लालबत्तीचे राजकारण
"मैं अनार्कीस्ट (अराजक) हूँ।". "हमारे लोगोंसे हम राजपथ भर देंगे। देखता हूँ गणतंत्र दिन कैसे मनाते है इस बार।". "दिल्ली पुलीस को मेरा आवाहन है की छुट्टी लेके आम आदमी पार्टी के इस धरने मे शामील हो जाए।" श्री केजरीवालसाहेबांनी हरताळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना भाषणात इशारा केला. हरताळ रेल भवना समोरच्या बागेत चालला होता. दोन दिवस दिल्लीकरांना मेट्रो सेवा उपलब्ध होऊ शकली नाही.
अनार्कीस्टची परिभाषा बदलली पाहिजे असे केजरीवालांचे मित्र श्री आशुतोष दूरदर्शनवर म्हणाले. अराजक ह्याचा एकच अर्थ होऊ शकतो. केजरीवाल साहेबांनी अराजकता केली म्हणून त्याला राजकारणाचा भाग म्हणून खपवून घेता येणार नाही. "मैं जेटली और सालवे पर थुंकता हूं।" आम आदमी पक्षाचे सोमनाथ भारती हरताळात भाग घेताना म्हणाले. गेले दोन दिवस दिल्ली मध्ये आम आदमी पक्षाच्या धरण्यामुळे, लोकांचे भयंकर हाल झाले.
धरणे देऊन काही उपयोग होत नाही असे दिसल्यावर व चोहोबाजूंनी टीकेची झोड उठलेली बघून आम आदमी पक्षाने केंद्र सरकारचा काही पोलिसांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या प्रस्तावाचा अतिशीघ्रतेने स्वीकार करून धरणे संपवले. केजरीवालांनी सोमनाथ भारती ह्यांना पाठिंबा देऊन आफ्रिकन मुलींवर केलेल्या कारवाईचे पूर्णं खापर पोलीस कर्मचा-यांवर फोडले. तीन पोलीस कर्मचा-यांना निलंबित करण्यासाठी हरताळाचा घाट घातला. केजरीवाल स्वतः हरताळ करायला बसले. जर केजरीवालजींनी सोमनाथ भारती ह्यांना तपास पूर्णं होई पर्यंत मंत्र्यांच्या जबाबदारीतून मुक्त केले असते तर काही तरी वेगळे केले असे वाटले असते. पण बाकीच्या राजकीय पक्षांसारखेच त्यांनी सोमनाथ भारती ह्यांची चूक असून सुद्धा पाठीशी घातले. एवढेच नव्हे तर लोकांची दिशा भूल करण्याच्या इराद्याने हरताळाचे सोंग घेतले. जर का आम आदमी पक्ष इतर पक्षांपेक्षा काही वेगळा आहे हे दाखवायचे असते तर सोमनाथ भारती ह्यांना केजरीवालांनी निलंबित किंवा तो पर्यंत त्यांना मंत्र्यांच्या जबाबदारीतून मोकळे करायला पाहिजे होते. पण मंत्रिमंडळांत आल्यावर सोमनाथ भारती "आम" चे "खास" आदमी झाले ना!
केजरीवालांचे सरकार आल्यापासून तुसडेपणाची भाषा रोज ऐकायला मिळते. ते व त्यांच्या अनुयायांचा गर्विष्ठपणा सतत अनुभवायला येतो. कोणत्याही दूरदर्शन वाहिनीवर चांगुलपणाचे पुढारी फक्त आम आदमी पक्षच आहे अशा आवेशात बोलणे असते त्यांच्या प्रवक्त्यांचे. काही काही वाहिनीवर तर प्रवक्ते येत सुद्धा नाहीत.
केजरीवालसाहेब, लाल बत्तीचा खरा अर्थ असा आहे की, जे सरकारच्या जवळचे आहेत त्या मोजक्याच लोकांना मिळणारी सूट, मिळणारे छत्र आणि मिळणाऱ्या सुविधा. त्याचे द्योतक म्हणजे मंत्र्यांच्या गाडीवर लागलेले लाल दिवे. केजरीवालसाहेब, हे लाल बत्तीचे दिवे काढून टाकले असले तरी एका मंत्र्याला पाठीशी घालून व तीन पोलीस कर्मचाऱ्यांना घरी बसवून लाल बत्तीच्या त्याच पूर्वीच्या संस्कृतीचे विद्रूप दर्शन सगळ्यांना दिले आहेत तुम्ही. केजरीवालसाहेब लोकांना दाखवायला लाल दिवे काढण्याने लाल बत्तीची संस्कृती जाणार नाही. उलट ह्या सगळ्या प्रकारामुळे तुमचे सुद्धा दाखवायचे दात व खायचे दात निराळे आहेत ह्याची आम आदमीला कल्पना आली.
ह्या कृती मुळे केजरीवालांची आम आदमी पार्टी बाकीच्या पक्षांसारखीच आहे असे दिसून येते एवढेच काय पण ह्या पंधरा दिवसात तुमचे अराजकतेचे गुण सुद्धा लोकांना कळले. बरे झाले वेळेवर कळले. शहाण्यांनी ह्या पक्षा पासून दूरच राहावे. नाहीतर आपण सुद्धा त्यांच्या बरोबर अराजक ठरायचो.
आज केजरीवालसाहेबांनी पोलिसांना जसे चिथवले तसे सेनेत कोणी केले असते तर त्या आधीकाऱ्याचे लागलीच कोर्ट मार्शल झाले असते व सेनेतून तडका फडकी बाहेर निघावे लागले असते.