Friday, January 28, 2011

२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू – भाग २



(१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले. हा एक प्रकारचा होलोकास्टच त्यांनी अनुभवला................ वाचा २० वर्ष - विस्थापित काश्मिरी हिंदू – भाग १)

आमच्या बॅच मध्ये सुनील खेर नावाचा काश्मिरी जीसी होता. आमच्या सारखाच तो ही एक कॅडेट. अधिकारी होण्याच्या प्रतीक्षेत दिवस मोजत. त्याला वडील नव्हते. तो आणि त्याची आई, बारामुल्ला जवळच्या सोयीबुक ह्या गावात राहायचे. त्यांची छोटी हवेली होती तिथे. त्याचे वडील काश्मीर खोऱ्यात एका दैनिकाचे संपादक होते. एक दिवस ते त्यांच्या कचेरीतून परत आलेच नाहीत. आज पर्यंत त्यांचा पत्ता लागला नाही. हल्ली त्याच्या कुटुंबाने वडील परत भेटण्याची आशा सोडून दिली आहे.

तो आम्हाला काश्मीर बद्दलच्या गोष्टी सांगायचा. तो पर्यंत मला लोकसत्ता, म टा ह्या नियतकालिकामधून व वेगवेगळ्या मासिकातून वाचलेला तपशील एवढीच काय ती काश्मीर बद्दलची माहिती होती. आय एम ए च्या मुलाखती साठी केलेली तयारी, ती पण अशी तशीच. थोडक्यात काश्मीर प्रश्ना विषयी एकदम तोकडी कल्पना होती. मला इंडियन एक्सप्रेस नियतकालीकेत, १९८६- ८७ मध्ये छापून आलेला काश्मीर विषयीचा लेख वाचल्याचे आठवत होते. त्यात निवृत्त ब्रिगेडियर एन बि ग्रॅन्ट ह्यांनी लिहिले होते की १९४८, १९६५ आणि १९७१ मध्ये भारत पाक युद्धांमधून झालेल्या पाकिस्तानच्या जबरदस्त पराजयाचा धक्का पाकिस्तानाला सतत सतावत असतो. पाकिस्तानाला कळून चुकले आहे की, भारता बरोबर सरळ युद्ध केल्याने त्या देशाची वित्त व मनुष्य हानी फार होते आहे. ह्या सर्व बाबींचा विचार करून पाकिस्तानच्या इंटर सर्विसेस इंटलीजन्स (आय एस आय) ने एक नवी योजना आखली आहे. त्या योजने नुसार सरळ युद्धा पेक्षा अतिरेकी संघटना उभारून भारत आतून पोखरून टाकायचा. मग अशा पोखरून अशक्त भारताला हरवायला वेळ लागणार नाही. योजना चार पदरी कार्यक्रमावर आधारित अशी राबवायची. पाहिला पदर – काही काश्मिरी युवकांना भडकवून पाक व्याप्त काश्मीर मध्ये नेऊन प्रशिक्षण देऊन अतिरेकी बनवणे. काश्मीर मधल्या भारत पाक युद्ध विराम सीमे (लाइन ऑफ कंट्रोल) मधून अशा अतिरेक्यांना खोऱ्यात धाडायचे. एकदा अतिरेकी आत घुसले की मग त्यांचे थैमान चालू द्यायचे. अशा अतिरेक्यांना एके ४७, हॅन्ड ग्रेनेड्स व तत्सम साधन सामुग्री पुरवायची. दुसरा पदर – जम्मू काश्मीर राज्य प्रशासन अतिरेकी कारवायांनी व अतिरेकी फतव्यांनी खिळखिळे करायचे. तिसरा पदर – काश्मिरी हिंदूंना पहिल्यांदा खोऱ्यातून व नंतर उधमपूर जम्मू मधून हुसकवून लावून काश्मिरी हिंदूंची संख्या नगण्य करायची. त्याच युक्तीचे पुनरावर्तन कारगिल व त्याच्या वरती लडाख भागात मग करायचे. शेवटचा चौथा पदर – काश्मिरी मुस्लिम जनतेला भारता विरुद्धं जेहाद साठी उत्तेजित करायचे.

ह्या पार्श्वभूमीवर जेव्हा जीसी सुनील खेरच्या रूपाने प्रत्यक्ष काश्मिरी हिंदू भेटला तेव्हा काश्मीर संबंधी बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या. आम्ही वेळ मिळेल तेव्हा सुनील खेर व अजून एक काश्मीरचा राहणारा जीसी हिरालाल गाडरू ह्या दोघां कडून काश्मीरच्या स्थिती बद्दल चौकशी करायचो. हिंदूंची होणारी गळचेपी व ससेहोलपट खरेच होतेका, हे आम्हाला जाणून घ्यायची प्रबळ इच्छा असायची. त्या दोघांकडून आम्हाला कळले की काश्मिरी हिंदूंची घरे रोज कशी जाळली जात आहेत व धमक्या कशा मिळत आहेत ते. आम्ही जीसी सुनीलला नेहमी सांगायचो की आईला घेऊन दुसरीकडे राहा म्हणून आणि त्यालाही तसे राहायचे होते पण दुसरीकडे राहायला लागणारे पैसे नव्हते व त्याची आई तयार नव्हती काश्मीर सोडायला. काश्मीर सोडून दुसरीकडे राहायचे म्हणजे काश्मीर मधले घर विकावे लागणार होते. दुसरीकडे म्हणजे कोठे स्थायिक व्हायचे हा प्रश्न होताच त्याला सतावणारा. आता पर्यन्त खोरे सोडून कोठेही गाडरू कुटुंब राहिले नव्हते. त्यातून वडील सापडत नाहीत ह्याची सतत मनाला खंत लागून राहिलेली. सैन्यात जाऊन अधिकारी होण्याचे लहानपणापासूनचे सुनीलचे स्वप्न होते. सैन्यात राहायला सरकारी घर मिळते हे कळल्यावर तर सुनीलला त्याच्या अडचणीचे उत्तरच सापडल्या सारखे झाले होते. म्हणूनच जरी आई एकटी राहणार असली तरी तो तिच्याशी भांडून आय एम ए मध्ये दाखल झाला होता. आय एम ए चे शिक्षण पूर्णं करूनच आता घर बदलायचे असे त्याने ठरवले होते.

काश्मीर मध्ये हिंदूंची घरे विकली जात नाहीत तर ती बळजबरीने घेतली जातात हे त्यावेळेला मला पहिल्यांदा समजले. जीसी हिरालाल गाडरू (हा जीसी, वर्ष भर आम्हाला त्याच्या आडनावाचा उच्चार बरोबर कसा करायचा हेच शिकवीत राहिला व आम्हीही मुद्दामून त्याला गदरू असे बोलवत राहायचो. हा खेळच झाला जणू काही. शेवटी त्याचे नाव जीसी हिरालाल गाडरू ऐवजी - जीसी हिरालाल गदरू नहीं गाडरू - असे लांबलचक पडले. वीस वर्षांनी जेव्हा त्याची भेट पुन्हा झाली तेव्हा मी त्याला ह्याच नावाने संबोधले होते. ) ह्या गाडरू च्या वडलांची लाकडाची वखार होती ती जाळली होती अतिरेक्यांनी.

अशा परिस्थितीत भर म्हणजे लहानपणापासून काश्मिरी जनतेने टेलिव्हिजन वर फक्त पाकिस्तानी कार्यक्रमच बघितले होते कारण तेवढेच दिसायचे. आपले दूरदर्शनचे प्रक्षेपण तेथ पर्यंत पोहचायचे नाही. लहानपणापासून त्यांना रेडियोवर फक्त उर्दू ऐकायला मिळालेले. त्यात सुद्धा पाकिस्तानी कार्यक्रम. काश्मीर हून जम्मू भागाला जोडणारा असा एकच रस्ता – जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग - एन एच वन. थंडीत बर्फवृष्टीमुळे जवाहर बोगदा कित्येक वेळेला बंद व्हायचा. त्यामुळे एन एच वन बंद व आवक जावक बंद. रेल्वेचा प्रवास तर अजून सुद्धा नाही श्रीनगरला. ह्याच्या उलट पाक व्याप्त काश्मीर कडून मात्र दळणवळण नेहमी चालू असायचे. काश्मीर खोऱ्यातल्या लोकांचे नातेवाईक व लग्न संबंध असायचे पाक व्याप्त काश्मिरात.

ह्या सगळ्याचा परिणाम काश्मिरी हिंदू मानसिकतेवर होत होता व अजूनही होत आहे. भोवतालची लोकवस्ती आपल्या बरोबर नसेल तर केवढी पंचाईत होते सगळ्या बाबतीत. आपल्याला सगळ्यांनी वाळीत टाकल्या सारखे वाटायला लागते. काश्मिरात त्या वेळेला अशी परिस्थिती होती की साधे घरा बाहेर सुद्धा पडता यायचे नाही. दिसता क्षणी गोळी घालण्याचे आदेश सतत असायचे. दोन दोन महीने कर्फ्यू चालायचा. शाळातर नेहमीच बंद असायच्या. बऱ्याच शाळा हळूहळू सशस्त्रबलांनी ताब्यात घ्यायला सुरवात केली होती. त्यांना तिथे छावण्या लावायच्या होत्या. सतत हिंदूंची घरे जाळणे, त्यांना पळवून नेणे, त्यांना धाक दाखवून घरे खाली करायला लावणे, त्यांना नोकऱ्या न देणे, मुली व महिलांवर अत्याचार होणे हे सगळे प्रकार हळूहळू १९८९ मध्ये वाढायला लागले होते. त्या मुळे जरी ती लोकं काश्मिरी हिंदू असली तरी बाकीच्या हिंदूंपेक्षा खूपच दूरचे झालेले व दुरावलेले असे होते. मानवी हक्क समिती (ह्युमन राईटस कमिशन) त्या वेळेला मूग गिळून बसले होते का काय कोण जाणे.

आम्हाला कोर्स मध्ये आठ महीने झाले होते. आम्ही ८ दिवसांच्या भदराज कॅम्पला गेलो होतो. हा कॅम्प डोंगराळ प्रदेशात युद्ध कसे करायचे ह्या शिक्षणाचा भाग म्हणून असतो (माउंटन वॉरफेअर ट्रेनिंग). संपूर्ण कोर्स ४ बटालियनस मध्ये विभागलेला असायचा. ह्या ४ बटालीयन् स नेतृत्व आलटून पालटून कोण्या जीसी वर सोपोवले जायचे. भदराज ह्या कॅम्प साठी त्या त्या तुकडीचा तेवढ्या वेळे पुरता नेमून दिलेला जीसी मग सेनापती असायचा. माउंटन वॉरफेअर संबंधी आय एम ए मध्ये जे काही शिकवले ते उपयोगात आणून भदराज वर धावा बोलायचा.

डेहराडूनहून मसुरी चे डोंगर दिसतात. त्या डोंगरांच्या रांगेतला भदराज नावाचे सगळ्यात डावीकडचे शिखर. त्या शिखरा वरती एक मंदिर आहे. भदराज साधारण ५५०० फुटा उंचीचा. त्या पर्वतराशीला लोअर हिमालयन रेंजेस असे म्हणतात. ते शिखर सर करून परत आय एम ए मध्ये यायचे. चारही बटालीयन् स मध्ये चुरस. जी बटालीयन भदराज सर करून पहिल्यांदा आय एम ए त पोहोचेल ती जिंकली. त्या बटालीयनला भदराज चषक मिळायचा. भदराज चढायला रात्री सुरवात करायची. पूर्णं युद्ध पोषाखात – जंगलात घालतात ते कॅमोफ्लॉज कपडे, तोंड ब्ल्यांको ने काळे केलेले, पाठीवर मोठा पॅक त्यात अत्यावश्यक लागणारे सामान. भूक शमवण्यासाठी शक्करपाऱ्याच्या वड्या, टेंट बांधण्यासाठी आवश्यक असे ताडपत्रीचे बिवोक, एक दुर्बीण व चुंबकीय कंपास. ह्या सगळ्याचे वजन साधारण १५ किलो भरायचे. कमरेच्या पट्टयाला लागलेली अर्ध्या लीटरची पाण्याची बाटली. तेवढेच काय ते पाणी (माहीत नसलेल्या ठिकाणाहून पाणी पिण्यास सक्त मनाई कारण शत्रूच्या इलाक्यात शत्रूने इलाका सोडून पळताना विहिरींमध्ये विष घालून ठेवले असेल तर जिंकलेला इलाका पाण्याच्या लोभापायी घालवावा लागेल. आपली माणसे मरतील ते वेगळेच). हातात गवत कापण्यासाठी दाह किंवा खुरपे व खांद्यावर साडे पाच किलो वजनाची आता पर्यंत अंगाचाच भाग झालेली अशी रायफल. पहाटे पर्यंत भदराज सर करून आपला तिरंगा फडकवून आय एम ए कडे परत यायला लागायचे. परतीचा रस्ता दिलेल्या नकाशा वरून थोधत. असा तो भदराजचा कॅंप. साधारण ४० किलोमीटर चा तो शेवटचा मार्च म्हणजे चिकाटी, ताकद, शिस्त, धाडस, नेतृत्व व तुकडीतले सामंजस्य ह्या वर अवलंबून असायचे. परतताना आमच्या माणेकशॉ तुकडीचे नेतृत्व जीसी रोहित वर्मा ह्यावर सोपोवले गेले होते. आम्ही नकाशे पाहत आमच्या गटातल्या साथीदारांसह आय एम एत परतलो. ४० किलोमीटर चालून आल्याने सगळे जीसी दमले होते. पण साथिदारांबरोबर चालताना एवढे दमलो असे वाटत नाही. कदाचित एकट्याला एवढे अंतर जड गेले असते. पंढरपूरच्या वारीचे पण तसेच असेल. ग्यानबा तुकारामाचा गजर व आजूबाजूला वारकऱ्यांचा मेळा ह्या मुळे तेच अंतर समजून येत नाही, सहनिय होते व उलट आनंद मिळतो.

पोहोचल्या बरोबर शस्त्रागारात आपआपल्या रायफली, दुर्बिणी व चुंबकीय कंपास जमा झाल्यावर आमचे स्वागत गरम गरम चहा व बिस्किटांनी झाले. हा प्रत्येक कॅंप चा आमचा सगळ्यात आवडणारा भाग असे. आम्ही आतुरतेने ह्या मेजवानीची वाट बघायचो. आमचे शिक्षक कॅप्टन गिल - आय एम ए मध्ये अशा शिक्षकाला डायरेक्टींग स्टाफ (डी एस) असे संबोधले जाते. आमच्या डी एस ह्यांनी त्या दिवशीचे बाकीचे आय एम ए चे कार्यक्रम आमच्या साठी रद्द झाल्याची घोषणा करताच सगळ्या जीसी कडून उत्फुर्त पणे माणेकशॉ बटालीयन की जय निघाले. आमचे अर्धे दमणे तेथेच विरून गेले. आता प्रत्येक जण त्यांना आलेल्या पत्रांचे वाचन करण्यात गुंग झाला. १९८९ मध्ये मोबाईल काय असते ते कोणालाच माहीत नव्हते व दूरध्वनी सेवा नुकतीच सुरू झाली असल्या कारणाने ती फक्त आय एम एच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्येच असायची अन तेथे जायचे म्हणजे काही सोपे नव्हते. त्या मुळे आम्ही व आमचे आप्तेष्ट ह्या मध्ये असणारा पत्र हा एकच दुवा होता.

मी माझ्या आईचे पत्र संपवतच होतो तेव्हा माझ्या कडे जीसी सुनील खेर व जीसी हिरालाल गाडरू आले. सुनीलचा रडवेला चेहरा पाहून मी काय झाले म्हणून विचारले. मला म्हणाला – आईला अतिरेक्याचा धमक्या आल्या आहेत व त्यांनी महिना अखेर पर्यंत घर सोडायला सांगितले आहे. त्याच्या तोंडाचे पाणीच पळाले. एक तर घर सोडून ती अशी एकटी जाणार कोठे. खोऱ्या बाहेर नवे घर घ्यायला पैसे नाहीत. असलेले घर विकता येत नाही अशी काश्मीर खोऱ्यात परिस्थिती आणि हे सगळे करायला सुनीलला सुट्टी कोण देणार व कशी मागणार सुट्टी. आमचा डि एस, कॅप्टन गिल असा कर्दन काळ होता की त्याच्या कडे जाणे म्हणजे शिक्षा घेऊनच येणे असे होते. आम्ही काही बोलायच्या आधीच, तो आमच्या चुका काढायचा. आमच्या पोशाखात जरा जरी खोट सापडली तर तेथेच आमची रोलिंग सुरू. आता हे रोलिंग काय तंत्र आहे ते समजावून सांगतो. आपण कशा लहानपणी गाद्या टाकल्या वर कोलांट्या उड्या मारायचो. अगदी तशाच कोलांट्या उड्या मारणे म्हणजे रोलिंग. फक्त हे रोलिंग गाद्यांवर नाही करायचे. आता हे रोलिंग कधीही कोठेही व कोणच्याही कपड्यांमध्ये होऊ शकते. आम्ही रोलिंग अंडरवेअर (फक्त) पासून कोट टाय मध्येही केलेले आहे. रस्त्यावर, खेळाच्या मैदानावर, उथळ वाहणाऱ्या टॉन्स नदीच्या पात्रात, ड्रिल स्क्वेअर मध्ये भर दुपारी असे वाटेल तिथे केलेले आहे. त्या मुळे आम्ही शक्यतोवर आमच्या डि एस कडे जायचे टाळायचो. पण आजचा दिवस वेगळा होता. एक तर आमच्यावर कॅप्टन गिल खूश होता कारण माणेकशॉ बटालीयन भदराज मध्ये सगळ्या बटालीयन् स मधून पहिली आली होती व म्हणूनच त्या दिवशी सुट्टी मिळाली होती. बाकीच्या बटालीयन् स आल्या आल्या कपडे बदलून पुढच्या कार्यक्रमाला लागल्या होत्या. धीर धरून आम्ही कॅप्टन गिल कडे गेलो. घाबरत घाबरत सुनीलने सगळे सांगितले. कॅप्टन गिलला सुनीलची घरची सगळी परिस्थिती माहीत होती. त्या मुळे त्याने सगळे नीट ऐकून घेतले. आज आमच्या पोषाखाची खिल्ली उडवली गेली नाही व शिक्षेचे नावही निघाले नाही. सगळे ऐकून घेतल्यावर तो म्हणाला – मी समजू शकतो तुला सुट्टी हवी आहे. तू सुट्टी चा अर्ज लिही मी शिफारीश करतो बाकी पुढचे कंपनी कमांडर व बटालीयन कमांडर वर अवलंबून आहे. मी पण तुझ्या सुट्टी बद्दल त्यांच्याशी बोलेन. सुनीलने वेळ जायला नको म्हणून डि एस कडे जाण्या अगोदरच लिहून ठेवलेला अर्ज पुढे केला. कॅप्टन गिलने लागलीच त्याची शिफारिश लिहून तो कंपनी कमांडर कडे स्वतः गेला. सुनीलला रात्री कंपनी कमांडर कडून निरोप आला की त्याला बटालीयन कमांडरने मुलाखती करता सकाळी बोलावले आहे. आमचा डि एस कॅप्टन गिल ह्यांच्याशी रोजच्या रोज संबंध यायचा. पण कंपनी कमांडर मेजर शेखावत कडे जाण्याचा किंवा त्याला भेटण्याचा प्रसंग गेल्या आठ महीन्यात क्वचितच आला होता. बटालियन कमांडर चे डर तर मग विचारुच नका. त्याचे ऑफिस जेथे असायचे तो रस्ता आम्हा जीसीज ना रहदारी साठी बंद होता. त्या रस्त्या वरून आम्हाला जाता यायचे नाही. आम्ही बटालीयन कमांडरला फक्त खेळाच्या मैदानावर किंवा कॅंपस च्या वेळेला पाहीले होते. कर्नल कटोच नाव होते त्यांचे. ज्या जीसीच्या हातून त्यांच्या गेल्या जन्मात घोर पापे घडली असावीत तेच जीसी बटालीयन कमांडरच्या ऑफिस मध्ये जायचे असे काहीसे चित्र होते. ज्यांचे रेलीगेशन होणार असायचे त्यांनाच फक्त तो एकदा भेटायचा हे सांगायला की तु रेलिगेट झालास म्हणून. हे सांगायला फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे कोणताही जीसी त्याच्या ऑफिस मध्ये दोन मिनटा पेक्षा जास्त वेळ कधीही उभा राहिला नव्हता. त्या मुळे जीसी सुनील खुप घाबरला होता. जेव्हा दुपारच्या जेवणाच्या वेळेला भेटला तेव्हा त्याचा चेहेरा अजूनच रडवेला झाला होता. तो म्हणाला बटालीयन कमांडर ने सुट्टी चा अर्ज रद्द केला. म्हणाला हे काही कारण होत नाही सुट्टी मागायला. आम्हाला राग आला व खुप वाईट वाटले. जीसी सुनील खेर तर वेडापीसा झाला होता. खूप शिव्या घातल्या बटालियन कमांडरला. त्याला त्याच्या आई व्यतीरिक्त कोणीच दिसत नव्हते.

त्या संध्याकाळी कॅप्टन गिल आमच्या बरॅक मध्ये सुनीलला येऊन भेटला. सुनील म्हणाला त्याला पण खूप वाईट वाटत होते अर्ज रद्द झाल्या बद्दल कारण त्याने सूनीलच्या सुट्टी साठी कंपनी कमाडरला स्वतः भेटून जीसी सुनील वर बेतलेल्या संकटा बद्दलची कल्पना दिली होती.

कॅप्टन गिल ला संध्याकाळी भेटल्या पासून जीसी सुनील खेर मध्ये आम्हाला अचानक एक बदल जाणवला. तो जरी दुःखी होता तरी त्याचा रडवेला चेहरा जाऊन निश्चयी बनला होता. त्याचा चेहरा निग्रही वाटत होता जसा काही त्याला त्याच्या वर बेतलेल्या संकटावर तोडगा सापडला आहे असा.

(क्रमशः)

(राजाराम सिताराम एक, राजाराम सिताराम दो – ही आय एम ए वर आधारीत कथा लवकरच प्रसिद्ध करत आहे)




Sunday, January 23, 2011

२० वर्ष - काश्मिरी विस्थापीत

(१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले. हा एक प्रकारचा होलोकास्टच त्यांनी अनुभवला. त्यामुळे खोऱ्यात आता हिंदू नगण्य राहिले आहेत व हिंदू मत नगण्य झाले आहे. पुढे कधी मताधिकार राबवून (प्लेबिसाईट) काश्मीर प्रश्न सोडवायचा असा निर्णय कार्यान्वित झाला तर फुटिरतावाद्यांना त्यांचा डाव जिंकायला साहजिकच सोपे जाईल. कलम ३७० लागू असल्या कारणाने जम्मू काश्मीर सोडून बाकी लोकं तिथे वस्ती करू शकत नाहीत, पण हिंदूंना मात्र तेथून घालवून देऊन पाकिस्तानचा इरादा सफल होत आहे. १९८८ मध्ये पाकिस्तान च्या राष्ट्राध्यक्ष ह्यांचा ऑपरेशन टोपुक कार्यान्वित झाल्यावर १९८९ – ९० मध्ये ज्या हजारो हिंदूंना मारून, धाक दाखवून पद्धतशीर पणे खोऱ्यातून हुसकवून लावले त्याला गेल्या आठवड्यात २० वर्षे झाली, नव्या पिढीला कदाचित ह्या इतिहासाचे विस्मरण झाले असेल किंवा कदाचित हा इतिहास माहीत पण नसेल. त्या होलोकास्ट चे व त्या काळ्या दिवसांचे स्मरण करून विस्थापित काश्मिरी हिंदूंनी गेल्या आठवड्यात एक मोर्चा काढला होता.

जर नवीन पिढीला होऊन गेलेला इतिहास माहीत नसेल तर पूर्वी राष्ट्राकडून झालेल्या चुका पुन्हा होण्याची भीती निर्माण होते. बरोबर इतिहास माहीत नसेल तर नवी पिढी आहे त्या परिस्तिथीचा विचार वेगळ्याच दृष्टिकोनातून घेऊ शकते. काही वर्षाने मग इतिहास माहीत नसल्याने किंवा त्याचे विस्मरण झाल्याने नव्या नव्या पिढी कडून ही चूक होण्याची देखिल शक्यता आहे आणि मग असे उद्गार निघायला लागतील - की, एवी तेवी हिंदू कोणी तेथे राहत नाहीत, जे राहतात त्यांना काश्मीर भारतात नको आहे आपण का धरून बसायचे काश्मीरला, सोडून द्या ना. भारत विरोधी अरुंधती रॉय ह्यांच्या सारख्या प्रसिद्धीची हाव असणारे स्वयंघोषित नेते ह्याच गोष्टीचा फायदा आता सुद्धा घेताना दिसतात. येणाऱ्या पिढ्या काश्मीर प्रश्नावर सतत उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत राहणार, पण गेल्या २० वर्षांचा इतिहास कोणच्याही शैक्षणिक संस्थांमधून शिकवला जात नाही व ही इतिहासाची जी रिक्त स्थाने आहेत ती भरल्या शिवाय काश्मीर प्रश्नाचे गांभीर्य, सोडवण्याची प्रबळ इच्छा व प्रश्न सोडवण्याचा मार्ग सुकर होणार नाही.

ह्याच पार्श्वभूमीवर ही कथा लिहिली आहे. ह्या कथेत पात्रांची नावे जरी बदलली असली तरी प्रसंग खरे आहेत. परिस्थितीचे वर्णन कथेच्या रूपाने केले असले तरी ज्यांना जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांनी ऑपरेशन टोपुक व त्यानंतर चे काश्मिरी हिंदूंचे विस्थापन ह्या विषयावर लेख, बातम्या, इतिहास ह्या वर अधिक संशोधन करावे. )







२० वर्षापूर्विची गोष्ट. १९८९ चा काळ. आम्ही इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून (आय एम ए) मध्ये होतो. एक वर्षाच्या कालावधीचा सैन्यात अधिकारी बनण्याचा कोर्स. आम्हाला जंटलमॅन कॅडेट (जीसी) असे संबोधले जायचे. आय एम ए चे सकाळी ४ पासून रात्री १० पर्यंत शिस्तबद्ध भरगच्च कार्यक्रम व त्यात काही चूक झाली तर मिळणाऱ्या रोजच्या शिक्षा ह्या मुळे दिवस व महिने कसे संपायचे हे कळायचेच नाही. आय एम ए चे कठोर नियम व ते पाळले नाही तर मिळणाऱ्या कठोर शिक्षा. बऱ्याच नियमांमध्ये एक अजूनच कठीण असा नियम म्हणजे ह्या कोर्सच्या दरम्यान सुट्टी मिळत नाही. अगदीच जर नाईलाज असेल तर चार दिवसाची सुट्टी मिळायची. आय एम ए च्या शब्दकोशात नाईलाज ह्या शब्दाची परिभाषा म्हणजे - जीसी च्या दुर्दैवाने त्याच्या पालकांपैकी कोणाचा मृत्यू झाला तर चार दिवसाची सुट्टी मिळायची. एरव्ही सुट्टी मागितली तर आय एम ए मधल्या शिक्षकगणां कडून त्वरित उत्तर मिळायचे – तुझ्या स्वतःच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा तुला सुट्टी मिळणार नाही मग उगाच कशाला मागतोस. नाही म्हणायला जर कोणी जास्त सुट्टी घेतली तर कोर्स मधून नापास व्हावे लागायचे. त्याला रेलीगेशन म्हटले जायचे. रेलीगेशन म्हणजे आणखीन सहा महिने आय एम ए चे ते नियम व त्या शिक्षा झेला. जर दोनदा रेलीगेशन झाले तर अकादमी मधून काढून टाकले जायचे व तेथेच जीसीची अधिकारी व्हावयाची स्वप्न भंग पावायची. त्यामुळे आम्ही कोणी सुट्टी घेण्याचा विचारही डोक्यात आणायचो नाही.


(क्रमशः)


Thursday, January 20, 2011

हसन अली

हसन अली ह्या इसमा कडे ३७००० कोटी रुपयाची करबाकी आहे असे एक दोन वर्षापूर्वी वाचनात आले होते.

त्या नंतर आता म्हणे त्याच्या कडे ५०००० कोटी रुपयाची कराची थक बाकी आहे.



हा इसम पुण्याचा.



१. हा कोण आहे. कोणाला माहीत आहे का. माझ्या माहिती प्रमाणे ह्या माणसाचे स्टड फार्म आहे पुण्यात. स्टड फार्म एवढा पैसा मिळवून देत असेल तर आतापर्यंत मोठ मोठ्या उद्योजकांनी त्यात पैसा ओतून बरेच असे फार्मस् निर्माण केले असते. मग एवढा पैसा आला कोठून.



२. टाइम्स नाऊच्या नुसार हा कोण्या राजकीय पुढाऱ्याचा मोहरा आहे. कोण असेल तो पुढारी. ५०००० कोटी रुपये जर कर बाकी असेल तर स्विस बॅंकेत त्याच्या तिप्पट पैसा जरुर असणार - म्हणजे साधारण १५०००० कोटी रुपये झाले. ह्या पैशात किती अतिरेकी संघटनांना पैसा पुरवता आला असेल. २०१० - २०११ मध्ये भारताचा सगळा मिळून संरक्षण खर्च १४७००० कोटी रुपये झाला. ह्या राष्ट्रात अराजक माजवण्याचे सामर्थ्य ह्या माणसा कडे आहे. हा विचार डोक्यात येतो. आपल्याला काय वाटते.



एवढे सगळे असून सरकार अजून सुद्धा चुप का.  मला वाटते सरकार ने ह्या पैशाचा जर प्रामाणिकपणाने शोध लावला व ही गोष्ट पुर्णत्वाला नेऊन जर देशा समोर एक केस स्टडी म्हणून ठेवली तर त्यातून फार मोठे कार्य होणार आहे. हे घडवून आणण्यासाठी लागणारी यंत्रणा सरकार कडे आहे, पैसा आहे. फक्त इच्छा शक्ती नाही असे वाटते. ह्याचीच खंत आहे. पैसे खाऊ पणा पुर्वी पण होता पण आता पाणी डोक्यावरून जाऊ लागले आहे. लोक हतबल आहेत का लोकांच्या संवेदना बोधट झाल्या आहेत. त्यांना उठवणारा व जागे करणारा एखादा जांबूवंत पाहिजे आहे.



Monday, November 15, 2010

शाळे बाहेरच्या शाळा

आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमची आई रोज दुपारी आम्हाला रेल्वेलाईन जवळच्या गणपतीच्या देवळात घेऊन जायची. कधी तिथे किर्तन चाललेले असायचे ते ऐकायला बसायचो, कधी प्रवचन चाललेले असायचे त्याला जायचो. किर्तन दोन भागात असायचे पहील्या भागात भागवतातली एक कथा किंवा पुराणातली एखादी घटना भजनां बरोबर किर्तनकार सांगायचे. मजा यायची. दुस-या भागात सांगितलेल्या कथेचा मतीतार्थ सांगायचे. हा भाग जरा गंभीर असायचा व सुरवातीला कंटाळा यायचा वय वाढल्यावर आवडायला लागला. कथेचे सार दुस-याच भागात असते हे कळले. प्रवचनेचे विषय जरा गंभीर असायचे. कधी महाभारतातील सोळा महत्वाची पात्रं, तर कधी गीतेचा अकरावा अध्याय, कधी उपनिषदांवर चर्चा. कधी कधी तर शेवडे गुरुजी प्रवचन करणार असतील तर चक्क १९७१ च्या भारत पाक युद्धातील अभिमन्यु असापण विषय असायचा. पण येवढे मात्र खरे एकदा का जायला सुरवात झाली ह्या किर्तन, प्रवचनांना की आवड वाढते. नवं नव्या गोष्टी कानावरुन जातात. उपनिषदांतून केवढे प्रगाढ तत्वज्ञान आहे ते तेव्हा लहानपणी समजले नाही तरी त्याची कल्पना येते. पुढे त्याचा खुप फायदा होणार असतो. वयाच्या कोणच्या ना कोणच्या टप्प्यावर आपण सर्व जण त्यातले तत्वज्ञान स्विकारतो व त्या तत्वज्ञानाकडे आकृष्ट होतो. हा साक्षातकार केव्हा ना केव्हा प्रत्येक माणसाला होतो. लहानपणी ते तत्वज्ञान नुसते कानावरुन जरी गेले तरी आपल्या आंतरमनात खोल कोठेतरी आपल्या नकळत रुतुन बसते. जिवनाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोण चांगला होतो. मन विशाल होते व आपले मन प्रसन्न व आनंदी रहावयास मदत मिळते.



शाळेला सुट्टी लागायची तशी बाबासाहेब पुरंद-यांच्या शिवाजी महाराजांवरच्या भाषणांना आम्ही जायचो. पुढचे दोन तास प्रत्यक्ष शिवाजी महाराजांबरोबर काढायचो आणि नंतरचे काही दिवस त्याच धुंदीत जायचे.



डोंबिवलीच्या नगरपालीकेचे पुस्तकालय चांगल्या पुस्तकांसाठी खुप प्रसीद्ध होते व ठेवले सुद्धा छान होते. सुट्टीत दुपारी सावरकरांचे काळेपाणी, १८५७ चे स्वातंत्र्य समर, सहा सोनेरी पाने. लोकमान्यांचे गीता रहस्य (त्या वेळेला जरी पुर्णपणे डोक्यावरुन गेले तरी आता कळते त्याचे महत्व) आर्टीक होम ऑफ वेदाज, ऑरायन. पुलंची सगळी पस्तके, वपुंची कथाकथने, रणजित देसाईंची पुस्तके इत्यदी कित्येक अनेक. किशोर मासिक, चांदोबा, गोट्या, चिंगी व चिमणराव, साने गुरुजींची शामची आई, गोनीदां ची पुस्तके व अजुन खुप खुप पुस्तके, आमच्या व बाकीच्या लहान मुलांच्या आवडीनिवडीवर वाचली जायची.



संध्याकाळ झाली की कोणी मोठी उत्सुक ‘ग्राऊंड’ घ्यायचे. म्हणजे जवळच्या मैदानावर खेळ घ्यायचे. मुलं, मुली त्या ‘ग्राऊंड’ वर जायचे. व खेळ घ्यायचे. आम्ही म्हणायचो ‘ग्राऊंडला’ जातो. मोठी समजायची की अमका अमका नेहरु मैदान किंवा बागशाळा मैदानावर गेलाय. मला आठवताय संध्याकाळी लक्ष्मीनारायणाच्या मंदिरा समोर एक घर होते त्यात राहणारे आजोबा त्यांच्या घराच्या गच्चीवर, उत्सुक अशा शालेय मुला मुलींना सभाधीट पणा शिकवायचे. एखादा विषय समोर ठेवायचे व त्यावर बालायला लावायचे. बाकीची ऐकणारी मुले, बोलणारा कसा बोलतो व चुका कसे करतो ते बघायची. त्याची वेळ आली की मग तो बोलायचा व बाकीची ऐकायची. काही मुले संध्याकाळची संघाच्या शाखेत जायची, त्यांच्या शिबिरात जायची. मी पण एक दोनदा शिबिरांना गेलेलो आहे. बहुतेक मुलांना एखादा छंद असायचा. शाळेला लागलेल्या सुट्टीत मग मुलं आपापला छंद जोपासायची. त्यातुन मिळणारा विरंगुळा काही वेगळाच असतो. दिवसभराचा डोक्यावरला ताण काही क्षणातच निघुन जातो.



हे सगळे होत असताना शाळा चालु असायची. शाळेतला अभ्यासक्रम जरी व्यापक असला तरी समर्पक कधीच होऊ शकत नाही. मुलाला एकदा शाळेत पाठवले, मग ती कोठलीही शाळा असो – शेजारची सरकारी शाळा घ्या किंवा अद्ययावत अंतरराष्ट्रीय विद्यालय असो, त्यात वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जरुर मिळते, वेगवेगळे विषय शिकायला मिळतात, जशी शाळा असेल तसे वगवेगळ्या गोष्टी पहायला मिळतात एखाद दुसरा अनुभव पण गाठी लागतो. पण आपल्या विचारसरणीत बसणारे संस्कार होऊ शकत नाहीत. जिवन चांगल्या प्रकारे कसे जगायचे त्याचे पाढे मिळु शकत नाहीत. आपल्या लोकनेत्यांचे जिवन कसे घडले, त्यांचे विचार हे उमजु शकत नाहीत. आपल्या संस्कृतीचा इतिहास व आपली संस्कृती कशी तयार झाली हे समजु शकत नाही. आपले सामाजिक कर्तव्य काय आहे ह्याची कल्पना फार क्वचीतच येऊ शकते. एकुणच शाळा ही ‘अ ब क ड’ शिकवणारी असते पण जिवनाचे ‘कडबोळे’ सोडवण्यासाठी लागणारे धडे देणारी नसते. आपल्या डोक्यावरला आलेला ताण नैसर्गिकरीत्या कसा कमी करायचा ह्याचे शिक्षण नसते. मनाची प्रसन्नता कशी टिकवुन ठेवायची ह्याचे शिक्षण नसते. ह्या जगात तोच मनुष्य यशस्वी गणला जातो ज्याला प्रसन्नतेने व आनंदाने जगता आले आहे.



ह्या सगळ्याचे नकळत शिक्षण देणा-या व चांगले संस्कार करवणा-या शाळेबाहेरील शाळा अजुनही आहेत पण त्यांचा आपण वापर फार कमी करायला लागलो आहे. धकाधकीचे आयुष्य ह्या नावाखाली आपण सगळ्यांनी ह्या शाळेबाहेरील शाळां मधुन आपल्या मुलांचे नाव काढले आहे. आपल्या लहानपणी सुद्धा धकाधकीचे आयुष्य होते. प्रत्येक पिढीला आयुष्य धकाधकीचेच वाटत आलेले आहे. पण आता ग्राऊंड घेणारे काका सहसा सापडत नाहीत. सभेत कसे बोलावे हे शिकवणारे आजोबा स्वतःच वृद्धाश्रमात दाखल आहेत. वेगवेगळे छंद व कला शिकवणारी काकु – का कु करायला लागली आहे. तिला दुरदर्शन वर दिसणा-या ‘सास बहु’ मालिकांमधुन उसंत मिळत नाही. वाचनालये आता गेम्स व ईंटरनेट पार्लर्स मध्ये बदलली आहेत त्यात मुले, नाही नाही ते ज्ञान सर्रास मिळवतात. आपल्या सभोवारचे निरिक्षण करायचे सोडुन स्वतःच्या मोबाइलवर तासनतास बटनं दाबत तल्लीन झालेली मुले आपण हमखास पाहतो. अशाने आपल्या भोवतीची एक प्रकारची जागरुकता असायला हवी ती कमी कमी होऊ लागली आहे. हल्ली आपले काँप्युटर मित्र फार व आसपासच्या ख-या लोकांशी आपल्याला बोलायला वेळ नाही अशी परिस्थिती झाली आहे. मुले फुटबॉल व इतर मैदानी खेळ खेळतात पण पि एस् ३ वर! अशाने जिवाभावाचे मित्रगण व नेत्रुत्व गुण विकसात होण्या पेक्षा मुलांमध्ये माणुसघाणी व विकृत मनोवृत्ती आणि पुढे नैराष्यवादी मनोदशा तयार होते. एवढेच काय पण गणकयंत्रावरच्या काही खेळ सारखे खेळल्याने मुलांमध्ये चुक झाल्यावरच्या पश्चातापाची नैसर्गिक भावना असते ती बोथट होते व चुक होऊन सुद्धा पश्चाताप होईनासा होतो. मुल बिघडण्यामागचे हमखास कारण म्हणजे त्यांच्यातली पश्चातापाची नैसर्गिक भावना नाहिशी होणे.



कोणाला जर वाटत असेल की काय करायचे हल्लीची मुले ऐकतच नाहीत, येतच नाहीत खेळायला कारण मुले म्हणे कॉम्प्युटरलाच चिकटुन बसतात. त्यात मुलांना दोष देण्या पेक्षा त्यांच्या आई वडिलांना द्यावा लागेल. हल्ली साधारण अशा त-हेचे उद्गार आपल्याला सर्रास ऐकायला मिळतात - माझे आयुष्य, मला माझी स्पेस, मी काही फक्त मुलांसाठी जगत नाही मला माझे जगायचे आहे, मी मुलांसाठी का म्हणुन स्वतःच्या स्वतंत्र्यावर आळा घालु?, मी त्यांच्या साठी का म्हणुन बंधन ओढवुन घेऊ?.



आपले आई वडील असेच विचार करते असते तर आज आपण हे वाचत नसतो. पुर्वी डिप्रेशन, बोर होणे हा शब्दच आपण कधी ऐकला नव्हता. हल्ली पालकच म्हणतात व मुले पण बोर व्हायला लागली आहेत. बोर होण्याची पुढची पायरी म्हणजे डिप्रेशन.



हल्ली समाजातील प्रौढ व लहान मुले एकत्र भेटतात व एकमेकांत सुसंवाद सादतात असे बघायला मिळत नाही. ते प्रयत्नपुर्वक पणे केले पाहीजे. शाळेबाहेरील शाळा सक्षम करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे किर्तन, प्रवचनांना प्रोत्साहन देणे. सगळ्यात चांगले प्रोत्साहन म्हणजे आपल्या मुलांना घेऊन अशा कार्यक्रमांना जाणे. किर्तन, प्रवचनांना फक्त म्हातारी लोकं जातात असा जो एक समाजात समज आहे तो आपण स्वतः जायला लागुन बदलला पाहीजे. त्यात कोणाला कमीपणा वाटायला नको, लाज वाटायला नको व मागासलेपणा पण वाटायला नको. आपले क्रिश्चन बांधव पण रविवारच्या मास ला जवळच्या चर्च मध्ये जातातच ना. ते मागासलेले वाटतात का आपल्याला? त्यांना लाज वाटते का? त्यांना त्यात कमीपणा वाटतो का? ते जातियवादी होतात का लागलीच? किर्तनात, प्रवचनात जे सांगितले जाते ते सगळेच्या सगळे देश, काल पात्रानी आपल्याला आणि आपल्या समाजाला लागु होतच असेल असे नाही पण निदान आपल्याला विचाराला चालना तरी मिळेल. ब-याच जणांना आपल्या मुलांना किर्तन प्रवचनांना घेऊन जायचे म्हणजे मुलाला शामळू बनवायचे किंवा लहानवयापासुन वैराग्याचे व अल्पसंतुष्ट होण्याचे धडे द्यायचे असे वाटते. थोडक्यात किर्तन प्रवचनांना लहान मुलांना घेऊन जाणे म्हणजे गृहास्थाश्रमासाठी मुलाला नालायक बनवणे असे काही लोकांना वाटेल. उलट आपली विचारसरणी अशी सर्वसमावशक आहे की वेदांतुन, शास्त्रांतुन, उपनिषदांमधुन, गीतेतुन कधीही टोकाची भुमिका घ्या असे प्रतिपादिले नाही. टोकाचे वैराग्य, टोकाचा संन्यास, टोकाचा उपवास, टोकाची व्रते, टोकाची कर्मे, टोकाचा निस्वार्थीपणा ह्याला विरोधच नाही तर ते तामसी कर्म मानले गेले आहे. माणसाने जगात राहुन, जगाच्या चांगल्या गोष्टींचा अस्वाद घेउन, कर्म न सोडता, प्रसन्न व आनंदी राहुन आपली सदसदविवेक बुद्धी हळु हळु कशी वाढवावी व आत्म्याची उन्नती कशी करावी व त्यासाठी कसे जगायचे हेच प्रत्येक ठिकाणी प्रतिपादिले आहे. हे सगळे करण्यासाठी आपली विचारसरणी ही सर्व समावेशक ह्यासाठी आहे की आपला धर्मच आपल्या शिकवतो की आनंदी कसे रहायचे, प्रसन्न मन कसे ठेवायचे, शरिरास व्यायाम कसा द्यायचा, रोगव्याधीं पासुन दुर राहण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक औषधे व पथ्यपाणी हे आपल्या हिंदुनावाच्या जिवनसरणीतच सामावलेले आहे.



कोठच्याही विचारसरणीचे दोन भाग असतात पहीला भाग – विचार. त्यात समाजापुढे विवेकबुद्धीला अनुसरुन विचार ठेवण्यात येतो. धार्मीक सुत्रे व तत्वज्ञान ह्यात मोडते. दुसरा भाग – क्रिय. त्यात त्या मांडलेल्या विचारांना क्रियेत उतरवणे.



विचार - कोणतिही विचारसरणी लोकांनी अंगीकारण्यासाठी लोकांना ते तत्वज्ञान पटायला पाहीजे. अशा दृष्टीने विचारांची मांडणी केली पाहीजे. आपला धर्म किंवा आपली विचारसरणी हजारो वर्षांपासुन चालत आलेली आहे. कालांतराने त्या परीसावर कधी कधी बुरशी जमते. प्रत्येक पिढीचे मग कर्तव्य बनते की समाजातील मोठ्यानी ती बुरशी वेळोवेळी दुर करावी. आपली विचारसरणी समजायला सोपी ठेवावी. पाखड आहेत म्हणुन आपण तांदुळ टाकुन थोडेच देतो. वेळोवेळी समाजातील मोठ्यांनी पाखड पाखडुन टाकुनद्यावेत. देश, काल व पात्राच्या परिसीमेत ती विचारसरणी कशी सोपी होईल ह्याकडे लक्ष घालायला हवे. लहानपणा पासुन किर्तन प्रवचनांना जाण्याने हे विचार त्यांना विचार करायला लावतात. त्यांच्यातली सारासार विचारकरण्याची ताकद प्रज्वलित होते. चुक झाल्यावर नैसर्गिक पश्चातापाची भावना उफाळुन येते. ही भावनाच लहानांना चांगले गुण आत्मसात करण्यात प्रद्युप्त करते. लहानपणा पासुन विचार कानावर पडले नाहीत तर मग आपली विचारसरणी एकदम अंगिकारली कशी जाऊ शकेल.



क्रिय – मांडलेल्या विचारांना क्रियेत उतरवण्या साठी, समजलेले तत्वज्ञान जिवनात उतरवण्या एवढे सोपे व व्यावहारिक पाहीजे. फार क्लिष्ट चाली रुढींचा लोकांना अनुसरायला कंटाळा येतो व त्या मागचा उद्देश स्पष्ट नसेल तर विचारसरणीवरचा विश्वासच उडतो. तसेच जर देश, काल व पात्र ह्यांना अनुलक्षून आपल्या विचारसरणीला वेळोवेळी धार दिली नाही तर ती लौकरच कालबाह्य होते व अनुसरणीय रहात नाही. आता हे करण्यासाठी काही कोणती धार्मीक बैठक बोलावण्याची गरज नाही किंवा राजकारण्यांसारखी कमिटी बनवण्याची गरज नाही. आपण समाजातील वयस्कर व मोठ्या लोकांनीच वेळोवेळी आपणहोऊन हे हाती घेतले पाहीजे. म्हणजे सुपातले तांदुळ न सांडता पाखड तेवढे जातील असे बघितले पाहीजे. ह्याची सुरवात अगदी आपल्या प्रत्येकाच्या घरात होऊ शकते. आपण लहानांना लागणारी विचारांची योग्य सामुग्री त्यांच्या बालपणीच बालकडु म्हणुन द्यायला हवी. हे साध्य करण्यासाठी काही रुपरेषा दिल्या आहेत –



• आपल्या मुलांना जवळच्या देवळात आठवड्यातुन एकदा किर्तन वा प्रवचनांना घेउन जा. ह्या गोष्टीला आठवड्यात दोन ते तिन तास लागतात जास्तीत जास्त. साधारण वयाच्या चार वर्षांपासुन बारा वर्षांपर्यंत हे करावे लागेल.

• लहान मुलांन मध्ये मिसळा. त्यांच्या बरोबर संध्याकाळी खेळ खेळा. जर का आसपास खेळायचे मैदान नसेल तर त्यांच्याकडुन पळायचा व्यायाम करवुन घ्या. सुर्यनमस्कारांचे मह्त्व पटवुनद्या व त्यांच्या कडुन सुर्यनमस्कार घालुन घ्या.

• लहानांना राष्ट्रव्रती बनवा व राष्ट्रव्रत काय असते ते समजवा.



शाळेबाहेरच्या शाळेची प्रथा तेवत ठेवणे आपल्या हाती आहे. लहान मुलांना दोष द्यायचा सोडुन आपला माणुसघाणेपणा आपण कमी करायला शिकला पाहीजे. आपणच परत पुर्वी आपल्या बरोबर होत असायची तशी लहान मुलां बरोबर सुसंवादास सुरवात केली पाहीजे. ह्या शाळे बाहेरील शाळा कार्यक्षम केल्या पाहिजेत. शाळेबाहेरील शाळांना आपण प्रत्येकाने महत्व दिले पाहीजे.













Thursday, November 4, 2010

सोसायटीचा आदर्श

आदर्श सोसायटी च्या घोटाळ्यावर भरपुर सध्या लिहुन येत आहे. आज पर्यंत मला स्वतःला आभिमान होता की सैन्य हे सरकारी लाचखोर व पैसाचोरी ह्या पासुन ब-यापैकी दुर आहे. आज तो कमी झाला.

ज्यांच्या कडे कौशल्य, कर्तब, शक्ती किंवा बुद्धी असते, आणि परिश्रम करण्याची तयारी असते, तो मनुष्य आपल्या कर्तबगारीवर पैसे मिळवतो. स्वतःचे इमान व स्वतःचा धर्म विकुन नव्हे. थोड्याशा पैशासाठी, आत्मा विकुन आपल्या स्वतःला व आपल्या घरच्या लोकांना सामोरं जाता येणार नाही. प्रत्येक लाचखोर माणसापाठीमागे नेहमी त्याचे हवरट कुटूंबं असते. लाचखोरी करुन कोणाला असे म्हणुन टाळता पण येत नाही की दुस-यानी त्याला लाच घ्यायला लावली - कारण लाच घ्यायची का नाही हे ठरवणारे शेवटी आपण स्वतःच असतो व हा निर्णय आपला स्वतःचा वैयक्तीक असतो. जो लाच खातो व देतो तो आपल्या राष्ट्राचा शत्रू ठरतो, मग तो किती का इतरवेळेला राष्ट्रप्रेमाचा आव आणुदे. जो लाच घेतो, लाच देतो व भ्रष्टाचार करतो तो पापी व राष्ट्रद्रोही असतो. तो देशभक्त असुच शकत नाही. ह्याच साठी जे स्वतःला देश भक्त समजतात त्यांनी राष्ट्रव्रत ( http://rashtravrat.blogspot.com/2010_05_01_archive.html , किंवा


http://bolghevda.blogspot.com/2010/10/blog-post.html )घेतले पाहीजे.

असल्या घोटाळ्यांनी देशा पुढील महत्वाचे प्रश्न - काश्मीर व त्यावर अरुंधती रॉय ह्यांचे व्यक्तव्य, नक्सल कारवाया, अतीरेकी कारवाया व बाकीचे प्रश्न आपोआपच नजरेआड होतात. हे प्रश्न सोडवायला आपल्याला एका शिवाजीची गरज आहे.

आज आपल्याला एका परशुरामाची गरज आहे. जो सा-या भ्रष्टाचारी लोकांचा निप्पात करेल (भारतात मग किती लोकं उरतील? कोण जाणे – का उरणारच नाही? – मध्यम वर्ग सोडला तर). आदर्श ह्याचा इंग्रजी शब्दार्थ Role model असा आहे. छान आदर्श ठेवले जात आहेत नविन पिढी पुढे.

आज आपल्याला एका परशुरामाची व एका शिवाजीची गरज आहे. कोण आहे आपल्यातला असा?

Friday, October 22, 2010

अतिरेक्यांचे मित्र




२१ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे अरुणधती रॉय व त्यांच्या मानवी हक्क जपणा-या मित्रपरीवारांनी (श्री वरावर राव व बाकीचे माओईस्ट मित्र) एक सभा बोलावली होती. ह्या सभेत हुरीयत पुढारी व काश्मीर तोडायला बसलेले श्री सय्यद अली शहा गीलानी हे बोलले. ह्या सभेचा विषय होता काश्मीरला आझादी एकच पर्याय. सभा - कमीटी फॉर द रिलीज ऑफ पोलिटीकल प्रिझनर्स ने बोलावली होती. (हे वृत्त द हिंदु ह्या २२ ऑक्टोबरच्या वृत्तपत्रात छापुन आले आहे.) महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सभेतुन अरुणधती रॉय व तीच्या मित्रांनी ह्या काश्मीर तोडु लोकांना त्यांच्या आझादीच्या भारताच्या विरुद्धच्या लढाईत पाठींबा जाहीर केला आहे.
अशी सभा बोलावण्याची कृती, व अश्या सभेत साक्षात भाग घेणे व त्याही वरुन काश्मीर तोडु अतीरेक्यांना पाठींबा जाहीर करणे हेच मुळी भारतीय कायद्याचे १२४अ कलमाचे उल्लंघन होते. राष्ट्रविरोधी कारवायांसाठी ह्या कलमाखाली आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावता येते. (१२४ अ राष्ट्रविरोधी कृत्य (sedition) – ‘whoever, by words, either spoken or written, or by signs, or by visible representation, or otherwise, brings or attempts to bring into hatred or contempt, or excites or attempts to excite disaffection towards. the Government established by law in India, shall be punished with imprisonment for life, to which fine may be added, or with imprisonment which may extend to three years, to which fine may be added, or with fine’) व त्या दृष्टीकोनातुन बघीतले तर सरकारने अरुणधती रॉय व त्यांच्या मित्रांवर तात्काळ हे कलम लागु केले पाहीजे. व असे होत नसेल तर आपण भारतियांनी व त्यातल्या त्यात राष्ट्रव्रत (राष्ट्रव्रता बद्दल अजुन कोणाला जाणुन घ्यायचे असल्यास, http://rashtravrat.blogspot.com/2010/05/rashtravrat.html ह्या वर टिचकी मारा) घेतलेल्यांने अरुणधती रॉय व त्यांच्या मित्रांवर व त्यांच्या सगळ्या वाङ्मयावर बहिष्कार घातला पाहीजे. हे सच्च्या भारतियांच्या हातुन उपजत झाले पाहीजे. हा बहिष्कार त्यांचे डोके ठिकाणावर येई पर्यंत व त्यांना त्यांची चुक समजुन येई पर्यंत टिकला पाहीजे.
अजुन विचार करण्या सारख्या गोष्टी अशा आहेत
()   अरुणधती रॉय सारखी लोक प्रसिद्ध होण्या साठी व राहण्या साठी कोणच्या ही थराला पोहोचतात. अशा लोकांपासुन आपण सावध रहायला शिकले पाहीजे व अशा लोकांना खत पाणी घालणे बंद केले पाहीजे.           
(ब)    अरुणधती रॉय सारख्या लोकांनी हे समजुन घ्यायला पाहीजे की आपल्या देशाचे ऐक्य सर्वोच्च्य आहे व असायला पाहीजे. भारताचे सार्वभौमुत्व व एकता हे त्यांच्या पैसा, प्रसिद्धी व समाजात नावाजलेले राहण्याच्या ईर्षे पेक्षा जास्त महत्वाचे आहे. भारत आहे तर ते आहेत. व हे जर अशी लोक लौकर समजली नाहीत तर आपल्या सारख्या राष्ट्रप्रेमी व राष्ट्रव्रती लोकांचे कर्तव्य आहे की त्यांना ते समजुन सांगायचे त्यांच्याच भाषेत त्यांच्यावर बहीष्कार घालुन. अशा लोकांना प्रसिद्धी व पैसा हा खुप प्रिय असतो व बहीष्कार घातला तर तो जातो. तेव्हा त्यांची भ्रष्ट झालेली बुद्धी ठिक होते.
(क) आपले सरकार व राजकिय पक्षांनी डोळ्यात तेल घालुन अशा सभांना कोणाचा पाठींबा मिळतो, पैसे कोण देतो ह्याचा थांगपत्ता लावला पाहीजे. त्यांना असे ब-याच वेळेला कळुन येईल की पुष्कळ वेळेस पाकिस्तानच अशा सभांना व एन जो ओ ना पैसे व मदत देत असतो.
()       भारत सरकारने भारतिय कायद्यांचा योग्यतो प्रयोग व उपयोग करुन अशा लोकांना तेथेच व तेव्हाच धडा शिकवला पाहीजे व अशा वेळेस सुज्ञ भारतियांनी त्याला उपजत व पुर्णपणे पाठींबा दिला पाहीजे.
लक्षात ठेवा अब्राहम लिंकन चे वाक्य the idea of secession is the essence of anarchy”. आपले सरकारने ह्याला अजाणपणे पण खत पाणी घालायला नको व सुज्ञ भारतियांनी डोळ्यात तेल घालुन असल्या सगळ्या डावपेचांना शह दिला पाहीजे.



Wednesday, October 6, 2010

हनुमानाला मिळालेला शाप व त्यावर उतारा – भाग ४ (अंतिम)





ज्या धर्माने ज्या विचारसरणीने आपल्या देशाला जिवंत केले, ज्याला अर्थ दिला आहे, देशाचे राष्ट्र बनवले आहे, त्या देशातल्या जर कोणी हिंदू हे नाव घेतले, त्याचा उच्चार केला तर तो जातीय कसा बनेल. ज्या श्वासांनी आपल्यात जीव फुंकरला आहे, तोच घ्यायला मला आता लाज वाटते असे कोणाला वाटायला लागले तर त्याने मेलेलेच बरे. मला श्वास तर घ्यायचा नाही पण जगायचे मात्र आहे असे कदापि शक्य होणार नाही. हे तर सोडाच पण हल्ली आपल्या देशात आपण हिंदू धर्माचा अभिमान न धरणे म्हणजे आपोआपच ‘सेक्युलर’ मानले जातो, असे वातावरण झाले आहे. ह्या विश्वात इतर अनेक देशात आपला म्हणण्यासारखा भारत एक देश आहे व ह्या भारताचे आम्ही आग्रही आहोत व त्याचा आम्हाला अभिमान आहे असे म्हणणे म्हणजे साऱ्या मानवजातीचा जसा अपमान होत नाही तसेच ह्या आपल्या देशात आपला म्हणण्यासारखा आमचा धर्म आहे व त्याचा आम्हाला अभिमान आहे असे म्हणण्याने बाकीच्या धर्मांचा अपमान होत नाही. आता गरज आहे आपल्या धर्माबद्दलची जाणीव होऊन अभिमान बाळगण्याची.



काही लोकांना उगाचच असंबद्ध प्रश्न करायची सवय असते. ते मग नेहमीच्या बिनबुडाच्या शंका काढतात - "लोकांना हिंदू असण्याचा नुसता गर्व असून काय उपयोग होणार. कोणाला नीट माहिती नाही हिंदू धर्म किंवा हिंदुत्त्वा बद्दल. हिंदू हिंदू करणाऱ्यांनी गीता पण कधी वाचलेली नसते. ह्या लोकांना हिंदुह्या शब्दाचा अर्थही कळलेला नसतो. हिंदुत्व म्हणजे काय हे ही समजावून घ्यायचे नसते वगैरे वगैरे". त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, जो भारतात राहतो, जो भारतासाठी जगतो, जो भारता साठी झटतो, ज्याच्या पूर्वजांनी येथे जन्म घेतलेला आहे – हो तरच त्याला आपल्या देशा बद्दल आपुलकी वाटणार. जो मनुष्य भारतहीच त्याची पुण्यभुमी आहे असे समजतो, जो भारतहीच त्याची कर्मभुमी आहे असे समजतो. ज्याला भारताच्या, पूर्वीपासून चालत आलेली समृद्ध अशी संस्कृती ही त्याचीच आहे असे वाटते. ज्याचा आपल्या विचारसरणीवर विश्वास आहे. तो हिंदू होय व त्या तत्त्वावर जो जीवनक्रम उभारतो, ह्या तत्त्वाचा ज्याला अभिमान आहे ते म्हणजे हिंदुत्व. ह्या पुढे जाऊन जो राष्ट्रवताच्या दहा सूत्रांबरहुकूम वागतो तो राष्ट्रव्रती व त्याचे राष्ट्रव्रत हेच खरे हिंदुत्व. इतकेच आपल्या हिंदू बांधवांसाठी पुरे आहे. प्रत्येकाने काही गीता वाचायलाच पाहिजे असे नाही. सगळेच लोकनेते होऊ शकत नाहीत. ज्यांना लोकसंग्रह करायचा आहे, त्यांनी हे व बाकीचे सगळे अभ्यासावे, मनन करावे व लोकांना शिकवावे. लोकांनी अशा श्रेष्ठांचा पुरस्कार करून, त्यांनी दिशा दाखवल्या प्रमाणे जीवनक्रम अनुसरावा. सामान्य जनांसाठी श्रेष्ठांवर विश्वास व हिंदुत्वाचा अभिमान एवंम राष्ट्रव्रताचा पुरस्कार व त्याचे आचरण एवढेच पुरे आहे. श्रेष्ठलोकनेत्यांनी काय करायचे ते श्रेष्ठांना सांगावे लागत नाही. ते करतात व म्हणूनच त्यांना लोकसंग्रहाचे कार्य करायचे काम ईश्वर सोपवतो. अशा श्रेष्ठलोकांनी गीतेत काय आहे त्याचा जरूर अभ्यास केला पाहिजे.





यद्यदाचरती श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः। स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते।।



गीतेचा हा श्लोक ह्या बद्दलचा संभ्रम दूर करतो. सामान्य लोकं नेहमी श्रेष्ठ लोकांचे अनुसरणं करतात असे दिसून येते, कारण श्रेष्ठ लोकांचे कर्म सामान्य लोकं प्रमाण मानतात. व श्रेष्ठ लोकं उत्तुंग कार्य करतात म्हणूनच ते लोकमान्य होतात. त्यांचा लोकसंग्रह कारणी लागतो.



माणसाच्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणी आहेत. त्या त्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणीत, माणूस त्याच्या पुढे येणाऱ्या सगळ्या गोष्टींचे आकलन करून विचार करतो, निष्कर्ष काढतो. समोर येणाऱ्या प्रश्नांना उत्तरं शोधतो. संकटाला तोंड देतो. प्रत्येक मानसिक प्रगतीच्या श्रेणीत त्याचे स्वतःचे मानसिक स्वास्थ्य वाढवायचे ध्येय असते. प्रत्येक श्रेणीत त्याची विचार करण्याची कक्षा ठरलेली असते. तितकीच तो करू शकतो. ती कक्षा ओलांडता येत नाही त्याला. जेव्हा एक मानसिक प्रगल्भतेची श्रेणी पार करून तो दुसऱ्या अजून उच्च दर्जाच्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणीत पदार्पण करतो, तेव्हाच तो आधीची कक्षा ओलांडू शकतो. प्रत्येक चढत्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणीत त्याचे विचार व्यापक बनतात. सामावून घेण्याची कक्षा वाढते. जगाकडे बघण्याची दृष्टी बदलते. मन विशाल होते. आधीच्या मनाच्या श्रेणीत त्याला बऱ्याच गोष्टी पटण्यापलीकडे होत्या. जेव्हा मनुष्य मनाच्या इतक्या प्रगल्भावस्थेत पोहोचतो तेव्हा त्याच्या दृष्टीने वेगवेगळे देश किंवा राष्ट्र ही कल्पना फार कोती ठरते. तो साऱ्या जीवसृष्टीचा विचार करतो. तो मग कोणत्याही धर्माचा, देशाचा, राष्ट्राचा राहत नाही. तो विश्वाचा होतो. विश्व त्याचे असते. त्याचा धर्म हा ‘जिववाद’ होतो. त्याचे राष्ट्र अखिल मानवजात ठरते. त्याचा देश संपूर्ण विश्व असते. त्याच्या दृष्टीने कोणी शेजारी राष्ट्रे नसतात. कोणी शत्रू राष्ट्रे नसतात. ह्याच संकल्पनेतून "सर्व भूत हित" हे ब्रीद वाक्य आपल्या धर्माने आपल्याला दिले आहे. बृहदअरण्यक उपनिषदात सर्व सृष्टीला उद्देशून केलेली सर्वेपिसुखिनःसंतू । सर्वेसंतू निरामया। सर्वेभद्राणी पश्यंतु। मा कश्चित दुःखमाप्नुयात। (१. ४. १४ बृहदअरण्यक) अशी प्रार्थना आढळेल. ही प्रार्थना सर्व सृष्टीला लागू आहे. तसेच "सर्व भूत हीतार्थ" (भगवद्गीता, १२ अध्याय, ४ श्लोक) ही संकल्पना हल्लीच्या "सर्व धर्म समभाव" ह्या पेक्षा प्रगल्भ आहे. "सर्व भूत हितार्थ" ही संकल्पना सर्व धर्मांना तर सामावून घेतेच पण त्याही पुढे जाऊन सगळ्या प्रकारच्या विचारसरण्यांना सामावून घेते, नास्तिक लोकांना सामावून घेते, जिवंत गोष्टी व त्यापेक्षाही पुढे जाऊन निर्जीव गोष्टींना सुद्धा सामावून घेते. एवढेच काय आपली पृथ्वी ही साऱ्या सृष्टीचा एक घटक समजून साऱ्या सृष्टीचा येथे विचार असतो व त्या सर्वांचे उत्थान करण्याचा प्रयत्न ह्या संकल्पनेत केलेला आढळतो. आपली "वसुधैव कुटुंबकम्" ही संकल्पना आजच्या "ग्लोबल व्हिलेज" पेक्षा फार पूर्वीची व सर्व समावेशक आहे.



बहुतांशी असे आढळून येते की अश्या मानसिक प्रगतीच्या उच्चतम श्रेणीत पोहोचलेली माणसे हाताच्या बोटावर मोजण्या सारखी असतात. त्यांच्या मानसिक प्रगल्भतेच्या कमतरते मुळे, बहुतांशी लोकांची विचारांची क्षमता, ह्या संतांएवढी व्यापक होऊ शकत नाही. त्यांचे विश्व एवढे विशाल नसते व अशांची जर प्रगती व्हायची असेल तर त्यांना झेपणाऱ्या अशा छोट्या वर्गात पहिल्यांदा त्यांना बसवून, शिकवून मगच ते पुढच्या इयत्तेत जायला तयार होतात. अशा कोट्यवधी लोकांच्या प्रगतीसाठी राष्ट्रांची संकल्पना उभारावी लागते. अशातऱ्हेने मग वेगवेगळ्या राष्ट्रांचा पुढचा प्रवास - प्रगतीच्या दिशेने त्या त्या लोकसमूहावर सोपविला जातो. त्या त्या विचारसरणीने मंत्रीत होऊन, ते ते देश मग प्रगत होण्यात गढून जातात. ह्या प्रक्रिये मधूनच हळू हळू अजून अजून प्रगल्भ, अजून अजून उन्नत व उत्तम विचारसरणी जन्म पावते. ही गोष्ट राष्ट्रा राष्ट्रात विश्व वाटले गेल्यामुळेच होऊ शकते.



‘हे विश्वची माझे घर’ मानणारे महात्मे मंडळी सुद्धा प्रबोधन करताना, त्यांच्या दृष्टीने क्षुल्लक पण सामान्य लोकांच्या प्रगती करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी धर्म व राष्ट्रांची संकल्पना उभारतात. जो शिक्षक दोन गटात खेळाचे सामने घेतो, त्याच्या दृष्टीने दोन्ही गट सारखेच असतात. पण दोन्ही गटांचे नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांना त्यांचा त्यांचा गट, अत्यंत महत्त्वच वाटतो. चुरशी शिवाय प्रगती नाही. त्यामुळे खेळात कर्णधाराने, त्याचा त्याचा गट कसा पुढे जाईल हेच बघायचे असते व शिक्षकाला दोन्ही गटात फरक वाटत नसून सुद्धा त्याने चुरस निर्माण करायची असते – खेळ व खेळाडूंच्या फायद्या साठी. ह्या प्रक्रियेत कर्णधारही बरोबर आहे व शिक्षकही बरोबर आहेत. इथे फक्त त्यांची श्रेणी वेगवेगळी असल्या मुळे त्यांना ह्या भूमिका घ्याव्या लागतात. कर्णधार जर शिक्षका सारखा विचार करू लागला तर त्याच्या गटाला परवडणार नाही. प्रगती – म्हणजे खेळात त्या गटाची आगेकूच थांबेल व त्याचा गट हरेल. अजून एक उदाहरण पाहण्या सारखे आहे. ह्या भौतिक जगात, भूमितीची जी प्रमेय लागू आहेत, उदाहरणार्थ त्रिकोणाच्या तीन अशांची बेरीज १८० अंश भरते, चौरसाच्या अंशांची बेरीज ३६० असते व आपल्याला वाटत राहते की हे नेहमी असेच राहणार आहे. ही प्रमेय आपण विविध गणिते सोडवायला वापरतोही आणि ती गणिते बरोबरही येतात. हे किती बरोबर आहे ते बघू. ह्या रोजच्या वापरातल्या भूमितीला ‘युक्लीडीयन’ भूमिती असे म्हणतात. कोणाच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही की हिच भूमितीची प्रमेय जेव्हा संपूर्ण विश्वाला (युनीव्हर्स) आपण लावतो तेव्हा ती चूक ठरतात. गणितं चुकतात, कारण जेव्हा संपूर्ण सापडलेल्या, व अवलोकन करता येण्या सारख्या विश्वाला आपण ही प्रमेय लावतो, तेव्हा आपण पृथ्वीच्या नेहमीच्या लांबी, रुंदीच्या मापदंडां पासून मुक्त होऊन त्याच्या कोट्यवधीच्या पटीने मोठ्या व गोलाकार अशा मापांशी खेळत असतो. पृथ्वीवर काढलेली लांबलचक सरळ रेघ, खूप वरून बघितले कर पृथ्वीचा गोलाकार घेतलेली दिसते. त्या वेळेला तेथे ‘युक्लीडीयन’ भूमिती कामास येत नाही. ‘युक्लीडीयन’ प्रमेयांनी ह्या विश्वाची गणितं चुकू लागतात. कारण येथे भूमितीच्या ‘युक्लीडीयन’ पेक्षाही वेगळ्या प्रमेयांची गरज पडते. ह्या प्रमेयां प्रमाणे त्रिकोणाच्या कोनांची बेरीज नेहमीच १८० अशांपेक्षा जास्त भरते. पण म्हणून आपण ‘युक्लीडीयन’ भूमिती बाद ठरवत नाही. कारण आपल्या श्रेणीला तीच बरोबर आहे व उपयोगी आहे. आपल्यासाठी जशी ‘युक्लीडीयन’ भूमिती आहे, तशीच राष्ट्रांची संकल्पना आपल्या प्रगती साठीच आहे. देश जिवंत करणाऱ्या, देशाचे राष्ट्रात रुपांतर करणाऱ्या धर्माची आपल्याला अत्यंत गरज आहे. तो धर्म ज्या विचारसरणीतून जन्मपावला त्या विचारसरणीचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, कारण तीच विचारसरणी, आपल्या मनुष्य समूहाची मानसिक, भौतिक व आधिभौतिक प्रगती करणारी आहे.





आपल्या धर्माचे आपणच रक्षण कर्ते आहोत. धर्माचे रक्षण करणे म्हणजे तलवारी काढणे नव्हे. जर वेळोवेळी कालबाह्य झालेल्या संकल्पनांचा आढावा घेऊन आपल्या धर्माला लागलेली बुरशी काढून तो सोपा करून व लहान, तरुण व वयस्कर लोकांना आकलनीय करून आकर्षित करणारा असा आपला धर्म केला व आपल्या धर्मातल्या चांगल्या प्रथा ठेवून बाकीच्या काढून टाकल्या तर आपल्या धर्माचे आपोआपच रक्षण होईल, तो वाढीस लागेल, त्याला परत पूर्वीचा कस येईल व तो वृद्धींगत होईल. तरुण पिढीला आलेली आपल्या धर्माबाबतची ग्लानी अशीच दूर होईल.



उठा ह्याची जाणीव करून घ्या. ह्याची जाणीव दुसऱ्यांना करून द्या. आपला धर्म जागवा. हे काम आपले आहे. वेळ गेलेली नाहीये, उशीर झालेला नाहीये. आपली ताकद ओळखा. हनुमानाच्या प्रचंड शक्तीची जाणीव करून द्यायला जांबुवंत होता. आपल्यावर लागलेल्या शापाचा आपला उतारा आपणच शोधला पाहिजे. आपल्यातल्या सुप्त ताकदीची जाणीव करून घ्या. संघटित शक्तीचे राष्ट्रव्रत घ्या. आपणच आपले जांबुवंत बना. राष्ट्रव्रती व्हा. राष्ट्रव्रत घ्या.



आता जे राष्ट्रव्रताच्या संकल्पनेशी आकृष्ट झाले असतील त्यांना राष्ट्रव्रत कसे घेता येईल ते पाहू. ज्यांना राष्ट्रव्रत घेण्याचे महत्त्व पटले आहे त्यांनी सर्वात आधी दहा सूत्री राष्ट्रव्रत घेण्याचे मनात ठामपणे आणले पाहिजे. बरेचजण ह्या सूत्रामधील काही सूत्र किंवा कधी कधी सोयी प्रमाणे सगळी सूत्र अमलात आणत असतील. पण म्हणून तो मनुष्य काही राष्ट्रव्रती ठरत नाही. हे व्रत पूर्णतः स्वीकारले पाहिजे. हे ज्यांना पटले त्यांनी राष्ट्रव्रती बनायचा प्रयत्न करावा, कोणाला दाखवायचे म्हणून तेवढ्या पुरते नको. पैशासाठी नको, जोर जबरदस्तीने नको, सोयीसाठी नको. राष्ट्रव्रत हे स्वतःला मानसिक प्रगतीच्या वरच्या श्रेणीत नेण्यासाठी हाती घ्या. आपल्या राष्ट्राच्या कल्याणासाठी घ्या, हिंदू धर्माच्या पुनर्उत्थानासाठी घ्या. आपल्या मानसिक समाधानासाठी घ्या. राष्ट्रव्रत घेण्याने आपोआप आपल्या जीवनाला अर्थ येईल. ह्या विश्वातले आपले वास्तव्य अर्थपूर्ण करण्यासाठी घ्या. नाहीतर आयुष्याच्या शेवटी आपण का जगलो व काय मिळवले असे वाटायला नको. श्वास आहे तोवर जगलो, खाल्ले, प्याले, काही पैसे जोडले गाठीला व प्रजनन केले असे नको. एवढे उद्योग तर बाकीचे प्राणीपण करतात आणि ते सुद्धा आपल्या सारखे रडत कुढत नाही.



आपण ठरवा, पटले तर राष्ट्रव्रत घ्या व एकदा घेतल्यावर स्वतःला दिलेला शब्द पाळा. आपल्या सदसद्विवेक बुद्धीला चालना द्या.



राष्ट्रव्रत घेतल्याने काय होईल? – आपली चित्तशुद्धी होईल. मानसिक प्रगल्भतेच्या अजून वरच्या श्रेणीत आपण सहजच पदार्पण करू शकाल. आपण जर ही सूत्र तंतोतंत नेहमी पाळत गेलो तर आपोआपच आपले एक वेगळे अस्तित्व तयार होईल. बाकीचे लोक आपल्याला राष्ट्रवती म्हणून ओळखतील व आपला आदर्श पुढे ठेवून आपल्या सारखे जगण्याचा प्रयत्न करायला लागतील. आपल्या सगळ्यांच्या अशा राष्ट्रवती आचरणांनी सांघिक शक्तीचा प्रत्यय येईल जे आपल्या राष्ट्राला पोषक ठरेल.



राष्ट्रव्रत घेतले नाही तर काय होईल?

काही नाही, आपले आयुष्य तसेच पुढे रेटत राहील बिनार्थाचे, रडत कुढत. आपल्या धर्मावर, आपल्या राष्ट्रावर विश्वास असेल तर आपण राष्ट्रव्रती होऊ शकता. प्रसिद्ध ब्रिटिश सेनांनी फील्ड मार्शल फिलिप चेटवुडच्या शब्दात थोडा बदल करून राष्ट्रव्रती कसा असावा हे थोडक्यात सांगतो -



आपल्या राष्ट्राची सुरक्षा, राष्ट्राचा सन्मान आणि राष्ट्राचे कल्याण - नेहमीच सगळ्यात आधी.



तदनंतर आपल्या परिवाराचा सन्मान, परिवाराचे कल्याण आणि परिवाराची सोय.



स्वतःची सोय, स्वतःचे कल्याण व स्वतःची सुरक्षा - शेवटी, नेहमीच शेवटी.



आपले राष्ट्र बलाढ्य, समृद्ध व कल्याणकारी करायचे असेल व ते तसे टिकवून ठेवायचे असेल तर पिढ्या पिढ्यांचा प्रयत्न सतत झाला पाहिजे. हे राष्ट्रबांधणीचे कार्य हा आपला राष्ट्रधर्म झाला पाहिजे, आपला स्वभाव झाला पाहिजे. राष्ट्रव्रताची अशी आपली संस्कृती निर्माण झाली पाहिजे. राष्ट्रव्रत हे प्रत्येकाने त्याच्या कुवतीला धरून घेतलेले पवित्र व्रत आहे. रामाच्या खारुटली प्रमाणे राष्ट्रबांधणी रुपी सेतू मध्ये घातलेले खारुटलीचे छोटे दगड आहेत. हे राष्ट्रव्रत आपल्या परिवाराच्या कल्याणाच्या आड न येणारे असे आहे. स्वतःवर ओझे न पाडणारे आहे, आपली गैरसोय न करणारे आहे आणि तरी सुद्धा राष्ट्रासाठी लागणारे सुकार्य आपल्या हातून घडवून आणणारे आहे.



तर मग केव्हा घेताय आपण राष्ट्रव्रत?







Friday, September 24, 2010

हनुमानाला मिळालेला शाप व त्यावर उतारा - ३





- लाचलुचपत व वित्तीय घोटाळ्यांपासून स्वतः दूर राहणे व दुसऱ्याला परावृत्त करणे. ज्याच्या कडे कौशल्य, कर्तब, शक्ती किंवा बुद्धी असते, आणि परिश्रम करण्याची तयारी असते, तो मनुष्य आपल्या कर्तबगारीवर पैसे मिळवतो. स्वतःचे इमान व स्वतःचा धर्म विकून नव्हे. थोड्याशा पैशासाठी, आत्मा विकून आपल्या स्वतःला व आपल्या घरच्या लोकांना सामोरं जाता येणार नाही. लाच घेणाऱ्या प्रत्येक माणसापाठीमागे नेहमी त्याचे हावरट कुटुंब असते.  लाचखोरी करून "दुसऱ्यानी मला लाच घ्यायला लावली" आपल्याला असे म्हणून टाळता पण येत नाही, कारण लाच घ्यायची का नाही हे ठरवणारे शेवटी आपण स्वतःच असतो व हा निर्णय आपल्या स्वतःचाच असतो. जो इसम लाच खातो व देतो तो आपल्या राष्ट्राचा शत्रू ठरतो, लाच खातो तो इसम जास्त मोठा शत्रू. मग इतरवेळेला किती का राष्ट्रप्रेमाचा आव आणूदे. जो लाच घेतो तो पापी व राष्ट्रद्रोही असतो.



- आपल्यातले कला, नैपुण्य सतत वाढवणे व छंद जोपासणे. शरीराला व्यायामाची सवय ठेवणे. आपली मातृभाषा सुधारण्याचा ध्यास घ्या. भाषाकौषल्य वाढवा. बऱ्याचदा आपले भाषाकौषल्य जर अपुरे असेल तर गैरसमज उद्भवण्याचा संभव असतो. आपला जो अभ्यासक्रम असतो, त्याच बरोबर आपण वेगवेगळे आवडणारे असे विषय शिकावेत व ज्यात आपल्याला गती व रस आहे अश्या कला जोपासाव्या व कौशल्य वाढवावे. आपला शालेय अभ्यासक्रम हा बुद्धीला चालना देणारा नसून पुस्तकी जास्त आहे व कौशल्य वाढवणारा नाही. आपणही कौशल्य वाढवायच्या मागे नसतो. कसेतरी करून पदवीधारक बनून नोकरी लागली की झाले, अशी आपली स्वतःची भावना असते. कमरेवर हात ठेवून दुसऱ्यांकडून काम करवून घेण्यात आपण फार तरबेज असतो. उंटावरून शेळ्या हाकायला फार आवडतात आपल्याला. पण आपल्याकडे कौशल्याची कमी असेल तर फार काळ आपला टिकाव लागत नाही. कोणी तरी जास्त कौशल्याचा आपल्या पुढे निघून जातो. कौशल्या बरोबर एखादा छंद जोपासावा. छंद हे व्यसन नाही. कॉम्प्युटरवर सारखे खेळ खेळणे हे व्यसन म्हणता येईल. सारखे नेट चॅटींग करणे हे व्यसन म्हणता येईल. हल्ली आपले कॉम्प्युटर मित्र फार व आसपासच्या लोकांशी आपल्याला बोलायला वेळ नाही अशी परिस्थिती झाली आहे. ह्याचे पर्यवसान लोकांना ‘डिप्रेशन’, मन उदास होणे व तत्सम व्याधी मधून पाहायला मिळते. ह्याच कारणास्तव आपल्याला आपल्या येणाऱ्या पिढीला छंद जोपासायला शिकवले पाहिजे. प्रत्येक लहान मुलाला एखादा चांगला छंद अंगिकारायला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. मोठे झाल्यावर हल्लीच्या ‘न्युक्लीयर’ कुटंबांतून छंद हाच प्रत्येकाचा खरा सोबती ठरणार आहे. चांगला छंद आपल्याला कठीण प्रसंगी कामास येईल. आपले मनोस्वास्थ्य जोपासण्यास त्याची अतोनात मदत होते. छंद जोपासण्याने बऱ्याच अंशाने आपल्या डोक्यावरचा ताण कमी होण्यास नैसर्गिकरीत्या मदत होते. चांगले छंद आपला एकटेपणा दूर करतात. छंद जोपासल्याने आपली प्रसन्नता टिकवून ठेवली जाते. छंद हा एक विरंगुळा आहे. शेवटी प्रत्येकाने आपला ‘जु’ आपणच उचलून पुढे चालले पाहिजे. ह्या जगात ज्याला प्रसन्नतेने व आनंदाने जगता आले आहे तोच मनुष्य यशस्वी गणला जातो. स्वतःची वाटचाल अशीच आनंदाने चालू ठेवा असेच गुरू रविंद्रनाथ टागोरांचे ‘एकला चालो रे’ ह्या गीतात उद्धृत आहे. आयुष्यात जरी कितीही अडचणी आल्या तरी, छंद हा प्रवास सुकर करण्यास निश्चित मदत करतो. आपल्या शरीराला व्यायामाची सवय ठेवा. दररोज किमान अर्धातास तरी शरीराला व्यायाम द्यावा. आपला हा व्यायाम आपण मुलांमध्ये मिसळून त्यांना शिकवत असताना करू शकता. स्वतःच्या शरीराला व्यायाम देताना तो कशा पद्धतीने करायचा ह्याचा आराखडा आपण स्वतःच तयार करू शकता. आपल्या ह्या अर्ध्या तासाची सुरवात प्राणायामाने करू शकता, त्यानंतर थोडे पळणे, घरातली कामे करणे – साफसफाई, केर काढणे तत्सम गोष्टी व्यायामाच्या आऱ्याखड्यात प्रविष्ट करू शकता, महिलांना भारतीय नृत्य येत असेल तर त्या त्याची तालीम करू शकतात. जे ठरवू त्यात नियमितता आणली पाहिजे. चांगली सवय लावून घेण्यासाठी सोपा उपाय म्हणजे तो उपक्रम सतत एकवीस दिवस करावा, आपोआप त्याची सवय लागेल व मग आपले मनच चुकचुकेल व व्यायाम नियमित व्हायला लागेल. आपल्या शरीराला व्यायाम हा हवाच. कोणतीही सरकारी वा बिनसरकारी स्वास्थ्य योजना असली आणि नीट राबवली जात असली तरी आपले शरीरच जर कमकुवत असेल तर आपल्याला प्रसन्नता, तरतरीतपणा व शरीर सौष्ठवता कदापि लाभणार नाही.



- कामाच्या चांगल्या सवयी लावून घेणे. तसेच कोणच्या ही कामाची व काम करणाऱ्यांची उपेक्षा टाळणे. चांगले काम हे कौशल्य, प्रतिभा व मनाची प्रसन्नता ह्यावर अवलंबून असते. तोंडपुजेपणा, अपात्रतेला प्रोत्साहन व नाकर्तेपणा ह्यावर नाही. चोख काम होणे हे वेळेत व बरोबर कले जाणे ह्यावर अवलंबून असते, हलगर्जीपणावर नाही. तसेच ते चांगल्या प्रशासनावर अवलंबून असते, धाकदपटशाहीवर नव्हे. एक दुसऱ्याच्या आदर भावनेवर अवलंबून असते. कोणच्या ही राष्ट्राची समृद्धता पिढ्या पिढ्यांच्या परिश्रमातून निर्माण होते व पिढ्या पिढ्यांच्या त्यागा मुळे टिकून राहते. ती काही कोणा एका महात्म्या मुळे बनत नाही व टिकत नाही. अशा महात्म्यांची माळ लागते व त्याही पेक्षा तुमच्या आमच्या सारखे सामान्यच लोकं ती टिकवून ठेवू शकतात. कोणतेही काम हे कनिष्ठ नसते. हलकट असतात ती लोकांची मने. कोणतेही कर्तब व कौशल्य कमीपणा आणणारे नसते. प्रत्येकाला परस्परांबद्दल आदरभावना असली पाहिजे मग तो कामगार असो, अधिकारी असो वा मालक असो. अहम भाव व उर्मटपणा, परस्परांमधला आदरभाव संपुष्टात आणतात. अहम भावावर जो मात करत नाही त्याला अहम भाव मारतो. साधेपणा नेहमीच फायद्याचा ठरतो. आपल्या कामावर श्रद्धा ठेवावी. कामाची अस्मिता जोपासावी व दुसऱ्यांचे काम कमीदर्ज्याचे लेखू नये.



- नीतिमत्ता व चांगल्या आचरणांचा वापर सतत करणे. आपल्या धर्माने दिलेली व आपल्या सदसदविचार बुद्धीला साजेसी अशी नीतिमत्ता व समाजात राहायचे म्हणून अंगिकारलेले काही सामाजिक नियम आपण स्वतः ठरवायला हवेत व एकदा ठरवले की त्यांच्याशी बांधील रहायला हवे. स्वतःला पटलेले व स्वतःनी ठरवलेली नीतिमत्ता व नियम म्हणजे स्वतःनी स्वतःला दिलेला शब्द. शब्द पाळण्यासाठी लोकं स्वतःचा जीव देतात अशी कित्येक उदाहरणे पाहिला मिळतील. ही नीतिमत्ता आपण हाती घेतलेल्या कामात, आपण करत असलेल्या अभ्यासात, आपल्या शेजारच्यांबरोबर राहताना आणि दुसऱ्यां बरोबरच्या व्यवहारात अमलात आणायचा प्रयत्न करायला पाहिजे. एकदा ठरवल्यावर नीतिमत्तेचे ढोंग करून उपयोग नाही. ते म्हणजे स्वतःलाच फसवल्यासारखे झाले. ह्यात काही पुरुषार्थ नाही. आपण ठरवलेल्या नीतीमते प्रमाणे आपण वागलो तर स्वतःत आत्मविश्वास जागृत होईल. आपणाला कणखर बनवेल. प्रलोभनांपासून दूर राहायची शक्ती देईल. नीतिमत्तेला धरून चालणाऱ्याला आपोआपच कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी उत्तरे सापडतात. कठीण प्रसंगात मन शांत राहायला मदत मिळते. मानसिक धैर्य वाढते. समाजात राहायचे म्हणजे प्राथमिक सुचार शिकले पाहिजेत व वापरले पाहिजेत. त्यांनी स्वतःचाच फायदा होतो. दुसऱ्यांना भेटल्यावर त्याचे पहिल्यांदा अभिवादन करायला विसरू नका. त्यांनी एकमेकांत नाते जोडले जाते व दुसरा आपल्याला काय म्हणायचे आहे त्याकडे जास्त चांगल्या भावनेने लक्ष देतो. हसतमुख राहा आणि व्यवहार आटोपल्यावर दुसऱ्याला धन्यवाद द्यायला विसरू नका. नेहमी चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवण्याने स्वतःला बरे वाटते व एखाद्या घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक होतो, जोडलेले नाते वाढीस लागते. ह्या सोप्या तीन गोष्टी आचरणात आणल्या आपण तर एकदुसऱ्यात मेळ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, एक नाते तयार होईल, सद्भावना वाढीस लागेल व त्या योगे दोघांचा फायदा होईल. वेळेचे महत्त्व काय सांगावे. कोणाला वेळ दिली तर तिचे पालन करणे हे कोणाला शब्द दिल्या इतकेच महत्त्वाचे आहे.



- टोकाच्या आवडी-निवडी टाळणे. छांदिष्टपण टाळणे व स्वतः बद्दलची कीव कमी करणे. स्वतः बद्दलची कीव करणे ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. ती कोणत्याही प्रगतीच्या आड येते. कोठचाही नवीन उपक्रम हाती न घेण्यासाठी आपण कारणे शोधत राहतो. घालून दिलेला सरकारी नियम हा स्वतःस कसा नुकसानदायी आहे हे पटवण्याचा प्रयत्न करतो पहिल्यांदा स्वतःला मग दुसऱ्यांना. हा नियम आपल्याला कसा लागू होत नाही ह्यासाठी कारणे शोधतो. त्या नियमाविरुद्ध अर्ज करतो. आपल्या सोयीप्रमाणे आपण नियम वाकवायचा प्रयत्न करतो. एकदाका आपले काम झाले की मग आपण तोच नियम कसा चांगला आहे व लोकांनी नियमाबरहुकूम का वागले पाहिजे ह्याचे ‘पाढे’ म्हणायला सुरुवात करतो. तीच गोष्ट सामाजिक कार्याच्या बाबतीत सुद्धा, किंवा रोजच्या व्यायामाबाबतीत. जेव्हा अशी गोष्ट हाती घ्यायची वेळ येते तेव्हा हजार कारणे आपल्याला सुचतात व दाखवता येतात. मग आपण स्वतःलाच समजवायचा प्रयत्नात असतो की ‘हा खोकला गेला की रोज सकाळी उठून फिरायला जाईन’, किंवा ‘माझे अंग दुखायचे जेव्हा कमी होईल तेव्हा मी पळायला जात जाईन’. अशी कीव जो करतो तो अंग दुखायचे थांबले तरी कधी पळायला जाऊ शकणार नाही कारण तो पर्यंत त्याला न करण्याचे दुसरे काहीतरी कारण सापडलेले असते. त्यापेक्षा सगळे बाजूला ठेवायचे मनात निश्चय करायचा व पळायला जायचे मग बघा चमत्कार, आपले शरीर जादूची कांडी फिरवल्यासारखे वागायला लागते ते. आपल्या जवळ जर रोज लागणाऱ्या गोष्टींच्या बद्दल टोकाच्या आवडी निवडी असतील – खायच्या बाबतीत, साफसफाईबाबत, कपड्यांबाबत, चवीबाबत तर आपल्याला खूप त्रास होईल व होत राहील. छोट्या छोट्या कारणांनी तुमचे मन दुःखी होईल. छोट्या छोट्या गोष्टीत मन गुंतले जाईल व आपण उदास होऊ. जर आपल्या आवडीनिवडी अशा प्रकारच्या टोकाच्या असतील तर येणारे रोजचे ‘कठीण’ प्रसंग आयुष्याची ‘दुःख’ समजून हिरमुसले होऊ. इतके दुःखी होऊ की, आपण मग चालू घटकेचा आनंद उपभोगू शकणार नाही. प्रत्येक गोष्टीत व प्रत्येक माणसात उगाचच खोट काढत बसायची सवय लागेल, कोणालाही समजून घेता येणार नाही, कोणाशीही नाते जोडता येणार नाही व माणसे जोडली जाणार नाहीत. जितक्या जास्ती आवडीनिवडी व जितका जास्त छांदिष्टपणा तितके आपले मित्र मंडळी कमी होत जातील व आपण एकटे पडू. एकटेपणा माणसाला दुःखी करतो. त्या उदास होण्याने पुढे आपले मनोस्वास्थ्य भिघडते. आयुष्य आनंदाने जगायचे असेल तर एक कान मंत्र लक्षात ठेवायचा – टोकाच्या आवडीनिवडी सोडून द्याव्या. लहानपणा पासून मुलांना टोकाची आवडनावड कशी घातक आहे ते त्यांना समजवले पाहिजे.



- दूरदर्शी बनायचा प्रयत्न करा व स्वतःचे विचार उत्तम, उदात्त व उत्तुंग बनवणे. दुसऱ्यांच्या चांगल्या संस्कारांची पुनरावृत्ती करण्यात काही गैर नाही. शत्रूच्याही चांगल्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत. आपल्या धर्मात सांगितलेच आहे की रोज सहा गुरू करावेत म्हणजे रोज दुसऱ्यांच्या कडून सहा चांगल्या गोष्टी शिकाव्यात त्यांनी आपली प्रतिभा उत्तुंग होते. इंग्रजांनी एकशेवीस वर्षापूर्वी व्हिक्टोराया टर्मीनस म्हणजे आताचा छत्रपती शिवाजी टर्मीनस बांधला. त्या वेळेला वीस गाड्या व हजार बाराशे प्रवासी त्याचा वापर करीत होती. पण तो टर्मीनस त्यांनी इतका भव्य बांधला होता त्यावेळेला, की आज तीन हजार गाड्या व तीस लाखापेक्षा जास्त प्रवासी तो वापरू शकतात. ह्याला म्हणतात दूरदृष्टी ठेवून केलेली आखणी. अशी दूरदृष्टी व अशी आखणी आपण आत्मसात केली पाहिजे व लहान मुलांना पण अश्या दूरदृष्टीची सवय लावली पाहिजे. आपण कोणचाही कामाचा आराखडा तयार करताना अशी दूरदृष्टी बाळगली पाहिजे. आपली पिढी जरी चाळीस, पन्नास वर्षे त्याचा उपयोग करणार असली तरी पण पुढे येणाऱ्या दहा पिढ्यांचा आपण विचार केला पाहिजे व तशी आखणी केली गेली पाहिजे. त्याच दृष्टिकोनातून आपली बांधकामे, रस्ते, पुल, खेळाची मैदानं इत्यादी आखले गेले पाहिजेत. जरी दुर्दैवाने आपल्या हातात अशी आखणी किंवा तिचा कार्यान्वय नसला तरी मनात नेहमी आपल्या राष्ट्राबद्दल चांगले उत्तुंग असे विचार आणावेत. अश्या राष्ट्राविषयीच्या उत्तुंग विचारांची सवय लावण्याने आपल्या स्वतःच्या दृष्टीमध्ये पुष्कळ फरक पडेल. मग आपण छोट्याछोट्या गोष्टीतला हेकेखोरपणा सोडून देऊ, आपोआप आपली दृष्टी विशाल बनेल, व रोजच्या जीवनातल्या अडचणींना सामोरे जाताना दुःख होणार नाही.



- आपल्या धर्मातल्या चांगल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे. आपले धर्मनिर्देश, आपली धर्म शास्त्रे, घालून दिलेली धर्म सूत्रे ही आपल्या पूर्वजाने त्यांच्या अनुभवातून आनंदाने आयुष्य जगण्याच्या दृष्टीने दिलेली समाजाला एक दिशा आहे. ह्या नियमांचे पालन केल्याने आपल्याला आपल्या आत्म्याची प्रगती होण्यास मदत होते. आपली चित्तशुद्धी होते, सचेतन बुद्धी वाढीस लागते. धर्म निर्देश, शास्त्रे, सूत्रे, व्रत, वैकल्ये ही सगळी स्वतःचे मन व आजूबाजूचे वातावरण प्रसन्न बनवण्याच्या हेतूने तयार केली होती व तशी बंधने घातली गेली होती. सामाजिक सौहार्द्रता व समरसता टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तयार केली गेली होती. त्याला देश, काल पात्राच्या मर्यादा होत्या व अजूनही आहेत. त्या मुळेच प्रत्येकाने हल्लीच्या काळी ही सूत्रे विचार करून अमलात आणली पाहिजेत. आजच्या देशाच्या गरजा, कालाच्या मर्यादा व पात्रता ह्याचा विचार करून प्रसंगी त्या सूत्रात यथार्थ बदल करून त्या त्या सूत्रांचा, व्रतांचा व धर्मनिर्देशाचे पालन केले पाहिजे. सतीची प्रथा एकेकाळी चालू होती आता ती कालबाह्य झाली व आपण ती टाकून दिली. तीच गोष्ट बाकीच्या चालीरुढींबाबत लागू आहे. ह्याचा विचार करून आपल्या धर्माच्या चौकटीत वागले तर आपल्याला मानसिक सुरक्षितता लाभेल. त्याच बरोबर बाकीच्या धर्मातल्या चांगल्या गोष्टी अंगिकारल्या पाहिजेत. आपल्या धर्मात सांगितल्या प्रमाणे जो वागतो त्याला कठीण परिस्थितीत मार्ग काढायला शक्ती व बुद्धी मिळते, कारण आपला धर्म, सामान्य माणसाच्या जीवनात येणाऱ्या सगळ्या संभ्रमांवर तोडगा देत असतो. आपल्या धर्मात, आपल्या समोर ठाकणाऱ्या सगळ्या द्विधा मनस्थितींवर उहापोह करून ठेवलेला आहे. आपल्या आयुष्याच्या मार्गावरून आपण जेव्हा घसरायला लागतो तेव्हा धर्म आपली मदत करतो, आपले रक्षण करतो. म्हणूनच आपल्या धर्मावर विश्वास ठेवा. आपली श्रद्धा असू द्यावी त्यावर पण अंधश्रद्धा टाळावी.



ही दहा सूत्रे व्रता सारखी जो आचरण करेल तो राष्ट्रव्रती. देश, काल, पात्राच्या परिसीमेत आजच्या हिंदू माणसाला जर हिंदुत्वाचा पुरस्कार करायचा असेल तर तो वर्णन केलेल्या दहा सूत्रांप्रमाणे वागून करता येईल. ह्यालाच राष्ट्रव्रत असे नाव आपण देऊ. ह्यालाच खऱ्या हिंदुत्वाचे पालन करणे असे होते. आता कोणी म्हणेल की मी ही दहाच्या दहा सूत्रे काही नेहमी पाळत नाही पण कधी कधी, थोडी थोडी पाळली जातात. कारण असे पाळणे म्हणजे आपल्याला सुलभ जे ते स्वीकारणे व बाकीचे सोडून देणे होते. व्रत हे एकदा घेतले की थोडे करू, मग करू, आपल्या सोयी प्रमाणे करू असे नसते. घ्यायचे तर पूर्णपणे पाळायचे. आपणच आपल्याला दिलेल्या शब्दासारखे व्रत असते. आपण आपल्याला दिलेला शब्द जर पाळणार नसू तर द्यायचाच का? ह्यात कसला पुरुषार्थ? म्हणून अर्धा राष्ट्रव्रती किंवा सोयीने राष्ट्रव्रती नको. अशा राष्ट्रव्रतींचा राष्ट्राला काही उपयोग नाही. राष्ट्रव्रती म्हणजे ही सर्व दहा सूत्रे नेहमी पाळणारा.



शिवाजीने ही जाणीव त्याच्या स्वतःच्या उदाहरणाने करून दिली व एक साम्राज्य निर्माण झाले. ही जाणीव संपली व आपण इग्रजांकडून पराभूत झालो. आपला आत्मविश्वास आपल्या हिंदू मनाच्या अभिमानाबरोबरच संपला. देशासाठी, आपोआप स्फूर्ती एक दुवा होता देणारा तोच संपला. संकटाला तोंड देण्याला, कठीण काम करण्यास जी स्फूर्ती लागते ती स्फूर्ती देणारी गुटीकाच नसेल तर माणसाचे हातपाय लटपटायला लागतात. इंग्रजांनी हे ओळखले व पहिल्यांदा हिंदू धर्माबद्दलचा अभिमानच संपुष्टात आणला. इतका की आजची पिढी हिंदू हे नाव घ्यायलाही लाजू लागली आहे. जो मग हिंदू धर्माचा नुसता उच्चार करता झाला त्याला जातीय म्हणून आपली पिढी स्वतःची सुटका करून घ्यायला लागली आहे. आपल्याला आपल्या शक्तीची परत जाणीव करून घ्यायची वेळ

आली आहे.


(क्रमशः)







 

Monday, September 13, 2010

हनुमानाला मिळालेला शाप व त्यावर उतारा – भाग २





माणसाचा स्वभाव हा जात्याच ‘पोझेसीव’ असतो. म्हणजे, ‘हे माझे’, ‘हे मी मिळवले आहे, ‘माझी गोष्ट अशी असावी’, ‘मी मग असे करीन’ – अशी वाक्ये आपण नेहमी ऐकतो. माणूस नेहमी मी, माझे अशा तऱ्हेचे मालकी हक्क दाखवणारे शब्द वापरतो व आपल्या वाटणाऱ्या गोष्टींना तो शेवट पर्यंत बिलगून राहतो. पण सध्या त्याला जणू हिंदू विचारसरणीचा काही कारणाने विसर पडत चालला आहे. ही जी महान संस्कृती म्हणजेच विचारसरणी त्याला लाभली आहे ती त्याची स्वतःची आहे ह्याची जाणीव भारतात राहणाऱ्या हिंदू मनाला करून दिली पाहिजे. ही संस्कृती त्याच्या पूर्वजांनी स्वतः संपादन केली आहे, ही संस्कृती भारतीयांचे आयुष्य सुकर करणारी व प्रेरणादायी विचारसरणी आहे. ह्याच विचारसरणीने आज ह्या देशाला इतर देशांपेक्षा वेगळे केले आहे. ह्याच विचारसरणीने, सगळ्या भारतीयांना विचार बंधांनी बांधलेले आहे. ह्या विचारसरणीत एवढी शक्ती आहे की तिचा जर अवलंब केला तर, लोकांचे कल्याण होईल ह्याचा प्रत्यय आज हजारो वर्षे आपल्याला येत आलेला आहे.



आज भारतात अनेक वेगवेगळे रीतिरिवाज आहेत – उत्तरे कडून दक्षिणे पर्यंत व पुर्वे कडून पश्चिमे पर्यंत, पण तरीसुद्धा प्रत्येक हिंदूमनाला माहीत असते की आपण वेगळे नाहीत. कारण मनाच्या कोपऱ्यात वा अंतर्मनात दडलेले असते की आपली विचारसरणी म्हणजेच धर्म एक आहे, व हा एवढा एक व एकच दुवा पुरा आहे लोकांची मने बांधून ठेवायला. पाहा ही कल्पना नुसती मनाच्या कोपऱ्यात असल्यानेच केवढे कार्य केले आहे, त्याचीच जर प्रत्येकाला जाणीव झाली तर त्यातूनच केवढी मोठी सांघिक शक्ती निर्माण होईल. हीच शक्ती प्रेरणा देते की आम्ही एक आहोत. हा देश आमचा आहे. ही विचारसरणी टिकवण्यास व प्रगल्भ करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आम्हाला आमच्या विचारसरणीचा म्हणजेच हिंदुत्वाचा अभिमान आहे. हे आमचे आहे. आमच्या देशाला काही अपयश आले तर नामुष्की आमची स्वतःची होणार आहे. देश यशस्वी झाला तर यश आमचे आहे. आमचा भारत बलाढ्य झाला पाहिजे, कारण आमची विचारसरणी, आमची संस्कृती, आमची इच्छा प्रबळ आहे. ही विचारसरणी हजारो वर्षांच्या परंपरेतून तावून सुलाखून निघालेली आहे. विचारसरणी पक्की आहे, खोटी आमच्या कडूनंच आहे. पण हे सगळे आपल्या विचार धारणेवर विश्वास नसला तर मुळीच होणार नाही. म्हणूनच प्रत्येक हिंदू मनाला आपण हिंदू आहोत ह्याचा अभिमान पाहिजे हे महत्त्वाचे व तो योग्य तऱ्हेने प्रगट करता आला पाहिजे हे अजून महत्त्वाचे. हिंदू धर्माचा अभिमान बाळगणे व तो योग्य तऱ्हेने प्रगट जर करायचा तर आपल्याला खालील सूत्र अमलात आणावी लागतील. ती सूत्र अशी आहेत.



- आपल्या व आपल्या भोवतालच्या लहान मुलांना योग्य वळण लावणे व जागृत करणे, राष्ट्रव्रती बनवणे.

- अहंभाव कमी करणे.

- राष्ट्र सुधार कार्यात नेहमी अग्रेसर राहणे.

- लाचलुचपत व वित्तीय घोटाळ्यांपासून स्वतः दूर राहणे व दुसऱ्याला परावृत्त करणे.

- आपल्यातले कला, नैपुण्य सतत वाढवणे व छंद जोपासणे. शरीराला व्यायामाची सवय ठेवणे.

- कामाच्या चांगल्या सवयी लावून घेणे. तसेच कोणच्या ही कामाची व काम करणाऱ्यांची उपेक्षा टाळणे.

- नीतिमत्ता व चांगल्या आचरणांचा वापर सतत करणे.

- टोकाच्या आवडी-निवडी टाळणे. छांदिष्टपण टाळणे व स्वतः बद्दलची कीव कमी करणे.

- दूरदर्शी बनायचा प्रयत्न करणे व स्वतःचे विचार उत्तम, उदात्त व उत्तुंग बनवणे.

- आपल्या धर्मातल्या चांगल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे.



ही सूत्र जो अमलात आणतो तो हिंदू हा राष्ट्रव्रती असतो. ही सूत्रे आपल्या हिंदुधर्मात वेळोवेळी व वेगवेगळ्या संतांनी, स्मृती, श्रुतींमधून निर्देशांच्या रूपाने आधीच अस्तित्वात आहेत. येथे फक्त देश काल पात्राच्या मर्यादेत राहून एकत्र केली आहेत. हेच हिंदुत्व, हेच राष्ट्रव्रत. राष्ट्रव्रताच्या दहा सूत्रांचे आकलन होण्या करता ती सूत्र काय आहेत ती पाहूया.



- आपल्या व आपल्या भोवतालच्या लहान मुलांना योग्य वळण लावणे व जागृत करणे, राष्ट्रव्रती बनवणे. हे प्रत्येक हिंदुत्ववाद्याचे म्हणजेच राष्ट्रव्रत्याचे कर्तव्य असले पाहिजे. आपल्या राष्ट्राला अग्रेसर बनवणारी अशी लहान मुलेच मशाली ठरणार आहेत. त्यांना हिंदू असण्याची कल्पना व देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी लागणारी विचारांची योग्य सामुग्री त्यांच्या बालपणीच बालकडू म्हणून द्यायला हवी. हे साध्य करण्यासाठी काही रूपरेषा दिल्या आहेत –



• लहान मुलांना कामाचे महत्त्व शिकवावे. कोणचेही काम खालच्या दर्जाचे नसते हे शिकवावे. काम करणाऱ्यांची उपेक्षा करणे घातक असते हे त्यांना सांगितले पाहिजे. ज्यांना काम मिळते ते खरोखरीच नशीबवान आहेत हे त्यांच्या मनात सतत ठसवले गेले पाहिजे.

• लहान मुलांमध्ये स्वच्छतेची जाणीव जागवा. स्वतःची स्वच्छात व सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व रुजवा. सार्वजनिक स्थळे घाण करणे म्हणजे अतिशय नीचतेचे वागणे आहे हे पटवा.

• गणपतीच्या दिवसात बाकीच्या न विरघळणाऱ्या मूर्तींपेक्षा मातीच्या मूर्ती स्थापनेचा फायदा शिकवा. मिरवणूक शिस्तबद्ध का असावी ह्याचे बाळकडू द्या.

• वाहनांचे योग्य नियम शिकवा व ते पाळायला शिकवा.

• मुलांना रांगेत उभे राहण्याचे महत्त्व सांगा. आपल्या देशाचे नियम पाळायची सवय लावा. नियम पाळणे वा न पाळणे हे कोणी बघताय वा बघत नाही ह्यावर अवलंबून असायला नको. नियमांविरुद्ध अर्ज करणे व नियम का पाळला नाही त्याला कारणे देणे आपल्यात भिनले आहे ते थांबवायची गरज आहे. लहानांना हे पटवले पाहिजे की नियम न पाळणे ह्यात काही शहाणपण नाही. माणसाचे थोरपण तेव्हाच कळते जेव्हा तो नियम पाळून यशस्वी होतो.

• लहानांना व्यायामाचे महत्त्व शिकवा. सूर्यनमस्कार शिकवा. नीटनेटकेपण अंगी बाणायला शिकवा. कोणचीही गोष्ट चांगल्या तऱ्हेने सादर करायची कला आत्मसात करायची सवय लावा.

• आपल्या देशाच्या मालमत्तेचे रक्षण करायची सवय लावा. विरोध जरी प्रदर्शित करायचा झाला तरी वाहने जाळून व कोणच्याही प्रकारची नासधूस करून प्रदर्शित करता कामा नये ह्याची शिकवण लहानपणापासून द्या.

• थुंकायची सवय चांगली नाही हे मनात बिंबवा.

• छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घ्यायला शिकवा. टोकाच्या आवडी निवडी सोडायला शिकवा. त्याने त्यांचे पुढचे आयुष्य आनंदी व प्रसन्न होण्यास मदत होईल.

• सकाळी लवकर उठण्याचे महत्त्व शिकवा. जो सकाळी लवकर उठतो त्याला दुसऱ्यांपेक्षा जास्त वेळ मिळतो हे ठसवा.

• लहान मुलांमध्ये मिसळा. त्यांच्या बरोबर संध्याकाळी खेळ खेळा. जर लहान वयात मुलांना नुसते मोकळे सोडले तर मुलं वाईट सवयी पटकन धरतात. नाहीतर गणकयंत्रावर लहानपणीच विविध हानिकारक खेळ खेळायचा वाईट नाद मुलांना लागतो. त्यामुळे त्यांची मनोवृत्ती विकृत बनू शकते वा शारीरिक प्रगती खुंटते. जर का आसपास खेळायचे मैदान नसेल तर त्यांच्याकडून पळायचा व्यायाम करवून घ्या. सूर्यनमस्काराचे महत्त्व पटवुन द्या व त्यांच्या कडून सूर्यनमस्कार घालून घ्या.

• लहान मुलांमध्ये कसे मिसळायचे व त्यांना जागृत कसे करायचे ह्याचे थोडक्यात वर्णन करत आहे.

o साधारणपणे दररोज १ तास लहानांमध्ये घालवायचा प्रयत्न करावा. लहान मुलांबरोबर खेळून आपणही आनंदी व्हाल. आपल्या आवडी नुसार व वेळेच्या उपलब्धते नुसार वेळापत्रक करावे. पण जे ठरवाल त्यात नियमितता असली पाहिजे.

o पहिला अर्धा तास व्हॉली बॉल, फुटा बॉल सारखे मैदानी खेळ असावेत. ह्या खेळांनी एकमेकांमधले सामंजस्य वाढते, मुलांची शारीरिक प्रगती होते आणि मुलांना दमायला होते. लहान मुलांनी खेळ खेळून दमायलाच पाहिजे. पुढची १५ मिनिटे, त्यांना एखादी गोष्ट सांगा. ही गोष्ट अशी निवडा की ज्या पासून जीवनाबद्दल चांगले धडे शिकायला मिळतील. ती गोष्ट, पूर्वीच्या आपल्या भारतवर्षाच्या उज्ज्वल काळातली असू शकते, आपल्या इतिहासातल्या झालेल्या चुका असू शकतात, आपल्या स्वातंत्र्य लढ्या बद्दलच्या गोष्टी असू शकतात, किंवा एखादी आपल्या स्वातंत्र्योत्तर काळातील भारत पाक लढ्यातली गोष्ट असू शकते. एखादी थोर लेखकाने लिहिलेली गोष्टही असू शकते.

o पुढची १५ मिनिटे मुलांना हल्लीच्या ज्वलंत प्रश्नांबद्दलची माहिती करून द्यावी. त्यांना त्याचा विचार करून त्या प्रश्नांवर उत्तरे शोधायची सवय लावावी. लोकांपुढे बोलायची सवय लावावी. सभे पुढे बोलायचे त्यांचे धैर्य वाढवावे.

o हा एक तास आपण जेवढा नीट आखाल तेवढा त्याचा फायदा मुलांच्यात योग्य जागृती होण्यात होईल. मुलांमध्ये आपला मेळ बरोबर बसला पाहिजे तरच मुले तुम्हाला मित्र समजून, किंवा तुमचा आदर करून चांगल्या सवयी उचलतील. हे करताना आपल्याला स्वतःचा अहंभाव जरा बाजूला ठेवावा लागेल. मुलांना शिकवायची मनापासून इच्छा व्हायला पाहिजे. कोठे मुले चुकताना दिसली तर, ‘मला काय करायचे त्यांचे पालक बघून घेतील’ ही भावना सोडून देऊन मुलांची चूक दुरुस्त करायचा प्रयत्न करावा लागेल. मुलांना चूक समजावून द्यावी लागेल व पालकांनीही उगाचच मुलांची बाजू घेण्याचे टाळले पाहिजे. हातून झालेल्या चुकांचा मुलांना पश्चात्ताप होणे हे चांगले लक्षण आहे ते जोपासले पाहिजे. ज्याला पश्चात्ताप होतो तो चुका सुधारू शकतो.



- अहंभाव कमी करणे. बऱ्याच वेळेला आपला अहंभाव कृती करण्याच्या आड येतो. आपल्यातल्या अहंभावामुळे कृती करावीशी वाटून सुद्धा गोंधळ उडण्या सारखे भरपूर प्रश्न आपल्या समोर उभे ठाकतात. कधी वाटते – "माझा दर्जा, माझी ‘पोझिशन’ पाहून मी का म्हणून असले काम करू"? कधी मनात येते, "मी कशाला त्या मुलाला शिकवू किंवा त्याच्या चुका काढू? कारण, तो मुलगा ज्या घरातला आहे त्याच्याशी आपले फार काही जिव्हाळ्याचे संबंध नाहीत". कधी कोणी आपल्या राष्ट्रासाठी छान कल्पना पुढे ठेवली तर "मी मदत तर सोडाच पण साधा पाठिंबा पण देणार नाही. बाजूला होऊन गंमत बघेन". फारच झाले तर, "मला जर श्रेय मिळणार असेल तर मग विचार करीन". आपण जेव्हा आपल्याकडे कामकरणाऱ्यांच्या मुलांना शिकवत असू, किंवा एखाद्या दारिद्र्यरेषेखालच्या घरातल्या मुलांना शिकवत असू तेव्हातर प्रामुख्याने आपल्या अहंभावावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे.



- राष्ट्र सुधार कार्यात नेहमी अग्रेसर राहणे. राष्ट्र जोपर्यंत समृद्ध होत नाही तो पर्यंत स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाच्या सातत्याने विकास होणार नाही. हे ज्याला पटले तो आपोआपच राष्ट्र सुधार कार्यात अग्रेसर राहील. जेव्हा आपले राष्ट्र निकोप, सुरक्षित व संघटित होईल तेव्हाच आपण स्वतःचा विकास खऱ्या अर्थाने करू शकू. आपल्या धर्मा मध्ये गरजूंची मदत नेहमीच प्रतिपादीली आहे एवढेच नाही तर शास्त्रांमध्ये तीकशी करावी ह्यावर मार्मिक विवेचन आढळते. शास्त्रे सांगतात, आपल्या मिळकतीतील दहा टक्के आपण गरजूंना द्यावेत, दहा टक्के आपल्या वृद्ध पालकांवर व थोरांवर खर्ची घालावी, दहा टक्के भविष्यासाठी साठवून ठेवावी आणि बाकी उरलेली स्वतःवर व परिवाराच्या कल्याणार्थ खर्ची घालावी. ही काही काळ्या दगडावरची रेघ समजायची गरज नाही. हा एक घालून दिलेला पायंडा आहे. कोणाला गरजेनुसार, इच्छेनुसार, आपल्या शक्तीनुसार, आपल्या आत्म्याच्या प्रगल्भतेच्या स्तरानुसार, आपल्या आवडीनुसार त्या टक्केवारीत कमी जास्त बदल करायचा असेल तर त्यात काही बिघडत नाही, तसा तो प्रत्येकाने करावा. पण समाजासाठी असलेली आपली जबाबदारी ओळखावी एवढे समजले व त्याप्रमाणे वागले म्हणजे शास्त्रपालन झाले असे समजावे. स्वतःला असे करण्यात किती समाधान मिळेल ते बघा. स्वतःचा स्वाभिमान वाढीस लागतो. आत्मविश्वास वाढतो.



राष्ट्र सुधार कार्यात अग्रेसर व्हायचे तर काही सोप्या सहजच करता येण्या सारख्या गोष्टी आहेत त्या देतो.



- आपण एखाद्या गरजू विद्यार्थ्याला मदत करू शकता.

- जवळच्या बिनसरकारी संघटनेत काम करू शकता.

- आपण जर वृद्ध असाल तर आजूबाजूचा लहान मुलामुलींना गोष्टी सांगून किंवा गोष्टी सांगायला लावून सभाधीट बनवू शकता. आपला पण वेळ चांगला जाईल व लहानांना पण जाता जाता वळण लागेल.

- आपण जर गृहिणी असाल तर फावल्या वेळेत आपल्याला येणारी कोठलीतरी कला लहानांना शिकवता येईल. कला, गोष्टी, संगीत व गप्पागोष्टींतून सुद्धा समाजोपयोगी चांगले गुण शिकले, शिकवले जाऊ शकतात.

- तुम्ही जर वैद्य किंवा डॉक्टर असाल तर जवळच्या गरजू लोकांना सामाजिक स्वास्थ्या बद्दल प्रबोधन करू शकाल व औषधेही देऊ शकाल.

- किती लिहू? तुम्ही आपण आपल्या कुवती प्रमाणे स्वतःच ठरवून रामाच्या खारुटली प्रमाणे आपला वाटा उचलू शकता. थोडक्यात, आयुष्यात एकातरी गरजू मुलासाठी देवमाणूस व्हायचा प्रयत्न करा व बघा किती आंतरिक समाधान प्राप्त होते ते.



ज्यांना एवढेही जमणार नसेल त्याने बाकीच्यांनी हाती घेतलेल्या कामात अडथळे न आणता त्यांना मनापासून निदान चांगले आशीर्वाद तरी द्यावेत. काही गोष्टी ज्या सहज आपल्या हातून होऊ शकतात त्या अशा.



- आपल्याला आवडले असेल किंवा नसेल पण आपले राष्ट्र वेगवेगळ्या भाषिक प्रांतात (राज्यात) विभागले गेले आहे. आपल्या राष्ट्राने ह्या गोष्टीचा स्वीकार केला आहे. आपले राष्ट्र आपल्या राज्यांपेक्षा श्रेष्ठ असल्या कारणाने आंतरराज्य सीमेवरून भांडणे उकरून काढता कामा नयेत व असलेल्या मतभेदांना प्रोत्साहन देता कामा नयेत. कोठच्याही अशा मोहिमेला बळी पडू नका ज्याने राज्या राज्यां मध्ये कलह निर्माण होईल. आपले बळ, आपली ऊर्मी, आपली ताकद, आपला उत्साह, आपली शक्ती, आपला जोर, आपला जोष व आपली बुद्धी नेहमी आपल्या राष्ट्राच्या सीमा सुरक्षित कशा राहतील ह्यात लागल्या पाहिजेत. आपल्या सीमेला धरून असणाऱ्या प्रश्नांशी आपण नेहमी जागरूक असले पाहिजे. कोणत्या सीमा अजून निश्चित नाहीत, कोणच्या सीमेबाबत कोणच्या राष्ट्रांबरोबर वाद आहेत, घुसखोर कोठून होत आहे, बांगलादेशी विस्थापितांचा लोंढा अजून का येत आहे व आपला देश तो थांबवण्यासाठी काय करत आहे इत्यादी बाबींवर आपले लक्ष वेधलेले असले पाहिजे.

- आपल्या राष्ट्राची संपत्ती व नैसर्गिक साठे ह्याच्या सुरक्षिततेच्या बाबतीत आपण नेहमी सतर्क असले पाहिजे. मुलांना व वाटचुकलेल्या तरुणांना राष्ट्रीय संपत्तीच्यानाषापासून नेहमी परावृत्त केले पाहिजे. राष्ट्रीय संपत्तीला हानी पोहचेल अशा कोठच्याही मोहिमेला आपला पाठिंबा असता कामा नये. विरोध दर्शवायच्या सुद्धा सुसंस्कृत पद्धती आहेत त्याचा वापर करावा. कोणत्याही कायद्या विरुद्ध किंवा सरकारी धोरणाचा विरोध करायचा असेल तर राष्ट्रीय संपत्तीला हानी न पोहचवता करा.

- मंदिर, मस्जिद इत्यादी धर्मस्थळे दळणवळण केंद्रांवर व रस्त्यांमध्ये बांधायचा कोणताही विचार असेल तर किंवा बांधली जात असली तर, अशा कोणत्याही मोहिमेला प्रोत्साहन वा पाठिंबा देऊ नये.

- लोकसंख्या वाढीमुळे उद्भवणारे प्रश्न अशिक्षित लोकांना समजावून सांगा. संख्ये पेक्षा कस का चांगला ह्याचे महत्त्व समजवावे.

- आपल्या राष्ट्राबद्दल चांगले विचार मनात नेहमी आणावे, तसेच आपल्या परिवाराबद्दल मनात चांगले विचार आणावे, आपल्या समाजाबद्दल मनात चांगले विचार आणावे. प्रार्थनेचा खूप फायदा होतो. त्याने मन निर्मळ, आनंदी राहते व आजूबाजूला चांगले वातावरण निर्माण होण्यास मदत होते हे सर्वश्रुतच आहे. देशासाठी चांगल्या मनाने केलेली प्रार्थना उपायकारक ठरते.

- मतदान हे आपले सगळ्यात मोठे कर्तव्य आहे व लोकशाही टिकवण्याचे मुख्य साधन आहे. ते प्रत्येकाने आपला धर्म आहे अस समजून पाळले पाहिजे.



(क्रमशः)

Sunday, August 29, 2010

पाकिस्तानात आलेला पुर व त्याला मदत द्यायची झालेली भारताला घाई.

पाकिस्तानात पुर आला. आतोनात नुकसान झाले. आपण माणुसकी म्हणुन ५० लाख डॉलर्स मदत देऊ केली आहे. गेले एक महीना भर आपण प्रयत्न करत आहोत की पाकिस्तान ने भेट कबुल करावी म्हणुन. पाकिस्तान कधी म्हणते कि त्याला भारताकडुन भेट नको. खाण्यापिण्याच्या गोष्टींवरच्या वेष्टणावरचे भारताचे चिन्ह काढुन मग ते पुर ग्रस्ताना वाटतानाची चित्र दुरदर्शन वर दाखवली जात होती ती सगळ्यानी पाहीलीच असतीलच. मदत मिळणा-यांना समजु नाही की भारताने मदत दिली आहे त्यापेक्षा भारताचा अपमान कसा होईल ह्यातच पाकिस्तानी नेत्यांना स्वारस्य आहे असे दिसते. आपण फारच आग्रह धरला म्हणुन त्यानी भेट कबुल करायचे ठरवले. आपल्या परोपकारी सरकारला अगदी हायसे वाटल्या सारखे झाले की पाकिस्तान एकदाची आपली भेट कबुल करता होत आहे म्हणुन. तेवढ्यात पाकिस्तानात माशी शिंकली. पाकिस्तान आता म्हणतो की जे काही भारताला द्यायचे आहे ते त्याने संयुक्त राष्ट्रला द्यावे व ते मग ती मदत संयुक्त राष्ट्राकडुन आली असे समजुन कबुल करतील. आता म्हणे भारतीय बाबु लोकं संयुक्त राष्ट्राकडे डोळे लावुन बसले आहेत.
ह्या गोष्टीवरुन कोणाला असे वाटेल कि पाकिस्तानला कोणत्याही मदतीची गरज नाही. कारण ज्याला गरज असते तो ती कशी येत आहे ते बघत नाही फक्त स्वीकार करतो.
आपण देतो ते दान आहे कि मदत. दान म्हटले तर आपल्या शास्त्रातुन लिहीले आहे की – दान देताना आधी घेणा-याची पात्रता बघायची असते. अशी पात्रता न बघता दिलेले दान हे अघोरी ठरते व अशा दानाला तामसी दान म्हणतात. असे दान देण्याने ना देणा-याचे पुण्य वाढते, ना घेणा-याचे कल्याण होते. मदत म्हंटले तर ती मित्रांना, शेजा-याला किंवा अडलेल्याला असते. पाकिस्तान मित्र नाही. अडलेला नाही. असता तर त्याने गप्प बसुन मदत घेतली असती. आता तो शेजारी राष्ट्र म्हणुन आपण मदत द्यायची पण लोटांगण नाही घालायचे किंवा गळ्यात थोडेच पडायचे हे आपल्याला समजायला पाहीजे एव्हाना. पाकिस्तान प्रत्येक गोष्टीत भारताचा अपमान कसा होईल हेच बघत आला आहे व आपण डोळ्यावर पट्टी बांधुन तिकडे दुर्लक्ष करत आलो आहे. ह्यात आपल्याला काय मिळणार आहे. अंतर राष्ट्रीय सभे मध्ये काय कोणी आपली पाठ थोपटणार आहे की संयुक्त राष्ट्रांमध्ये आपल्याला कायमचे स्थान मिळायला मदत होणार आहे, का पाकिस्तान अतिरेक्यांना प्रशिक्षण द्यायचे थांबवणार आहे, का पाक व्याप्त काश्मिर आपल्यासाठी सोडुन देणार आहे.