शेवटचे काही
दिवस
हे आमचे आयएमएतले
शेवटचे सत्र. ह्या सत्रात नवीन अभ्यासक्रम. त्यात प्रामुख्याने १० माईल रनिंग, बॉक्सिंग, OTCT, शंभर मीटर
धावणे आणि विविध आर्मस्च्या प्रात्यक्षिकाच्या आधाराने माहिती. अजून महत्त्वाचा
भाग म्हणजे वेगवेगळे मिलिटरी इतिहास सादर करणे. हे सादरीकरण आम्हा जिसीजना करायचे
असायचे. त्या निमित्ताने सैनिकी इतिहास वाचला गेला. ह्यात प्रामुख्याने दूसऱ्या
महायुद्धातल्या लढाया, फील्ड मार्शल स्लिम चे बर्मा युद्ध, फील्ड मार्शल
डेझर्ट फॉक्स रोमेल ह्याचे युद्ध कावे व दूसऱ्या महायुद्धात भारताचा सहभाग.
ओटीसीटी म्हणजे
ऑब्स्टॅकल ट्रेनिंग एन्ड कॉन्फिडन्स ट्रेनिंग. ह्यात विविध प्रकारचे ऑब्स्टॅकल्स
पार करायचे ट्रेनिंग देतात. सुरवातीला ऑब्स्टेकल बघून घाबरायला व्हायचे पण करून करून आत्मविश्वास वाढला. एकट्याने करायचे
असते तर घाबरायला झाले असते पण सगळेच करतात म्हटल्यावर जिसीज मध्ये धैर्य येते.
ग्रुपमध्ये असताना धैर्याचे कवच येते. एकट्यात घाबरणारी व्यक्ती समूहात कमी घाबरते.
एक प्रकारच्या सांघिक शक्तीचा प्रत्यय येतो. ह्याच कवचाचा प्रत्येय, सीमेवर जेव्हा
दिवस रात्र पाळत ठेवली जाते तेव्हा येते. ह्याच सांघिक शक्तीचा प्रत्यय लाइन ऑफ
ऍक्शन वर लॉन्ग रेंज पेट्रोलींग किंवा ट्रान्सबॉर्डर पेट्रोलींग मध्ये सैनिकांना
येतो. ह्याच सांघिक धैर्याचा प्रत्यय ज्यू लोकांना ग्रुपने कॉनसनट्रेशन कँपला
नेताना व्हायचा. सांघिक शक्ती धैर्य वाढवण्यात कशी यशस्वी होते त्याचा प्रत्यय
इतिहास शिकताना येतो. ओटीसीटी करून करून ऑब्स्टॅकल ट्रेनिंग अंगवळणी पडते. तरी
सुद्धा प्रत्येक वेळेला ओटीसीटी रेंजच्या स्टार्टींग पॉइंटवर उभे राहिल्यावर पोटात
गोळा यायचा. पण एकदा सुरू झाले की २० मिनटात संपते ह्या करून करून मिळालेल्या
माहिती मुळे आपल्याला हा त्रास फक्त २० मिनटेच सोसायचा आहे हे मनात ठरवून ओटीसीटी
करायचो. पण त्या २० मिनटाच्या अग्निपरीक्षेनंतर इतका आनंद मिळतो – खरे तर हायसे
वाटते कुठे दुखापत झाली नाही त्याची. हिच गोष्ट बॅटलड्रेस मध्ये रायफल घेऊन पंचवीस
मिनटात पाच किलोमीटर पळण्या मध्ये प्रत्ययास येते. सैन्य आधीकाऱ्याचे
प्रेसीडेंशीयल कमिशन मिळाल्यावर आम्हाला आर्मी मध्ये हे नेहमी करावे लागते. वर्षात
एकदा त्याची परीक्षा होते, वर्ष भर सकाळच्या पिटी परेडला त्याची प्रॅक्टिस करावी लागते. आज
वीस वर्षाने सुद्धा पाच किलोमीटर पळायच्या
आधी असेच मनात येते. नको ती भयंकर गोष्ट. पण लागलीच हा त्रास फक्त पंचवीस मिनटेच
सोसायचा आहे हे मनाला पटवून ती पंचवीस मिनटे संपवतो. आपल्या आयुष्याचे पण असेच
असेल का?
बॉक्सिंग हा एक खेळ
असा आहे की त्यात तुम्हाला ठोस्यास ठोसा मारावाच लागतो. बाकीच्या खेळात कसे जर
दमलो तर किंवा खेळात विरुद्ध खेळाडू पेक्षा कमी पडायला लागलो तर जास्तीत जास्त काय
होते तर आपण हरतो. बॉक्सिंग मध्ये दमलो व विरुद्ध खेळाडू पेक्षा कमी पडायला लागलो
तर हरण्याबरोबर जबर मुक्के पण सोसावे लागतात. जर मार नको असेल किंवा मुक्के
चुकवायचे असतील तर एकच उपाय ठरतो व तो म्हणजे आपल्या विरुद्ध खेळणाऱ्याला मारत
राहा, कमीत कमी ठोस्यास ठोसा तरी द्या. बॉक्सिंग मध्ये किलर इन्स्टिंक्टचा
उपयोग सर्वात जास्त होतो. ह्याच कारणास्तव आयएमएत हा एक खेळ सगळ्यांना खेळावाच
लागतो. बाकीच्या खेळात प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर भाग घ्यायचा की नाही हे
प्रत्येकाने ठरवायचे असते. पण बॉक्सिंग प्रत्येकाला खेळावाच लागतो. ह्या
बॉक्सिंगची अजून एक मजा आहे. आधी कितीही दोघा खेळाडूने ठरवले की एकमेकांना कमी
मारायचे म्हणजे दोघांना कमी लागेल. पण हे सगळे ठरवलेले पाहिल्या ठोशात संपते. एकदा
का दोघांपैकी एकाने दुसऱ्याला ठोसा मारला, की बॉक्सिंग
रिंगच्या बाहेर ठरवलेले सगळे विसरले जाते व एक दुसऱ्याला ठोसे मारण्याचा खेळ सुरू
होतो. त्यामुळे अगदी हरणार सुद्धा ठोसे द्यायला शिकतो. एका जिसीची मानसिकता
घडवण्यात ह्या खेळाचा प्रभाव मोठा असतो. युद्धात किलर इनस्टिंक्ट खूप महत्त्वाचे
असते. मी कमी पडतो, मी हरतो असे म्हणून चालत नाही, किती तरी
वेळेला युद्धात परिस्थिती विपरीत असताना किलर इन्स्टिंक्ट मुळे पारडे आपण उलटवू
शकतो.
रॅगिंग घेण्याचा अलिखित
नियम म्हणजे हा मान फक्त अपॉइंटमेंट धारकांनाच असतो. त्यामुळे रॅगिंग मध्ये सुद्धा
एक तंत्र असते. एक जबाबदारी असते. उगाच काहीही मनात आले व करायला लावले असे नसते.
ज्यूनीअरर्स येण्या आधी, कॅप्टन गिलने आम्हाला ही जबाबदारी समजून सांगितली. रॅगिंग घेताना
कोणा ज्यूनीअरर्सला मारहाण करायची नाही. कोणालाही हात लावायचा नाही. जे रॅगिंगचे
प्रकार आमच्या सिनीअर्सने घेतले त्या व्यतिरिक्त काही करू नका म्हणून बजावले.
आम्ही रॅगिंग भोगली असल्या कारणाने आम्हाला मर्यादा चांगल्या माहीत होत्या. आम्ही
नव्या जिसींची आतुरतेने वाट बघायला लागलो.
आमचे शेवटचे सत्र सुरू
झाले व लवकरच नवीन मुले आयएमए व ओघाने आमच्या प्लटून मध्ये दाखल झाली. त्यांचे
केविलवाणे चेहरे बघून मला माझे सुरवातीचे दिवस आठवले. आज वीस वर्षाने सुद्धा आयएमए
व त्यातल्या रॅगिंगची आठवण करून देणाऱ्या दोन गोष्टी मनात घोळतात. त्या वेळेला ‘कयामत सें
कयामत तक’ हा पिक्चर बेफाम चालला होता. त्यातले ‘हम भी अकेले
तूम भी अकेले मजा आ रहा है’ हे गाणे आमचे रॅगिंग चाललेले असायचे तेव्हा सीनियरच्या खोलीत लागलेले
असायचे, त्यामुळे ते गाणे मनात कायमचे कोरले गेलेले आहे. कोठेही लागले की
त्यातला रोमांन्स बाजूला राहतो व संध्याकाळ झाली आहे व आमच्या बॅरॅक मधल्या अंगणात
आम्ही पट्टी परेड किंवा कोणतातरी रॅगिंगचा प्रकार करत आहोत असे वाटायला लागते व
आजूबाजूचे वातावरण आयएमएचे होऊन जाते. आता कधीही ‘कयामत सें
कयामत’ मधले हे गाणे लागले की मला त्यातला रोमांन्स सोडून रॅगींगच आठवते.
काही गाणी आपल्या लक्षात राहतात ती त्या वेळच्या आपल्याला भावलेल्या व मनात भिडलेल्या गाण्यांबरोबरच्या आठवणींमुळे.
गाणे तेच पण त्या गाण्याशी निगडित प्रत्येकाच्या आठवणी वेगवेगळ्या. खूप वर्षाने
असे मनाला भावलेले गाणे लागले की त्याच्या बरोबर जडलेल्या आठवणींना उजाळा मिळतो.
ती गाणी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात. ‘तेजाब’ व ‘कयामत सें
कयामत तक’ची गाणी लागली की मला आयएमएतल्या दिवसांची आठवण येते. दुसरी आठवण
करून देणारी गोष्ट म्हणजे ‘ओल्डस्पाईस’ चे आफ्टर शेव लोशन. एकदा आयएमएची आठवण झाली की लागलीच मनाच्या
नाकातून ओलांडा स्पाईस आफ्टर शेव लोशनचा वास भरायला लागतो. त्यावेळी आयएमएत बहुतेक
सर्व हाच आफ्टर शेव लोशन वापरायचे. कारण हाच ब्रॅन्ड त्या वेळेस प्रसिद्ध होता व
सहज मिळायचा. अजूनही दूरवरून जरी ओलांडा स्पाईसचा वास आला तरी मला ते ‘तुम भी अकेले
हम भी अकेले और रॅगिंग मे मजा आ रहा है’ हे गाणे आठवते. रॅगिंगचा भाग प्रत्येक
जिसीच्या मनात कायमचा कोरला गेलेला असतो, पण इतक्या वर्षाने अशा शास्त्रोक्त
पद्धतीने घेतलेल्या रॅगिंगचे अप्रूप वाटते. माणूस घडायला किती उपयोगी पडले हे
आठवून बरे वाटते.
आयएमएत रायडींग आहे, पोहणे आहे, नित्य व्यायाम
आहे, मेस एटीकेट्स आहेत, हल्लीच्या मॅनेजमेंट टेक्निक्स मध्ये शिकवले जाणारे सॉफ्टस्किल्स्
आहेत, वेगवेगळे हॉबिक्लबस् आहेत. ह्या सगळ्याने जिसीची परसनॅलिटी डेव्हलप
होते, ह्याच बरोबर त्याची अभिव्यक्ती फुलण्या मागे निश्चितच रॅगिंगचा भाग
आहे. प्रत्येक नव्या येणाऱ्या जिसीला
रॅगिंगची कल्पना होती, फक्त किती व केव्हा होते ते माहीत नव्हते. नाही म्हणायला सुब्बू
सारखी काही सॅम्पल्स बघायला मिळाली. सुब्बूने आल्या आल्या एका सीनियरला त्याचे
ऑफिस कोठे आहे म्हणून विचारले होते. अभियांत्रिकी करून महाशय आयएमएत दाखल झाले
होते. मनात शंका बऱ्याच होत्या. सिनीयर्सने रॅगिंग घेऊन सुब्बूचे सर्व डाऊट्स
व्यवस्थित क्लियर केले. नव्या मुलांचे
सत्र सुरू झाले व आमचे सत्र पुढे सरकत होते. जिसी विनीत सिंग ने पॅरामेडल जिंकले
होते. पॅरामेडल जिंकणारा आयएमएचा हीरो असतो. पॅरामेडल जिंकण्यासाठी आयएमएतले जिसी
महिनाभर मेहनत करतात. पॅरामेडलच्या चुरशीत पहिल्या भागात पूर्ण बॅटल ऑर्डर मध्ये
दहा मैल म्हणजे सोळा किलोमीटर क्रॉसकंट्री रेस असते. ती झाल्या झाल्या ओटीसीटी रेंज
वर पूर्ण ओटीसीटीची कवायत पूर्ण करायची, तिसऱ्या भागात त्याच बॅटल ऑर्डर ड्रेस
मध्ये शंभर मीटर पोहायचे व चवथ्या भागात त्या ओलेत्याने फायरिंग रेंजवर जाऊन
फायरिंग करायची. प्रत्येक भागाचे मार्क व वेळ जोडून पहिल्या येणाऱ्याला पॅरामेडल
मिळते. आमच्या कोर्स मध्ये ह्या मेडलचा मानकरी जिसी विनीत सिंग होता. पुढे तो पॅरा
कमांडोत गेला.
ह्याच सुमारास आम्हाला
आर्मीतल्या वेगवेगळ्या आर्मास् बद्दल माहिती द्यायला सुरवात झाली. फायटिंग आर्मस्
कोणत्या त्या सांगितल्या व आम्हाला निवड करायला सांगितली. आम्ही प्रत्येकाने
आम्हाला आवडणाऱ्या आर्मस् साठी अर्ज केले. अमितचा पेरंटेल क्लेम होता त्याने
त्याच्या वडलांची युनिट मिळावी असा अर्ज केला. आर्मी मध्ये पेरंटल क्लेमला खूप
महत्त्व आहे. त्यामुळे त्याला ती मिळणार हे जवजवळ निश्तितच होते. पेरंटल क्लेम
मुळे रेजीमेंटबद्दलची आस्था धृढ होत जाते. आपले वडील ह्याच पलटनीत होते. ह्यातल्या
जवानांबरोबर आपण लहानपणी खेळलो असल्या कारणाने आपण सगळ्यांना ओळखतो. अशा पलटनीत
जाणे म्हणजे आपल्या घरीच जाण्यासारखे वाटते.
(क्रमशः)
No comments:
Post a Comment