१५
ऑगस्टला प्रधान मंत्री नरेंद्र मोदी ह्यांनी लाल किल्ल्यावरून स्वच्छ भारत अभियानाची
घोषणा केली व त्वरित त्याची अंमलबजावणी सुद्धा झाली. आपण सगळे आजूबाजूच्या गलिच्छ परिसराला
कंटाळलो आहोत. आपल्या देशातल्या सार्वजनिक जागा किती गलिच्छ आहेत त्याचा अंदाज सर्वांनाच
आहे. सगळ्यांना स्वच्छता हवी आहे. आपोआप झाली तर बरेच पण स्वच्छता आपोआप काही होत नाही.
दूरचित्रवाणी
व रेडिओ वरून स्वच्छ भारत अभियानाने म्हणावा तसा जोर पकडलेला नाही हे समजते ह्याचे
सगळ्यात मोठे कारण पिढ्यांपिढ्यांची घाणेरड्यात राहायची सवय. त्यातून वैयक्तिक स्वच्छता
फक्त काय ती राखायची बाकी सगळीकडे घाण व उकिरडा. घराबाहेर सार्वजनिक
जागांवर घर स्वच्छ करून उकिरडा फेकणे हा कार्यक्रम गेली अनेक वर्षे आपण राबवत आलो आहोत
त्या मुळे सगळीकडे उकिरडाच उकिरडा दिसतो.
इतक्या
पटकन अशी घाणेरडी सवय कशी जाणार? उकिरडा, गलिच्छता व
घाणीबद्दलच्या संवेदना
बधिर होऊन गेल्या आहेत. अगदी शिकलेले लोकंपण आपले घर झाडून कुंपणा बाहेर रस्त्यावर
केर ढकलून देतात. बंगळूरला तर साठलेला कचरा प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून घराबाहेर रस्त्यावर
ठेवतात, दरवाजाला अडकवतात किंवा घराबाहेरच्या झाडाला टांगतात! महानगरपालिकेचा कचरावाला घेऊन जाईल अशी अपेक्षा.
कचरावाला काही रोज येत नाही व टांगलेल्या व ठेवलेल्या पिशव्या रस्त्यावरची मोकाट कुत्री
फाडून कचरा सगळ्याभर करतात. सकाळी आपल्यासकट आजूबाजूचे रहीवाशी महानगरपालिकेला नावे
ठेवतात.
स्वच्छता
अभियान एक पिढिभर तरी राबवले पाहिजे तरच काय तो फरक दिसायला लागेल. नाहीतर थोड्या दिवसाने
परत तशीच सगळीकडे - घाण. स्वच्छता अभियानात काही गोष्टी आपण सर्वाने केल्या तर काही
प्रमाणात तरी फरक पडेल. स्वच्छते बरोबर कचरा कमी करणे व उकिरडा न पसरवण्यावर भर दिला
तर बऱ्याच प्रमाणात स्वच्छता दिसून येईल. घाण होऊ कशी द्यायची नाही ह्यासाठी काही प्रस्ताव
देत आहे –
- आपल्या घराजवळील रस्त्यालगतचा किंवा रस्त्याचा
एक भाग किंवा घाणीचा एक कोपरा स्वच्छ करण्यासाठी दत्तक घ्यायचा प्रयत्न करूया. असे
दत्तक घेतलेले ठिकाण, दर आठवड्याला साफ झाडून स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करूया. त्या जागेवर
कोणी घाण टाकताना दिसली तर त्यांना घाण टाकू नका अशी विनंती करायचा प्रयत्न करावा.
नियमाने दर आठवड्याला स्वच्छता करायची असा प्रयत्न असावा.
- आपल्या घरातल्या नोकरांना किंवा मोलकरीणबाईला
कचरा कोठे व कसा टाकायचा ह्याची सूचना द्यावी. बऱ्याच वेळा सूचना न दिल्याने घर स्वच्छ
ठेवण्यासाठी ठेवलेले नोकर घर स्वच्छ करून साठलेला कचरा घराबाहेर जवळच जेथे त्यांना
सोपे जाईल तेथे टाकतात. बाकीचे लोकं असा वाटेल तसा कचरा टाकताना पाहून, नोकरांच्या मालकांना नावे ठेवतात.
- ज्यांच्याकडे पाळीव कुत्री, मांजरी असतील
त्यांनी पाळीव जनावरांना फिरवायला घेऊन जाताना बरोबर एक प्लॅस्टिकची पिशवी व जुन्या
वर्तमानपत्राचा तुकडा जरूर बाळगावा. पाळीवाची विष्ठा उचलून कचरा कुंडीत टाकावी. रस्त्यावरची
विष्ठा उचलायला अतिशय सोपे असते. रस्त्यावरच्या माती व धुळीमुळे रस्त्याला विष्ठा चिकटत
नाही. बऱ्याच जणांनी हे करून पाहिलेले नसते व त्यामुळे त्यांना असे वाटते की विष्ठा
काढायला खूप वेळ लागेल व कोणीतरी पाहील. आपल्या पाळीव प्राण्याची विष्ठा काढायला लाज
वाटायचे कारण नाही. उलट बाकीचे लोकं आपले बघून अनुकरण करायला लागतील. पहिल्यांदा काढताना
थोडीशी लाज वाटेल पण मग काही वाटणार नाही. जो मालक स्वतःच्या पाळीव जनावराची विष्ठा
काढून कचरा पेटीत टाकत नाही त्याचे हे करणे बाहेर शौचाला जाण्या एवढेच वाईट आहे.
- दर आठवड्याला समाजसेवा करायला थोडा वेळ
द्या. आपल्या मुलांना घेऊन आठवड्यात एकदा एक तास तरी आपण ठरवलेला घराबाहेरचा कोपरा
साफ करायचा प्रण घ्या. त्या निमित्ताने आपला व्यायाम होतो व मुलांना स्वच्छतेचे चांगले
वळण लागते. दर आठवड्याला नियमाने साफ केल्याने, आपण ठरवलेल्या जागेबद्दल आपुलकी निर्माण
होते व त्याच आपुलकीतून तो कोपरा साफ ठेवला जातो.
- सार्वजनिक स्वच्छता मोहिमेसाठी आपल्याला
स्वतःचा अहंभाव जरा बाजूला ठेवावा लागेल. जी जागा आपली नाही ती साफ करायला बऱ्याच वेळेला
आपला ‘इगो’ मध्ये मध्ये येतो. आपण ती जागा साफ का करावी
हा प्रश्न आपल्याला पडतो. आपण कारणे देतो – हे काम खरे तर महानगरपालिकेचे आहे, गेल्याच आठवड्यात साफ केले होते मी, लोकांनी परत घाण केली – मी काय त्यांचा नोकर आहे की मी साफ करावे? व त्यांनी घाण टाकावी? एवढ्याचसाठी आपण एक कोपरा स्वच्छतेसाठी आपलासा
करावा, एखाद्या व्रता प्रमाणे
तो नियमितपणाने साफ ठेवावा. हे काम चिकाटीचे आहे व मन शांत ठेवून साफ करण्याच्या उद्देश्याकडे
लक्ष ठेवण्याचे आहे बाकीच्या गोष्टी गौण समजाव्यात.
आपण
ठरवलेला व स्वच्छतेसाठी दत्तक घेतलेला कोपरा नियमितपणे साफ ठेवा. घाण होऊन देऊ नका,
साफ ठेवण्यासाठी तळमळीने काम करावे लागेल
पण तरी सुद्धा करा. एकदा करून पाहाच.