Thursday, December 15, 2016

अर्थक्रांतीचे समुद्रमंथन


नोटबंदीमुळे सध्या सगळ्यांना त्रास सोसावा लागत आहे. लोकांची अधीरता वाढू लागली आहे. पैशाची हाव ठेवणारे भ्रष्ट श्रीमंत नागरिकांनी कसे तरी करून सगळा काळा पैसा गोरा केला असे वाटून लोकांचा उत्साह व धैर्य खच्ची व्हायला लागला आहे. बँकेत पैसे ह्या ना त्या मार्गाने टाकल्याने काळ्याचे गोरे होत नाहीत हे ही लोकं खोडसाळ बातम्यांमुळे विसरत चालली आहेत. ह्या पुढे अशा प्रत्येक व्यवहाराची छाननी झाली पाहिजे व दोषी लोकांवर कारवाई केली पाहिजे. ती केली जाईल असे  वाटते.  बऱ्याच लोकांच्या तंगड्या एकमेकात गुंतल्या असल्या कारणाने ह्याला वेळ लागू शकतो पण होईल असे वाटते.
ह्या समुद्र मंथनातून होणाऱ्या बदलाचा प्रत्यय यायला वेळ लागणार आहे. बरेच दिवस लागतील. जर तर, फायदा तोटा, कधी शोध अधिकाऱ्यांचा विजय तर कधी कर चुकवणाऱ्यांना संधी अशा गोष्टी होत राहतील. नोटबंदी विरुद्ध असणारे व भ्रष्टाचारी त्यांच्या त्यांच्या फायद्यासाठी काहूर माजवतील. काही राजकीय पक्षांचे समर्थक नोट बंदी विरुद्ध पक्षाची नीती आहे म्हणून फक्त विरोधासाठी विरोध करतील.
काही पत पेढ्यांचे संचालक पैशासाठी नीतिमत्ता बाजूला ठेवून काळे पैसे गोरे करण्याच्या मागे लागल्या कारणाने आम जनतेला एटिएम मधून पैसे काढायला त्रास सोसावा लागत आहे. सरकारने अशा लोकांच्या वर अंकुश ठेवायला पाहिजे व त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे. नाही तर लोकांचा उत्साह ओसरेल व नोट बंदीवरचा विश्वास उठेल.
काही लोकांच्या मते आपल्या देशात एका रात्रीत कागदी नोटां ऐवजी रोकड रहित अर्थ व्यवहार करणे अशक्य प्राय व मूर्खपणाचे आहे. त्यांच्या मते आपला देश अजून रोकड रहित अर्थ व्यवहाराला तयार नाही. अशा मोठ्या प्रमाणावरच्या बदलासाठी खूप अवधी लागतो. खरे आहे. पण जर सरकार मदत करत असेल व आपण त्याला साथ दिली तर हीच गोष्ट थोड्या अवधीत घडू शकते. १० वर्षाचे काम एका वर्षात शक्य होऊ शकते. जर आपल्याला आपले राष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करायचे असेल तर नोट बंदी व रोकड रहित  अर्थ व्यवहार केले पाहिजे. हा बदल घडू शकते. आज जर आपण किमतीने २० टक्के रोकड रहित व ८० टक्के नगदी अर्थ व्यवहार करत असू तर येत्या दोन महिन्यात जास्तीत जास्त रोकड रहित अर्थ व्यवहार करायचा ठरवला तर किमतीने सहज ५० ५० टक्क्या पर्यंत आपण रोकड रहित अर्थ व्यवहार करू शकू. जर मनात ठरवून प्रयत्न केला तर अजून काही दिवसातच आपण किमतीने ८० टक्के रोकड रहित व्यवहार करू शकू.
हीच गोष्ट राष्ट्राला लागू होऊ शकेल. रोकड रहित अर्थ व्यवहार दोन भागात बदल म्हणून आणायचा ठरवला तर सरकार व आपल्या मदतीने ते शक्य होऊ शकेल. आज जर देशात किमतीने २० टक्के रोकड रहित व्यवहार चालत असतील तर सरकारने पहिल्या भागात, मार्च २०१७ पर्यंत ते किमतीने ६० टक्क्यांपर्यंत वाढवायचे व अशा तऱ्हेने २०१७ वर्ष अखेरी पर्यंत ७० ८० टक्के किमतीने रोकड रहित व्यवहार देश करू शकेल. हे शक्य आहे. लोकांच्या मते लांब लांबच्या व छोट्या छोट्या गावांतून रोकड रहित व्यवहार अवघड आहे. अवघड आहे पण एका रात्रीत बदलायला कोण सांगत आहे. आपल्या देशाने किमतीच्या ७० टक्के रोकड रहित केले तरी हा बदल मोठा आहे. असे लांबचे व छोटे गाव जिथे रोकड रहित व्यवहार अवघड आहे ते बाकीच्या ३० टक्क्यात गणले जाऊ शकेल. दूसऱ्या भागात दोन वर्षात तेथे पण आपोआप बदल घडू शकेल.
काहीचं म्हणणे आहे की ८ डिसेंबराच्या पाहिल्या भाषणात पंतप्रधानांनी काळ्या पैशाविरुद्ध युद्धाचा शंख फुंकला होता. आता हल्लीच्या भाषणांतून काळ्या पैशाविरूद्धच्या युद्धावर नाही तर रोकड रहित अर्थ व्यवहारावर भर दिली जाते. काही लोकांनी तर त्याचे एका वेगळ्या तऱ्हेने विश्लेषण करून आकडेवारी काढली  आहे. पाहिल्या भाषणात पंतप्रधानांनी २२ वेळा काळा पैसा हा शब्द वापरला व दोनदा रोकड रहित हा शब्द वापरला. हल्लीच्या भाषणांतून पंतप्रधान काळा पैसा हा शब्द केवळ ३ ते ४ वेळा वापरतात व रोकड रहित वीस एकवीस वेळा वापरतात ह्या वरून असे वाटते की आता त्यांना रोकड रहित व्यवहाराला जास्त महत्त्व द्यायचे आहे व काळ्या पैशाबाबतची लढाई मोडकळीत काढायची आहे.  आपण जर गेल्या दोन वर्षाचे निर्णय तपासले तर प्रत्येक निर्णय हा काळा पैसा कमी करण्याच्या दृष्टीनेच घेतलेला आहे असे दिसून येते. काळा पैसा कमी करण्यासाठी नोटबंदी आवश्यक होती. प्रत्यक्षकरा पेक्षा अप्रत्यक्ष करा मुळे जास्त लोक कर दाते बनू शकतात. हे रोकड रहित व्यवहाराने शक्य होईल. जास्त लोक कर द्यायला लागले की एकूणच कराचे दर कमी होतील. प्रत्येकालाच फायदा आहे त्यात. जास्त लोक कर द्यायला लागल्याने कर वसुली वाढेल. सरकारच्या तिजोरीत जास्त पैसा येईल. आपल्या देशातील जे २  टक्के कर देत होते ते १० १५ टक्क्यांवर जातील. जिएसटीच्या अमल बजावणीसाठी सुद्धा रोकड रहित व्यवहार खूप सोईस्कर होईल. रोकड रहित व्यवहाराने पैसा कोठून कोठे गेला हे समजणे सोपे जाईल त्याने काळा पैसा तयार होण्यावर अंकुश बसेल. म्हणूनच कोणताही निर्णय कप्प्या कप्प्यात ठेवून बघण्यापेक्षा अर्थ व्यवहाराचे पूर्ण चित्र डोळ्यासमोर ठेवा. नोटबंदीचा पाहिला भाग संपत आला आहे व म्हणूनच रोकड रहित अर्थ व्यवहार हा सरकारचा मंत्र सध्या बनला आहे. इतकी वर्षे विरोधात असलेले राजकीय पक्ष काळा पैसा कसा थांबवावा व भ्रष्टाचाराचा किडा आपल्या देशाला कसा लागला आहे त्या बद्दल बोलायचे. तेच पक्ष सत्तेवर आले की काळ्या पैशाबाबत  नुसते बोलायचे पण तेच भ्रष्टाचाराला खत पाणी घालायचे. आज इतक्या वर्षाने सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाने  व आपल्या पंतप्रधानांनी काळा पैसा व भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम उघडली आहे ह्याचे समर्थन सुज्ञ नागरिकांनी करायलाच पाहिजे. इतकी वर्षे भाजप एक बनिया पक्ष म्हणून संबोधला गेला आहे. हे असताना देखील पंतप्रधानांनी हा निर्णय घेणे हे पंतप्रधानांच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्धचा त्यांचा संकल्प जाणवून देतो.

धीर, विश्वास आणि संकल्प हे जाणत्या व सुज्ञ नागरिकांकडून अपेक्षीत आहे.  हीच अर्थक्रांती आहे हेच समुद्रमंथन आहे.

Wednesday, August 10, 2016

राजाराम सीताराम एक...........भाग १९........धूंद येथ मी स्वैर झोकितो मद्याचे प्याले

धुंद येथमी स्वैर झोकितो मद्याचे प्याले

पासिंग आऊट परेड (पिओपी) ची तारीख जशी जशी जवळ येऊ लागली तसतशी आमच्या वरची बंधने हळू हळू शिथिल होऊ लागली. वेळापत्रकात जास्त तास मोकळे मिळायला लागले. आमच्या सर्वांची त्या तासांमध्ये आयएमएच्या शॉपिंग सेंटरला जाऊन पिओपीची तयारी सुरू झाली. कमिशन मिळताना व पिओपिच्या परेडसाठी घालायचा नवा गणवेश तयार करायचा............. हे चालू असताना आम्हा जंटलमन कॅडेट्सना पिओपीपुर्व पार्टीचे आमंत्रण आले. आर्मी मधली आमची पहिली पार्टी. पार्टी नव्हतीच तो कोर्स संपण्या प्रीत्यर्थ कोर्स एंडिंग बॉल होता. केवढे कुतूहल. काय कल्पना की पुढे २० वर्षांच्या सैन्य सेवेत शेकडो वेगवेगळ्या पार्ट्या दिल्या, घेतल्या जाव्या लागणार आहेत म्हणून. तसे नाही म्हणायला ही काही पहिलीच पार्टी नव्हती. ह्या आधी पण पार्ट्या व्हायच्या पण सीनियर्सच हुकमावर. आयएमेत गेल्या गेल्या काहीच दिवसाने कंपनी सोशल झाले. त्यात प्रत्येकाने आपआपले गुण दाखवले. कोणी गाणे, कोणी स्टॅन्ड अप कॉमेडी शो करून दाखवला होता, कोणी इलेक्ट्रिक गिटारावरचे त्याचे कौशल्य पणाला लावले होते, तर कोणी सीनियर्सवर विडंबनात्मक छोटे नाटक बसवले होते. पण हे सगळे एकदम शिस्तीत. अमक्या वेळेला कार्यक्रम सुरू म्हणजे सुरू. एक तासाचा म्हणजे एक तासाचा. जर जास्त वेळ लागायला लागला तर आईनवेळी काही कार्यक्रमात काटछाट. वेळेचे भान ठेवणे जास्त महत्त्वाचे. त्यामुळे साहजिकच बऱ्याच वेळेला कार्यक्रमाची मजा कमी व्हायची. कोठचाही सर्जनशील कार्यक्रम जर वेळेच्या पिंजऱ्यात बांधला गेला तर सर्जनशीलता संपते. कार्यक्रमात आताच कोठे रंग चढायला लागलेला असायचा पण वेळ संपत आली म्हणून कोणाचे तरी गायन, कोणाचे तरी व्हायोलिन वादन, कोणाचे तरी नाटक असे रद्द करावे लागायचे व पटकन समारोप करून पुढच्या आयएमएतल्या शिस्तबद्ध कार्यक्रमाला हजर राहावे लागायचे. ह्या बॉलसाठी आम्ही व्यवस्थित तयार होऊन कोट, टाय, जोडे घालून ओल्ड स्पाईसचे आफ्टर शेव लावून बॉलला हजर झालो. अमित वर्माने त्याला माहीत असलेल्या ब्रिगेडियर शहाच्या मुलीला त्याच्याकडून आमंत्रण दिले होते. पार्टी मध्ये सगळे झकपक पोषाखात आले होते. पुरुष सूट बूट कोटात व त्यांच्या बायका छान छान साड्यांमध्ये. अत्तराचे भपके येत होते. त्यांची कॉलेजातली मुले व मुली वयापरत्वे व सध्याच्या फॅशन प्रमाणे अद्ययावत कपडे घातलेली अशी हजर होती.

            तसे प्रत्येक पार्टीला मुलांचे येणे होत नाही. काहीच सोशल इंटरऍक्शन्स मध्ये त्यांना येता येते. बॉल हा त्यातलाच एक प्रकार. काही पार्ट्या ह्या फारच ऑफिशियल असतात. अशा पार्ट्यांना फक्त आधिकारी आणि त्याची बायको येते. मुलांना घरी ठेवावे लागते. त्यांची लुडबूड ऑफिसर्स मेस मध्ये नको म्हणून. अशा पार्ट्या साधारण कोण्या अधीकाऱ्याची बदली किंवा कोणत्या युनिट मध्ये बदलीहून आलेल्या आधिकाऱ्याचे स्वागत करण्यासाठी आयोजल्या जातात. ह्या पार्ट्या जास्त वेळे चालत नाहीत. 45 मिनटात सूप दिले जाते व मग जेवण. जेवणानंतर कमांडींग ऑफिसर कडून बदलीहून जाणाऱ्या आधिकाऱ्या बद्दल चांगले चुंगले बोलले जाते. 

            ह्या बॉलसाठी आम्ही जिसीज तयार होऊन दिलेल्या वेळेच्या आधीच ऑफिसर मेसच्या मुख्य खोलीत हजर राहिलो. ऑफिसर मेसच्या मेन हॉलला एन्टेरुम असे नाव असते. सरंजामी थाटाचा तो हॉल, प्रत्येक युनिटचे भूषणं असते. वेगवेगळ्या पद्धतीने तो हॉल सजवलेला असतो. काही काही युनिट्स खूप जुन्या इंग्रजांवेळच्या आहेत. त्यामुळे अशा युनिटच्या एन्टेरुमच्या सजावटीत त्या त्या युनिटच्या इतिहासाचे प्रतिबिंब दिसते. बऱ्याच वेळेला झालेली युद्ध, पकडलेले ध्वज, मारलेले प्राण्यांची तोंडे, किंवा युद्धाची तैलचित्रे असतात. अधिकाऱ्यांनी मेस ला दिलेल्या चांदीच्या ट्रॉफीज असतात. उंची गालिचे व सोफासेटने ती एन्टीरुम सजवलेली असते. कर्णमधुर संगीत, झकपक अधिकारी व त्याहीपेक्षा सजलेल्या त्यांच्या बायकांच्या परफ्यूम्सचा सुटलेला घमघमाट एक आगळीच धूंदी चढवून देतो.
           
त्यातच तरुण वयाची आम्ही पोरं, एक नजर आलेल्या मुलींवर होती. गमतीने आम्ही त्यांना SODA  - सीनियर ऑफिसरर्स डॉटरर्स असोशिएशन असे संबोधायचो. म्हणतातना - एका लग्नात अनेक लग्न जुळतात तसेच आहे हे. जिसी अमित वर्माने बोलावलेल्या व आलेल्या ब्रिगेडियरच्या छान मुली बरोबर त्याचे बोलणे व वागणे आमच्या तिरक्या नजरेतून सुटत नव्हते. मधून मधून सगळ्यांच्या नजरा हॉलच्या मुख्य दरवाज्यावर लागलेल्या होत्या. ठरवून दिलेल्या वेळेला आयएमएचा कमांडंट येतो. आर्मी मध्ये सीनियर ज्युनिअरचे फार असते. सीनियर आल्यावर ज्युनिअर लागलीच उभे राहतात. त्यांना अभिवादन करतात. बायका सगळ्यात सीनयर मानल्या जातात. त्यामुळे कमांडंट आला तसे सगळे आधिकारी उभे राहिले होते, पण बायका बसून होत्या. लेफ्टनंटच्या बायकोला सुद्धा सीनियर आधिकारी अभिवादन करतात व ती जो पर्यंत बसत नाही तो पर्यंत तो बसत नाही. आता पार्टीला रंग चढायला लागला होता. पार्टीतले वातावरण स्वैर असलेतरी कोठलाही स्वैराचार नव्हता. मद्यपान हा टाबू मानला जात नाही येथे व – “बसुयाना एकदा प्यायला”- अशा पद्धतीची वाक्य ऐकायला मिळत नाहीत. ज्यांना मद्य प्यायची असेल ते बार मध्ये जाऊन मद्य पितात. लपून छपून नाही तर  चार चौघात मिळून मिसळून. येथे काही ओढून ताणून केल्या सारखे वाटत नाही. मेस मध्ये फक्त आधिकारी वर्ग व त्यांच्या बायका मुले येऊ शकतात. त्यामुळे आधिकारी मद्य व त्यांच्या बायका मॉकटेलस् किंवा फृटज्यूसचे झोके घेतात. हे सगळे होत असताना आपण कोठे थांबायचे हे सर्वजण जाणत असल्यामुळे, मद्य पिऊन कधी तमाशा झालेला माझ्या ऐकिवात नाही. मुलींना व मुलांना कोणचे तरी फ्रूट ज्यूस देण्यात येते. मंद संगीत चाललेले असतानाच कोणी तरुण बॅचलर कोण्या लेडी वाइफला नृत्य करण्यासाठी विनंती करतो. तरुण लेफ्टनंट कॅप्टन बॅचलरने विनंती करायची व लेडीवाईफनी स्वीकारायची हा एक आर्मी कल्चरचा भाग आहे. मग मंद धुनांवर ते इंग्रजी थाटाचे नृत्य सुरू होते. हळू हळू बाकीची लोक नृत्यामध्ये शामिल होतात व सुंदर वातावरण तयार होते. मध्येच कोणी सीनियर नुसताच उभ्या असलेल्या एका बॅचलरला म्हणतोकी व्हाय आर यू स्टॅन्डींग अलोन, गेट डान्सिंग. काही अधिकारी आपआपल्या बायकांबरोबर नृत्यात मग्न होतात. बॅचलर्सना सीनियर ऑफिसरर्सच्या बायकांबरोबर नाचायचे प्रिव्हिलेज असते. अमित आपल्या आमंत्रित केलेल्या मुलीबरोबर पाश्चिमात्य पद्धतीचे नृत्य करण्यात गुंग झालेला आम्ही पाहिला. अमित छान नृत्य करायचा आम्ही आपले उगाचच नृत्यवजा कवायत करत त्या मंद धुनेचा अपमान करत होतो. आम्हाला एवढ्याचेच अप्रूप वाटत होते की आज कोणीतरी आपल्या बरोबर नाचताय. मी जाऊन आमच्या खूंकार डिएसच्या बायकोला विनंती केली
–          मॅममे आय रीक्वेस्ट यू टू जॉईन मी फॉर ए डान्स.
–          ओ शुअर असे म्हणत तिने आपल्या साडीचा पदर खोचला व सोफ्यावरून उठली.
मग मी तिला एस्कॉर्ट करत डान्स फ्लोअरवर घऊन आलो... पुढची पंधरा मिनिटे मी कवायत करत होतो व ती गाण्याच्या धुनेवर हळुवारपणे ठेकाधरुन नाचल्यासारखी करत होती. धून संपली, दुसरी सुरू होण्यामध्ये थोडा विराम होता. धून थांबल्या थांबल्या सगळ्या नृत्य करणाऱ्यांनी व बघ्यांनी टाळ्या वाजवून संपलेल्या धुनेचे आभार मानले. माझा नाच संपला होता. मी परत एस्कॉर्ट करत डिएसच्या बायकोला तिच्या जागे पर्यंत नेऊन सोडले. थॅन्क्यु मॅम म्हणत तिचे आभार मानले. तिने अदबीने यू आर वेलकम म्हटले.

            आज आम्हाला बियर प्यायची परवानगी होती. त्यामुळे तर त्या पार्टीचे फारच अप्रूप. एक तास भर हा नृत्याचा कार्यक्रम झाला. आम्ही नेत्रसुख जेवढे घेता येईल तेवढे घेतले. अमित पूर्णं तासभर त्याच्या मैत्रिणी बरोबर नाचला. दोघांची जोडीपण पहाणाऱ्याला चांगली वाटत होती. धून संपली तसा मेस हवालदार संचलन करत आपल्या पूर्णं पोषाखात ब्रिगेडियर धिंग्रा जो मेसच्या प्रेसिडंट मेस कमिटीचा चेअरमन होता त्याच्या समोर दहा फुटांवर सावधान करून सॅल्यूट मारून आपल्या खड्या आवाजात म्हणाला

श्रीमान.      भोजन प्रस्तुत है।

सगळे आधिकारी हे  होताना सावधान मध्ये उभे राहिले होते. बायका बसल्या होत्या. असे म्हटल्या बरोबर अधिकाऱ्यांच्या बायका हळूहळू डायनिंग हॉलकडे चालायला लागल्या. त्यांना एस्कॉर्ट करायला कर्नल शेखावत जो मेस सेक्रेटरी होता तो पुढे झाला. जेवण बुफे पद्धतीचे होते. आम्हा जिसीज् ना माहिती होते की बुफे पद्धतीच्या जेवणात सिनीयॉरीटी प्रमाणे जेवण मिळते. पहिल्यांदा लेडीज, मग मुले मग सीनियर ऑफिसर्स. त्यामुळे आम्हाला जेवण मिळे पर्यंत, केलेल्या चिकनच्या फक्त मानाच शिल्लक राहिल्या होत्या. पुढे बरीच वर्षे अशा पार्ट्यांमध्ये आम्ही चिकनच्या फक्त मानाच खाल्ल्या आहेत व चिकनला फक्त मानच असते अशी धारणा होऊन बसली होती. कारण युनिट मध्ये गेलो तरी आम्हा ज्युनियर्सचा नंबर लागे पर्यंत मानाच तेवढ्या उरलेल्या असायच्या. जेवण छान असून आम्हाला त्यात स्वारस्य नव्हते. एक तर इतक्या महिन्यांनी छान छान मुली बघत होतो त्यामुळे मन विचलित होऊन जेवणात लक्ष नव्हते व दुसरे म्हणजे जेवण सुरू झाले म्हणजे आता ही पार्टी संपणार होती व उद्या पासून पुन्हा आयएमएचा कार्यक्रम सुरू होणार होता.
           
जेवण झाले. जेवणा नंतरची स्विट डिश डेसर्ट खाऊन झाले व त्यानंतर लागलीचच सगळ्यांना थॅन्क्यू म्हणून कमांडंट आपल्या गाडीतून निघून गेला. गेल्या बरोबर पार्टी संपली व आपापल्या सिनियॉरीटी अनुसार एकेक अधिकारी निघून गेला. पिएमसी ब्रिगेडियर धिंग्रा ने जायच्या आधी मुदपाकखान्यात जाऊन सगळ्या आचाऱ्यांचे, मसालच्यांचे व मदतनिसांचे आभार मानले. जाताना आमच्या कडे बघून म्हणाला

यू क्लाऊन्स् . इनफ ऑफ रेवेलरी नाऊ विदाऊट वेस्टींग टाइमगो टू युअर बरॅक्स ऍड स्लिप. 

डिनर नाइट हे एकदम फॉर्मल असते. डिनर नाइटचा पोषाख असतो. तो वेगवेगळ्या रेजीमेंट्सचा वेगवेगळा असतो. त्यांच्या त्यांच्या प्रथा, इतिहासानुसार. समर युनिफॉर्म मध्ये हाफ पांढरा शर्ट, काळी पॅन्ट व कमरबंध. कमरबंधांचे डिझाइन युनिटांच्या रूढीवर अवलंबून असते. पोषाखावर नाव व रिबन्स लावायचे असतात. विंटर युनिफॉर्म बंद गळ्याचा जोधपुरी व खाली काळी पॅन्ट असते. डिनर नाइट्स मध्ये साधारणपणे नुसतेच अधिकारी असतात. क्वचित बायकांना पण बोलावणे असते कधी कधी जेव्हा भारताचा राष्ट्रपती येणार असेल तर. मिलिटरी बॅन्डच्या धुनांवर सगळे शिस्तबद्ध पद्धतीने चाललेले असते. साधारण 45 मिनटे एन्टेरुम मध्ये गप्पा, स्नॅक्स आणि ड्रिंक्स. जेव्हा जेवणाचा रिपोर्ट मिळतो तेव्हा आत डायनिंग हॉल मध्ये मोठ्या सरंजामशाही लाकडी टेबल व खुर्च्यांवर आधीच ठरलेल्या जागी बसायचे असते. टेबल लांब असते व एका टोकाला कमान अधिकारी जो युनिटाच्या सर्वेसर्वा असतो व दुसऱ्या टोकाला सगळ्यात ज्युनियर ऑफिसरने बसायचा प्रघात आहे. बाकी अधिकारी ठरवून दिलेल्या जागी बसतात. बाहेर मिलिटरी बॅन्ड धून वाजवतो व त्या तालावर सूप वाढले जाते. सगळ्यांना वाढल्यावरच कमान अधिकारी सूप सुरू करतो. बाकीचे लागलीच सुरू करतात. सूप किंवा पुढे कोणचाही कोर्स खाताना सतत डोळ्याच्या कोपऱ्यातून कमानअधिकाऱ्यावर लक्ष ठेवावे लागते त्यामुळे जेवणाऱ्यांची नजर कमानअधिकाऱ्यावर सतत असते. त्याने जेवणाचा कोर्स सुरू केल्या शिवाय कोणी जेवायला सुरुवात करत नाही व त्याने सूप संपवून सुपाचे बौल क्लोज केले म्हणजे बाकीचे त्याचे अनुसरण करतात. सूप संपल्याबरोबर बॅन्ड वाजायला लागतो व वेटर्स पहिला कोर्स उचलायला लागतात. पहिला कोर्स उचलल्या बरोबर दुसरा मेन कोर्स लावायला लागतात. हे करताना सगळ्या मध्ये यंत्रासारखी शिस्त जोपासली जाते. ज्या वेळेला अलीकडचा वेटर प्लेट ठेवेल त्याच वेळेला पलीकडचा समोरच्या अधिकाऱ्या समोर प्लेट लावतो. मेन कोर्स झाला की डेसर्ट. डेसर्ट संपल्यावर व डिशेस काढल्यावर कॉफी व चॉकलेट्स दिले जातात. त्या वेळेला कोणाला सिगारेट फुंकायची असेल तर फुंकू शकतात. हे सगळे झाले की प्रसिडेंट साठी टोस्टचा कार्यक्रम होतो. त्यासाठी वेटर रिकामे छोटे वाइन ग्लासेस सगळ्यांच्या पुढ्यात ठेवतात. मग वाइनच्या कॅन्टर मधले वाइन वा पाणी प्रत्येक अधिकारी आपल्या वाइन ग्लासा मध्ये ओततो व कॅन्टर हळूच पुढे सरकवत जवळच्या अधिकाऱ्याला देतो. उजवीकडून डावीकडे व डावीकडून उजवीकडे अशी सर्वांनी वाइन आपल्या वाइन ग्लासात ओतली की मग कमानअधिकारी आपल्या जागेवर उभा राहतो व जजकडे कशी हातोडी असते तशी त्याच्या समोर ठेवलेली असते तिने तो टेबलावर हळूच टोले देतो तसे सर्व शांत होतात मग तो उठून उभा राहतो व एका हातात भरलेला वाइनचा ग्लास घेऊन म्हणतो --- जंटलमन मिस्टर वाईस. त्या वेळेला सगळे उभे राहतात व जो सगळ्यात कनिष्ठ अधिकारी असतो तो म्हणतो जंटलमन द प्रेसिडेंट. सगळे अधिकारी मग ग्लास हातात घेऊन उभे उभे हात उंच करत म्हणतात फॉर द प्रेसिडेंट व एका घोटात ते ओतलेले पाणी पिऊन टाकतात. त्याच वेळेला बाहेर मिलिटरी बॅन्ड आपले राष्ट्रगीत वाजवायला लागतात. पूर्वी इंग्रजांच्या वेळेला प्रेसिडेंट ऐवजी इंग्लंडच्या राज्याच्या स्वास्थ्यासाठी टोस्ट करत असत व पाण्या ऐवजी वाइन असायची, राष्ट्रगीता ऐवजी गॉड सेव्ह द क्वीन किंवा किंग हे त्यांचे राष्ट्रगीत असायचे. ह्या सगळ्या मध्ये मेस हवालदार लांबवर उभे राहून नजर ठेवून सगळे नीट चालले आहे ह्याची खात्री करत असतो. तोच वेटर्सना सांभाळतो व पुढे काय करायचे ते डोळ्यांच्या इशाऱ्याने दर्शवतो.  मेस हवालदार बॅन्ड कधी धून वाजवणार व थांबवणार हेही ठरवतो. त्यामुळे जर का हे सगळे दृश्य कोणी लांबून पाहिले तर त्याला अगदी इतके छान चित्र दिसते की बघणारा एकदम भारावून जातो. प्रत्येक अधिकारी काटे सुरे वापरण्यात अगदी तरबेज असतात. मला माझे लहानपण आठवले. घरी खाली बसून हाताने कढी भात कालवून जेवणारे आम्ही, जेवायच्या आधी वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे। सहज हवन होते नाम घेता फुकाचे। ......... म्हटल्या शिवाय न जेवणारे आम्ही व आता तिथे बसून प्रेसिडेंटला टोस्ट देणारे आम्ही. जेव्हा आई भाजी नेहमी पानात उजवीकडेच वाढायची किंवा चटणी, पापड मिठाला पानात ठरलेल्या जागा आहेत ह्याचा आग्रह धरायची तेव्हा आम्हाला राग येई. आम्ही कधीतरी म्हणायचो, आई तू फारच करतेस, काय होईल जर भाजी उजवी कडच्या ऐवजी पानात डावीकडे वाढली तर. काय होईल मीठ किंवा चटणी पानात वाटेल तिथे वाढले तर. आई खूपदा समजवायचा प्रयत्न करायची की प्रत्येक गोष्टीला आपआपली जागा असते. ती त्याच जागी शोभून दिसते. प्रत्येक पद्धतीला काही कारणे असतात. काही रुढी व प्रथा अशाच घडत जातात व त्या सांभाळल्या की जवळच्या माणसा माणसात एकसंधपणा येतो. अशाच छोट्या छोट्या चांगल्या सवयीने मग माणूस ओळखला जातो. अशाच प्रघाताने एक संस्कृती बनते. प्रत्येक रुढी किंवा प्रथा घडण्या पाठीमागे एक कारण असते. अशा प्रथा देश, काल पात्राच्या चौकटीत बसवून राबवायला काहीच हरकत नसते. समाजाला स्वतःचे अस्तित्व येते. त्या वेळेला ह्या सगळ्या रूढींचा राग यायचा कारण मागची पिढी ही रुढी, परंपरा व प्रथा सांभाळणारी धार्मिक, देव देव करणारे, जात्यंध व अंधश्रद्धा जोपासणारी आहे असा आम्हा कॉलेजातील मुलांचा समज असायचा व त्याच चश्म्यातून आम्ही पाहायचो. आम्हाला आई रूढिवादी वाटायची व त्याच्या विरुद्ध पेटून उठायचो.  आता इतक्या वर्षाने कळले की इंग्रजांमध्ये व पश्चिम देशात सुद्धा अशा रुढी, परंपरा व प्रघात आहेत. कशा नंतर काय खायचे. काटे चमचे कोठे लावायचे. काटा डाव्या हातात धरायचा सुरी कधी तोंडात घालायची नाही व उजव्या हातातच धरायची. काटा चमचा सुरी प्लेट मध्ये सरळ ठेवले म्हणजे प्लेट बंद केली असे वेटरला सुचवले जाते व तो काढायला मोकळा होतो. काटा चमचा एकमेकांवर फुली सारखे लावले की प्लेट मधून अजून खात आहे बोलायला मध्ये विराम घेतला आहे हे कळते. आयएमएत आईला विचारले तसे उलट प्रश्न न करता शिष्टाचार म्हणून शिकलो व आत्मसात केले. तेथे असे प्रश्न विचारले असते तर जेवण बंद होऊन तेथेच रोलिंग सुरू झाले असते. आई बिचारी आमच्या उलट प्रश्नांना उत्तर देत बसायची व आम्ही अजून चिडवायचो. आता आई नाही पण छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आईला त्रास दिला त्याचे वाईट वाटते. आई परत आली तर दंडवत घालून तिला सांगेन की ती किती बरोबर होती ते. प्रत्येक जीवनशैलीत असे काही प्रघात हळू हळू तयार होतात. त्यात कमीपणा व लाज वाटून घ्यायचे काही कारण नाही. म्हणूनच भारतीय पद्धतीने जेवताना पाटावर बसून हाताने जेवण ओरपताना लाज वाटायची गरज नाही व इंग्रजी पद्धतीने जेवताना फार काही कौतुकाची गोष्ट आहे असे वाटायची पण गरज नाही. त्यांची ती शैली आहे आता आपण अनुकरण करत आहोत एवढंच. दोन्ही आपआपल्या परीने विकसित झालेल्या शैली आहेत, त्यांतूनच शिष्टाचार उत्पन्न होतो. इंग्रजांचा शिष्टाचार आत्मसात केला म्हणून आपल्या शिष्टाचाराचा तिरस्कार करून काही साधणार नाही. जे सोपे आहे, स्वच्छ आहे व परिस्थितिजन्य आहे ते आपले मानावे. पण म्हणून आपल्या वाडवडलांच्या सवयींना बोटं दाखवूनये ह्याचे तारतम्य आपल्या पिढीला शिकावे लागेल असे वाटते.
           
पार्टीचे हेच दोन प्रकार सैन्यात कमी अधिक प्रमाणात अधीकारीगण वापरतात. मग युनिट मधला एक ऑफिसर दुसऱ्याला मेजवानीला बोलवतो, घरी किंवा ऑफिसर मेस मध्ये. मेजवानीला बोलावले म्हणजे साधारण पहिला तास ड्रिंक्स व स्नॅक्स बरोबर बोलता बोलता संपतो व बाकीचे बोलणे पुढे जेवताना होते. युनिट मध्ये असलेले, लग्न न झालेल्या ज्युनियर ऑफिसरर्सचा हक्क असतो की त्याला मनात येईल तेव्हा कधीही तो लग्न झालेल्या सीनियर ऑफिसरच्या घरी कॉलऑन करू शकतो. असा कॉलऑन साधारण एक तासाचा असतो व ड्रिंक व स्नॅक्स बरोबर संपतो.
           
सैन्यातले वातावरण एकाच वेळेला ऑफिशियल व त्याच वेळेला मनमोकळेपणाचे असते. मग जर कधी कमानअधीकाऱ्याने सकाळी ऑफिसात कोण्या कनिष्ठ अधिकाऱ्याची झाड लावली तर दुपारच्या वेळेला त्या झाड पडलेल्या आधिकाऱ्याकडे कमानअधीकाऱ्याकडून निरोप येतो व संध्याकाळी ड्रिंक्स व स्नॅक्ससाठी बोलावले जाते. जो टेन्शन देतो तोच ज्याला दिले त्याचे टेन्शन कमी करू शकतो. माणसा माणसातले संबंध चांगले ठेवायचे असतील तर जो टेन्शन देतो त्याच्यावरच दिलेले टेन्शन कमी करण्याची जबाबदारी पडते. नोकरी मध्ये तर ह्या तंत्राचे अवलंबन केले नाही तर माणसातले संबंध दुरावतात व त्याचा परिणाम संस्थेच्या कामावर पडू लागतो. निमंत्रित  साधारण दिलेल्या वेळेवर हजर राहतात. वेळे नुसार व वया परत्वे नमस्कार चमत्कार होतात. थोड्या गप्पा मारल्या जातात व टाटा बाय बाय होते

            सैन्यातल्या गप्पा जास्ती करून मी जेव्हा अमुक अमुक युनिटला होतो, तू कोठे कोठे होतास- किंवा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आयएमए किंवा एनडीएच्या गोष्टी करणे. कोर्समेट्स भेटले तर काही विचारूच नका. आपण एकत्र कसे रोलिंग केले आहे हे कितीही वर्षे झाली तरी हा विषय ताजाच राहतो. हल्ली सगळेच जास्त मटेरीअलीस्टीक झाले आहेत, त्यामुळे गप्पात प्रामुख्याने काय विकत घेतले, केवढ्याला आणि माझ्याकडे काय काय वस्तू आहेत ह्याच्यातच संभाषण सुरू होते व संपते. ह्याचीच सावली सैन्यात सुद्धा पडलेली आढळते. मित्र म्हणवतो व हृदयस्पर्शी बोलणे होतच नाही हे मला गाभाऱ्यात नमस्कार करायच्या ऐवजी प्रदक्षिणेची घाई झालेल्या भक्ता सारखे वाटते. जीवनाला लागणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या विषयांवर न बोलता, बाहेर बाहेरुन विचारपूस असते त्यामुळे जीवापाडाची मैत्री जडत नाही. जीवापाडाचे मित्र आपले पूर्वीचेच शाळेतले व लहानपणाचे स्नेही असतात. मोठे झाल्यावर होतात ते फक्त आपले सहकारी.
           
ह्या व्यतिरिक्त आधीकारी व जवान, सुभेदार हे वेगवेगळ्या वेळी कामा व्यतिरिक्त भेटत राहतात. हा व्यवस्थापनाचा एक भाग आहे. त्यातच रम पंच किंवा बडाखाना समाविष्ट होतो. बडाखाना म्हणजे सहभोजन. सहभोजनाच्या दिवशी कमानअधिकारी, बाकीचे ऑफिसर्स, सुभेदार व जवान एकत्र संध्याकाळी जवानांच्या मेस मध्ये भेटतात. जवान सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात व तासा दीड तासाच्या हा कार्यक्रम सहभोजनाने संपतो. हिच गोष्ट रम पंच मध्ये असते, फक्त भोजनाचा भाग नसतो त्यात. त्यामुळे कधी कधी जेव्हा वेळ नसतो तेव्हा रमपंच करतात. सैन्यात दारू पिणेहा लपून छपून करण्याचा प्रकार नाही. रमपंच मध्ये जवान, सुभेदार व अधिकारी आपआपला हुद्दा बाजूला ठेवून जवानांबरोबर मिळून मिसळून दारू पितात. धुंद येथमी स्वैर झोकितो मद्याचे प्याले ह्या बाबूजींच्या गायिलेल्या भावगीता मधूनचे भाव सैन्य खरोखरीच यतार्थ करते. पण तरी सुद्धा सैन्यात काही कोणाला दारुडे किंवा दारू पिऊन तर्र् होणारी मंडळी सापडणार नाहीत. सैन्यात मद्य वाईट मानली गेलेली नाही व तिचे सेवन सुद्धा अतिरेकी पद्धतीने होत नाही. युनिट मध्ये कधीही पिऊन दंगा झाला असे चित्र दिसत नाही. प्रत्येकाला कळते कोठे थांबायचे ते. सात्त्विक, राजस तामस भावांमध्ये मद्य हे तामसी समजले जाते. तिचे सेवन करण्याने तामसी भावना जागृत होते. सैन्य हे देशाच्या रक्षणासाठी असते. त्याचा धर्म युद्ध करणे व युद्धासाठी तयार राहणे हा आहे. युद्धासाठी लागणारी तामसी वृत्ती सैन्यात जर जोपासली नाही तर युद्धाच्या वेळी अर्जूना सारखी दशा होईल व आपण गलितगात्र होऊन आपल्या राष्ट्राला धोक्यात घालू. युद्धाला पोषक तामसी वृत्ती लागते त्यामुळे दारू सैन्यात निषिद्ध मानली जात नाही.


(क्रमशः)

Monday, August 1, 2016

राजाराम सीताराम एक.............शेवटचे काही दिवस..........भाग १८

शेवटचे काही दिवस

हे आमचे आयएमएतले शेवटचे सत्र. ह्या सत्रात नवीन अभ्यासक्रम. त्यात प्रामुख्याने १० माईल रनिंग, बॉक्सिंग, OTCT, शंभर मीटर धावणे आणि विविध आर्मस्च्या प्रात्यक्षिकाच्या आधाराने माहिती. अजून महत्त्वाचा भाग म्हणजे वेगवेगळे मिलिटरी इतिहास सादर करणे. हे सादरीकरण आम्हा जिसीजना करायचे असायचे. त्या निमित्ताने सैनिकी इतिहास वाचला गेला. ह्यात प्रामुख्याने दूसऱ्या महायुद्धातल्या लढाया, फील्ड मार्शल स्लिम चे बर्मा युद्ध, फील्ड मार्शल डेझर्ट फॉक्स रोमेल ह्याचे युद्ध कावे व दूसऱ्या महायुद्धात भारताचा सहभाग.

ओटीसीटी म्हणजे ऑब्स्टॅकल ट्रेनिंग एन्ड कॉन्फिडन्स ट्रेनिंग. ह्यात विविध प्रकारचे ऑब्स्टॅकल्स पार करायचे ट्रेनिंग देतात. सुरवातीला ऑब्स्टेकल बघून घाबरायला व्हायचे पण  करून करून आत्मविश्वास वाढला. एकट्याने करायचे असते तर घाबरायला झाले असते पण सगळेच करतात म्हटल्यावर जिसीज मध्ये धैर्य येते. ग्रुपमध्ये असताना धैर्याचे कवच येते. एकट्यात घाबरणारी व्यक्ती समूहात कमी घाबरते. एक प्रकारच्या सांघिक शक्तीचा प्रत्यय येतो. ह्याच कवचाचा प्रत्येय, सीमेवर जेव्हा दिवस रात्र पाळत ठेवली जाते तेव्हा येते. ह्याच सांघिक शक्तीचा प्रत्यय लाइन ऑफ ऍक्शन वर लॉन्ग रेंज पेट्रोलींग किंवा ट्रान्सबॉर्डर पेट्रोलींग मध्ये सैनिकांना येतो. ह्याच सांघिक धैर्याचा प्रत्यय ज्यू लोकांना ग्रुपने कॉनसनट्रेशन कँपला नेताना व्हायचा. सांघिक शक्ती धैर्य वाढवण्यात कशी यशस्वी होते त्याचा प्रत्यय इतिहास शिकताना येतो. ओटीसीटी करून करून ऑब्स्टॅकल ट्रेनिंग अंगवळणी पडते. तरी सुद्धा प्रत्येक वेळेला ओटीसीटी रेंजच्या स्टार्टींग पॉइंटवर उभे राहिल्यावर पोटात गोळा यायचा. पण एकदा सुरू झाले की २० मिनटात संपते ह्या करून करून मिळालेल्या माहिती मुळे आपल्याला हा त्रास फक्त २० मिनटेच सोसायचा आहे हे मनात ठरवून ओटीसीटी करायचो. पण त्या २० मिनटाच्या अग्निपरीक्षेनंतर इतका आनंद मिळतो खरे तर हायसे वाटते कुठे दुखापत झाली नाही त्याची. हिच गोष्ट बॅटलड्रेस मध्ये रायफल घेऊन पंचवीस मिनटात पाच किलोमीटर पळण्या मध्ये प्रत्ययास येते. सैन्य आधीकाऱ्याचे प्रेसीडेंशीयल कमिशन मिळाल्यावर आम्हाला आर्मी मध्ये हे नेहमी करावे लागते. वर्षात एकदा त्याची परीक्षा होते, वर्ष भर सकाळच्या पिटी परेडला त्याची प्रॅक्टिस करावी लागते. आज वीस  वर्षाने सुद्धा पाच किलोमीटर पळायच्या आधी असेच मनात येते. नको ती भयंकर गोष्ट. पण लागलीच हा त्रास फक्त पंचवीस मिनटेच सोसायचा आहे हे मनाला पटवून ती पंचवीस मिनटे संपवतो. आपल्या आयुष्याचे पण असेच असेल का?

बॉक्सिंग हा एक खेळ असा आहे की त्यात तुम्हाला ठोस्यास ठोसा मारावाच लागतो. बाकीच्या खेळात कसे जर दमलो तर किंवा खेळात विरुद्ध खेळाडू पेक्षा कमी पडायला लागलो तर जास्तीत जास्त काय होते तर आपण हरतो. बॉक्सिंग मध्ये दमलो व विरुद्ध खेळाडू पेक्षा कमी पडायला लागलो तर हरण्याबरोबर जबर मुक्के पण सोसावे लागतात. जर मार नको असेल किंवा मुक्के चुकवायचे असतील तर एकच उपाय ठरतो व तो म्हणजे आपल्या विरुद्ध खेळणाऱ्याला मारत राहा, कमीत कमी ठोस्यास ठोसा तरी द्या. बॉक्सिंग मध्ये किलर इन्स्टिंक्टचा उपयोग सर्वात जास्त होतो. ह्याच कारणास्तव आयएमएत हा एक खेळ सगळ्यांना खेळावाच लागतो. बाकीच्या खेळात प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर भाग घ्यायचा की नाही हे प्रत्येकाने ठरवायचे असते. पण बॉक्सिंग प्रत्येकाला खेळावाच लागतो. ह्या बॉक्सिंगची अजून एक मजा आहे. आधी कितीही दोघा खेळाडूने ठरवले की एकमेकांना कमी मारायचे म्हणजे दोघांना कमी लागेल. पण हे सगळे ठरवलेले पाहिल्या ठोशात संपते. एकदा का दोघांपैकी एकाने दुसऱ्याला ठोसा मारला, की बॉक्सिंग रिंगच्या बाहेर ठरवलेले सगळे विसरले जाते व एक दुसऱ्याला ठोसे मारण्याचा खेळ सुरू होतो. त्यामुळे अगदी हरणार सुद्धा ठोसे द्यायला शिकतो. एका जिसीची मानसिकता घडवण्यात ह्या खेळाचा प्रभाव मोठा असतो. युद्धात किलर इनस्टिंक्ट खूप महत्त्वाचे असते. मी कमी पडतो, मी हरतो असे म्हणून चालत नाही, किती तरी वेळेला युद्धात परिस्थिती विपरीत असताना किलर इन्स्टिंक्ट मुळे पारडे आपण उलटवू शकतो.   

रॅगिंग घेण्याचा अलिखित नियम म्हणजे हा मान फक्त अपॉइंटमेंट धारकांनाच असतो. त्यामुळे रॅगिंग मध्ये सुद्धा एक तंत्र असते. एक जबाबदारी असते. उगाच काहीही मनात आले व करायला लावले असे नसते. ज्यूनीअरर्स येण्या आधी, कॅप्टन गिलने आम्हाला ही जबाबदारी समजून सांगितली. रॅगिंग घेताना कोणा ज्यूनीअरर्सला मारहाण करायची नाही. कोणालाही हात लावायचा नाही. जे रॅगिंगचे प्रकार आमच्या सिनीअर्सने घेतले त्या व्यतिरिक्त काही करू नका म्हणून बजावले. आम्ही रॅगिंग भोगली असल्या कारणाने आम्हाला मर्यादा चांगल्या माहीत होत्या. आम्ही नव्या जिसींची आतुरतेने वाट बघायला लागलो.

आमचे शेवटचे सत्र सुरू झाले व लवकरच नवीन मुले आयएमए व ओघाने आमच्या प्लटून मध्ये दाखल झाली. त्यांचे केविलवाणे चेहरे बघून मला माझे सुरवातीचे दिवस आठवले. आज वीस वर्षाने सुद्धा आयएमए व त्यातल्या रॅगिंगची आठवण करून देणाऱ्या दोन गोष्टी मनात घोळतात. त्या वेळेला कयामत सें कयामत तकहा पिक्चर बेफाम चालला होता. त्यातले हम भी अकेले तूम भी अकेले मजा आ रहा हैहे गाणे आमचे रॅगिंग चाललेले असायचे तेव्हा सीनियरच्या खोलीत लागलेले असायचे, त्यामुळे ते गाणे मनात कायमचे कोरले गेलेले आहे. कोठेही लागले की त्यातला रोमांन्स बाजूला राहतो व संध्याकाळ झाली आहे व आमच्या बॅरॅक मधल्या अंगणात आम्ही पट्टी परेड किंवा कोणतातरी रॅगिंगचा प्रकार करत आहोत असे वाटायला लागते व आजूबाजूचे वातावरण आयएमएचे होऊन जाते. आता कधीही कयामत सें कयामतमधले हे गाणे लागले की मला त्यातला रोमांन्स सोडून रॅगींगच आठवते. काही गाणी आपल्या लक्षात राहतात ती त्या वेळच्या आपल्याला भावलेल्या व  मनात भिडलेल्या गाण्यांबरोबरच्या आठवणींमुळे. गाणे तेच पण त्या गाण्याशी निगडित प्रत्येकाच्या आठवणी वेगवेगळ्या. खूप वर्षाने असे मनाला भावलेले गाणे लागले की त्याच्या बरोबर जडलेल्या आठवणींना उजाळा मिळतो. ती गाणी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात. तेजाबकयामत सें कयामत तकची गाणी लागली की मला आयएमएतल्या दिवसांची आठवण येते. दुसरी आठवण करून देणारी गोष्ट म्हणजे ओल्डस्पाईसचे आफ्टर शेव लोशन. एकदा आयएमएची आठवण झाली की लागलीच मनाच्या नाकातून ओलांडा स्पाईस आफ्टर शेव लोशनचा वास भरायला लागतो. त्यावेळी आयएमएत बहुतेक सर्व हाच आफ्टर शेव लोशन वापरायचे. कारण हाच ब्रॅन्ड त्या वेळेस प्रसिद्ध होता व सहज मिळायचा. अजूनही दूरवरून जरी ओलांडा स्पाईसचा वास आला तरी मला ते तुम भी अकेले हम भी अकेले और रॅगिंग मे मजा आ रहा हैहे गाणे आठवते. रॅगिंगचा भाग प्रत्येक जिसीच्या मनात कायमचा कोरला गेलेला असतो, पण इतक्या वर्षाने अशा शास्त्रोक्त पद्धतीने घेतलेल्या रॅगिंगचे अप्रूप वाटते. माणूस घडायला किती उपयोगी पडले हे आठवून बरे वाटते.

आयएमएत रायडींग आहे, पोहणे आहे, नित्य व्यायाम आहे, मेस एटीकेट्स आहेत, हल्लीच्या मॅनेजमेंट टेक्निक्स मध्ये शिकवले जाणारे सॉफ्टस्किल्स् आहेत, वेगवेगळे हॉबिक्लबस् आहेत. ह्या सगळ्याने जिसीची परसनॅलिटी डेव्हलप होते, ह्याच बरोबर त्याची अभिव्यक्ती फुलण्या मागे निश्चितच रॅगिंगचा भाग आहे.  प्रत्येक नव्या येणाऱ्या जिसीला रॅगिंगची कल्पना होती, फक्त किती व केव्हा होते ते माहीत नव्हते. नाही म्हणायला सुब्बू सारखी काही सॅम्पल्स बघायला मिळाली. सुब्बूने आल्या आल्या एका सीनियरला त्याचे ऑफिस कोठे आहे म्हणून विचारले होते. अभियांत्रिकी करून महाशय आयएमएत दाखल झाले होते. मनात शंका बऱ्याच होत्या. सिनीयर्सने रॅगिंग घेऊन सुब्बूचे सर्व डाऊट्स व्यवस्थित क्लियर केले.  नव्या मुलांचे सत्र सुरू झाले व आमचे सत्र पुढे सरकत होते. जिसी विनीत सिंग ने पॅरामेडल जिंकले होते. पॅरामेडल जिंकणारा आयएमएचा हीरो असतो. पॅरामेडल जिंकण्यासाठी आयएमएतले जिसी महिनाभर मेहनत करतात. पॅरामेडलच्या चुरशीत पहिल्या भागात पूर्ण बॅटल ऑर्डर मध्ये दहा मैल म्हणजे सोळा किलोमीटर क्रॉसकंट्री रेस असते. ती झाल्या झाल्या ओटीसीटी रेंज वर पूर्ण ओटीसीटीची कवायत पूर्ण करायची, तिसऱ्या भागात त्याच बॅटल ऑर्डर ड्रेस मध्ये शंभर मीटर पोहायचे व चवथ्या भागात त्या ओलेत्याने फायरिंग रेंजवर जाऊन फायरिंग करायची. प्रत्येक भागाचे मार्क व वेळ जोडून पहिल्या येणाऱ्याला पॅरामेडल मिळते. आमच्या कोर्स मध्ये ह्या मेडलचा मानकरी जिसी विनीत सिंग होता. पुढे तो पॅरा कमांडोत गेला.

ह्याच सुमारास आम्हाला आर्मीतल्या वेगवेगळ्या आर्मास् बद्दल माहिती द्यायला सुरवात झाली. फायटिंग आर्मस् कोणत्या त्या सांगितल्या व आम्हाला निवड करायला सांगितली. आम्ही प्रत्येकाने आम्हाला आवडणाऱ्या आर्मस् साठी अर्ज केले. अमितचा पेरंटेल क्लेम होता त्याने त्याच्या वडलांची युनिट मिळावी असा अर्ज केला. आर्मी मध्ये पेरंटल क्लेमला खूप महत्त्व आहे. त्यामुळे त्याला ती मिळणार हे जवजवळ निश्तितच होते. पेरंटल क्लेम मुळे रेजीमेंटबद्दलची आस्था धृढ होत जाते. आपले वडील ह्याच पलटनीत होते. ह्यातल्या जवानांबरोबर आपण लहानपणी खेळलो असल्या कारणाने आपण सगळ्यांना ओळखतो. अशा पलटनीत जाणे म्हणजे आपल्या घरीच जाण्यासारखे वाटते.

(क्रमशः)

Tuesday, May 17, 2016

राजाराम सीताराम एक ..................भाग १७.............. मुंबईचा मित्र


 

ह्या आधीचे............आस्थेचे बंध

 

........आम्ही खोटेखोटे चेहऱ्यावर हसू आणायचा प्रयत्न केला. पण घरी जाऊ देणे त्या ऐवजी बिअर पाजणे हे माझ्या कोठल्याच कोष्टकात बसत नव्हते. सुनील खेर बाकीच्या शिक्षा भोगणाऱ्या जिसीजना बरे वाटले आता त्यांच्या बरोबर पहिल्या सत्राचे कोणीच सुट्टीत घरी जाणार नव्हते.

 

 

मुंबईचा मित्र

 

आम्ही पहिल्या सत्राचे उरलेले दिवस रेटायला लागलो. खूप कठीण जात होते. मी मनाने कधीच घरी पोहोचलो होतो. त्यामुळे जीव रमत नव्हता, इतके दिवस घरी जायची वाट बघितली घरीच जायला मिळाले नाही त्याचे दुःख जास्ती. पहिल्यांदाच माहीत असते तर मनाची तयारी  केली असती. मनाला समजावणे आता खूप कठिण झाले होते. पण नाईलाज होता. कधी कधी पर्याय असणे हा शाप ठरतो नाईलाज हा फार मोठा वर ठरतो. पर्याय असण्याने चुकीची निवड होऊ शकते आपण निवड केली त्या पेक्षा दुसरी निवड सरस ठरली तर? असे मनात नेहमी येत राहते. त्या पेक्षा जर नाईलाज असेल तर निवड करायची जरूर नसते जे आहे तेच भोगू त्यातच आनंद मानू असे मनोबल तयार होते. तेवढ्यात मला आशिष कार्लेकरचे पत्र आले. आशिष कार्लेकर माझा रुईया कॉलेज मधला मित्र. आर्मीच्या सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड जे एसएसबी म्हणून प्रसिद्ध आहे त्यासाठी आम्ही दोघे एकत्र भोपाळला गेलो होतो. आमच्या बॅच मध्ये चाळीस पोरं आली होती. हे सिलेक्शन आर्मी, नेव्ही, एअरफोर्सला जाऊ इच्छुकांना देणे जरूरीचे असते. निवड प्रक्रिया चार दिवसाची असते. पाहिल्या दिवशी सायकॉलॉजीकल परीक्षा असतात. छान असतात. त्यात वेगवेगळी चित्र पटापट पडद्यावर प्रदर्शित करतात. प्रत्येक चित्र जेव्हा प्रदर्शित होते तेव्हा दहा सेकंदात त्या चित्राला पाहून मनात काय आले ते कागदावर लिहायचे असते. एका मागून एक खूप चित्र दाखवतात. विचार करायला वेळ राहत नाही आपल्या मनाची स्थिती जशी असेल त्या प्रमाणे आपण चित्रा संबंधी लिहायला लागतो. आपल्या मनात काय चालले आहे ते तज्ञ बरोबर ओळखतात. त्या नंतर काही सिचुएशन्स रेखाटलेले असतात अर्धी गोष्ट आपल्याला पुरी करायची असते. ह्या अशा विविध परीक्षांमधून आलेल्या पोरांची मानसिकतेचा अभ्यास करतात. त्यांना विशिष्ट प्रकारची मानसिकता हवी असते. काहींची आत्महत्येची सुप्त प्रवृत्ती असते. काही निराशावादी असतात. काहींच्याकडे आपलेपणा नसतो. आलेल्या मुलांमध्ये साहस, एकदूसऱ्याला घेऊन पुढे जायची मानसिकता, नेतृत्व गूण, ध्येयसिद्धीचा अट्टहास अशा सारखे गूण शोधण्याचा प्रयत्न होतो. दुसऱ्या दिवशी ग्रुप डिस्कशन ग्रुप टास्क्स असतात. ग्रुप टास्क्स मध्ये अगदी सोपे सोपे टास्क देतात. वेळ दहा मिनिटे दिलेली असतात. ग्रुप टास्क ऑफिसर मग लांब राहून फक्त त्या ग्रुपला न्याहाळतो. तो ग्रुप तो टास्क दहा मिनिटात कसा सोडवतो, त्या ग्रुप मध्ये नैसर्गिकरीत्या कोण नेता म्हणून उभरतो. ग्रुपमधल्या मुलांचे टीम स्पिरिट कसे आहे, एकमेकांशी कसे नाते बनते हजार गोष्टी. तिसऱ्या दिवशी पॅनल इंटरव्युव असतो. चवथ्या दिवशी निकाल जाहीर करतात. आमच्या त्या चाळीसच्या बॅचचा निकाल देण्याआधी सिलेक्शन बोर्डाच्या प्रेसिडेंट ने छोटेसे भाषण दिले होते. म्हणतो आर्मीसाठी अधिकाऱ्यांचे सिलेक्शन एका विशिष्ट प्रकारे केले जाते. आम्हाला एक विशिष्ट प्रकारची मानसिकता असलेले होतकरू पाहिजे असतात त्यावर आधारीत आमची निवड प्रक्रिया असते. त्यामुळे ह्या प्रक्रियेत ज्यांचे सिलेक्शन होत नाही त्यांनी त्यांच्यात काही कमी आहे असे वाटून घेऊ नाही. ह्या एसएसबी सिलेक्शनला अमिताभ बच्चन पण आला होता तो सिलेक्ट होऊ शकला नव्हता. आज बघा तो कोठे आहे. आम्हाला येथे जसे बुद्धू मुले नको तसे खूप बुद्धिमान मुले पण नको असतात. आम्ही लिडरशीप क्वालिटी, टीम मध्ये बसणारा, शरीर मनाने कठोर असलेली ऍव्हरेज इंटलीजन्सची मुले शोधत असतो. त्यामुळे ज्यांची निवड होत नाही त्यांनी वाईट वाटून घेऊ नये ज्यांची निवड होते त्यांनी असे वाटून घेऊ नये की ते कोणी आईन्स्टाईन आहेत. असे म्हणत त्याने निकाल जाहीर केला. आमच्या चाळीस जणांच्या ग्रुप मधून आठ जणांची निवड झाली होती. काही काही चाळीस चाळीस मुलांचे ग्रुप्स निवड होताच परत पाठवले जातात. पास झालेल्या आठात मी होतो, आशिष कार्लेकर बाकीच्या बत्तीस मधला एक होता. पुढे मी आयएमएत जेव्हा रगडा खात होतो तेव्हा आशिष बंगळूरच्या आय आय एम मध्ये मॅनेजमेंट शिकत होता.

 

पहिल्या सत्राच्या शेवटच्या आठवड्यात तो मला भेटायला येणार असे पत्र आले. त्याला माझ्या बरोबर दोन दिवस राहायचे होते. पण आयएमएत असे काही करता येण्या सारखे नव्हते म्हणून तो डेहराडूनला हॉटेलात उतरला. रविवार होता, मला भेटायला सकाळीच आला. मला जेवढे जमले तेवढे त्याला आयएमएचे दर्शन करून आणले. माझी प्लटून दाखवली. प्लटून मागे खूप मोठी लिचीच्या झाडांची बाग होती. लिची हे फळ आयएमएत येण्या आधी कधी खाल्ले नव्हते. पण लांबच लांब पसरलेल्या लिचीच्या बागांतून लिची तोडून खायला केव्हा आम्ही लागलो ते समजलेच नाही. ती लिचीची बाग आमच्या प्लटूनच्या जिसीज साठी विशेष होती. त्या लिचीच्या बागेच्या एका कोपऱ्यात एक चोर वाट होती जी जंगलातून डेहराडून गावाजवळ असणाऱ्या घंटाघराजवळ उघडायची. चोरावाटेने मध्येच राजापूर रस्त्या पर्यंत सरळ पोहचता यायचे. त्यामुळे त्या चोरवाटीचे आम्हाला आकर्षण होते. मी कधी गेलो नव्हतो पण कधीकधी कोणी गेले होते असे ऐकिवात होते. रविवारच्या लिबर्टीची वेळ संध्याकाळी आठला संपायची. एखाद दुसऱ्या जिसीला उशीर झाला तर तो ह्या चोरावाटेने लपतछपत आल्याच्या गोष्टी आम्ही प्लटूनकर ऐकायचो. पण ह्या वाटेने अडचण अशी होती की ह्या वाटेने सायकलने नाही येता यायचे. कारण त्यात छोटी टेकडी चढून यावे लागायचे घनदाट झाडी असायची. ह्या झाडीला आम्ही १४ प्लटून जंगल म्हणायचो. त्यामुळे एखाद दुसरा उशीर झालेला प्लटून चवदाचा जिसी अशा गुप्त वाटेने आल्यामुळे शिक्षेतून सुटायचा. आयएमचे रेजिमेंटल पोलीस क्वचितच त्या रस्त्याला असायचे. आमच्या प्लटूनचा हा गुप्तमार्ग वारसाहक्क होता. लिचीची बाग आम्हा चवदा प्लटूनकरांना ह्याच कारणास्तव  फार जवळची होती. बाग दाखवून झाल्यावर, त्याला मी चेटवोडची बिल्डिंग परेड ग्राउंड दाखवले. बिल्डिंग बघून तो भारावून गेला. आम्ही भेटलो तेव्हा जाणवले, त्याला आयएमएत येता आले नाही त्याची खंत उराशी अजून बाळगून होता.  खरे तर तो आय आय एम मध्ये शिकत होता. लवकरच कोर्स संपल्यावर कोठल्या तरी कंपनीत लठ्ठ पगारावर लागणार होता हे निर्विवाद होते. पण कोणाचा जिव कशात असतो त्यातच तो घुटमळतो. हल्ली तो गेली बरीच वर्षे अमेरिकेत कोठेतरी कंसलटंट म्हणून आहे. बक्कळ मिळवले आहे, पण मधून मधून आर्मी मध्ये नसण्याची आठवण येते त्याचे जड झालेले मन दिसून येते.

 

हमदोनो, संगम, सात हिंदोस्तानी, हिमालय की गोद मे, संगम, विजेता, रंग दे बसंती, बॉर्डर असल्या चित्रपटाने जे ग्लॅमर लष्कर अधिकऱ्याला चिकटवलेले आहे त्याने बरीच लोक मोहित होतात. चित्रपटातून सेनाधीकाऱ्याचे जे जीवन रेखाटलेले असते ते पाहून बऱ्याच जणांना ही जीवन पद्धती फार लुभावणारी वाटते. बऱ्याच जणांना आर्मीचा गणवेश भयंकर आवडतो. त्या ओजी गणवेषावर जाड पट्टा इतका उठावदार दिसतो. लोकांना फार आवडतो. ह्या दिसणाऱ्या ग्लॅमरला दिसणाऱ्या पण समजून घ्यायच्या त्याग बलिदानाच्या झालरीने सैनिकांची नोकरी आकर्षक वाटते. ती फील्ड मधली पोस्टिंग, नावा पुढे लागणारी पदाची बिरुदावली, युद्ध होते तेव्हा थोड्या वेळे पुरते जवानाला मिळणारा संपूर्ण देशाचा पाठिंबा प्रसिद्धी, ह्या सगळ्या गोष्टी ग्लॅमर वाढवतात काहींना सेनेकडे आकृष्ट करतात. आशिष कार्लेकर सारख्याना सैन्यात जायचे राहून गेले ह्याचे जन्मभर वाईट वाटत राहते. 

 

रविवारचा पूर्णं दिवस त्याच्या बरोबर काढायचा असे ठरवून, उशीर झाला गरज पडलीतर लिचीच्या बागेतल्या गुप्त मार्गाने यायला सोपे जावे म्हणून बरोबर एक सिव्हिल ड्रेस घेतला. खरे तर मी कधी असले प्रकार केले नव्हते पण त्या दिवशी कसे सुचले फार विचार करता कसा काय नियम तोडण्याचा निर्णय घेतला कळलेच नाही. कधी कधी काही निर्णय क्षणात घेतले जातात. नेहमी नियमांचे पालन करणारे क्वचित जर वाटे वरून घसरले तर लागलीच तोंडघशी पडतात. घंटाघर, क्लेमेन्ट टाऊन, राजापूर रस्ता असे गावात त्याच्या बरोबर पायी हिंडल्यावर, कुमार स्विट्स मधून पाणीपुरी खाल्ली. संध्याकाळचे सहा वाजत आले होते. माधुरी दीक्षितांचा तेजाब पिक्चर रिलीज झाला होता. आम्ही तो बघितला. पिक्चर संपायला रात्रीचे नऊ वाजले होते. आता त्या गुप्त वाटे खेरीज गत्यंतर नव्हते. मी त्याच्या हॉटेलच्या रूमवर जाऊन मुफ्ती ड्रेसच्या ऐवजी सिव्हिल ड्रेस चढवला, त्याचा निरोप घेतला भरल्या मनाने परतीच्या मार्गाला लागलो. राजपूररस्त्याच्या गुप्त मार्गाच्या वळणावर क्षणभर सगळीकडे नजर टाकली, रेजीमेटल पोलीस नाही असे बघून पटकन चवदा प्लटूनच्या जंगलात पसार झालो. भयंकर घाबरलो होतो, जंगलाला नाही, तर आपल्याला असे पकडू नये कोणी म्हणून. मार्ग काही छोटा नव्हता, साधारण तीन किलोमीटरचा जंगलातून जाणारा मार्ग. दूरवर जसे मॅकटीला कंपनीचे दिवे दिसायला लागले तसा जिवात जीव आला. आता लिचीची बाग जवळच. हळूच तारेचे कुंपण ओलांडून मांजराच्या पावलाने मी लिचीच्या बागेत पाऊल टाकले, मागून कोणीतरी ओरडले. "ये जिसी सावधान". मला समजले. रेजीमेंटल पोलीस अर्थात आर-पी ने पकडले. आपण कधी कधीच असले करायला जातो, नेमके पकडले जातो, बाकीचे आरामात सगळे नियम धाब्यावर बसवून सर्रास जगतात त्यांना काहीच कसे होत नाही ह्याचे कोडे मला आज पर्यंत सुटले नाही. कधीतरीच सिग्नल तोडला जातो पोलीस पकडतो. मध्यम वर्गाचे हे लक्षणच आहे असे दिसते. खूप श्रीमंत नियम धाब्यावर बसवतात, खूप गरीब लोकांना नियमांचा उपयोग नसतो. रेजीमेंटल पोलीस ने पकडल्यावर व्हायचे तेच झाले, दुसऱ्या दिवशी पासून मी पाच दिवसाच्या रेस्ट्रिकश्नस् वर रुजू झालो. हा सगळा गोंधळ माधुरी दीक्षित मुळे झाला असे अजून सुद्धा मी समजतो. म्हणजे माधुरी दीक्षित नेमका मी आयएमएत असतानाच तिचा पहिला हिट पिक्चर देते, तो नेमका त्याच आठवड्यात डेहराडूनच्या थेटरात लागतो नेमका मी उशीराचा शो बघून, माधुरीच्या माधुर्याने चढलेल्या नशेला रेजिमेंटल पोलिस ने पकडून नशा उतरवावी. चांगल्या गेलेल्या दिवसावर पाणी फेरले गेले. फजितीच झाली. तसे पाहिले तर माधुरीने मी एकदमच आमचे करिअर सुरू केले होते. तिने ज्या वर्षी तेजाब पिक्चर दिला, त्याच वर्षी मी आयएमएत दाखल झालो. आता ती अमेरिकेत असते मी कर्नल आहे पण कधी भेट झालीच तर मला मिळालेल्या रेस्ट्रिकश्नस बद्दल तिच्याकडे तक्रार करणार आहे. माझ्या शिक्षेचे पाप तिच्या माथ्यावर फोडणार आहे.

 

आज त्या गोष्टीला २५ वर्षे झाली. जेव्हा आयएमएत होतो तेव्हा एव्हढा एकच पिक्चर आय एम बाहेर जाऊन चोरून बघितला. त्या वेळचे ते एक दो तीन .. .. ..हे गाणे आवडले होते. माधुरीला बघताना हृदयाचा ठोका चुकला होता. त्या वेळचे आयएमए, तिचे गाणे, तो मित्र हे सगळे इतके मनात खोलवर रुतले आहे की अजूनही कोठे ते गाणे लागले तरी डोळ्यात चमक येते हृदयाचा ठोका चुकतो.

 

माझी बायको नेहमी म्हणते माधुरीचे नाव कानावर पडले की ह्याचे डोळे चमकतात. आपल्या आयुष्यात कोणी असे येऊन जाते की त्यांचे नाव उच्चारले गेले की डोळ्यात चमक येते. कधी ती माणसे कोठच्या तरी प्रसंगाने लक्षात राहतात, कधी त्यांच्यामुळे आपल्या आयुष्याला चांगली कलाटणी मिळालेली असते, कधी काही प्रसंगामुळे आपण त्यांच्या जवळ जातो किंवा त्या व्यक्तीच्या विचारांच्या जवळ जातो.  कधी कधी भेटलेल्या व्यक्तीचे आपले मनाचे धागे जोडले जातात असे जोडले जातात की आपण बरेच वर्षात जरी भेटलो नाहीतरी, त्या व्यक्तीची आठवण मधून मधून डोकावते. ह्यालाच म्हणतात नाते. नाहीतर ह्या धरतीवर सर्व एकटेच येतात आणि एकटेच जातात. पण काही माणसे आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडून जातात. काही जण आपल्या आयुष्यात एका घटने पुरती येतात असे काम करून जातात की आपण जन्मभर त्यांना विसरू शकत नाही. आपले आयुष्य जगताना आपल्यालाही असे कोणाच्या आयुष्यात येण्याचा योग असतो. आपल्याला भेटलेल्या चांगल्या व्यक्तींना आपण कधी देव माणूस म्हणतो, मित्र म्हणतो, सखा म्हणतो, हितचिंतक म्हणतो किंवा अजून काही. नात्याला काहीही नाव द्या. डोळ्यात चमक आणणाऱ्या अशा व्यक्ती सारखे आपणही एखाद्याच्या आयुष्यात त्यांना आवडणारा त्यांचा लुकलूकणारा तारा बनू शकू का? नकळत बनतही असू. 

 

असे तसे करत दोन जिसींना वगळून आमचा संपूर्ण कोर्स पहिल्या सत्रात पास झाला आम्ही दुसऱ्या सत्रात दाखल झालो. सुट्टी मात्र मिळाली नाही. घरी जाता आले नाही. आमच्या बरोबरचा एक जिसी रघुनाथ, मंकी रोप करताना पडून हात तुटल्यामुळे परीक्षा देऊ शकला नाही रेलिगेट झाला. हरबींदर वेळेत पोहणे शिकला नाही पोहण्याच्या परीक्षेत नापास झाला. तोही रेलिगेट झाला. त्यांना हेच सत्र पुनः करावे लागणार होते.  नवे सत्र जोमात सुरू झाले. आम्ही सीनिअर झालो. आमच्या डोक्यावर कोणी सीनियर जिसी नव्हते, त्यामुळे बराच रगडा कमी झाला. नवीन बकरे यायला एक आठवडा होता, आम्हाला कॅप्टन गिलने सीनियर्स च्या अपॉइंटमेंट्स दिल्या. परितोष शहा जेयुओ झाला, मी कॉर्पोरल, अमित बटालियन अंडर ऑफिसर, करिअप्पा बटालियन चा शोभित राय ऍकॅडमी अंडर ऑफिसर झाला होता. सुब्बूला कोणतीही अपॉइंटमेंट मिळाली नव्हती. अपॉइंटमेंट म्हणजे जास्त काम. अशा प्रत्येक प्लटून मधून ओएलक्यू परीक्षेतल्या मेरिट वर आधारीत एक दोन अपॉइंटमेंट धारकांना त्याच प्लटून मध्ये ठेवले जाते. ज्युनीयरर्स आले की आम्हाला जसे सिनियर्सने, मारून मुटकून आयएमएत राहण्या जोगे बनवले तेच काम आता ह्या अपॉइंटमेंट धारकांना करावे लागणार होते. काम खूप पण रॅगिंग घेण्याची मजा. ज्यांना अपॉइंटमेंट मिळाली नाही असे बाकीचे जिसी, वेगवेगळ्या बटालियन्स प्लटून्स मध्ये वाटले गेले. आम्ही जेव्हा दुसऱ्या सत्रात दाखल होत होतो, त्याच सुमारास आमचे सीनियर्स पासिंग आऊट परेड होऊन सैन्यातील आधीकारी म्हणून वेगवेगळ्या आर्मी युनिट्स मध्ये रवाना झाले. त्यांनी मोकळ्या केलेल्या खोल्या आता आम्ही घेतल्या.

 

(क्रमशः)