Friday, April 28, 2023

चुळ

 

दातांची किड, दात दुखणे, दाढा दुखणे, तोंडाला वास येणे ह्यावर एक सोपा उपाय आहे. तो म्हणजे - खाल्ल्यावर चूळ भरणे.

एकदाका दातांच्या डॉक्टरांकडे आपण गेलो की मग सुटका नाही. खर्च व वेळ खाणारा असा हा दातांचा कार्यक्रम. परत आयुष्यभर दातांचे काही ना काही होतच राहते. आपल्या आधीच्या पिढीत दातांचा एवढा त्रास ऐकिवात नव्हता. हा त्रास शहरांमध्ये अधिक, व गावातून कमी. खेडे गावात लोकांचे दात शाबूत असतात त्याचे एक कारण म्हणजे ते, खाल्ल्यावर न लाजता चूळ भरतात.

आपण रोज सकाळी व रात्री झोपताना दात घासतो तरी सुद्धा आपले दात वरचेवर खराब होतात, किड लागते, दुखतात, तोंडाला दुर्गंधी येते. विचार केला तर असे दिसून येते की झोपून उठल्यावर व झोपण्या पूर्वी दात घासल्यानंतर, दिवसाच्या मध्ये काही खाल्ल्या नंतर आपण चूळ भरायचे थांबवले आहे किंवा विसरलो आहोत. काही खाल्ले की दातांवर पुटं चढतात. चहा, कॉफी, सरबत अशी पेय जरी प्यायली किंवा खाण्यात साखरेचा भाग असेल तर त्याची पुटं आपल्या दातांवर चढून वेळीच चूळ भरली गेली नाही तर दातांवरचे आवरण कमकुवत होते, दात पिवळटसर दिसायला लागतात. त्यातून दाढेत किंवा दातात फटी असतील तर त्यात किड बसते.

काही वेळेस आपण जे लहानपणी करायचो ते मोठे झाल्यावर विसरतो. लहानपणी आई मागे लागून तोंड धुवायला लावायची. त्यामुळे किडी पासून आपले दात वाचायचे.

चूळ भरण्याची कला लाजून चूळ भरू नये. काही लोकं पाण्याचा घोट तोंडात घेऊन हळुवारपणे ते पाणी तोंडात फिरवतात. त्याला चूळ भरणे म्हणत नाहीत. जारजोरात गालांचा उपयोग करून तोंडात पाणी वेगाने व गालांच्या हालचालीने निर्माण झालेल्या पाण्याच्या दाबाने, दात, हिरड्या व घसा स्वच्छ करून चूळ भरून टाकावी. पाणी बाहेर फेकता येण्यासारखे नसेल किंवा चूळ भरायला जागा नसेल तर पिण्याच्या पाण्याचाच घोट पिऊन तोंडातल्या तोंडात चूळ भरून घोट पिऊन टाकल्याने लोकांना कळणार नाही व दातही स्वच्छ राहतील. हल्ली लोकांच्या तोंडाला वास येण्याचे एक कारण म्हणजे  - खाल्ल्यावर चूळ न भरणे. नियमित चूळ भरली तर दातांचे आयू वाढते. दातदुखी व दातांच्या कटकटींचे प्रमाण कमी होते व जीवन सुलभ होते.

No comments:

Post a Comment