Saturday, July 2, 2011

सुरवातीचे दिवस – भाग १




मी सकाळी चार वाजता उठून तयार झालो. अंगणात आलेला चहा व बिस्किटे खाऊन प्रि मस्टर साठी फॉल इन झालो. आमचे सीनियर्सचे ते काम होते की आमचा पोषाख – टर्न आऊट बरोबर आहे का तो बघणे व नसेल तर परेड आधी करवून घेणे. आम्ही सगळे आयएमएला शोभेल असा सोल्जर कट घेतला होता. म्हणजे कानावरती एक इंच भर सगळे केस छाटणे व डोक्यावरील बाकीचे एकदम बारीक करणे. पुण्याच्या राष्ट्रीय रक्षा प्रबोधिकेच्या कॅडेटस चे केस पण असेच छोटे छोटे कापलेले असतात. छोटे झाल्या मुळे केस उभे राहतात व कॅडेटस चे डोके फणसाच्या साली सारखे दिसते म्हणून पुण्यातली कॉलेजातली मुले असल्या केस कापलेल्या कॅडेटला फणस असे म्हणतात. पुढे दर आठवड्याला शनवारी दुपारी हेअर कट घ्यायची सवयच झाली कारण नाहीतर शिक्षा ठरलेली. प्रत्येकाने गुळगुळीत दाढी केलेली. दाढी रोज करायची असा नियम आहे व तो पोषाखाचा एक भाग आहे. तो पर्यंत मी चार दिवसातून एकदा दाढी करायचो. आम्हाला पोषाखातल्या आमच्या चुका समजावून दाखवल्या व ताकीद दिली की समजावलेल्या चुका परत दिसल्या तर शिक्षेस पात्र व्हाल म्हणून. हे सगळे करे पर्यंत सकाळचे साडे पाच वाजले होते.



आम्ही पिटी परेड साठी निघालो, आठ जिसीजचा सायकलचा स्क्वॉड केला, पाठीवर शर्टाच्या कॉलरला दुसऱ्या तासाला लागणारे कपडे टांगलेला हॅन्गर अडकवला, त्याचबरोबर, उजवा आणि डावा ड्रिल बूट एकमेकांच्या नाड्याने बांधून सायकलच्या हॅन्डलवर अडकवला व पिटी ग्राउंड वर येऊन धडकलो. सकाळची कवायत म्हणजे पिटी, आमचा पिटी उस्ताद हवालदार केसरराम घ्यायचा. पिटी परेडला संख्या घेतली तेव्हा पहिल्यांदाच आम्ही आमचा डायरेक्टींग स्टाफ बघितला. प्रत्येक प्लटून साठी एक डायरेक्टींग स्टाफ होता, त्याचे काम हॉस्टेल वॉर्डन् सारखेच असायचे व अजून पुष्कळ जबाबदाऱ्या होत्या त्या डायरेक्टींग स्टाफवर. डायरेक्टींग स्टाफ एक सैन्य आधीकारी असतो. आयएमएतला अभ्यासक्रम घेणारे सगळेच सैन्य अधिकारी आमच्या साठी डायरेक्टींग स्टाफ म्हणजे डिएस असायचे. आमचा डिएस कॅप्टन गिल होता. कॅप्टन गिल स्वतः २४, २५ वर्षांचा असल्या कारणाने, प्रचंड उत्साह ओतप्रोत भरलेला, स्फुर्तीदायक आधीकारी होता. आमचा मानदंड होता. त्याने फॉल इन घेतले. पाहिलाच दिवस असल्या मुळे आम्हाला त्याने पिटीचा सिलॅबस सांगितला.



कमीत कमी २५ पुशअपस्, २५ सिटअपस्, व्हर्टिकल रोप, होरीझॉन्टल रोप, १३ मिनटात २ माइल पळणे, मंकी रोप, जंप एंड रिच, फायरमॅन लिफ्ट, ८ फिट डीच पार करणे, १५ पुलअपस असा पाहिल्या सहामाहीसाठी अभ्यास होता. त्याचा सराव रोज सुरू करायचा होता. जे एनडीए मधून आले होते त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आधीच माहीत होत्या पण आमच्या सारखे सिव्हिल वातावरणातून आले होते त्यांच्यासाठी हे सगळे नवीन होते. त्यातल्या त्यात मला निदान पुशअपस् सिटअपस् माहीत होते कारण पूर्वी शाखेत जायचो तेव्हा सूर्यनमस्कार, जोर, बैठका काढायचो. पण बऱ्याच जणांना ह्यातले काही माहीत नव्हते.



नाऊ फर्स्ट थिंग्स फर्स्ट. युअर टर्न आऊट. बिफोर वी स्टार्ट प्रॅक्टीसिंग, यु ऑल मस्ट लर्न टु ड्रेस अप प्रॉपर्ली फॉर द परेड (म्हणजे प्रि मस्टरचा बट्ट्याबोळ). असे म्हणत कॅप्टन गिलने काही जणांना बनियन चांगला खोचला नाही म्हणून बाहेर काढले, काहींच्या सॉक्स मध्ये दोष काढला, काहींच्या शु लेसेस बांधण्यात दोष काढला व माझ्या गालावरून हात फिरवीत दाढी निट झाली नाही म्हणून मला बाहेर काढले. एकही जिसी उरला नाही ज्याच्या टर्न आऊट मध्ये काही दोष नाही असा. मग आम्हाला सगळ्यांना एका ओळीत उभे केले व म्हणाला



टुडे वी विल जस्ट कॉनसंट्रेट ऑन डिसिप्लीन रादर दॅन पिटी.

आय डोंट वॉन्ट धिस शॅबिनेस टुबी रिपीटेड अगेन. नाव गेट रोलिंग.



जे एनडीएतून आले होते त्यांना माहीत होते रोलिंग ह्या शब्दाचा अर्थ. आता हे रोलिंग काय प्रकरण आहे ते समजावून सांगतो. आपण कशा लहानपणी गाद्या टाकल्यावर कोलांट्याउड्या मारायचो. अगदी तशाच कोलांट्याउड्या मारणे म्हणजे रोलिंग. फक्त हे रोलिंग गाद्यांवर नाही करायचे तर कोठेही होऊ शकते व कोणत्याही पोषाखात होऊ शकते. त्यामुळे आम्ही रोलिंग करायचा प्रयत्न करायला लागलो. हळू हळू जमू लागले. रोलिंग जर निट जमले नाही तर पाठीच्या कण्याला व डोक्याला खूपं छोटे छोटे दगड टोचतात. अगदी असह्य होते. पण जसे आपण रोलिंग मध्ये तरबेज व्हायला लागतो तसे त्यातल्या खुब्या कळतात. रोलिंग मध्ये आपली मान आपण जेवढी दुमडू व मणका जेथून सुरू होतो त्याच्या वरच्या बाजूवर मानेच्या मागच्या भागावर पहिल्यांदा भार दिला म्हणजे डोके वाचते. पुढे एवढा जोर देऊन शरीर पालथे घालायचे की मणका लागतच नाहीत जमिनीला. आदळतात फक्त आपले कूले. ईश्वराने त्या पार्श्व भागाची जनुकही तेवढ्यासाठीच घडण अशी काही केली आहे की बरोबर रोलिंग केल्याने अलगद सगळा भार कमर व कुल्ल्यावर येतो व न लागता कोठेही रोलिंग केले जाऊ शकते. पण ही कला दोन चारदा डोक्याला व मणक्याला दगड टोचे पर्यंत आत्मसात होत नाही. मग आम्ही पिटी परेड भर फक्त रोलिंगचीच सवय करत होतो. आता मला समजून चुकले की प्रत्येकाला पिटी ड्रेसचे ५ जोड का दिले होते ते, कारण पूर्णं पिटी ग्राउंड छापले गेले होते आमच्या कपड्यांवर एव्हाना, सकाळच्या दवाने तर अजूनच कपडे मळले. सकाळची सगळी झोप निघून गेली. आता पुढचा तास होता ड्रिलचा.



पिटीचा तास जसा संपला तसा आम्ही स्क्वॉड बनवला व ड्रिलस्क्वेअर कडे निघालो. अंतर साधारण २ किलोमीटर. प्रत्येक वेळेला स्क्वॉड ने जाताना कोणी आधीकारी दिसला की सगळ्यात पुढचा सायकल स्वार एखाद्या मशीन सारखे स्क्वॉड साsssवधान म्हणायचा, लागलीच आम्ही सारे सायकल स्वार पाठीचा कणा अजूनच ताठ करून मान वर करून त्याला दुजोरा द्यायचो. जसा आधीकारी शेवटच्या सायकाल स्वाराला पार करायचा तसा शेवटचा सायकल स्वार स्क्वॉड विssssश्राम असे ओरडायचा, अधिकाऱ्या ऐवजी जर सुभेदार आला तर पाहिला सायकल स्वार जयहिंद साब असे त्याला अभिवादन करायचा व तो सुद्धा कडक सॅल्यूट मारायचा. जर मधूनच हे करायचे राहून गेले तर एखादा स्क्वॉड पुढची पाच मिनिटे गळ्यात सायकली अडकवून उठाबशा काढताना आढळायचा. गळ्यात कधी सायकली अडकवल्यात का कोणी. आम्ही अडकवल्यात. सोपे असते तसे पण ह्यात वेळ जातो व पुढच्या तासाला उशीर होतो. परत उशीर का झाला ह्याचे कारण न विचारताच उशीर झाल्याची शिक्षा सुरू होते. हिरो किंवा एटलासच्या सिट व हॅन्डल मध्ये आडवा दांडा असलेल्या जेंट्स सायकलचा दांडा मानेच्या मागे ठेवला की आपोआप आपले डोके त्या सायकलच्या दांड्यांच्या त्रिकोणात जाऊन सायकल गळ्यात अडकते, हात सुटे राहतात व उठाबशा पण काढता येतात. हे आत्ता पर्यंत मला कोणच्याही कॉलेजांत शिकायला मिळाले नव्हते.



स्क्वॉड करुन आम्ही ड्रिल स्क्वेअरपाशी आलो. सायकल स्टॅन्ड मध्येच पटापट कपडे बदलले व फॉल इन झालो. ड्रिल रिग बदलण्यास बऱ्याच जिसीज ना वेळ लागला व रिपोर्ट देण्यास साहजिकच उशीर झाला. आता तेथल्या ड्रिल उस्तादाची वेळ होती आमचा ड्रिल रिग तपासण्याची. पिटी परेड पेक्षा ड्रिल रिग मध्ये बरीच अवधाने सांभाळायची असतात, बेल्ट, बॅरे, शर्ट खोचणे (शर्टाची फक्त तीनच बटण दिसली पाहिजेत आठवते ना) वगैरे, व त्यात बऱ्याच चुका ड्रिल उस्ताद ने काढल्या. बॅरे चापुनचोपून लावणे म्हणजे एक कठीण कला आहे. बॅरे जरका चुकीची घातली तर फुगलेल्या भटोऱ्या सारखी दिसते. आडवी सपाट घातली गेली तर कडक पोळी किंवा चपाती सारखी दिसते पण जर बॅरेचा आयएमएचा बिल्ला डाव्या डोळ्याच्या रेषेत वर आणला व बाकीचे कापड डोक्यावर चापून बसवून तिरपे उजव्या कानाच्यावर आणले व बॅरेची कपाळावर बसणारी पट्टी आणि भुवया ह्यात तीन बोटांचे अंतर सुनिश्चित केले की मग मुंडा एकदम छान रुबाबदार दिसतो. आम्हाला ड्रिल उस्तादाने सांगितले की जो पर्यंत ड्रिल टेस्ट पास होत नाही तो पर्यंत आम्हाला सॅल्यूट करण्यास मनाई आहे व पी कॅप घालण्यास सुद्धा मनाई आहे, हे सांगितल्यावर ड्रिल परेड मध्ये गणवेश निट नाही म्हणून ड्रिल उस्ताद ने परेड ग्राउंडच्या चार फेऱ्या हात उंच करून रायफल हातात आडवी घेऊन पळत लावायला सांगितल्या. आता साडे पाच किलो वजनाची रायफल हातात उंच धरून आडवी घेऊन पळायचे म्हणजे नाकात दम येतो हे पळाल्यावर कळते. आयएमेत वेपन ट्रेनिंग, ड्रिल, घोड स्वारीचे काही वर्ग 'साब' म्हणजे सैन्यातले सुभेदार घेतात व त्यांना मदतीला व आम्हाला शस्त्रांचे हिस्से पुर्जे उघडणे, जोडणे, ड्रिल व पिटी शिकवून आणि करवून घ्यायला उस्ताद म्हणजे सैन्यातले हवालदार किंवा नायक असतात. आमची परिस्थिती अशी होती की शिकवताना सैन्यातला नायक सुद्धा आम्हा जिसीजना सहजच शिक्षा करायचा. अशा त्या ड्रिल उस्ताद ने दिलेल्या शिक्षेतच ड्रिल पिरेड संपला आणि आम्ही रायफली शस्त्रागारात ठेवल्या. शस्त्रागाराला सैन्यात कोत असे म्हणतात. आयएमएत दोन प्रकारच्या रायफली प्रत्येक जिसीला मिळतात. एक रायफलीच्याच आकाराची, वजनाची व दिसण्यात अशी असलेली ड्रिल प्रॅक्टिस रायफल व दुसरी खरी रायफल. ड्रिल आम्हाला ड्रिल प्रॅक्टिस रायफलने करायला लागायची.



आम्ही ब्रेकफास्ट साठी मेस मध्ये पोहोचलो. पंधरा मिनटात ब्रेकफास्ट संपवला. सकाळच्या सगळ्या व्यायामाने भलतीच भूक लागली होती. त्यामुळे दलीया, ब्रेड, एग ऑम्लेट व दूध पटकन पोटात गेले. पुढे आमचे साडे बारा वाजे पर्यंत क्लासेस होते. त्यात टॅक्टिक्स्, विपन ट्रेनिंग, रेडियो टेलिफोनी कम्युनिकेशन ह्या सगळ्याचे धडे होते. आम्हाला त्यात काही स्वारस्य राहिले नव्हते. इतके दमलो होतो की झोप अनावर होत होती. पण झोपलेला जिसी दिसला की त्या पायऱ्या पायऱ्यांच्या वर्गात बाकांच्या मध्ये रोलिंग करायला लागायचे. त्यामुळे माझा सगळा वेळ झोप आवरण्यात गेला. काय शिकवले ते कळले काहीच नाही. वहीत लिहून सुद्धा घेतले नाही. दुपारी मेस मध्ये जेवण झाले. पोळीचे तुकडे बोटाने न तोडता, त्याची सुरनळी करून डाव्या हातात धरून एकेक घास तोंडाने तोडून चमच्याने डाळ (आपली आमटी), भाजी, भात खाण्याचे तंत्र पहिल्यांदाच येथे बघत होतो. शाकाहाऱ्यांसाठी डाळ भात भाजी, मांसाहारी असतील त्यांच्या साठी ह्या व्यतिरिक्त एक मांसाहारी डिश असे. मला कधी एकदा रूम मध्ये जाऊन झोपतो असे झाले होते. वेळापत्रका प्रमाणे आता एकदम दुपारी ४ वाजता गेम्स पिरियड होता.

(क्रमशः)

No comments:

Post a Comment