Sunday, November 10, 2013

विश्वाची उत्पत्ती


मी हिंदू वर्तमानपत्र वाचत होतो. भौतिक शास्त्रासाठी वर्ष २०१३चे नोबेल पारितोषिक जाहीर झाले होते. फ्रांकोईस एनग्लर्ट ह्या बेलजियन शास्त्रज्ञाला मिळाल्याचे वर्तमानपत्रात आले होते. एनग्लर्ट व रॉबर्ट ब्राऊटने १९६४ मध्ये विश्वाचे मुलकण, भार आत्मसात कसे करतात त्याच्या बद्दलचा सिद्धांत मांडला होता.  ह्याच सिद्धान्तावर पुढे पीटर हिग्स ह्या ब्रिटिश शास्त्रज्ञानाने मुलकण कसे भारदस्त होतात त्याची प्रक्रिया मांडली होती. मी हिंदू वर्तमानपत्रात आलेली त्या बद्दलची बातमी येथे देत आहे -

"The universe was born with a Big Bang 13.8 billion yrs ago, releasing a lot of energy. This energy was symmetrical, uniform in space and time. This symmetry broke 1011 s later. The particles become non uniform because they had acquired mass. This was due to the Higgs mechanism. The universe is pervaded by an invisible field of energy the Higgs field. Higgs boson is the smallest disturbance in it. Higgs bosons couple with the fundamental particles moving through the field, giving them mass. For Higgs mechanism to occur, 4 particles were necessary, electroweak forces swallowed 3 the only survivor is the Higgs boson. Large Hadron Collider (LHC) found the Higgs boson beyond reasonable doubt in January 13". 

नववीत शिकत असलेल्या माझ्या मुलाला मी आलेली बातमी वाचत होतो ती, समजायला अवघड जात होती. विश्वाची उत्पत्ती कुठच्या तरी घटकेला झाली व त्यावेळी अचानक झालेल्या विस्फोटातून अती गरम वायू चोहो दिशांना वाहायला लागला. हळूहळू गरम वायूचे तापमान कमी व्हायला लागले तसे त्या थंडावलेल्या वायूचे स्वतः भोवती फिरणाऱ्या मोठ मोठाल्या गोळ्यात रूपान्तर होऊ लागले. पुढे ह्यातूनच आज दिसणाऱ्या सूर्य मालिका तयार झाल्या. हे सगळे माझ्या चिरंजीवांना समजवत असतानाच, ऐंशी उलटून गेलेली माझी आजी माझ्याकडे बघत मधूनमधून समजल्या सारखी माना हालवतं होती. हिंदू मधला लेख इंग्रजी असल्या कारणाने तो तिच्या डोक्यावरून गेला असावा असा माझा समज. आजीला समजवावे म्हणून मी त्या लेखाचा अर्थ मराठीत सांगायचा प्रयत्न करोत होतो  "पहिल्यांदा एक प्रचंड विस्फोट झाला, चहुबाजूला ऊर्जा फेकली गेली, गरम वायू सगळीकडे पसरायला लागला........................" आजी आणि मी, नकळत विश्वाच्या उत्पत्तीवर बोलायला लागलो. मराठीतून मॅट्रिक पास झालेली माझी देव देव करणारी धार्मिक आजी ह्या विषयावर चांगलीच ‘comfortable’ होती. ती मला म्हणाली..."अरे हे अगदी आपल्या ऋग्वेदातल्या नासदीय सूक्तात (ऋग्वेद १० वे मंडळ, सूक्त १२९ वे) विश्वाची उत्पत्ती कशी झाली त्याचा सिद्धांत मांडला आहे तसेच काहीसे आहे..." आजी पुढे सांगू लागली.......


"
सुरवातीला काहीच नव्हते, का ऊर्जेच्या रूपात सगळे होते? कारण शून्यातून उत्पत्ती कशी होणार? ऊर्जा नुसतीच श्वासा शिवाय श्वासोच्छ्स्वास करत होती. ही सूक्ष्म ऊर्जा, सगळीकडे भरून होती, तिला एकदम प्रगट होण्याची इच्छा झाली, ह्यातूनच स्थूलत्वाचा जन्म झाला व सर्व दूर वेगळेपणाचा आभास तयार झाला, ह्या स्थूलत्वामुळे निर्माण झालेल्या वेगळेपणातून सृष्टीची निर्मिती झाली..........."

भौतिक शास्त्र न शिकलेल्या धार्मिक आजीकडून हा सिद्धांत ऐकायला मिळणे म्हणजे एक आगळा अनुभव होता. माझी आजी म्हणत होती, तिनी विश्वाच्या उत्पत्ती बद्दल भागवतात वाचले होते, पुराणात वर्णन केले आहे असे कीर्तनकारांच्या तोंडून ऐकलेले आहे, गीतेत त्या बद्दलचे श्लोक आहेत असे प्रवचनातून नित्य ऐकले होते.

हिंदूत दिलेल्या विश्वाच्या उत्पत्तीच्या बातमीच्या शेवटच्या चार ओळी तर आजीला खूपच आवडल्या व भावल्या ..... For Higgs mechanism to occur, 4 particles were necessary, electroweak forces swallowed 3 the only survivor is the Higgs boson. पुराणातून अशाच गोष्टी ती ऐकत आलेली होती "स्थूलत्व येण्यासाठी, अमक्या अमक्या गोष्टींची जरूर असते, त्यातल्या तीन गोष्टी, इंद्राने गिळल्या. एकट्या राहिलेल्या सूक्ष्म अणुरेणुकणांनी ऊर्जेशी संग साधला व त्यातून स्थूलत्व निर्माण झाले................."  सामान्य लोकांना समजण्यासाठी कीर्तनकार असेच सोप्या भाषेत सांगतात, असे आजीचे म्हणणे होते. तीच सोपी भाषा पुढे पुराणात रूढ झाली व तपशील मागे राहिला.

काही प्रश्न - बिगबॅन्गच्या आधी काय होते? जर काहीच नव्हते तर उत्पत्तीसाठी लागणारे साहित्य कोठून आले? ऊर्जा कशातून झिरपली? बिगबॅन्ग घडवण्याची घटका कोणी ठरवली व बिगबॅन्ग घडवून आणणारी कळ कोणी दाबली

Monday, February 25, 2013

पाकिस्तानचा कट व आपले धोरण

मुंबईला ताज हॉटेल मध्ये व आता हैदराबादला नुकत्याच झालेल्या २१ फेब्रुवारीला झालेल्या बॉम्ब स्फोटात १६ भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले. बातम्यांवरून असे कळते की हा स्फोट घडवून आणण्यात इंडियन मुजाहदीनचा हात आहे. बातम्यांवरून व मिळालेल्या पुराव्या वरून इंडियन मुजाहदीन हा लष्करे तायबाचीच भारतातली संघटना आहे असे कळते. नाव इंडियन मुजाहदीन पण काम लष्कर ए तायबाचे. आता हे सर्वश्रुतच आहे की लष्कर ए तायबा हे पाकिस्तानच्या आय एस आय चा एक भाग आहे. ह्याचाच अर्थ हा होतो की, काही कारण नसताना, पाकिस्तान ने आपल्या देशाची सीमा उल्लंघून हैदराबादला स्फोट घडवून मनुष्यहानी व वित्तहानी करण्याच्या उद्देशाने आपल्या देशावर चढाई केली आहे. आता पाकिस्तानने काय केले हे जाणण्यासाठी आपल्याला सुरक्षा परिषद भरवण्याची काही गरज नाही. कोठल्याही शब्दकोशात "देशाची सीमा उल्लंघून चढाई करणे" ह्याचा एकच अर्थ होतो व तो म्हणजे आक्रमणहा होय. पाकिस्तानने आपल्यावर आक्रमण केले आहे. पाकिस्तानने एका सुनियोजित दीर्घकालीन कटाने आपल्या देशावर हल्ला चालवला आहे, त्याचा, काश्मीर व अजून सुद्धा घेता येईल तेवढा भूभाग घ्यायचा इरादा आहे. हे दर्शवणारा अर्थ शब्दकोशात बघितला तर ह्यालाच युद्ध छेडणे असे म्हणतात. मग जे एखादा शब्दकोश सुद्धा सांगू शकतो त्या पाकिस्तानची मानसिकता समजण्यासाठी आपण कोणाची वाट पाहत आहोत? कोणी दुसरा देश आपल्या कानात कानगोष्टी करायला येणार नाही की पाकिस्तान आपल्या देशाचा शत्रू आहे व तो शत्रुत्वाच्या धर्माचे स्वातंत्र्य मिळाल्या पासून पालन करत आला आहे. तो आपल्या विरुद्ध युद्ध पवित्र्यात नव्हे नव्हे युद्ध पुकारले आहे. हैदराबादचा स्फोट म्हणजे आपल्यावर पाकिस्तानने केलेले आक्रमण आहे.


हे आपल्याला जितक्या लवकर समजेल त्यातच आपले भले आहे. आपण हे जाणून, ताबडतोब उभय देशांमधले सगळ्या तऱ्हेचे सांस्कृतिक, व्यापार व खेळांचे संबंध थांबवले पाहिजेत. उभय देशा मधले सगळे दळणवळण थांबवले पाहिजे. पाकिस्तानातला आपला उच्चआयोग परत घेतला पाहिजे व दिल्लीतल्या पाकिस्तान उच्च आयोगाला हाकलले पाहिजे. सगळ्यात आधी "आमन की आशा" हे उभय देशातला आपसातला सौहार्द्रभाव वाढवण्याचे जे नाटक चालले आहे ते थांबवले पाहिजे. ह्याच बरोबर पाकिस्तानला इशारा दिला पाहिजे व तो धुडकावून जर त्याने आपले पूर्वीचेच खेळ परत चालू ठेवले म्हणजे परत अशी घटना भारतात कोठेही घडली व जर असे सिद्ध झाले की त्या मागे पाकिस्तानचा हात आहे, तर भारताने लागलीच त्या देशावर प्रत्याक्रमण करून त्या देशाला धडा शिकवायला पाहिजे. हे करायची तयारी नसेल तर तात्काळ आपसातले विश्वास वाढवणारे सगळे उपाय थांबवले पाहिजेत. आपण विश्वास वाढवणारे उपाय करायचे व त्याने रोज येथे बॉम्ब स्फोट घडवून आणायचे हे एकाच वेळेला होऊ शकत नाही. उलट आपल्या असल्या वागण्याने आपल्या देशाचा शत्रुत्वाचा मानस बोथट होतो. आपले धोरण गुळमुळीत राहते. व आपली मानसिकता मुळामुळीत होते. पाकिस्तान आपला शत्रू आहे व शत्रूशी जसे वागले जाते तसेच त्याच्याशी वागले पाहिजे.

आपण राष्ट्रव्रत घेतले का? त्या बद्दल येथे वाचा
आणि येथे
(मराठी ब्लॉग)


Sunday, February 24, 2013

सियाचीन ग्लेशीयर .. आयुष्याची दोरी.. (शेवटचा भाग)


ह्या आधीचे.....

 

....... कंट्रोल रूम मधली मंडळी गोंधळली. टीम लीडरला अजून वाटत होते व विश्वास होता की काही तरी चांगला सल्ला कंट्रोल रूम मधून मिळेल म्हणून. अशा परिस्थितीत कंट्रोल रूम मधल्या लोकांनी काहीतरी सल्ला देणे भागच होते................ 

 

"तुझ्याकडे स्नो स्कूटरर्स आहेत? उपयोग कर त्यांचा" बेस कमांडरने टीम लीडरला रेडिओवरून सल्ला दिला.

 

"व्हॉट द हेल आर यू अॅडव्हायजींग? इफ ही इज पूल्ड बाय द स्कूटर, इट विल ब्रेक हिज बोन्स्!" न राहवून तावातावाने डॉक्टर बेस कमांडरला म्हणाला.

 

चिडलेल्या बेस कमांडरने त्याला रागात विचारले "यू हॅव ए बेटर आयडिया दॅन धिस?" अर्थातच डॉक्टरांकडे गप्प बसण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता.

 

खाईच्या तोंडाशी अधीरतेने असलेल्या टीम लीडरने स्वतःलाच शिवी हासडली. कारण, स्नो स्कूटर वापरायचे इतक्या वेळ त्याच्या लक्षात कसे आले नाही ह्याचे त्याला फार वाईट वाटत होते. कॅप्टनच्या इशाऱ्यावर लागलीच स्नो स्कुटरर्स् सुरू केल्या गेल्या व नेमक्या जागी उभ्या केल्या. दोरीचा हूक स्कूटरला अडकवला. हे सगळे झाल्यावर स्नोस्कुटरच्या ड्रायव्हरने तयार असल्याचा टीम लीडरला इशारा केला. टीम लीडरच्या थम्स् अप वर ड्रायव्हरने स्नोस्कुटरला फूल थ्रॉटल दिला. दोरी त्या खाईच्या तोंडाशी साठलेल्या बर्फात रुतायला लागली व ताणली जाऊ लागली पण वर काही येईना. स्कूटर बरोबरच, बाकीचे नऊ जवान न सांगताच जोर लावून त्या दोरीला त्यांच्या परीने ओढू लागले. खरे म्हणजे त्या स्नो स्कूटरच्या जोरा पुढे त्यांचा जोर नगण्य होता, पण अशा हताश स्थितीत, विवेक हरवला जातो....... आतला जवान थोडा सुद्धा हालला नाही.

 

"नो मुव्हमेंट" टीम लीडरने कंट्रोल रूमला कळवले.

"ट्राय अगेन" बेस कमांडर अजून दुसरे काय सांगणार होता.

 

टीम लीडरला त्याचा स्वतःचाच राग आला. हताश वाटले. अडकलेला जवान दिसत आहे पण त्याला तो वर काढू शकत नव्हता. रेस्क्यू टीमची व्यर्थता त्याला जाणवली.

 

"इटस् टाइम" हेलिकॉप्टरच्या पायलटने कंट्रोल रूमला सांगितले.

कंट्रोल रूमला अजून एका नकोश्या वस्तुस्थितीचा धक्का बसला. हळूहळू वादळी वारे व्हायला सुरू झाले होते. थोड्याच वेळात त्यांचा वेग इतका वाढणार होता की मग ते हेलिकॉप्टर व ती सगळी माणसे तेथेच अडकली असती. अडकलेला माणूस ग्लेशीयरमध्ये उघड्यावर रात्र काढू शकत नाही. मरण अटळ असते. रेस्क्यू टीमला सोडून चालणार नव्हते. त्यांना घेऊन परतायचे होते बेस कँपवर. वेळेत. दोरीच्याबाकीच्या सात जवानांना रसद घेऊन जवळच असलेल्या त्या फॉरवर्ड पोस्टवर जायचे होते. त्यासाठीच तर ते निघाले होते इतक्या पहाटे.

 

रेस्क्यू टीम जरी रेस्क्यू करणारी असली तरी ते देव थोडेच होते. रात्री असे बाहेर राहिले असते तर गोठून मेलेच असते. ते बेस कँपवर स्थित असल्या कारणाने त्यांना ग्लेशीयरवर कोठेही बचाव कार्यासाठी थोड्यावेळे पुरते जाता येई. त्यामुळे नेहमी ते दहा हजार फुटांवर असायचे. दहा हजार फुटांवर असणाऱ्यांना अचानक अठरा हजार फुटांवर फार काळ राहता येत नाही. हा अपघात समुद्रसपाटीपासून अठरा हजार फूट उंचीवर झाला होता! अठरा हजार फुटांवर राहायचे असेल तर आधी त्यांना वेगळ्या प्रकारचे अॅक्लीमटायझेशन करावे लागते. अठरा हजार फुटांवर पोस्टवर राहणाऱ्या जवानांचे सुद्धा टप्प्या टप्प्याने अॅक्लीमटायझेशन केले जाते व मग तेव्हाच ते तेथे राहू शकतात. त्यामुळे वाचवण्यासाठी गेलेल्या रेस्क्यू टीमने अॅक्लेमटायझेशन व्यतिरिक्त तेथे राहणे किंवा रात्र काढणे म्हणजे मरणाला आमंत्रण दिल्या सारखेच होते. बेस कमांडरला हे साहजिकच मान्य नव्हते.

 

बेस कमांडरने घड्याळाकडे पाहिले.

"दहा मिनिटे?" त्याने पायलटला विचारले.

"ह्याच्या पेक्षा जास्त नाही"

बेस कमांडरने रेडिओचा हॅन्डसेट हातात घेतला.

"माइक वन, यू हॅव अबाउट ट्वेन्टी मिनिट्स बिफोर द फर्स्ट लिफ्ट कमेन्सेस्. डू युअर बेस्ट"

 

खाईच्या जवळ टीम लीडरने निराशेने आपल्या घडाळ्याकडे पाहिले. "वीस मिनिटे. डॅमीट!"

 

वीस मिनिटात त्यांना काय करता येणार होते जे मागच्या एवढ्या वेळात ते करू शकले नव्हते. असहायपणा कशाला म्हणतात ते टीम लीडर अनुभवत होता. एव्हाना खाईतल्या जवानाला कळून चुकले काहीतरी भयंकर झालेले आहे. रेस्क्यू टीमला वाचवता येत नाही ह्याची त्याला जाणीव झाली. भीतीने त्याची तडफड पुन्हा सुरू झाली.

 

निराशायुक्त आवाजात टीम लीडरने त्याच्या टीमला आदेश दिला, "आपण सगळे खाईत जात आहोत".

 

त्यांनी दोन नव्या दोऱ्या काढल्या, खाईच्या तोंडाशी ठोकलेल्या डांबरी खिळ्यांशी पक्क्या केल्या व चारही जण दोऱ्यांवरून स्लिदर करून म्हणजे खाली घसरत खाईत गेले. प्रत्येकाने आईस एक्स घेतल्या होत्या. खाईच्या गुडुप अंधारात विजेरीच्या झोतात, चारही जणांनी अडकलेल्या जवानाच्या भोवतालची बर्फाची भिंत कुदळीने फोडायचा प्रयत्न सुरू केला. उपयोग नव्हता. जागा इतकी अरुंद होती की, कुदळीचा जोर बसण्यासाठी द्यावा लागणारा हाताचा झोका देण्या इतकी पण जागा नव्हती. त्यामुळे जोर म्हणावा तसा बसत नव्हता. बर्फ इतका कडक होता की, त्यांना त्यांच्या कुदळी एखाद्या दगडावर मारत आहोत असे वाटत होते. आवाज पण तसाच येत होता. खण् ssss, खण् ssss असा. प्रयोग निष्फळ होत चालला होता. त्या दगडासारख्या बर्फावर खरचोटा पण उठत नव्हता. वेळ कमी राहिला आहे, काम खूप आहे ह्या जाणिवेने व दमलेल्या स्थितीत हताशपणे कुदळ मारत राहिल्यामुळे त्यांचे हात कापायला लागले होते. गणिताच्या परीक्षेत शेवटची पाच मिनिटे राहिली असताना दहा प्रश्न सोडवायचे राहिले आहेत हे एकदम लक्षात येते तेव्हा आपले हात थरथरतात व सुचेनासे होते तसेच अगदी. कुदळीचे घावावर घाव घातले जात होते. त्या अंधारात व घाईत, एका कोणाचा घाव त्या अडकलेल्या जवानाच्या खांद्यावर बसला. त्या जवानाच्या संवेदना, आतल्या भयंकर गारठ्यामुळे, मालवत चालल्याच होत्या त्यातच अचानक झालेल्या ह्या वाराने, उठलेल्या भयंकर वेदनेने जवानाने किंकाळी फोडली. रक्त टपकायला लागले.   

 

हताश होऊन शेवटी रेस्क्यू टीमला कळले काहीही केले तरी राहिलेल्या वेळेत त्याला सोडवता येणार नाही. त्यांना दुरून हेलिकॉप्टर येण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. वेळ झाली होती. टीम लीडरने त्याच्या टीमला वर जायला खुणावले. नाखुशीने टीमने त्यांच्या दोऱ्यांना इशाऱ्याचा दोनदा ओढ दिला. हळूहळू वरच्या जवानांनी त्यांना ओढायला सुरवात केली. टीम लीडर मात्र अजून त्याच्या जवळच होता, बाकीचे वर जायला लागले होते.

 

अडकलेला जवान आता पूर्णपणे मनाने कोलमोडला होता. आवरता न येऊ शकणारे हुंदके देत रडत होता. सोडून जाऊ नका असे त्यांना विनवीत होता. टीम लीडर स्वतःला येणारे हुंदके आवरू पाहत होता. काहीच नाही, अगदी काहीच करू शकत नव्हता तो. त्या घटकेला जेवढे त्याच्याकडे होते व जेवढे करता येण्यासारखे होते ते सर्व करून झाले होते. टीम लीडरने हेलिकॉप्टरची पहिली सॉर्टी लॅन्ड होऊन थोड्या वेळाने हेलिकॉप्टर, टेकऑफ झाल्याचे ऐकले. म्हणजे टीम मधल्या दोन जवानांना बेस कँपला पोहोचवून हेलिकॉप्टरच्या दुसऱ्या फेरीला अजून पंधरा वीस मिनिटे होती.

 

"मुझे छोडके मत जाना साब।" त्या कॅप्टनला उद्देशून अडकलेल्या जवानाने विनवले. त्याचे केविलवाणे विनवणे कॅप्टनला सहन होईना. तो विनवीत होता. हा काही करू शकत नव्हता. टीम लीडरला त्याचे आता पर्यंतचे सगळे शिक्षण, सगळी शिकवण, सगळा अनुभव वाया गेल्यासारखे वाटायला लागले. ह्या परिस्थितीला तोंड द्यायची त्याची इच्छा नव्हती. पण तो तिथे होता. इच्छा नसून. त्याचा साथीदार येथे त्याच्या समोर हळूहळू मरत होता. कुदळीच्या बसलेल्या घावाने वेदनेत होता व कॅप्टन हतबल होता. काही सेकंद गेले. असे वाटले की त्या अडकलेल्या जवानात थोडी शक्ती आली. त्याची निराशा गेली. एकदम उभारी आल्या सारखे वाटावे तसा त्याचा चेहरा झाला. वाटले की मरणाला सामोरे जाण्याचे धैर्य त्याने गोळा केले असावे. आता पर्यंत कापणारा त्याचा आवाज स्थिर झाला व शुद्ध स्पष्ट आवाजात अडकलेला जवान कॅप्टनला म्हणाला,

 

"मेरी फॅमिली साब, मेरे तीन छोटे बच्चे है। माँ व पिताजी, बहोत बुढे है साब।" 

"उनका खयाल हम रखेंगे।" टीम लीडर उत्तरला.

"साब, उनको मत बताना, की मेरी मौत ऐसी हूई। वो सेह नही पाएंगे, टूंट जाएंगे"

"नही उनको नही बताएंगे। उनको कहेंगे की, तूम गिरते ही मर गये।"

"उनको बताना, बताना की...."

"तुझे जो बोलना है, बोलो।, हम बताएंगे उनको।"

"उनको मेरे तरफ सें सॉरी केहना साब। मैने उनको ऐसेही छोड दिया।" त्याच्या डोळ्यातून परत अश्रू ओघळले.

 

"फिकर मत करो। उनका खयाल आर्मी रखेगी।" टीम लीडरचा आवाज फुटत नव्हता. तो स्वतःचे हुंदके आवरत बोलत होता. त्याला कसेसेच वाटत होते. पूर्णसत्य, पूर्णं वस्तुस्थिती त्यांच्या डोळ्यांसमोर दिसत होती व ते दोघे असे त्या स्थितीत ह्या विषयावर बोलत होते. अजून काही मिनिटातच लीडर, त्या अडकलेल्या जवानाला मरणासाठी एकटे सोडून जाणार होता. त्या भयाण अंधाऱ्या खाईत, त्या ग्लेशीयर मध्ये. रात्रीच्या पडलेल्या घाणेरड्या स्वप्नागत. हे असे होत नसते, सकाळी उठल्यावर आपण हुस्स करतो की ते स्वप्न होते म्हणून व विसरून पण जातो. आज स्वप्न नव्हते जागेपणीच त्याच्या समोर होत होते ते सारे.

 

"और कितना देर, साब।" हुंदके देत त्याने विचारले.

 

पहिल्यांदा टीम लीडरला कळलेच नाही. त्याने, "आता कधीही हेलिकॉप्टर येणारच आहे….", हे सांगायला सुरवातच केली होती आणि लागलीच जीभ चावली, त्या अडकलेल्या जवानाला हेलिकॉप्टर येण्यात कोणतेही स्वारस्य उरले नव्हते, त्याला काय म्हणायचे आहे हे लक्षात येऊन टीम लीडर पुढे म्हणाला,

 

"अब जादा समय नही।" तो खोटे बोलत होता.

"साब, अभी दर्द नही है। मुझे कुछ महसूस नही हो रहा है साब।"

"ss, और बहोत जलदी, तुमको निंदा लग जायेगी।............ बस।"

"मुझे डर लग रहा है, साब।"

"भगवान का नाम लो।" टीम लीडरने त्याचा हात आपल्या हाताने दाबत म्हटले.

"और बाकी सब फिकर छोडो।" त्याचे शब्द त्यालाच पोकळ वाटत होते.

"साब, मै जाने तक, आप रहोगे मेरे पास?" त्याने बिचकत विचारले.

 

जसे काही त्याला उत्तर देण्यासाठीच हेलिकॉप्टरचा दुरून येणारा आवाज खाई मध्ये घुमायला लागला. टीम लीडर व टीम मधल्या राहिलेल्या साथीदाराला घेण्यासाठी ते परत येत होते. त्याला सोडून जायच्या कल्पनेने कॅप्टनला ती हिमखाई अजूनच गोठणारी, एकांती व भयानक वाटायला लागली होती. अशा भकास खाईत, त्याला मरायला सोडून आपण निघून जायचे म्हणजे त्याला त्याचे आयुष्य सगळे निरर्थक वाटायला लागले. टीम लीडरने एक हात मोकळा करून दोरीला धरला, दुसऱ्या हाताने अडकलेल्या जवानाचा हात हातात घेतला. त्याच्या मनातला कल्लोळ शब्दात सांगणे कठीण.

 

त्याचा हात हातात घेऊन शरमून टीम लीडर त्याला म्हणतो, "मुझे जाना होगा।"

 

त्या अडकलेल्या जवानाने त्याचा हात इतका घट्ट पकडून ठेवला होता की कॅप्टनला आपला हात सोडवण्यासाठी जोरात खेचायला लागला. टीम लीडरने इशाऱ्यासाठी आपली दोरी दोनदा खेचली. टीम लीडर वरती खेचला जात असताना, अडकलेल्या जवानाच्या कानावर पडणाऱ्या आर्त किंकाळ्या, त्याला बाहेर येई पर्यंत ऐकायला येत होत्या. एवढेच काय त्याला असे वाटले की हेलिकॉप्टरचा कानठळ्या बसणाऱ्या आवाज सर्वत्र घुमत असताना सुद्धा त्या जवानाच्या किंकाळ्या त्याच्या कानात घुमून राहिल्या होत्या. खाईच्या बाहेर आल्यावर टीम लीडरला समजून चुकले की बाहेर वादळी वारे वाहू लागले आहेत. एकीकडे लांबवर उतरलेल्या हेलिकॉप्टरचा अधीर पायलट त्याला लवकर येण्यासाठी खुणावत होता, त्याच्या टीमचा दुसरा साथीदार एव्हाना राहिलेले साहित्य गोळा करायला लागला होता. त्यांना उशीर करून चालणार नव्हते. हे सगळे चालले असतानाच अचानक त्या हिमखाईच्या तोंडाशी टीम लीडर निःस्थब्धपणे उभा राहिला. विचारात. त्याच्यासाठी समय थांबल्या सारखा झाला होता. उतरलेल्या हेलिकॉप्टरने आपले रोटर्स थांबवले नव्हते. नाहीतर त्या वादळात त्यांचे पंखे परत सुरू करता आले नसते. हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या वाऱ्याच्या फेकाने बर्फ व हिमखडे उडत होते. टीम लीडरला लांबून पायलटने दिलेला हाताचा इशारा दिसला. लीडरला खाली राहिलेल्या जवानाच्या आर्त किंकाळ्या अजून ऐकू येतच होत्या. त्याचा साथीदार हेलिकॉप्टरच्या दिशेने पळायला लागलाच होता, तेव्हाच एकदम काहीतरी लक्षात आल्या सारखे होऊन, लीडर साथीदाराला म्हणाला, "वेट. रूको। वापीस आओ। मैं, एक मिनट कै लिये नीचे जा रहा हुँ।"

 

साथीदाराला धक्काच बसला म्हणाला "साब, चलो। टाइम नही है अभी। अगर नीचे कुछ सामान रह गया हो, तो जाने दो अभी। अभी जाना ठीक नही है।"

 

टीम लीडरने काही न बोलता, पटकन दोरीचा हूक डांबरी खिळ्याला अडकवला, व खाईत जायला सुरवात पण केली होती. साथीदाराने कॅप्टनच्या मनातले विचार जाणले की काय कोण जाणे, परत माघारी पळत येत, साथीदार कॅप्टनला ओरडून म्हणाला,

 

"साब, ऐसा मत करो।" हाताने इशारा करत टीम लीडरला पुढे म्हणाला "ये ठीक नही है साsssब।"

 

"मै। उसके लिये और कुछ कर नही सकता।" टीम लीडरने, साथीदाराला म्हटले व झपझप खाली जाऊ लागला.

 

"मै, आपके साथ आ रहा हू साsssब।"

 

"नहीss।" टीम लीडरने फटकारले साथीदाराला. "मैं टीम लीडर हूँ। ये भी मै ने ही करना हैं।"

 

"व्हॉट द हेल ही इज डूइंग?" शंभर यार्डावर गोंधळलेला हेलिकॉप्टर पायलट आपल्या को-पायलटला विचारत होता. एव्हाना वाऱ्याचा वेग चांगलाच वाढला होता, व वाऱ्याच्या जोराने आता सगळे हेलिकॉप्टर हालायला लागले होते. पायलटला हेलिकॉप्टरला कंट्रोल करणे मुश्किलीचे झाले होते.

 

"व्हिक्टर वन टू बेस, व्हॉट द हेल इज टीम लीडर डूइंग देअर. ही इज गोईंग टू किल् एव्हरी बडी ऑफ अस इफ हि इज नॉट बॅक सून. वी कांट हॅन्ग ऑन लाइक धिस एनी लॉन्गर" आपल्या रेडिओवर पायलटने बेस कँप ला कळवले.

 

"आय हॅव नो आयडिया" बेस कमांडर उत्तरला. "हि नोज, ही हॅज टू पुल आऊटऑफ देअर"

टीम लीडरची वाट बघणाऱ्या बाहेरच्या सगळ्यांना टीम लीडर कधी येतो असे वाटत होते. एक एक क्षण, एक एक तासाचा वाटत होता. अखेर दोरी दोन वेळेला ओढली गेली व साथीदाराने टीम लीडरला बाहेर काढले. आता वेळ नव्हता, ते पळत हेलिकॉप्टर मध्ये बसले व वीस मिनिटात बेस कँपवर पोहोचले.

 

बेसकॅम्पच्या रिवाजा प्रमाणे, रेस्क्यू मिशन नंतर, सगळे डी ब्रीफिंगसाठी कंट्रोल रूम मध्ये गोळा झाले. टीम लीडर त्यात नव्हता. सगळ्यांना वाटले, खाईतल्या जवानाला वाचवता आले नाही म्हणून अस्वस्थ झाल्यामुळे आला नसेल. कोणी त्याच्या न येण्या संबंधी बोलले देखील नाही...................

 

त्या संध्याकाळी टीम लीडर बेस कँपच्या ऑफिसर्स मेसच्या बार मध्ये दिसला. दोन लार्ज आत गेले असतील त्याचे एव्हाना, तेव्हाच बेस कमांडर आला व त्याच्या जवळ बसला.

 

"फायनली इट इज ऑलवेज द बार" त्याच्या खांद्यावर थोपटत बेस कमांडर म्हणाला, "वेदर वी गेट् द मॅन ऑर नॉट". टीम लीडर काही बोलला नाही. त्याने नुसती मान हालवली. परत एकदा थोपटत बेस कमांडर त्याला म्हणाला "इट्स् पार्ट ऑफ द गेम....." टीम लीडरवर काही फरक पडत नाही हे बघून बेस कमांडर त्याला पुढे म्हणाला, "समटाईम्स वी विन, आदर टाइम्स द ग्लेशीयर. नो रीझन टू फिल बॅड अबाउट डॅट."

 

टीम लीडर हलकेसे आपले तोंड बेस कमांडरकडे करत म्हणाला.

"इट्स नॉट दॅट" म्हणाला, "दॅट इज नॉट व्हाय आय एम सॅड" दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. बेस कमांडरला समजले. बराच वेळ ते दोघे बोलले नाहीत. शेवटी बेस कमांडरनेच सुरवात केली, "इफ डॅट्स् व्हॉट यू डिड. इट वॉज ब्रेव्ह"

 

"आय डोन्ट फिल व्हेरी प्राऊड" टीम लीडरचा आवाज उतरला होता.

"नेव्हर द लेस, इट वॉज करेजियस. नॉट मेनी वूड हॅव थॉट अबाउट इट, एन्ड फीवर कूड हॅव्ह डन इट" बेस कमांडरने खांद्यावर हात ठेवून म्हटले. टीम लीडर काही बोलला नाही.

 

"हाऊ" बेस कमांडरने विचारले.

टीम लीडरने एक मोठा श्वास घेतला, व मान वळवून, कमांडर पासून दुसरी कडे पाहत उत्तरला "आय यूस्ड द रोप"

 

"डिड ही ......?"

 

"नो.... आय गेस ही न्यू इट, इट वॉज द बेस्ट वे आऊट"

बेस कमांडरने एक मोठा उश्वास सोडला व जायला लागला.

 

"अजून दोन गोष्टी आहेत" टीम लीडर कमांडरला म्हणता झाला.

"काय आहेत त्या"

 

"त्याच्या घरच्यांना कळवायला हवे".

"हे काय सांगणे झाले. कोणी तरी सांगेलच, एव्हाना कळवले पण असेल, तुला माहीत आहे आर्मीत, काय करायचे व कशा पद्धतीने करायचे ह्या सगळ्याची एक स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर असते. असा अपघात झाल्यावर सुद्धा काय करायचे त्याची क्रिया वेगवेगळ्या स्तरावर सुरू झाले असेल एव्हाना."

 

"नाही. कळवण्याचे काम तुम्हाला करावे लागेल"

 

"बिकॉज.....? ऑलराईट, अॅन्ड द आदर थिंग?"

 

"मला बदली पाहिजे. मी हे काम नाही करू इच्छीत"

 

"सॉरी अबाउट द सेकंड पार्ट. नो वे. यू कांट शेअर प्रॉब्लेम्स विदाऊट अॅक्सेप्टींग टू हॅन्डल सम युवरसेल्फ". बेस कमांडर टीम लीडरच्या उत्तरासाठी न थांबता निघून गेला…………………

.

.

.

.

 

माझ्या बोटात धरलेली सिगारेट जळत जळत बोटांजवळ आल्याने बोटं भाजली तेव्हा मी परत वास्तवात आलो. त्या चंडीगढच्या बार मध्ये बसून आता पर्यंत मी जे ऐकत होत ती एक काल्पनिक गोष्टी होती. काल्पनिकच असणार. कारण आपल्या आयुष्यात असे कधी होते का. कधीच नाही. मी घड्याळाकडे पाहिले. बराच उशीर झाला होता. त्या कर्नलचे बोलून झाले होते.

 

"मी त्याच्या घरच्यांना कळवायला गेलो होतो. मागे म्हणालो तसे आपल्या घरातल्याच, जवळच्याच, अगदी आपल्या नात्यातल्याच्याच अंत्यविधीला जाऊन आलो. आजच. अंत्यविधी म्हणायलाच. कारण अजून त्याचे शरीर ग्लेशीयर मध्ये त्या खाईत आहे, व कल्पांता पर्यंत, तसेच राहील".

 

"म्हणजे तुम्ही...."

 

येस. आय एम द बेस कमांडर अॅट द बेस कँप"

 

आमचे दोघांचे मद्य पिऊन झाले होते. आम्ही आपआपल्या गेस्ट रूम्स मध्ये निघून गेलो. मला लवकर उठायचे होते..... आय एल ने थॉईसला जायचे होते.... पुढे बेस कँप..... नंतर ग्लेशीयरसाठी अॅक्लमटायझेशन......अॅक्लमटायझेशन झाल्यावर.....बेस कँपला होणारा ग्लेशीयरवरचा कोर्स करायचा आहे....... हिमलोट व खाई संबंधी शिकायचे आहे.....स्वतःला कसे वाचवायचे......दुसऱ्यांना कसे वाचवायचे(?) हे शिकायचे आहे......ग्लेशीयर मध्ये स्वतःची प्रकृती कशी सांभाळायची, हे शिकायचे आहे......तेथे एक वर्ष काढायचे आहे......द शो मस्ट गो ऑन.........

 

पण ती गोष्ट अजून माझ्या मनात घर करून बसली आहे. काल्पनिकच असणार. कारण आपल्या आयुष्यात असे कधी होते का. कधीच नाही. खरे ना? आणि ग्लेशीयर मध्ये? ................................................................................................................ असेच होते.

 -------------------------------------------------------------------------------------------------------------

ही गोष्ट कॅप्टन रघू रामन (रिटायर्ड) ह्यांनी लिहिली होती. त्यांनी अनुवाद करण्यास परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. गोष्टीचा गाभा तसाच ठेवून, मला वाटले तेथे तेथे वर्णन वाढवले आहे, म्हणजे वाचणाऱ्याला तेथले वातावरण, सैन्यात उपयोगात येणारे शब्द व सैन्यातल्या प्रघातांबद्दल जास्त माहिती मिळेल. सियाचीन ग्लेशीयरच्या भागात भुःसंपत्ती बरीच आहे असा कयास आहे. लेह, काराकोरम, अक्साईचीन येथे पण अशी संपत्ती पुष्कळ आहे अशी समजूत आहे. कॅप्टन रघू रामन ह्यांचा ईमेल पत्ता captraman@yahoo.com व जालावरचा पत्ता असा आहे www.captraman.com . ते आर्मी मधून निवृत्त होऊन आता स्वतःचे लिडरशिप वर वर्कशॉप चालवतात. २००९ पासून गृह मंत्रालयात काउंटर टेररिझम वर सल्लागार म्हणून काम पाहतात.

----------------------------------------------------------------------------------------

आपण राष्ट्रव्रत घेतले का? त्या बद्दल येथे वाचा
http://rashtravrat.blogspot.com/2010/05/rashtravrat.html

आणि येथे
(मराठी ब्लॉग)