Tuesday, May 17, 2016

राजाराम सीताराम एक ..................भाग १७.............. मुंबईचा मित्र


 

ह्या आधीचे............आस्थेचे बंध

 

........आम्ही खोटेखोटे चेहऱ्यावर हसू आणायचा प्रयत्न केला. पण घरी जाऊ देणे त्या ऐवजी बिअर पाजणे हे माझ्या कोठल्याच कोष्टकात बसत नव्हते. सुनील खेर बाकीच्या शिक्षा भोगणाऱ्या जिसीजना बरे वाटले आता त्यांच्या बरोबर पहिल्या सत्राचे कोणीच सुट्टीत घरी जाणार नव्हते.

 

 

मुंबईचा मित्र

 

आम्ही पहिल्या सत्राचे उरलेले दिवस रेटायला लागलो. खूप कठीण जात होते. मी मनाने कधीच घरी पोहोचलो होतो. त्यामुळे जीव रमत नव्हता, इतके दिवस घरी जायची वाट बघितली घरीच जायला मिळाले नाही त्याचे दुःख जास्ती. पहिल्यांदाच माहीत असते तर मनाची तयारी  केली असती. मनाला समजावणे आता खूप कठिण झाले होते. पण नाईलाज होता. कधी कधी पर्याय असणे हा शाप ठरतो नाईलाज हा फार मोठा वर ठरतो. पर्याय असण्याने चुकीची निवड होऊ शकते आपण निवड केली त्या पेक्षा दुसरी निवड सरस ठरली तर? असे मनात नेहमी येत राहते. त्या पेक्षा जर नाईलाज असेल तर निवड करायची जरूर नसते जे आहे तेच भोगू त्यातच आनंद मानू असे मनोबल तयार होते. तेवढ्यात मला आशिष कार्लेकरचे पत्र आले. आशिष कार्लेकर माझा रुईया कॉलेज मधला मित्र. आर्मीच्या सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड जे एसएसबी म्हणून प्रसिद्ध आहे त्यासाठी आम्ही दोघे एकत्र भोपाळला गेलो होतो. आमच्या बॅच मध्ये चाळीस पोरं आली होती. हे सिलेक्शन आर्मी, नेव्ही, एअरफोर्सला जाऊ इच्छुकांना देणे जरूरीचे असते. निवड प्रक्रिया चार दिवसाची असते. पाहिल्या दिवशी सायकॉलॉजीकल परीक्षा असतात. छान असतात. त्यात वेगवेगळी चित्र पटापट पडद्यावर प्रदर्शित करतात. प्रत्येक चित्र जेव्हा प्रदर्शित होते तेव्हा दहा सेकंदात त्या चित्राला पाहून मनात काय आले ते कागदावर लिहायचे असते. एका मागून एक खूप चित्र दाखवतात. विचार करायला वेळ राहत नाही आपल्या मनाची स्थिती जशी असेल त्या प्रमाणे आपण चित्रा संबंधी लिहायला लागतो. आपल्या मनात काय चालले आहे ते तज्ञ बरोबर ओळखतात. त्या नंतर काही सिचुएशन्स रेखाटलेले असतात अर्धी गोष्ट आपल्याला पुरी करायची असते. ह्या अशा विविध परीक्षांमधून आलेल्या पोरांची मानसिकतेचा अभ्यास करतात. त्यांना विशिष्ट प्रकारची मानसिकता हवी असते. काहींची आत्महत्येची सुप्त प्रवृत्ती असते. काही निराशावादी असतात. काहींच्याकडे आपलेपणा नसतो. आलेल्या मुलांमध्ये साहस, एकदूसऱ्याला घेऊन पुढे जायची मानसिकता, नेतृत्व गूण, ध्येयसिद्धीचा अट्टहास अशा सारखे गूण शोधण्याचा प्रयत्न होतो. दुसऱ्या दिवशी ग्रुप डिस्कशन ग्रुप टास्क्स असतात. ग्रुप टास्क्स मध्ये अगदी सोपे सोपे टास्क देतात. वेळ दहा मिनिटे दिलेली असतात. ग्रुप टास्क ऑफिसर मग लांब राहून फक्त त्या ग्रुपला न्याहाळतो. तो ग्रुप तो टास्क दहा मिनिटात कसा सोडवतो, त्या ग्रुप मध्ये नैसर्गिकरीत्या कोण नेता म्हणून उभरतो. ग्रुपमधल्या मुलांचे टीम स्पिरिट कसे आहे, एकमेकांशी कसे नाते बनते हजार गोष्टी. तिसऱ्या दिवशी पॅनल इंटरव्युव असतो. चवथ्या दिवशी निकाल जाहीर करतात. आमच्या त्या चाळीसच्या बॅचचा निकाल देण्याआधी सिलेक्शन बोर्डाच्या प्रेसिडेंट ने छोटेसे भाषण दिले होते. म्हणतो आर्मीसाठी अधिकाऱ्यांचे सिलेक्शन एका विशिष्ट प्रकारे केले जाते. आम्हाला एक विशिष्ट प्रकारची मानसिकता असलेले होतकरू पाहिजे असतात त्यावर आधारीत आमची निवड प्रक्रिया असते. त्यामुळे ह्या प्रक्रियेत ज्यांचे सिलेक्शन होत नाही त्यांनी त्यांच्यात काही कमी आहे असे वाटून घेऊ नाही. ह्या एसएसबी सिलेक्शनला अमिताभ बच्चन पण आला होता तो सिलेक्ट होऊ शकला नव्हता. आज बघा तो कोठे आहे. आम्हाला येथे जसे बुद्धू मुले नको तसे खूप बुद्धिमान मुले पण नको असतात. आम्ही लिडरशीप क्वालिटी, टीम मध्ये बसणारा, शरीर मनाने कठोर असलेली ऍव्हरेज इंटलीजन्सची मुले शोधत असतो. त्यामुळे ज्यांची निवड होत नाही त्यांनी वाईट वाटून घेऊ नये ज्यांची निवड होते त्यांनी असे वाटून घेऊ नये की ते कोणी आईन्स्टाईन आहेत. असे म्हणत त्याने निकाल जाहीर केला. आमच्या चाळीस जणांच्या ग्रुप मधून आठ जणांची निवड झाली होती. काही काही चाळीस चाळीस मुलांचे ग्रुप्स निवड होताच परत पाठवले जातात. पास झालेल्या आठात मी होतो, आशिष कार्लेकर बाकीच्या बत्तीस मधला एक होता. पुढे मी आयएमएत जेव्हा रगडा खात होतो तेव्हा आशिष बंगळूरच्या आय आय एम मध्ये मॅनेजमेंट शिकत होता.

 

पहिल्या सत्राच्या शेवटच्या आठवड्यात तो मला भेटायला येणार असे पत्र आले. त्याला माझ्या बरोबर दोन दिवस राहायचे होते. पण आयएमएत असे काही करता येण्या सारखे नव्हते म्हणून तो डेहराडूनला हॉटेलात उतरला. रविवार होता, मला भेटायला सकाळीच आला. मला जेवढे जमले तेवढे त्याला आयएमएचे दर्शन करून आणले. माझी प्लटून दाखवली. प्लटून मागे खूप मोठी लिचीच्या झाडांची बाग होती. लिची हे फळ आयएमएत येण्या आधी कधी खाल्ले नव्हते. पण लांबच लांब पसरलेल्या लिचीच्या बागांतून लिची तोडून खायला केव्हा आम्ही लागलो ते समजलेच नाही. ती लिचीची बाग आमच्या प्लटूनच्या जिसीज साठी विशेष होती. त्या लिचीच्या बागेच्या एका कोपऱ्यात एक चोर वाट होती जी जंगलातून डेहराडून गावाजवळ असणाऱ्या घंटाघराजवळ उघडायची. चोरावाटेने मध्येच राजापूर रस्त्या पर्यंत सरळ पोहचता यायचे. त्यामुळे त्या चोरवाटीचे आम्हाला आकर्षण होते. मी कधी गेलो नव्हतो पण कधीकधी कोणी गेले होते असे ऐकिवात होते. रविवारच्या लिबर्टीची वेळ संध्याकाळी आठला संपायची. एखाद दुसऱ्या जिसीला उशीर झाला तर तो ह्या चोरावाटेने लपतछपत आल्याच्या गोष्टी आम्ही प्लटूनकर ऐकायचो. पण ह्या वाटेने अडचण अशी होती की ह्या वाटेने सायकलने नाही येता यायचे. कारण त्यात छोटी टेकडी चढून यावे लागायचे घनदाट झाडी असायची. ह्या झाडीला आम्ही १४ प्लटून जंगल म्हणायचो. त्यामुळे एखाद दुसरा उशीर झालेला प्लटून चवदाचा जिसी अशा गुप्त वाटेने आल्यामुळे शिक्षेतून सुटायचा. आयएमचे रेजिमेंटल पोलीस क्वचितच त्या रस्त्याला असायचे. आमच्या प्लटूनचा हा गुप्तमार्ग वारसाहक्क होता. लिचीची बाग आम्हा चवदा प्लटूनकरांना ह्याच कारणास्तव  फार जवळची होती. बाग दाखवून झाल्यावर, त्याला मी चेटवोडची बिल्डिंग परेड ग्राउंड दाखवले. बिल्डिंग बघून तो भारावून गेला. आम्ही भेटलो तेव्हा जाणवले, त्याला आयएमएत येता आले नाही त्याची खंत उराशी अजून बाळगून होता.  खरे तर तो आय आय एम मध्ये शिकत होता. लवकरच कोर्स संपल्यावर कोठल्या तरी कंपनीत लठ्ठ पगारावर लागणार होता हे निर्विवाद होते. पण कोणाचा जिव कशात असतो त्यातच तो घुटमळतो. हल्ली तो गेली बरीच वर्षे अमेरिकेत कोठेतरी कंसलटंट म्हणून आहे. बक्कळ मिळवले आहे, पण मधून मधून आर्मी मध्ये नसण्याची आठवण येते त्याचे जड झालेले मन दिसून येते.

 

हमदोनो, संगम, सात हिंदोस्तानी, हिमालय की गोद मे, संगम, विजेता, रंग दे बसंती, बॉर्डर असल्या चित्रपटाने जे ग्लॅमर लष्कर अधिकऱ्याला चिकटवलेले आहे त्याने बरीच लोक मोहित होतात. चित्रपटातून सेनाधीकाऱ्याचे जे जीवन रेखाटलेले असते ते पाहून बऱ्याच जणांना ही जीवन पद्धती फार लुभावणारी वाटते. बऱ्याच जणांना आर्मीचा गणवेश भयंकर आवडतो. त्या ओजी गणवेषावर जाड पट्टा इतका उठावदार दिसतो. लोकांना फार आवडतो. ह्या दिसणाऱ्या ग्लॅमरला दिसणाऱ्या पण समजून घ्यायच्या त्याग बलिदानाच्या झालरीने सैनिकांची नोकरी आकर्षक वाटते. ती फील्ड मधली पोस्टिंग, नावा पुढे लागणारी पदाची बिरुदावली, युद्ध होते तेव्हा थोड्या वेळे पुरते जवानाला मिळणारा संपूर्ण देशाचा पाठिंबा प्रसिद्धी, ह्या सगळ्या गोष्टी ग्लॅमर वाढवतात काहींना सेनेकडे आकृष्ट करतात. आशिष कार्लेकर सारख्याना सैन्यात जायचे राहून गेले ह्याचे जन्मभर वाईट वाटत राहते. 

 

रविवारचा पूर्णं दिवस त्याच्या बरोबर काढायचा असे ठरवून, उशीर झाला गरज पडलीतर लिचीच्या बागेतल्या गुप्त मार्गाने यायला सोपे जावे म्हणून बरोबर एक सिव्हिल ड्रेस घेतला. खरे तर मी कधी असले प्रकार केले नव्हते पण त्या दिवशी कसे सुचले फार विचार करता कसा काय नियम तोडण्याचा निर्णय घेतला कळलेच नाही. कधी कधी काही निर्णय क्षणात घेतले जातात. नेहमी नियमांचे पालन करणारे क्वचित जर वाटे वरून घसरले तर लागलीच तोंडघशी पडतात. घंटाघर, क्लेमेन्ट टाऊन, राजापूर रस्ता असे गावात त्याच्या बरोबर पायी हिंडल्यावर, कुमार स्विट्स मधून पाणीपुरी खाल्ली. संध्याकाळचे सहा वाजत आले होते. माधुरी दीक्षितांचा तेजाब पिक्चर रिलीज झाला होता. आम्ही तो बघितला. पिक्चर संपायला रात्रीचे नऊ वाजले होते. आता त्या गुप्त वाटे खेरीज गत्यंतर नव्हते. मी त्याच्या हॉटेलच्या रूमवर जाऊन मुफ्ती ड्रेसच्या ऐवजी सिव्हिल ड्रेस चढवला, त्याचा निरोप घेतला भरल्या मनाने परतीच्या मार्गाला लागलो. राजपूररस्त्याच्या गुप्त मार्गाच्या वळणावर क्षणभर सगळीकडे नजर टाकली, रेजीमेटल पोलीस नाही असे बघून पटकन चवदा प्लटूनच्या जंगलात पसार झालो. भयंकर घाबरलो होतो, जंगलाला नाही, तर आपल्याला असे पकडू नये कोणी म्हणून. मार्ग काही छोटा नव्हता, साधारण तीन किलोमीटरचा जंगलातून जाणारा मार्ग. दूरवर जसे मॅकटीला कंपनीचे दिवे दिसायला लागले तसा जिवात जीव आला. आता लिचीची बाग जवळच. हळूच तारेचे कुंपण ओलांडून मांजराच्या पावलाने मी लिचीच्या बागेत पाऊल टाकले, मागून कोणीतरी ओरडले. "ये जिसी सावधान". मला समजले. रेजीमेंटल पोलीस अर्थात आर-पी ने पकडले. आपण कधी कधीच असले करायला जातो, नेमके पकडले जातो, बाकीचे आरामात सगळे नियम धाब्यावर बसवून सर्रास जगतात त्यांना काहीच कसे होत नाही ह्याचे कोडे मला आज पर्यंत सुटले नाही. कधीतरीच सिग्नल तोडला जातो पोलीस पकडतो. मध्यम वर्गाचे हे लक्षणच आहे असे दिसते. खूप श्रीमंत नियम धाब्यावर बसवतात, खूप गरीब लोकांना नियमांचा उपयोग नसतो. रेजीमेंटल पोलीस ने पकडल्यावर व्हायचे तेच झाले, दुसऱ्या दिवशी पासून मी पाच दिवसाच्या रेस्ट्रिकश्नस् वर रुजू झालो. हा सगळा गोंधळ माधुरी दीक्षित मुळे झाला असे अजून सुद्धा मी समजतो. म्हणजे माधुरी दीक्षित नेमका मी आयएमएत असतानाच तिचा पहिला हिट पिक्चर देते, तो नेमका त्याच आठवड्यात डेहराडूनच्या थेटरात लागतो नेमका मी उशीराचा शो बघून, माधुरीच्या माधुर्याने चढलेल्या नशेला रेजिमेंटल पोलिस ने पकडून नशा उतरवावी. चांगल्या गेलेल्या दिवसावर पाणी फेरले गेले. फजितीच झाली. तसे पाहिले तर माधुरीने मी एकदमच आमचे करिअर सुरू केले होते. तिने ज्या वर्षी तेजाब पिक्चर दिला, त्याच वर्षी मी आयएमएत दाखल झालो. आता ती अमेरिकेत असते मी कर्नल आहे पण कधी भेट झालीच तर मला मिळालेल्या रेस्ट्रिकश्नस बद्दल तिच्याकडे तक्रार करणार आहे. माझ्या शिक्षेचे पाप तिच्या माथ्यावर फोडणार आहे.

 

आज त्या गोष्टीला २५ वर्षे झाली. जेव्हा आयएमएत होतो तेव्हा एव्हढा एकच पिक्चर आय एम बाहेर जाऊन चोरून बघितला. त्या वेळचे ते एक दो तीन .. .. ..हे गाणे आवडले होते. माधुरीला बघताना हृदयाचा ठोका चुकला होता. त्या वेळचे आयएमए, तिचे गाणे, तो मित्र हे सगळे इतके मनात खोलवर रुतले आहे की अजूनही कोठे ते गाणे लागले तरी डोळ्यात चमक येते हृदयाचा ठोका चुकतो.

 

माझी बायको नेहमी म्हणते माधुरीचे नाव कानावर पडले की ह्याचे डोळे चमकतात. आपल्या आयुष्यात कोणी असे येऊन जाते की त्यांचे नाव उच्चारले गेले की डोळ्यात चमक येते. कधी ती माणसे कोठच्या तरी प्रसंगाने लक्षात राहतात, कधी त्यांच्यामुळे आपल्या आयुष्याला चांगली कलाटणी मिळालेली असते, कधी काही प्रसंगामुळे आपण त्यांच्या जवळ जातो किंवा त्या व्यक्तीच्या विचारांच्या जवळ जातो.  कधी कधी भेटलेल्या व्यक्तीचे आपले मनाचे धागे जोडले जातात असे जोडले जातात की आपण बरेच वर्षात जरी भेटलो नाहीतरी, त्या व्यक्तीची आठवण मधून मधून डोकावते. ह्यालाच म्हणतात नाते. नाहीतर ह्या धरतीवर सर्व एकटेच येतात आणि एकटेच जातात. पण काही माणसे आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडून जातात. काही जण आपल्या आयुष्यात एका घटने पुरती येतात असे काम करून जातात की आपण जन्मभर त्यांना विसरू शकत नाही. आपले आयुष्य जगताना आपल्यालाही असे कोणाच्या आयुष्यात येण्याचा योग असतो. आपल्याला भेटलेल्या चांगल्या व्यक्तींना आपण कधी देव माणूस म्हणतो, मित्र म्हणतो, सखा म्हणतो, हितचिंतक म्हणतो किंवा अजून काही. नात्याला काहीही नाव द्या. डोळ्यात चमक आणणाऱ्या अशा व्यक्ती सारखे आपणही एखाद्याच्या आयुष्यात त्यांना आवडणारा त्यांचा लुकलूकणारा तारा बनू शकू का? नकळत बनतही असू. 

 

असे तसे करत दोन जिसींना वगळून आमचा संपूर्ण कोर्स पहिल्या सत्रात पास झाला आम्ही दुसऱ्या सत्रात दाखल झालो. सुट्टी मात्र मिळाली नाही. घरी जाता आले नाही. आमच्या बरोबरचा एक जिसी रघुनाथ, मंकी रोप करताना पडून हात तुटल्यामुळे परीक्षा देऊ शकला नाही रेलिगेट झाला. हरबींदर वेळेत पोहणे शिकला नाही पोहण्याच्या परीक्षेत नापास झाला. तोही रेलिगेट झाला. त्यांना हेच सत्र पुनः करावे लागणार होते.  नवे सत्र जोमात सुरू झाले. आम्ही सीनिअर झालो. आमच्या डोक्यावर कोणी सीनियर जिसी नव्हते, त्यामुळे बराच रगडा कमी झाला. नवीन बकरे यायला एक आठवडा होता, आम्हाला कॅप्टन गिलने सीनियर्स च्या अपॉइंटमेंट्स दिल्या. परितोष शहा जेयुओ झाला, मी कॉर्पोरल, अमित बटालियन अंडर ऑफिसर, करिअप्पा बटालियन चा शोभित राय ऍकॅडमी अंडर ऑफिसर झाला होता. सुब्बूला कोणतीही अपॉइंटमेंट मिळाली नव्हती. अपॉइंटमेंट म्हणजे जास्त काम. अशा प्रत्येक प्लटून मधून ओएलक्यू परीक्षेतल्या मेरिट वर आधारीत एक दोन अपॉइंटमेंट धारकांना त्याच प्लटून मध्ये ठेवले जाते. ज्युनीयरर्स आले की आम्हाला जसे सिनियर्सने, मारून मुटकून आयएमएत राहण्या जोगे बनवले तेच काम आता ह्या अपॉइंटमेंट धारकांना करावे लागणार होते. काम खूप पण रॅगिंग घेण्याची मजा. ज्यांना अपॉइंटमेंट मिळाली नाही असे बाकीचे जिसी, वेगवेगळ्या बटालियन्स प्लटून्स मध्ये वाटले गेले. आम्ही जेव्हा दुसऱ्या सत्रात दाखल होत होतो, त्याच सुमारास आमचे सीनियर्स पासिंग आऊट परेड होऊन सैन्यातील आधीकारी म्हणून वेगवेगळ्या आर्मी युनिट्स मध्ये रवाना झाले. त्यांनी मोकळ्या केलेल्या खोल्या आता आम्ही घेतल्या.

 

(क्रमशः)