राष्ट्रव्रत


राष्ट्रव्रत
 

हनुमानाची गोष्ट अशी सांगतात की, त्याला असा शाप ऋषींनी दिला होता की जो पर्यंत त्याला त्याच्या शक्तीची कोणी  जाणीव करुन देणार नाही, तो पर्यंत त्याला स्वतःच्या शक्तीची जाणीव असणार नाही, व त्या मुळे तो तिचा योग्य उपयोग करु शकणार नाही.  ह्या शापा मुळे त्याला माहीतीच नव्हते पडले की त्याच्या कडे एवढी प्रचंड शक्ती आहे. हि जाणिव करुन देण्याचे काम जांबुवंताने केले. आपण लहानपणा पासून शिकतो की सगळे धर्म तत्त्वतः चांगलेच असतात. कोणताही धर्म मानव जातीचा उत्कर्ष कसा साध्य होईल ह्याच एका उद्देशाने शिकवण देत असतो. मग सध्या जो हिंदुत्त्वाचा उद्घोष चालला आहे तो बरोबर आहे का? व त्याची गरज खरोखरीच आहे का? असे प्रश्न सहजच उद्भवतात. आपण सगळे येथे सामंजस्याने राहू, उगाच हे प्रश्न उकरुन जातियवाद का निर्माण करा? व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ह्याचा सामान्य माणसांवर काय फरक पडणार आहे? त्यांचे रोजचे सतावणारे प्रश्न सुटणार आहेत का?

           

ह्या सगळ्याचा विचार करायचा म्हणजे आपल्याला काही गोष्ठींचा खुलासा करुन घ्यावा लागेल. विचारवंतांचे व तत्त्वज्ञानी लोकांचे ध्येय, हे सर्व सामावणा-या, सगळ्या अस्तीत्त्वात असलेल्या जिवसृष्टीला पोषक व समृध्द करण्याचे असते. ज्ञानेश्वरांचे पसायदान हे त्याच दृष्टीकोनातून मागीतले आहे देवाजवळ.

 

जोजे वांछेल तो ते लाहो। प्राणिजात सकळा।।

 

जो ज्याची इच्छा करेल त्याची प्राप्ती त्याला व्हावी. इथे इच्छा ह्याचा अर्थ भौतिक इच्छा नव्हे. ज्ञानेश्वरांना आत्म्याची परमोच्च प्रगती हा अर्थ अभिप्रेत आहे. ह्यालाच जिववाद म्हणतात व ह्याच साठी हे संतलोक आपला जीव खर्ची घालवतात. सर्व जिवमात्रांची अशा दृष्टीने प्रगती होण्यास हे जरुरी आहे की ह्या जिवसृष्टी चे सगळे जे घटक आहेत ते सुध्दृढ झाले पाहीजेत. आपल्या सोयी साठी ह्या जिवसृष्टीचा प्रमुख दोन घटकां मध्ये भाग करु. प्राणीमात्र व मानव. एकुणच मानव व प्राणीमात्र ह्यांचे संवर्धन - जिवसृष्टीचे अस्तीत्त्व व शारिरीक प्रगती, ह्या नियमां मुळे चालु असते. एक म्हणजे निसर्गाचा समतोल राखणे ह्याचे थोडक्यात विश्लेषण द्यायचे झाले तर, आपण आपल्या भुतळावरचा कोणताही जीव हा एकटा असा बघायचाच नाही. सगळी पृथ्वी हा एक जिवंत. जगणारा ग्रह आहे असे गृहीत धरले म्हणजे. ह्यातले प्रत्येक जीव हे स्वतंत्र पणे जगण्याचे नियंत्रण करत नाहीत, तर सर्व जिवमात्र मिळुन त्यांच्या जगण्याने पृथ्वीच्या वातावरणाचे नियमन करत राहतात व पृथ्वीच्या वातावरणाचा फरक इथल्या जिवांवर सहाजिकच पडतो. दोन्ही घटक हा समतोल सतत सांभाळायच्या प्रयत्नात असतात. असा प्रबंध प्रोफेसर लव्हलिक ह्या अमेरिकन शास्त्रज्ञानाने मांडला आहे. आपल्या पृथ्वी वर २१ टक्के प्राणवायू आहे. जर तो, १५ टक्के असता तर कोणताही जीव जगू शकला नसता व प्राणवायू चे हेच प्रमाण जर २५ टक्के झाले तर, झाडांचे हिरवे बुंधे सुद्धा पेट घेतिल. एवढेच काय पण आपल्या श्वासनलीका सुद्धा जळतील. प्रणवायूचे इतके नाजुक प्रमाण, कोट्यावधी वर्ष पृथ्वीची होऊनही कसे राहीले. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. प्रोफेसर लव्हलीक यांच्या मता प्रमाणे, ह्या सगळ्या पृथ्वीवरच्या जिवसृष्टींच्या जगण्यानी आपोआपच संतुलन होत असते व पूढे ही होत राहील जो पर्यंत अनैसर्गिकरित्त्या आपण वातावरण बदलणार नाही तो पर्यंत.

 

ही झाली आपल्या अस्तित्त्वा बद्दलची ग्वाही व ह्या बाजुने काही इतक्यात काळजी करण्याचे कारण नाही. दुसरी म्हणजे जिवमत्रांची शारिरीक व मानसिक प्रगती. हे सर्वज्ञातच आहे की, प्राणीमात्रांचा प्रवास एका पेशिंच्या जिवांपासून, मानवा सारख्या प्रगत जीवा पर्यंत कसा झाला तो. चार्लस् डार्विन ह्यांच्या सर्व्हाइवल ऑफ द फिट्टेस्ट व प्रोफेसर लव्हलीक ह्यांच्या कारणमीमांसे वरुन अजुन एक गोष्ट आपल्या लक्षात येते. ती म्हणजे पुढे आत्ताच्या मानवाच्यादृष्टीने, प्रतीकूल असे आपल्या पृथ्वीचे वातावरण जरी बदलले तरीही जी नवीन वातावरणाला तोंड देऊन जिवंत राहू शकेल अशी एखादी नविन मानवजात निर्माण होईल व ती ह्या आपल्याला प्रतिकूल वाटणा-या वातावरणात मोठ्या ऐषारामात राहील. अस्तीत्त्व व शारिरीक प्रगती हे न थांबणारे स्त्रोत आहेत ह्याची काळजी संपली की मग येते मानसिक प्रगती. मानसिक प्रगती ही ख-या रुपाने जिवमात्रांमध्ये मानवालाच लागु आहे. तेव्हा आपण आतापासून मानवजातीचा विचार करुया.

     

मानवाचे अंतीम लक्ष्य, हे मानव जातीची मानसिक प्रगती करणे आहे. ज्ञानेश्वरांनी ह्याच ध्येयाचे प्रतिपादन त्यांच्या पसायदानात केलेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मताने, आपण सगळे ह्या आखिल मानवजातीच्या मानसिक उत्कर्षासाठी सतत खपले पाहीजे. आपली प्रत्येक कृती त्यालाच पोषक अशी असली पहीजे. आपली वृत्ती अशीच सर्वव्यापी झाली पाहीजे. आपले प्रयत्न त्याच दिशेने नित्य नेमाने झाले पाहीजेत. ह्यालाच म्हणतात मानवतावाद.

     

शरीर सुध्दृढ व निकोप होण्यासाठी हे जरुरी आहे की, शरीराचे सगळे अवयव निकोप व बलवान असले पाहीजेत. म्हणजे जो शरीर सुद्धृढ होण्यासाठी झटतो, त्याने शरीराचे सगळे अवयव धष्ट पुष्ट होण्याची काळजी गेतली पाहीजे. तसेच, सा-या मानवजातीने प्रगती करायची असेल तर ती, ज्याने बनलेली आहे ते सगळे मनुष्य समुह समृद्ध झाले पाहीजेत. हे मनुष्य समुह म्हणजेच भुतलावर असलेले वेगवेगळे देश. हे शरीररुपी मानवजातीचे, देशरुपी अवयव आहेत. मग प्रत्येक देशावर साहजीकच ही जबाबदारी पडते की, त्या त्या देशाने आपापला मानवजात समृध्द करण्याच्या दृष्टीने कार्यभाग सांभाळावा. महान इटालीयन क्रांतीकारी नेता, जोसेफ मॅझीनी हेच सांगत आला आहे. ह्या विश्वात जन्म झालेल्या प्रत्येक प्रणिमात्रांचे विशीष्ट असे करायचे कार्य आहे. प्रत्येकाच्या शिरावर कोणतीनाकोणती जबाबदारी असते. ती त्याने पारखून त्या प्रमाणे कार्य करायचे असते. हे त्याचे कार्य वाया जात नाही, अखील विश्वाचे कल्याण होण्यात त्या कार्याचा उपयोग होतो. अगदी तसेच देशांचे आहे. प्रत्येक देशाच्या वाट्याला मानवजातीची मानसिक प्रगती करण्यासाठी, ठरावीक जबाबदारी आलेली असते. ती त्या त्या देशाने पार पाडल्या वाचून गत्त्यंतर नसते. सगळ्या मानवजातीचे कल्याण करण्याचा मक्ता कोणा एका देशावर नसतो व तसे चालणार पण नाही. प्रत्येक दशाने आपले कार्य ओळखावे, पहिल्यांदा स्वतः समृद्ध व बलिष्ठ व्हावे मग इतरांना बरोबर घेऊन पुढे जावे. आत्ता पर्यंत आपण ह्या मनुष्य समुहांना देश असे संबोधत होतो. पण हा सर्वव्याप्त शब्द नव्हे. देश म्हणजे मनुष्य समुहानी व्यापलेला विशिष्ठ भौगोलिक परिसर. ह्याला जीव नसतो. कोणत्याही देशाला स्थिर अशी सिमा असते. देश स्वतः काही कार्य करणारा नसतो. फक्त कार्य करणा-यां साठी जागा देतो.

 

      ह्याच देशाला अर्थ देणारी, जिवंत करणारी, त्यात राहणारी माणसे असतात. आता ही माणसे सगळ्या दशात सारख्याच विचारसरणीचा उच्चार व आचार करणारी असती तर मग ह्या देशांना काही अर्थ प्राप्त झाला नसता. पण तसे नाही होत. ते, ते मनुष्य समुह जे विशिष्ठ प्रकारची विचारसिणी आचरतात, जी विचारसरणी ते ते मनुष्य समुह अंगिकारण्यास प्रबळ अशी कारणे असतात. जी विचारसरणी त्या त्या देशात राहाणा-या मनुष्य समुहानी वर्षों वर्षे जोपासलेली असते. जी विचीरसरणी वर्षों वर्षीच्या विचारमंथनातून निर्माण झालेली असते. जी विचारसरणी त्या त्या मनुष्य समुहांना मार्ग दाखवते, प्रगती करण्यास आत्मविश्वास प्रदान करते, ही विचारसरणी त्या त्या मनुष्य समुहांचे मनोबल वाढवते, कारण ती विचारसरणी त्या समुहाच्या वाडवडीलांनी अनुभवानी व गाढ विचारांनी सिद्ध केलेली असते. अशी विचारसरणी व तीचा अंगीकार करणारे लोकसमुह त्या त्या देशांना अर्थ प्राप्त करुन देतात.  तो देश जिवंत होतो. त्या देशाला राष्ट्र म्हणतात. देशाला सीमा असतात आणि त्याच सीमेत राहुन राष्ट्र विकासाची परिसीमा गाठू शकतो. राष्ट्राला अधोगती नसते प्रगती असते. कारण प्रगती फक्त जिवंत गोष्टीच करु शकतात. मग ते ते राष्ट्र जगात त्या त्या विचारसरणी मुळे ओळखले जाऊ लागते व स्वतःचे अस्तित्त्व बनवते. आपोआपच राष्ट्र ज्या विचारसरणी वर बनले आहे, त्या विचारसरणी वर, व ती अनुसरणा-या लोकांवर, जबाबदारी येते की आपले राष्ट्र जर जिवंत व प्रगत बनवायचे असेल तर आपली विचारसरणी जोपासली पाहीजे. तीचा उच्चार केला पाहीजे. तीचा आचार केला पाहीजे. बहुतेक बलाढ्य राष्ट्रांनी हेच केले आहे व करत आहेत. जी राष्ट्र त्यांची विचारसरणी बदलण्याच्या मागे लागतात, त्या राष्ट्रातली लोकं गोंधळलेल्या मनस्थितीत राहतात. आपोआपच प्रगती थांबते. रशियाची सध्या हीच व्दिधा मनस्तिथी झाली आहे. कम्युनीझम् सोडवत नाही आणि कॅपिटॅलीझम् धरवत नाही. पाश्चिमात्य देशांमध्ये आयन रँड यांच्या कॅपिटॅलीझम् ह्या विचारसरणीचा पगडा कायम आहे, आणि ही विचारसरणी ज्या पासुन उद्भवली तो त्यांचा देश पण अबाधीत आहे. पाया भक्कम आहे. लोकं गोंधळलेली नाहीत, परिणाम स्वरुप, पाश्चिमात्य राष्ट्रांची प्रगती न थांबता होत आहे.

 

मग आपल्या राष्ट्रची अशी गोंधळेली परिस्थीती का. आपल्या देशाचा प्रवास समृद्धीच्या वाटेवर सुरू झाला आहे त्यात शंका नाही, पण त्याची गती बरीच संथ आहे. आपल्या राष्ट्रचा जीडीपी (GDP) जरी सातत्त्याने वाढत असला, व आपले उद्दयोग धंधे बाहेरील बाजारपेठेत जास्त नफा कमवायला लागले असले तरी ते किती नितीनीयमानूसरुन व कीती आपल्या सरकारी नियमांची भलावण करुन पुढे जात आहेत ह्याचा विचार आपण करायला पाहीजे. ब-याच वेळा पैसा कमवायचा म्हणुन प्रस्थापित नितिमत्ता सुद्धा ठोकरली जाऊ लागली आहे. नितिमत्तेला धरुन पैसा कमावणे व काहीही करुन पैसा कमावणे ह्यातला फरक फार थोड्यांना कळु शकतो व त्याहुन थोड्यांना त्याचे महत्त्व कळु शकते. नाहीतर हल्ली सगळ्यानी गृहीत धरले आहे की, पैसा कमावण्यासाठी सरकारचे नियम आपल्याला पाहीजे तसे लाच देऊन वळवता येतात. ह्याला उद्योगपती सरकारी शिक्षण म्हणतात, किंवा मग मोठमोठाली कॉनफरनसेस आयोजीत करण्यात येतात, त्यात हवे तसे कायदे बनवण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जातात. त्याचा परीणाम आपल्याला मिळणा-या विविध निकृष्ट सेवेतून दिसुन येतो. प्रसिद्ध उद्योगपती श्री जे आर डी टाटा यांनी किती मार्मीक टिप्पणी करुन ठेवली आहे ते पहा मला भारत आर्थिक दृष्ट्या बलाढ्य राष्ट्र नको आहे. मला भारत सुखी व समृद्ध राष्ट्र हव आहे.  आपला दृष्टीकोण ब-याच महत्त्वाच्या बाबींवर स्पष्ट नाही. आपला राजकिय दृष्टीकोण पण त्या मुळे शिड उडालेल्या जहाजा सारखा झाला आहे.

 

-                     आपला शत्रु देश व त्याच्याशी आपला व्यवहार कसा असला पाहीजे ह्या वर एकमत अजुन नाही.

-                     समान नागरी कायदा व त्या संबंधातले धोरण कायम नाही.

-                     आपल्या देशाच्या सिमा पुर्णपणे निश्छित अजुन झाल्या नाहीत. पाक व्याप्त काश्मीर वर आपण बोलु शकत नाही.

-                     काश्मीर जर भारताचा अविभाज्य भाग आपण मानत असु तर पीकिस्तान बरोबर काश्मीर मुद्द्यावर आपण का म्हणुन बोलायचे? आपला देश, आपले राज्य त्यात आणखीन पाकिस्तान कोठुन आले? बोलायचेच तर फक्त पाक व्याप्त काश्मीर वर बोलायला पाहीजे.  काश्मीरीयत पाहीजे असे अजुन सुद्धा म्हणणारी मंडळी येथे सापडतात.

-                     हिच गोष्ट अरुणाचल प्रदेश बद्दल. चीन आपला मित्र आहे की शत्रु राष्ट्र आहे हे अजुन आपल्याला आळखायचे आहे.

-                     आपल्या देशा साठी काय बरे व काय वाईट हे आपण ठरवणार का जगाचे बलाढ्य आंतरराष्ट्रीय उद्द्योग ठरनणार हा संभ्रम अजुन आहे आपल्याकडे. भोपाळ वायु गळती मुळे हजारो लोकं मेली पण कोण्या एकाच्या अमेरीकेहून आलेल्या दुरध्वनी वरुन अँडरसन महाशयांना चॅर्टर विमानाने अमेरीकेला परत पोहचविले जाते. ह्या वरुनच आपली विचारशक्ति गोंधळलेली दिसते.

-                     आपल्याला जो इतिहास शिकवला जातो तो आपण पारखुन घेतला पाहीजे. त्या संबंधाने आपले धोरण ठरवणारी कोणतीही संस्था अजुन नाही.

 

आपली विचारसरणी एवढी प्रखर असताना, आपल्या पुर्वजांनी भरभक्कम तत्त्वांवर आधारलेल्या विचारांचे देणे आपल्या पदरात घातले ते फक्त जाहीरातींवर दाखवण्यासाठीच आहे काय? ती अनुसरायला आपण लाजतो का?

 

आपल्या देशाने सेक्यूलॅरीझम (सर्व धर्म समभाव) अंगीकारला आहे, पण त्याला अजुन जाणीव झालेली दिसत नाही की हा - सर्व धर्म समभाव ज्या विशिष्ठ विचारसरणीचा भाग आहे, जी विचारसरणी भारताला ज्ञात अशा ५००० वर्षा पासून मिळालेली आहे, जी विचारसरणी आपल्या पुर्वजांनी आचारुन आपला देश समृद्ध केला होता, ज्या विचारसरणी चे आजही भारतात ८० टक्के सदस्य आहेत, असा जो हिंदू धर्म आहे, त्याचाच सेक्यूलर हा अर्धवट लचका तोडून त्याला सजवून ठेवलेला भाग आहे. अहो सगळीच्या सगळीच विचारसरणी अंगीकारा ना. गणित शिकायचे तर पाढे म्हणायची लाज का. आपल्या पुर्वजांनी हिंदु विचारसरणीरुपी पक्वान्नाचा घास आपल्या तोंडाशी आणून ठेवलेला असताना, गिळायचा कंटाळा का. आपल्या देशाचे भाग्य समजा की आपल्याला सगळ्या विचारांचे सार तयार मिळालेले आहे. कोणा देशां सारखे विचारांचे दारिद्र्य आपलाकडे नाही मग हा करंटे पणा कसला. ओरपा ते विचारसरणी रुपी अमृत.

 

हिंदु धर्म अनुसरणा-यांनी ही जबाबदारी आपणहून घ्यावी ही जबाबदारी त्यांच्यावर आपोआपच पडते, कि ते भारताच्या प्रगतीचे प्रहरी ठरो. सावरकरांच्याच शैलीत बोलायचे म्हणजे आपला भारत, सांस्कृतिक दृष्ट्या जगाला मार्ग दाखवणारा एवं शिरोग्राह्य बनवण्यासाठी हिंदु लोकांनी स्वतःहून प्रयत्न केले पाहीजेत. भारत अग्रेसर बनवण्यात  आपल्याला कधी यश मिळेल? असे कोणते लोक जबाबदारीने पुढे येऊन काम करतील?

 

ज्यांना भारत खरोखरच बलाढ्य व समृद्ध देश व्हावा, ह्याची तीव्र कळकळ आहे, ज्यांची देशासाठी झटण्याची तयारी आहे, जे स्वतःचा उत्कर्ष भारताच्याच उत्कर्षात बघतात, त्यांच्याच हातून भारताची प्रगती होणार आहे. तेच लोक भारताचे खङगहस्त बनण्यास पात्र आहेत. तेच नेते आहेत व तेच जेते ठरणार आहेत. पण ही अशी प्रबळ इच्छा लोकांच्या मनात उत्पन्न कशी होणार. कि जेणे करुन ही इच्छा अस्वस्थ करणा-या कळवळीला जन्म देईल व त्याच अस्वस्थ करणा-या कळवळीच्या पोटी देशासाठी झटण्याचा मनोनिग्रह निर्माण होऊन लागणारा आत्मविश्वास प्रदान करील व जेणे करुन, अशा प्रबळ इच्छेची व त्या इच्छेतून, प्रचंड प्रमाणात काम करणारी अशी न संपणारी मानवी साखळी तयार होईल, व हळुहळू भारतात रहाणा-या प्रत्येकाचे मन ह्या लाटेने चिंब भिजून, आपल्या देशासाठी कोणचेही काम, माझे स्वतःचे काम आहे व मी ते मन ओतून करीन असे वाटायला लावणारी तळमळ व तसे काम करणारे लोकसैन्य निर्माण होईल. हे कधी होईल? हे कसे होईल? हे होईल का?

 

      माणसाचा स्वभाव हा जात्याच पोझेसीव असतो.  म्हणजे हे माझे, हे मी मिळवले आहे, माझी गोष्ट अशी असावी, मी मग असे करीन अशी वाक्ये आपण नेहमी ऐकतो ते हेच दर्शवतात. मग भारतात राहणा-या हिंदु मनाला ह्या गोष्टीची जाणीव निर्माण करुन दिली पाहीजे की ही जी महान संस्कृती म्हणजेच विचारसरणी त्याला लाभली आहे ती त्याची स्वतःची आहे. ती त्याच्या पुर्वजांनी स्वतः संपादन केली आहे. ती त्याच्या साठीच, आयुष्य सुकर करणारी व प्रेरणादायी विचारसरणी आहे. ह्याच विचारसरणीने आज ह्या देशाला इतर देशांपेक्षा वेगळे केले आहे. ह्याच विचारसरणीने, सगळ्या भारतियांना विचार बंधांनी बांधलेले आहे.  ह्या विचारसरणीत एवढी शक्ती आहे की तिचा जर अवलंब केला तर, लोकांचे कल्याण होईल ह्याचा प्रत्यय आज हजारो वर्षे आपल्याला येत आलेला आहे.

 

                        आज भारतात अनेक वेगवेगळे रितिरीवाज आहेत उत्तरे कडुन दक्षिणे पर्यंत व पुर्वे कडुन पश्चिमे पर्यंत. पण प्रत्येकाला माहीत आहे की आपण वेगळे नाहीत. कारण मनाच्या कोप-यात वा अंतर मनात दडलेले असते की आपली विचारसरणी म्हणजेच धर्म एक आहे, व हा एवढा एक व एकच दुवा पुरा आहे लोकांची मनं बांधून ठेवायला. पहा ही कल्पना नुसती मनाच्या कोप-यात असल्यानीच केवढे कार्य केले आहे, त्याचीच जर प्रत्येकाला जाणीव झाली तर त्यातूनच केवढी मोठी सांघीक शक्ती निर्माण होईल. हीच शक्ती प्ररणा देते की आम्ही एक आहोत. हा देश आमचा आहे. ही विचारसरणी टिकवण्यास व प्रगल्भ करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. आम्हाला आमच्या विचारसरणीचा म्हणजेच हिंदुत्त्वाचा अभीमान आहे. हे आमचे आहे. आमच्या देशाला काही अपयश आले तर नामुष्की आमची स्वतःची होणार आहे. देश यशस्वी झाला तर यश माझे आहे. माझा भारत बलाढ्य झाला पाहीजे, कारण माझी विचारसरणी, माझी संस्कृती, माझी इच्छा प्रबळ आहे. हजारो वर्षांच्या परंपरेतून तावून सुलाखून निघालेली आहे. विचारसरणी पक्की आहे, खोटी आमच्या कडुनच आहे. पण हे सगळे आपल्या विचार धारणेवर विश्वास नसला तर मुळीच होणार नाही. म्हणूनच प्रत्येक हिंदु मनाला आपण हिंदु आहोत ह्याचा आभिमान पाहीजे व तो योग्य त-हेने प्रगट करता आला पाहीजे हे महत्वाचे. हिंदु धर्माचा अभिमान बाळगणे व तो योग्य त-हेने प्रगट जर करायचा तर आपल्याला खालील सुत्र अंमलात आणावी लागतील. ती सुत्र अशी आहेत.

 

-                     आपल्या व आपल्या भोवतालच्या लहान मुलांना योग्य वळण लावणे व जागृत करणे, राष्ट्रव्रती बनवणे.

-                     अहंभाव कमी करणे.

-                     राष्ट्र सुधार कार्यात नेहमी अग्रेसर राहणे.

-                     लाचखोरी व वित्तिय घोटाळ्यां पासुन स्वतः दुर रहाणे व दुस-याला परावृत्त करणे.

-                     आपल्यातले कला, नैपुण्य सतत वाढवणे व छंद जोपासाणे. शरीराला व्यायामाची सवय ठेवणे.

-                     कामाच्या चागल्या सवयी लावुन घेणे. तसेच कोणच्या ही कामाची व काम करणा-यांची उपेक्षा टाळणे.

-                     नितीमत्ता व चांगल्या आचारणांचा वापर सतत करणे.

-                     टोकाच्या आवडी-निवडी टाळणे. छांदीष्टपणा टाळणे व स्वतः बद्दलची कीव कमी करणे.

-                     दुरदर्शी बनायचा प्रयत्न करा व स्वतःचे विचार उत्तम, उदात्त व उत्तुंग बनवा.

-                     आपल्या धर्मातल्या चागल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे.    

 

ही सुत्र जो अमलात आणतो तो हिंदु हा राष्ट्रव्रती असतो. ही सुत्रे आपल्या हिंदुधर्मात वेळोवेळी व वेगवेगळ्या संतांनी, स्मृती, श्रुतीं मधुन निर्देशांच्या रुपाने आधिच अस्तित्वात आहेत. येथे फक्त देश काल पात्राच्या मर्यादेत राहुन एकत्र केली आहेत. हेच हिंदुत्त्व, हेच राष्ट्रव्रत. राष्ट्रव्रताच्या दहा सुत्रांचे आकलन होण्या करता ती सुत्र काय आहेत ती पाहूया.

 

- आपल्या व आपल्या भोवतालच्या लहान मुलांना योग्य वळण लावणे व जागृत करणे, राष्ट्रव्रती बनवणे. हे प्रत्येक हिंदुत्त्ववाद्याचे म्हणजेच राष्ट्रव्रत्याचे कर्तव्य असले पाहीजे. आपल्या राष्ट्राला अग्रेसर बनवणारी अशी लहान मुलेच मशाली ठरणार आहेत. त्याना हिंदु असण्याची कल्पना व देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी लागणारी विचारांची योग्य सामुग्री त्यांच्या बालपणीच बालकडु म्हणुन द्यायला हवी. हे साध्य करण्यासाठी काही रुपरेषा दिल्या आहेत

 

·        लहान मुलांना कामाचे मह्त्व शिकवावे. कोणचे ही काम खालच्या दर्जाचे नसते. काम करणा-यांची उपेक्षा करणे घातक असते. त्यांच्या मनात ठसवा की ज्याना काम मिळाले आहे ते खरोखरीच नशीबवान आहेत.

·        त्यांच्यात स्वछतेची जाणीव जागवा. स्वतःची स्वछता व सार्वजनिक स्वछतेचे मह्त्व रुजवा. सार्वजनिक स्थळे घाण करणे म्हणजे अतिशय निचतेचे वागणे आहे हे पटवा.

·        वहानांचे योग्य नियम शिकवा व ते पाळायला शिकवा.

·        मुलांना रांगेत उभे राहण्याचे मह्त्व बिंबवा. आपल्या देशाचे नियम पाळायची सवय लावा. नियम पाळणे वा न पाळणे हे कोणी बघताय वा बघत नाही ह्या वर अवलंबून असायला नको. नियमां विरुद्ध अर्ज करणे व नियम का पाळला नाही त्याला कारणे देणे आपल्यात भिनले आहे ते थांबवायची गरज आहे. लहानांना हे पटवले पाहीजे की नियम न पाळणे ह्यात काही शहाणपण नाही. माणसाचे थोरपण तेव्हाच कळते जेव्हा तो नियम पाळुन यशस्वी होतो.

·        लहानांना व्यायामाचे मह्त्व शिकवा. सुर्यनमस्कार शिकवा. निटनेटकेपणा अंगी बाणायला शिकवा. कोणचीही गोष्ट चांगल्या त-हेने सादर करायची कला आत्मसात करायची सवय लावा.

·        आपल्या देशाच्या मालमत्ते चे रक्षण करायची सवय लावा. विरोध जरी प्रदर्षित करायचा झाला तरी वहाने जाळुन व कोणच्याही प्रकारची नासधुस करुन प्रदर्षित करता कामा नये ह्याची शिकवण लहालपणापासुन द्या.

·        थुंकायची सवय चांगली नाही हे मनात बिंबवा.

·        छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घ्यायला शिकवा. टोकाच्या आवडी निवडी सोडायला शिकवा. त्यानी त्यांचे पुढचे आयुष्य आनंदी व प्रसन्न होण्यास मदत होईल.

·        सकाळी लवकर उठण्याचे मह्त्व शिकवा. जो सकाळी लवकर उठतो त्याला दुस-यां पेक्षा जास्त वेळ मिळतो.

·        लहान मुलांन मध्ये मिसळा. त्यांच्या बरोबर संध्याकाळी खेळ खेळा. जर लहान वयात मुलांना नुसते मोकळे सोडले तर मुलं वाईट सवयी पटकन धरतात. नाहीतर गणकयंत्रावर लहानपणीच विविध हानीकारक खेळ खेळायचा वाईट नाद लागतो मुलांना. त्यामुळे त्यांची मनोवृत्ती विकृत बनु शकते वा शारिरीक प्रगती खुंटते. जर का आसपास खेळायचे मैदान नसेल तर त्यांच्याकडुन पळायचा व्यायाम करवुन घ्या. सुर्यनमस्कारांचे मह्त्व पटवुनद्या व त्यांच्या कडुन सुर्यनमस्कार घालुन घ्या.

o   लहान मुलांमध्ये कसे मिसळायचे व त्यांना जागृत कसे करायचे ह्याचे थोडक्यात वर्णन करत आहे.

§  साधारणपणे दररोज १ तास लहानांना मध्ये घालवायचा प्रयत्न करावा. लहानात मिसळा तुम्हीही आनंदी बनाल. तुमच्या आवडी नुसार व वेळेच्या उपलब्धते नुसार वेळापत्रक करावे. पण जे ठरवाल त्यात नियमीतता असली पाहीजे.

§  पहीला अर्धा तास व्हॉली बॉल, फुट बॉल सारखे मैदानी खेळ असावेत. ह्या खेळांनी एकमेकांमधले सामंजस्य वाढते, मुलांची शारिरीक प्रगती होते आणि दमायला होते. लहान मुलांनी खेळ खेळुन दमायलाच पाहीजे. पुढची १५ मिनीटे, त्याना एखादी गोष्ट सांगा. ही गोष्ट अशी निवडा कि ज्या पासुन जिवनाबद्दल चांगले धडे शिकायला मिळतील. ती गोष्ट, पुर्वीच्या आपल्या भारतवर्षाच्या उज्वल काळातली असु शकते, आपल्या इतिहासातल्या झालेल्या चुका असु शकतात, आपल्या स्वातंत्र्य लढ्या बद्दलच्या गोष्टी असु शकतात, किंवा एखादी आपल्या स्वातंत्र्योत्तर काळातील भारत पाक लढ्यातली गोष्ट असु शकते. किंवा एखाद्या थोर लेखकाने लिहीलेली गोष्टही असु शकते.

§  पुढची १५ मिनीटे मुलांना हल्लीच्या ज्वलंत प्रश्नांबद्दलची माहीती करुन द्यावी. त्यांना त्याचा विचार करुन त्या प्रश्नांवर उत्तरे शोधायची सवय लावावी. लोकांपुढे बोलायची सवय लावावी. सभे पुढे बोलायचे धैर्य वाढवावे.

§  हा एक तास तुम्ही जेवढा नीट आखाल तेवढा त्याचा फायदा मुलांच्यात योग्य जागृती होण्यात होईल. मुलांमध्ये तुमचा मेळ बरोबर बसला पाहीजे तरच मुले तुम्हाला मित्र समजुन, किवा तुमचा आदर करुन चांगल्या सवयी उचलतील.

 

हे करताना आपल्याला स्वतःचा अहंभाव जरा बाजुला ठेवावा लागेल. मुलांना शिकवायची मनापासुन इच्छा व्हायला पाहीजे. कोठे मुले चुकताना दिसली तर, मला काय करायचे त्यांचे पालक बघुन घेतील ही भावना सोडुन देऊल मुलांची चुक दुरुस्त करायचा प्रयत्न करावा लागेल. मुलांना चुक समजावुन द्यावी लागेल व पालकांनीही उगाचच मुलांची बाजु घेण्याचे टाळले पाहीजे.  हातुन झालेल्या चुकांचा मुलांना पश्चाताप होणे हे चांगले लक्षण आहे ते जोपासले पाहीजे. ज्याला पश्चाताप होतो तो चुका सुधारु शकतो.

 

-                     अहंभाव कमी करणे.     ब-याच वेळेला आपला अहंभाव कृती करण्याच्या आड येतो. आपल्यातल्या अहंभावामुळे ब-याचवळेला कृती कराविशी वाटुन सुद्धा गोंधळ उडण्या सारखे भरपुर प्रश्न आपल्या समोर उभे ठाकतात. कधी वाटते माझा दर्जा, माझी पोझीशन पाहुन मी का म्हणुन असले काम करु? कधी मनात येते, मी कशाला त्या मुलाला शिकवू किंवा चुका काढु? कारण, तो मुलगा ज्या घरातला आहे त्याच्याशी आपले फार काही जिव्हाळ्याचे संबंध नाहीत. कधी कोणी आपल्या राष्ट्रासाठी छान कल्पना पुढे ठेवली तर मी मदत तर सोडाच पण साधा पाठींबा पण देणार नाही. बाजुला होऊन गंम्मत बघेन. फारच झाले तर, मला जर श्रेय मिळणार असेल तर मग विचार करीन. आपण जेव्हा आपल्याकडे कामकरणा-यांच्या मुलांना शिकवत असु, किंवा एखाद्द्या दारिद्र्यरेषे खालच्या घरातल्या मुलांना शिकवत असु तेव्हातर प्रामुख्याने आपल्या अहंभावावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहीजे.

 

-                     राष्ट्र सुधार कार्यात नेहमी अग्रेसर राहणे.            राष्ट्र जो पर्यंत समृद्ध होत नाही तो पर्यंत स्वतःचा व स्वतःच्या कुटूंबाचा सातत्त्याने विकास होणार नाही. हे ज्याला पटले तो आपोआपच राष्ट्र सुधार कार्यात अग्रेसर होईल. आपण स्वतःचा विकास जेव्हा आपले राष्ट्र निकोप, सुरक्षित व संघटीत होईल तेव्हाच ख-या अर्थाने करु शकु. आपल्या धर्मा मध्ये गरजुंची मदत नहमीच प्रतिपादीली आहे एवढेच नाही तर शास्त्रांमध्ये ती कशी करावी ह्यावर मार्मीक विवेचन आढळेल. शास्त्रे सांगतात, आपल्या मिळकतितील १० टक्के आपण गरजुंना द्यावेत, १० टक्के आपल्या वृद्ध पालकांवर व थोरांवर खर्चि घालावी, १० टक्के भविष्यासाठी साठवुन ठेवावी आणि बाकी उरलेली स्वतःवर व परिवाराच्या कल्याणार्थ खर्ची घालावी. ही काही काळ्या दगडावरची रेघ नव्हे पण एक घालुन दिलेला पायंडा आहे. कोणाला गरजे नुसार, इच्छे नुसार, आपल्या शक्ति नुसार, आपल्या आत्म्याच्या प्रगल्भतेच्या स्तरानुसार, आपल्या आवडी नुसार त्या प्रमाणात कमी जास्त बदल करायचा असेल तर त्यात काही गुन्हा नाही, तो त्याने करावा. पण समाजासाठी असलेली आपली जबाबदारी ओळखावी एवढे समजले व त्याप्रमाणे वागले म्हणजे शास्त्रपालन झाले असे समजावे. स्वतःला असे करण्यात किती समाधान मिळेल ते बघा. स्वतःचा स्वभिमान वाढीस लागेल.

 

राष्ट्र सुधार कार्यात अग्रेसर व्हायचे तर काही सोप्या सहजच करता येण्या सारख्या गोष्टी आहेत.

 

-                        आपण एखाद्या गरजु विद्द्यार्थ्याला मदत करु शकता.

-                                             जवळच्या असरकारी संघटनेत काम करु शकता.

-                                             आपण जर वृद्ध असाल तर आजुबाजुच्या लहान मुला मुलींना गोष्टी सांगुन किवा गोष्टी सांगायला लावुन सभाधीट बनवा. तुमचा पण वेळ चांगला जाइल व लहानांना पण जाता जाता वळण लागेल.

-                                             आपण जर गृहिणी असाल तर फावल्या वेळेत तुम्हला येणारी कोठली कला लहानांना शिकवता येईल. कला, गोष्टी, संगीत, गप्पागोष्टीतुन सुद्धा समाजोपयोगी चांगले गुण शिकले, शिकवले जाऊ शकतात.

-                                             तुम्ही जर वैद्द्य किवा डॉक्टर असाल तर जवळच्या गरजु लोकांना सामाजिक स्वास्थ्या बद्दल सांगता येऊ शकेल व औषधेही देऊ शकाल.

-                                             किती लिहु? तुम्ही तुमच्या कुवती प्रमाणे स्वतःच ठरवुन रामाच्या खारुटली प्रमाणे तुमचा वाटा उचलु शकता. थोडक्यात, आयष्यात एकातरी गरजु मुलासाठी देवमाणुस व्हायचा प्रयत्न करा व बघा किती अंतरिक समाधान प्राप्त होते ते.

 

ज्याना एवढेही जमणार नसेल त्यानी बाकीच्यांनी हाती घेतलेल्या कामात अडथळे न आणता त्यांना मनापासुन निदान चांगले आशिर्वाद तरी द्यावेत. काही गोष्टी ज्या सहज तुमच्या हातुन होऊ शकतात त्यां बद्दल आता लिहीत आहे.

 

-                     आपल्याला आवडेले असेल किवा नसेल पण आपले राष्ट्र वेगवेगळ्या भाषिक प्रांतात (राज्यात) विभागले गेले आहे. आ      पल्या राष्ट्राने ह्या गोष्टीचा स्वीकार केला आहे. आपले राष्ट्र आपल्या राज्यांपेक्षा श्रेष्ठ असल्या कारणाने अंतरराज्य सिमेवरुन भांडणे उकरुन काढता कामा नयेत व असलेल्या मतभेदांना प्रोत्साहन देता कामा नयेत. कोठच्याही अशा मोहीमेला बळी पडु नका ज्याने राज्या राज्यां मध्ये कलह निर्माण होईल. तुमची उर्मी, तुमची शक्ती व तुमची बुद्धी ही आपल्या राष्ट्राच्या सिमा सुरक्षित कशा राहतील ह्यात लागल्या पाहीजेत. आपल्या सिमेला धरुन असणा-या प्रश्नांशी तुम्ही नेहमी जागरुक असले पाहीजे. कोणत्या सिमा अजुन निश्छित नाहीत, कोणच्या सिमेबाबत कोणच्या राष्ट्रांबरोबर वाद आहेत, घुसखोर कोठुन होत आहे, बांगलादेशी विस्थापितांचा लोंढा अजुन का येत आहे व आपला देश तो थांबवण्यासाठी काय करत आहे ईत्यादी.

-                     आपण नेहमी सतर्क असले पाहीजे आपल्या राष्ट्राची संपत्ती व नैसर्गीक साठे ह्यांच्या सुरक्षीतते कडे. नेहमी मुलांना व वाटचुकल्या तरुणांना राष्ट्रिय संपत्तीच्यानाषा पासुन परावृत्त केले पाहीजे. अशा कोठच्याही मोहीमेला आपला पाठींबा असता कामा नये कि जेणे करुन राष्ट्रिय संपत्तीला हानी पोहचेल. विरोध दर्शवायच्या सुद्धा चांगल्या पद्धती आहेत त्याचा वापर करावा. कोणत्याही कायद्या विरुद्ध किंवा सरकारी धोरणाचा विरोध करायचा असेल तर राष्ट्रिय संपत्तीला हानी न पोहचवता करा.

-                     अशा कोणत्याही मोहीमेला प्रोत्साहन व पाठींबा देऊ नका की जेणे करुन मंदीर, मस्जीद इत्यादी धर्मस्थळे दळणवळण केंन्द्रांवर व रस्त्यांमध्ये बांधायचा विचार आहे किंवा बांधली जात आहेत.

-                     लोकसंख्या वाढीमुळे उद्भवणारे प्रश्न अशिक्षित लोकांना समजावुन सांगा. संख्ये पेक्षा कस का चांगला ह्याचे महत्त्व समजवावे.

-                     आपल्या राष्ट्राबद्दल चागले विचार मनात नेहमी आणावे, तसेच आपल्या परिवाराबद्दल मनात चांगले विचार आणावे, आपल्या समाजाबद्दल मनात चांगले विचार आणावे. हे सर्वश्रुत आहे की सार्वजनिक प्रार्थनेचा खुप फायदा होतो. मन चांगले होते व आजुबाजुला चांगले वातावरण निर्माण होईला मदत होते. चांगल्या मनाने केलेली प्रार्थना देशासाठी उपायकारक ठरते.

-                     मतदान हे सगळ्यात मोठे आपले कर्तव्य आहे व लोकशाही टिकवण्याचे मुख्य साधन आहे. ते प्रत्येकाने आपला धर्म आहे अस समजुन पाळले पाहीजे.

     

-                     लाचखोरी व वित्तिय घोटाळ्यां पासुन स्वतः दुर रहाणे व दुस-याला परावृत्त करणे.  ज्याच्या कडे कौशल्य, कर्तब, शक्ती किंवा बुद्धी असते, आणि परिश्रम करण्याची तयारी असते, तो मनुष्य आपल्या कर्तबगारीवर पैसे मिळवतो. स्वतःचे इमान व स्वतःचा धर्म विकुन नव्हे. थोड्याशा पैशासाठी, आत्मा विकुन आपल्या स्वतःला व आपल्या घरच्या लोकांना सामोरं जाता येणार नाही. प्रत्येक लाचखोर माणसापाठीमागे नेहमी त्याचे हवरट कुटूंबं असते.  लाचखोरी करुन तुम्हाला असे म्हणुन टाळता पण येत नाही की दुस-यानी मला लाच घ्यायला लावली - कारण लाच घ्यायची का नाही हे ठरवणारे शेवटी तुम्ही स्वतःच असता व हा निर्णय तुमचा स्वतःचाच असतो. जो लाच खातो व देतो तो आपल्या राष्ट्राचा शत्रू ठरतो, मग तो किती का इतरवेळेला राष्ट्रप्रेमाचा आव आणुदे. जो लाच घेतो व लाच देतो तो पापी व राष्ट्रद्रोही असतो.

 

-                     आपल्यातले कला, नैपुण्य सतत वाढवणे व छंद जोपासाणे. शरीराला व्यायामाची सवय ठेवणे.   आपली मातृभाषा सुधारण्याचा ध्यास घ्या. भाषाकौषल्य वाढवा. ब-याचदा आपले भाषाकौषल्य जर अपुरे असेल तर गैरसमज उद्भवण्याचा संभव असतो. आपला जो अभ्यासक्रम असतो, त्याच बरोबर आपण वेगवेगळे आवडणारे असे व ज्यात आपल्याला गती व रस आहे अश्या कला जोपासाव्या व कौशल्य वाढवावे. आपला शालेय अभ्यासक्रम हा बुद्धीला चालना देणारा नसुन पुस्तकी जास्त आहे, कौशल्य वाढवणारा नाही. आपणही कौशल्य वाढवायच्या मागे नसतो. कसे तरी करुन पदवीधारक बनुन नोकरी लागली की झाले, अशी आपली स्वतःची भावना असते. कमरेवर हात ठेवुन
दुस-यांकडुन काम करवुन घेण्याचा फार शौक आपल्याला. उंटावरुन शेळ्या हाकायला फार आवडतात आपल्याला. पण आपल्याकडे कौशल्याची कमी असेल तर फार काळ आपला टिकाव लागत नाही. कोणी तरी जास्त कौशल्याचा आपल्या पुढे निघुन जातो.

 

कौशल्या बरोबर एखादा छंद जापासावा. छंद हे व्यसन नाही. काँप्युटर वर सारखे खेळ खेळणे हे व्यसन म्हणता येईल. नेट चॅटींग हे व्यसन म्हणता येईल. हल्ली आपले काँप्यटर मित्र फार व आसपासच्या ख-या लोकांशी आपल्याला बोलायला वेळ नाही अशी परिस्थिती झाली आहे.  ह्याचे पर्यवसन लोकांना डिप्रेशन व तत्सम व्याधीं मधुन पहायला मिळते. ह्याच कारणास्तव आपल्याला आपल्या येणा-या पिढीला छंद जोपासायला शिकवले पाहीजे. प्रत्येक लहान मुलाला एखादा चांगला छंद अंगिकारायला प्रोत्साहन द्यायला पाहीजे. मोठे झाल्यावर हल्लीच्या न्युक्लीयर कुटंबांतुन छंद हाच प्रत्येकाचा खरा सोबती ठरणार आहे. चांगला छंद आपल्याला कठीण प्रसंगी कामास येईल. आपले मनोस्वास्थ्य जोपासण्यास त्याची अतोनात मदत होते. छंद जोपासण्यानी ब-याच अंशाने आपल्या डोक्यावरचा ताण कमी होण्यास नैसर्गीकरीत्या मदत होते. चांगले छंद आपला एकटेपणा दुर करतात व तो असा एक विरंगुळा आहे की जो जोपासल्याने आपली प्रसन्नता टिकवुन ठेवली जाते. शेवटी प्रत्येकानी आपला जु आपणच उचलुन पुढे चालले पाहीजे. ह्या जगात तोच मनुष्य यशस्वी गणला जातो ज्याला प्रसन्नतेने व आनंदाने जगता आले आहे. गुरु रविंद्रनाथ टागोरांचे एकला चालो रे हे गीत हाच उपदेश आपल्याला देते की स्वतःची वाटचाल अशीच आनंदाने चालु ठेवा, जरी कितीही अडचणी आल्या तरी व छंद आपला हा प्रवास सुकर करण्यास निश्चित मदत करेल.

 

आपल्या शरिराला व्यायामाची सवय ठेवा. दररोज किमान अर्धातास तरी शरीराला व्यायाम द्यावा. आपला हा व्यायाम आपण मुलांमध्ये मिसळूण त्यांना शिकवत असताना करु शकता. स्वतःच्या शरिराला व्यायाम देताना तुम्ही स्वतः तो कशा पद्धतीने करायचा ह्याचा आराखडा आपण तयार करु शकता. आपल्या ह्या अर्धा तासाची सुरवात प्राणायमाने करु शकता, त्यानंतर थोडे पळणे, घरातील कामे करणे साफसफाई, केर काढणे तत्सम गोष्टी व्यायामाच्या आ-याखड्यात प्रवीष्ट करु शकता, महीलांना भारतीय नृत्य येत असेल तर त्या त्याची तालीम करु शकतात. जे ठरवू त्यात नियमितता आणली पाहीजे. चांगली सवय लावुन घेण्यासाठी सोपा उपाय म्हणजे तो उपक्रम सतत २१ दिवस करा, आपोआप त्याची सवय लागेल व मग आपले मनच चुकचुकेल व लागलीच व्यायाम करु.  आपल्या शरीराला व्यायाम हा हवाच. कोणतीही सरकारी वा गैरसरकारी स्वास्थ्य योजना असली आणि नीट राबवत असली तरी आपले शरीरच जर कमकुवत असेल तर आपल्याला प्रसन्नता, तरतरीतपणा व शरीर सौष्ठवता कदापी लाभणार नाही.

 

-                     कामाच्या चागल्या सवयी लावुन घेणे. तसेच कोणत्याही कामाची व काम करणा-यांची उपेक्षा टाळणे.   चांगले काम कौशल्य, प्रतीभा व प्रसन्न मन ह्यावर आवलंबुन असते तोंडपुजेपणा, अपात्रतेला प्रोत्साहन व नाकर्तेपणा ह्यावर नाही. चोख काम हे वेळेत व बरोबर कले गेलेले ह्यावर जास्त अवलंबुन असते हलगर्जीपणावर नाही. तसेच ते चांगल्या प्रसासनावर अवलंबुन असते धाकदपटशाहीवर नव्हे. एक दुस-याच्या आदर भावनेवर अवलंबुन असते. कोणच्या ही राष्ट्राची समृद्धता पिढ्यां पिढ्यांच्या परीश्रमातुन निर्माण होते व त्यापेक्षाही जास्त पिढ्यां पिढ्यांच्या त्यागातुन टिकुन रहाते. ती काही कोणा एका महात्म्या मुळे बनत नाही व टिकत नाही. अशा महात्म्यांची माळ लागते व त्याही पेक्षा तुमच्या आमच्या सारखे सामान्यच लोकं ती टिकवुन ठेवू शकतात. कोणतेही काम हे कनिष्ठ नसते. हलकट असतात ती लोकांची मने. कोणतेही कर्तब व कौशल्य कमीपणा आणणारे नसते. प्रत्येकाला परस्परांबद्दल आदरभावना असली पाहीजे मग तो कामगार असो, अधिकारी असो वा मालक असो. अहम् भाव, उर्मट पणा परस्परांमधला आदरभाव संपुष्टात आणतात. अहम् भावावर जो मात करत नाही त्याला अहम् भाव मारतो.  साधेपणा नेहमीच फायद्याचा ठरतो. आपल्या कामावर श्रद्धा ठेवावी. कामाची अस्मिता जोपासावी व दुस-यांचे काम कमीदर्ज्याचे लेखू नये.

 

-                     नितिमत्ता व चांगल्या आचारणांचा वापर सतत करणे.       आपल्या धर्माने दिलेली व आपल्या सदसदविचार बुद्धिला साजेसी अशी नितिमत्ता व समाजात रहायचे म्हणुन अंगीकारलेले काही सामाजिक नियम आपण स्वतः ठरवायला हवेत व एकदा ठरवले की त्यांच्याशी बांधील रहायला हवे. स्वतःला पटलेले व स्वतःनी ठरवलेली नितिमत्ता व नियम म्हणजे स्वतःनी स्वतःला दिलेला शब्द. शब्द पाळण्यासाठी लोकं स्वतःचा जिव देतात अशी कित्येक उदाहरणे पाहीला मिळतील. ही नितिमत्ता आपण हाती घेतलेल्या कामात, आपण करत असलेल्या अभ्यासात, शेजारच्यां बरोबर राहताना आणि दुस-यां बरोबरच्या व्यवहारात अमलात आणायचा प्रयत्न करायला पाहीजे. एकदा ठरवल्यावर नितिमत्तेचे ढोंग करुन उपयोगी नाही. ते म्हणजे स्वतःलाच फसवल्यासारखे झाले. ह्यात काही पुरुषार्थ नाही. आपण ठरवलेल्या नितिमत्ते प्रमाणे वागलात तर स्वतःत आत्मविश्वास जागृत होईल. आपणाला कणखर बनवेल. प्रलोभनांपासुन दुर राहायची शक्ति देईल. नितिमत्तेला धरुन चालणा-याला आपोआपच कठीण प्रसंगाना तोंड देण्यासाठी उत्तरे सापडतात. कठीण प्रसंगात मन शांत राहायला मदत मिळते. मानसिक धैर्य वाढते.

 

सामजात रहायचे म्हणजे प्राथमीक सुचार शिकले पाहीजेत व वापरले पाहीजेत. त्यांनी स्वतःचाच फायदा होतो. दुस-यांना भेटल्यावर त्याचे पहील्यांदा अभिवादन करायला विसरु नका. त्यानी एकमेकांत नाते जोडले जाते व दुसरा आपल्याला काय म्हणायचे आहे त्याकडे जास्त चांगल्या भावनेने लक्ष देतो. हसतमुख रहा आणि व्यवहार आटोपल्यावर दुस-याला धन्यवाद द्यायला विसरु नका. अशा करण्याने जोडलेले नाते वाढीस लागते. ह्या सोप्या तीन गोष्टी आचरणात आणल्या आपण तर एकदुस-यात मेळ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, एक नाते तयार होईल, सद्भावना वाढीस लागेल व त्या योगे दोघांचा फायदा होईल.

 

-                     टोकाच्या आवडी-निवडी टाळणे. छांदीष्टपणा टाळणे स्वतः बद्दलची कीव कमी करणे.     स्वतः बद्दलची कीव ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. ती कोणत्याही प्रगतिच्या आड येते. प्रत्येक वेळेस कोठचाही उपक्रम हाती न घेण्यासाठी आपण कारणे शोधत राहतो. घालुन दिलेला सरकारी नियम हा आपल्याला कसा लागु होत नाही ह्यासाठी कारणे शोधतो. त्या विरुद्ध अर्ज करतो. आपल्या सोयीप्रमाणे आपण नियम वाकवायचा प्रयत्न करतो. एकदाका आपले काम झाले की मग आपण तोच नियम कसा चांगला आहे व लोकांनी नियमाबरहुकूम का वागले पाहीजे ह्याचे पाढे म्हणायला सुरुवात करतो. तीच गोष्ट सामाजिक कार्याच्या बाबतीत सुद्धा, किंवा रोजच्या व्यायामाबाबतीत. जेव्हा अशी गोष्ट हाती घ्यायची वेळ येते तेव्हा हजार कारणे आपल्याला सुचतात व दाखवता येतात. मग आपण स्वतःलाच समजवायचा प्रयत्नात असतो की हा खोकला गेला की रोज सकाळी उठुन फिरायला जाईन, किंवा माझे अंग दुखायचे जेव्हा कमी होईल तेव्हा मी पळायला जात जाईन. अशी कीव जो करतो तो अंग दुखायचे थांबले तरी कधी पळायला जाऊ शकणार नाही कारण तो पर्यंत त्याला दुसरे काहीतरी कारण सापडलेले असते. त्यापेक्षा सगळे बाजुला ठेवा मनात निश्चय करा व पळायला जा मग बघा चमत्कार, तुमचे शरीर जादु झाल्या सारखे वागायला लागेल.

 

आपल्या जवळ जर रोज लागणा-या गोष्टींच्या बद्दल टोकाच्या आवडी निवडी असतील खायच्या बाबतीत, साफसफाई बाबत, कपड्यांबाबत, चवी बाबत तर आपल्याला खुप त्रास होईल व होत राहील. छोट्या छोट्या कारणांनी तुमचे मन दुःखी होईल. छोट्या छोट्या गोष्टीत मन गुंतले जाईल व तुम्ही दुःखी व्हाल. जर आपल्या आवडी निवडी अशा प्रकारच्या टोकाच्या असतील तर रोजचे येणारे कठीण प्रसंग आयष्याची दुःख समजुन हिरमुसले व्हाल. इतके उगाचच दुःखी व्हाल की, तुम्ही चालु घटकेचा आनंद उपभोगू शकणार नाही. प्रत्येक गोष्टीत व प्रत्येक माणसात उगाचच खोट काढत बसायची सवय लागेल, कोणालाही समजुन घेता येणार नाही, कोणाशीही नाते जोडता येणार नाही व माणसे जोडली जाणार नाहीत. जितक्या जास्ती आवडी निवडी व जितके जास्त छांदीष्ठ तितके तुमची मित्र मंडळी कमी होत जातील व तुम्ही एकटे पडाल. एकटेपणा माणसाला दुःखी करतो. पुढे तुमचे मनोस्वास्थ्य भिघडेल. आयुष्य आनंदाने जगायचे असेल तर एक कान मंत्र लक्षात ठेवायचा टोकाच्या आवडी निवडी सोडुन द्याव्या. लहानपणा पासुन मुलांना त्यांची टोकाची आवड नावड कशी घातक आहे ते त्यांना समजवले पाहीजे.

 

-                     दुरदर्शी बनायचा प्रयत्न करा व स्वतःचे विचार उत्तम, उदात्त व उत्तुंग बनवा.
दुस-यांच्या चांगल्या संस्कारांची पुनरावृत्ती करण्यात काही गैर नाही. शत्रुच्याही चांगल्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहीजेत. आपल्या धर्मात सांगितलेच आहे की रोज सहा गुरु करावेत म्हणजे रोज दुस-यांच्या कडुन सहा चांगल्या गोष्टी शिकाव्यात त्यानी आपली प्रतीभा उत्तुंग होते. इंग्रजांनी १२० वर्षापुर्वी व्हिक्टोराया टर्मीनस (आता छत्रपती शिवाजी टर्मीनस) बांधले. त्या वेळेला २० गाड्या व हजार बाराशे प्रवासी त्याचा वापर करीत होती. पण तो टर्मीनस ईतका भव्य बांधला गेला होता त्यावेळेला, की आज ३००० गाड्या व ३० लाखापेक्षा जास्त प्रवासी तो वापरु शकतात. ह्याला म्हणतात दुरदृष्टी ठेवुन केलेली आखणी. अशी दुरदृष्टीनी केलेली आखणी आपण आत्मसात केली पाहीजे व लहान मुलांना पण अश्या दुरदृष्टी ची सवय लावली पाहीजे. आपण कोणचाही कामाचा आराखडा तयार करताना अशी दुरदृष्टी बाळगली पाहीजे. आपली पिढी जरी ४०, ५० वर्षे त्याचा उपयोग करणारअसूदे पण पुढे येणा-या १० पिढ्यांचा आपण विचार केला पाहीजे. व तशी आखणी केली गेली पाहीजे. त्याच दृष्टीकोनातुन आपली बांधकामे, रस्ते, पुल, खेळाची मैदानं इत्त्यादी आखले गेले पाहीजेत. जरी दुर्दैवाने आपल्या हातात अशी आखणी किवा तिचा कार्यान्वय नसले तरी मनात नेहमी आपल्या राष्ट्रबद्दल चांगले उत्तुंग असे विचार आणावेत. अश्या राष्ट्राविषयी उत्तुंग विचारांची सवय लावण्यानी आपल्या स्वतःच्या दृष्टीमध्ये पुष्कळ फरक पडेल. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीतला हेकेखोरपणा साडुन द्याल, दृष्टी विशाल बनेल, व रोजच्या जिवनातल्या अडचणींना सामोरे जाताना दुःख होणार नाही.

 

-                     आपल्या धर्मातल्या चागल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे.     आपले धर्मनिर्देश, आपली धर्म शास्त्रे, घालुन दिलेली धर्म सुत्रे ही आपल्या पुर्वजांनी त्यांच्या अनुभवातुन समाजात आनंदाने आयुष्य जगण्याच्या दृष्टीने दिलेली आपल्याला एक दिशा आहे. ह्या नियमांचे पालन केल्याने आपल्याला आपल्या आत्म्याची प्रगती होण्यास मदत होते. आपली चित्तशुद्धी होते,  सचेतन बुद्धी वाढीस लागते.  धर्म निर्देश, शास्त्रे, सुत्रे, व्रत, वैकल्ये ही सगळी स्वतःचे मन व आजुबाजुचे वातावरण प्रसन्न बनवण्याच्या हेतुने तयार केली होती व तशी बंधने घातली गेली होती. सामाजिक सौहार्द्रता व समरसता टिकवुन ठेवण्याच्या दृष्टीकोनातून तयार केली गेली होती. त्याला देश, काल पात्राच्या मर्यादा होत्या व अजुनही आहेत. त्या मुळेच प्रत्येकाने हल्लीच्या काळी ही सुत्रे विचार करुन अमलात आणली पाहीजेत. आजच्या देशाच्या गरजा, कालाच्या मर्यादा व पात्रता ह्याचा विचार करुन प्रसंगी त्या सुत्रात यथार्थ बदल करुन त्या त्या सुत्रांचा, व्रतांचा व धर्मनिर्देशाचे पालन केले पाहीजे. सतीची प्रथा कोण्या एका काळी चालु होती आता ती कालबाह्य झाली आहे व आपण ती टाकुन दिली. तीच गोष्ट बाकीच्या चालीरुढीं बाबत लागु आहे. ह्याचा विचार करुन आपल्या धर्माच्या चौकटीत वागले तर आपल्याला  मानसिक सुरक्षितता लाभेल. त्याच बरोबर बाकीच्या धर्मातल्या चांगल्या गोष्टी अंगीकारल्या पाहीजेत. आपल्या धर्मात सांगितल्या प्रमाणे जो वागतो त्याला कठीण परिस्थीतीत मार्ग काढायला शक्ती व बुद्धी मिळते, कारण सामान्य माणसाच्या जिवनात येणा-या सगळ्या संभ्रमांवर तोडगा आपला धर्म देत असतो. आपल्या समोर ठाकणा-या सगळ्या व्दिधा मनस्थितींवर उहापोह धर्मात करुन ठेवलेला आहे. आपल्या आयुष्याच्या मार्गावरुन आपण जेव्हा घसरायला लागतो तेव्हा धर्म आपली मदत करतो, आपले रक्षण करतो. म्हणुनच आपल्या धर्मावर विश्वास ठेवा. आपली श्रद्धा असु द्यावी त्यावर पण अंध श्रद्धा टाळावी.  

 

 

ही दहा सुत्रे व्रता सारखी जो आचरण करेल तो राष्ट्रव्रती. आजच्या देश काल पात्राच्या परिसीमेत आजच्या हिंदु माणसाला जर हिंदुत्वाचा पुरस्कार करायचा असेल तर तो वर्णन केलेल्या दहा सुत्रांप्रमाणे वागुन करता येईल. ह्यालाच राष्ट्रव्रत असे नाव आपण देऊ. ह्यालाच ख-या हिंदुत्त्वाचे पालन करणे असे होते. आता कोणी म्हणेल की मी ही दहाच्या दहा सुत्रे पाळत नाही पण कधी कधी, थोडी थोडी पाळली जातात. व्रत हे एकदा घेतले की थोडे करु, मग करु, आपल्या सोयी प्रमाणे करु असे नसते. घ्यायचे तर पुर्णपणे पाळायचे. आपणच आपल्याला दिलेल्या शब्दासारखे व्रत असते. आपण आपल्याला दिलेला शब्द जर पाळणार नसु तर द्यायचाच का? ह्यात कसला पुरुषार्थ? म्हणुन अर्धा राष्ट्रव्रती किंवा सोयीने राष्ट्रव्रती अशा राष्ट्रव्रतींचा राष्ट्राला काही उपयोग नाही. राष्ट्रव्रती म्हणजे ही सर्व दहा सुत्रे नेहमी पाळणारा.

 

शिवाजीने ही जाणीव करुन दिली व समृद्ध साम्राज्य निर्माण केले. ही जाणीव संपली व आपण इग्रजां कडुन पराभूत झालो. आपला आत्मविश्वास आपल्या हिंदु मनाच्या अभिमानाबरोबरच संपला. तो एक दुवा होता देशासाठी आपोआप स्फुर्ती देणारा तोच संपला. संकटाला तोंड देण्याला, कठीण काम करण्यास जी स्फुर्ती लागते ती स्फुर्ती देणारी गुटीकाच नसेल तर माणसाचे हातपाय लटपटायला लागतात. इंग्रजानी हे ओळखले व पहील्यांदा हिंदु धर्माबद्दलचा अभिमानच संपुष्टात आणला. इतका की आजची पिढी नाव घ्यायलाही लाजू लागली. जो मग हिंदु धर्माचा नुसता उच्चार करता झाला त्याला जातीय म्हणून आपली पिढी स्वतःची सुटका करुन घ्यायला लागली. आपल्याला आपल्या शक्तीची परत जाणिव करुन घ्यायची वेळ आली आहे.

 

      ज्या धर्माने ज्या विचारसरणीने आपल्या देशाला जिवंत केले, ज्याला अर्थ दिला आहे, देशाचे राष्ट्र बनवले आहे, त्या देशातल्या जर कोणी हिंदु हे नाव घेतले, त्याचा उच्चार केला तर तो जातिय कसा बनेल. ज्या श्वासांनी आपल्याला जिव दिला आहे, तोच घ्यायला मला आता लाज वाटते असे कोणाला वाटायला लागले तर त्याने मेलेलेच बरे. कारण असे कदापी शक्य नाही की मला श्वास तर घ्यायचा नाही पण जगायचे मात्र आहे. हे तर सोडाच पण हल्ली आपल्या देशात असे झाले आहे की आपण हिंदु धर्माचा आग्रह व अभिमान न धरणे म्हणजे आपोआपच सेक्युलर झालो असे आहे. ह्या विश्वात इतर अनेक देशात आपला म्हणण्यासारखा भारत एक देश आहे व ह्या भारताचे आम्ही आग्रही आहोत व त्याचा आम्हाला आभिमान आहे असे म्हणणे म्हणजे सा-या मानवजातीचा जसा अपमान होत नाही तसेच ह्या आपल्या देशात आपला म्हणण्यासारखा आमचा धर्म आहे व त्याचा आम्हाला आभिमान आहे असे म्हणण्याने बाकीच्या धर्मांचा अपमान होत नाही. आत्ता गरज आहे आपल्या धर्माबद्दलची जाणिव होऊन अभिमान बाळगण्याची.

 

काही लोकांना उगाचच असंबद्ध प्रश्न करायची सवय असते. ते मग नेहमीच्या बिनबुडाच्या शंका काढतात -  लोकांना हिंदु असण्याचा नुसता गर्व असुन काय उपयोग होणार. कोणाला नीट माहीती नाही हिंदुत्त्वा बद्दल. हिंदु हिंदु करणा-यांनी गीता पण कधी वाचलेली नसते. ह्या लोकांना हिंदु ह्या शब्दाचा अर्थ कळलेला नसतो. हिंदुत्त्व म्हणजे काय हे त्याहुन समजलेले नसते वगैरे वगैरे. त्यांनी हे समजुन घेतले पाहीजे की, जो भारतात राहातो, जो भारता साठी जगतो, जो भारता साठी झटतो, ज्याच्या पुर्वजांनी येथे जन्म घेतलेला आहे हो तरच त्याला आपल्या देशा बद्दल आपुलकी वाटणार. जो भारत हिच त्याची पुण्य भुमी आहे असे समजतो, जो भारत हीच त्याची कर्मभुमी आहे असे समजतो. ज्याला भारताच्या, पर्वीपासून चालत आलेली समृद्ध अशी संस्कृती ही त्याचीच आहे असे वाटते. ज्याचा आपल्या विचारसरणीवर विश्वास आहे. तो हिंदु होय व त्या तत्त्वावर जो जिवनक्रम उभारतो, ह्या तत्त्वाचा ज्याला अभीमान आहे ते म्हणजे हिंदुत्त्व. ह्या पुढे जाऊन जो राष्ट्रवताच्या दहा सुत्रांबरहुकुम वागतो तो राष्ट्रव्रती व त्याचे राष्ट्रव्रत हेच खरे हिंदुत्त्व.  बस् इतके आपल्या हिंदु बांधवांसाठी पुरे आहे. प्रत्येकानी काही गीता वाचायलाच पाहीजे असे नाही. सगळेच श्रेष्ठ व लोकनेते होऊ शकत नाहीत. ज्यांना लोकसंग्रह करायचा आहे, त्याने हे सगळे अभ्यासावे, मनन करावे व लोकांना शिकवावे. लोकांनी अशा श्रेष्ठांचा पुरस्कार करुन, त्यांनी दिशा दाखवल्या प्रमाणे जिवनक्रम अनुसरावा. सामान्य जनांसाठी श्रेष्ठांवर विश्वास व हिंदुत्त्वाचा आभिमान एवंम् राष्ट्रव्रताचा परस्कार व त्याचे आचरण एवढेच पुरे आहे. श्रेष्ठलोकनेत्यांनी काय करायचे ते श्रेष्ठांना सांगावे लागत नाही. ते करतात व म्हणुनच त्याना लोकसंग्रहाचे कार्य करायचे काम ईश्वर सोपवतो. अशा श्रेष्ठलोकांनी गीतेत काय आहे त्याचा जरुर अभ्यास केला पाहीजे.

 

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः। स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते।।

                 

गीतेचा हा श्लोक ह्या बद्दलचा संभ्रम दुर करतो. सामान्य लोकं नेहमी श्रेष्ठ लोकांचे अनुसरण करतात, कारण श्रेष्ठ लोकांचे कर्म सामान्य लोकं प्रमाण मानतात. व श्रेष्ठ लोकं उत्तुंग कार्य करतात म्हणुनच ते लोकमान्य होतात. त्यांचा लोकसंग्रह कारणी लागतो.

 

                        माणसाच्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणी आहेत. त्या त्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणीत, माणुस त्याच्या पुढे येणा-या सगळ्या गोष्टींचे आकलन करुन विचार करतो, निष्कर्ष काढतो. समोर येणा-या प्रश्नांना उत्तरं शोधतो. संकटाला तोंड देतो. प्रत्येक मानसिक प्रगतीच्या श्रेणीत त्याचे स्वतःचे मानसिक स्वास्थ्य वाढवायचे ध्येय असते. प्रत्येक श्रेणीत त्याची विचार करण्याची कक्षा ठरलेली असते. तितकीच तो करु शकतो. ती कक्षा ओलांडता येत नाही त्याला. ती कक्षा तेव्हाच तो ओलांडू शकतो, जेव्हा तो; एक मानसिक प्रगल्भतेची श्रेणी पार करुन दुस-या अजुन उच्च दर्जाच्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणीत पदार्पण करतो. अशा मानसिक प्रगल्भतेच्या स्थितीत त्याचे विचार व्यापक बनतात. सामावून घेण्याची कक्षा वाढते. जगाकडे बघण्याची दृष्टी बदलते. मन विशाल होते. आधीच्या मनाच्या श्रेणीत त्याला ह्याच गोष्टी पटण्यापलीकडे होत्या किंवा न पटतील अशा मनस्थितीत तो होता. जेव्हा मनुष्य मनाच्या इतक्या प्रगल्भावस्थेत पोहोचतो तेव्हा त्याच्या दृष्टीने वेगवेगळे देश किंवा राष्ट्र ही कल्पना फार कोती ठरते. तो सा-या जिवसृष्टीचा विचार करतो. तो मग कोणत्याही धर्माचा, देशाचा, राष्ट्राचा राहात नाही. तो विश्वाचा होतो. विश्व त्याचे असते. त्याचा धर्म हा जिववाद होतो. त्याचे राष्ट्र अखिल मानवजात ठरते. त्याचा देश संपूर्ण विश्व असते. त्याच्या दृष्टीने कोणी शेजारी राष्ट्रे नसतात. कोणी शत्रु राष्ट्रे नसतात. ह्याच संकल्पनेतुन सर्व भुत हीत हे ब्रिद वाक्य आपल्या धर्माने आपल्याला दिलाय. किंवा  बृहदअरण्यक उपनीषदात सर्व सुष्टीला उद्देशुन केलेली सर्वेपिसुखिनःसंतु । सर्वेसंतु निरामया। सर्वेभद्राणी पश्यंतु। मा कश्चीत् दुःखमाप्नुयात। (१.४.१४ बृहदअरण्यक) अशी प्रार्थना  आढळेल. ही प्रार्थना सर्व सृष्टीला लागु आहे. तसेच सर्व भुत हीतार्थ(भगवद्गीता, १२ अध्याय, ४ श्लोक) ही संकल्पना हल्लीच्या सर्व धर्म समभाव ह्या पेक्षा प्रगल्भ आहे. सर्व भुत हितार्थ ही संकल्पना सर्व धर्मांना सामावुन घेतेच पण त्या ही पुढे जाउन सगळ्या प्रकारच्या विचारसरण्यांना सामावून घेते, नास्तिक लोकांना सामावून घेते, जिवंत गोष्टी व त्या पेक्षाही पुढे जावून अजिवीत गोष्टीना सुद्धा सामावुन घेते.  एवढेच काय आपली पुथ्वी ही सा-या सृष्टीचा एक घटक समजुन सा-या सुष्टीचा येथे विचार असतो. व त्या सर्वांचा उत्थान ह्या संकल्पनेत केलेला आढळतो. आपली वसुधैव कुटुंबकम् ही संकल्पना आजच्या ग्लोबल व्हिलेज पेक्षा फार पुर्वीची व सर्व समावेशक आहे.

 

बहुतांशी असे आढळून येते की अश्या मानसिक प्रगतीच्या उच्चतम श्रेणीत पोहोचलेली माणसे हाताच्या बोटावर मोजण्या सारखी असतात. बहुतांशी लोकांची विचारांची क्षमता, त्यांच्या मानसिक प्रगल्भतेच्या कमतरते मुळे, एवढी व्यापक होऊ शकत नाही. त्यांचे विश्व एवढे विशाल नसते व अशांची जर प्रगती व्हायची असेल तर त्यांना झेपणा-या अशा छोट्या वर्गात पहील्यांदा त्याना बसवुन, शिकवून मगच ते पुढच्या इयत्तेत जायला तयार होतात. अशा कोट्यावधी लोकांच्या मग प्रगतीसाठी लहान अशी राष्ट्रांची संकल्पना उभारावी लागते. व मग वेगवेगळ्या राष्ट्रांचा पुढचा प्रवास  - प्रगतीच्या दिशेने त्या त्या लोकसमुहांवर सोपविला जातो. त्या त्या विचारसरणीनी मंत्रीत होऊन, ते ते देश मग प्रगत होण्यात गढून जातात. व ह्या मधुनच हळु हळू अजुन अजुन प्रगल्भ, अजुन अजुन उन्नत व उत्तम विचारसरणी जन्म पावते. ही गोष्ट राष्ट्रा राष्ट्रात विश्व वाटले गल्यामुळेच होऊ शकते.

 

      हे विश्वची माझे घर मानणारे महात्मे मंडळी सुद्धा प्रबोधन करताना, त्यांच्या दृष्टीने क्षुल्लक पण सामान्य लोकांच्या प्रगती करण्याच्या दृष्टीने अत्त्यंत मह्त्वाची अशी धर्म व राष्ट्रांची संकल्पना उभारतात. जो शिक्षक दोन गटात खेळाचे सामने घेतो, त्याच्या दृष्टीने दोन्ही गट सारखेच असतात. पण दोन्ही गटांचे नेत्रुत्व करणा-या कर्णधारांना त्यांचा त्यांचा गट, अत्त्यंत मह्त्वाचा वाटतो. चुरशी शिवाय प्रगती नाही. त्यामुळे खेळात कर्णधारानी, त्याचा त्याचा गट कसा पुढे जाईल हेच बघायचे असते व शिक्षकाला दोन्ही गटात फरक वाटत नसुन सुद्धा त्याने चुरस निर्माण करायची असते खेळ व खेळाडुंच्या फायद्या साठी. कर्णधार ही बरोबर आहे व शिक्षकही बरोबर आहेत इथे. त्यांची श्रेणी वेगवेगळी असल्या मुळे त्यांना ह्या भुमिका घ्याव्या लागतात. कर्णधार जर शिक्षका सारखा विचार करु लागला तर त्याच्या गटाला परवडणार नाही. प्रगती म्हणजे खेळात त्या गटाची आगेकुच थांबेल व तो गट हरेल. अजुन एक उदाहरण पहाण्या सारखे आहे. ह्या भौतिक जगात, भुमितीची जी प्रमेय लागु आहेत, उदाहरणार्थ त्रिकोणाच्या तीन अशांची बेरीज १८० अंश भरते, चौरसाच्या अंशांची बेरीज ३६० असते व आपल्याला वाटत रहाते की हे नेहमीच बरोबर राहणार आहे. आपण हे प्रमेय विवीध गणितं सोडवायला वापरतोही आणि ती गणिते बरोबरही येतात. हे किती सत्य आहे ते बघु. ह्या रोजच्या वापरातल्या भुमीतीला इयुक्लीडीयन भुमीती असे म्हणतात. कोणाच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही की हिच भुमीतीची प्रमेय जेव्हा संपुर्ण विश्वाला (युनीव्हर्स) आपण लावतो तेव्हा ती चुक ठरतात. गणितं चुकतात, कारण जेव्हा संपुर्ण सापडलेल्या, व अवलोकन करता येण्या सारख्या विश्वाला आपण ही प्रमेय लावतो, तेव्हा आपण पृथ्वीच्या नेहमीच्या लांबी, रुंदीच्या मापदंडां पासुन मुक्त होऊन त्याच्या कोट्यावधीच्या पटींनी मोठ्या मापांशी खेळत असतो. त्या वेळेला तेथे इयुक्लीडीयन भुमीती काम येत नाही. त्याच प्रमेयांनी ह्या विश्वाची गणितं चुकू लागतात. कारण आता ह्यासाठी वेगळी भुमीतीची प्रमेये लागतात. ह्या प्रमेयां प्रमाणे त्रिकोणाच्या कोनांची बेरीज १८० पेक्षा नेहमीच जास्त भरते. पण म्हणुन आपण इयुक्लीडीयन भुमीती बाद ठरवत नाही. कारण आपल्या श्रेणीला तीच बरोबर आहे व उपयोगी आहे. इयुक्लीडीयन भुमीती जशी आपल्यासाठी आहे, तशीच राष्ट्रांची संकल्पना बरोबर व आपल्याच प्रगती साठी आहे. देश जिवंत करणा-या, देशाचे राष्ट्रात रुपांतर करणा-या धर्माची आपल्याला अत्त्यंत गरज आहे. तो धर्म ज्या विचारसरणीतून जन्मपावला त्या विचारसरणीचा आपल्याला आभिमान असला पाहीजे कारण तीच विचारसरणी, आपल्या मनुष्य समुहाची मानसिक, भौतिक व आधिभौतिक प्रगती करणार आहे.

 

     

आपल्या धर्माचे आपणच रक्षण कर्ते आहोत. व धर्माचे रक्षण करणे म्हणजे तलवारी काढणे नव्हे. जर वेळोवळी कालबाह्य झालेल्या संकल्पनांचा आढावा घेऊन आपल्या धर्माला लागलेली बुरशी काढुन तो सोपा करुन व लहान, तरुण व वयस्कर लोकांना आकलनिय करुन आकर्षीत करणारा केला व आपल्या धर्मातल्या चांगल्या प्रथा ठेवुन बाकीच्या काढुन टाकल्या तर आपल्या धर्माचे आपोआपच रक्षण होईल, तो वाढीस लागेल, त्याला परत कस येईल व तो वृद्धींगत होईल. तरुण पिढीला आलेली आपल्या धर्माबाबतची ग्लानी अशीच दुर होईल. उठा ह्याची जाणीव करुन घ्या. ह्याची जाणीव दुस-यांना करुन द्या. आपला धर्म जागवा. हे काम आपले आहे. वेळ गेलेली नाहीये, उशिर झालेला नाहीये. आपली ताकद ओळखा. हनुमानाच्या प्रचंड शक्तिची जाणीव करुन द्यायला जांबुवंत होता. आपल्यावर लागलेल्या शापाचा आपला उतारा आपणच शोधला पाहीजे. आपल्यातल्या सुप्त ताकदीची जाणीव करुन घ्या. संघटीत शक्तिचे राष्ट्रव्रत घ्या. आपणच आपले जांबुवंत बना. राष्ट्रव्रती व्हा. राष्ट्रव्रत घ्या.

 

      आता जे राष्ट्रव्रताच्या संकल्पनेशी आकृष्ट झाले असतील त्याना राष्ट्रव्रत कसे घेता येईल ते पाहु. ज्याना राष्ट्रव्रत घेण्याचे महत्त्व पटले आहे त्यानी सर्वात आधी दहा सुत्री राष्ट्रव्रत घेण्याचे मनात ठामपणे आणले पाहीजे. बरेज जणं ह्या सुत्रांमधील काही सुत्र किंवा कधी कधी सोयी प्रमाणे सगळी सुत्रं आमलात आणत असतील. पण म्हणुन तो मनुष्य काही राष्ट्रव्रती ठरत नाही. हे व्रत पुर्णतः स्वीकारले पाहीजे. हे ज्यांना पटले त्यानी राष्ट्रव्रती बनायचा प्रयत्न करावा, कोणाला दाखवायचे म्हणुन तेवढ्या पुरते नको. पैशासाठी नको, जोर जबरदस्तीने नको, सोयीसाठी नको. राष्ट्रव्रत हे स्वतःला मानसिक प्रगतीच्या वरच्या श्रेणीत नेण्यासाठी हाती घ्या. आपल्या राष्ट्राच्या कल्याणासाठी घ्या, हिंदु धर्माच्या पुनर्उत्थानासाठी घ्या. आपल्या मानसिक समाधानासाठी घ्या. राष्ट्रव्रत घेण्याने आपोआप तुमच्या जिवनाला अर्थ येईल. ह्या विश्वातले आपले वास्तव्य अर्थपुर्ण करण्यासाठी घ्या. नाहीतर आयुष्याच्या शेवटी आपण का जगलो व काय मिळवले असे वाटायला नको. श्वास आहे तोवर जगलो, खाल्ले, प्याले, काही पैसे जोडले गाठीला व प्रजनन केले असे नको. एवढे उद्द्योग तर बाकीचे प्राणीपण करतात आणि ते सुद्धा आपल्या सारखे रडत कुढत नाही. 

 

      आपण ठरवा, पटले तर राष्ट्रव्रत घ्या व एकदा घेतल्यावर स्वतःला दिलेला शब्द पाळा. आपल्या सदसदविवेक बुद्धीला चालना द्या.

     

राष्ट्रव्रत घेतल्याने काय होईल? आपली चित्तशुद्धी होईल. मानसिक प्रगल्भतेच्या अजुन वरच्या श्रेणीत आपण सहजच पदार्पण करु शकाल. आपण जर ही सुत्र तंतोतंत नेहमी पाळत गेलो तर आपोआपच आपले एक वेगळे अस्तित्व तयार होईल. बाकीची लोकं आपल्याला ओळखतील व आपला आदर्श पुढे ठेवुन आपल्या सारखे वागायचा प्रयत्न करायला लागतील.  आपल्या आचरणानी मग सांघिक शक्तिचा प्रत्यय येईल जी आपल्या राष्ट्राला पोषक ठरेल. राष्ट्रव्रत घेतले नाही तर काय होईल? काही नाही, आपले आयुष्य तसेच पुढे रेटत राहील बिनार्थाचे, रडत कुढत. आपल्या धर्मावर, आपल्या राष्ट्रावर विश्वास असेल तर आपण राष्ट्रव्रती होऊ शकता. प्रसिद्ध ब्रिटीश सेनानी फिल्ड मार्शल फिलिप चेटवुडच्या शब्दात थोडा बदल करुन राष्ट्रव्रती कसा असावा हे थोडक्यात सांगतो -

 

आपल्या राष्ट्राची सुरक्षा, राष्ट्राचा सन्मान आणि राष्ट्राचे कल्याण - नेहमीच सगळ्यात आधी.

 

तदनंतर आपल्या परिवाराचा सन्मान, परिवाराचे कल्याण आणि परिवाराची सोय.

 

स्वतःची सोय, स्वतःचे कल्याण व स्वतःची - सुरक्षा शेवटी, नेहमीच शेवटी.

 

आपले राष्ट्र बलाढ्य, समृद्ध व कल्याणकारी करायचे असेल व ते तसे टिकवुन ठेवायचे असेल तर पिढ्यां पिढ्यांचा प्रयत्न सतत झाला पाहीजे. हे राष्ट्रबांधणीचे कार्य हा आपला राष्ट्रधर्म झाला पाहीजे, आपला स्वभाव झाला पाहीजे. राष्ट्रव्रताची अशी आपली संस्कृती निर्माण झाली पाहीजे. राष्ट्रव्रत हे प्रत्येकाने त्याच्या कुवतीला धरुन घेतलेले पवित्र व्रत आहे. रामाच्या खारुटली प्रमाणे राष्ट्रबांधणी रुपी सेतू मध्ये घातलेले खारुटलीचे छोटे दगड आहेत. हे राष्ट्रव्रत आपल्या  परिवाराच्या कल्याणाच्या आड न येणारे असे आहे. स्वतःवर ओझे न पाडणारे आहे, आपली गैरसोय न करणारे आहे आणि तरी सुद्धा राष्ट्रासाठी लागणारे सुकार्य आपल्या हातुन घडवुन आणणारे आहे.

 

तर मग केव्हा घेताय आपण राष्ट्रव्रत?

 

 

 

राष्ट्रार्पण

 

No comments:

Post a Comment