Thursday, June 16, 2022

अग्निपथ

समाजात सगळ्यांनी सैनिकी शिक्षण घेतले पाहिजे व सैन्यसेवा सक्तीची केली पाहिजे असे कित्येक लोकांना वाटते. अशाने जागरूकता येईल, शिस्त वाढेल व त्याच बरोबर तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्याची शक्यता आहेच. पण लोकांना जरी वाटले तरी ते शक्य होणारे नाही कारण सरकारी तिजोरीत सगळ्यांना पगार देण्याइतके पैसेच नाहीत.



सरकारी सैन्यात पेन्शन खूप आहे व त्याचा खर्च इतका मोठा व दरवर्षी वाढत जाणारा आहे की सरकारला तो झेपणारा नाही. एक जवान २० वर्षानंतर पेन्शन घ्यायला लागतो (तेव्हा त्याचे वय साधारण ३६ ते ४० असते) तेव्हा पासून तो पुढची किमान ३० वर्ष पेन्शन घेतो त्याच्या नंतर त्याच्या मागे त्याची पत्नी किंवा मुलगी पेन्शन घेते. तो ३६ - ४० वर्षाचा असल्याने व सैन्यातल्या शिस्तीच्या सवयीने पेन्शन बरोबर दुसरी नोकरी पकडून चार पैसे कमावतो व घराला हातभार लावतो. सैन्यात केलेल्या १७ - ते २० वर्षाच्या सेवेबद्दल पेन्शन मिळालीच पाहिजे. 

आपल्या सेनेतल्या जवानांचे सरासरी वय कमी होऊन त्याच बरोबर सरकारचे पेन्शन बिल कमी होण्यास साध्य असे दूरगामी धोरण अमलात आणले तर दोघांचाही फायदा होऊ शकतो. त्याच बरोबर जवानांना बाहेर जाऊन दुसरा उद्योग धंदा किंवा नोकरी पण करता येईल. अग्निपथातून बाहेर पडते समयी तरुणांचे वय २२ ते २८ असणार आहे त्याच बरोबर हातात १० - १२ लाखाचा निधीही. परत २५ टक्के सैन्यात भरती होण्याच्या गाजराच्या आशेवर ते सैन्यात असताना काम पण चांगले करतील, पुढे केंद्रीय सैन्यबळात भरती होण्यास प्राधान्य पण मिळेल व काही जणांना तर १० - १२ लाखाच्या भांडवलावर स्टारटअप सुद्धा करता येईल. तेव्हा उगाच तोडफोड करून विरुद्ध पक्षाच्या लोकांनी ठरवून व लोकांना चिथवून अग्नीपथ योजने विरुद्ध निषेध करण्यापेक्षा ह्या योजनेचा तरुणांनी लाभ घ्यावा व येत्या ९० दिवसात भरती होण्यासाठी तयारी करावी. 

मराठी पत्रकार (सगळे नाही, पण बहू) जे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन स्वतःला पत्रकार समजतात व एका कोणत्यातरी पक्षाची री ओढत बसतात किंवा रक्षासंदर्भातला कोर्स करून सुद्धा फुसक्या राजकीय घडामोडींवर चार वाक्य लिहितात त्यांनी उगाच ताशेने झाडण्यापेक्षा ह्या योजनेचा अभ्यास करून लेख लिहिवावेत. उगाच मोदी आवडत नाहीत फक्त ह्याच कारणास्तव अग्निपथाचा निषेध न करता त्याचे फायदे काय आहेत, तरुणांना कसे भरती होता येईल हे लिहावे. अशा लिहिण्याला म्हणतात जबाबदार लेखणी. 

तरुणांनो उठा अग्नीवीर व्हा उगाच कोणाच्या चिथवण्यावर जाळपोळ व निषेध करून काही मिळणार नाही - आपल्या देशाला ह्याच पासून तर वाचवायचे आहे. अग्निपथावर अग्नीवीर बना व स्वतःचा जठराग्नी शमवा देशाचे भले करा.

Thursday, May 12, 2022

१८५७ चे स्वातंत्र्य समर

इंग्रजांच्या विरुद्ध लढलेल्या १८५७च्या स्वातंत्र्यसमराला बरीच वर्षे लोटली. इंग्रजांशी झुंजून त्यांना मागे रेटण्यात आपले स्वातंत्र्यवीर सफल झाले व आजच्याच दिवशी १६५ वर्षापूर्वी दिल्ली इंग्रजांपासून मुक्त झाली. 

मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे ह्यांच्या सारख्या असंख्य हुतात्म्यांमुळे बहादूर शहा जफर भारताचा राजा झाला. भले सहाच दिवसांकरता पण झाला. इंग्रजांनी त्याचा पराभव करून दिल्लीवर परत ताबा मिळवला आणि भारताचे पहिले स्वातंत्र्य समर अयशस्वी ठरले. 

इंग्रजांनी ह्या स्वातंत्र्य लढ्याला “काडतुसाला लागलेल्या गायीच्या व डुकराच्या चरबीमुळे झालेला उठाव” असे घोषित केले. इंग्रजांनी त्यांना सोयीस्कर असा इतिहास आपल्या गळी उतरवला. खरे काय घडले व किती प्रमाणात घडले ह्याचे आपल्या लोकांना अज्ञान होते व त्यामुळे ह्या लढ्याचे आपल्या लोकांना विस्मरण होऊ लागले. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गेल्या शतकाच्या पहिल्या दशकात इंग्रज अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या पत्रांचा व तपशिलांचा अभ्यास करून खरा इतिहास भारता समोर ठेवला. चरबीमुळे झालेला छोट्या स्वरूपाचा उठाव नव्हे तर १८५७चे स्वातंत्र्य समर हा इतिहास लोकांना दाखवून त्यांचे अज्ञान दूर केले. प्रयत्न केले तर स्वराज्य मिळू शकते हे लोकांना पटले. भारतीय जनतेला राणी लक्ष्मी, टोपे व मंगल पांडे ह्यांच्या हौतात्म्याचे स्मरण करून दिल्यामुळे पुढे प्रोत्साहित होऊन त्यांच्या नावाचा जयजयकार करीत व ओठावर बंकीम चंद्रांच्या वंदे मातरमचा उद्घोष करीत कित्येक भारतीयांनी आपले जीवन समर्पित केले. 

स्वराज्य भिकेत मिळत नाही तर हिसकावूनच घ्यावे लागते हे समजावण्याचे काम १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याने केले. ह्याचे स्मरण म्हणून ११ मे हा दिवस भारतीय स्वातंत्र्य समर दिन म्हणून दर वर्षी साजरा झाला पाहिजे.