ठाण्याच्या खासदारांनी, महाराष्ट्र सदनात
जेवण चांगले नाही मिळाले म्हणून तेथल्या सुपरीटेंडंटच्या तोंडात बळेने पोळी
कोंबल्याचे दृष्य सर्वानीच पाहीले असेल. जेवण चांगले नाही म्हणून राग आलेल्या
ठाण्याच्या राजन विचा-यांनी जे कृत्य केले ते निंदनीय आहेच पण त्यावर त्यांचा
बचावाचा प्रयत्न अजूनच निंदनीय आहे.
त्या केटररची किंवा त्या सुपरीटेंडंटची कितीही
चूक असली तरी कोणाच्या तोंडात कोंबणे म्हणजे व्यक्ति स्वातंत्र्यावर कु-हाड
मारण्यासारखे आहे. आपण खासदार आहात, प्रशासनिक कारवाई घेण्याचा अधिकार आपण बाळगता,
मग तो सोडून हा अविचार म्हणजे तुमचा खासदारकीचा निव्वळ मगरुरपणाच दाखवतो.
आपण काय विचार करतो ह्या पेक्षा आपण काय कृती
करतो ह्यावरच समाजातली आपली प्रतिमा बांधली जाते. लोकसंग्रह करण्या-यांनी तरी हे
मनात बाळगून आपली कृती केली पाहिजे. जे राजन विचा-यांनी केले नाही. कोणाला समज
द्यायचीच असेल तर असे तोंडात कोंबून कोणाचा वैयक्तिक अपमान करायचे स्वातंत्र्य तर
कोणालाही नाही.
ह्या परिस्थितीत राजन विचा-यांनी त्या
सुपरिटेंडंची सार्वजनिक माफी मागणे हेच उचित आहे. तसेच राजकीय पक्षांकडून ह्या
गोष्टीला हिंदू मुसलमान रंग देण्याची चूक झाली नाही पाहिजे.