Tuesday, December 27, 2011

राजाराम सीताराम ........ भाग ९.....एक गोली एक दुश्मन। भाग एक





एक गोली एक दुश्मन।

SHOOT TO KILL.



असे फायरिंग रेंजच्या प्रवेशद्वाराच्या सुरवातीलाच चुन्याने मोठ्या अक्षरात जमिनीवर कोरलेले असायचे. फायरिंग रेंजवर जाण्या आधीच आम्हाला क्लास मध्ये पिस्तूल, रायफल, मशीनगन, रॉकेट लॉन्चर, मोर्टार, ग्रेनेड ह्यांच्या बद्दल कॅप्टन गिलने माहिती दिलेली होती. मस्केटरीचे क्लासेस बाहेर भरायचे. आयएमएत मुबलक मोकळी जागा असायची. गोलाकार सिमेंटच्या बैठ्या बैठकी असायच्या त्यावर आम्ही बसायचो. आमच्या समोर त्यादिवशी शिकायचे हत्यार ठेवलेले असायचे. उस्ताद आम्हाला हत्याराबद्दल माहिती सांगायचा. ह्याच मस्केटरीच्या क्लास मध्ये उस्तादाने आम्हाला ही सगळी हत्यारे हाताळायला दिलेली होती. मस्केटरीच्या क्लासला खरी हत्यारे नसायची. ही सगळी ‘ड्रिलप्रॅक्टीस’ हत्यारे म्हणजे खऱ्या सारखी खोटी हत्यारे. पूर्वी कधीतरी ती हत्यारे खरी होती व फायरिंगसाठी वापरली जायची. जुनी, बिघडलेली व दुरुस्त करण्याच्या पलीकडे गेलेली ही हत्यारे फेकून द्यायच्या ऐवजी ह्याच हत्यारांचा शिकण्यासाठी व ड्रिलसाठी वापर व्हायचा. उस्तादाने अशाच एका ड्रिलप्रॅक्टीस रायफलीचे जोडलेले भाग सुटे करायला व परत शिताफीने जोडायला शिकवले. त्याने रायफलच्या गोळ्या झाडताना रायफल मध्ये जर तांत्रिक बिघाड आला तर ‘फौरी इलाज’ कसा करायचा त्याचे शिक्षण दिले, रायफल कॉकिंग करायला शिकवले, ‘लेटके’ पोझिशन घ्यायला शिकवली. ह्या पोझिशन मुळे नेम चांगला लागतो. ‘लेटके’ पोझिशन म्हणजे जमिनीवर रायफल घेऊन पालथे पडायचे, दोन्ही पायात अंतर ठेवून पायांच्या तळव्यांची कड टाचे सकट पूर्णं टेकवली गेली पाहिजे. रायफलचा लाकडाचा मागचा भाग म्हणजेच रायफल ‘बट’, आपल्या उजव्या खांद्याला घट्ट टेकले गेले पाहिजे. डाव्या हाताने रायफलचा पुढचा भाग खालून पकडायचा व उजव्या हाताने रायफल कॉक करून त्याच हाताने रायफलचा घोडा तर्जनीने दाबतायेईल अशी रायफलची मूठ पकडायची व रायफलचे सेफ्टी लॅच फायर पोझिशनवर करायचे. मान सरळ ठेवून डोळा, नेम धरायची मागची खोच, नेमधरायचे पुढचे टोक व टार्गेट सरळ रेषेत आणून, आपला श्वास रोखून चाप दाबायचा. चाप दाबल्या दाबल्या गोळी सुटते व उलट बसणाऱ्या जोराने, रायफलच्या बटचा थोडा धक्का आपल्या खांद्याला लागतो. त्याची जाणीव असली पाहिजे व असा जोर घ्यायला आपण तयारीत राहिले पाहिजे. पूर्वी थ्री नॉट थ्री च्या बंदुका असायच्या. असा जोर बसायचा खांद्याला, की जर तयारीत नाही राहिलो तर कधी कधी खांदा निखळायचा. पण हल्लीच्या रायफलींमध्ये नवीन तंत्रज्ञानाने खांद्यावर येणारा जोर खूप कमी झाला आहे. गोळी किंवा बुलेटला राउंड किंवा कार्ट्रीज म्हणतात. कार्ट्रीजचे दोन भाग असतात. मागचा भाग ब्रासचा असतो. त्यात बारूद भरलेले असते. पुढचा भाग शिसे वापरून बनवलेला असतो त्याला थोडे टोक दिलेले असते. जेव्हा रायफलचा चाप दाबला जातो तेव्हा कार्ट्रीजच्या मागच्या भागावर जोरात घाव बसतो, ब्रासच्या आतल्या बारुदाचा स्फोट होतो व तापलेला वायू प्रसरण पावतो. त्या प्रसरण पावणाऱ्या वायूच्या धक्क्याने शिसे असलेला पुढचा भाग म्हणजे गोळी, ब्रासच्या भागाहून उसळी मारून मोकळी होऊन, स्वतःच्या भोवती गरगरा फिरत जोरात वेगाने लक्ष्याचा वेध घेते. रायफल सेल्फ लोडींग असल्या मुळे उरलेल्या गरम वायूच्या धक्क्याने ब्रिचब्लॉक मागे जाऊन रायफल पुन्हा आपोआप कॉक होऊन पुढच्या गोळी साठी सज्ज होते. त्याच वेळेला आता ब्रासचा मागचा मोकळा भाग रायफल मधून बाहेर पडतो. ह्या सगळ्या घडामोडी एकदम घडत असतात. रायफल मधून बाहेर पडलेल्या मोकळ्या भागाला ‘एम्टी राउंड’ किंवा ‘खालीखोका’ म्हणतात. हे सगळे खालीखोके ब्रासचे असल्या मुळे परत वापरता येतात व म्हणून गोळा केले जातात. थ्री नॉट थ्री च्या बंदुकांमध्ये प्रत्येक गोळी साठी प्रत्येक वेळेला हाताने कॉक करावे लागायचे. पण सेल्फ लोडींग रायफलने मॅगझिन मध्ये गोळ्या असेपर्यंत आपोआप रायफलचा ब्रिचब्लॉक मागे येतो. त्यामुळे बुलेटस् दर चापाला सहजच सुटू शकतात. फायरिंग झाल्यावर रायफलचे बॅरल पुलथृला लावलेल्या चिंधीने साफ करावे लागते. रायफलची जपणूक करणे हा फार महत्त्वाचा भाग आहे. नाहीतर पुढच्या फायरिंगला रायफल नीट चालत नाही. रायफल हा जवानाचा युद्धातला सगळ्यात जवळचा साथी असतो व त्याची काळजी घेणे त्याचे परम कर्तव्य असते.



आयुष्यात पहिल्यांदा खऱ्या रायफलने खऱ्या बुलेटस् मला डागायला मिळणार होत्या. हे सगळे ब्रह्मांड मी त्या ड्रिलप्रॅक्टीसच्या रायफलवर शिकून खऱ्या फायरिंगच्या प्रतीक्षेत होतो. शिकण्यात महिना दोन महिने गेले होते. पुढच्या आठवड्यात लॉन्गरेंज वर फायरिंग करायला जायचे. लॉंगरेंज आमच्या रोजच्या ड्रिलस्क्वेअर, क्लासेस व पिटी ग्राउंड पासून साधारण सात ते आठ किलोमीटरवर होते. सायकलनेच जायचे. आठवड्यातले चार दिवस सलग फायरिंग होती. जेवणाची व्यवस्था सुद्धा रेंजवरच होणार होती. ठरलेल्या दिवशी मी डांगरी चढवली. थंडी होती म्हणून आतून स्वेटर घातला. बाहेरून स्वेटर घालताच आला नसता कारण डांगरीच्या गणवेशात, डांगरी, स्मॉल पॅक, जॅपकॅप, बेल्ट, डिएमएस बूट व त्यावर पट्टी एवढेच असते, मग स्वेटर कसा घालणार. गणवेशात आपल्या मर्जीने कोणताही बदल चालत नाही. त्यामुळे मी डांगरीवर स्मॉलपॅक बांधला, पाण्याची बाटली कमरेला पाठीमागे बसेल असा बेल्ट चढवला, पायांत डिएमएस शूज चढवले, जिथे डांगरीचे पाय शूज जवळ येतात तेथे पायाला पट्टी बांधली व सकाळीच शस्त्रागारात जाऊन सर्विस रायफल घेतली. आज पहिल्यांदा खरी रायफल हाताळायला मिळाली. प्रत्येकाच्या नावाची एक सर्विस रायफल होती. रायफलच्या बट वर त्या रायफलीचा नंबर लिहिला असायचा. रायफल घेतली पण आम्हाला बूलेटस रेंजवर गेल्यावरच मिळणार होत्या. रायफल व बुलेटस् सुरवातीला एकत्र कसे देणार. माकडाच्या हातात कोलीत देण्यासारखेच की. आम्ही आठ आठचा स्क्वॉड करून स्टॅन्ड नंबर फाइव्ह, जी आमची फायरिंग रेंज होती तिकडे कुच केले.



स्टॅन्ड फाइव्ह वर पोहोचलो. सायकली लावल्या व इन थ्रिज फॉलीन झालो. आता एव्हाना आम्हाला कोणाला सांगायला लागायचे नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच व्हायच्या. इन थ्रिज फॉलीन न होता असे जमावासारखे उभे राहिले तर प्रत्येकाला कसेसे वाटायला लागायचे.



जिसीज साSSSSवधान. आठवड्याचा कोर्स सीनियर मी होतो. मार्च करत मी कॅप्टन गिल कडे गेलो. थम. एक दो. करून उजवा हात शिताफीने उचलून डाव्या हाताच्या खांद्यावर मारला. जेव्हा रायफल स्लिंगला लावून ती डाव्या खांद्यावर लटकवलेली असते तेव्हा नेहमी सारखा उजवा तळ हात डोक्याच्या कडेला लावून सॅल्यूट नसतो करायचा हे आता ड्रिल करून करून व शिक्षा झेलून झेलून पक्के झाले होते.



गुड मॉर्निंग सर. 120 जिसीज प्रेझेंट फॉर फायरिंग सर.



कॅप्टन गिलने सॅल्यूट करून माझ्या सॅल्यूटला उत्तर दिले व आम्हाला म्हणाला -



गाईज नेक्स्ट फोर डेज इज फायरिंग ड्युरींग द डे. वन्स् यू फिनिश धिस देअर विल बी नाइट फायरिंग. लर्न इट प्रॉपर्ली. धिस इज युअर मोस्ट इम्पॉर्टन्ट फेज ऑफ ट्रेनिंग. रिमेमबर द मोर यू स्वेट इन पीस द मोर यू सेव्ह ब्लड ड्यूरींग वॉर.

जितना पसीना आभी बहाओगे । उतना खून लडाईमे बचाओगे ।



येस सर. आमचा सांघिक आवाज त्या स्टॅन्ड नंबर फाइव्ह मध्ये दुमदुमला. आम्ही उतावीळ झालो होतो.



गाईज. यू विल बी हॅन्डलींग रिअल बुलेट राऊंडस अॅन्ड इट इज डेंजरस इफ इनफ प्रिकॉशन इज नॉट टेकन. डिसिप्लीन इज पॅरामाऊंट व्हाइल फायरिंग. आदर वाईज यू विल अॅन्ड अप किलींग युअर ओन फोर्सेस, युअर ओन मेन, रादर दॅन एनीमी फोर्सेस. डोन्ट फरगेट द बेसिक डिसिप्लीन बॉइज..... अॅन्ड वी वील एनशूअर, डॅट यू डोन्ट फरगेट इट. बेस्ट ऑफ लक. विSSSSश्राम.



मॅकटीला कंपनी सावधान. आमचा उस्ताद, हवालदार इष्ट देव मिश्राने आता आमचा ताबा घेतला. आम्ही त्याला नंतर नंतर कष्ट दे मीश्रा म्हणायला लागलो. कष्ट दे मिश्राने आल्या आल्या आमचे ‘ट्रेनिंग’ सुरू केले. सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला दहा दहाच्या बारा डिटेल्स् मध्ये वाटले गेले. फायरिंग करतानाची कवायत कष्ट दे मिश्राने समजावून सांगितली.



एका वेळेला तीन डिटेल्स्. दहा फायरिंग पॉईन्टस् मागे इन थ्रिज आपली आपली रायफल डाव्या खांद्याला टेकवून जमिनीवर मांडी घालून बसा. जेव्हा पहिले डिटेल फायरिंग पॉईन्ट वरून फायरिंग करत असेल तेव्हा दुसरे डिटेल पहिल्या डिटेलच्या प्रत्येक जिसी मागे फायरिंग करताना खालीखोकी उडतात ती आपल्या जॅपकॅप मध्ये साठवून घेण्यासाठी सज्ज असले पाहिजे. फायरिंग करून झाल्यावर फायरिंग टार्गेट्स पर्यंत पळत जाऊन प्रत्येक जिसीचा फायरिंग स्कोर टिपण्यासाठी तिसरे डिटेल. अशी कवायत अविरत फायरिंग संपे पर्यंत चालत राहिल. फायरिंगची ही कवायत अत्यंत चोखपणे चालावी लागते नाहीतर अपघात होतात. कारण भरलेली रायफल हातात असणार, बुलेटस् खऱ्या असणार, थोडीशी सुद्धा हलगर्जी झाली तर शेजारचा जीवानिशीच जाईल. म्हणून रायफलचे बॅरल नेहमी टार्गेटकडेच रोखून ठेवलेले असावे. बेसावधपणे ते जर इकडे तिकडे फिरवले व चुकून रायफलच्या चापावर बोट पडले तर आजूबाजूचे हकनाक मरतील. आम्हाला घाम फुटला, त्या आजूबाजूला आम्हीच तर होतो.



कष्ट दे मीश्रा आम्हाला फायरिंगच्या कवायतीचे बारीकसारीक पैलू सांगत होता. त्याच्या खड्या आवाजात आम्हाला ऑर्डर देत होता.



डिटेsssल खडे होs।

त्या बरोबर मांडी घालून बसलेले व डोक्यावर हेल्मेट लावलेले, पहिले तिन्ही डिटेल उभे राहिले.



नंsssबरएक डिटेल आगेssss बढ। तेज चल।

जसे फायरिंग पॉईन्ट जवळ पाहिला डिटेल आला तसे....



थम्। लेsssटके पोझिशन्।

जिसीनी लेटके पोझिशन घेतली.

खराssssब.... एकदम खराssssब। पहिल्या डिटेलची लेटके पोझिशन कष्ट दे मिश्राला आवडली नसल्या मुळे तो जोरात किंचाळला.



खडे होsss। फिर एकबार लेsssटके पोझिशन................ असे बऱ्याच वेळेला प्रत्येक डिटेल कडून करवून घेतल्या शिवाय कष्ट दे मिश्राला चैन पडायचे नाही. तेवढ्यात एका लेटके पोझिशन मध्ये माझ्या डांगरीच्या अस्तनीतून बाहेर डोकावणारा आतून घातलेला स्वेटर कष्ट दे मिश्राच्या नजरेस पडला.



ये जिसी फॉल आऊट। बहोत ठंड लगती हैं जिसीको। आभी गरमी लाता हूं।

मला डिटेलच्या बाहेर काढले.

सुरू न झालेली बाकीच्या डिटेलची फायरिंग तेथेच थांबली. पाहिलाच डिटेल.



जिसी आकाश, आपकी रायफल नीचे रखो।

डांगरी उतारों।



मला सगळ्यांसमोर डांगरी उतरायला लावली. डांगरी उतरल्यावर मी आत घातलेला मरून रंगाचा स्वेटर दिसायला लागला. पाठीमागे अमित, सुब्बू, परितोष, सुनील खेर ह्या सगळ्या माझ्या प्लटूनच्या जिसींबरोबर बाकी अनेक जिसींचे फिदीफिदी हसणे मला ऐकायला येत होते. खूप राग आला होता व सगळ्यांसमोर बीना डांगरीचे उघडे उभे राहायला लाज पण वाटत होती. थंडी वाजत होती ती वेगळीच.



वर्दी ठीक क्यो नही पेहनते आप लोग। ये प्रायवेट स्वेटर जो डांगरीके अंदर था वो निकालो। ऐसा गलत ड्रेस पहनननेका पर्मिशन किसने दिया आपको।



ये माचीस लेलो। कष्ट दे मिश्राने त्याची सिगारेट शिलगावण्याची माचीस काढून माझ्या हातावर दिली. मी कष्ट दे मिश्राकडून काडेपेटी घेऊन परत उभा राहिलो. मला अंधुकशी कल्पना आली आता काय होणार त्याची.



जिसी आकाश, अब बीना देर किये आपका ये प्रायव्हेट स्वेटर उतारो और जलाओ। मी तो स्वेटर पेटवला, डोळ्यात पाणी आले, तो स्वेटर तिकडे थंडी असेल म्हणून माझ्या आईने तिच्या स्वेटर विणायच्या मशीनावर विणून दिला होता. रोज रात्री झोपताना घालायचो. आई जवळ असल्याचा भास व्हायचा. दिवसभर दमल्यावर आईच्या कुशीत झोपल्या सारखे वाटायचे. ज्या गोष्टींवर आपली खूप आस्था असते अशा गोष्टी दुसरा माणूस कधीकधी सहजच तुडवून जातो. ह्यात आपण कोणाच्या आस्थेला धक्का पोहचवला आहे हे त्याच्या खिजगणतीत सुद्धा नसते. त्याच्या दृष्टीने तो एक साधा स्वेटर होता पण तोच स्वेटर माझा कमफर्ट झोन होता. कधी कधी आयुष्यात अशा गोष्टी घडतात आणि त्या सुद्धा अचानक. अचानक घडल्या मुळेच आपण कदाचित तोंड देऊ शकतो. कोठून स्वेटर घालायचे मनात आले असे झाले मला. पाठीमागून परत एकदा मुलांचे हसणे ऐकायला आले. फिदीफिदी हसणे ऐकून कॅप्टन गिल आला. त्याने बाकीच्या जिसीजना फर्मावले.



जोकर्स, लाफिंग अपॉन युअर फेलो जिसी. वेट आय विल रब दॅट स्माईल फ्रॉम युअर फेस.



मग दूरवर एका झाडाकडे बोट दाखवत त्यांना म्हणाला. मॅकटीला कंपनी सावधान, सामने देख। आठसो मीटर सामने, एक किकर का पेड। नाम किकर।



एव्हाना सगळ्या जिसींना ते आठशे मीटर दूर बाभळीचे झाड दिसू लागले. कॅप्टन गिलचे चालूच होते.



उस किकर को दाये छोडके आना। पहले तीन लुंगा। बाकीची मुले छू झाली व मला मनातल्या मनात गुदगुल्या व्हायला लागल्या. बऱ्याच वेळाला त्या झाडाला शिवून झाल्यावर कॅप्टन गिलने, ज्यांनी ज्यांनी आतून स्वेटर घातले होते त्यांना काढायला लावून त्याची होळी पेटवली. किती जणांच्या आस्था त्या होळीत पेटल्या गेल्या असतील आम्हालाच ठाऊक. त्या दिवसा पासून पुढे कधी कोणी गणवेशात स्वतःहून फेरबदल करण्याच्या भानगडीत पडले नाही.