Thursday, December 15, 2016

अर्थक्रांतीचे समुद्रमंथन


नोटबंदीमुळे सध्या सगळ्यांना त्रास सोसावा लागत आहे. लोकांची अधीरता वाढू लागली आहे. पैशाची हाव ठेवणारे भ्रष्ट श्रीमंत नागरिकांनी कसे तरी करून सगळा काळा पैसा गोरा केला असे वाटून लोकांचा उत्साह व धैर्य खच्ची व्हायला लागला आहे. बँकेत पैसे ह्या ना त्या मार्गाने टाकल्याने काळ्याचे गोरे होत नाहीत हे ही लोकं खोडसाळ बातम्यांमुळे विसरत चालली आहेत. ह्या पुढे अशा प्रत्येक व्यवहाराची छाननी झाली पाहिजे व दोषी लोकांवर कारवाई केली पाहिजे. ती केली जाईल असे  वाटते.  बऱ्याच लोकांच्या तंगड्या एकमेकात गुंतल्या असल्या कारणाने ह्याला वेळ लागू शकतो पण होईल असे वाटते.
ह्या समुद्र मंथनातून होणाऱ्या बदलाचा प्रत्यय यायला वेळ लागणार आहे. बरेच दिवस लागतील. जर तर, फायदा तोटा, कधी शोध अधिकाऱ्यांचा विजय तर कधी कर चुकवणाऱ्यांना संधी अशा गोष्टी होत राहतील. नोटबंदी विरुद्ध असणारे व भ्रष्टाचारी त्यांच्या त्यांच्या फायद्यासाठी काहूर माजवतील. काही राजकीय पक्षांचे समर्थक नोट बंदी विरुद्ध पक्षाची नीती आहे म्हणून फक्त विरोधासाठी विरोध करतील.
काही पत पेढ्यांचे संचालक पैशासाठी नीतिमत्ता बाजूला ठेवून काळे पैसे गोरे करण्याच्या मागे लागल्या कारणाने आम जनतेला एटिएम मधून पैसे काढायला त्रास सोसावा लागत आहे. सरकारने अशा लोकांच्या वर अंकुश ठेवायला पाहिजे व त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे. नाही तर लोकांचा उत्साह ओसरेल व नोट बंदीवरचा विश्वास उठेल.
काही लोकांच्या मते आपल्या देशात एका रात्रीत कागदी नोटां ऐवजी रोकड रहित अर्थ व्यवहार करणे अशक्य प्राय व मूर्खपणाचे आहे. त्यांच्या मते आपला देश अजून रोकड रहित अर्थ व्यवहाराला तयार नाही. अशा मोठ्या प्रमाणावरच्या बदलासाठी खूप अवधी लागतो. खरे आहे. पण जर सरकार मदत करत असेल व आपण त्याला साथ दिली तर हीच गोष्ट थोड्या अवधीत घडू शकते. १० वर्षाचे काम एका वर्षात शक्य होऊ शकते. जर आपल्याला आपले राष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करायचे असेल तर नोट बंदी व रोकड रहित  अर्थ व्यवहार केले पाहिजे. हा बदल घडू शकते. आज जर आपण किमतीने २० टक्के रोकड रहित व ८० टक्के नगदी अर्थ व्यवहार करत असू तर येत्या दोन महिन्यात जास्तीत जास्त रोकड रहित अर्थ व्यवहार करायचा ठरवला तर किमतीने सहज ५० ५० टक्क्या पर्यंत आपण रोकड रहित अर्थ व्यवहार करू शकू. जर मनात ठरवून प्रयत्न केला तर अजून काही दिवसातच आपण किमतीने ८० टक्के रोकड रहित व्यवहार करू शकू.
हीच गोष्ट राष्ट्राला लागू होऊ शकेल. रोकड रहित अर्थ व्यवहार दोन भागात बदल म्हणून आणायचा ठरवला तर सरकार व आपल्या मदतीने ते शक्य होऊ शकेल. आज जर देशात किमतीने २० टक्के रोकड रहित व्यवहार चालत असतील तर सरकारने पहिल्या भागात, मार्च २०१७ पर्यंत ते किमतीने ६० टक्क्यांपर्यंत वाढवायचे व अशा तऱ्हेने २०१७ वर्ष अखेरी पर्यंत ७० ८० टक्के किमतीने रोकड रहित व्यवहार देश करू शकेल. हे शक्य आहे. लोकांच्या मते लांब लांबच्या व छोट्या छोट्या गावांतून रोकड रहित व्यवहार अवघड आहे. अवघड आहे पण एका रात्रीत बदलायला कोण सांगत आहे. आपल्या देशाने किमतीच्या ७० टक्के रोकड रहित केले तरी हा बदल मोठा आहे. असे लांबचे व छोटे गाव जिथे रोकड रहित व्यवहार अवघड आहे ते बाकीच्या ३० टक्क्यात गणले जाऊ शकेल. दूसऱ्या भागात दोन वर्षात तेथे पण आपोआप बदल घडू शकेल.
काहीचं म्हणणे आहे की ८ डिसेंबराच्या पाहिल्या भाषणात पंतप्रधानांनी काळ्या पैशाविरुद्ध युद्धाचा शंख फुंकला होता. आता हल्लीच्या भाषणांतून काळ्या पैशाविरूद्धच्या युद्धावर नाही तर रोकड रहित अर्थ व्यवहारावर भर दिली जाते. काही लोकांनी तर त्याचे एका वेगळ्या तऱ्हेने विश्लेषण करून आकडेवारी काढली  आहे. पाहिल्या भाषणात पंतप्रधानांनी २२ वेळा काळा पैसा हा शब्द वापरला व दोनदा रोकड रहित हा शब्द वापरला. हल्लीच्या भाषणांतून पंतप्रधान काळा पैसा हा शब्द केवळ ३ ते ४ वेळा वापरतात व रोकड रहित वीस एकवीस वेळा वापरतात ह्या वरून असे वाटते की आता त्यांना रोकड रहित व्यवहाराला जास्त महत्त्व द्यायचे आहे व काळ्या पैशाबाबतची लढाई मोडकळीत काढायची आहे.  आपण जर गेल्या दोन वर्षाचे निर्णय तपासले तर प्रत्येक निर्णय हा काळा पैसा कमी करण्याच्या दृष्टीनेच घेतलेला आहे असे दिसून येते. काळा पैसा कमी करण्यासाठी नोटबंदी आवश्यक होती. प्रत्यक्षकरा पेक्षा अप्रत्यक्ष करा मुळे जास्त लोक कर दाते बनू शकतात. हे रोकड रहित व्यवहाराने शक्य होईल. जास्त लोक कर द्यायला लागले की एकूणच कराचे दर कमी होतील. प्रत्येकालाच फायदा आहे त्यात. जास्त लोक कर द्यायला लागल्याने कर वसुली वाढेल. सरकारच्या तिजोरीत जास्त पैसा येईल. आपल्या देशातील जे २  टक्के कर देत होते ते १० १५ टक्क्यांवर जातील. जिएसटीच्या अमल बजावणीसाठी सुद्धा रोकड रहित व्यवहार खूप सोईस्कर होईल. रोकड रहित व्यवहाराने पैसा कोठून कोठे गेला हे समजणे सोपे जाईल त्याने काळा पैसा तयार होण्यावर अंकुश बसेल. म्हणूनच कोणताही निर्णय कप्प्या कप्प्यात ठेवून बघण्यापेक्षा अर्थ व्यवहाराचे पूर्ण चित्र डोळ्यासमोर ठेवा. नोटबंदीचा पाहिला भाग संपत आला आहे व म्हणूनच रोकड रहित अर्थ व्यवहार हा सरकारचा मंत्र सध्या बनला आहे. इतकी वर्षे विरोधात असलेले राजकीय पक्ष काळा पैसा कसा थांबवावा व भ्रष्टाचाराचा किडा आपल्या देशाला कसा लागला आहे त्या बद्दल बोलायचे. तेच पक्ष सत्तेवर आले की काळ्या पैशाबाबत  नुसते बोलायचे पण तेच भ्रष्टाचाराला खत पाणी घालायचे. आज इतक्या वर्षाने सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाने  व आपल्या पंतप्रधानांनी काळा पैसा व भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम उघडली आहे ह्याचे समर्थन सुज्ञ नागरिकांनी करायलाच पाहिजे. इतकी वर्षे भाजप एक बनिया पक्ष म्हणून संबोधला गेला आहे. हे असताना देखील पंतप्रधानांनी हा निर्णय घेणे हे पंतप्रधानांच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्धचा त्यांचा संकल्प जाणवून देतो.

धीर, विश्वास आणि संकल्प हे जाणत्या व सुज्ञ नागरिकांकडून अपेक्षीत आहे.  हीच अर्थक्रांती आहे हेच समुद्रमंथन आहे.