आहे. रामनामाचा उपयोग काउन्सेलिंग पेक्षा सरस पद्धतीने कसा करता येतो ते ह्यात दाखवले आहे. 


Thursday, May 23, 2019

पुस्तक दिंडी

आईची देणगी - पुस्तक १
– गोनीदांचा गोष्टींचा संग्रह मी लहान होतो तेव्हा आई वाचून दाखवायची किंवा त्यातल्या गोष्टी सांगायची. त्यात राम, कृष्ण, शिवाजी, तुकाराम, एकनाथ, रामदास, लोकमान्य टिळक, नेताजी ह्या व अनेक महानुभावांच्या थोडक्यात गोष्टी होत्या. रामायण व महाभारतातल्या गोष्टी होत्या. आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या गोष्टी होत्या. प्रत्येक गोष्टीत संस्काराचे धडे असायचे. मला गोष्टींची आवड तेव्हा पासून लागली. रोज संध्याकाळी एखादी गोष्ट वाचली जायची. त्यानंतर ते पुस्तक दर दिवाळीत वाचले गेले होते. त्यात शिकवलेले संस्कार मनात ठसत होते ते त्या वेळेला समजले सुद्धा नव्हते.
आमच्या लहानपणी पुस्तकाचे मुखपृष्ठ वेगळ्याच प्रकारचे होते. लहान लहान चौकोनात काढलेल्या चित्रांचे ते पृष्ठ होते. ती चित्र आम्ही तासनतास बघत बसायचो. आता त्याचे मुखपृष्ठ वेगळे झाले आहे बहुदा. पुस्तक दिंडीतले माझी पहिली निवड.


Wednesday, May 22, 2019

विश्वाची उत्पत्ती - प्रश्न


बरेच दिवस एक प्रश्न मनात आहे त्याला समर्पक उत्तर सापडत नाही.
आपले विश्व बिगबॅन्गने सुरू झाले असा सिद्धांत आहे. त्या पेक्षा पडणारा मोठा प्रश्न म्हणजे, बिगबॅन्ग होण्यासाठी लागणारा पदार्थ किंवा घटना अस्तित्वात असायला हवी, तो पदार्थ किंवा ती घटना कोठून आली.

एनर्जी वा मॅटरच्या आधी काय होते. ते कोठून आले, कशातून आले व ज्याच्यातून आले ते कोठून आले ह्याला समर्पक उत्तर कोणी देऊ शकेल का.

मी जालावर प्रयत्न केला समर्पक उत्तर सापडत नाही. कोणी म्हणते की बिगबॅन्गच्याच वेळेला वेळ सुरू झाली. आता वेळ ही आपल्यासाठी आहे. वेळेच्या आधी काहीतरी असणारच. काहीच नसेल तर मग हे सगळे उत्पन्न कसे झाले. फक्त एनर्जी होती असे म्हटले तर ती आली कोठून. ती यायला जर स्पेस - अवकाश लागत असेल तर ती स्पेस - अवकाश आलं कोठून. 

बिगबॅन्गच्या आधी काय होते? जर काहीच नव्हते तर उत्पत्तीसाठी लागणारे साहित्य कोठून आले? ऊर्जा कशातून झिरपली? बिगबॅन्ग घडवण्याची घटका कोणी ठरवली व बिगबॅन्ग घडवून आणणारी कळ कोणी दाबली
कोणी वैज्ञानिक निरूपण करू शकेल का ह्या प्रश्नाचे.